(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आजचा आरोग्य विचार – भाग पंचवीस

    केवळ पोटावर चार सहा बिस्किटे दाखवता आली म्हणजे पूर्ण आरोग्य मिळत नसते, जिममधला व्यायाम हा हट्टी व्यायाम प्रकार आहे. विशिष्ट स्नायुंची ताकद विशिष्ट व्यायाम करून वाढवता येते, पण त्याचा परिणाम इतर मांसपेशीवर वा अन्य नाजूक अवयवावर होतो, हे पण लक्षात घेतले जात नाही.

      February 25, 2018


  • आहारातील बदल-शाकाहार भाग १२

    आता काय करू?

    कोकणात गहू वापरायचा नाही तर
    आता काय करू ?
    आता गहू खायची एवढी सवय (सात्म्यता) झाली आहे
    आता काय करू ?
    गहू सोडता येणार नाही.
    आता काय करू ?
    सुखाची एवढी सवय झाली आहे
    आता काय करू?

    जसा प्रदेश, तसा आहार
    जसा आहार, तशी शरीरयष्टी
    जशी शरीरयष्टी, तसे काम
    जसे काम, तसा आहार.

    ही एक साखळी आहे.
    यातील एखादा दुवा बदलता येणार नाही.

    जसा देश पंजाब, गहू मुख्य आहार.
    गहू मुख्य आहार म्हणून मिळते बलदंड शरीरयष्टी.
    पंजाबी जाट मजबूत शरीर, तसे झेपते काम.
    कामच एवढे प्रचंड मेहनतीचे,
    की आहार गव्हाचाच हवा
    आणि
    प्यायला लस्सी आणि खायला खवा.

    मला गहू आवडतो, मला परवडतो, मी सात्म्य केलाय, आता मी तो खाणार, असे म्हणून कोकणाचे रूपांतर, हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या थंड प्रदेशात थोडेच होणार आहे ? समुद्र आपली जागा किंवा गाज थोडीच बदलू शकणार बदलणार आहे? ( गाज म्हणजे समुद्राच्या लाटांचा आवाज )
    किंवा एकवेळ गहू खाऊन खाऊन सात्म्य केला म्हणून आपले कामाचे स्वरूप थोडेच बदलणार आहे ?

    ऊलट जेवढे कमी करता येईल, तेवढे काम आपण कमीच करत आहोत. विज्ञानाच्या सहाय्याने बौद्धिक काम वा शारीरिक श्रम कमीच करत करतोय.....
    पण मनःशांती मात्र हरवतोय.

    त्यासाठी कमी वेळात जास्त पैश्यासाठी धडपडतोय.. साधने मिळवतोय.

    पूर्वी मधुमेह हा बुद्धिजीवी वर्गाचा आजार होता. पण आता कष्टकरी वर्गातही दिसतोय.
    आज विज्ञानाने कुकर शेतकऱ्याच्या घरात आणून दिला आणि मागोमाग मधुमेह सुद्धा ! शेतकऱ्याच्या शेतात बैलजोडीच्या जोता ऐवजी टॅक्टर आला.
    मागे पैसा वाढला, आणि पुढे पोटही .........

    सुखाच्या जेवढे जवळ जातोय, तेवढे सुखापासून आपण लांब जातोय, एक सुख मिळवण्याच्या प्रयत्नात महत्वाचे सुख आपण विसरत जातोय. ते म्हणजे आरोग्य.

    म्हणून एक सूत्र आमचे ग्रंथकार सांगतात, पळवाटा शोधू नका.
    निःसुखत्वम सुखायच......
    आत्ता थोडासा सुखाचा त्याग करा, जे अंतिमतः सुखकर असेल.

    हे सर्व ज्याच्यासाठी करतोय ते आरोग्यच, (किंवा पुढची पिढी ) जर माझ्या हातून, अगदी देखल्या डोळा, निसटून जात असेल तर, एवढी धडपड करायची तरी कशाला ?

    वेगवेगळे आजार आज अगदी दरवाज्यात रांगेत उभे आहेत. एका चुकीच्या वेळी दरवाजा उघडायची खोटी...
    तो आत आलाच म्हणून समजा....

    पुढच्या पिढी या बंद दरवाज्यापासून अनभिज्ञ आहे.
    त्यांनी दरवाजा जवळपास उघडलेला आहे, समोर संकट दिसतंय आणि ही पिढीपण ओरडून तेच विचारतेय,
    आता काय करू?

    आयुर्वेद दीनपणे साजरा करण्याची वेळ न येवो, या आयुर्वेददिनाच्या शुभेच्छांसह..

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    28.10.2016

      October 28, 2016


  • किचन क्लिनीक  – शेंगभाज्या – फरसबी

    किचन क्लिनीक – शेंगभाज्या – फरसबी

    हिला वालपापडी असे देखील म्हटले जाते.संपुर्ण भारतात ही भाजी अत्यंत प्रसिध्द आहे.विशेषत: चायनीज पदार्थ बनवताना हिचा भरपूर वापर केला जातो.तसेच पंजाबी डिशेस मध्ये देखील हि वापरतात.हिची भाजी,उसळ देखील केली जाते.तसेच बिर्याणी,पुलाव ह्याच देखील हि घालतात.

    २-३ हात उंचीच्या झाडाला ह्या फरसबीचा शेंगा लागतात.ह्या कोवळ्या शेंगांचा वापर खायला केला जातो.हि भाजी चवीला गोड तुरट असून थंड असते त्यामुळे ती शरीरातील वात दोष वाढविते व कफपित्त हे दोष कमी करते.

    चला तर आता हिचे घरगुती उपचार पाहूयात:

    १)गजकर्णा मध्ये फरसबीच्या पाल्याचा रस व लसणीचा रस एकत्र करून लावावा.

    २)खोल चरणा-या जखमेमध्ये फरसबीच्या पाल्याच्या रसात कापुस बुडवून वात करावी व दर दिवशी अशी नवीन वात त्या जखमेत ठेवावी साधारण पणे ३ आठवड्यात जखम भरते.

    ३)डोळ्यांची शक्ती वाढवायला इतर उपचारांसह रोज रात्री कोवळ्या फरसबीची भाजी जेवणात ठेवावी.

    ४)ज्या मधुमेह झालेल्या व्यक्तिच्या लघ्वीतून साखर जात असेल त्याला कोवळ्या फरसबीच्या शेंगा उकडून त्याला हळदींची फोडणी देऊन खायला द्यावी.

    फरसबी खायचा अतिरेक केल्यास पोटात दुखणे व संडासला घट्ट होण्याची तक्रार होऊ शकते.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      November 27, 2016


  • बाळगुटी एक वरदान- भाग ८ : नागरमोथा वनस्पती

    नागरमोथा वनस्पती ही एक सुगंधी औषधी वनस्पती आहे, जी बाळगुटीमध्ये वापरली जाते; आणी तिच्या थंडगुणधर्मासाठी आणि पचनास मदत, कृमीनाशक, लघवी साफ करण्यास मदत, आणी वजननियंत्रणात उपयोगी असणाऱ्या फायद्यांसाठी ओळखली जाते. ही पित्त आणि कफ कमी करते, तसेच अतिसार व कृमींवर प्रभावी आहे.

      January 23, 2026


  • प्रमुख आहारसूत्र – प्रमेह भाग २३

    पाणी जिथे जास्ती काळ साठून राहते, तो प्रदेश म्हणजे आनूप. या प्रदेशात निर्माण होणारे सर्व अन्नधान्य, पालेभाज्या, फळे ही कफाच्या आधिक्यातील असतात. म्हणून यांचा अतिवापर नको, असे शास्त्रकार सांगतात. या अन्नधान्यादि पासून शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते आणि अग्निमांद्य होते, तसे होऊ नये. स्पष्ट उदाहरण द्यायचे झाल्यास कोकणातील लोकांनी सफरचंद खाणे. बर्फाळ प्रदेशातील हे फळ समुद्राजवळ रहाणाऱ्या लोकांनी खाल्ले तर पचन बिघडते. आणि क्लेद वाढतो.

    आधीच जमिनीमध्ये, वातावरणात पाण्याचे प्रमाण जास्त अशा प्रदेशातील एखादे फळ आणि तेही रसरशीत असेल तर प्रमेहाला आणखीन पूरक. जसे ऊस. ऊसाचा रस,त्यापासूनची काकवी, गुळ, साखर आणि हे पदार्थ ज्यामधे आहेत, अशा सर्व मिठाया जर खाऊन पचवता आल्या नाहीत तर प्रमेह ठरलेला.

    रसदार फळे नकोतच, त्याचा ज्युस काढून पिणे हे आणखीनच खतरनाक. याविषयी सविस्तर आपण वाचले आहेच.

    आयुर्वेदातील आणखीन एक संकल्पना म्हणजे नवे धान्य आणि जुने धान्य. आजच्या विज्ञानाला कदाचित हे रूचणार नाही, पटणार नाही, पण जेवढे धान्य नवीन तेवढे ते पचायला जड. जेवढे जुने तेवढे पचायला हलके. धान्य सूर्याच्या किरणांनी संरक्षित करून ठेवायची पद्धत भारतीयच ! किमान एक वर्ष जुने तांदुळ वापरले तर भात मोकळा होतो, हे व्यवहारात आपण बघतोच. मोकळा होणे म्हणजे त्यातील चिकटपणा कमी होणे. दही जसे प्रमेहामधे नको, तसेच दह्याप्रमाणे आंबलेले अन्य पदार्थ देखील क्लेद निर्माण करतात. जसे, आंबोळी, इडली, दहिवडा, मेदूवडा, ढोकळा. या पदार्थांमधे केवळ साखर नाही म्हणजे मधुमेहात चालतील असे नाही. तर आयुर्वेदीय पद्धतीने विचार केला तर चिकटणारे, चिकट असणारे आणि चिकटपणा वाढवणारे जे जे पदार्थ आहेत, ते ते सर्व क्लेद वाढवणारे, प्रमेहाचे कारण जाणावे.

    म्हणजे आंबवलेले सर्व पदार्थ बंदच करायचे का ? कधीच खायचे नाही का ?
    नाही. एवढं टोकाला जाऊन अर्थ काढण्याची आवश्यकता नाही.

    आपल्याला चिकटपणा कमी करायचा आहे. पीठ जरी आंबवलेले असले तरी त्या पीठापासून तयार झालेल्या इडली, दहीवडा, ऑम्लेट, या फुगलेल्या पदार्थापेक्षा, डोसा प्रकार जो खमंग खरपूस भाजलेला असतो, त्यामुळे त्यातील जलीय अंश बऱ्यापैकी कमी करून घेतलेला असतो, त्यातील पोकळपणा तुलनेने कमी असतो, तव्याच्या म्हणजे अग्निच्या जास्ती जवळ असतो, म्हणजेच डोसा, पेपरडोसा, मसाला डोसा, हे पदार्थ इतर आंबवलेल्या पदार्थांच्या तुलनेत, पचायला हलके असतील. जेव्हा आंबवलेलेच पदार्थ खाण्याशिवाय अन्य कोणतेही पर्याय उपलब्ध नसतील तेव्हा हे डोसा आयटम आपल्याला नक्कीच मदत करतील!!!!

    चिकटपणा युक्तीने कमी करावा, जेवढा चिकटपणा कमी तेवढे पदार्थ पचायला हलके, चिकटपणा म्हणजे क्लेद. ही सर्व साखळी लक्षात ठेवली तर आपणच ठरवू शकतो, क्लेद कशाने कमी करता येतो ते !
    यासाठी शास्त्रकार अनेक प्रकाराने समजावून सांगताहेत, इथे पाणी आहे, इथे चिकटपणा आहे, इथे ओलावा आहे, इथे हवेत आर्द्रता जास्ती आहे, इथे गती कमी आहे, इथे इथे प्रमेहाचा धोका आहे.

    तेवढी दृष्टी तयार झाली की, झाले. प्रमेह गेलाच म्हणून समजा !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    08.02.2017

      February 8, 2017


  • आहारातील बदल भाग ५ – मांसाहारी भाग दोन

    मांसाहार करणारे प्राणी रक्ताला थंड ठेवण्यासाठी एक युक्ती करतात. जीभ बाहेर काढून ते श्वसनावाटे शरीरातील आर्द्रता वाढविण्यास मदत करतात. कुत्रा, वाघ, सिंह हे मांसाहारी प्राणी जीभ बाहेर काढून जणुकाही शीतली, सीतकारी (हे पू. हठयोगी निकम गुरूजींनी शिकवल्याप्रमाणे प्राणायामाचे प्रकारच जणु) करत असतात.

    मांसाहारी प्राण्यांच्या अंगाला घाम येत नसल्याने त्यांना शरीर थंड राखण्यास अशी जीभेने मदत करावी लागते. त्यामुळे हे प्राणी सतत आपले अंग चाटत असतात. अंग चाटत राहील्यामुळे जो ओलेपणा मिळतो, ती जणुकाही त्यांची आंघोळच असते.

    म्हणून त्याचा दुसरा परिणाम असा होतो की, अंगाला खूप ऊग्र दर्प असतो.
    वाघ सिंहाच्या पिंजऱ्याच्या जवळपास गेलो तरी हा दुर्गंध लक्षात येतो. कुत्र्यांना कितीही डेली सोप लावा. वास काही जात नाही.

    हे प्राणी स्वभावतःच क्रूर असतात. त्यांचे विचकणारे दात बघितले तरी भीती वाटते. बांधलेला कुत्रा जोरजोरात भुंकायला लागला, त्याचे ते अक्राळविक्राळ रूप बघीतले तर काय हिंमत पुढे जायची ?

    मांसाहारी प्राण्यांची पिल्ले जेव्हा जन्म घेतात, तेव्हा पहिले अकरा दिवस पर्यंत त्यांचे डोळे बंदच असतात. नंतर उघडतात. वाघ असो वा वाघाची मावशी. सिंह असो वा कुत्रा, नियम तोच. पहिले अकरा दिवस जन्मआंधळे !

    या मंडळीकडे दया माया प्रेम वात्सल्य अगदी "न" के बराबर ! प्रचंड अहंकार रोम रोम मे समाया हुआ ! गरूड, सिंह यांनी शिकार केल्यावर लगेचच फोटोमधली पोझ आठवतेय का त्यांची ? त्यांच्या डोळ्यातले भाव वाचता आलेत कधी ?
    प्रचंड मस्ती, गुर्मीत असल्याप्रमाणे ( आजुबाजुला कोणी नसले तरी ) मान उंचावून पहाताना,
    "बघा, अखेर केली की नाही शिकार ! माझ्यासारखा शिकारी मीच ! "
    अशी त्यांची देहबोली दिसते. अपवाद असतील पण अगदी क्वचित. मांजराने उंदराला पकडल्यावर, त्याला खाण्यापूर्वी, मांजराच्या चेहेऱ्याकडे बघीतलंय कधी ? आता मुद्दाम लक्ष ठेवा.

    हे मांसाहारी प्राणी एवढे क्रूर असतात की, आपला वंश पुढे वाढला पाहिजे, या नैसर्गिक नियमाचाही त्यांना विसर पडतो. आणि....आणि.....त्यांच्या मादीने नुकत्याच जन्म दिलेल्या, आपल्याच रक्तापासून तयार झालेल्या, कोवळ्या जीवांचीच शिकार करून, भविष्यात त्यांच्या कामविश्वात तयार होणारा, त्याच्याच ताकदीचा एक मोठ्ठा शत्रु, आधीच नष्ट करून टाकतात, खाऊन टाकतात. स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी, पुढे निर्माण होणारे आपले हितशत्रु कायमचे संपवून टाकण्याची यांची कंसवृत्ती दिसते. यासाठी त्याच्यातील आईला, तिच्या पिल्लांना, फार जपावे लागते. कारण इथे शत्रु, अपनेवाले, अपनेही घरवाले होते है ! कितीही मांसाहारी असली तरी एक आई, "असं" कधीच करू शकत नाही.

    बरं यांचे आणखी एक वैशिष्ट्य दिसते, यांना भूक लागली की, त्यांना शिकार करण्यासाठी दिसतात, ते फक्त शाकाहारी प्राणीच ! पोट भरतात, फक्त शाकाहारी प्राण्यांच्या जीवावरच ! निसर्गाचा नियमच आहे हा ! चुक काहीच नाही.
    वाघ सिंह शिकार करतील, हरीण ससे आणि हत्तीचीच ! पण कोल्हे आणि लांडग्यांची नाही.

    वरील सर्व नियम मांसाहारी प्राण्यांना लागू होतात की नाही, ते पुनः एकदा तपासून पहा.

    या निसर्गदत्त देणग्या, या प्राण्यांना ईश्वराने दिलेल्या आहेत.
    मी मांसाहारी आहे, हाच माझा धर्म, एवढंच शिकून तो इथे आलेला असतो. कोणत्याही धर्मग्रंथांचा अभ्यास तो नंतर करत बसत नाही.
    जगण्यासाठी, ( आजच्या भाषेत, बाय डिफाॅल्ट प्रोग्रामने आलेले ) हेच ईश्वर निर्मित नियम पाळणे, ही त्यांची गरज आहे. यातील एक गुण जरी कमी पडला तरी त्यांचे जीवन संपूनच जाईल.
    म्हणून परत परत म्हणावेसे वाटते,
    ईश्वर महान आहे !
    यु आर ग्रेट !!
    तुस्सी ग्रेट हो !!!

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    26.09.2016

      September 26, 2016


  • किचन क्लिनीक – केळे

    किचन क्लिनीक – केळे

    हे सर्वांचे आवडते व अत्यंत चविष्ट व पौष्टिक फळ आहे.ह्याच्या अनेक जाती उपलब्ध आहेत वेलची,हिरवी,सालदाटी,मांईडोळची,आंबटी इ.त्यातल्यात्या वेलची अर्थात ह्याला रसबाळी देखील म्हणतात उत्तम मानली जातात.

    गरीब,श्रीमंत,वृद्ध,लहान मुल असे सगळ्यांचेच पोषण करणारे हे फळ.ह्याचे पासून शिखरण,पाकातली केळी,गुळातला केळीचा हलवा,केरळ मध्ये तर केळी घालून केलेला बदामी हलवा देखील मिळतो,शेक,केळ्याचे पंचामृत असे अनेक प्रकार केले जातात व ते फार रूचकर लागतात.

    हि केळी चवीला गोड थंड शरीरातील वात व पित्त दोष कमी करणारी व कफ वाढवणारी असते.ह्याच सुंदर हिरवा वृक्ष असतो जो अत्यंत पवित्र मानला जातो व सत्यनारायण पुजेला तो वापरतात.

    चला मग आपल्या ह्या लाडक्या फळाचे औषधी उपयोग पहायचे ना:

    १)सुज आली असता सुजलेल्या भागावर गव्हाचे पीठ व पिकलेले केळे एकत्र कालवून गरम करून बांधावे.

    २)वारंवार भस्मक रोगा सारखी भूक लागत असल्यास केळीच्या शिकरणात तूप घालून खावे.

    ३)स्त्रियांच्या अंगावर पांढरे जात असल्यास पिकलेले केळे+आवळकाठी चूर्ण+ त्याच्या दुप्पट साखर घालून हे मिश्रण दिवसातून एकदा खावे.

    ४)दम्यामुळे फुफ्फुसे कम कुवत झाली असल्यास एका पिकलेल्या केळ्यात रात्री ३ लवंगे टोचून ठेवावीत व ते रात्रभर झाकून ठेवावे सकाळी अनशापोटी लवंगासह ते केळे खावे व वरून १/२ कप कोमट पाण्यात २ चमचे मध घालून प्यावे ह्याने फुफ्फुसे बळकट व लवचीक होतात.

    ५)सुका खोकला वारंवार येत असल्यास पिकलेले केळे+१ चमचा मध + १/२ चमचा काळी मिरपुड हे मिश्रण काही दिवस सकाळ संध्याकाळी घ्यावे.

    केळी खायचा अतिरेक केल्यास भुक न लागणे व सर्दी होणे अशा तक्रारी होऊ शकतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      December 18, 2016


  • किचन क्लिनीक – कंदभाज्या – बीट

    किचन क्लिनीक – कंदभाज्या – बीट

    हा प्रकार भारतीय नाही पाश्चात्यांनी ह्यास भारतात आणले व आपण ह्याला सवयी प्रमाणे आपलेसे केले.
    तसा ह्याचा वापर प्रत्यक्ष आमटी,भाजी करायला केला जात नसला तरी देखील सलाड,कोशिंबीर,बीटामृत,बीटताक,घरगुती तिरंगी मीठाई,बाटरूट हलवा तसेच सूप बनवताना ह्याचा वापर सरार्स केला जातो.

    ह्याचे क्षूप असते व बीट हा कंद जमीनी खाली उगवतो.हा बाहेरून मातकट रंगांचा असतो व आत मध्ये लाल भडक असतो.ह्याच्या लाल रंगांचा उपयोग स्वयंपाकात सजावट करायला देखील केला जातो.हा चवीला गोड व थंड असून शरीरातील वात व पित्त दोष कमी करतो व कफ दोष वाढवितो.

    चला आता ह्याचे औषधी उपयोग पाहूयात:

    १)अपचन,पोट साफ न होणे,मुळव्याध ह्यात बीट उकडून त्यात कोथिंबीर घालून जेवणापुर्वी खावे व १० मिनीटांनी जेवावे.

    २)बीटाचे नियमीत सेवन केल्यास मासिकपाळी व्यवस्थित व नियमीत येते.

    ३)छातीत जळजळ होऊन उल्टी होऊन त्यातून आंबट कडू पित्त पडणे ह्यात बीटाचा रस १ कप+खडीसाखर १ चमचा हे मिश्रण जेवणासोबत प्यावे.बीट उकडून ४-५ काप खावे.३ दिवस दिवसातून २ वेळा हा प्रयोग करावा.

    ४)रक्तदाब वाढून तोल जाणे,डोके जड होणे,चिडचिड ६ चमचे बीटाचा रस +६ चमचे दुधाचा रस +१चमचा मध उपाशीपोटी व रात्री झोपताना घ्यावा.आठवड्यात फरक पडतो.

    ५)अशक्तपणा व रक्ताची कमी ह्यात बीट नियमीत खावा.

    अतिप्रमाणात बीट खाण्याने जुलाब होऊ शकतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      November 24, 2016


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग सोळा

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक चार

    जगण्यासाठी औषधं काम करत नाही. - भाग सात

    ज्यांची प्रतिकारशक्ती जास्ती, त्यांना औषधांची गरज रहात नाही. ही प्रतिकार क्षमता येते कुठुन ?

    अनेक गोष्टींवर ही क्षमता अवलंबून आहे. जसे, खाण्यापिण्याच्या सवयी, शरीराचे नैसर्गिक नियम पाळणे, व्यायाम करणे, इ. इ. गोष्टीवर अवलंबून असते.
    एक श्लोक आपण बघितला होता...
    दूष्य देश बल काल वय ......
    ...... अवस्थाश्च पृथक्विधः ।।

    या श्लोकाचा पूर्ण सविस्तर अर्थ यापूर्वी बघितला असल्याने पुनरूक्ती दोष टाळण्यासाठी, पुढे जाऊया.

    आपण जे औषध घेतोय त्याची गरज भासू नये, यासाठी आपला आहार संतुलीत असावा. सहा चवींचा समावेश नेहेमीच्या जेवणात असावा. खाताना, भीती बाळगून, फार चिकित्सक बुद्धीने खाऊ नये. आणि खाल्ल्यानंतर आठवत बसू नये. खाल्लेलं अन्न पचवायला पुरेसा वेळ द्यावा. म्हणजे शरीराला आवश्यक असलेले सर्व घटकपदार्थ आतल्या आत तयार करता येतील. आणि बाहेरून काही भरावे लागणार नाही. म्हणजेच औषधांची गरज उरणार नाही.

    यासाठी जेवणाची वेळ बदलावी. सर्व साधारणपणे सकाळी सात ते सायंकाळी सात पर्यंत खावे, नंतर शक्यतो काही खाऊ पिऊ नये. म्हणजे शरीराला आवश्यक ते घटकपदार्थ तयार पुरेसा वेळ मिळेल, आणि सगळी ए टू झेड द्रव्ये आतल्या आतच तयार होतील. हा विषय देखील सविस्तर यापूर्वी लिहून झालेलाच आहे.

    विचारांचा गोंधळ होतोय ना !
    आपण काय करतोय, दोन परस्पर विरूद्ध विचार एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे गोंधळ होतोय. पाश्चात्य पद्धतीने आरोग्य आणि भारतीय पद्धतीने आरोग्य अभ्यासले तर ठीक आहे, पण दोन्ही पद्धतींना "काळाची गरज" या गोंडस नावाखाली एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून वैचारिक गोंधळ होतोय. एकाच बाजूला येऊन विचार केला तर विचारांना स्थिरता येईल. मग आयुर्वेदात कॅल्शियम वाढण्यासाठी काय आहे ? थायराॅईडसाठी काय औषध सांगितले आहे? कॅन्सर वर काही आहे काहो उपाय ? असे प्रश्न निर्माणच होणार नाहीत.

    दोन भिन्न विचार प्रवाह एकत्र करणं खूप कठीण गोष्ट आहे. आपल्या जीवनपद्धती मधे होत असलेला हा बदल एका मधल्या पिढीने आपल्या डोळ्यादेखत बघितला आहे.

    औषधांशिवाय आरोग्य ही संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी आपल्याला भारतीयत्वाच्या दृष्टीकोनातून आयुर्वेद शिकणं, जास्त गरजेचं आहे, असं मला वाटतं.

    कुछ पाने केलिए कुछ तो खोना पडता है ।
    और यहा तो जिंदगी का सवाल है ।

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
    02362-223423.
    25.04.2017

      April 25, 2017


  • जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 4

    दिवसा सूर्य असतो. रात्री सूर्य नसतो.
    सूर्य म्हणजे साक्षात अग्नि. पचनाला मदत करणारा. म्हणून तर आयुर्वेदात एक वचन आहे, आरोग्यम् भास्कराद् इच्छेत. म्हणजे आरोग्य ठीकठाक ठेवण्यासाठी सूर्याची भूमिका महत्वाची आहे.

    सर्वात शुद्ध काय असते ? अग्नि सर्वात शुद्ध. सूर्य म्हणजे अग्नि. सूर्य म्हणजे शुद्धता. सूर्य उगवला की बाकी सर्व जीवजंतु नष्ट व्हायला सुरवात होते. या सूर्याची उष्णता त्यांना सहन होत नाही, आणि त्यातील काही जीवजंतुंचा जन्म संपतो.

    आपण सूर्याला केंद्रस्थानी मानतो. आपली भूमाता सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. केवळ भूमाता नाही तर तिचे सर्व मंगळ, बुध, गुरू, शनि, शुक्र हे सर्व भाऊबंद, आपल्या मुलाबाळांसह याच सूर्याला केंद्र मानतात. आणि त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालत आपली कामे करीत असतात.

    आपण आपली दिनचर्या पाळतो. सकाळी उठतो, रात्री झोपतो. पशुपक्षीदेखील, सकाळी उठतात, रात्री झोपतात. म्हणजेच सर्व निसर्ग या सूर्याच्या अधिकारात काम करत असतो.

    आजच्या वैज्ञानिक नियमानुसार "फोटो सिंथेसिस" ही प्रक्रिया देखील सूर्यावरच अवलंबून असते. पानातील हिरवा रंग देखील याच सूर्यामुळे मिळतो. रक्तातील लाल पेशी वाढायला, कॅल्शियम वाढायला, आणि मुख्य म्हणजे व्हिटामिन डी वाढायला फक्त सूर्य मदत करतो. कोणत्याही प्रकारे व्हिटामिन डी कृत्रिमरीत्या तयार करता येत नाही. जरी जाहिरातीतून तसे दावे केले जात असले तरी, जाहिरातीमधे दाखवतात, ते सर्व खरे कुठे असते ? असो.

    तर आपण सूर्यवंशी आहोत. सूर्य उगवतो, त्याच्या स्वागताला आपण आधी उठतो, तो मावळला की आपले सर्व व्यवहार बंद करीत झोपी जातो. हा निसर्ग नियम आहे.

    या सूर्याला साक्षी ठेवूनच आपण आपली सर्व महत्त्वाची कामे करीत असतो. जसे नेहमीचे पोटभरतीसाठीचे व्यवसाय, लग्न, मुंज, वास्तुशांत, गृहप्रवेश, होमहवन, वाढदिवस, देवदर्शन, बारसे, इ शुभकार्ये दिवसाचीच केली जातात. कधी विचार केलाय, असं का, असा ?
    तेव्हा उत्तर मिळालं, सूर्य असतो म्हणून.

    तसेच जेवणे हे जर यज्ञकर्म असेल तर ( तर म्हणजे ते यज्ञकर्मच आहे. वदनी कवल घेता...... जाणिजे यज्ञकर्म । ) ते सुद्धा सूर्य असे पर्यंत पार पडले पाहिजे ना !
    म्हणूनच सूर्य असे पर्यंत जेवावे, कारण आपणही याच निसर्गाचा एक हिस्सा आहोत ना !!
    तेच नियम आपणही पाळले पाहिजेत, जे "त्याने" ठरवून दिलेले आहेत.
    निसर्गापुढे आपली बुद्धी म्हणजे किस झाड की पत्ती !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    27.02.2017

      February 27, 2017