समोर ये तूं केंव्हा तरी
बघण्याची मज ओढ लागली
फुलूनी गेली बाग कशी ही
बीजे जयांची तूच पेरीली
कल्पकता ही अंगी असूनी
दुरद्दष्टीचा लाभ वसे
अंधारातील दुःखी जनांची
चाहूल तुज झाली असे
शीतल करुनी दुःख तयांचे
जगण्याचा तो मार्ग दाखविला
सोडूनी सारे वाटेवरी
आकस्मित तू निघूनी गेला
आस्तित्वाची चाहूल येते
आज इथे केंव्हातरी
तव आशिर्वादे जगतो सारे
हीच पावती त्याची खरी
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
October 17, 2019
उजाड रस्ता,
मोकळा पण भकास सूर्य
आणि उध्वस्त दिशा !
वाट नजरेच्या टप्प्यात आहे ,
पण पावलंच नाहीयेत ,
तरीही मला जायचंय
रांगत का होईना
मला जायचंय..
सगळं वाळवंट आहे.
तप्त उष्ण वाळू,
चटके बसतायत पावलांना,
गिधाडं घिरट्या घालतायत.
पाणी दिसतंय मला ,
पण फक्त डोळ्यातलं.
मला पळायचंय
वाचवायचंय स्वतःला...
काय सांगतोस ?
तो पण अडकलाय ?
अरे रे, तो ही अडकलाय,
हो मला कळलं
सगळेच अडकलेत.
बंधनात,
नात्यात,
प्रेमात
आणि व्यवस्थेत!
हळूहळू पोखरतेय ती मला.
कुरतडतेय माझी बोटं,
बधिर करत चाललीये माझी प्रत्येक नस,
जेणेकरून मी विसरेन मला,
मी विसरेन तुला,
मी विसरेन माणूसपणाला,
होईन एक प्राणी,
सर्कशीतला एक प्राणी,
"माणूस" नावाचा!
January 13, 2017
कृपा होऊनी शारदेची,
कवित्व तुजला लाभले
शिक्षणाच्या अभावांतही,
भावनांचे सामर्थ्य दिसले ।।१।।
कुणासी म्हणावे ज्ञानी,
रीत असते निराळी,
शिक्षणाचा कस लावती,
सर्व सामान्य मंडळी ।।२।।
कोठे शिकला ज्ञानोबा,
तुकोबाचे ज्ञान बघा,
दार न बघता शाळेचे,
अपूर्व ज्ञान दिले जगा ।।३।।
जिव्हेंवरी शारदा,
जेव्हा वाहते प्रवाही,
शब्दांची गुंफण होवूनी,
कवितेचा जन्म होई....४
भाव शब्दांचा सुगंधी हार,
माझी अंबिका भवानी
वाहत रहा आनंदाने,
यशस्वी होशील जीवनी ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
February 25, 2021
नव्हतो आम्ही आमचे कधींही बनले जीवन दुजामुळे ।
कर्तेपणाचा भाव तरीही येतो कां मनी ? ते न कळे ।।
कसा आलो या जगतीं ठाऊक नव्हते कांही मजला ।
कसा वाढलो हलके हलके जाण आहे याची मला ।।
जेंव्हा झालो मोठा कुणीतरी वाटू लागले कांही करावे ।
काळाने परि दिले दाखवूनी जीवन प्रवाही वाहात जावे ।।
परिस्थितीच्या काठामधूनी जीवन सरिता वाहात जाते ।
वाहात असता त्याच दिशेनें इच्छीत ध्येय हातीं नसते ।।
होते सारे अखेर तेचि आखून ठेवते नियती जे जे ।
अज्ञानानें समजत राही हे केले मी, अन् हे माझे ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 13, 2017
प्रभूची लीला न्यारी
विश्वाचा तो खेळ करी
कुणी न जाणले तयापरी
हीच त्याची महिमा ।।१।।
जवळ असूनी दूर ठेवितो
आलिंगुनी पर भासवितो
विचित्र त्याचा खेळ चालतो
कोणी न समजे त्यासी ।।२।।
मोठे मोठे विद्वान
त्यांत कांहीं संतजन
अध्यात्म्याचे ज्ञान घेऊन
विश्लेषण करिती प्रभूचे ।।३।।
कांहीं असती नास्तिक
कांही असती आस्तिक
त्यांत कांही ज्ञानी मस्तक
चर्चा करिती प्रभूची ।।४।।
सत्य परिस्थीती ऐसी
कुणी न जाणले प्रभूसी
सर्वांची चालना तर्कासी
प्रभू अस्तित्वा विषयीं ।।५।।
फक्त एकमुखी वाच्यता
असे ती सर्वता
महान शक्ति असता
त्या ब्रह्मांडामध्यें ।।६।।
सर्वानी जाणले एक
'अपूर्व शक्ती' ह्याचा चालक
त्याच उर्जेचे हे प्रतीक
सारे विश्वमंडल ।।७।।
कुणी नाहीं दुजा भाव
समजोनी त्या शक्तीची ठेव
ज्ञान विज्ञान देती नाव
निरनिराळे त्या शक्तीसी ।।८।।
कुणी म्हणती राम
कुणी म्हणे रहीम
कुणी संबोधती गौतम
येशू असे कुणाचा ।।९।।
परी तत्व नसे वेगळे
नांवे होत निरनिराळे
सामान्यास ते न कळे
हीच खरी शोकांतिका ।।१०।।
सारे जीवन निघून जाई
परी त्या शक्तीचा बोध न होई
विश्लेषण करीत राही
त्याच्या अस्तित्वाविषयी ।।११।।
जाणावी ती शक्ती
रुप आकार त्यासी नसती
शक्ती समजोनी करावी भक्ती
आदरभाव ठेवून ।।१२।।
मानवजन्म श्रेष्ठ ठरविला
विशेष बुद्धी मिळून त्याला
विचार शक्ती उमजण्याला
सर्वप्राण्यामध्ये ।।१३।।
बहूत झाले विद्वान
कर्तव्याने मिळवी मान
मानव जातीची ती शान
ह्या संसारी ।।१४।।
मार्ग निरनिराळे दाखवी
सारे मिळती एक ध्येयी
सर्वार्पण त्या शक्ती होई
ध्येय मिळतां जीवनी ।।१५।।
विचार करा मनाशी
वैर आपले आपणाशी
नसते केंव्हां प्रभूशी
हेच मूळ दुःखाचे ।।१६।।
वाद नसतो ध्येयापरी
चर्चा असे मार्गापरी
हीच मानव निर्मिती खरी
सर्व सुख दुःखाची ।।१७।।
तथा कथीत पंडित
विद्वान सामान्यात
बहूजनांपेक्षां
ज्ञान त्यांचे थोडेसे ज्यास्त ।।१८।।
वापरुन ज्ञान शक्ती
सामान्यजनास वाकविती
आपले अस्तित्व स्थापती
विसरुन प्रभू शक्तीसी ।।१९।।
तर्क शक्ती थोर
“आहे चा नाही” करणार
“नाहीं ला आहे” पटविणार,
करुनी ज्ञानाचा खेळ ।।२०।।
मार्गाचा करुनी भेद
वाद करीत राही
जीवन करी बरबाद
विसरुनी ध्येयासी ।।२१।।
ध्येय हे साध्य,
मार्ग हे साधन
वाया जाई आयुष्य
माध्यम साधन समजून ।।२२।।
साध्य नका समजू साधनासी
ठेवा विश्वास साध्यासी
कोणत्याही साधनाने
साधका प्राप्त साध्य होई ।।२३।।
अनेक मार्गाचे प्रयोजन
ज्ञान शक्ती वापरुन
स्व अस्तित्व
ठेवण्या टिकवून ।।२४।।
आस्तित्वाची भावना मोठी
प्रत्येक झगडतो त्यासाठीं
सकळजन आयुष्य
खर्ची त्या पोटी ।।२५।।
न कळे त्यास देवपण
भांडण्यांत जाई विसरुन
टाकी आयुष्य
मातीमोल करुन ।।२६।।
विसरुन जा सर्व भेद
मिटवा वादविवाद
नष्ट करा त्वरीत
लहान मोठ्यांचा संवाद ।।२७।।
न कुणी मोठे न लहान
सारेच आहे समान
असती सारे मानवनिर्मित
घ्या सारे समजून ।।२८।।
ज्ञात धर्म होत अनेक
हे मानवनिर्मीत प्रतिक
न कळे अज्ञाना
सर्व मार्गाचे ध्येय एक ।।२९।।
मानव शक्ती तीच ईश्वर
दुसरा नसे कोणी वर
सगुण रुप देऊनी
आपणची देतो त्यासी आकार ।।३०।।
मानवता हाच धर्म खरा
आपसातील भेद विसरा
जीवन सुखी करण्या
प्रभू देई तयांना आसरा ।।३१।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
September 3, 2017
धागा धागा मिळून,बांधले,खास घरटे,
फांदीचा आधार घेऊन,
उभ्या झाडास लटकवले,
एक चोंच करी किमया,
केवढी मोठी कारागिरी,
पिल्लांस सुरक्षित करण्यां,
माय बापाची चाले हेरगिरी,
घर मोठे प्रशस्त हवेशीर,
वारा चारी बाजूंनी वाहे,
निसर्ग सान्निध्यातले,
वाटते मोठे आरामशीर,
अंडी घालून ती उबवती,
वाट जन्माची पाहती,
कारागीरच ते नव्या उमेदी,
दार घरट्याचे असे बांधले,
सहजी कोणी उतरू नये,
पण साप नागांचा दहशतीने,
रक्षणास तत्पर दोन पाखरे,
चहूबाजूंनी घरट्याला चौकोनी,
असे जाळीदार नक्षी,
आखीवरेखीव जाळ्याला ,
केले कसे त्रिशंकूकृती ,
दुनिया सारी घरातच वसे,
संसार मांडला आगळा,
समर्थ नर मादी दोघे,
परंतु नशिबाचा खेळ वेगळा,--!
हिमगौरी कर्वे.©
April 15, 2019
रक्तातुनी गुण-दोष उतरतो, वंश परंपरेने
व्यक्तीतील स्वभाव धर्म, जाणता येतो रक्ताने...१,
मनांतील विचार मालिका, कृत्य करण्या लाविती
सभोवतालच्या परिस्थिती रूपे, रक्ताला जागविती...२,
कर्म फळाच्या लहरींना, रक्त शोषून घेई,
ह्याच गुणमिश्रीत रक्तामधूनी, बिजे उत्पन्न होई....३,
बिजांचे मग रोपण होवूनी, नव जीवन येते
स्वभाव गुणांची मालिका, अशीच पुढे जाते...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
January 25, 2020
कधी न पाहीले आजपावतो
तरीही येई आठवण कैसी
सभोवतालच्या खाणाखुणा
चित्रीत करीती त्यासी
जेंव्हा बघतो कलाकृती ही
नाविण्याने बहरली
दुर द्दष्टी मज त्यांत दिसे
कल्पकतेने भरलेली
दुःख दुजांचे शितल करणे
मानवतेच्या जीवनधीरा
व्यसनमुक्तीच्या अनुशंगाने
रसेल दाखवी मार्ग खरा.
(रसेल- सेवाधन व्यसनमुक्ती केंद्राचा संस्थापक)
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail – bknagapurkar@gmail.com
January 28, 2018
हादरून गेलो मनात पूरता,
ऐकून त्याची करूण कहानी ।
केवळ एका दु:खी जीवाने,
हृदय दाटूनी आणीले पाणी ।।१।।
असंख्य सारे जगांत येथे,
प्रत्येकाचे दु:ख निराळे ।
सहन करिल का भार येवढा,
ऐकूनी घेता कुणी सगळे ।।२।।
सर्व दुखांचा पडता डोंगर,
काळीज त्याचे जाईल फाटूनी ।
कसाही असो निर्दयी कठोर,
आघात होता जाईल पिळवटूनी ।।३।।
मर्म जाणीले आज परि मी,
पाषाणरूप तुझे कां देवा ।
सर्वजणाची दु:खे झेलण्या,
वज्र देह हा धारीला असवा ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
March 1, 2016
जेंव्हा जेंव्हा प्रवासाने
आम्ही दोघे दमलेलो असतो ........
थकून, कंटाळून घरी येतो,
झोमॅटो तिला नको असतं,
म्हणून पिठलं भाताचा साधा बेत ठरवते !
माझी आवड सांभाळून ती
सांडगे पापड़ हि तळते .....
त्यासोबत न विसरता
लोणच्याची फोड वाढते
कारण आम्ही दोघे दमलेले असतो
तेंव्हा खरंच पिठलं भात
असा साधाच बेत असतो !
कैरी लिम्बाचे लोणचे ....
नेहमीच जेवणात असते.
म्हणून ती मिक्स भाज्यांचे
खमंग लोणचे सुद्धा बनवते
ती कंटाळली की नेहमी असेच होते.....
पिठल भात असा साधाच बेत ठरवते !
भात शिजे पर्यन्त रिकामा वेळ आणि ......
प्रवासातील थकव्याचा सुंदर मेळ मी घालतो..
दोनच ग्लास बियर घेऊन घसा ओला करतो..
कारण पिठलं भात असा साधाच मेनू असतो !
बियर सोबत,मला आवडतात म्हणून ...
चार कांदा भजी ती तळते ...
साध्या मेनूत हि रंगत आणते
कारण जेंव्हा जेंव्हा ती कंटाळलेली असते,
तेंव्हा तेंव्हा पिठल भात असा साधाच मेनू रांधते !
घरी आहेत म्हणून चार थेपले गरम ती करते
तुपाची धार सोडून त्यांना ओले करते ....
शेंगदाण्याच्या चटणी सोबत ..
टोमेटो काकडीची कोशिंबीर असते....
कारण पिठलं भात असा साधाच बेत ती करते !
जेवण खुप साधे झाले .....
हे तिलाही जाणवत असते....
फ्रिजमधल्या आइसक्रीमचे
फ्रूट सलाड ती बनवते
कारण ....
पिठल भात असा साधाच मेनू असतो !
साधाच मेनू असल्याने तिला, मी थोडासा नाराज वाटतो
उद्या नाश्त्याला मिसळीचे वचन देऊनच ती झोपी जाते ....
आमच्याकडे नेहमी असेच असते
ती कंटाळली की पिठल भाताला पर्याय नसतो !
संसार म्हणजे तडजोड आणि समझोता
मी नेहमीच करत असतो
ती दमली की पिठलं भात असा साधाच बेत नेहमी असतो !
ती माझी गृहलक्ष्मी,
कंटाळली तरी,अन्नपूर्णा असते.
चेहऱ्यावर स्मित बाळगून
माझी रसना तृप्त करते !
-- अरविंद टोळ्ये
९८२२०४७०८०
May 19, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti