सतत फिरत राही, चक्र जीवनाचे
विविधता पाही , रंग आयुष्याचे
सुख दुःखाच्या भावना, उठवूनी लहरी
देह आणि मना, परिणाम करी
लोभ अहंकार निराशा, सारे मनाचे विकार
आनंद समाधान आशा, करी भावना साकार
जीवन विषयाचे, बनत असे वलय
रस शोधितां त्याचे, जीवन वहात जाय
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
November 10, 2016
आस राहते सतत मनी, मिळत नसते त्याचेसाठी
प्रयत्न सारे होत असती, हाती नाही ते मिळविण्यापोटी....१,
प्रयत्नात तो आनंद होता, धडपड होती, होती शंका
मिळविण्याच्या त्या लयीमध्यें, जिद्द मनाची आणिक हेका....२,
यश मिळते जेंव्हां पदरी, धडपड सारी थंडावते
ज्याच्या करिता सारे सोशीले, त्यातील उर्मी निघून जाते....३,
यशांत नाही आनंद तेवढा, मिळविण्यात जो दिसून येई
कांहींतरी ते मिळवायचे, याच विचारी रमून जाई....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
September 11, 2019
नदिकाठच्या कपारीमध्ये, बेडूक बसला दबा धरूनी
उडणाऱ्या त्या माशी वरते, लक्ष सारे केंद्रीत करूनी...१,
नजीक येवूनी त्या माशीचे, भक्ष त्याने करूनी टाकले
परि दुर्दैव त्याचे बघा कसे, सर्पानेही त्यास पकडले...२,
बेडूक गिळूनी सर्प चालला, हलके हलके वनामधूनी
झेप मारूनी आकाशी नेले, घारीने त्याला चोचित धरूनी...३,
'भक्ष्य बनने' दुजा करिता, मृत्यूची ही चालते श्रृखंला
जनक असता तोच सर्वांचा, गमंत येई त्या खेळाला...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 19, 2021
मुलगा म्हणाला बापाला
'पप्पा,गुगलवर हवं ते मिळते,
जसं म्हणावं तस ते ऐकते'
मग तो म्हणाला, ' हे गुगल,
सिंग अ साँग फाॅर मी'
गुगलने लगेच गाणे म्हटले.
'ओके ,व्हाट्स अबाऊट टुडे.'
आजचा दिनविशेष सांगितला
'हे गुगल , शो टुडेज वेदर '
लगेच गुगलने
आजचे तापमान सांगितले.
बाप म्हणाला,
'वाss बेटा, वाss!'
बरं बेटा आता
गुगलला हे म्हण की ,
'गिव्ह मी वन भाकर अॅन्ड
गो अवर वावर '
मुलाने गुगलला म्हणताच
गुगल म्हणाले, ' साॅरी? '
-- विठ्ठल जाधव
शिरूरकासार जि.बीड
सं.९४२१४४२९९५
November 21, 2018
प्रत्येक गाणे नशीब घेऊन जन्माला येते. काही गाणी गाजतात तर काही विस्मृतीत जातात.तर काही किस्से बनून जन्माला येतात.एकाच गाण्याच्या किस्याबद्दल काही लोकांच्या वेगवेगळ्या आठवणी असतात. त्यातलीच काही गाण्याचे किस्से
August 4, 2022
झालो आम्ही *धन्य,
मातृभूमीच्या कुशीत विसावलो, वीर मरणाचे स्वप्न पाहिले,
अन् भाग्यवंतही ठरलो,
देशासाठी लढणे एकच ध्यास, बालपणापासून आमची आंस, येतील कितीही संकटे,अडथळे
प्यारी आम्हा भारतमाता, तिच्यापुढे खूप आव्हाने" ठाऊक हरेक वार्ता, तिलाजिवापाडजपणे
सैनिकाचे असते ध्येय,
कोणी काही म्हणो,
ना कदर ना काळजी ,
नको फक्त श्रेय,
जीवन तिलाच अर्पण,
दुसरे नको काही,
पुढील जन्मी होऊ सैनिक,
अशीच वाटते ग्वाही,
नागरिक करतात सर्वस्व ओतून, त्यांचे संसार,
आम्ही नशीबवान शिवाय देशसेवेत रममाण*,-
तरुण पत्नी, गोंडस मुले,
वृद्ध माता -पिता,
आठवण खूप त्यांची येते, धारातीर्थी पडतां,---!!!
आमच्यासाठी वाट बघतील,
कोण सावरेल त्यांना,
आता,कोण कमावेल
करील भविष्यचिंता,--? मुलगाचआधार,त्यांचा,
कोण घेईल त्यांची काळजी, सांभाळत घेईल भार,
संसार उघडा पडून,
राहील पत्नी एकटी,
काढा तुम्हीच समजूत,
करा सांत्वन शेवटी, बाळे कोवळी ती,
निरागस त्यांची मने,
वाट पाहतील बाबांची,
पण त्यांच्याशिवाय राहणे,
कडा पापण्यांच्या ओलावती,
जरी जाहलो पावन,
घेतो निरोप आता,
सेवेत मातेच्या येणार परतून,--!!!
हिमगौरी कर्वे
March 8, 2019
बरस बरसता, पाऊस धारा
मन हे, श्रावण होऊनी जाते...
चिंब, चिंबल्या आठवणींची
शब्दगीता, अलवार प्रसवते...
ओंजळ भावरंगल्या शब्दांची
अंतरातुनी मनांगणी पाझरते...
ओला ओला हा श्रावण सुंदर
तनमनांतर सारे भिजूनी जाते...
अवीट आगळी ही श्रावणीगंगा
चराचरालाच या शांतवुनी जाते...
जणू प्रीतीचेच डोहाळे सृष्टीला
दशदिशांना तृप्तीचे भरते येते
रचना क्र. ५५
२३/६/२०२३
-वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
July 23, 2023
November 15, 2010
विश्वास माझा तव चरणी, भाव अपिर्तो तुझ्यावरी,
जगदंबे अवती-भवती, राहून माझे रक्षण करी ... ।। ध्रु ।।
सावध नसे निद्रेच्या काळी, धीर देते राहूनी जवळी,
झोपेमध्ये जगा विसरता, सर्ववेळी तू जाग्रण करी...।।१।।
जगदंबे अवती –भवती, राहून माझे रक्षण करी,
धावपळीत चाले जीवन, संकट भोवऱ्यात फिरून
दुर्घटनेची चाहूल देवून, मनास आमच्या दक्ष करी...२
जगदंबे अवती -भवती राहून माझे रक्षण करी,
पसरता दु:खाचा सागर, सुख रत्ने कशी शोधणार,
किरण दाखवून आशेचे, दु:ख तू आमचे दूर करी...३,
जगदंबे अवती –भवती, राहून माझे रक्षण करी
अगणित प्रश्न संसाराचे, कसे करू उकलन त्यांचे,
सोडविण्यासाठी सारे प्रश्न, मदत आम्हांला तूच करी..४,
जगदंबे अवती –भवती, राहून माझे रक्षण करी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagaprkar@gmail.com
December 10, 2018
हात हातात गुंतवूनी, मान खाली दाडवण्यास ,
लटकेच हसूनी गाली, गोड खळी उमटवण्यात...
जरा गोंधळलेला, वेडा ही जरासा,
अधीर अबोल प्रियकर तो उतावळा !! १!!
हुरहूर मनाची हळूच, डोळ्यांच्या कोनांत लपवण्यास,
तुफानी धडधड हृदयाची , नकळंत हाताने रोखण्यात...
जरा गोंधळलेला, वेडा ही जरासा,
अधीर अबोल प्रियकर तो उतावळा !!२!!
जवळ घेण्यात अन् जवळही येण्यास,
भटकंती नजरेची मजभवती भिरभिरण्यात...
जरा गोंधळलेला, वेडा ही जरासा,
अधीर अबोल प्रियकर तो उतावळा !!३!!
सारूनी बटा हलकेच , हनुवटी वर उचलण्यास,
ओठांवर ओंठ मुरले तरी, डोळे घट्ट बंद करण्यात...
जरा गोंधळलेला, वेडा ही जरासा,
अधीर अबोल प्रियकर तो उतावळा !!४!!
जरा गोंधळलेला, वेडा ही जरासा,
अधीर अबोल प्रियकर तो उतावळा !!
-- श्वेता संकपाळ
September 14, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti