वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
May 4, 2026
आचार्य अत्रे हे तर संस्थेचे सदैव हितैषी राहिले. संस्थेबद्दल त्यांनी ८ जानेवारी १९६७ रोजी ‘‘ह्य़ाच संस्थेने माझ्या साहित्यिक जीवनाचा पाया घातला. संस्थेचे उपकार मानण्यास मजजवळ शब्द नाहींत. पुण्यातील वाङ्मयप्रेमी तरुणांना स्फूर्ति नि प्रेरणा देण्याचे महान कार्य ह्य़ा संस्थेकडून होवो ही इच्छा!’’ असा अभिप्राय लिहिला आहे.
February 7, 2022
रोजचे संगणकावरचे काम हे आता जवळपास कुणालाच न टाळता येण्यासारखे आहे. सतत संगणकावर काम करुन करून अनेकांना मानदुखी आणि पाठदुखीचा त्रास होतो. काहींचे डोळेही दुखतात. संगणकासमोर सक्तीने बसावे लागण्याचे तोटे आणि त्यावरचे काही सोपे उपाय.
मानदुखीची कारणे अनेक असू शकतात. पण संगणकासमोर घालवलेला वेळ जितका जास्त, तितकी मानदुखी अधिक असे एक साधे समीकरण आहे. या मानदुखीसाठी संगणकासमोर बसण्याची आपली पद्धत कारणीभूत ठरते. अनेकदा संगणकाचा ‘मॉनिटर’ डोळ्यांच्या सरळ रेषेच्या तुलनेत वरच्या किंवा खालच्या पातळीवर ठेवलेला असतो. मॉनिटरकडे पाहण्याची आपल्याला इतकी सवय झालेली असते की तो असा वर किंवा खाली आहे हेही लक्षात येत नाही. मॉनिटर नेहमी डोळ्यांच्या समोर सरळ रेषेतच हवा. तो काही मिलिमिटर वर किंवा खाली चालू शकेल, पण मॉनिटरकडे पाहताना वर किंवा खाली पाहावे लागू नये अशी त्याची जागा असावी. संगणकासमोर काम करताना काही जणांना एकदा की- बोर्डकडे आणि एकदा मॉनिटरकडे असे सतत खाली आणि वर पाहावे लागते. सहसा कागदपत्रे वाचून ती टाईप करताना असे होते. हे देखील मानदुखी वाढवणारे ठरते. अनेकदा की- बोर्ड आणि मॉनिटर यांच्या जागांचा काही मेळच नसतो. एकीकडे की- बोर्ड आणि त्याच्या समोर नव्हे तर थोडासा दूर तिरक्या रेषेत मॉनिटर अशी परिस्थिती असते. यात नुसते वर-खालीच नाही तर उजवीकडे- डावीकडे असेही सारखे पाहावे लागते आणि मानेच्या स्नायूंवर वाढीव ताण येतो.
संगणकासमोर बसल्यावर मॉनिटरवरील मजकूर वाचण्यासाठी खुर्चीतून पुढे वाकावे लागू नये हा पहिला नियम. त्यामुळे खुर्ची सहजपणे पुढे किंवा मागे हलवता यावी. काही खुच्र्याना हाताचे कोपर टेकवायला जागाच नसते. माणसाची उंची अधिक असेल तर की-बोर्ड वापरताना कोपरे सतत हवेत लटकल्यासारखी राहतात. असे करताना खांदे वर उचललेले राहतात आणि मानेच्या बाजूला असलेला स्नायू सतत दाबला जातो. यामुळे काही वेळाने मान दुखायला लागते. त्यामुळे खुर्चीच्या दोन्ही बाजूंना कोपर टेकवायला आधार असणे गरजेचे आहे. इतकेच नव्हे तर खुर्चीच्या हातांची उंची कमी-जास्त करण्याची सोय असलेली खुर्ची निवडल्यास उत्तम. की- बोर्डवर टाईप करताना कोपरांना आधार मिळाला तर खांद्यांवर ताण येत नाही. पाठदुखी टाळण्यासाठी खुर्चीला चांगला ‘लंबर सपोर्ट’ असायला हवा. खुर्चीची पाठ सहसा केवळ पाठीला आधार देण्यापुरती असते. पण हा आधार खांद्यांपर्यंत मिळणे गरजेचे असते. खुर्चीची पाठ तुमच्या खांद्यांपर्यंत असेल तर संपूर्ण पाठीला आधार मिळेल. अशी खुर्ची वापरल्यास पाठदुखीबरोबरच मानदुखीलाही प्रतिबंध करता येऊ शकतो. सातत्याने संगणकावर काम करायचे असेल त्यांनी काही वेळ गेल्यावर पाठ आणि मानेच्या स्नायूंचे साधे व्यायाम करावेत. हे व्यायाम अगदी साधे, कार्यालयात देखील करण्यासारखे असतात. आपल्या डॉक्टरांकडून ते जरूर शिकून घ्यावेत. या हालचालींमुळे पाठ, कंबर आणि मानेवरचा ताण हलका होतो. काहींना तासा- दोन तासांनी ब्रेक घेतलेला पुरेल तर काहींना दर अध्र्या तासाने ‘विश्राम’ स्थितीत यावे लागेल. ब्रेक घेणे म्हणजे काम थांबवून पुन्हा संगणकावरच फेसबुक किंवा तत्सम काहीतरी करणे नव्हे! ब्रेक घेतल्यावर ती पाच मिनिटे तुम्ही संगणकापासून दूर राहायला हवे. या काळात उभे राहून पाठीचे व्यायाम करा किंवा कार्यालयात या टोकापासून त्या टोकापर्यंत चक्कर मारून या.
चष्म्याचा क्रमांकही तपासून घ्या.
नेहमी संगणकावर काम करणाऱ्यांनी आपला चष्म्याचा नंबर बरोबर आहे ना हे ठराविक काळाने तपासून घेतलेले बरे. चष्म्याचा नंबर बदललेला असला तर डोळ्यांवर वाढीव ताण येतो. मानदुखी आणि डोकेदुखीसाठीही हे कारणीभूत ठरू शकते. चाळिशीनंतर बहुतेक जणांना वाचताना चष्मा लागतो, पण ही मंडळी चष्मा घालायचे टाळतात. त्यामुळे आपल्याला चष्मा असेल तर संगणकावर काम करताना तो घालायचे विसरू नका. चष्मा असताना तो न वापरणे हे देखील मान दुखण्याचे एक कारण ठरू शकते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- संपदा सोवनी / सकाळ
January 18, 2017
१९२४ साली चित्रपट सृष्टीतील एका कलंदर कलाकाराचा जन्म झाला. वयाच्या अकराव्या वर्षी त्याने पहिला चित्रपट ‘इन्कलाब’ केला. नंतर फट्मार मारण्याच्या कामापासून त्याने चित्रपटाच्या सर्व विभागांचा अनुभव घेतला. वडील पृथ्वीराज कपूर याच क्षेत्रात नामवंत अभिनेते असल्यामुळे राजने चित्रपट निर्मितीचा देखील बारकाईने अभ्यास केला.
May 4, 2023
महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले माहूरगड हे ठिकाण नांदेड जिल्ह्यात आहे. प्राचीन काळी माहूरचे जंगल ‘ अमलीवन ‘ म्हणून प्रसिद्ध होते .माहूर हे प्राचीन किल्ल्याचे ठिकाण, रेणुकामाता, दत्तात्रेय, अनसूयामाता या तीन डोंगरावरील मंदिरांना सामावणारा माहूरचा हा डोंगरकिल्ला गौंड या आदिवासी राज्याचा एकेकाळी सत्तेचे केंद होता. या परिसराला सुमारे ६ मैल तटबंदी आहे, किल्ल्यावर हत्तीदरवाजा, ब्रह्माकुंड, कारंजी, हौद यांचे अवशेष त्याचे गत वैभवाची साक्ष देत उभे आहेत, १४२७ मध्ये आदिवासी गोंडराजाचा पराभव करून अहमदशहाने माहूरगड जिंकून घेतला . तेव्हा येथील मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली, पुढे किल्लेदार जयसिंग ठाकूर याने रेणुकादेवीचा सभामंडप बांधला .
या सभामंडपवजा मंदिरात प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्याने मढवलेले आहे पुढे देवीची बैठक असुन देवीच्या बैठकीवर सिंहासन कोरलेले आहे या बैठकीवर ५ फूट उंच व ४ फूट रुंद असा रेणुकादेवीचा तांदळा आहे.
या ठिकाणा विषयी अनेक कथा प्रचलित आहेत.
भागीरथीच्या तीरावार कान्यकुब्ज नावाची नगरी होती. त्या नगरीत इश्वाकू राज्याचा पुत्र रेणू राजा राज्य करीत होता रेणू राजाने कन्याप्राप्तीसाठी. शंकर-पार्वतीला प्रसन्न करून कन्याप्राप्तीसाठी यज्ञ केला. त्या यज्ञकुंडातून रेणुका प्रगटली. यथावकाश भागीरथीच्या तीरावर रेणुकेचे स्वयंवर झाले व ती तपस्वी जमदग्नीची रेणुका भार्या झाली. ते भागीरथी तीरावरील महोदय या नगरीत राहू लागले. त्यांचे सोबत स्वयंवरात इंद्राने दिलेली कामधेनू हि होती, रेणुकेला वसू, विश्वासू, बृहद्भानू, बृहत्कन्न आणि परशुराम ही मुले झाली.
रेणुका एकदा नदीवर गेली असता स्त्रियांसह मदनाचे रूप धारण करणाऱ्या गंधर्वाला पाहून तीचे मनात कामूक भाव येतात ही गोष्ट जमदग्नीला कळते तेव्हा ते क्रोधीत होतात व रेणुकेला मृत्युदंडाची शिक्षा देतात व पुत्रांना तिची हत्या करण्यास सांगतात. एकामागून एक चारही पुत्रांनी रेणुकेचा वध करण्याची पित्याची आज्ञा नाकारताच जमदग्नी त्यांना शाप देऊन ठार करतात.
पाचवा पुत्र परशुरामास आज्ञा करतात,पितृ आज्ञा म्हणून परशुराम तत्काळ आपल्या परशुने रेणुकामातेचे शीर धडावेगळे करतो. जमदग्नी प्रसन्न होतात. पितृवचनाचे पालन केल्यामुळे परशुरामास वर मागण्यास सांगतात. मातृभक्त परशुराम आपल्या मातेला व भावंडांना पुन्हा जिवंत करण्याची विनंती करतात. त्यांना क्रोधाचा पश्चाताप होतो व ते रेणुका व पुत्रांस पुन्हा जिवंत करतात. व आपला क्रोध त्यागतात. पुढे राजा सहस्त्रार्जुन जमदग्नी आश्रमात येतो. त्याला तेथे असणार्या कामधेनू व तिच्या चमत्काराबद्दल कळते. तो जमदग्नीकडे कामधेनूची मागणी करतो; .पण जमदग्नी कामधेनू देण्यास असमर्थता दर्शवितात. तेव्हा राजा आश्रमावर हल्ला करतो. सर्वांची हत्या करून रेणुकेला जखमी करून कामधेनूला घेऊन जातो नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला. घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली . पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पाथिर्व व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले . रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर पोहचला . तिथे असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले .या पाण्याने स्नान घालून व तेथेच दत्तात्रेयांचे पौरोहित्या खाली परशुरामाने जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले. यावेळी माता रेणुका सती गेली. त्यानंतर परशुरामाला रेणुकेची खूप आठवण येऊ लागली . तो शोक करत होता , तोच आकाशवाणी झाली . ‘ तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल .फक्त तू मागे पाहू नकोस .’ परंतु त्याने मागे वळून बघितले . त्यावेळी रेणुकामातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते . तेवढेच परशुरामाला दिसले. त्या तांदळारूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते . परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला ठिकाणाला मातापूर नाव मिळाले पुढे त्याचे माहूर झाले.
या परिसरात महाकाली आणि महालक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत. खालील बाजूस परशुराम मंदिर, गणपती मंदिर, पांडवतीर्थ , औदुबर झरा, अमृतकुंड, बोधतीर्थ, मातृतीर्थ, रामतीर्थ , ऋणमोचनतीर्थ ही स्थळे आहेत.
-- निखिल आघाडे
October 7, 2016
अल्बर्ट आइनस्टाइन..... एका महान भौतिक शास्त्रज्ञ , ज्याच्या सापेक्षवादाच्या सिद्धांता मुळे आपल्या विश्वासंबंधीच्या कल्पनेमध्ये अतिशय अमुलाग्र आणि क्रांतिकारक बदल झाला.
अल्बर्ट आइनस्टाइन यांचा जन्म शुक्रवार १४ मार्च १८७९ या दिवशी दक्षिण जर्मनीतील उल्म या संपन्न गावात झाला.हर्मान आणि त्यांची पत्नी पौलिन यांचा हा पहिला मुलगा .त्याच्या डोक्याचा आकार जर वेगळा होता. इतर मुलांच्या मानाने बोलायला उशीरा लागल्याने त्याच्या आईला तो मतीमंद असावा अशी भीती वाटत असे.इतर मुलांबरोबर खेळ खेळल्यावर मी दमतो अशी तो तक्रार त्याच्या आई जवळ करीत असे.तो खूप शांत आणि एकांत प्रिय होता.मस्ती करण्यापेक्षा वाचन आणि संगीत ऐकणे हा त्याचा छंद होता.अल्बर्ट नेहमी धीरगंभीर पण निश्चयी स्वभावाचा होता.अतिशय एकाग्रतेने तो पत्याचा बंगला बनवीत असे. पण लहानपणी तो शांत असला तरी सहनशील नव्हता .५ वर्षाचा असताना त्याने रागाच्या भरात त्याच्या शिक्षिकेला खुर्ची फेकून मारली होती .या घटनेचा त्याच्या मनावर खोल परीणाम झाला आणि निश्चय पूर्वक तो विवेकी बनला.
अल्बर्ट याचे त्याची बहिण माजा आणि त्याच्या आई वडिलांवर खूप प्रेम होते .आई वडिलांना आणि बहिणीला त्याने कधीही अंतर दिले नाही.अल्बर्ट ची आई बुद्धिमान होती.वडील अभियंते होते.अल्बर्ट चा भाऊ जेकब आणि त्याच्या वडिलांचा एक कारखाना होता.
अल्बर्ट च्या वडिलांनी लहानपणी त्याला एक होकायंत्र दिले होते. होका यंत्राची सुई नेहमी उत्तर दक्षिण दिशाच दाखवते हे लक्षात आल्यावर त्याला खूप कुतूहल वाटले .तो या घटनेने इतका उत्तेजित झाला कि त्याच्या अंगाला कंप सुटला . त्यावेळी तो जेमतेम ६ वर्षाचा होता.त्याला ते सर्व गूढ वाटले आणि गूढ शक्तीची उकल करण्याचा ध्यास त्याने घेतला.
काही वर्षांनी गणितातील संख्यांच्या बाबतीत सुद्धा काही तरी गूढ आहे असे त्याला वाटू लागले.गणित आणि विज्ञान याचे आकर्षण वाढले आणि अंधार कसा पडतो ? सूर्याचे किरण कशाचे बनलेले आहेत ? या सारख्या प्रश्नांची उत्तरे तो शोधण्याचा प्रयत्न करू लागला.या संबंधी प्रश्न विचारून तो त्याच्या वडील आणि काकांना भंडावून सोडत असे.अल्बर्ट शाळेतल्या इतर मुलांबरोबर रमत नसे पण अभ्यासात तो खूप हुशार होता.त्याचा वर्गात नेहमी १ ला नंबर येत असे.
वयाच्या १० व्या वर्षात अल्बर्ट स्वतःच गणित शिकू लागला.शाळेचा ठरलेला गृहपाठ झाला कि अल्बर्ट गणितातील कोडी सोडवत बसत असे.
जर्मन कायद्या प्रमाणे अल्बर्ट ला घरच्या घरी धर्म शास्त्राचे शिक्षण मिळाले.आइनस्टाइन कुटुंब ज्यू धर्माचे होते.घरी धार्मिक आचार विचार काटेकोरपणे पाळले जात .परंतु ज्या परमेश्वरावर विश्वास ठेव असे त्याचे शिक्षक नेहमी सांगत त्या परमेश्वरावरील त्याचा विश्वास वयाच्या १२ व्या वर्षीच पूर्ण पणे उडाला .पण निसर्गातील आश्चर्यकारक घटनांकडे तो मोठ्या कुतूहलानी पाहत असे.
या दरम्यान अल्बर्ट च्या आई वडिलांनी कारखान्यात खोट आल्याने म्युनिच मधील आपला व्यवसाय गुंडाळला आणि ते इटलीला गेले.अल्बर्ट शिक्षण पूर्ण करण्यासाठी जर्मनीतच राहिला.परंतु वयाच्या १७ व्या वर्षी लष्करात भरती व्हावे लागेल म्हणून त्याने जर्मनी सोडली आणि तो आपल्या आई वडिलांकडे इटलीला गेला.अल्बर्टला युद्ध , रक्तपात ,हिंसा हे अत्यंत पाप आहे असे वाटे. त्याच्या मनात दुस-याला मारणा-या लोकांबद्दल घृणा उत्पन्न झाली.
अल्बर्ट पदवीधर झाल्यावर नोकरी शोधत होता.जवळ जवळ वर्षभर त्याला नोकरी मिळाली नाही.शेवटी एका शाळेत त्यास शिक्षकाची हंगामी नोकरी मिळाली.त्याला ती नोकरी प्रथम आवडली नव्हती पण नंतर त्याला शिक्षकी पेशा आवडू लागला.अध्यापन करताना त्याने आपले संशोधनाचे कार्य सुरु ठेवले.अल्बर्ट च्या विज्ञान विषयाच्या कल्पना भन्नाट असायच्या . तो नियतकालीकांतून लेख लिहायचा.१९०१ मध्ये त्याने झुरिच विद्यापिठात पी एच डी साठी पाठवलेला प्रबंध झुरिच विद्यापीठाने नाकारला.अल्बर्ट निराश झाला पण ऐन वेळी त्याच्या मदतीला त्याचा जिवलग मित्र मार्सेल ग्रोसमान धावून आला.त्याचे वडील स्वित्झेर्लंड मधील बडे प्रस्थ होते.त्यांनी बर्न शहरातील आपल्या मित्राकडे अल्बर्ट ची शिफारस केली.ते संशोधनाच्या पेटंट देणा-या कार्यालयाचे प्रमुख होते.१९०२ मध्ये अल्बर्ट ला त्या संस्थेत नोकरी मिळाली.स्विस संशोधकांनी पेटंट मिळवण्यासाठी केलेल्या अर्जाची नोंदणी आणि छाननी हि संस्था करीत असे.या संस्थेत अल्बर्ट तंत्र विषयक तज्ज्ञ तिसरा वर्ग ( कनिष्ठ )म्हणून नोकरीला लागला.या कार्यालयात अल्बर्ट आइनस्टाइन यांस तंत्रविषयक सल्लागार (दुसरा वर्ग ) अशी पदोन्नती मिळाली.ते काम करताना त्याला स्वतःचे संशोधन करण्यासाठी खूप वेळ मिळू लागला.
याच अल्बर्ट आइनस्टाइन याने नंतरच्या काळात जे सिद्धांत मांडले त्या सिद्धांताने संपूर्ण जगाचे लक्ष त्याने वेधून घेतले .
E = mc²
उर्जा =वस्तुमान गुणिले प्रकाशाच्या वेगाचा वर्ग हे अल्बर्ट आइनस्टाइन यांचे जग प्रसिद्ध सूत्र .यात कोणतीही गोष्ट प्रकाशाच्या वेगा पेक्षा ज्यास्त वेगाने जात नाही.... हे या सूत्राने स्पष्ट पणे दाखवून दिले .अल्बर्ट आइनस्टाइन यांनी न्युटनचा निरपेक्ष काळाचा सिद्धांत मोडीत काढलाच पण प्रत्तेक व्यक्तीगणित काळ व्यय वेगळा असतो आणि ती व्यक्ती किती जलद अथवा मंद गतीने हालचाल करीत आहे यावर काळव्यय किती होणार ते अवलंबून असते.उदाहरणार्थ --जवळ जवळ प्रकाशाच्या वेगाने प्रवास करणा-या यानात बसून काही अंतराळवीर अवकाशात गेले तर त्या अंतराळवीरांच्या दृष्टीने ,त्यांचा काळव्यय पृथ्वीवर मागे राहिलेल्या माणसांपेक्षा कमी गतीने होईल .अर्थात नेहमीच्या गतीने जाणा-या माणसांसाठी न्युटनचा नियमही लागू पडतो.काही वस्तू प्रकाशाच्या वेगा इतपत वेगाने जावू लागल्या तर त्या आहेत त्या पेक्षा मोठ्या भासतील आणि त्यांच्या वस्तुमाना मध्ये प्रचंड वाढ होईल असे आइनस्टाइन यांनी प्रतिपादन करून गणिताच्या आधारे ते सिद्ध केले.
संत ज्ञानेश्वर यांना जसे धर्ममार्तंड लोकांचा विरोध सहन करावा लागला तसाच अल्बर्ट आइनस्टाइन यांना तो सहन करावा लागला.त्यांचा हा नवा सिद्धांत मान्य करणे तत्कालीन शास्त्रज्ञ समूहाला खूप अवघड होते आणि त्यांचे सिद्धांत चटकन समजतही नसत.
अणु बॉम्ब चा स्फोट ......!
अणु भंजन करून खूप मोठी संघटक शक्ति मुक्त होईल याची जाणीव आइनस्टाइन यांनी जगाला करून दिली.आधुनिक याने, अंतराळातील होणारे प्रयोग याचे खरे जनक आइनस्टाइन हे आहेत हे संपूर्ण जगाने मान्य केले.Run away reaction हि रसायन शास्त्रातील स्फोट घडवणा-या प्रक्रियेला आइनस्टाइन यांच्या मुळे चालना मिळाली.प्रचंड वेगाने याने पृथ्वीचा तळ सोडण्यासाठी आणि पृथ्वीचे आवरण फोडून अवकाशात झेप घेण्यासाठी लागणा-या उर्जेचे , वेळेचे आणि गतीचे गणित आइनस्टाइन यांच्या सिद्धांताने सुटले . आज त्याचीच गोड फळे आपण चाखत आहोत.
हिटलर आणि आइनस्टाइन --
जर्मनी हि श्रेष्ठ आर्य वंशाच्या लोकांची भूमी असून ज्यू , जिप्सी ,किवा अन्य कोणत्याही धर्माच्या लोकांना जर्मनीत राहता येणार नाही असा फतवा हिटलर ने काढला .अनेक ज्यू लोकांनी तेथून पळ काढला तर अनेक भूमिगत झाले.या नाझी वादाशी मुकाबला करण्यासाठी अल्बर्ट आइनस्टाइन याने आपले सारे वैज्ञानिक ज्ञान वापरले.१९३९ साली त्यांनी अमेरिकेच्या रूझवेल्ट या अध्यक्षांना पत्र लिहिले .अणुशक्तीवर आधारित शस्त्रे तयार करणे शक्य आहे हे त्यांनी रूझवेल्ट यांना सांगितले.१९४१ साली रूझवेल्ट यांनी त्यांच्या सरकारी शास्त्रज्ञ समूहाला अणू बॉम्ब तयार करण्यास सांगितले.१९४३ साली आइनस्टाइन यांची अतिशय उच्च दर्जाच्या स्फोटक विषयक सल्लागार समितीचा प्रमुख म्हणून अमेरिकेने नेमणूक केली . जर्मनांना अणु बॉम्ब तयार करता येणार नाही याची पुसटशी जरी कल्पना मला असती तरी अणु बॉम्ब तयार करा असे मी अमेरिकेला सुचवले नसते असे निराश उद्गार आइनस्टाइन यांनी नंतर काढले होते.
खरे तर आइनस्टाइन हे शांततेचे भोक्ते होते.त्यांना रक्तपात आवडत नसे म्हणूनच २ -या महायुद्धा नंतर आइनस्टाइन यांनी ज्या देशांनी अणू अस्त्र बनवली होती त्या त्या देशांनी ती नष्ट करावीत या साठी आइनस्टाइन यांनी जोरदार मोहीम उभारली.आपण एक अतिशय विनाश करणारी शक्ती मोकळी केली याचे शल्य जन्मभर आइनस्टाइन यांना होते . अणुशक्तीचा उपयोग विध्वंस करण्यासाठी न करता शांतते साठी आणि लोकांच्या दैनंदिन व्यवहारात जगाच्या भल्या साठी करावा असे त्यांचे मत होते. त्यांच्यातला ' विवेक ' आपण लोकांच्या हातात हे काय ज्ञान देवून बसलो याची खंत करीत असे.अणू शक्तीच्या दुष्परिणामाची जाणीव त्यांना झाली होती. जगाची हानी टाळण्यासाठी हे नवे तंत्रज्ञान अतिशय कडक नियंत्रणा खाली ठेवले पाहिजे असा इशारा त्यांनी सर्व जगाला त्याच वेळी दिला होता.१८ एप्रिल १९५५ रोजी आइनस्टाइन यांची प्राण ज्योत मालवली. आइनस्टाइन यांचा मेंदू त्याच्या मृत्यू नंतर प्रिन्स्टन हॉस्पिटल च्या पथौलॉजी च्या पयोग शाळेत परीक्षण करण्यासाठी जतन केला गेला.त्याच्या मेंदूच्या डाव्या आणि उजव्या भागाचे नमुने तपासले गेले त्यात अनेक आश्चर्य कारक गोष्ठी उघड झाल्या. आइनस्टाइन यांच्या मेंदू बाबत स्वतंत्र लेख लिहिता येईल .आजवर त्यांच्या मेंदूवर १००००० हून अधिक शास्त्रीय लेख वैज्ञानिकांनी प्रसिद्ध केले आहेत .अजूनही त्यावर संशोधन सुरु आहे.
संत ज्ञानेश्वर आणि अन्य देशातील थोर शास्त्रज्ञ यांच्या काही समान दुवे आहेत परंतु त्यांच्यात काही मुलभूत फरक सुद्धा आहे. या लेखमालेच्या शेवटी मी तो लिहिणार आहे.
-- चिंतामणी कारखानीस -
February 11, 2016
आपण अनेक शंकासुराच्या काटेरी कुंपणातुन गेलो आहोतचं, पण थोडे आपले बोल असत्याच्या चौकातून सत्याच्या मार्गाकडे रममाण झाले तर थोडं लवकर नक्कीच उजाडेल…!
April 26, 2020
बाहेर जाताना पायात चप्पल, हातात काठी, आणि छत्री घेऊन बाहेर पडावे. जमिनीवरील दगड माती, काटे, चिखल, पायांना लागू नये, आपल्या आरोग्याची आम्हाला काळजी आहे, म्हणून हे सर्व पहावे, असे ग्रंथकारांना सांगायचे आहे. वरवर पहाता ” एवढे काय सांगायचे त्यात, एवढे बुद्धु नाही आम्ही” असं वाटणं चुक नाही. पण अश्या अनेक जागा आपल्या सहजपणे लक्षात येत नाहीत, जिथून आपल्याला धोका संभवू शकतो.
September 4, 2017
भारतीयांना एक सुखद आठवण नेहमीच आठवते ती म्हणजे संदीप पाटील यांनी बॉब विलिसला जे सहा चौकार मारून २४ धावा एका षटकामध्ये केल्या. आजही ते सहा चौकार बघताना बॉब विलिसचा बदललेला चेहरा समोर येतो.
June 22, 2021
श्री गणेशा नमुनी तुला
नंतर नमितो कुलस्वामिनीला
मातापूरवासिनी रेणूकेला
कृपा प्रसादे ।१।
तुझा महिमा असे थोर
दुःख नष्ट होती सत्वर
कृपा करिसी ज्याचेवर
पावन होत असे ।२।
गणेश जन्मकथा सांगतो
तयाचा महिमा वर्णितो
आनंदीभाव समर्पितो
तुम्हासाठी ।३।
सर्व दुःखे दुर कराया
तुम्हांसी सुखे द्यावया
जन्म घेती गणराया
तुम्हां करिता ।४।
असतील देव अनेक
देवाधीदेव महादेव एक
सर्व विश्वाचा अधिनायक
तयामध्ये कैलासपती ।५।
शिवपत्नी पार्वती
रही कैलास पर्वतीं
माता जगताची ती
उमादेवी ।६।
उमाशंकर मिळून
सर्व जगाते सांभाळून
कैलासावरी राहून
पालनपोषण करताती ।७।
एके दिनी सकाळी
पार्वति निघाली अंघोळी
पुष्पे घेऊन निरनीराळी
पुजेसाठी ।८।
आनंदी उमादेवी
शिवप्रतिमा मनी वसवी
अंतःकरणी ती रमवी
रुप सदाशिवाचे ।९।
स्नानास निघाली पार्वती
पूजासाहित्य बाहेर ठेवती
मनी विचार करि
प्रेमभरे ।१०।
बेसोनी स्नानघराबाहेर
मनींते बहूत विचार
विचारांना देती आकार
आनंद रुपे ।११।
हाळद घेतली हातीं
चंदन मिश्रीत गोळी करी ती
बाळरुप प्रतिमा बनविती
तयापासून ।१२।
जगन्माता पार्वती
विश्वाची श्रेष्ठ शक्ति
कोतुके बाळ पाहे ती
हर्षभरे ।१३।
सचेतन केला बाळ
प्रेमे आलिंगुनी जवळ
घालितसे पुष्पमाळ
कंठी ज्याचे ।१४।
बाळाचे तेज निराळे
सुवर्णापरी रुप आगळे
तयाचा महिमा कुणा न कळे
पार्वतीविणे ।१५।
धावूं लागला छोटा बाळ
आनंदून गेली उमा सकळ
शिरी बांधली पुष्पमाळ
पार्वतीने ।१६।
बाळासंगे खेळली
स्नानाची तिज आठवण झाली
सांगतसे माय माऊली
बाळाते जवळी घेवूनी ।१७।
तू एक काम करावे
दारापाशी बसून राहावे
आंत कुणा येवू न द्यावे
आज्ञा माझी ।१८।
आनंदे लागला बागडूं
कुणासंगे ही लढू
परत जाण्या भाग पाडू
ह्या विचारी ।१९।
आज्ञा केली मातेने
पाळीन मी आनंदानें
रोकीन तयाते बळजबरीनें
बाळ बोले ।२०।
छोटे शस्त्र हाती देऊनी
पार्वती सांगे समजावूनी
वाट तयाची रोकूनी
धराविसी ।२१।
पार्वती गेली स्नानासी
बैसवुनी बाळा द्वारासीं
द्वारपाल तो बनलासी
बाळ माझा ।२२।
बाळ आनंदे फिरु लागला
तिकडून शिव आला
स्नानगृही जाऊ लागला
बाळ रोके त्यासी ।२३।
हांसु लागला बाळ बघोनी
कौतूक तयाचे करुनी
प्रेमभरे जवळ घेऊनी
सदाशिवे ।२४।
शिव चालला स्नानगृहात
बाळ त्याला रोखीत
तुम्ही न जावे आंत
सांगे बाळ ।२५।
प्रथम त्याचे कौतूक केले
आंत सोडण्या विनविले
वाकून बाळ आलिंगले
विश्वनाथे ।२६।
कोप आला शिवासी
पाहूनी बाळ हट्टासी
त्याच्या विरोधासी
बघुनिया ।२७।
बाळ असूनी लहान
मुर्ति गोंडसवानी छान
जगन्मातेची शक्ति अंगिकारुन
प्रतिकार करु लागला ।२८।
बाळाअंगी पार्वतीचे बळ
म्हणून झाला निश्चयी अवखळ
कांही सुचेना तये वेळ
विश्वेश्वरासी ।२९।
असे तो जगनेमातेचे बाळ
तयामध्ये विश्वाचे बळ
कठीण वाटली शिवे ती वेळ
तयासी पाहूनी ।३०।
बाळ हट्टाने पेटून
शिवाचा करिती अपमान
द्वारी त्याना रोखून
अडवितसे ।३१।
राग येवू लागला मनीं
समज न येई बाळा सांगुनी
संताप आला तत्क्षणी
क्रोधाग्नी पेटला ।३२।
हांती घेऊनी त्रिशूळ बनता बाळाचा काळ
शिरच्छेद केला तत्काळ बाळाचा ।३३।
बाळ पडला धारातीर्थी
धडावेगळे शरीर होती
तत् क्षणीं निश्चेष्ट पडती
जमिनीवर ।३४।
पार्वती आली बाहेरी
नजर आता बाळावरी
दुःख होतसे मनावरी
मृत बाळ बघूनिया ।३५।
एकदम निराश झाली
सारी स्वप्ने धुळीस मिळाली
हूरहूर मनी लागली
पार्वतीस ।३६।
शोक न तिजला आवरे
मृत बाळ बघूनी गोजिरे
ज्या पाही ती प्रेमभरे
पार्वती देवी ।३७।
खिन्न मनाने बैसली
दुःखाश्रु पडती खाली
अत्यंत निराश झाली
उमादेवी ।३८।
शिव झाले शांत
बघूनी उमेचा आकांत
तियेसी देवूनी हात
उठवितसे ।३९।
बघूनी शिवाचे शांत रुप
गेला होता त्यांचा कोप
सोडूनी द्यावे मनातील ताप
पार्वती बोले ।४०।
माझ्या बाळा जीवदान द्यावे
त्याच्या बालहट्टा क्षमावे
विनवितसे जीवेभावे
पार्वतीदेवी ।४१।
स्तुती केली ईश्वराची
पूजा करुनी शिवाची
विनंती करिसी त्याची
बाळप्राणा ।४२।
बघूनी पार्वतीभक्ति
पावला उमापती
बाळासी जीवदान देती
सदाशिव ।४३।
आज्ञा केली शिवगणा
कैलासतील जावे वना
दिसेल प्राण्याचे शिर आणा
प्रथम दर्शनी ।४४।
गेले आनंदे शिवदूत
शिर मिळवण्या वनांत
बघितला छोटा ऐरावत
सरोवरी बागडतसे ।४५।
गजराजाचे शिर छाटले
घेवूनी शिवदूत आले
शिवचरणी अर्पिले
ऐरावत शिर ।४६।
उठवोनी बाळ शरीर
घेऊनी गजराजाचे शिर
ठेवती तयाचे वर
बाळाचे शरिरी
शिवशक्ति प्राण घातले
पूर्ववत् ते सचेतन पावले
मानवी देही दिधले
गजराज शिव ।४७।
नवीन बाळ जन्मास आले
गजशिर मानव देह दिधले
माता-पित्यास वंदन केले
बाळ राजे ।४८।
शिवपार्वतीचे बाळ जाहले
गजानन तयाचे नांव ठेवले
शिवदूतें कौतूक केले
गणेशाचे ।४९।
शिवपार्वतीची अपूर्व शक्ति
गणेशाते मिळती
दोन्ही तेज एकरुप होती
गणेशामध्ये ।५०।
महादेव आशिर्वाद दिधला
गणेशाते श्रेष्ठ ठरविला
प्रथम पुजा मान तयाला
सर्व देवांमाजी ।५१।
प्रथम पुजा श्री गणेशाची
कार्ये होतील सार्थ नंतरची
हीच असेल प्रथा पूजेची
आज्ञा केली शिवे ।५२।
सर्व संकटे निवारसी
कार्ये नेती सिद्धीसी
दुःखापासून मुक्त करिसी
गणेश कृपें ।५३।
विघ्नहर्ता सुखकर्ता गणपती
कार्ये निर्विघ्न पार पडती
सुख समृद्धी घरी नांदती
त्यांचे आशिर्वादे ।५४।
तू होशील ज्ञानदेवता
सकळजण तुज वंदिता
प्रसन्न होऊनी ज्ञान देता
विद्वान होतील ।५५।
श्री गणेश जन्मसोहळा
सर्वाना भासे आगळा
आकाशातून वाहती पुष्पमाळा
सर्व देव मिळूनी ।५६।
पुष्पांची वृष्टी केली
पृथ्वीमाता पावन झाली
तिच्यावरील दुःखे शमली
श्री गणेशामुळे ।५७।
गणेश दैवत सुख समृद्धीचे
ज्ञानविज्ञानाचे
कार्य सिद्ध करिसी सर्वांचे
प्रथम मान तुला ।५८।
गणेश दैवत सुखसमृद्धीचे
ज्ञानविज्ञानाचे
कार्य सिद्ध करीसी सर्वांचे
प्रथम पुजामान तुला ।५९।
वंदन तुज गणराया
सर्वांचे भले कराया
सर्व समभाव मनीं यावया
कृपा करावी ।६०।
रोज एकदा स्त्रोत्र म्हणूनी
एकविस दुर्वा लाल फूल वाहूनी
गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवूनी
गणेशा पूजावे ।६१।
नित्यनियमे पठन करावे
चतुर्थीला एकविस आवर्तने
भक्तिभाव मनीं ठेवणे
भक्तासि पावतसे ।६२।
भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थीला
श्री गणेशाचा जन्म जाहला
आनंदे सण उत्सावूं लागला
सकळजन ।६३।
।। शुभं भवतू ।।
डॉ. भगवान नागापूरकर
२- ०८०८८३
January 1, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti