चिमण्या आल्या दोन कोठूनी, बांधून गेल्या घरटे ।
खेळूनी नाचूनी, चिव चिव गाणे गात वाटे ।।
झाडावरती उंच बसूनी, रात्र घालवी हलके हलके ।
दाणा टिपणे पाणी पिणे, स्वछंदाचे घेवूनी झोके ।।
संसार चक्र भोवती पडता, गेल्या दोघी त्यातच गुंतूनी ।
नव पिल्लाच्या सेवेसाठी, घरटे केले काड्या आणूनी ।।
पिल्लांना त्या पंख फूटता, उडूनी गेल्या घरटे सोडूनी ।
अल्प काळाचे बंधन तोडीत, जगण्या पुनरपी स्वच्छंदानी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 1, 2018
बरसत, बरसत ये रे घना
चिंब चिंब भिजव रे मना
आसक्त,अधीर प्रीतभाव
बरसत, बरसत ये रे घना
सांग कसे, मीच रे सावरुं
हे निळ्या सावळ्या घना
तुझ्यात रे स्पर्षतो सावळा
बरसत, बरसत ये रे घना
हेच गगन, हीच वसुंधरा
उताविळ, मिलना रे घना
तूच रे, चैतन्य या सृष्टिचे
ये सजवित ब्रह्मांडा रे घना
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. १४८
७ - ६ - २०२२.
July 22, 2022
रत्नाकर
मंथनात
दिव्यरत्न
कौस्तुभात
महाविष्णू
आभुषती
कंठीमणी
विराजती
कालीयाने
देऊ केला
कौस्तभास
श्रीकृष्णाला
शुभ्रमणी
घरी ठेवू
संतुष्टता
मना देऊ
थोररत्न
मिळताच
उधाण हे
आनंदाच
-- सौ. माणीक शुरजोशी
नाशिक
May 11, 2021
लोणच्याला चव येते,
थोडे मुरल्यानंतर ।
आंबाही स्वादिष्ट लागे,
आंबून गेल्यानंतर....१,
विचारांची मजा वाटे,
ऐकता ज्ञानी विचार ।
परिपक्वता त्यांच्यातील,
देई आनंदाला धार...२,
परिपक्वता येण्यासाठीं,
अनुभवाची भट्टी हवी ।
ज्ञान चमकते,
जेव्हां तर्कज्ञान पाही....३,
विचारांत मुरलेला,
मुरब्बी तो असतो ।।
अनुभवाच्या शक्तीनें,
योग्य पाऊल टाकतो...४
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
December 12, 2016
मागत होता प्रभूला हात जोडूनी कांही
भक्तिभाव बघूनी त्याचे मिळत ते जाई
एका मागून एक मिळे मागणी होता त्याची
निराश करणे न लगे इच्छा होता भक्ताची
जे जे बघे भोवती घेतले होते मागुनी
कशांत दडले सुख उमज येईना मनीं
देरे बुद्धि देवा मजला योग्य मागण्यासाठी
समाधानी मी होईन तुझ्या कृपे पोटी
ज्ञान झाले गंमतीचे सांगे सोड मागणे
न मागतां मिळाले जे आनंदी केले जगणे.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८४०
October 28, 2019
ताई गुणाची माझी छकुली,
“झोका दे दादा' म्हणून लागली,
संभाळ ताई ! फांदी वाकली,
दोन्ही दोरांना गच्च आवळी,
जोजोगेजोजो ।॥१॥।
आयुसागरी आल्या लहरी,
ताई तरंगे नोका त्यावरी,
कुंतलध्वजा फडफड करी,
पायाचे वल्हे हाण सत्वरी,
जो जो गे जोजो ॥॥२॥।
वायु सिंधूला भरती आली,
नौका हालते वरती खाली,
परकर-शिडांची त्रेधा उडाली, .
शाब्बास ताई ! माझी सानुली
जोजोगेजोजो ॥1३।।
देवदयेचे झाड थोरले,
भक्ति प्रीतीचे दोर बांधले
मोक्ष प्राप्तीचा झोका हा बाळे ।
आनंद देवो तुला वेल्हाळे !
जोजोगेजोजो ।॥४॥|
June 12, 2026
December 5, 2016
मातेच्या उदरांत झोपला, शेषशायी भगवान
वेड्यापरी त्यास शोधीतो, सागरी जाऊन
शेषशायीचे चित्र बघतां, साम्य ते दिसेल
उदरामधल्या बालकांतही, सारे तेच आढळेल
शेषापरी वेटोळे असुनी, ' नाळ ' तयाला म्हणती
क्षारयुक्त पाण्यामध्यें, बालक ते निद्रिस्त असती
बालकाच्या नाभी मधुनी, येई कमलाकृती भाग
जीवनसत्व त्यावर असुनी, ब्रह्मापरी दिसे अंग
' सो हं ' निनादुनी सांगे, ' मीच तोच ईश्वर आहे '
चुकीचा समज करुनी, तयास सागरीं पाहे
विवीधतेनें सुचवी, ' अहं ब्रह्मास्मि ' सत्य ते
कां आम्ही धांवत असतो, त्यास शोधण्या बाह्यांते
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
May 18, 2019
अलार्म वाजला कानी, म्हणून आली मला जाग
तशी ही म्हणे, उठा लवकर, आठ मार्च आज |
मनी म्हटल चला नवरोजी, एक दिवस हा बयकोचा
चहा-नाश्ता-डब्यासाठी, ताबा घेतला किचनचा |
मुले बाहेर पडेस्तवर, ही खुशाल पडली लोळत
मीच सगळ आवरुन सवरुन, ऑफीस गाठल पळत |
घरकामवाल्यांची रजा होतीच, आजच्या महिला दिनाला
ऑफीसांतही महिला वर्ग, येणार नव्हता कामाला |
घरची दारची कसरत करत, फेस आला तोंडाल,
खरेदी-हॉटेल-सिनेमा उरकून, हिला उशीर झाला यायला |
हुश: करतोय तोच परिचित, शब्द आले कानी
आठ वाजून गेले, अहो उठताय नं तुम्ही?
खर सांगतो त्याच क्षणी
जाग आणली स्वप्नानी
Hats off to you
बायकोस म्हटलं महिला दिनी |
March 8, 2018
स्वप्नावरही माझ्या ठेवू नको पहारा...
नुकताचं चांदव्याने केला मला इशारा
नौका सोडली मी उधाणत्या सागरी अन्
बेभान वादळाने केला मला इशारा....
जखमेवरती फुंकर हळुवार घालता तू
अलवार वेदनेने केला मला इशारा...
डोळ्यात पाहिले तुझ्या रोखून काय जरासे
भयंकर संकटाने केला मला इशारा...
ओठांस तुझ्या ओठांचा टोचला जरासा काटा
घायाळ गुलाबाने केला मला इशारा....
तुज स्पर्शुन आल्या वार्याने मज हलकेच स्पर्श करता
बेधुंद अत्तराने केला मला इशारा...
विखुरशील तुकड्यात तू करता गुन्हा प्रितीचा
सांभाळ...! काळजाने केला मला इशारा....
उज्वला सुधीर
आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुप
February 12, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti