आयुष्यात काही लोकांना एक जाणीव करून
देना खूप महत्वाचे असते....
कि त्यांच्या असण्याने काही फरक नाही पडत,
तेव्हा त्यांच्या नसण्याने तर कदापिही
फरक पडणार नाही....!!
-- मयुरी राम विखे
December 14, 2019
देह मनातील, तफावत दिसून येते ।
चंचल असूनी मन सदैव, शरीर परि बदलत राहते...१,
चैतन्ययुक्त मन सदा, स्थिर न राहते केव्हांही ।
जन्मापासूनी मृत्यूपर्यंत भाग दौड ती चालत राही...२,
परिस्थितीच्या चौकटीमध्यें, विचारांचा दबाव राहतो ।
शरीराच्या सुदृढपणाचा, मनावरती परिणाम होतो...३,
दिसून येते केव्हां केव्हां, मन अतिशय उत्साही ।
परि शरीराचा अशक्तपणा, मनास त्याक्षणी साथ न देई....४
विचित्र होते वातावरण ते, जेव्हां मनास साथ ना मिळे ।
विचारांच्या चुका होऊनी, दु:खी होते जीवन सगळे...५
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 9, 2017
सोडूनी दिली मी पूजाअर्चा, समाधान मज ज्यात न लाभले
दैनंदिनीच्या कार्यक्रमातील, एक भाग तो सदैव वाटले
बालपणी मज कुणी शिकविले, पूजाअर्चा आन्हकी सारे
ठसले नाही मनात कधीही, भक्तीला हे पोषक ठरे
पूजाअर्चा ह्या विधीमध्ये, लक्ष आमचे केंद्रीत होते
हळदी कुंकू गंध फूले आणि, दीपधूप हे मधूर जळते
सुबकतेच्या पाठी लागूनी, यांत्रिकतेसम आम्ही झालो
अर्थ ज्याचा कधी न कळला, मंत्र मुखोदगत वदू लागलो
वास्तव्य ज्याचे सदैव सागरी, स्नान तयाला काय घालता
नैवैद्य ज्याला अर्पण करितो, तो विश्वाचा असे अन्नदाता
प्रेमभाव भक्तीसाठा उचंबळूनी तेव्हा न आला
तांत्रिकतेच्या आहारी जावूनी, मुख्य गाभा विसरूनी गेला
पूजा विधी हा मार्गदर्शक, समरस होण्या प्रभू चिंतनी
रेंगाळूनी जाता वाटेवरती, वेळ दौडतो ध्येय विसरूनी
चिंतन मनन ध्यानामध्ये, पूजा अर्चा जावे विसरूनी
हेच खरे ते साध्य आहे, जे समर्पीत होते ईश्वर चरणी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
January 10, 2021
संतुलन करूनी चालवी, निसर्गाचा खेळ सतत ।
जन्ममृत्यूची चाके फिरवी, एकाच वेगाने अविरत ।।
जन्म घटना ही शांत होता, मृत्यू परि घेई लक्ष्य खेचूनी ।
नष्ट होतो जेव्हां मानव, विचार लाटा उठती मनी ।।
मरणामध्यें निसर्ग असतां, हताश होऊनी दु:ख करी ।
मानवनिर्मित नाश बघूनी, घृणायुक्त येई शिसारी ।।
पूर वादळे धरणी कंप, पचवितो आम्ही ही संकटे ।
मानव निर्मित युद्ध दंगली, सूड भावना तेथे पेटे ।।
विनाश असता दोन्हीमध्ये, मान तुकवी निसर्गापुढे ।
बिघडले घर देईल बांधूनी, विश्वास बाळगी ईश्वराकडे ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
November 9, 2016
हे शारदे ! रूसलीस कां तू, माझ्या वरती ।
लोप पावली कोठे माझी, काव्याची स्फूर्ती ।।
दिनरात्रीं तव सेवा केली, मनोभावें ।
कळले नाहीं आज शब्द ओठचे, कोठे जावे ।।
दिसत होते भाव मजला, साऱ्या वस्तूमध्यें ।
उचंबळूनी जाई मन तेव्हां, नाचत आनंदे ।।
तेच चांदणे तारे गगनी, आणिक लता वेली ।
पकड येईना टिपण्या सौंदर्य, परि या वेळी ।।
जागृत केली मम हृदयांतील, सुप्त जी शक्ति ।
अखंडित वाहूं दे शब्द प्रवाह, हे श्री सरस्वति ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 12, 2017
ध्येय असावे तुमचे नेहमीं
आनंद मिळवण्याकडे
'आनंद ' हाचि ईश्वर असतो
समजून घ्याहो हे कोडे ।।१।।
शरीर देई 'सुख ' तुम्हांला
क्षणिक ते तर असती
सुखाच्या पाठीशी छाया असते
'दुःख ' तयाला संबोधती ।।२।।
सुखाबरोबर नाते असते
सदैव अशाच दुःखाचे
वेगळे त्यांना कुणी न करती
जाणा तत्त्व हे जीवनाचे ।।३।।
'आनंद ' भावना असे एकटी
नसे तेथे दुजी भावना
'मोक्ष' तयाला म्हणती कुणी
आस्तित्व त्याचे तुमच्याच मनां ।।४।।
व्यर्थ जातील प्रयत्न तुमचे
'आनंद' शोधता बाहेरी
विसरुन जाता जर देहाला
मिळेल तुम्हां ते अंतरी ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 18, 2020
खरं सांगते बरा आहे
नवरा माझा नवरा आहे
थोडासा तो कोडगा आहे
जणु माझा पोरगा आहे
कधी तो माझा पप्पा आहे
मनातला नाजूक कप्पा आहे
थोडासा तो चिडका आहे
पण मायेचा झरा आहे
खरं सांगते बरा आहे
नवरा माझा नवरा आहे
लहानांशी त्याची गट्टी आहे
थोडासा तो हट्टी आहे
त्याला वाटतं तो धाडसी आहे
मला वाटतं तो आळशी आहे
थोडासा तो हळवा आहे
माझ्या जिवनाचा वारा आहे
खरं सांगते बरा आहे
नवरा माझा नवरा आहे
थोडासा तो भावनिक आहे
राग त्याचा क्षणिक आहे
नव्या कल्पनेत उडणारा आहे
जुन्या आठवणीत रमणारा आहे
नव्या स्वप्नात रंगणारा आहे
त्याच्यामुळे सौख्य घरा आहे
खरं सांगते बरा आहे
नवरा माझा नवरा आहे
थोडासा तो ज्ञानी आहे
सुखी आणि समाधानी आहे
संयम थोडासा कमी आहे
जिभेनं थोडा कडवा आहे
पहिल्यापेक्षा बरा आहे
मी कुठं म्हणते हिरा आहे
खरं सांगते बरा आहे
नवरा माझा नवरा आहे.
- डॉ. सुभाष कटकदौंड
August 21, 2018
April 17, 2012
March 7, 2022
माझी ही गीतरचना पुणे आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित झालेली आहे तसेच माझ्या काव्यसंग्रहामध्ये प्रसिद्ध झाली आहे
दुष्टकाळ रे म्हणती याला,
सांग पावसा कुठेशी दडला ?!| ध्रु ||
तुला गौरविले जीवनदाता,
स्वतःच ठरला खोटा आता,
कां रे डोळा असा उघडला ?
सांग पावसा कुठेशी दडला ? || १ ||
करीत होता मेघगर्जना,
गङगङोनी भिववी जनांना,
मुहूर्त टळला, तरीही अडला,
सांग पावसा कुठेशी दडला ? || २ ||
धाडधाड तू कोसळणारा,
छप्पर ढगांचे फाङणारा,
मेघराजा तो इतिहास घडला,
सांग पावसा, कुठेशी दडला ? || ३ ||
केली पेरणी, फळा न आली,
उरली - सुरली आशा पळाली,
बोल तुला रे, कुणी कोंडला ?
सांग पावसा कुठेशी दडला ? || ४ ||
अवर्षणाची अवकाळी ऐरण,
गाई - गुरांना नाही वैरण,
भयभीत होऊनी, जीवच उड़ला,
सांग पावसा कुठेशी दडला ? || ५ ||
मेघा धरणे कुणी भरावी ?
वरुणा, करुणा, किती करावी ?
भयसागरी या मानव बुडला,
सांग पावसा कुठेशी दडला ? || ६ ||
फसवे ढग हे अवती - भवती,
हुलकाउनी ते तोंड फिरवती,
पेच तुला कां, कसला पडला ?
सांग पावसा कुठेशी दडला ? || ७ ||
अवर्षणाने घडे उपोषण,
उपोषणाने घडे कुपोषण,
कुणास ठावे, दिस कसा पुढला ?
सांग पावसा कुठेशी दडला ? || ८ ||
जलातुनी रे जीव जन्मतो,
जलाकारणे जीव पोसतो,
हाय ! जलाविण तो तङफङला,
सांग पावसा कुठेशी दडला ? || ९ ||
आमिष तुजला नसे धनाचे,
वचन हवे कां, संतुलनाचे,
संकल्प आज मी झणी सोडला,
सांग पावसा कुठेशी दडला ? || १० ||
© रचना : उपेंद्र चिंचोरे
June 17, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti