वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

अथ श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः ॥
इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
विभूतियोग नावाचा दहावा अध्याय
श्रीभगवानुवाच ।
भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः ।
यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया ॥ १
श्री भगवान म्हणाले,
महाबाहु पार्था तू असशी माझा प्रिय मित्र
म्हणुनि सांगतो तुझ्या हितास्तव परमज्ञानसूत्र १
न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः ।
अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः ॥ २
कळलो नाही मी देवाना वा महर्षिंनाही
मूळ मीच सार्या देवांचे आणि ऋषींचेही २
यो मामजन्मनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् ।
असम्मूढः स मर्त्येषु सर्वपापैः प्रमुच्यते ॥ ३
मज अजन्म अन् अनंत जाणी जो नर निर्मोही
मी जगदीश्वर कळते ज्या तो पापमुक्त होई ३
बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः ।
सुखं दुःखं भवोऽभावो भयं चाभयमेव च ॥ ४
मति, ज्ञान, संशयनिवृत्ती, क्षमा, सत्य, निग्रह,
सुखदु:ख तसे जननमरण अन् भय, निर्भय भाव, ४
अहिंसा समता तुष्टिस्तपो दानं यशोऽयशः ।
भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः ॥ ५
समत्वबुध्दी, तृप्ति, अहिंसा, तप अन् दातृत्व,
यश, अपयश या साऱ्यांचा हो माझ्यातुनि उद्भव ५
महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा ।
मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः ॥ ६
चार महर्षी अन् सप्तर्षी तसे मनु समष्टी
(पाठभेद: सात महर्षी, चार पुरातन, तसे मनु समष्टी)
या सार्यांना जन्म मजमुळे, अन् त्यातुन सृष्टी ६
एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः ।
सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः ॥ ७
माझ्या कर्मांवर, सामर्थ्यावर धरि विश्वास
तो होतो ममभक्तिपरायण कर्मयोगी खास ७
अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते ।
इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः ॥ ८
उगमस्थान मी अन् सार्यांचा माझ्यातुन उपज
बुध्दिवंत हे जाणुनि भजती भक्तीपूर्वक मज ८
मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परम् ।
कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च ॥ ९
भक्तिपूर्वक चित्त मजमधी गुंतवुनी सांगती
परस्परां मजविषयी, आणि स्वत: त्यात रमती ९
तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् ।
ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ॥ १०
प्रेमाने जे योगि भक्त मम सेवेमधि गर्क
त्यांना मी मजकडे यायचा दावितसे मार्ग १०
तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजं तमः ।
नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता ॥ ११
त्यांवरती अनुकंपा म्हणुनी तदंतरी जातो
ज्ञानाच्या तेजाने तेथिल अंधारा हटवितो ११
अर्जुन उवाच ।
परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् ।
पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम् ॥ १२
अर्जुन म्हणाला‚
अजर, अमर, आदिदेव, दिव्य तुम्हि आहा सर्वव्यापी
परब्रह्म तुम्हि, परमात्मा तुम्हि, परमधामही तुम्ही १२
आहुस्त्वामृषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा ।
असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे ॥ १३
ऋषी असित, देवल, देवर्षी नारद, व्यासमुनी
असेच म्हणती आणि ऐकतो तुमच्याहीकडुनी १३
सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव ।
न हि ते भगवन्व्यक्तिं विदुर्देवा न दानवाः ॥ १४
सत्य हेच मज मान्य, केशवा, तुम्ही सांगता ते
व्यक्तिमत्व तुमचे ना माहित देवदानवाते १४
स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम ।
भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते ॥ १५
भूतमात्र निर्मिता सर्व तुम्हि जगत्पती माधवा,
तुम्हास अंतर्ज्ञाने कळते तुम्ही कोण, देवा १५
वक्तुमर्हस्यशेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः ।
याभिर्विभूतिभिर्लोकानिमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि ॥ १६
कळल्या ज्या तुम्हा, सांगाव्या मजला मधुसूदन,
प्रवृत्ती तुमच्या ज्यायोगे राहता जग व्यापून १६
कथं विद्यामहं योगिंस्त्वां सदा परिचिन्तयन् ।
केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया ॥ १७
कसे करावे चिंतन, तुम्हा कसे आळवावे?
मज सांगा कुठकुठल्या रूपे तुम्हा ओळखावे? १७
विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन ।
भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मेऽमृतम् ॥ १८
अपुल्या शक्ती आणि महत्ता सांगा विस्तारून
अमृतमय ते बोल ऐकण्या आतुर मम कर्ण १८
श्रीभगवानुवाच ।
हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः ।
प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे ॥ १९
श्री भगवान म्हणाले‚
हे कुरूश्रेष्ठा, तुला सांगतो ठळक ठळक माझ्या शक्ती
विस्ताराला अंत न माझ्या अशीच माझी प्रवृत्ती १९
अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः ।
अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च ॥ २०
मीच अंतरात्मा रे ब्रह्मांडातिल साऱ्या भूतांचा
कुंतिसुता मी आदि, मध्य मी, तसा अंतही मी त्यांचा २०
आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् ।
मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी ॥ २१
मी आदित्यांतिल विष्णू, अन् मीच सूर्य तेजसांतला
वाऱ्यामधला मरिचि मी, तसा शशांक नक्षत्रांमधला २१
वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः ।
इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना ॥ २२
वेदांमध्ये सामवेद मी, देवांमधला देवेंद्र
इंद्रियांमधे मन, अन् भूतांतिल जीवाचे मी केंद्र २२
रुद्राणां शङ्करश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसाम् ।
वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहम् ॥ २३
रूद्रगणांचा मी शंकर, अन् कुबेर मी यक्षांमधला
अष्टवसूतिल पावक मी, अन् मेरूही पर्वतांतला २३
पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिम् ।
सेनानीनामहं स्कन्दः सरसामस्मि सागरः ॥ २४
पुरोहितांतिल मुख्य म्हणति ज्या तो मी आहे बृहस्पती
सेनानींमधि कार्तिकेय मी, जलाशयांमधि सरित्पती २४
महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम् ।
यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः ॥ २५
महर्षींमधी भृगुऋषी मी, ॐकार असे ध्वनींत मी
यज्ञांमधला जपयज्ञ, हिमाचलहि तसा निश्चलांत मी २५
अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः ।
गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः ॥ २६
वृक्षांमध्ये पिंपळ, तैसा नारद देवर्षींमधला
गंधर्वांमधि चित्ररथ, तसा कपिलमुनि सिध्दांमधला २६
उच्चैःश्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भवम् ।
ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् ॥ २७
सागरातुनी निर्मिति ज्याची तो अश्वांतिल उच्चश्रवा,
हत्तींमधि ऐरावत, तैसा नराधीप मी मनुज जिवां २७
आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् ।
प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणामस्मि वासुकिः ॥ २८
शस्त्रांमध्ये वज्र, तसा मी कामधेनु गायींमध्ये
जीवनिर्मितीमधि मदन मी, अन् वासुकि सर्पांमध्ये २८
अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम् ।
पितॄणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम् ॥ २९
नागांपैकी अनंत मी, अन् पाण्यासाठी वरूणहि मी
नियमनकर्ता यम मी आणिक, पितरांमधला अर्यम मी २९
प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहम् ।
मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम् ॥ ३०
नियंत्रकांतिल काळ मी, तसा दैत्यांमध्ये प्रल्हाद
पशूंमधी मी सिंह, आणखी पक्षिगणांमधला गरुड ३०
पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम् ।
झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी ॥ ३१
वेगवान वारा मी, आणि शस्त्रधरांमधि दाशरथी
मत्स्यांमधे मकरमत्स्य, अन् सरितांमध्ये भागिरथी ३१
सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन ।
अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् ॥ ३२
सृष्टीचा आरंभ, अंत, अन पार्था, मीच असे मध्य
विद्यांमधि अध्यात्म मीच, अन् वादींमधला मी वाद ३२
अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च ।
अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतोमुखः ॥ ३३
अक्षरांतला ‘अ’कार मी, अन् समासांतला मी द्वंद्व
अक्षय ऐसा काल मीच, अन् ब्रह्मदेव मी चतुर्मुख ३३
मृत्युः सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यताम् ।
कीर्तिः श्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा ॥ ३४
सर्वांसाठी मी मृत्यू, अन् येणार्यांस्तव जन्महि मी
श्री, कीर्ति, वाचा, बुध्दी अन् धृती, श्रुती, नारींमधि मी ३४
बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम् ।
मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः ॥ ३५
स्तोत्रांमधला बृहत्साम मी, अन छंदांमधि गायत्री
मासांमधला मार्गशीर्ष, अन् ऋतूराज जो वसंत मी ३५
द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ।
जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहम् ॥ ३६
कपटींसाठी द्यूत मीच, अन् तेजस्वींचे मी तेज
व्यवसायांतिल यशही मी, अन् बलवानांचे मी ओज ३६
वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः ।
मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः ॥ ३७
वृष्णींचा वासुदेव मी, अन पांडवामधे धनंजय
मुनींमधी मी व्यासमुनी, अन् कवींमधी शुक्राचार्य ३७
दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम् ।
मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम् ॥ ३८
दण्डकांतला दंड मी, तसा विजिगीषूंमधली नीति
गुपितांमध्ये मौन मीच, अन ज्ञानींमधली विज्ञप्ती ३८
यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन ।
न तदस्ति विना यत्स्यान्मया भूतं चराचरम् ॥ ३९
आणि अर्जुना मीच आहे रे बीज भूतमात्रांचे या
माझ्याविरहित नसे कुणिहि तुला या इथे आढळाया ३९
नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप ।
एष तूद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया ॥ ४०
ना गणती अन् अंतही तसा नाही रे माझ्या रूपा
तुज सांगितली ती तर केवळ थोडिच रूपे, परंतपा ४०
यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा ।
तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसम्भवम् ॥ ४१
सुंदर अन् तेजस्वी ऐशा असती ज्या सार्या गोष्टी
माझ्या तेजाच्या अंशांतुन होते त्यांची उत्पत्ती ४१
अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन ।
विष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत् ॥ ४२
तरी अर्जुना, हवे कशासाठी हे विस्तारित ज्ञान
अंश सूक्ष्मसा माझा राही जगताला या व्यापून ४२
इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः ॥
अशा प्रकारे येथे श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
विभूतियोग नावाचा दहावा अध्याय पूर्ण झाला.
-- मुकुंद कर्णिक
October 23, 2022
ब्रोकोलीचा जन्म साधारण दोन हजार वर्षापूर्वी इटलीमध्ये झाला. ब्रोकोली ही हिरव्या रंगाची असते व आपल्या फुलकोबीप्रमाणे दिसते. रोम संस्थानिक ब्रोकोली लावत असत. ब्रोकोलीनंतर इटलीमधून युरोपात आली. व नंतर अमेरिकेकडे वळली. अमेरिकेत गेल्यावर डॉ.जे.टी.स्मिथ यांनी ब्रोकोलीचे संपूर्ण पृथ्थकरण केले व ब्रोकोली ही अतिशय उपयुक्त आहे असे जाहीर केले.
January 3, 2024
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत भेटीदरम्यान काय भूमिका घेतील याबद्दल सर्वांनाच कुतुहल होते. या दौर्यात ओबामा यांनी भारताभिमुख भूमिका घेतली तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीतील भारताच्या कायम सदस्यत्वाला पाठिंबा देऊन त्यांनी खूष केले; परंतु जाता-जाता भारताने इराणच्या अणुकार्यक्रमाला तसेच म्यानमारमधील मानवी हक्कांच्या पायमल्लीला विरोध करावा असे सुचवून स्वत:चे हित साधले.
November 10, 2010
तोंडात अन्न घेतल्याबरोबर लगेचच लाळ येऊन पचनाची पहिली प्रक्रिया सुरू होते. वार्धक्यात कधीकधी लालाग्रंथींमधून पुरेशा प्रमाणात लाळ निर्माण होत नाही. याची अनेक कारणे असू शकतात. काही औषधांचे दुष्परिणाम, विशिष्ट आजारांचे लक्षण, केमो किंवा रेडिएशनचे दुष्परिणाम, लालाग्रंथींच्या नलिकांमध्ये खडा होणे, उलट्या होणे, तळलेले पदार्थ अधिक सेवन करणे, रक्तस्राव होणे, सिगारेट व तंबाखू सेवन करणे अशी मुख्य कारणे आहेत.
July 6, 2022
भगवान गणेशांच्या स्तोत्रांनंतर जगदंबेच्या स्तोत्रांच्या रसग्रहणाला आरंभ करताना आज नेमकी वसंत पंचमी असावी हा नियतीचा सुंदर योगायोग. वसंत पंचमी हा ज्ञानदायीनी देवी शारदेच्या, सरस्वतीच्या पूजनाचा दिवस
January 28, 2020
गोलंदाजाने एका डावात पाच बळी घेणे किंवा फलंदाजाने शतक करणे यापेक्षा फार जास्त दुर्मिळ आणि अतिशय कमी वारंवारता असलेली घटना म्हणजे एका क्षेत्ररक्षकाने एका डावात ५ गडी बाद करणे. यष्टीरक्षकांच्या बाबतीत हे तसे कमी वेळाच पण ‘बर्याचदा’ घडू शकते. निव्वळ क्षेत्ररक्षकाकडून हे घडणे म्हणूनच आश्चर्यजनक ठरते.
September 18, 2010
देवाची आरती करताना असो किंवा उत्साहाच्या क्षणी टाळ्या या आपसुकच वाजवल्या जातात.
मानवी शरीरात 340 प्रेशर पॉईन्ट्स असतात. त्यापैकी 27 हाताच्या तळव्यामध्ये आढळतात. असे Kairali Ayurveda group चे डॉ. राहुल डोग्रा सांगतात.
त्या प्रेशर पॉईंटवर विशिष्ट दाब दिल्यास, मसाज केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. अनेक वेदना कमी करण्यास मदत होते.
क्लॅपिंग थेरपी – :
खोबरेल तेल किंवा तीळाचे तेल हाताला लावून मसाज करा. ते हळूहळू त्वचेमध्ये शोषले जाते. दोन्ही हात एकमेकांवर ठेवा. ते डोळ्यासमोर ताठ ठेवा. खांदे थोडे सैलसर ठेवा. हा उपाय सकाळच्या वेळेस अधिक फायदेशीर ठरते.
सकाळच्या वेळेस 20-30 मिनिटं टाळया वाजवल्यास तुम्ही फीट आणि अॅक्टीव्ह रहाल. कारण टाळ्या वाजवल्याने रक्तप्रवाह सुधारतो. रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर होण्यास मदत होते. तसेच घातक कोलेस्ट्रेरॉलचा त्रासही कमी होतो असा सल्ला डॉ. डोग्रा देतात.
टाळी वाजवल्यानंतर कोणत्या 5 अँक्युपंचर पॉईंटला चालना मिळते :
1. Hand valley point
2. Base of thumb point
3. Wrist point
4. Inner gate point
5. Thumb nail point
या ’5′ पॉईन्ट्सला चालना दिल्यास खालील फायदे होतात-
1. हृद्याच्या आणि फुफ्फुसांच्या कार्याला चालना मिळण्यासाठी, त्यासंबंधी व्याधी कमी होण्यासाठी मदत होते. यामुळे अस्थमाचा त्रासही कमी होतो.
2. पाठीचे, मानेचे आणि सांध्यांचे दुखणे कमी होते.
3. गाऊट्च्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी क्लॅपिंग थेरपी फायदेशीर ठरते.
4. लो ब्लड प्रेशरच्या रुग्णांना ही थेरपी फायदेशीर ठरते.
5. टाळ्या वाजवल्याने पचनाचे विकार सुधारतात.
6. क्लॅपिंग थेरपीमुळे लहान मुलांची आकलनक्षमता सुधारते. अभ्यासातील गती सुधारते.
7. क्लॅपिंग थेरपीमुळे मुलांचा मेंदू तल्लख होण्यास मदत होते.
8. क्लॅपिंग थेरपीमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते तसेच अनेक आजार दूर ठेवण्यास मदत होते.
9. मधूमेह, अर्थ्राईटीस, रक्तदाब, नैराश्य, डोकेदुखी, निद्रानाश,केसगळती, डोळ्यांचे विकार यासारख्या समस्या कमी करण्यासाठी क्लॅपिंग थेरपी मदत करते.
10. सतत एसीमध्ये बसणारे आणि काम करणार्यांमध्ये घाम येत नाही. अशा लोकांनी क्लॅपिंग थेरपी केल्यास रक्तप्रवाह सुधारतो. यामुळे शरीर शुद्ध होण्यास मदत होते.
-- `आरोग्यदूत' WhatsApp ग्रुपवरुन
May 16, 2017
गावात रामदास नावाचे कासार होते ..ते गल्लोगल्ली बांगडी, बिल्लोर म्हणून आवाज द्यायचे …मग त्यांना आवाज दिला की ते घरी येऊन….बांगड्या हातात भरून देत असत.. विविध रंगी बांगड्या काय मन मोहून घ्यायच्या म्हणून सांगू…..रामदास दादांचा स्वभाव खूप मिश्किल होता.सदोदित चेहऱ्यावर हास्य.
October 25, 2023
कोकणात आढळणाऱ्या मंदिरांमध्ये मुख्यतः ग्रामदेवतेचे मंदिर महत्वाचे असते. त्याव्यतिरिक्त काही खाजगी मंदिरे सुद्धा आहेत. आज नोकरी व्यवसायाची साधने बदलल्यामुळे कोंकणातील बहुसंख्य लोक शहराकडे स्थायिक झाले आहेत. पण आपल्या गावाकडील ग्रामदेवतेचे मंदिर हा त्यांच्या जिव्हाळयाचा विषय आहे. कोकणातील मंदिरांमध्ये साजरे होणारे सण उत्सव, जत्रा यांच्या प्रथा-रूढी आणि परंपरांमुळे समाजातील एकोपा आणि बांधिलकी टिकून राहण्यास मदत होते.
December 16, 2022
एक वर्ष,सव्वा वर्षाचे मूल...मुंबई शहरात एकटं फिरतय..गर्दीतून..गाड्यांच्या मधून..रेल्वे ट्रॕक वरुन...मधेच कुठल्यातरी बाकावर झोपतय...भूक लागते म्हणून एक पडलेली गोळी खातो तर ती झोपेची गोळी असल्याने गाढ झोपी जातय..पुन्हा उठतय...आपल्या आईला शोधत फिरतय…
कुणी तुम्हाला एखाद्या चित्रपटाचा अर्धाअधीक भाग असा एखाद्या एक वर्षाच्या मुलावर चित्रीत झालाय हे सांगितले तर पटेल का?
माणसाचे आयुष्य अकल्पनीय आहे. 'Truth is stranger than fiction' असे मार्क ट्वेनचे एक प्रसिद्ध वाक्य आहे. सिनेमाच्या पडद्यावर ज्या गोष्टी आपण काल्पनिक म्हणून पाहतो त्यात माणसाच्या आयुष्यात प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टींचेच प्रतिबिंब असते का, हा एक जुना वादाचा विषय. सिनेमॕटीक इलेमेंट म्हणून काही वेळी कल्पनेची फोडणी द्यावी लागते. तरीही सिनेमा पाहून बाहेर पडणा-या प्रेक्षकांना जे आपण पाहिलं तसे खरेच घडले असणार हे वाटत रहावे, त्यांना त्या विचाराने अस्वस्थ करावे, अशी ताकत काहीच सिनेमांमधे असते. 'आखरी खत' हा त्यापैकी एक.
माझ्यावर 'आखरी खत' या चित्रपटाची एक अजब मोहिनी आहे. याचे कारण जेंव्हा केबल टिव्हीने नुकतेच डोके बाहेर काढले होते तेंव्हा त्यावर येणारी काही मोजक्या चॕनेल्समधे एक होते ATN. या चॕनेलवर दुपारी हा सिनेमा नियमीत लागायचा. मी तेंव्हा काॕलेजमधे होतो. काॕलेजला सुट्टी असायची तेंव्हा केबलवर 'पडीक' असायचो. त्यामुळे चॕनेल बदलता बदलता या चॕनेलवर असेन व हा सिनेमा लागलेला असेल तर बोटं आपसूक स्थिरावायची. मग तो सिनेमा तिथून पुढे पाहिला जायचा.
आखरी खत हा चेतन आनंद यांचा चित्रपट. हकीकत, हिर रांझा यासारखे दर्जेदार सिनेमे देणारा हा आवलिया एक दिवस अचानक साधारण सव्वा वर्षाच्या एका मुलाला मुंबईत फिरायला सोडतो व सिनेमॕटोग्राफर जाल मिस्त्री यांना घेउन त्याच्या मागे त्याचे शुटींग करत फिरतोय अशी बातमी बाॕलीवूड मधे पसरली व काही जणांनी त्याला चक्क वेड्यात काढलं. राजेश खन्ना नावाचा एक नवा कलाकार व इंद्राणी मुखर्जी सारखी तितकी प्रसिद्ध नसलेल्या आभिनेत्री घेउन चेतन आनंद काय हा वेडेपणा करताहेत असेही लोक म्हणू लागले होते. पण अर्थातच चेतन आनंद यांना आपण काय करतोय व आपल्याला काय बनवायचय याची पूर्ण जाणीव होती.
कथा तशी नेहमीच्याच धाटणीची.. एक तरुण शिल्पकार गोवींद काश्मिरमधे आलेला आहे. ज्या गावात तो आहे तिथल्या एका साध्याभोळ्या मुलीवर लज्जोवर त्याचा जीव जडतो. तिलाही तो पसंत आहे. दोघे गुपचूप मंदिरात लग्न करतात. काही दिवसांनी तो शहरात परत येतो, त्याचे पुढचे शिक्षण पूर्ण करायला. नंतर तिला कळते की तिला दिवस गेले आहेत. तिची सावत्र आई लज्जोला विकून टाकते. लज्जो तिथून कशीबशी सुटते. एका मुलाला जन्म देते. आपल्या मुलाला कष्ट करुन सांभाळू लागते. पण तिची तब्येत खूप खराब होते आणि आपला अंत जवळ आलाय हे पाहून आपल्या मुलाला, बंटूला, घेउन शहरात येते व गोवींदला शोधत फिरु लागते. ब-याच प्रयत्नांनी गोवींदचा पत्ता मिळतो पण गोवींद तिच्यावर शंका घेतो व तिला स्विकारत नाही. म्हणून ती त्याला एक पत्र लिहीते व जेंव्हा तो घरी नसतो त्यावेळी त्याच्या दाराशी सोडते..हेच ते 'आखरी खत'.
गोवींदला ते पत्र मिळते पण तोवर खूप उशीर झालेला असतो. लज्जो हे जग सोडून निघून गेलेली असते..त्याचे मूल शहरात हरवलेले असते. पश्चातापदग्ध गोवींद पोलीसांच्या मदतीने बंटूचा शोध घेउ लागतो. बंटू फिरत फिरत एका अनाथ आश्रमातल्या माणसाला सापडतो. तो त्याला घेउन येतो..खायला घालतो. रात्री आई स्वप्नात येते...तिच्या आठवणीत तो उठतो व त्या अनाथ आश्रमातून बाहेर पडतो. रात्रभर फिरत राहतो. त्याचा ट्रेस लागल्याने पोलीस व गोवींद शहरभर त्याला शोधत फिरत असतात. पहाटे पहाटे बंटू गोवींदच्या घराजवळ पोहोचतो. तिथे गोवींदने बनवलेला लज्जोचा पुतळा पाहतो..आईचा पुतळा बंटू ओळखतो व पुतळ्याला जाउन मिठी मारतो..तिचा पान्हा शोधू लागतो.
गोवींद दोन रात्र झोपलेला नसतो. तो व पोलीस परत येतात तेंव्हा बंटू त्यांना घरीच सापडतो..तो लज्जोच्या पुतळ्याला धरुन झोपी गेलेला असतो.
हा सिनेमा पाहताना तुम्हाला रडू आले नाही तर तुम्ही स्वतःला चेक करुन घेउ शकता. कारण कोणीही असो, डोळ्यात पाणी येणार नाही असे हा चित्रपट पाहताना होत नाही.
मुलांवर आलेले खूप चित्रपट आपण पाहिले आहेत. या चित्रपटातील मुले जराशी तरी कळत्या वयातील असतात. त्यांच्याकडून भूमीका करुन घेणं तसंही अवघडच असतं..इथे तर जेमतेम एक वर्षाचं मूल. मग चेतन आनंद या महाभागाने आख्खा चित्रपट (जवळ जवळ सत्तर टक्के भाग) त्याच्यावर कसा चित्रीत केला असेल? चेतन आनंद आणि जाल मिस्त्री या दोघांनाही यासाठी 'लवून कुर्नीसात'. त्याकाळी त्यांनी आउटडोअर चित्रीकरणासाठी (मुख्यतः बंटूच्या मागे मागे फिरताना) हँडहेल्ड कॕमेरा वापरला. चित्रपटात निओ-रिॲलिझम चा इफेक्ट आणण्यासाठी कदाचित हा चित्रपट कृष्णधवल बनला. कारण १९६६ साली रंगीत पडदा भारतात अवतरला होता.
चित्रपटातील गाणी एकदम उच्च दर्जाची. रफीनी गायलेले 'और कुछ देर न जा और कुछ देर ठहर' हे अतिशय तरल गीत खास खय्याम टच असलेलं. मन्ना डे यांनी म्हंटलेले एक पार्टी साँग 'ओह माय डार्लिंग' हे तितके प्रसिद्ध नाही पण छान आहे. असेच एक क्लब साँग भूपिंदर सिंग यांनी पडद्यामागे व पडद्यावर देखील गायलय..'रुत जवाँ..जवाँ..रात मेहेरबाँ..' खूप साॕफ्ट व छान लयीतलं हे गाणं तस खय्याम पठडीतलं नाही पण तरीही श्रवणीय.
पण या चित्रपटातील कळसाध्याय अर्थातच लता दिदींच्या आवाजातील दोन गाणी..
पहिलं अर्थात सदाबहार गीत 'बहारों..मेरा जीवन भी संवारो..कोई आयें कहींसे..यूं पूकारो..बहारो..' गोवींद भेटण्याआधी लज्जो तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराला साद घालते तेंव्हाचं हे कमालीचे सुंदर गीत..माझ्या स्वतःच्या टाॕप टेन मधील एक.
दुसरं गाणं आहे एक अंगाई..'मेरे चंदा..मेरे नन्हे..तुझे अपने सिनेसे कैसे लगांउ..' लज्जो मृत्युनंतर बंटूच्या स्वप्नात येउन ही अंगाई गातेय..गोवींद रस्तो-रस्ती झोपलेल्या लोकांमधे त्याच्या मुलाला शोधतोय. बंटू एक चर्चच्या आवारात झोपलाय..सकाळ होताच तो पुन्हा उठून रस्त्यावरुन फिरायला लागलाय..अशी या गाण्याची पार्श्वभूमी. लताजींनी या गाण्यात प्राण ओतलाय..
कैफी आझमी व खय्याम ही बाप माणसं का होती हे तुम्हाला ही गाणी ऐकून पटतंच.
असो. चित्रपटाने रिलीजच्या वेळी फारशी कमाई केली नाही. राजेश खन्नाचा हा पहिलाच चित्रपट. पण त्याकाळी तो स्टार नव्हता. पण नंतर राजेश खन्ना सुपर स्टार झाला. त्यानंतर या चित्रपटाने रिपीट रिलीज मधे कमाई करीत खर्च वसूल केला.
चित्रपट विलक्षण होता..व त्याच्या आख्यायिका त्याहून विलक्षण.
मार्क ट्वेनचे वाक्य म्हणूनच इथे चपखल लागू होते..
Truth is stranger than fiction, but it is because Fiction is obliged to stick to possibilities; Truth isn't.
कोण जाणे असे किती बंटू रस्त्यांवर आजही फिरत असतील..
-- सुनील गोबुरे.
सांगली.
July 9, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti