वाक्य हे आयुष्य मानल्यास, शब्द हे व्यक्तींसारखे असतात
November 24, 2011
वाटते आता भेटावेसे
संथची,जाहली स्पंदने
गात्री थरथर कंपनांची
तुझ्या प्रतीक्षेत लोचने
जाहली, प्रीती व्याकुळ
अंत:करणी, दग्ध जीणे
नि:शब्दी, सारे अंतरंग
मनी, ओढ तुला भेटणे
लावी हुरहूर, काळजा
नभांगणाचे झाकोळणे
सांजाळलेल्या क्षितिजी
आंस! एक तुला भेटणे
अजूनही, जीवंत आशा
दशदिशात, सत्य प्रीती
लडिवाळ प्रीत अमरत्वी
हे सारेच भगवंतांचे देणे
-- वि.ग.सातपुते.(भावकवी).
9766544908
रचना क्र.४४.
१२ - २ - २०२२.
February 28, 2022
संवाद सारा हरवला आता
कुणा कुणासाठी वेळ नाही
धडपड फक्त जगण्यासाठी
जीवाला कुठेच शांती नाही...
जन्मदात्यांचे स्पर्श बोलके
ते सुख कधी विसरलो नाही
रुजले बीजांकुर संस्कारांचे
विद्रोह मनास शिवला नाही.
आज संवेदनाच निर्जीवी
सहृदयता, उरलीच नाही
अतृप्त, हे श्वास अशाश्वत
दुजे वास्तव जगती नाही.
कालचक्र गतिमान अविरत
कुठे थांबावे कळतच नाही
जगव्यवहार स्वार्थात गुंतले
आपुलेपण ते उरलेही नाही.
रचना क्र. ६८-८-७-२०२३
- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
July 26, 2023
December 15, 2021
टिळक तुम्ही फिरुन एकवार
या हो जन्म घेऊन
हव तर ब्रम्हदेवाकडे शिफारस तुमची
मी देतो पाठवून
किती उदात्त हेतूने गणेशोत्सव
तुम्ही केला होतात सुरु
पण हल्ली त्याच स्वरुप पाहून
मीच लागलोय गुदमरु
मोठया आतुरतेने मी वाट पाहायचो
भाद्रपदातल्या चतुर्थीची
वाट आता पाहावी लागते
अनंत चतुर्दशीची
काय सांगू टिळक तुम्हांला?
संयोजकांनी मलाही केलय कार्पोरेट
उत्सवांत माझ्या दर्शनाचे
चढते झालेत रेट
गल्लोगल्ली स्थापना माझी
मंडपी बेगडी आरास,
सोन-चांदी अंगावरती
पुढयांत धनाची रास
बुध्दीदायक मी खर तर
बुध्दी देणेच माझ्या हाती,
इथल्या मागण्या नवस ऐकून
माझी कुंठीत झालेय हो मती
टिळक ह्यावर कळस म्हणजे
उत्सवांत खंडणीची वर्गणीरुपी दहशत
वर चोवीस तास माझ्या भोवती
पोलिसांची वसाहत
असली जीवघेणी भक्ती
नाही हो आता सोसवत,
विसर्जनाच्या मिरवणुकीतला
उन्माद नाही बघवत
म्हणून तर म्हणतोय टिळक तुम्हीं
घ्यावा अवतार फिरुन
अन् समाजकारण हाती घेऊन
हे बाजारीकरण टाका संपवून
उत्सवातल राजकारण टाका चिरडून
टिळक तुम्ही या हो
जन्म घेऊन, या हो जन्म घेऊन
-- सौ. अलका वढावकर
January 16, 2016
तप्त लोखंडात, लपली ती आग
दिसे लाल लाल, जाळी सर्व भाग...१,
सुंदर फूलात, सुंगध तो छान
अवती भवती काटे, ते कठीण...२,
विजेची ती तार, प्रकाशी दिव्याला,
झटका तो देई, स्पर्श होता तिला..३,
सुखाच्या पाठीशीं, असे दुःख छाया
न दिसे ती आम्हा, असे मोह माया...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
April 8, 2017
खुरटून जाते फूलझाड, गर्द झाडीच्या वनांत,
कोमजूनी चालली स्त्रीलज्जा, धावपळीच्या जीवनांत ....१,
भावनेची नाहीं उमलली, फुले तिची केव्हांही,
नाजुकतेचे गंध फेकूनी, पुलकित झाली नाही...२,
कोमेजूनी गेल्या भावना, साऱ्या हताळल्या जावून,
एकांतपणाची खरी ओढ, दिसेल मग ती कोठून...३,
गर्दीच्या या ओघामध्यें, धक्के-बुक्के मिळत आसे,
प्रेमभावना जातां उडूनी, ओलावा मग राहत नसे...४,
स्त्रीलज्जेची भावना जी, युगानूयुगें जपली
घराबाहेर पडून पाऊल लोप पावू लागली...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
November 15, 2018
इजिप्तमधले राजाराणी झाडांमध्ये सुखावले
July 12, 2026
1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते....
गुड़ मॉर्निग, गुड़ नाईट
सर्व काही होते....
वाढदिवसाच्या शुभेच्छा ही
त्यातून देता येतात
वाटतील तेवढे पुष्पगुच्छ ही
पाठवता येतात....
अभिनंदन, स्वागत,
सर्व काही करता येते
श्रद्धांजलि द्यायला
मौन ही धरता येते....
सर्व कसे अगदी
ऑनलाइन चालते
1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते....
फेसबूक, whatsapp
आणि काय काय राव
चॅटींग मधली मजा
तुम्हाला कुठे ठाव....??
विनोद, मस्ती,
असो कि जयंती, पुण्यतिथी
पोस्टचा वर्षाव होतो
साऱ्यांच्या माथी....
शाळेत नसेल शिकवित
एवढे ज्ञान मिळते
1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते....
तसे भेटून बोलणे
होत नाही आता फारसे
तुम्ही ऑनलाइन या ना
बोलू मग खुपसे....
गेलात जवळून तर
नमस्कार ही करु नका
ऑनलाइन मात्र
हाय हॅलो विसरू नका....
थोडीशी virtual दुनियाच
आता हवी-हवीशी वाटते
1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते....
ऑनलाइन जग झाले
याची नाही खंत
माणुसकी आटत चालली
हे मना सलतं....
भावनेचा ओलावा
कोरडा झाला फ़क्त
समुहात राहुनही
एकटं एकटं वाटतं....
नुसत्या शब्दांनी
ह्रदय कुठे हलते
1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते....!!
November 11, 2016
प्रभूनाम मुखीं होते रामतिर्थांच्या सदा ।
ऐकू आले तेच निद्रेत असता एकदा ।।
चमत्कार दिसून आला एके दिवशी ।
राम नामाचे ध्वनी उमटती देहापाशी ।।
विज्ञानाने उकल केली या घटनेची ।
खात्री करिता सत्यता पटली याची ।।
चेतना मिळता स्वर यंत्रात ध्वनी उमटे ।
त्याच ध्वनीच्या विद्युत लहरींनी शब्द फुटे ।।
शब्दांचे वलय फिरती देहाभोवती ।
शरीरासाठी तेच शब्द कवच बनती ।।
जेव्हां होते नामस्मरण प्रभूंचे सतत ।
शब्द ध्वनी लहरी निघत असे अविरत ।।
हुंकार तसाची ऐकू येई देहां जवळी ।
निद्रेमध्ये जरी असला मेंदू त्या वेळी ।।
सदैव नामस्मरण चेतना देत राहतो ।
रामतिर्थांच्या अनुभवांनी हेच अनुभवतो ।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५९
February 26, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti