कशी काय सांगू किती देखणी मी



कशी काय सांगू किती देखणी मी
कधी गीत असते कधी लावणी मी

पुन्हा आज आले तुला भेटण्याला
जरी रोज खाते घरी बोलणी मी

कळेना कशी मी? कळेना कशी मी?
न वाखाणणी मी न हेटाळणी मी

मला पाहण्याचा मला मोह झाला
न ही बंद केली तुझी पापणी मी

जमा जाहले हे किती आज भुंगे
फुले माळली का नको त्या क्षणी मी

— प्रदीप निफाडकर

Author