माणसाला माणुसकीचं वागणं कळावं।
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसाचे शरीर अमोल किंमतीचं
पशु-पक्ष्यांपेक्षा खूपच मोलाचं
माणसाच्या हातून चांगलंच घडावं
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसाच्या वागण्यात स्वार्थ नसावा
माणसानं आचरणात बदल करावा
आपल्या आचरणातून इतरांना सांगावं
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसानं नजरेतून चांगलच पहावं
चांगलच ऐकावं,चांगलच बोलावं
चांगलं वाईट माणसाला कळावं
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसानं चंचल मनाला आवरावं
चांगल्यांच्या संगतीत त्याला रमवावं
वाईटाला दूर करावं, चांगल्याला जवळ करावं
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसानं तहानलेल्या जीवाला पाणी पाजावं
भुकेलेल्या जीवाला अन्न द्यावं
इतरांसाठी प्रेम द्यावं
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसाला माणुसकीचं वागणं कळावं।
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
January 28, 2020
किती तो मोह
आता तरी आवर
गरजेचं खरं काय
याचा करूया विचार
आधीची पिढी
मानी समाधान खरं
पोटापुरत जगणं
आपलं आपण बरं
एक पिळा दोरीवर
दुसरा जोड अंगावर
ठेवणीतले एखाद पातळ
खणात नसे गच्च अडगळ
नसे कधी अतिरिक्त ताण
न ऋतू बदलता वरचेवर आजार
तृप्त जेऊन सकस घरगुती अन्न
बाळसे असे कायम अंगावर
टेकता पाठ शांत निज येई
नसे सोस अधिक मनोरंजन सुमार
पिंगळा वेळी आपसूक जाग येई
प्रसन्नचित्ती दिवसाचा हरएक प्रहर
अगदी तसे आता जगणे अशक्य
मान्य! तरी घेऊ त्यातील सार
घरातील, मनातील नकोनकोसे
मोठ्या मनाने करूया हद्दपार
वस्तू, वास्तू, धन अन माणसं
सारेच येथे आहे नश्वर
आला क्षण खऱ्या आनंदात जगूया
तेव्हाचं होईल जीवन सुकर!!
--वर्षा कदम.
December 13, 2021
सरोवरात कमलिनी फुलतां,
भ्रमर भोवती विहरू लागे, पाकळ्यांचे सौंदर्य पाहता,
त्याचा मनमोर नाचू लागे,--!
मोह पडे अगदी त्याला,
टपोऱ्या मोहक कमळाचा, गुणगुणत मस्त मजेत,
वाऱ्यावरती झोके घेत,
उतावीळ एकदम तो,
झटकन तेथे आला,--!!!
ती आपल्याच नादात असे,
ना तिच्या गावी त्याचे येणे,
डुलता डुलता झुळकेबरोबरी, तारुण्याचा तो आनंद उपभोगणे,--!!!
मोहित भुंगा जवळी येता,
गुंजारव सारखा करे,--
निरागस निष्पाप कमला,
जवळ जाऊन तो एकटक बघे,--!!
पराग कण टिपण्या आतून
भृंगराजा जरी वेडावला,--
कमलिनीचे नाजूक तन ,
पाहून अधिकच चक्रावला,--!!!
*सौंदर्याची मूस जशी,
लावण्याची खाणच असे की*,---
पुटपुटतच स्वतःशी मग तो,
म्हणे, मर्जी राखेन तुझी खाशी,--!!
पाहून त्याला ती उद्गारली,
जन्म माझा ना तुझ्यासाठी, प्रेमभावना कळते मजला,
वाहून घेतले प्रभूचरणांसाठी*,--!!!
हिमगौरी कर्वे.©
June 18, 2019
शब्द म्हणजे नाही केवळ समूह अक्षरांचे……
ते आहे एक प्रभावी माध्यम भाव प्रगट करण्याचे……
September 23, 2010
स्वैर मनानें भरारी घेई, पक्षी दिसला आकाशीं ।
स्वछंदामध्यें विसरला , काय चालते पृथ्वीशीं ।१।
एक शिकारी नेम धरूनी, वेध घेई पक्षाचा ।
छेदूनी त्याचा एक पंख, मार्ग रोखी उडण्याचा ।२।
जायबंदी होवूनी पडला, जमीनीवरी ।
त्वरीत उचलून पक्षाचे, पाय बांधे शिकारी ।३।
ओढ लागली त्यास घराची, भेटन्या मुलाला ।
आजारी असूनी पुत्र त्याचा, चिडचिडा तो झाला ।४।
चकित झाला बघूनी मुलाला, अंगणी खेळतांना ।
बघत होता रोज त्याला रडत असतांना ।५।
झाडा वरती दोन पक्षी, नाचुन गात होते ।
मुलास त्याच्या आनंद देवूनी, रिझवीत होते ।६।
गहींवरूनी गेला दृष्य बघूनी, पक्षी- मुलातले प्रेम ।
सोडून दिला हातातला पक्षी, लावून त्यास मलम ।७।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
November 17, 2016
चिव् चिव् करित बोलतां
तुम्ही सारी भाषा
दोन स्वरातून विचारांना
देत असता दिशा
शब्द आमचे सप्तसुरांतून
येती बाहेरी
व्यक्त करिती भाव सारे
असती जे अंतरी
दोन अक्षरी किमया सारी
तुमच्या भाषेची
त्याच चिव चिवे समजुन घेता
धडधड ह्रद्धयाची
भाव मनीचे टिपून घेण्या
शब्द लागती थोडे
चेहऱ्यावरल्या हलचालीनी
प्रश्न उकलूनी पडे.
समज तुमची आपसांतली
कौतूक करणारी
शब्द मोजके असून देखील
भाव दाखविणारी
चिमण्यानो तुम्ही शिकवा सारे
मानव जातीला
व्यर्थ बडबड करुन सारी
वाहूनी तो गेला
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
February 25, 2020
रडवून पुन्हा, अश्रू पुसण्यात मजा नाही
जेंव्हा हरतेस तू, जिंकण्यात मजा नाही
मृगजळापाठी धावावे, कुठवर कोणी?
प्रेम करुन सारखे, फसण्यात मजा नाही
नुसता उगीच हा दिखावा, काय कामाचा?
प्रेम नसेल तर मग, भेटण्यात मजा नाही
प्रयत्ने रगडता वाळूचे कण, तेल गळे!
बोलणे ते सोपे, रगडण्यात मजा नाही
हुलकावण्या वाऽ, देशील तू किती कितीदा?
पुन्हा पुन्हा सावरुन, पडण्यात मजा नाही
श्री सुनील देसाई
०३/०६/२०२२
June 5, 2022
कळले माझे मलाच आता जगणे माझे अल्प
July 12, 2026
सत्याचा असत्यावर विजय म्हणजे होळी ..........
सर्व रंग एकत्र मिसळण्याचा सण म्हणजे होळी ..........
थंडीला राम राम करण्याचा दिवस म्हणजे होळी..........
जीवनातील उत्साह म्हणजे होळी ...........
पुरणपोळी करण्याला कारण म्हणजे होळी........
मुंबई आणि कोकण यामधील दुवा म्हणजे होळी ........
देवावरील विश्वास म्हणजे होळी..........
मनातील पापाला राम राम करण्याची संधी म्हणजे होळी.......
तरुणांना तारुण्य दाखविण्याचा बहाणा म्हणजे होळी .........
अंधारमय जीवनातील प्रकाश म्हणजे होळी ...........
-- निलेश बामणे
March 3, 2012
एकदा त्याला वाटले, आज जाऊन पहावे त्याच्याकडे
पहावे त्याला समजते का,
की का पाऊले वळली तिकडे?
थेट 'त्या'च्या समोर गेला 'बघ कळतंय का तुला !'
आव्हानाची भाषा ऐकून,
'तो' फक्त मनोमन हसला
'त्याने' चक्क विचारले, 'सुखी आहेस ना बाळा ?'
आश्चर्य वाटून याला वाटले,
'त्याला' आला आपला कळवळा
'काय सांगू देवा तुला.....' सर्व दुःख त्याने मोकळे केले
अगदी ढसाढसा रडल्यावरच
चरण त्याचे सोडले
नजर चेहऱ्याकडे, मग सर्व देहाकडे वळली
आताची 'सजीव मूर्ती' दगड कशी झाली?
इतक्यात आकाशवाणी झाली....
'मी समोर असतांनाही
तुम्ही दुःखाचेच पाढे वाचता
आता तरी दुःख विसरावित
हेच कसं विसरता ?
विश्वास नसतो माझ्यावर
की, उगाचच दुःखाचा बाऊ करुन
का मलाच दोष देत बसता ?
अरे असं गाऱ्हाणे गाऊन कधी,
कोणत्या परीक्षेत पास होता येतं का ?
कष्ट केल्याशिवाय, यश चाखता येतं का ?
भ्याडासारखे आत्महत्या करता
खऱ्या परीक्षेतच, सहज हार पत्करता
मीच दिलेल्या आयुष्याची
क्षणात माती करुन टाकता
म्हणूनच मी दगड होणे पसंत करतो
पुन्हा एक संधी नव्याने देऊ पाहतो
पहा तिचे सोने करता येते का ?
आयुष्याचे मोल ओळखता येते का ?
तो तडक उठला, अश्रु कधीच थांबले होते
त्याचं देवत्व मानून
त्याने आत्मविश्वासाने लढायचे ठरवले होते.
सौ. मृणाल महागांवकर, महाड
May 17, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti