February 6, 2022
तुझा थोबडा पाहून मी
तुझ्या प्रेमात पडलोच नाही
तुला पाहून माझ्या हृद्याचे
ठोके चुकले पहिल्यांदाच...
मला वाटते तुझे आणि माझे
काही नाते असावे गतजन्मीचे
पण ते नाते प्रेमाचे नाही
तर कदाचित असावे शत्रूत्वाचेच
कारण क्षणात माणसांना
भुरळ घालणार्या मला
तुझ्या मागे उगाचच
धावत राहावे लागलेच नसते
वर्षानुवर्षे वेड्यागत...
© कवी – निलेश बामणे ( एन.डी.)
May 16, 2016
मी काय कथू जे साहियले ते तुजला?
डोळ्यात वाच या तू विरहाच्या गजला
तुजवाचून सारी मैफल रंगविताना
अश्रूत भिजवल्या मी कंठातिल ताना
ऐश्वर्य लेऊनी महाल होता धुंद
अंगणी ढवळे रातराणीचा गंध
झुंबरी पेटले दीप, उजळली रात
वर चंद्रकलेची अमृतमय बरसात
छेडिली तार मी ... ओठी आली तान
पायात नूपुरे हरपून गेली भान
मी ताल सूरांचे धुंद गुंफिले शेले
परि तुला शोधण्या सुर दिशातून फिरले
वेदनेवरी त्या रागदारीची शाल
लेऊन सजविले वादळ हृदयातील
स्वर भिजून गेला तुला तिथे स्मरताना
रसिकांनी हासुन डोलविल्या पण माना
मी काय कथू त्या मुक्या यातना तुजला?
डोळ्यात वाच या तू विरहाच्या गजला
तुजवाचुन सारी मैफल रंगविताना
अश्रूत भिजविल्या मी कंठातील ताना !
-सौ. राजलक्ष्मी देशपांडे
April 17, 2023
लाट उसळतां ती क्रोधाची, बळी घेतले कित्येकाचे
हिंसाचाराच्या लाटेमध्यें, सर्वस्व गमविले कांहींचे...१,
फार पूरातन काळीं आम्हीं, चालत होतो एक दिशेनें
कुणीतरी फोडून वाटा तेव्हां, विखरूनी टाकिली कांहीं मने...२,
त्याच क्षणाला बिज रूजले, धर्मामधल्या विषमतेचे
ईश्वराकडे त्या जाण्याकरितां, मार्ग पडती विविधतेचे....३,
विविधतेनें संघर्ष आणिला, भेदभावाची भिंत उभारूनी
विवेकाला गाडून टाकले, उफाळणाऱ्या भावनांनी,
चूक कुणाची सजा कुणाला, कालचक्राची रीत न्यारी
धर्म पंथांचे मार्ग आखूनी, सलोख्यात निर्मिली एक दरी
कमी न होईल अंतर हे, केवळ दुजा धर्म जाणतां
एकत्र येवूं तेव्हांच सारे, ईश्वरास तो एक समजतां
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
January 27, 2021
रोज थोडे तरी कार्य
केल्यावाचून राहू नकोस,
ब्रह्यांडनायक पहातायेत तुला
गुरूबोध मात्र विसरु नकोस....
तुझ्या वाटेत आडवे खूप येतीलही...
पायात पाय घालून पाडवतीलही....
घाबरून त्यांना तू तुझं
उभे राहणं सोडू नकोस..
सद्गुरू पहातायेत तुला
गुरूबोध मात्र विसरू नकोस
तुझं कौतुक प्रत्येकाला इथं
रुचेलच असं नाही...
कौतुकासाठी तुझं नाव
सुचेलच असंही नाही...
तू मात्र इतरांचं कौतुक
करण्यास कधी कचरु नकोस...
सद्गुरु पाहातायेत तुला
गुरूबोध मात्र विसरू नकोस
तुला सुद्धा मन आहे
माहीत आहे सद्गुरूला.....
पण ब्रह्मांडाचा स्वामी असताना काय रे कमी तुला....
इतरांना भरभरून देणं
मात्र कधी सोडू नकोस ...
सद्गुरू पाहातायेत तुला
गुरूबोध मात्र विसरू नकोस
रडावंसं वाटत तेव्हा
रडून सरळ मोकळा हो...
कार्यासाठी लढावंसं वाटत तेव्हा,
लढून ही मोकळा हो....
रडण्यामध्ये मात्र तुझे
कार्य कधी विसरू नकोस
सद्गुरू पाहातायेत तुला
गुरूबोध मात्र विसरू नकोस
तुझ्या कार्याचे पुरावे
कोणाला द्यायची गरज नाही...
कुणासाठी तुला कार्य
सोडायचीही गरज नाही....
सद्गुरू संकल्पासाठी पुढे
चालणं सोडू नकोस..
सद्गुरू पाहातायेत तुला
गुरूबोध मात्र विसरू नकोस
February 23, 2019
गर्दीत माणसांच्या लोटून हाय! मजला
स्वप्नात पाहिलेला माझा गुलाब गेला
त्या मखमली सुखाला मी स्पर्शिले न होते
अजुनी; तरीही त्याच्या का पाकळ्या गळाल्या?
शहरात आज साऱ्या ही 'ईद' चाललेली
त्याच्या स्मृतीत माझा सारा सुना मुहल्ला
त्या जायचेच होते निघुनी नवीन देशा
का शुभ्र हा दुपट्टा इष्कात रंगविला?
-सौ. राजलक्ष्मी देशपांडे
April 10, 2023
खोड्या करणे, त्रास देणे,
हाच बनला स्वभाव त्याचा
वाटत होते बघून त्याला,
दूरोपयोग करि तो शक्तीचा...१
पाय ओढणे, खाली पाडणे,
कपड्यावरी तो चिखल फेकणे
मारपिट ती करूनी केंव्हां,
गुंडपणा तो करित राहणे...२,
बेफिकीर ती वृत्ती तयाची,
स्वार्थाने तो भरला पुरता
तुच्छ लेखी इतर जनाना,
स्व आनंद साधत असतां....३,
'आनंद' मिळवणे हेच ध्येय,
जीवनाचे तत्त्व खरे ते
विपरीत मार्ग अवलोकितां,
समाधान राही दूर तेथें...४
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
June 1, 2016
-- स्वाती ठोंबरे.
December 4, 2021
June 2, 2022
बघा बघा तो रवि चालला, अतिशय वेगानें ।
पूर्व दिशेला चंद्रही येई, त्याच तन्मयतेने ।।
युगानु युगें लपंडाव हा, त्यांचा चालला असे ।
भावांमधली शर्यत बघूनी, गम्मत परी भासे ।।
मोठा भाऊ रवि त्याला, पकडण्या धांव घेई ।
लहान भाऊ चंद्र असूनी, निसटून मात्र जाई ।।
संताप येता लाल होऊनी, रवि जाई तापूनी ।
परि शांत असे चंद्र बघा, राग घेई गिळूनी ।।
लहान असूनी थकून जाई, कांही काळ जाता ।
नभीं न येतां घरींच झोपे, थकवा जाण्या करीता ।।
विश्रांतीचा काळ घालवूनी, हलके हलके येई ।
पुनरपि त्यांचा खेळ बघतां, आनंद मनास होई ।।
July 15, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti