स्फुर्ति येऊन कविता केली आनंद झाला मनीं ।
चटकन कागदावरी लिहीली शब्द येतां ध्यानी ।।
कवितेतील शब्दरचना झाली बहरदार ।
कौतूकाची येई भावना बघुनी शब्द भांडार ।।
पुर्ण करुनी कविता टिपूनी घेतली वहीत ।
काव्य रचना परत वाचतां मग्न झालो आनंदात ।।
फेकूनी दिला कागद ज्यावरी रचिली कविता ।
विचारांत होतो धुंद कृत्य केले मी अजाणतां ।।
अघटित घटना झाली काव्य स्फुर्ति गेली निघूनी ।
नंतर मजला काव्य सुचेना बेचैन झालो मनीं ।।
चूक मनां उमगली अपमान केला अजाणतां ।
शारदा कागदावरी अवतरली बनोनी एक कविता ।।
खिन्नता वाटली मनासी कागद घेतले उचलून
निर्माल्य समजोनी त्यासी गंगाजलीं केले अर्पण ।।
पुनरपि सुचले काव्य लिहूं लागलो कविता ।
शब्द रचना भव्य लेखणीतून उतरतां ।।
अनावधाने झाला मजकडूनी अपमान ।
प्रायश्चित्त घेतां गेला शारदेचा राग निघून ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
August 31, 2014
आज मज कळो यावे,का रिकामे आपुले आभाळ, अनभिषिक्त प्रेम चांदणे,
नाहीसे का आज ओढाळ,--!!!
मंदमंद प्रेम प्रकाश,
हळूहळू नाहीसा होई,
जीवनीचा तम मग,
बघ, कसा वाढत जाई,--!!!
रोज रोज अमावस,
असे कसे चालायाचे,
रात्रंदिनी निष्प्रभ खास,
चंद्र - चांदणे मज भासे,---!!!
अनुभवल्या जिथे पोर्णिमा,
चंदेरी धवल लख्ख,
तेच प्रेमाभाळ वाटे,
धूसर तममय मख्ख,--!!!
कुठे गेला माझा चंद्र,
आणि त्याचे प्रेमळ चांदणे,
विरहार्त गीत गाई,
पक्षी एकाकी दिवाणे,--!!!
चंद्र चांदण्या भरून बहरे,
खरे तर रात्र लोभसवाणी,
जशी ती जवळ येते,
आठवांनी काळीज चरे,--!!!
या रम्य निरव एकांती,
पुन्हा एकदा तू जवळ यावे, पहिल्यासारखे लाजलाजूनी,
कवेत माझ्या सामावून जावे,--!!
पुन्हा एकदा व्हावा तो, लाजराबुजरा शृंगार ,
नदीस जसा सागर भेटतो,
बघत राहावे त्यांचे उफान,--!!!
हिमगौरी कर्वे.©
May 26, 2019
विशालतेच्या गुणामध्यें उणीवतेचा लपतो भाग
चंद्रातील सौंदर्यामुळे आम्ही विसरतो त्याचा डाग
नदिकांठची चिखलमाती सांचलेली दिसते
परि निर्मळ प्रवाह वेगांत वाहून ती जाते
अथांग सागराच्या उदरीं नवरत्नाच्या खाणीं
विसरुन जातो खारेपणा दुर्लक्ष त्यास करुनी
सुंदर दिसे रुबाबदार तो पक्षी राज मोर
आवाज नसे चांगला परिं नाचतो बहरदार
आकर्षक वाटते मनास फूल गुलाबाच
लक्ष्य खेचले जातां विचार नसतो कांट्याचे
कित्येक आहेत विशाल ह्या भूतलावरती
जीवनांतील न्युनता भव्यतेत लय पावती
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 11, 2017
धावपळीचे जीवन सारे,
मिळे न कुणा थोडी उसंत
विश्रांतीच्या मागे जाता,
दिसून येतो त्यातील अंत ।।१।।
चैतन्यमयी जीवन असूनी,
चक्रापरी ते गतीत राही
चक्र थांबता क्षणभर देखील,
मृत्यूची ते चाहूल पाही ।।२।।
थांबत नसते कधीही जीवन,
अंत ना होई केंव्हां त्याचा
निद्रा असो वा चीर निद्रा,
विश्रांती ही भास मनीचा ।।३।।
थकून जाई शरिर जेंव्हां,
प्रयत्न करि ते विश्रांतीचा
चैत्यन्य आत्मा देह सोडूनी,
घेई आसरा पुन्हा दुजाचा ।।४।।
आत्मा देखील थकून जाता,
परमात्म्याशी विलीन इच्छितो
चैतन्यातूनी विश्रांतीचा
‘मुक्ती’ मार्ग अखेरचा तो ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 18, 2015
जीवंतपणी घेई समाधी, ज्ञानेश्वर राजा ।
दु:खी होऊनी हळहळली, विश्वामधली प्रजा ।। १
सम्राट होता बालक असूनी, राज्य मनावरी ।
हृदय जिंकले सर्व जणांचे, लिहून ज्ञानेश्वरी ।। २
आसनीं बसत ध्यान लावता, समाधिस्त झाले ।
बाह्य जगाचे तोडून बंधन, प्राण आंत रोकले ।। ३
निश्चिष्ठ झाला देह जरी , बाह्यांगी दर्शनी ।
जागृत आसती प्राण तयांचे, आजच्याही क्षणी ।। ३
संचार त्यांच्या आत्म्याचा , सदैव होत राही ।
ज्ञान भुकेल्या भाविकाला, चेतना ते देई ।। ५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
August 4, 2020
ये रे ये रे पोष्टमणा
माहेरच्या आण डाकें
मना लागे हुरहुर
वरण होई फिके-फिके
वाटेकडे तुझ्या डोळे लावून
लावून, मला चष्मा लागे
चित्त न लागे स्वयंपाकात
भातातही खडे लागे
पायातली काढून हाणू कारे
सुंदर तुझ्या ह्या थोबड्यावरती
लक्ष न देताच जातोस मेल्या
दारावरुन माझ्या पुढती
काय मेले लफडे तुझे
शेजारच्या टवळी संगे
रोज-रोज कार्डे द्याया
तिच्या घरी, कोण सांगे?
ये रे ये रे पोष्टमणा
खबर घेऊन गावाहून
अगोबाई, नादात तुझ्या
भाजी गेली की रे करपून
आई माझी म्हातारी
असेल वळीत वाती
किंवा आजोळी आलेल्या
असेल खेळवित नाती
बाबा माझे मोठे शास्त्री
असतील सांगत शास्तर
निरोप त्यांचा पोचव ना रे
आणून माझ्या पोत्तर
मी न शिकले तरी
भाऊ माझा शाळेत प्यूण
हुशार शिकलेला
दुजा कचेरी कारकूण
बहिणी माझ्या साळू, काळू
चमेली, ढमेली, नि मैना
असतील दमलेल्या संसारी
कळीव की रे त्यांची दैना
लगबगे पोष्टमणा
माहेरच्या आण डाके
मनात रे माझ्या कशी
पाल का रे चुकचुके?
-- यतीन सामंत
ऋणानुबंध या कवितासंग्रहातून
(1976)
June 1, 2022
भक्ति करुन प्रभूसी मिळवी, दिसले आम्हा ह्या जगती
परि त्याचाच विरोध करुनी, कांही पावन होऊन जाती
लंकाधिपती रावण याने, रोष घेतला श्रीरामाचा
जानकीस पळवून नेई, विरोध करण्यास प्रभुचा
झाली इसतां आकाशवाणी, कंसास सांगून मृत्यु त्याचा
तुटून पडता देवकीवरी, नाश करण्या त्याच प्रभुचा
प्रभी अवताराचे ज्ञान होते, परि विरोध करीत राही
होऊन गेले तेच प्रभूमय, सतत त्याचाच ध्यास घेई
रोम रोम तो शोधत होता, कोठे लपला आहे ईश्वर
भक्ति असो वा विरोध असो, तन्मयताच करी साकार
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८४०
April 21, 2019
तप्त होतां धरणी माता, शांत करी वर्षा तिजला
प्रफुल्लतेचे झरे फुटती, आंतूनी त्या मातीला.....१,
जलमय होती नदी नाले, दुथडी भरूनी वाहती
धबधब्यातील खरी शोभा, वर्षामुळेंच दिसती...२,
हिरव्या रंगीं शाल पसरते, धरणी माते वरी
ऊब यावी म्हणून मेघांचे, आच्छादन ती करी....३,
वर्षा धरती बहिणी असूनी, प्रभूची भावंडे
उचंबळूनी प्रेम येतां, धावून येते तिजकडे....७
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 18, 2019
असाच पाऊस झिम्माड
वाहते रस्ते गळकी झाडं
पक्षी घरट्यात
माणसं बिऱ्हाडात
सगळं शांत निवांत ...
अंतरात.. आसमंतात
तू म्हणालास...
एक आठवण जगावी कोसळणाऱ्या पावसाची
चिमटीत धरून सोडावी तशीच बोट कागदाची
हातावर थेंब झेलत गोल गोल राणी म्हणावं
तसंच लहान होऊन गोधडी गुरफटून झोपावं
पाऊस तुझ्या मनात
पाऊस माझ्या डोळ्यात
झरत होता झरझर
उलगडत अंतर
अचानक तू थांबलास
ओल्या पापण्यांनी हसलास
म्हणालास....
संपला इथला सहवास
पुढचा पाऊस नसेल खास
बदलली चौकट कि बदलेल सगळं
मनाच्या पाटीवर चित्र असेल वेगळं
फुटतील ढग कोसळतील सरी
सगळं असेल तसंच तरी
सूर होतील बेसूर गातील राग अनवट
पावसाच्या चित्रातले रंग दिसतील फिक्कट
उखडलेली घरटी उजाडलेली घरं
येईल नजरेत सगळं खरंखरं
तू म्हणालास…तसंच झालाय रे !
सुरु झालाय अनवट राग
घेतोय कसला कसला माग
मी अस्वस्थ त्रयस्थ वैराग
सजीव चित्रातला निर्जीव भाग
दिसतंय सगळं उदास भकास फिक्कट
कारण....
मोडून गेलास तू चित्राची चौकट...
मोडून गेलास तू चित्राची चौकट!!!
. ..... मी मानसी
August 14, 2019
सागर किती ही विशाल असला तरी त्याची एक लाट ही सुखद अनुभव करून जाते तसेच आपल्या दिवसभराच्या कारोबारात ही एखादा सुखद क्षण ही पुरेसा असतो. विशाल हृदयाने, मुक्त मनाने विचारांना प्रकट करण्याची सवय लावावी कारण विचारांचे दमन हे अतिशय नुकसानकारक आहे. शुद्ध विचारांचा स्पर्श जीवनाला सुखद बनवण्यासाठी मदत करतो.
October 18, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti