खिडकीमधूनी टिपत होतो
बाह्य जगाचे द्दष्य आगळे
लोभसवाणें चित्र बघण्या
आतूर होऊन गेले डोळे
नयन नव्हते बघत ते
बघत होतो मीच खरा
खिडकीसम नयनातूनी
द्दष्य उमटते आंत जरा
संगीताचे सूर निनादूनी
लहरी त्यांच्या उठताती
कर्णा मधल्या पडद्यायोगे
आनंद मजला देवून जाती
मालक असूनी मी देहाचा
इंद्रिये सारी असती सेवक
ती केवळ साधने असूनी
आंतील 'मीच' असे साधक
मालक असूनी ताबा नसणें
स्वच्छंदी बनवी सेवकाला
इंद्रिये ती गोंधळ घालती
जागृकता नसतां मनाला
सोडून द्यावी वृत्ति मनाची
अरोप करणें इंद्रियावरी
ती तर केवळ सेवक असूनी
मनाची इच्छा पूर्ण करी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
October 14, 2020
दोन थेंब गंगाजळ
मृत्युच्या दारी
स्वर्गाचे तिकीट
रोज पी गंगाजळ
त्वरित मिळेल
स्वर्गाचे तिकीट.
टीप: सरळ नदीचे जीवघेण्या रसायन युक्त प्रदूषित पाणी पिल्यावर विभिन्न रोगराई होऊन माणूस शीघ्र स्वर्गात जाईल.
January 9, 2018
क्षणक्षण, आनंदे जगुनी घ्यावे
अजाण,अनभिज्ञ क्षण जीवनी
अशाश्वत,असे भाकीत क्षणांचे
सदैव! सतर्क रहावे या जीवनी।।
भाळीच्या, विधीलिखीत घटना
जे घडणारे, ते सारे घडुनी जाते
विवेकी मानवतेचा तर्क असावा
वास्तवतेला, समजुनी घेता येते।।
भिरभिरे, कालचक्र जन्ममृत्युचे
झाले, गेले, सारे विसरुनी जाते
अलगदी काळ, सावरे दुःखाला
संयमे, सहज जीवन जगता येते।।
निर्मळी! सहवासाच्या सदिछ्या
जीवास, सावरती क्षणाक्षणाला
गतजन्मांचेच,सारे आपुले सुकृत
स्मरावे! सातत्याने अनामिकाला।।
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ३०.
१ - २ - २०२२.
February 7, 2022
कोमेजणार म्हणून फूल उमलायचे राहते काय
July 12, 2026
रोज सकाळीं प्रात: समयीं, पूजा करी देवाची ।
पूजे मधल्या विधीत, चूक न होई कधी त्याची ।।१
स्नान करोनी नेसूनी सोंवळे, देव घरांत जाई ।
भाळी लावूनी गंध टिळा, मंत्रपाठ गाई ।।२
सहयोग देई पत्नी, पूजा कर्मामध्ये त्याला ।
आधींच उठोनी झाडूनी घेई, स्वच्छ करी देव घराला ।।३
करूनी सडा संमार्जन तेथें, सारवोनी घेई जागा ।
देवापुढती रांगोळी काढी, दिसे कशी सुंदर बघा ।।४
बागेमध्ये जाऊनी मग ती, दुर्वा काढीत असे ।
पुष्प करंडीत फुले निराळी, ताजी सुंदर दिसे ।।५
स्नान करूनी ओलेत्याने, पाणी ठेवी पूजेसाठीं ।
घास घासूनी चंदन मग ते, भरे लहानशी वाटी ।।६
हरिनाम घेई मुखीं सतत, मंत्र जप ते येईना ।
पूजेच्या परि तयारीमध्यें, उणीव कधी ठेवीना ।।७
जमवित होती पूण्य राशी, पतिची सेवा करूनी ।
द्विगुणीत होई सांठा, प्रभू सेवा लाभूनी ।।८
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
December 1, 2020
राखण करीतो पाठीराखा, भाऊ माझा प्रेमळ सखा,
विश्वासाचे असते नाते, एकाच रक्तामधून येते ।।१।।
आईबाबांचे मिळूनी गुण, तुला मला हे आले विभागून,
हृदयामधली ज्योत त्यांच्या, तेवत आहे आज आमच्या ।।२।।
प्रकाश झाला परंपरेनें, त्याला माहित पुढेच जाणे,
मार्ग जरी भिन्न चालले, मूळ तयाचे खालीं रूजले ।।३।।
अघात पडतां तव वर्मी, दु:खी होऊन जाते बघ मी,
दिसत नाही कुणा हे बंधन, जीव श्वासाचे अतूट स्पंदन ।।४।।
भांडत रूसत हासत होतो, जगण्यामधला भाग असे तो,
खेच खेचता ढील सोडतां, सुटत नाहीं मग तो गुंता ।।५।।
बाह्यांगीं तूं दूर आहे जरी, तव प्रतिमा ही राही अंतरी,
बघत राहते तुझी भाऊबीज, आठवणीत मी जगते आज ।।६।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 8, 2017
1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते....
गुड़ मॉर्निग, गुड़ नाईट
सर्व काही होते....
वाढदिवसाच्या शुभेच्छा ही
त्यातून देता येतात
वाटतील तेवढे पुष्पगुच्छ ही
पाठवता येतात....
अभिनंदन, स्वागत,
सर्व काही करता येते
श्रद्धांजलि द्यायला
मौन ही धरता येते....
सर्व कसे अगदी
ऑनलाइन चालते
1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते....
फेसबूक, whatsapp
आणि काय काय राव
चॅटींग मधली मजा
तुम्हाला कुठे ठाव....??
विनोद, मस्ती,
असो कि जयंती, पुण्यतिथी
पोस्टचा वर्षाव होतो
साऱ्यांच्या माथी....
शाळेत नसेल शिकवित
एवढे ज्ञान मिळते
1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते....
तसे भेटून बोलणे
होत नाही आता फारसे
तुम्ही ऑनलाइन या ना
बोलू मग खुपसे....
गेलात जवळून तर
नमस्कार ही करु नका
ऑनलाइन मात्र
हाय हॅलो विसरू नका....
थोडीशी virtual दुनियाच
आता हवी-हवीशी वाटते
1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते....
ऑनलाइन जग झाले
याची नाही खंत
माणुसकी आटत चालली
हे मना सलतं....
भावनेचा ओलावा
कोरडा झाला फ़क्त
समुहात राहुनही
एकटं एकटं वाटतं....
नुसत्या शब्दांनी
ह्रदय कुठे हलते
1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते....!!
November 11, 2016
कुणी असे कोणी तसे,
कित्येक काही ठरवतात,
मध्येच काय मग बिनसते,
सगळेच डाव मोडतात,--!!!
कोण येते आणिक आपुली,
जादू करुनी जाते,--
नाम तिचे असते नियती,
नियत ते परास्त करते,--!!!
ठरवून गोष्टी बिघडती,
आकस्मिक बसतात धक्के,
एकदम मग कोण कसे,
माणसास कळून चुके, --!!!
राजकारण,अनीतीअन्याय,
किती गोष्टींचे आपण बळी,
सत्तालोलूप मदांधांमुळे,
जनता चिरडली जाई खरी,--!!!
पैसा एक मुख्य कारण,
नाती सडती त्यामुळे,
प्रेमातही कठोर व्यवहार,
केला जातो त्या कारणे,--!!!
नियती गालात हसते,--
जेव्हा सुख एखादे पदरी,
थोडे थांब ती म्हणते, -
दाखवते तुज किमया सारी,-!!!
- व्यक्तिगत, सामाजिक,
आर्थिक अशी किती संकटे, मनुष्यमात्र तिच्यापुढे भोगी,
करत करत सारखी दुष्कर्मे,---!!!
अहंता, स्वार्थ, भांडणे,
किती तिचे सेवक असती, बघता-बघता ताबा घेऊन,
तुम्हाला लोळवून टाकती,--!!!
प्रेम, माया, जिव्हाळा, आपुलकी ज्यांना कधीच कळत नाही,
नियती तिथे फासे टाकी,
कोपर्यात बसून गंमतपाही--!!!
हिमगौरी कर्वे.©
June 20, 2019
या मित्रांनो सारे या, सर्व मिळूनी खेळू या ।।धृ।।
खेळ आमच्या देशाचे गरिबांसाठी सोईचे ।
मैदान नको मोठे ते वस्तूही अल्प लागते ।।
खेळांना त्या समजून घ्या- १--- या मित्रांनो सारे या,
हुतुतूचा खेळ बघा दोन गट, छोटी जागा ।
स्पर्श रेषा ओलांडूनी ह्तुतू म्हणती तोंडानी ।।
एकाच दमात भिडू मारू या -२--- या मित्रांनो सारे या,
खो खो मध्ये चपळाई चकमा देण्याची घाई ।
उलट सुलट बसे एकाच रांगेत दिसे ।।
मिळता खो भिडूला पकडू या- ३--- या मित्रांनो सारे या,
लपंडाव हा खेळ कसा लपलेल्यांना शोधत बसा ।
राज्य येते त्यावरती शोध घेई सभोवती ।।
तीक्ष्ण नजर ती ठेऊया – ४--- या मित्रांनो सारे या,
आट्या पाट्या च्या खेळात कांही घरे आखतात ।
सीमेवरती दक्ष राहती घरात येण्या ते रोकती ।।
चपळाईने घरात शिरू या – ५--- या मित्रांनो सारे या,
एका पायाची गम्मत लंगडी आहे माहित? ।
उड्या मारीत पळावे भिडू सारे पकडावे ।।
आखल्या रेषेतच खेळू या- ६--- या मित्रांनो सारे या,
एक दिलाने खेळू या आनंद सारा लुटू या ।
निरोगी सदा राही तो प्रफुल्ल मन बाळगतो ।।
शीण अभ्यासाचा घालवू या – ७ --- मित्रांनो सारे या,
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 7, 2020
एऽ येश्वदे, एऽ ममद्या, बाप्ये जमवा समदे
बाया बी गोळा करा समद्या
मारा समद्यांनला जोरात हाका,
आन् ती समदी मेंढरं हाका.
चला आपन बहिनी-भाऊ
मतदानासाठी जाऊ.
देऊ त्याला भलामोट्टा आपल्या मतांचा गठ्ठा.
तो, जो गावीं आल्ता पठ्ठा ज्यानं आपल्या समद्यांनला वाटला हाय पैका.
- सुभाष स. नाईक
August 28, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti