ती महाराष्ट्र माऊली
अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली //धृ//
ज्ञानाचा तो मुकूटमणी, ग्रंथ रचिला ज्ञानेश्वरी
ओवीबद्ध साज प्राकृतीं चढविला, भगवतगीतेवरी
तेज चमकूनी सुर्यासम, दाही दिशा उजळली //१//
अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली
तुकाराम तो संत महान, अभंगाचा राजा
हासंत खेळत शिकवली, जीवनातील मजा
अभंगाची मधूर सुमने, सर्वत्र तुक्याने ऊधळली //२//
अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली
संवाद करुन विठोबाशी, नामदेव नाचला
तल्लीन होऊनी भजनासी, मधूर गाऊ लागला
भक्ति अर्पून प्रभूला, भावी निरंजने ओवाळली //३//
अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली
तसेच झाले एकनाथ, भागवत त्यानी लिहीले
श्री रामदास स्वामी, दासबोध रचिले
निवृती सोपान मुक्ताबाई , कित्येक झाली संत मंडळी //४//
अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली
शिवरायाची बातच न्यारी, दुमदुमला प्रताप
अंबेडकरांनी न्याय देऊनी, दलितास दिले योग्य माप
प्रतिकार करुनी जुलमाचा, अन्यायाला वाचा फोडली //५//
अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली
टिळक आगरकर साने गुरुजी, तसेच झाले फुले
सावरकर सेनापती बापट, ह्यानी शुरत्व दाखविले
सारय़ांनी महान होऊनी, देशाची मान उंचाविली //६//
अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
June 5, 2020
गुलाबी निशा आज
मंद धुंद गारवा...
ताऱ्यांना चढला साज
सांज गाते मारवा..
रातराणीचा सुगंध
असा दरवळला दूर..
रूप चंद्रमेचे शुभ्र
लाजून झाले चूर..
प्रीत गंधीत वारा
बटांना छेडीत जातो..
धवल मेघांचां पदर
तोरणे बांधून राहतो..
कलेकलेने न्हाले
मनविभोर चांदणे..
रूणुझुणू झंकारली
ह्रदयी प्रीत पैंजणे
July 25, 2026
लहानपणी रात्र कशी
अगदी लवकर यायची
थकलेल्या मला कशी
पटकन निजवायची.
कळु लागले तशी
रात्र ही शांत झाली
तिला मला जणु
स्वतःची ओळख मिळाली.
तरूण झालो तेंव्हा
रात्र कशी रोमांचित होई
रातराणीच्या वासानं
ती धुंद होउन गाई.
संसाराच्या धावपळीत
चैन रात्रीची हरपली
काळजीने ग्रस्त रात्र
उशीराने झोपू लागली.
स्वप्नाळु रात्र फार काळ
नाही स्वप्नात रमली
वास्तवाच्या जाणीवेने
दचकून वारंवार उठली.
कोसळण्याऱ्या दूःखानी
रात्र जरी पूरती भिजली
मायेची चादर घेऊन
मला गुरफटून झोपली.
कधी रात्र विनाकारण
माझी चिंता करते
मलाही नाही झोपू देत
आणि स्वतः उगाच जागते.
आजकाल रात्र पूर्वीसारखी
वाटत नाही खुशीत
येत नाही जवळ आणि
घेत नाही मला कुशीत.
माहित आहे मला, रात्र
चिरःकाल टिकणार आहे
केंव्हा तरी कायमच झोपुन
मी तिला मुकणार आहे.
- डॉ.सुभाष कटकदौंड
October 14, 2018
दोघे मिळून आलां हातात घेऊन हात
हाताळूनी परिस्थितीला करण्या त्यावर मात
दोघांची मिळूनी शक्ति दुप्पट होत असे
सहभागी होतां, युक्ति यशाची खात्री दिसे
एकाच तेजाची तुम्ही बाळे बरोबरीने आलां जगती
रवि-किरण होऊन जुळे प्रकाशमान बनती
ओळखुनी जीवन धोके यशाच्या मार्गांत
गाडीची बनूनी चाके सतत रहा वेगांत
एकाचे पाठी जाता दुसरा यश अल्पची मिळे
एकत्र मिळूनी काम करा तुम्ही आहांत जुळे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail bknagapurkar@gmail.com
September 5, 2018
बघ ना सखे, कसं आभाळ गच्च दाटलंय
मनात तुझ्या आठवणींचं काहूर माजलंय...
चिंब भिजून या पावसात, कवेत मला घेशील ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?
अंगी झोंबे हा गार गार वारा
मोहरून तुझ्या आठवणीने, येई देही गोड शहारा
उबदार घट्ट मिठीत घेऊन, मला बिलगशील ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?
सखे सुरू झालाय, आता वीजांचा कडकडाट
हिरवी होईल धरती अन् ओली चिंब पायवाट...
थोडी सावरत अन् बावरत, हात माझा हाती घेशील ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?
धुंद कुंद ओल्या क्षणी, येऊ दे आता प्रेमाला बहर...
तप्त धरणीच्या मिलनासाठी “तो”ही करेल कहर
त्याच्यासारखीच मिलनाची ओढ, तुला देखील लागेल ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?
निसर्गाच्या अमृतधारांनी, मन न्हाऊन निघतंय
आठवणींच्या हिंदोळ्यावर, उगाच झुलत राहतंय
पुरे झाल्या आठवणी, आता सामोरी तू येशील ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?
ऊन-पावसाच्या लपंडावात, बघ इंद्रधनुही साकारले
सप्तरंगांच्या या खेळात, झाले तुझेही मन बावरे
बावऱ्या तुझ्या या मनात, प्रेमाची पालवी फुटेल ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?
बरसू दे त्याला मनासारखं, आपण मात्र एकांत शोधूया
आडोशाला उभे राहून, एकमेकांच्या मिठीत विसावूया
गोऱ्या गालावरून थेंब ओघळताच, लाजून हसशील ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?
तसा आत खोलवर पाऊस, माझ्या रोजच बरसतो आहे
डोळ्यांतील आसवांसवे, नित्य ओघळतो आहे
उधाणलेल्या माझ्या मनाचा, किनारा तू होशील ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?
©श्री. अल्केश प्रमोद जाधव®
अलिबाग, रायगड
November 19, 2022
माझ्या अक्षर यात्रेतल्या प्रवासात
स्पदनांचं धुकधुकणं थांबलंय
अफाट वेगाची मर्यादा
भोवाळतीय मनाला
सतत धावणं ,सतत गुरफटणं वळणांचा ससेमिरा
ही फार रे..
पायाखालचा रस्ता भुलवत नेतो
त्या सांदी कपारीतून
अव्यक्ताचं देणं असल्या सारखं
शोध कुठवर घ्यायचा ..?
मग माझ्या मनातले गहींवर
ओंथंबून येतात..
एकेक शब्द लयींचा किनारा होतो..
निळ्याशार शाईचा समुद्र होतो..
बुद्धी भ्रष्टतेचे फासे दोन ,चार सहा
कसे ही पडतात..
पण एक अधांतरी असणारा विचार
स्थिरावतो ,त्या गुलाबी कागदी नभावर
माझी कविता सहत्रावर्तनात
अवतरते अलगद,हळुवार त्या
त्या मेघमालांचा साक्षात्कार घडवत
तूफान कोसळतो विचारांचा नभ
एका उन्मुक्त कवितेचा
जन्म होतो .. माझ्याच अश्रुंच्या
उधाणलेल्या तांडवात...
-- ©लीना राजीव.
September 14, 2019
खुरटून जाते फूलझाड, गर्द झाडीच्या वनांत,
कोमजूनी चालली स्त्रीलज्जा, धावपळीच्या जीवनांत ....१,
भावनेची नाहीं उमलली, फुले तिची केव्हांही,
नाजुकतेचे गंध फेकूनी, पुलकित झाली नाही...२,
कोमेजूनी गेल्या भावना, साऱ्या हताळल्या जावून,
एकांतपणाची खरी ओढ, दिसेल मग ती कोठून...३,
गर्दीच्या या ओघामध्यें, धक्के-बुक्के मिळत आसे,
प्रेमभावना जातां उडूनी, ओलावा मग राहत नसे...४,
स्त्रीलज्जेची भावना जी, युगानूयुगें जपली
घराबाहेर पडून पाऊल लोप पावू लागली...५
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 1, 2016
दगड टाकतां पाण्यावरी,
तरंगे त्याची दिसून आली ।
दगड होई स्थीर तळाशी,
बराच वेळ लाट राहीली...१,
जेव्हा कुणीतरी क्रोध करी,
वातावरण दूषित होते ।
क्रोध जातो त्वरीत निघूनी,
दूषितपणा कांहीं काळ राहते...२,
निर्मळपणा दिसून येई,
स्थिर होवून जातां जल ।
पुनरपि पडता खडा क्रोधाचा,
सारे होवून जाते गढूळ...३,
स्थिर होण्यास वेळ लागतो,
गढूळ होई क्षणांत
मन जिंकणे कठीण असता,
वैमनस्य सहज होत...४
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 15, 2017
जर मी तुझ्या
प्रेमात पडलो नसतो
तर कोठे असलो असतो ?
जगातील कोणत्यातरी पैशाच्या उकिरड्यावर गाढवासारखा
लोळत असतो...
एखाद्या बैलासारखा जगात कोणाच्यातरी सुखासाठी
राबत असतो...
मदमस्त हत्तीसारखा माझ्याच
खोटया अहंकारात
फिरत असतो...
जगातील निरर्थक सुखे
मिळविण्यासाठी निरर्थक
भटकत असतो...
भविष्याच्या उदरात मी
इतक्या सहज
शिरलो नसतो...
माझ्या जन्माचं रहस्य
मी जाणूच
शकलो नसतो...
जगातील सारी दुःखें
मी समजू
शकलो नसतो...
ज्ञानाच्या गुहेत वेड्यागत
मी कधीच
शिरलो नसतो...
माझ्या ज्ञानाची पणती
जगासाठी लावू
शकलो नसतो...
माझ्या कविते मी
जगात या
प्रेमवेडा असतो...
©निलेश बामणे
June 6, 2017
खिडकीमधूनी टिपत होतो
बाह्य जगाचे द्दष्य आगळे
लोभसवाणें चित्र बघण्या
आतूर होऊन गेले डोळे
नयन नव्हते बघत ते
बघत होतो मीच खरा
खिडकीसम नयनातूनी
द्दष्य उमटते आंत जरा
संगीताचे सूर निनादूनी
लहरी त्यांच्या उठताती
कर्णा मधल्या पडद्यायोगे
आनंद मजला देवून जाती
मालक असूनी मी देहाचा
इंद्रिये सारी असती सेवक
ती केवळ साधने असूनी
आंतील 'मीच' असे साधक
मालक असूनी ताबा नसणें
स्वच्छंदी बनवी सेवकाला
इंद्रिये ती गोंधळ घालती
जागृकता नसतां मनाला
सोडून द्यावी वृत्ति मनाची
अरोप करणें इंद्रियावरी
ती तर केवळ सेवक असूनी
मनाची इच्छा पूर्ण करी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
October 14, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti