करू नकोस विचार त्याचा, करणे नाही जेंव्हां तुजला
मोलाचे हे जीवन असता, व्यर्थ दवडशी वेळ कशाला....१
दोन घडीचे जीवन सारे, क्षणा क्षणाने जाईल निघूनी
कुणासाठी हा काळ थांबला, उत्तर याचे घे तू शोधूनी....२
लहरी उठतील विचारांच्या, आघात होता जेंव्हां मनी
विवेक बुद्धीने शांत करावी, भाव तरंगे त्याच क्षणी....३
मर्यादेचे आयुष्य असता, वाहू नकोस विचार प्रवाही
भगवंताचे स्मरण करण्या वेळेची परि बचत करावी....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
November 29, 2019
आनंद दडला वस्तूमध्यें, सुप्त अशा त्या स्थितीत असे
सहवासाने आकर्षण ते, होऊन बाहेरी येत दिसे....१,
प्रेम वाटते हर वस्तूचे, केवळ त्यातील आनंदाने
बाहेर येता नाते जमते, आपुलकीचे पडून बंधने...२,
तोच लूटावा आनंद सदैव, अंवती भंवती वस्तूतला
दूर न जाता दिसले तुम्हां, आनंदच भोवती जमला...३,
जेव्हा कुणीतरी म्हणती, ईश्वर आहे अणू रेणूत
वस्तूमधील आनंद बघतां हेच तत्त्व ते येई ध्यानात...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
October 1, 2020
निराकार तो असूनी व्यापतो, सर्व विश्व मंडळ
सूक्ष्मपणातही दिसून येतो, करि जगाचा प्रतिपाळ....१
दर्शन देण्यास भक्त जणांना, धारण करितो रूप
तसाच दिसे नयनी तुमच्या, ध्यास लागता खूप...२
दृष्टांत होणे सत्य घटना ती, जीवनी तुमच्या घडे
वेड लागता प्रभू चरणाचे, सदैव स्वप्न पडे....३
कुणामध्येही अस्तित्व दाखवी, हीच त्याची किमया
परि टिपून घेई खऱ्या भक्ताची, दृष्टांताची ही माया....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
August 11, 2019
*हायकू*
नववर्ष
*१*
सु स्वागतम्
द्वि सहस्त्र वीसात
हो सुफलाम्
*२*
गरुड झेप
घे या नव वर्षात
दे स्वर्ण लेप
*३*
सुर जुळावे
तन-मन-धनाचे
सुख लाभावे
*४*
प्रभा फाकता
कलरव हो झाला
वर्ष -स्वागता
*५*
या पायघड्या
घालते रे स्वागता
आता ये गड्या
*६*
झाले स्वागत
मोहरता लेखणी
नव वर्षात
-- सौ.माणिक शुरजोशी
January 3, 2020
क्रियेला प्रतिक्रिया, ध्वनीला प्रतिध्वनी ।
तत्व ते सनातन, दिसे नित्य जीवनी ।।
फेकतां जोराने, आदळे भिंतीवरी ।
प्रवास परतीचा, होई तुमचे उरीं ।।
शिवी वा अपशब्द, दिले कुणासाठी ।
येऊनी धडकतील, तुमचेच पाठीं ।।
प्रेमाने बोलणे, सुंगध आणिते ।
आनंदी लहरी, मनां सुखावते ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
September 4, 2017
नव्या घराचा पाया भरतांना,
तो दिसला मला माझ्याकडे येतांना..!
येताच म्हणाला,
"मी वास्तुशास्त्र जाणतो..!"
"कुठे बेड, कुठे हाॅल,
कुठे किचन असावं सांगतो..!"
"शास्त्र माझे सर्व काही सांगते,
मी सांगेन तिथेच सुख नांदते..!"
ऐकून त्याचा सारा कित्ता
मी म्हणालो,
"दोस्ता थोडं थांब
अन्...
मला तिथल्या सुखाचं गुपीत सांग..!"
"जिथं दहा बाय दहाच्या खोलीत
मोठा समूह रहातो..!"
"जिथं या कुशीवर वळलं की
बेड होतो..!"
"त्या कुशीवर वळलं की
हाॅल होतो..!"
"पोटात आग पडली की
तेच होतं किचन..!"
"कुठल्याच सुखसोई
नसल्या तरीही
मजेत फुलतो देह,
ना कुणा रक्तदाब
ना कुणा मधुमेह..!"
"काही सूचत नसेल
तर तसं सांग..!"
"न बोलताच
का चाललास लांब..?"
"दोस्ता...
कदाचित इलाजाला पैसा नसेल,
‘विरंगुळ्याचे रोग’ लागत नसतील..!"
"त्यांचं दुःखच देतं त्यांना
जगण्याचं बळ..!"
"त्याचं दुःखच घालतं त्यांना
जगण्याची गळ..!!"
"नीट उत्तर दे..!"
प्रश्न आणखी विचारतो सोपा,
"कुठल्या शास्त्राला विचारून
सुगरण विणते रे खोपा..?"
"दोस्ता…
सुख नांदण्यासाठी
"या खोलीचं तोंड
त्या दिशेला नसावं..?"
अन्
"त्या खोलीचं तोंड
या दिशेला नसावं..?"
या तकलादू शास्त्रापेक्षा रे,
"माणसाचं तोंड
माणसाकडं असावं..!"
अन्
"माणसाचं मन
माणसाला दिसावं रे..!!!"
March 28, 2017
आदले दिवशी येऊनी, तिजला अभिनंदन दिले
पास झालीस सांगुनी, मित्रांनी पेढे मागितले
हास्यवदन करुनी, साखर हातीं दिली
हाती मिळतां निकाल, पेढे देईन वदली
आंत जाऊनी खोलीमध्यें, बंद केले दार
दुःख आवेग येऊनी, रडली ती फार
वरचा मिळेल नंबर, तिजला होती आशा
रात्र रात्र जागूनही, मिळाली तिज निराशा
खूप कष्ट करुनी, अपयश येता पदरीं
दुःख तया सारखे, नसते ह्या संसारी
समजूनी सांगूनी तिजला, सान्तवन केले मी
पुष्कळ येतील परीक्षा, श्रम येईल कामी
दुसरें दिवशी शाळेमध्ये, निकाल बघण्या गेली
सर्व प्रथम नांव बघूनी, चकीत ती झाली
होता नंबर तिचा, तेथील गुणवत्ता यादींत
मुद्रण दोषांतील चुकीने, पाडले तिला गोंधळांत
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 31, 2017
आई तुझे प्रेम,
अनंत त्याचे दाम ।
तुलनेसी ब्रम्हांडी,
जड तुझीच पारडी ।।१।।
पुंडलीक तुझ्यासाठी,
विसरला जगत् जेठी,
कळण्या तुझ्या प्रेमाचा अर्थ,
शब्दांत नाही सामर्थ्य ।।२।।
बलीदानाची तू मूर्ती,
'प्रेमाचे प्रतिक' हीच तुझी कीर्ती,
कष्ट करुनी वाढविले छोटे,
विसरती तुला होऊन मोठे ।।३।।
सोडीनी एकटे तुजसी,
पंख फुटता उडे आकाशी,
निरोप देऊन प्रेमाचा,
कळस गाठला महानतेचा ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
August 11, 2016
March 23, 2014
आठवण म्हणजे घायाळ ह्रदयाला जगण्याची विनवणी.
June 14, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti