April 1, 2022
मान्य आहे मजला वाल्या कोळी बनणे
खून लागल्याचा डाग लागला परी उद्धरुन जाणें ।।१।।
लुटालूट करुनी देह वाढविला
राम नाम जपूनी पावन तो झाला ।।२।।
प्रभू कृपा होऊनी महा कवी बनला
वाल्मिकी ऋषी बनूनी रामायण ग्रंथ रचिला ।।३।।
वाहून गेला पाप भाग तप प्रवाहाच्या वेगांत
धुवूनी गेला डाग जलाशयाच्या ओघांत ।।४।।
वाईट घटना घडते त्यास भोग म्हणावे
उद्धरुनी त्यांत जाणे ह्यास योग समजावे ।।५।।
जर होत असेल माझा वाल्मिकी ऋषि
मान्य मजला सजा जी प्रभूं तूं देशी ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmai.com
January 25, 2019
मनांतरीच्या भावनांना
शब्दातुनी मी माळीतो
अंतरातील गुज प्रीतीचे
भावगीतात मी मांडितो
स्पर्श! वात्सल्यप्रीतीचे
स्वरगंगेसवे, गुणगुणतो
गुणगुण आर्त भावनांची
मी हृदयांतरी आळवितो
गीता! ही प्रीतभावनांची
श्वासासंगे, मी गुणगुणतो
गीतात! नि:ष्पाप सुगंधा
गंधाळ! जीवनी दरवळतो
दिव्य! सुरम्य भावस्पर्ष
प्रीतशब्दातूनी,ओघळतो
लोचनी, तीच एक प्रीती
मी, मलाच भुलूनी जातो
कृपा ही त्याच दयघनाची
मी तिला मनांतरी स्मरतो
सदैव, हीच ओढ प्रीतीची
माझ्या गीतातुनी मांडतो
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ५६
२३ - २ - २०२२.
March 10, 2022
चेहऱ्याला सजवावे म्हणतो
अश्रूंना लपवावे म्हणतो,
नव्या ऋतूच्या स्वागताला
नव्याने उमलावे म्हणतो.
पुन्हा एकदा रुजावे म्हणतो
वादळवाऱ्यात तगावे म्हणतो,
कोसळणाऱ्या प्रपातातून
स्वत:ला वाचवावे म्हणतो.
पुन्हा एकदा उडावे म्हणतो
आभाळाला भेटावे म्हणतो,
सुकलेल्या एका दाण्यासाठी
दोन थेंब मागावे म्हणतो.
पुन्हा एकदा जगावे म्हणतो
ताठ उभे रहावे म्हणतो,
खोल ओलाव्याच्या शोधात
खोल खोल जावे म्हणतो.
झाडांपासून शिकावे म्हणतो
स्वत:ला सावरावे म्हणतो,
नको असलेले ओझे टाकून
पुन्हा एकदा बहरावे म्हणतो.
-- अभय बापट.
June 2, 2022
स्वयंप्रेरित, स्वयंप्रेषित हे सदा आपल्या जोषात
आभाळओझे घेऊन खांद्यावर धावधावती कैफात
नाही साथ कुणाची, नाही कसली सहानुभूती
तरीही चिंता जगाची, आसक्तीची करुन सक्ती
कुणी वंदा कुणी निंदा, करे कुणी वा वंचना
नादावलेल्या कर्मयोग्यांची असे व्रतस्थ आराधना
अशक्याचा हव्यास त्यांना, अचूकतेचा ध्यास केवढा
सौख्याशी करुन वाकडे, पुकारत स्वत:शी स्वत:चा लढा
आत्यंतिकाची अस्वस्थता सततच्या जणू प्रसूतिवेणा
अखंड असे हा होम पेटता, धगधगती अंतःप्रेरणा
रोरावणाऱ्या प्रपातास, कुठे कधी का उसंत आता
नशीबी त्यांच्या ती, तेवढी, एक शेवटची शांतता
बदकांच्या कुडीत कोणी कोंडिले हे राजहंस गोजिरे
अश्वत्थामाच्या जखमेला घेऊन कपाळीच्या देव्हारे
जनाकलनाच्या कक्षेपार भ्रमणारे हे भूस्तरीय तारे
ओसंडणाऱ्या गर्दीतही, एकाकी व्यथित बिचारे
हिंदोळून पारंब्यांना आशेच्या, लोंबकळती हुतात्मे
आसूसले प्रतीक्षेत मुक्तीच्या, केव्हाचे शापित आत्मे
- यतीन सामंत
August 23, 2022
आम्रवनांतील शोभा बघत, भटकत होतो नदी किनारी
मैनेची ती ओरड ऐकूनी, नजर लागली फांदीवरती...१
एक धामण हलके हलके , घरट्याच्या त्या नजीक गेली
पिल्लावरती नजर तिची, जीभल्या चाटीत सरसावली...२,
मैनेच्या त्या मातृहृदयाला, पर्वा नव्हती स्वदेहाची
जगावयाचे जर पिल्लासाठी, भीती न उरी ती मृत्यूची...३
युक्त्या आणि चपळाईने, तुटून पडली त्या मृत्यूवरी
रक्त बंबाळ ते केले शरीर, चोंच मारीत धामणीवरी....४
अखेर धामण वृक्ष सोडते, जखमी होवूनी शरिराने
पिल्लामध्ये बसूनी मैना, शांत करिते हृदय स्पंदने
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 16, 2021
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!
तिचं बोलणं, तिचं हसणं
जवळपास नसूनही जवळ असणं;
जिवणीशी खेळ करीत खोटं रुसणं;
अचानक स्वप्नात दिसणं !
खटयाळ पावसात चिंब न्हायचं !
माझं काय, तुमचं काय
प्रेमात पडलं की असच व्हायचं !!
केसांची बट तिने हळूच मागं सारली ...
डावा हात होता की उजवा हात होता?
आपण सारखं आठवतो,
प्रत्येक क्षण,
मनात आपल्या साठवतो
ती रुमाल विसरुन गेली !
विसरुन गेली की ठेवून गेली?
आपण सारखं आठवतो,
प्रत्येक क्षण मनात आपल्या साठवतो !
आठवणींचं चांदण
असं झेलून घ्यायचं !
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!
तिची वाट बघत आपण उभे असतो ...
ठरलेली वेळ कधीच टळलेली !
येरझारा घालणंसुद्धा
शक्य नसतं रस्त्यावर!
सगळ्यांची नजर असते आपल्यावरच खिळलेली !!
माणसं येतात, माणसं जातात
आपल्याकडे संशयाने रोखून बघतात!
उभे असतो आपण
आपले मोजीत श्वासः
एक तास ! चक्क अगदी एक तास !!
अशी आपली तपश्चर्या
आपलं त्राण तगवते !
अखेर ती उगवते !!
इतकी सहज! इतकी शांत !
चलबिचल मुळीच नाही !
ठरलेल्या वेळेआधीच
आली होती जशी काही !!
मग तिचा मंजुळ प्रश्नः
"अय्या! तुम्ही आलात पण?"
आणि आपलं गोड उत्तरः
"नुकताच गं ! तुझ्याआधी काही क्षण!"
काळावर मात अशी !
तिच्यासोबत भुलत जायचं!
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!
एकच वचन
कितीदा देतो आपण !
एकच शपथ कितीदा घेतो आपण !
तरीसुद्धा आपले शब्द
प्रत्येक वेळी नवे असतात !
पुन्हा पुन्हा येऊनही
पुन्हा पुन्हा हवे असतात !!
साधंसुधं बोलताना
ती उगीच लाजू लगते,
फुलांची नाजूक गत
आपल्या मनात वाजू लागते !!
उत्सुक उत्सुक सरींनी
आभाळ आपल्या मनावर झरुन जातं;
भिजलेल्या मातीसारखं
आपलं असणं सुगंधाने भरुन जातं !!
भरलेल्या ढगासारखं
मनाचं भरलेपण उधळून द्यायचं !
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!
- मंगेश पाडगांवकर मराठी कविता
March 2, 2017
क्षणा क्षणाला घटते जीवन, जाण त्याची येईल कोठून
मोठे प्रसंग आम्ही टिपतो, तेच सारे लक्षांत ठेवतो,
जीवनाच्या पायऱ्या मोजता, मना विचारा काय राहता
ढोबळतेचा विचार होतो, सूक्ष्मपणाला विसरूनी जातो,
मृत्यू येई तो हर घडीला, जाण नसते त्याची कुणाला
गेला क्षण तो परत न येई, आयुष्य तेवढेच व्यर्थ होई,
समाधान जे मिळे तुम्हाला, देता किंमत प्रत्येक क्षणाला
घटनांची क्रिया चाले सतत, झिजवावा देह प्रभू सेवेत,
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
September 10, 2018
चिंव चिंव करीत चिमणा चिमणी,खोलीमध्ये माझ्या आली
अवती भवती नजर टाकून,माळ्यावरती ती बसली
वाचन करण्यात रंगून गेलो,लक्ष्य नव्हते तिकडे
आश्चर्य वाटले बघून मजला,काड्या गवताचे तुकडे
घरटे बांधण्या रंगून गेली,आणती कडी कचरा
मनांत बांधे एकच खुणगांठ,तयार करणे निवारा
भंग पावता शांत वातावरण,वैताग आला मला
कचरा आणि घरटे काढून,खिडकीतुनी फेकला
काम संपवूनी सांज समयी,घरी परत मी आलो
त्याच चिमण्या तसेच घरटे,पाहून चकित झालो
पहाट होता चिमण्या उडाल्या,काढून टाकले घरटे
असेंच चालले कित्येक दिवस,परी जिद न सोडी ते
चार दिवसाची सुटी घालउन,गांवाहून परतलो
घरटे बघता संताप येऊन,मुठी वळवूनी धावलो
घरट्या मधूनी चिमणी उडाली,बसली पंख्यावरती
चिव चिव करुनी विनवू लागली,दया दाखवा ती
परी मी तर होतो रागामध्ये,चढलो माळ्यावरी
मन चरकले बघून अंडी,छोट्या घरट्यामध्ये
असहाय्य दृष्टीने चिमणी,पाही मज करुणायुक्त नयनी
यश मीळाले तिनेच,शेवटी भूतदया जागवूनी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
May 9, 2017
पुण्यनगर पंढरीला घेउनिया जाई
वाट पंढरिची पावन ही ।।
चालतात पाय रस्ता, नेत्र पंढरीकडे
दूर जरी देह, पोचें हृदय विठ्ठलापुढे
भक्त-देव यांच्यांमध्ये अंतरची नाहीं ।।
सोडुन आलो मागुती घर, कुटुंबां जरी
चिंता निज-संसाराची नसे अम्हांला परी
ठावें, विठुराया आमुचा भार सदा वाही ।।
प्रिय अति ही वाट, प्रिय अन् पंढरिचा-ध्यास
पंढरिचा नाथ व्यापी अस्तित्व नि श्वास
रूपडें दिसेल कधि तें, अती मनां घाई ।।
नेते ही वाट सर्वां विठुरायाच्या पदीं
पापांचें करेल क्षालन चंद्रभागा नदी
शुचिर्भूत अंतर्बाह्यच करते सरिता ही ।।
याचि देहिं याचि डोळा पाहुनिया पंढरी
नाद अनाहत हृदयीं अन् अमृतवर्षा शिरीं
नेइल वैकुंठीं विठ्ठल, संशय ना कांहीं ।।
सुभाष स. नाईक
Subhash S. Naik
October 31, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti