December 5, 2016
गादी चालविते माझी आई,
माझ्याच आजीची,
मला वाटते परंपरा,
ती चाले घराण्याची ।।१।।
रात्रंदिनीचे कष्ट करणे,
हा तिचा स्वभाव,
प्रेमळपणे खावू घालणें,
मनी तिच्या भाव ।।२।।
अधिकाराची नशा तिजला,
शब्द तिचा कायदा,
जुमानत नाही कुणाचाही,
शाब्दीक तो वायदा ।।३।।
प्रेमळपणा असूनी अंगी,
अहंकार युक्त ती,
गुणदोषांनी भरले व्यक्तीत्व,
तसेच पुढे चालती ।।४।।
सोडून द्या तो अहंकारी भाव,
टिकवा प्रेमळपणा,
चक्रामधल्या गुणदोषातील,
गुणच अंगा बाणा ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
December 5, 2016
क्षणक्षण, आनंदे जगुनी घ्यावे
अजाण,अनभिज्ञ क्षण जीवनी
अशाश्वत,असे भाकीत क्षणांचे
सदैव! सतर्क रहावे या जीवनी।।
भाळीच्या, विधीलिखीत घटना
जे घडणारे, ते सारे घडुनी जाते
विवेकी मानवतेचा तर्क असावा
वास्तवतेला, समजुनी घेता येते।।
भिरभिरे, कालचक्र जन्ममृत्युचे
झाले, गेले, सारे विसरुनी जाते
अलगदी काळ, सावरे दुःखाला
संयमे, सहज जीवन जगता येते।।
निर्मळी! सहवासाच्या सदिछ्या
जीवास, सावरती क्षणाक्षणाला
गतजन्मांचेच,सारे आपुले सुकृत
स्मरावे! सातत्याने अनामिकाला।।
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ३०.
१ - २ - २०२२.
February 7, 2022
आनंदाच्या हिंदोळ्यावर झुलते साल नवं नवं
राजसा प्रीत पाखरांचे उडवा हो तुम्ही थवं ।।धृ।।
नव्या सालातील नवी सांज ,नटून बसले हो मी।।
अजून सजणा नाही आले,घायाळ हरणी हो मी।।
उगाच कावं उशीर केला,मनास या होती घावं।।
राजसा प्रीत पाखरांचे,उडवा हो तुम्ही थवं।।१।।
साज सरली रात्र झाली, भेटीलागी मी आतुरली।।
विरहणीची व्यथा न्यारी,
अजून तुम्हा ना कळली ।।
उर धडधडे काया थरथरे, नका टाकू डावं
।।
राजसा प्रीत पाखरांचे,उडवा हो तुम्ही थवं।।२।।
रात्र सरली पहाट झाली,एकलीच मी झुरली।।
जडावलेल्या पापणीला,
ओढ तुमचीच लागली।।
नको छळणे प्रीतीत रमणे,नाही तुम्हा का ठावं।।
राजसाप्रीत पाखरांचे उडवा हो तुम्ही थवं ।। ३।।
हुरहुर माझ्या मनी दाटली,प्रियतम हा कुठं
।।
प्रीतीत कुणाच्या अडकला का,प्रश्न मनी या उठं।।
माझ्या प्रीतीचा नजराणा,कमी पडला का हो रावं।।
राजसा प्रीत पाखरांचे,उडवा हो तुम्ही थवं।।४।।
-- सौ.माणिक शुरजोशी
January 4, 2020
सुखदुःखाचा , मी कधीच
गणिती हिशेब नाही केला
जीवा जगविता , जगविता
कधी अट्टाहास नाही केला
वेदनांतूनही शोधीता सुखा
दुश्वास कुणाचा नाही केला
सुखसमाधान, योग भाळीचे
त्याचा हव्यासही नाही केला
निर्मळी ! सहवासात लाभले
संस्कारांचे रांजण सोबतीला
आघातातही डगमगलो नाही
विवेके , सावरले मनांतराला
खेळ सारेच त्या अनामीकाचे
ना कधी विसरलो दयाघनाला
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र.१५२
१४ - १२ - २०२१.
December 21, 2021
जीवन हा श्वास आहे
स्मरणगंधी ध्यास आहे...
कळीकळीने उमलावे
फुलांनी दरवळणे आहे...
सभोवारी गंधाळावे
सत्कर्मी आव्हान आहे...
सुखदुःखांच्या सरोवरी
मुक्त असे डुंबणे आहे...
प्रवाहा विरुद्ध पोहणे
पुरुषार्थाची कमाल आहे...
विवेकाची साथ असावी
अप्राप्यही, प्राप्त आहे...
मनामनांत नित्य रहावे
तीच खरी मन:शांती आहे...
द्वैत, अद्वैत एकरूपता
निर्मलतेचे प्रतिबिंब आहे...
कानी मंजुळ धुन मुरलीची
आत्मानंदी सुंदर सत्य आहे...
–वि.ग.सातपुते.( भावकवी )
9766544908
रचना क्र. १८८
५/८/२०२२
September 6, 2022
खरेदी केला सुंदर पक्षी, दाम देवूनी योग्य असे ते ।
नक्षीदार पिंजरा घेवूनी, शोभिवान केले घरातें ।।
प्रात:काळी उठोनी बघतां, चकित होवूनी गेलो मनीं ।
पक्षानें मान टाकली, पडला होता तळात मरूनी ।।
क्षणभर मनी खंत वाटली, राग आला स्वकृत्याचा ।
अकारण हौस म्हणूनी, खरेदी केला पक्षी याचा ।।
किती बरे निच मन हे निराशा तयाला धन हानीची ।
पक्षानेतर प्राण गमविला, विषण्णता परि दुय्यम याची ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
November 4, 2016
विठूचे पद मजला लाभावे
देह मातिचा बनण्यां कांचन, अन्य कशास हवे ?
नच माहित, मेघांच्या मागे विठ्ठल दिसतो कां कुणां ?
असती कां क्षितिजापल्याड श्रिठ्ठलवस्तीच्या खुणा ?
विठू भक्तहृदयीं वसतो, पण, ठाम मला ठावें ।।
अगणित जैसे तारे गगनीं, देवदेवता अनंत जगतीं
त्या सार्यांचें वंदन-अर्चन-पूजेनें जन मागत मुक्ती
मात्र माझियासाठी सारी विठूचीच नांवें ।।
क्षणभंगुर ही दुनिया चंचल, पळभर येथें थांबायाचें
त्या थांब्यावर, अखंड तोंडीं नाम चिरस्थिर-विठुरायाचें
नच गंगा, अंतीं ओठांना विठुनामच लागावें ।।
-- सुभाष स.नाईक
पंढरीचा राणा
July 3, 2017
चिव् चिव् करित बोलतां
तुम्ही सारी भाषा
दोन स्वरातून विचारांना
देत असता दिशा
शब्द आमचे सप्तसुरांतून
येती बाहेरी
व्यक्त करिती भाव सारे
असती जे अंतरी
दोन अक्षरी किमया सारी
तुमच्या भाषेची
त्याच चिव चिवे समजुन घेता
धडधड ह्रद्धयाची
भाव मनीचे टिपून घेण्या
शब्द लागती थोडे
चेहऱ्यावरल्या हलचालीनी
प्रश्न उकलूनी पडे.
समज तुमची आपसांतली
कौतूक करणारी
शब्द मोजके असून देखील
भाव दाखविणारी
चिमण्यानो तुम्ही शिकवा सारे
मानव जातीला
व्यर्थ बडबड करुन सारी
वाहूनी तो गेला
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
February 25, 2020
ज्या ज्या वेळी धीर ठेवशी
मिळेल कांहीतरी
गडबड मनां होऊन जातां
निराशाच पदरीं ।।१।।
शांत चित्त आपुले
तूं ठेव प्रत्येक समयी
मिळेल यश पदरी तुझ्या
खात्री याची घेई ।।२।।
आत्मविकास तूं सोडूं नको
आपल्या कामाचा
मोबदला मिळेल तुजला
योग्य प्रयत्नाचा ।।३।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
November 22, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti