दिन दुबळे रोगी जर्जर, कितीक पसरले या संसारी
काटे काढूनी जीवनावरचे, सुगंध घ्या तुम्ही कुणीतरी....१
शून्यामधले कितीकजण ते, शून्यची सारे अवतीभवती
परिस्थितीच्या वणव्यामध्ये, धगधगणारे जीवन कंठती....२
आज हवे ते त्यांना कुणीतरी, फुंकार घालील दु:खावरती
सहानुभूतीचा शब्द एक तो, निर्माण करील सहनशक्ति....३
क्षीण होता तव दृष्टी, दिसेल कां तयाची धडपड
श्रवणदोष तो येण्यापूर्वी, ऐकून घे तू दु:खी ओरड...४
चपळ सारे अवयव असता, धावपळीचे जीवन बघ तू
संगे जावून जाण तयांचा, जगण्यामधला खडतर हेतू...५
जेव्हां असशील विंवचनात तू, लक्ष केंद्रीत स्वदेहा भवती
कोण जगतो कसा काय ते, जाणून घेण्या सवड कुणा ती...६
डॉ, भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
August 24, 2018
जीवनातील वाटे वरती, कडेकडेने उभे ठाकले
परि वाटसरूंना सारे ते, यशातील अडसर वाटले...१,
वाट चालतां क्रमाक्रमानें, बाधा आणून वेग रोकती
ध्येयावरल्या उच्च स्थळीं, पोहचण्या आडकाठी करिती...२,
षडरिपूचे टप्पे असूनी, भावनेवर आघांत होतो
सरळ मार्गाच्या विचाराला, आकर्षणाचा खेंच बसतो...३,
पवित्र निर्मळ भावनेमध्ये, रंगाच्या त्या छटा उमटती
गढूळपणाच्या वातावरणीं, सारे कांहीं गमवूनी बसती....४,
थोडे राहता गाफील तुम्ही, जाळ्यामध्ये अडकून जातां
जीवनाचे जे साध्य असते, स्वकर्माने गमवून बसतां...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
June 21, 2017
किती खाल्ला मार, किती खाल्या शिव्या याची गणतीच नव्हती.
एकच गोष्ट सतत कानी पडत होती.
उनाड आहे, बावळट आहे, धडपड्या आहे, तडफड्या आहे, मूर्ख कुठचा.
भडीमार होत होता आईकडून शब्दांचा..
आम्ही होतो बालपणीच गांधीवादी.
एका गालांत कुणी मारली तर दुसरा गाल पुढे करणारे.
मुकाट्यानें मान वर न करता सारे शब्द पचविणारे.
खेळणें, कुदणें, उड्या मारणें,
त्यातच ढोपर, कोपर, हातपाय फुटून जाणें, भळभळा रक्त वाहायचे.
पण सांगा रडून कुणाला ?
कारण ते असायचे स्वतःच्याच प्रतापाचे...
निमुटपणें बाजूस बसून, सहन करायचे
आणि कुणास समजू नये, म्हणून माती टाकायचे.
भरत होत्या साऱ्या जखमा हलके हलके.
न भरून कसे चालायचे ?
मस्तीची रग, खेळातील धडपड आणि
स्वत:च डॉक्टर बनून जखामाबद्दल वाटणारी मायेची कढ.
सारे तुटून पडायचे, घाव बरे करण्यासाठी.
* * *
... संध्याकाळची वेळ, सूर्य अस्ताला चाललेला.
किती घटका राहील्या होत्या, त्याला डुबण्यासाठी !
विचार करितो मी. शांत बसून पंचाहत्तरीच्या काठी.
हातपाय खाजवितो, कुरवाळीतो, सुरकुतलेल्या कातड्याकडे बघतो.
मध्येच नजर खिळून राहते, ती जखमांच्या वणावर.
कितीतरी लहान मोठ्या आकाराची.
ज्यावर दिसत होती चित्रे आठवणीची.
प्रत्येक वणावर होता एक इतिहास, एक घटना, एक जबरदस्त प्रसंग.
कोडगे बनून केलेली मस्ती, आईचा मार, शिव्या आणि बाबांचा राग.
पण आज सारे काही मनाला आनंदीत करून टाकणारे.
शरिरावरले वण बनले होते एक जीवन आलबंम.
नेत होते भूतकाळांत.
जो होता निश्चित आणि उपभोगलेला.
त्यात भविष्यकाळाची अनिश्चितता नव्हती, कि वर्तमान काळाची क्षणिकता.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
May 1, 2016
बारा गावच्या, बारा वहिवाटीच्या,
कुलदैवत आणि गावच्या ठिकाणदार म्हाराजा.....
......व्हय म्हाराजा sss...
ह्या तुका बारा पाचाचा
गाऱ्हाणा घालतय म्हाराजा
ता तू पावन करुन घी रे म्हाराजा..
......व्हय म्हाराजा sss...
सध्या जो काय ह्यो ओळखीच्या
मंडळीनी आपलो ग्रुप केलो आसा म्हाराजा....
......व्हय म्हाराजा sss...
जसे ग्रुप सुरू झाल्यापासना
आजतागायत सर्व एकमेकांका
जोडून ऱ्हवले हत म्हाराजा...
......व्हय म्हाराजा sss...
तसेच व्हाँटस् अप ग्रुपवर
एकमेकांका जोडून ऱ्हवची
तेंका बुध्दी दे रे म्हाराजा...
......व्हय म्हाराजा sss...
आमचो प्रेमळ ग्रुपलिडर
सगळ्यांका मायेने गोंजारता
कधी कधी हिटलर बनान
फटकारता म्हाराजा...
......व्हय म्हाराजा sss...
कोणाचा काय चुकला तर
त्येका ग्रुपवरना काढुन टाकान
पुन्हा ग्रुपवर घेता म्हाराजा...
......व्हय म्हाराजा sss...
अशीच तेका सुबुध्दी देवनं
ग्रुप जोडानं ठेवची शक्ती
अँडमिनाक दि रे म्हाराजा...
......व्हय म्हाराजा sss...
कामगारांक बोनस, अधिकाऱ्यांक
बक्षिसी तशी ग्रुप सदस्यांक
पार्टी देवची आमच्या अँडमिनाक
बरकत दि रे म्हाराजा...
......व्हय म्हाराजा sss...
टाटा चेअरमनची निवड होवची आसा,
कडक ईस्त्रीचो नयो...
म्हणजेच आमचो अँडमिन...
हेकाच ती संधी दि रे म्हाराजा...
......व्हय म्हाराजा sss...
November 2, 2016
May 25, 2022
प्रदीप निफाडकरांची गझल
April 17, 2010
काव्य रचनेचा छंद लागूनी, कविता करू लागलो
भाव तरंगाना आकार देवूनी, शब्दांत गुंफू लागलो....१,
एका मागूनी दुसरी कविता, रचित मी चाललो
वही भरता संग्रहाची, आनंदात गुंग झालो...२,
अचानकपणे खंत वाटूनी, निराश मी झालो
निरर्थक तो वेळ दवडिला, हेच मनी समजलो....३,
बोध मिळूनी कुणीतरी सांगे, मूल्यमापन होईल
वेडेपणा वा शहाणपणा, काळ हाच ठरवील...४,
करूनी घेतले तुज कडूनी, कोणत्या तरी शक्तीने
कर्तेपणाचा भाव तुझ्यातील, सोडून दे तू मनाने....५,
असेल हे जर कृत्य त्याचे, काळजी त्याला यशाची
सैनिक तू लढत रहावे, आशा सोडून जिंकण्याची....६
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 9, 2018

July 2, 2013
शब्द जरी जाहले अबोल
मौनी मन, मनाशी बोलते
द्वंद्व! ते सत्य, असत्याचे
जीवाला सदा खात असते
कर्म! मनी बिलोरी आरसा
स्वचे, खरे प्रतिबिंब दिसते
जरी प्रतारणा जगाशी केली
सत्यता उरीची जीवा छळते
सर्वांती नोंदणी ती चंद्रगुप्ती
लेखाजोखा, सामोरी मांडते
जन्म! कर्म विवेकी, संचिती
अर्थ! मुक्ती, मोक्षाचा सांगते
प्रीती, सद्भावना सदा सांगाती
सत्य! सूर्यप्रकाशी समोर येते
-- वि. ग. सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. ३९.
८ - २ - २०२२.
February 24, 2022
माऊली मराठीच माझी मायबोली..
ज्ञानयोगीयांची कनवाळू माऊली..
ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या..
स्वसंवेद्या मराठी माझी मायबोली..।।..१
ज्ञानेश्वरी , ही ज्ञानेश्वर माऊलीची..
अभंगगाथा तुकयाची भक्तीरंगली..
भाषाबोध सकल संतसद्गुरूंचा..
माऊली मराठीच माझी मायबोली..।।..२
शब्द मराठीच अस्मिता अंतरीची..
गीता,भागवत,दासबोधादी ग्रंथाली..
अक्षर , अक्षर , साक्षात्कार कृपाळू..
माऊली मराठीच माझी मायबोली..।।..३
माझ्या मराठीचा मला स्वाभिमान..
जगतवंद्य ! ती जगतवंद्य शोभली..
प्राणांहूनही ती श्रेष्ठ आम्हा निरंतर..
माऊली मराठीच माझी मायबोली..।।..४
अती आदरे , मराठी अंतरी जपावी..
मराठी मातृभाषा जी आम्हा लाभली..
मराठी भाषा हा अलंकार वैखरीचा..
माऊली मराठीच माझी मायबोली..।।..५
रचना :- वि.ग.सातपुते. (विगसा)
दिनांक :- २५-२-२०२१
June 1, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti