November 10, 2021
November 5, 2013
बाळ चिमुकले,गोड हासले,
रांगत आले ,
पायाला धरुनी,
उभे राहिले,
बाळकृष्ण ते,
मला भासले, --
वदनांतून कोवळे,
ध्वनि उमटले,
बोबड्या स्वरांनी,
मज जिंकीयले,
उचलून घेता ,
कसे आनंदले,
हात हलवून ,
मज कुरवाळले,
कोण लहान,
मग वाटले,
कुशीत त्याच्या,
मीच शिरले ,
हलके हलके,
त्याने थोपटले,
गा,---गा कर ,
मज म्हणाले,
निश्चिंत जीव,---!!!
निश्चिंत मन ,-----!!!
मज विश्वरूपदर्शन,
अलगद घडले,--!!!!
हिमगौरी कर्वे.©
May 1, 2019
लहानपणी वाटायचं,
तो ससा फार गर्विष्ठ होता,
म्हणूनच शर्यतीत झोपला…
पण मोठा झाल्यावर समजलं,
प्रत्येक झोप ही आळशीपणाची नसते.
कधी कधी माणूस थकलेला असतो,
जबाबदाऱ्यांच्या ओझ्याने वाकलेला असतो,
सगळ्यांना पुढे जाताना पाहत,
स्वतःला सावरायला
क्षणभर थांबलेला असतो.
जिंकण्याची इच्छा कमी नसते,
फक्त श्वास घ्यायला
एक निवांत क्षण हवा असतो.
जीवनाच्या शर्यतीत
प्रत्येक जण कासवासारखा संथ नसतो,
आणि प्रत्येक ससा बेफिकीरही नसतो.
काही जण हसत धावत असतात,
आतून मात्र हजारो लढाया लढत असतात.
आज समजतं…
त्या सशाने हार झोपेमुळे नाही पत्करली,
तर थकव्याने घेतलेल्या
त्या एका विश्रांतीची किंमत
त्याला पराभवाने चुकवावी लागली.
म्हणून आता
कोणाच्या प्रवासावर हसू येत नाही,
कारण प्रत्येकाच्या आयुष्यात
एक अशी शर्यत असते,
जिथे धावण्यापेक्षा
स्वतःला सावरणं अधिक महत्त्वाचं असतं.
आणि हो…
जिंकणं सुंदर असतंच,
पण थकलेल्या मनाला
स्वतःची साथ देणं,
हे त्याहूनही सुंदर असतं.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
June 20, 2026
रस्त्यावरती उभी राहूनी, हातवारे ती करित होती
मध्येच हसते केंव्हां रडते, चकरा मारीत बसे खालती...१,
गर्दी जमली खूप बघ्यांची, कुत्सीतपणे न्याहळू लागली,
'शिपाई आणा जावूनी कुणी', ठाण्यात नेण्यास सांगू लागली...२
जीवनातील दु:खी चटका, सहनशक्तीचा अंत पाहतो,
मनावरील तो ताबा सुटूनी, वेडेपणा हा दिसून येतो...३
इतकी गर्दी जमून कुणीही, तिच्या मनीचा ठाव न जाणला
रूख रुख वाटली ती बघोनी, सहानूभुती शून्य समाजाला...४
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 7, 2017
अरे माझी माय .. माझी माय ..
म्हणून सगळेच बोंबलतात
बाप तुमचा मेलाय काय...?
आईनं जन्म दिला आईनं वाढवलं
बापाचं योगदान काहीच नाही काय ?
रडत होती पण लढत होती
बरंच सोसावं लागलंय तिला
बापाचा हात पाठीवर होता
म्हणून लढली कधी तरी विचारा तिला.!
आईच्या डोळ्यातलं पाणी आणि
दाटलेले हुंदके सगळ्यांना दिसतात
अरे दिसले नाही कधी कुणाला पण
बापाच्याही डोळ्यात अश्रू असतात..!!
आजची लेक उद्या बहीण प्रेयसी
पत्नी आणि आई होणारच आहे
तु सुध्दा मुलगा आहेस उद्या भाऊ
प्रियकर पती आणि बाप होणारच आहे.
जिवनाच्या जत्रेला जायला जी वाट
काल होती तीच उद्या असणार आहे
निष्ठूरपणे अडगळीत टाकलेल्या बापाच्या जागी
तु ही उद्या बसणार आहे..!!
-- राजेश जगताप
January 30, 2023
भोवतालच्या जगाकडे मी जेव्हा डोळसपणे पहातो
मनाचा आरसा माझा मी अलगद उघडतो
वाटतो मला आंधळा
जगाच्या अधोगतीकडे पाहून
घेत असेल डोळे मिटून
वाटतो मला एकांध
घेत असेल संधी
एक डोळा मारुन
दाखवत नसेल ना लंगडा जीवनातला अधूरेपणा
पृथ्वीवर असता एक डोळा दूजा चंद्रावर रोखून
वेध नसेल ना घेत अनंताचा एखादा चकणा
पुढे आलेले दात दिसतात गाताना रडगाणे
पुढे आलेले डोळे वाटतात ओंगळवाणे
करतो विचार तेव्हा मी कसा असेन
मनाच्या आरशात माझ्या मीच कसा दिसेन
कदाचित दाखवीत नसेन ना मी
दोन पायांवर उभा असलेला एक पशू?
- यतीन सामंत
September 20, 2022
घरामधला कर्ता बाप,
जेंव्हा येतो बाहेरून |
पाळलेली मांजर सूद्धा,
आनंदाने जाते शहारून |
मॅव मॅव करत बिचारी,
फिरते सा-या घराला |
पण ते प्रेम कळत नाही,
पोटच्या त्या पोराला |
मालकाला बघून कूत्रा,
झेपाऊन घेतो ओढ |
साखळी दाटे मानेला,
कमी होत नाही वेड |
शेपटाचा गोंडा घोळून,
घूटमळते ते दाराला |
पण ती ओढ कळत नाही,
पोटच्या त्या पोराला |
दूर बघून मालकाला,
हंबरते गोठ्यात गाय |
वळवळ करते जागीच,
तान्ह्या वासराची माय |
वासराच्या आधी चाटे,
ती मालकाच्या ऊराला |
पण ती माया कळत नाही,
पोटच्या त्या पोराला |
बांधा वरचा बैल सूद्धा,
हाक ऐकून परत वळतो |
रागाची हाक असुनही,
गप गुमान रानात पळतो |
आपुलकीचा राग सुद्धा,
कळतो मुक्या ढोराला |
पण तो राग कळत नाही,
पोटच्या त्या पोराला |
जीव लावला जनावराला,
लेकरावानी वागत आली |
पोटची लेकरं मात्र कशी,
परक्यावानी जगत आली |
बाप लेकाचा सुर कधीच,
जुळला नाही सुराला |
जीव लावनं कळंलं नाही,
पोटच्या त्या पोराला |
बाप असतो जरा जरा,
नारळाच्या फळा वानी,
बाहेरून कठोर भासे,
आतमध्ये गोड पाणी |
पावसाचं महत्व सुद्धा,
कळेना झालंय मोराला |
तसाच बाप कळत नाही,
जीवंत पणी पोराला |
( एक छान कविता आवडली तर नक्की शेयर करा )
March 12, 2017
सण उत्सवाने भरलेला श्रावण,
चैतन्याने, आराधनेने भरलेला श्रावण,
सृष्टीच्या नटण्या मुरडण्याचा श्रावण,
ऊन-पावसाशी लपंडाव खेळणारा श्रावण,
श्रावण मनभावन !
देवदेवतांच्या भजन-पूजनात रंगून जाण्याचा श्रावण,
व्रतवैकल्याने, धार्मिक परंपरेने आत्मबल वाढवणारा श्रावण,
चांगुलपणा, भाविकता आणि भावुकता जागवणारा श्रावण,
माणसांना खुलवणार, नाचवणारा, गाणारा श्रावण,
श्रावण मनभावन !
नागपंचमी, जन्माष्टमी, नारळीपौर्णिमा,
रक्षाबंधन, मातृदिन आणि पोळ्याचा श्रावण,
तरुणी, नाविवाहीतांचा, मंगळागौरीचा श्रावण,
मन उल्हासित, सुगंधित, आनंदी करणारा असा श्रावण,
श्रावण मनभावन !
निसर्गाबद्दलची कृतज्ञता व्यक्त
करण्याची संधी देणारा श्रावण,
सप्त रंगाने गंधाने नाहू घालणारा श्रावण,
श्रावण मनभावन !
जगदीश पटवर्धन
September 10, 2015
विधी लिखीत असे अटळ त्याच प्रमाणे होई निश्चित
कोण बदले मग काळाला प्रभूचा सहभाग असे ज्यांत ।।१।।
राम राज्याभिषेक समयीं असता सर्वजण आनंदी
राज्य सोडूनी वनी जाईल जाणले नव्हते कुणी कधीं ।।२।।
नष्ट करुनी सर्प कुळाला तक्षकावरही घात पडे
परिक्षिताचे प्रयत्न सारे फिके पडती नियती पुढे ।।३।।
आकाशवाणीचे शब्द ऐकतां हादरुनी गेला कंस मनीं
काळाने त्या झडप घातली प्रयत्न त्याचे निष्फळ करुनी ।।४।।
दुर्दैवी होते विधी विधान हरिश्चंद्र तारामती यांचे
राजा राणी असूनी दोघे जीवन गेले परि कष्टाचे ।।५।।
सुख दुःखानें भरले असे प्रत्येकाचे व्यक्ती जीवन
सहज लीलेने घ्यावे सारे प्रभूचेच आहे समजून ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmai.com
January 23, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti