हा देखील गरम मसाल्यातील एक अत्यंत सुगंधी पदार्थ.आपल्यापैकी बरेच जण ह्याचा उपयोग जेवणातील मसालेभात,पुलाव,गरम मसाला ह्या मध्ये तर केला जातोच.पण चहा अथवा काॅफी बनवताना देखील दालचिनी वापरली जाते.
दालचिनीचा वापर आपण घरगुती औषधामध्ये देखील करू शकतो.वाचून आश्चर्य वाटले का?
दालचिनीचा व्रुक्ष नेहमी हिरवागार असतो.आणी आपण वापरत असलेली दालचिनी ही त्या झाडाच्या बुंध्याची त्वचा हो.ह्यात एक उडवशील सुवासिक तेल असते ज्याचा बराचसा उपयोग त्याच्या औषधी गुणधर्मामध्ये होतो.
दालचिनी ही चविला कडू,गोड अशा मिश्र चवीची असते आणी उष्ण असते.ती शरीरातील वात आणी कफ दोष कमी करते आणी पित्त दोष वाढवते.
आता हिचे घरगुती उपचारात उपयोग पाहूयात:
१)दात किडून दुखत असल्यास दालचिनीच्या तेलात भिजविलेला कापूस दाता खाली धरावे वेदना कमी होतात.
२)सर्दी,खोकला ह्या मध्ये सुंठ+दालचिनी+धणे घालून केलेला काढा प्यावा.
३)वारंवार पोटात क्रूमी होण्याची सवय असल्यास २ इंच दालचिनी +३० वावडींग दाणे+१ चिमूट हिंग पूड हे मिश्रण दररोज साधारण दहा ते पंधरा दिवस घ्यावे व वर कोमट पाणी प्यावे.हा प्रयोग दर तीन ते सहा महीन्यांनी परत करावा.
४)लिंबाच्या रसात दालचिनी उगाळून लावल्यास वांग आणी चामखीळ कमी होतात.
५)वाढत्या वया सोबत काहीजणांची लघ्वीची तक्रार वाढते जसे वारंवार थोडी थोडी लघ्वी होणे,लघ्वीवरचा ताबा सुटणे,किंवा झालेली लघ्वी न समजणे ह्यात १/२ चमचा दालचिनी पूड सकाळ संध्याकाळी गरम पाण्यासोबत घ्यावी.
दालचिनीच्या अतिवापराने एसिडीटी,तोंडात उष्णतेचे फोड येणे,तसेच शरीरातील धातूंना क्षीणता येणे अशा तक्रारी उत्पन्न होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
September 24, 2016
नैसर्गिक उपवास न घडण्याची कारणे आणि उपाय.
छे, हो, एवढ्या लवकर कसे जेवायचे ? वेळच नाही हो.
आम्ही घरीच येतो आठ वाजता
August 10, 2016
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 30
नैवेद्यम् समर्पयामी-भाग चार
आपल्याकडे पाहुणे येणार आहेत. त्याच्यासाठी मस्त स्वयंपाक तयार केलेला आहे. पाने घेऊन ठेवलेली आहेत. पण पाहुणेच आलेले नाहीत, तर पाने उगाच वाढून ठेवायची काय ?
देवाच्या पूजेची सर्व आरास तयार झालेली आहे. पूजेला दाखवायचा नैवेद्य तयार आहे. सर्व पूजा साहित्य तयार आहे. यजमान तयार आहेत, पण देवाची प्रतिष्ठापना जर झाली नसेल तर नैवेद्य दाखवून घ्यायचा का ? आणि मखरात देवच नसेल तर नैवेद्य दाखवायचा तरी कुणाला ?
नैवेद्य कधी दाखवायचा ?
देव आला असेल तर.
अहं वैश्वानरो भूत्वां प्राणीनाम् देहमाश्रितम, म्हणजे पोटातील भूक, वैश्वानर, जाठराग्नी, तो मीच, असं प्रत्यक्ष भगवंत सांगताहेत. याचाच अर्थ असा की, पोटात देव उपस्थित झाल्याशिवाय त्याला नैवेद्य दाखवायचा काय ?
सरळ सरळ सांगायचे तर, भूक लागल्याशिवाय अजिबात जेवू नये. देव प्रकट झाल्याशिवाय नैवेद्य तरी कोणाला दाखवायचा ना ? पाहुणे आल्याशिवाय वाढायचे तरी कोणाला ?
नैवेद्याचे हे साधे सोपे सूत्र लक्षात ठेवले तरी बास आहे. ज्याला जसे समजून घ्यायचं असेल तसं समजून घ्यावे समजून घ्यायचंच नसेल तर सोडून द्यावे. इथे फुकटचा निरर्थक वाद घालायला वेळ आहे कोणाला ?
देवाला समजून घेण्यासाठी मुळात एक वेगळी दृष्टी, काही वेगळी समज असली पाहिजे. देव का सांगितला गेलाय, देव कुठे असतो, तो कुणाला दिसलाय का ? सगुण रूपातला देव समजला की नंतर निर्गुणातला समजून घ्यायचा असतो. सगुण निर्गुण एकु गोविंदु रे, असं माऊली म्हणतात. पण सगुण समजून घेतला की नंतर निर्गुण समजणे सोपे होते.
काही गोष्टीमधे आपल्याला "क्ष" गृहीत धरावा लागतो, ते उत्तर मिळेपर्यंत. ते उत्तर एकदा मिळाले की नंतर हा गृहीत धरलेला "क्ष" विसरून जायचा असतो. हा " क्ष" म्हणजेच आमचा देव.
ज्यांना अभ्यास करायचा आहे, त्यांनी कोणत्याही मार्गाने शिकावे. सगुण रूपात भक्ती योगाने जाणून घ्यावा, ज्यांना कर्मयोगाने समजून घ्यायचा असेल तर तसा समजून घ्यावा. ज्यांना ज्ञानमार्गाने जाणून घ्यायचा असेल तर तसा निर्गुण रूपातील अभ्यासावा. पण कुत्सित बुद्वीने देव म्हणजे बुवाबाजी, देव मानणे म्हणजे समाजाला काही वर्षे मागे नेणे असले आरोप करून केवळ शाब्दीक बुडबुडे काढणे म्हणजे शक्तीचा अपव्यय आहे.
देवपूजा वगैरे सगळं बामनाचं काम. त्यांनी समद्या जन्तेला फशीवलंय. येड्या देवाच्या नादी लावलंय, समाजाला मागे नेण्याचं काम केलंय, वगैरे ज्यांना बोलायचं असेल ते खुशाल बोलू द्यावे. देव ही संकल्पना समजून घेण्यासाठी तशी शुद्ध वैज्ञानिक बुद्धी हवी, ते येरागबाळ्याचे काम नव्हे. आज कोणीही उठतो, देवाची निंदा नालस्ती करतो.
देवाला नैवेद्य अर्पण करायचा तेव्हा मनात भाव असा हवा की मी जणुकाही सगुणरूपातील देवाला घास भरवतो आहे. भाव जर नामदेवांचा असेल तर देव जेवल्याशिवाय राहात नाही, ही उच्चकोटीची भक्ती आहे. ही तळमळ, तो भाव आपण निर्माण करू शकत नाही, म्हणून देव आपल्या हातून जेवत नाही. भाव तसा देव असतो, हे समजून घ्यायचे असते. बुद्धिवादी नास्तिक लोकांना ही भक्ती म्हणजे बुवाबाजी वाटते. ढोंग वाटते. आणि मनात विकल्प येतात. चार दोन बड्या लोकांनी देवाला नावे ठेवली, त्यांचे आपण अनुयायी आहोत, समाजसुधारक आहोत, असे वाटणे हा निव्वळ भ्रम आहे.
जर विज्ञानाचा तिसरा डोळा उघडला तर भक्तीमागील कर्मयोग आणि ज्ञानयोग दोन्ही दिसू लागतील.आणि त्यामागे लपलेले आरोग्य सूर्याप्रमाणे स्पष्ट दिसू लागेल.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
23.06.2017
June 23, 2017
माणूस हे रसायनच काही अद्भूत आहे. सगळं कळतंय, पण वळवत नाही. आध्यात्मिक भाषेत यालाच " माया " असे म्हणतात वाटतं.
एकदा या मायेच्या जालात अडकलं की, माया सोडतही नाही, सोडवतही नाही, सोडलं तरी दुःख, सोडलं नाही तरी दुःख.
असो.
मांसाहारी आणि शाकाहारी प्राण्यांच्या आवाजापेक्षा माणसाचा आवाज, त्यातील चढउतार, गोडवा, हीच त्याची देणगी. सात स्वरांचे ज्ञान आहे, म्हणून गाता बोलता येते, भांडताही येते. असं इतर कार्निवोरस, हर्बीवोरस ना नाही करता येत.
नजर रोखून, डूक धरून खाणे हे माणसाला जमत नाही. एखादा पदार्थ आवडला नाही तर नाक मुरडेल, पण मारक्या बैलासारखा, किंवा कुत्र्यामांजरा सारखा दुसऱ्या वर गुरगुरत तर खाणार नाही. बायकोने केलेलं कसं निमूटपणे गिळतो !!! ( म्हणजे तसं करायचं तरी असतं. )
सकाळी दुपारी संध्याकाळी आणि रात्री असं रोज चार वेळा तरी पोटभर जेवतो. तरीदेखील काही जणांना रात्री परत भूक लागतेच. माणूस मांसाहारी प्राण्यांसारखा एकदा पोटभर खाल्ले की पुढे चार दिवस उपास नाही करत.
माणसाची आतडी, मांसाहारी प्राण्यांच्या आतड्यांपेक्षा लांब असतात, तर शाकाहारी प्राण्यांच्या आतड्यांपेक्षा लहान असतात.
मांसाहारी प्राण्यांप्रमाणे तोंड उघडे ठेवून, जीभ बाहेर काढून, श्वासोच्छ्वास करीत तापमान संतुलीत राखत नाही, की अंग चाटत बसत नाही. उन्हाळा आला की घाम खूप येतो, थंडी आली की शू शू खूप करतो आणि शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढतो.
माणसांच्या अंगाला दुर्गंधी नाही. कारण दररोज आंघोळ करतात. अपवादाने काही महाभाग असतीलही. पण ते घरात रहात नाहीत, हाॅस्टेलला रहात असतील कदाचित !
दया, प्रेम, वात्सल्य, लळा माणसांमधे असते.
नरो वा वानरो वा !
मांसाहारी नरांइतके क्रूर नसतात. हे नक्की.
माणसाचे डोळे जन्मतःच उघडलेले असतात. पण मिटून घेऊन झोप आणल्याचं सोंग मात्र उत्तम वठवतो. मला माहित नव्हतं, विसरलो, जमलंच नाही, सहन झालं नाही, झेपत नाही, ही अशी कारणं हर्बीवोरस किंवा कार्निवोरस देत नाहीत. त्याने नियम केलाय तो पाळण्यासाठी. टाळण्यासाठी नाही. बुद्धीचा अतिवापर झाल्यानं, त्यालाच टाळायला, पिटाळायला, रिटायर करायला निघालेल्यांना काय सांगणार आणि कसं समजवणार ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
2.10.2016
October 2, 2016
प्रत्येकाची गोधडी पण वेगळी. लहान बाळाकरीता तयार केलेली रंगीबेरंगी दुपटी म्हणजे या गोधडीचे जणु बाळच ! ही दुपटी नवीन साडी घेऊन शिवायचीच नसतात. ही साडी जुनी वापरलेलीच हवी. एका बाळासाठी वापरलेली दुपटीदेखील परत परत धुवुन पुढच्या बाळंतपणातदेखील वापरली जात होती.
February 7, 2018
माड,पोफळी ह्या जातीचे हे झाड उष्ण प्रदेशामध्ये उत्पन्न होते.उंच वृक्ष असतो.तसेच ह्या झाझापासून ताडी काढली जाते जी प्यायला वापरतात तर फळे ज्यांना ताडगोळा म्हणतात त्यांचा उपयोग खाण्यासाठी केला जातो.
आता आपण ह्याचे गुणधर्म पाहूयात कच्चे ताडगोळा हा चवीला गोड,थंड गुणाचा व कफ वाढविणारा व वातपित्त दोष कमी करणारा असतो.
चला मग ह्याचे घरगुती उपयोग पाहूयात ना:
१)उष्णतेमुळे लघ्वीची जळजळ होत असेल तर कोवळा ताडगोळा खडीसाखर घालून खावा.
२)डोळ्यांची आग होत असल्यास ताडगोळा त्याच्याच पाण्यात वाटून तो लेप पापण्यांवर लावावा.
३)गळू पिकत नसल्यास जून ताडगोळा वाटून त्यात हळद घालून गरम करावा व त्या गळूवर बांधावा.
४)ज्या व्यक्तींना शरीरात वात वाढल्याने संडासला घट्ट होत असेल अथवा साफ होत नसेल तर जेवणापुर्वी व जेवणानंतर काही वेळाने १ ताडगोळा खावा.
५)अंगामध्ये उष्णता वाढणे,हातापायांची आग होणे,पोटात आग होणे ह्यात ताडगोळा खाण्याने फायदा होतो.
ताडगोळा अतिमात्रेत खाल्ल्याने सर्दी,खोकला,जुलाब होतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 21, 2016
लवण रसाचा युक्तीने वापर केला तर तो प्रिझरवेटीव्ह म्हणून वापरता येतो. म्हणून तर लोणच्यामधे मीठ जास्त घालतात.
मीठाला कधीही कीड लागत नाही. हा त्याचा एक चांगला गुण. मीठाप्रमाणेच खायचा चुना देखील कीटनाशक आहे.
मीठातील हा गुण ओळखून मासे टिकवण्यासाठी, सुकवण्यासाठी मीठाचा वापर होतो. कैरी, लिंबू मिरच्या टिकवण्यासाठी सुद्धा मीठच वापरले जाते.
कोकणात कच्च्या फणसाचे गरे मीठ लावून वाळवतात. काही ठिकाणी हे असे मीठ लावलेले कच्चे गरे नीट गुंडाळून, मातीच्या मडक्यात जमिनीत पुरूनही ठेवतात. ते कुसत नाहीत किंवा किडत नाहीत. आणि आवश्यक वाटतील तेव्हा बाहेर काढून, धुवुन भाजी करतात.
दररोज दात घासण्यासाठी लवणरस हा निषिध्द सांगितला आहे. त्याने दात जास्त क्षरण पावतात, म्हणजे झिजतात, पण युक्ती वापरली तर किडलेल्या दातांपासून मुक्ती मिळते. किडलेल्या दाढांमधे मीठाचा दाणा धरून ठेवल्यास किड मरते.
कशी ?
घरात कोबी अथवा फ्लाॅवर किंवा तत्सम भाजी आणली, तर त्यात लपलेली किड दिसत नाही. ती बाहेर यावी यासाठी सुगृहिणीला, हा फ्लाॅवर मीठाच्या पाण्यात बुडवून ठेवायचा असतो, हे सांगावे लागत नाही, किंवा शिकण्यासाठी शाळेत जावे लागले नाही. फ्लाॅवर मीठाच्या पाण्यात बुडवला की लपलेली कीड आपोआप बाहेर येते, तशी दाढेत लपलेली कीडदेखील आठवड्यातून एकदा मीठाच्या पाण्याचा कवल धरला की झाले काम ! मीठाची गुळणी धरून बसणे म्हणजे कवल. ( कवल टीप यापूर्वी झाली आहे. )
म्हणजे आजच्या भाषेत मीठ जंतुनाशक झाले ना !
कोबी, पालक, पडवळ, दोडका अश्या काही भाज्यामधे मीठ नैसर्गिकरित्या जास्तच आहे. त्या शिजवताना मीठ जरा कमीच घालावे लागते. या भाज्या शिजल्यानंतर आळतात, हे सुगृहिणीला कळते.
मीठ जास्त झाले तर पोटात ढवळत रहाते. म्हणून उलटी नीट होण्यासाठी मीठाचे पाणी प्याले तर उलटी छान होते.
छान होते ? किळसवाण्या उलटीमधे छान होण्यासारखे काय आहे ? ते उलटी करणाऱ्यांना विचारावे, म्हणजे समजेल.
पोटात आतड्यांना चिकटलेला चिक्कट आम सोडवण्यासाठी हे लवणजल वापरले जाते.
ताप कमी होण्यासाठी मीठाच्या पाण्याच्या घड्या डोक्यावर ठेवतात, हा प्रथमोपचार तर सर्वांनाच माहिती आहे.
आणि कुठेतरी लचकून मुरगळून सूज आली, तर गरम पाण्यात मीठ टाकून शेक घेणे हा उपाय पण घरातील ज्येष्ठ नागरीकांना माहिती आहे. शरीरातील पाणी बाहेरून स्वतःकडे शोषून घेणे, या मीठातील गुणामुळे सूज आणि वेदना कमी करण्यासाठी मीठ बाहेरूनच वापरले जाते.
उलट्या जुलाब होत असतील तर मीठ साखर पाण्याचा जगजाहीर उपाय आहेच. पण तो आयुर्वेद मतानुसार सरसकट वापरू नये, अग्नि मंद होतो. यासाठी वैद्य मत जरूर घ्यावे.
केस गळणाऱ्या केसमधे मीठ जरा जपूनच वापरावे, नाहीतर गाॅनकेस व्हायला वेळ लागणार नाही.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
06.11.2016
November 6, 2016
देवदर्शनासाठी जायची सुद्धा लाज वाटू लागली. विज्ञान म्हणे देवाला मानत नाही. आपण देवाला मानले तर उगीचच आपणाला आर्थोडाॅक्स म्हटले जाईल, कदाचित याची लाजही वाटू लागली.
March 2, 2018
वाग्भट सूत्र स्थान 5 मधे ग्रंथकार असे म्हणतात, आकाशातून थेट खाली येणारे पाणी हे सर्वोत्तम. याला गांगेय जल, ऐंद्र जल, अंतरीक्ष जल किंवा दिव्य जल असे म्हणतात.
जमिनीतून पण पाणी वर येते, जसे विहिरीतून येणारे. याला भूमीतून येते म्हणून भूमीज किंवा भौमजल म्हणतात.
या दोन्ही प्रकारच्या पाण्याला कोणतीही विशिष्ट चव नसते, रंग नसतो, वास नसतो, पण तरीही ते जीवनदान देणारे आहे, म्हणून त्याला जीवन म्हटले आहे.
बाह्यरूपावर एखाद्याचे गुणमुल्य ठरत नसते, त्याच्या उपयोगितेवर त्याची किंमत ठरत असते. हे आत्महत्या करू इच्छिणाऱ्या मंडळींनी जरा लक्षात घ्यावे. जर असे विचार येत असतील तर झरा, नदी, धबधबा, समुद्र, तलाव, कारंजा यांच्याजवळ जावे. काठावर शांत बसावे, पाण्याचे उडणारे तुषार अंगावर झेलावेत, मनसोक्त पाण्याशी खेळावे, आणि मनातली सारी जळमटं धुवुन टाकावीत.
"मी हा असा, मला काही जमत नाही, माझ्यात काहीही गुण नाहीत, माझी इथे आवश्यकता नाही, माझी कोणाला गरज नाही, माझ्यामुळे कोणाचेही काहीही अडत नाही, मग मी जगायचे तरी कशाला", असे नकारार्थी विचार ज्यांच्या मनात येतात, त्यांनी या खळाळत वाहाणाऱ्या पाण्याकडे पहावे. पाणी असा विचार करतं का ? मी कशाला वाहायचे ? माझं पुढे काय होणार आहे. गटारातून समुद्रातच जाणार. तिथेही माझी वाफच होणार. ना मला रूप ना गंध, ना आकार. मग माझ्या जिंदगानीचा काय उपयोग होणार ?
पण हेच पाणी कोणत्याही अपेक्षाशिवाय वाहात असते. "ज्याला हवे असेल तो माझ्या काठावर येतो आणि अमृतकण घेऊन जातो, हेच माझं मोठेपण" असा सकारात्मक अहंकार बाळगून हे जल इतरांना तृप्त करण्यासाठी समुद्रात विलीन होऊन जाते.
मनाला प्रसन्न आणि शुद्ध करण्यासाठी देखील हे जीवन काम करते. जेव्हा प्रकुपित पित्तामुळे राग अनावर होतो, अंगाची आग होते, मनाचा तोल जातो, तेव्हा पाण्याचा एक घोट लगेचच शांतपणा आणतो. प्रवासाचा शीण आलेल्या पाहुण्यांचे पहिले स्वागत पाणी देऊनच केले जात असते. प्रवासाचा थकवा एक घोट पाण्याने लगेच निघून जातो ना !
घरात वारंवार होणाऱ्या भांडणात हे पाणी आग कमी करणारे ठरू शकते. बाहेरून दमूनभागूनचिडून आलेल्या पतीला अथवा पत्नीला, घरात आधी हजर असणाऱ्यांने, दारात पाऊल पडताक्षणी जर पाण्याचा एक ग्लास नेऊन हातात दिला तर ??? सारा थकवा, सारी दुःख, सारा राग, नाहीसा झाल्यासारखा वाटेल.
प्रत्येकाला, वेळेत घरी यावंस वाटेल, मला पाणी विचारणारं कोणीतरी माझी वाट बघतंय, ही भावनाच कौटुंबिक संबंध घट्ट करत असते.
म्हणूनच याला जीवन ऐसे नाव !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
24.12.2016
December 24, 2016
छान पंगत बसलेली आहे. जिलब्यांचा मस्त वास दरवळतो आहे. आवडीची मंडळी वाढायला अवतीभवती बागडताहेत,
अशा वेळी जिलबी खाण्यावरून पैज लागते.
August 16, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti