नव्हतो आम्ही आमचे कधींही बनले जीवन दुजामुळे ।
कर्तेपणाचा भाव तरीही येतो कां मनी ? ते न कळे ।।
कसा आलो या जगतीं ठाऊक नव्हते कांही मजला ।
कसा वाढलो हलके हलके जाण आहे याची मला ।।
जेंव्हा झालो मोठा कुणीतरी वाटू लागले कांही करावे ।
काळाने परि दिले दाखवूनी जीवन प्रवाही वाहात जावे ।।
परिस्थितीच्या काठामधूनी जीवन सरिता वाहात जाते ।
वाहात असता त्याच दिशेनें इच्छीत ध्येय हातीं नसते ।।
होते सारे अखेर तेचि आखून ठेवते नियती जे जे ।
अज्ञानानें समजत राही हे केले मी, अन् हे माझे ।।
डॉ. भगवान नागापूरकर
January 7, 2020
पुरुषांना भावना नसतात,
असं जग गृहीत धरत राहतं,
त्यांच्या शांततेला कणखरपणा म्हणत
आतल्या वादळांकडे डोळे झाकतं.
ते हसतात, कारण हसणं अपेक्षित असतं,
ते थांबतात, कारण रडणं परवडत नाही,
शब्द गिळून घेतात छातीत,
आणि त्या गुदमरलेल्या नि:शब्दतेलाच
“पुरुषार्थ” असं नाव दिलं जातं.
त्यांचं मौन म्हणजे कमजोरी नाही,
ते एक न बोललेलं युद्ध असतं,
जिथे प्रत्येक शांत श्वासामागे
असंख्य न उच्चारलेले प्रश्न असतात.
कोणी विचारत नाही,
“तू कसा आहेस?”
कारण त्यांनी मजबूत असणं बंधनकारक असतं,
मजबूत दिसणं म्हणजे वेदनारहित असणं,
असा गैरसमज रुजलेला असतो.
पण लक्षात ठेवा,
शांत राहणंही एक वेदना असते,
स्वतःला बाजूला सारून
सगळ्यांना सांभाळण्याची
ती एक किंमत असते.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे
July 13, 2026
विष्ठा बघूनी थुंकलो,
घाण वाटली मजला,
अमंगल संबोधूनी,
लाखोली देई तिजला ।।१।।
संतापूनी मजवर ,
कान उघडणी केली,
तुझ्याचमुळें मूर्खा मी,
अमंगळ ती ठरली।।२।।
आकर्षक रूप माझे,
लाडू करंज्यानें युक्त
कपाटातूनी काढूनी,
केले सारे तूंच फस्त ।।३।।
परि मिळतां तुझा तो,
अमंगळ सहवास,
रूप माझे पालटूनी,
मिळे हा नरकवास ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
May 8, 2017
अंगणात उतरल्या चांदण्याच्या गावास आता मी परका
काळजात झिरपल्या डोहाच्याही थेंबास आता मी परका
बेसुमार साऱ्या स्वप्नांना शब्दात जखडती माझ्या राती
फुलणाऱ्या कळ्यांच्या काट्याच्या दिशानाही आता मी परका
श्वासातच माझ्या शोधीत फिरतो कुठल्या नक्षत्राचे गाणे
मनातले गाणे गाणाऱ्या शिवारातल्या वाऱ्यास आता मी परका
स्वप्नांना साऱ्या बांधून मी शब्दाची रचितो अवघी कवने
बोरुत गिरवल्या गुरुजींच्या वचनास आता मी परका
दोन श्वासामधल्या माझ्या अंतऱ्याचे मग उगाच सलणे
मातीच्या गावाकडल्या तुटल्या नाळेस आता मी परका
देव मला जरी कधी भेटला असेल माझे एकच मागणे
दे चिमणीच्या दातांना फिरुनी ज्यांना आता मी परका
-- रजनीकान्त
March 31, 2018
जगण्यात मौज आहे,
सुखदुःखाची फौज आहे,
रिवाजांचे शासन आहे,
रीतींचे आसन आहे,
आश्वासनांचे नभ आहे,
निराशांचा पाऊस आहे,
क्वचित आशेचा किरण आहे,
कल्पनांचे साम्राज्य आहे,
वज्राहून कठोर वास्तव आहे, लोण्याहून मऊ हृदय आहे सैतानाहून कठोर भावना आहे,
संताहून हळवे कुठे मन आहे,
देवाहून थोर कधी माणुसकी आहे, पत्थराहून टणक अनीती आहे,
अत्याचाराचा विळखा आहे,
कधी प्रेमाचा झरा आहे, जिव्हाळ्याचा शब्द बोलका,
मुके प्रेम कधी थोर आहे,--!!
आभाळाहून मोठे मन आहे, विहिरीत कोंडलेले कधी सान आहे,
सुदैव कधी जादूगार आहे,
कधी दुःख मोठे प्रहार आहे,--
जीव कधी कसानुसा आहे,
कधी कधी त्याला भरवसा आहे, दुनियेत कधी ईश्वराचा वास आहे मध्येच कधी, राक्षसी भास आहे,--!
*जगण्यात मौज आहे,
सुखदु:खांची फौज आहे*---!!!
हिमगौरी कर्वे.©
June 18, 2019
लोकशाही सत्ता हवी
लोकशाही राज्य
भारताने स्विकारले
लोकहो टिकवा हे सुराज्य
इथे चालवतो
पंच वार्षिक योजना
नवी सत्ता ,नवा रस्ता स्विकारतो
बेधुंद जनता
हानीकारक देशास
निर्बंधच फायदा असता
हाव नको नुस्ती
राजकारण्या खुर्चीची
त्यास समाजसेवेची पुस्ती
करू नका इथे
जाळ-पोळ,दंगा-धोपा
जिथे शांती लोकशाही तिथे
कर्तव्य नी हक्क
दिले ना संविधानाने
पाळता होतील सारे थक्क
सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
January 9, 2020
पांडूरंगाचे दर्शन घेण्या, गेला पंढरपूरी ।
चुकली नाही कधीही, आषाढी कार्तिक वारी ।।
आजपरी शरीर दुबळे साथ देईना ।
मन तजेले दर्शन घेण्या हट्ट सोडीना ।।
आधार घेऊनी आज कुणाचा गेला पंढरपूरी ।
भरून आले डोळे त्याचे बघता शिखर मंदिरी ।।
आशा नव्हती थोडी देखील दर्शन मिळण्या तेथे ।
अंगणीत जमले भक्त गण नाचत सारे होते ।।
चार दिवस पडून होता विठ्ठल विठ्ठल गजरी ।
फिरणे नाही मागे अशी मनीची तयारी ।।
गेला नाही कण अन्नाचा चार दिवस पोटी ।
ध्यास लागला मनी एकची त्याच्याच भेटीसाठी ।।
टाळ मृदुंग विठ्ठल नामी एक रूप झाला ।
नाचत नाचत प्रभू चरणी येऊन तो पडला ।।
विलीन झाला अनंतात तो फिरूनी नाही उठला ।
देह सोडूनी पांडूरंगी चरणी वैकूंठी गेला ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
August 10, 2016
स्वातंत्र्य मिळालें, पुढें काय ?
चालेल पुढें हें मढें काय ?
स्वातंत्र्यासाठी फुकटच लाखों पडले
अम्हि-तुम्हि घेतले धडे काय ?
सत्तर वर्षें स्वातंत्र्याला होतिल रे
गाजण्यांयोग्य पण घडे काय ?
सांडलें रक्त हें खरेंच आहे, परी
अविरत त्याचे चौघडे काय !
राज्यावर शिवबांच्या बाजिराव-दुसरा !
मग राज्य बुडालें, अडे काय ?
जो खाली, तो तर खाली-खाली जातो
अंधांच्या दृष्टिस पडे काय ?
जो वर चढतो, त्याला खेचूं रे खाली
आम्हांला टाळुन उडे काय !!
स्वातंत्र्याच्या हर्षानें पोट भरा
अन्नासाठी कुणि रडे काय ?
नेते-च गुन्ह्यांना देती चिथावणी
लावतील पोलिस छडे काय !
करीतसे आगळीक राष्ट्र-शेजारी
पण करील UN-बडें काय ?
दुर्दशा बघुन दो-चार फार अस्वस्थऽ
पण, त्यांशिवाय, कुणि कुढे काय ?
दुस्थिती सांगु जर जाई कुणि नेत्यांना
ते मख्ख उत्तरत, ‘कुठे काय ?’
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
August 17, 2016
जातीचे प्रमाणपत्र आपल्याला उपजिल्हाधिकारी कार्यालयातून दिले जाते.आणि हे देत असताना तहसील कार्यालयामार्फत आपली सर्व कागदपत्रे तपासून पाहिली जातात आणि त्याची छाननी करून व सर्व सत्यता पडताळून पाहिली जावून आपली फाईल एकेक टेबल पुढे सरकत जाते. आणि शेवटी सर्व सोपस्कार पूर्ण करून आपल्याला जातीचे प्रमाणपत्र दिले जाते.
आपल्याला हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही आपली फरपट संपत नाही.जेव्हा केव्हा निवडणुका येतात तेव्हा याप्रमाणपत्राची वैधता ( VALIDITY ) करून घ्यावी लागते.हे कशामुळे?
ज्या यंत्रणेद्वारे जातीचे प्रमाणपत्र दिले गेले ती यंत्रणा म्हणजे शासन. मग या शासनाच्या अधिकृत क्लास वन आणि सुपर क्लास वन अधिकार्यांनी एकेक कागदपत्रे अक्षरश:चाळणीतून तपासूनच हे प्रमाणपत्र दिले ना.... मग हि यंत्रणा विश्वासार्ह नव्हे काय? जर विश्वासार्ह आहे तर मग VALIDITY कशासाठी?
जर का एखादी फाईल VALIDITY न होता लातूर येथून जर परत आली तर हे प्रमाणपत्र देणारा अधिकारी दोषी आहे असे समजावे काय?
VALIDITY चे एक टेबल जर उपजिल्हाधिकारी कार्यालयातच वाढविले तर जमणार नाही काय? काय तो येथेच फैसला होवून सामान्याची ससेहोलपट तरी होणार नाही.कारण जातीचे प्रमाणपत्र मिळविताना किती कष्ट लागतात हे प्रमाणपत्र काढ्लेल्यालाच माहित...
प्रशासनाने या बाबत जरूर सकारात्मक विचार केल्यास जनतेला नक्कीच दिलासा मिळू शकेल.
-- महादेव विश्वनाथ कापुसकरी
October 4, 2011
जाई जुईच्या वेलींच्या हा सुंदर पसरला वास
लागली मला घरा जाण्याची आस
आईचा तो नाजूक हात
पित्याचा तो निर्मळ सहवास
जीवनाच्या साथीला क्षितीचा हव्यास
जीवन म्हणजे एक ध्यास
जीवन म्हणजे एक भास
जीवन म्हणजे शिक्षणाची आहे रास
पण आईबाबाशिवाय जीवनात नाही काही खास
भाग्यश्री सतीश प्रधान
अलिबाग
May 12, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti