मोहरीचे तेल हे बंगाल,व उत्तर भारतामध्ये स्वयंपाका करिता वापरले जाते.हे तेल चवीला कडवट,उष्ण असते व ते भुक वाढविते,पचायला हल्के,तीक्ष्ण गुणाचे,कफ व वातनाशक,पित्त वाढविणारे,संडासला बांधुन ठेवणारे अर्थातच घट्ट करणारे,लघ्वीचे प्रमाण कमी करणारे आहे.हे तेल शरीरातील मेदाचा नाश करते.ह्या तेलाचा गरजे पेक्षा जास्त वापर केल्यास शरीरातील शुक्रधातू नष्ट होतो.
त्वचेला खाज येणे,कोड,तसेच काही कफ वात प्रधान त्वचाविकारात ह्या तेलाचा आपण वापर करू शकतो.
मोहरीचे तेल हे अत्यंत उष्ण असल्याने थंड हवामान असलेल्या प्रदेशांत हे तेल लोकांना सहज पचते.पण हेच मोहरीचे तेल जर आपण देशावर किंवा कोकण गोवा प्रांतात वापरू लागलो आपणच काय पण बंगाली किंवा युपी स्थित लोक जरी ह्याच तेलाचा वापर भरपूर प्रमाणात आपल्या स्वयंपाकात करू लागले तरी त्यांच्या अंगात पित्त दोषाची फाजील वाढ होऊन त्यामुळे पित्ताचे व रक्ताचे विकार त्यांना सतावतील ह्यात दुमत नाही.
म्हणूनच कोणतेही तेल वापरताना देश अर्थात आपण रहात असलेल्या प्रदेशाचा विचार होणे अत्यंत गरजेचे आहे.शक्यतो तेलाचा वापर करत असताना आपल्या प्रदेशात कोणत्या तैल बिया पिकतात ह्याचा विचार करूनच त्यांच बियांचे तेल वापरावे.कारण त्या तेलबियांचे पासुन काढलेले तेल आपल्याला आपल्या प्रदेशाचा वापरायला चांगले असते.जसे कोकण,गोवा खोबरेल,देशावर शेंगदाणा,उत्तर भारत,बंगाल सरसों का तेल अर्थात मोहरीचे तेल.
मोहरीचे तेल वापरण्याचा अतिरेक केल्यास पित्ताचा त्रास वाढेल.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
January 6, 2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 28-नैवेद्यम् समर्पयामी-भाग दोन
देवाला नैवेद्य दाखवणे हा पूर्ण भक्तीयोग आहे. त्यातील विज्ञान योग कोणता ते पाहू.
गणपतीचा नैवेद्य ठरलेला. मोदक.
मोदकच का ?
गणेशांना आवडतो म्हणून !
का आवडतो ?
गणेश हा बुद्धीदाता आहे. आणि मोदकातील पुरण म्हणजे गुळ खोबरे आणि वर तूप हे काॅम्बिनेशन म्हणजे साक्षात बुद्धिवर्धक योग आहे. बूस्ट बोर्नव्हीटा, माल्टोव्हा, काॅम्प्लान इ. म्हणजे फक्त टीनचे डब्बे. बाकी त्यात सोयाबीनची टरफले, नारळाची भुशी आणि शेंगदाण्याचा चोथाच असतो. जर्रा जाहीरात दाखवायची खोटी, पडले तुटून त्या डब्यावर. हे जाहिरात तंत्र या कंपन्यांना बरोब्बर माहिती आहे, त्यामुळे जाहिरातींचा मारा करून, सचीन, कपील इ. ब्रॅण्डचा वापर केला की, आपले प्राॅडक्ट खपते. चोथा खाऊनच जर वजन वाढणार असेल तर मग असली नारळ आणि शेंगदाणेच का नकोत ? नारळ आणि शेंगदाणे खाऊन तब्येत सुधारत होती. घरच्या घरी बारा बारा बाळंतपणे होत होती. टाॅनिक म्हणून काय होते ? गुळ आणि शेंगदाणे. नारळ आणि गुळ. जो आपल्याकडे नैवेद्य म्हणून दाखवला जात होता आणि आमच्याच घरातील बाल हनुमान आणि बाल गणेशांना प्रसाद म्हणून मिळत होता. भक्तीपूर्ण नैवेद्याला, कोलेस्टेरॉलच्या भीतीने बदनाम केले गेले आणि जाणीवपूर्वक आरोग्याचा व्यापार सुरू झाला.
देवीला पुरणाचाच नैवेद्य लागतो.
पुरण म्हणजे चणे. हरभरे डाळ शिजवून गुळ घालून केलेले मनगणे असो वा कडबू असोत, पुरणाची पोळी असो वा नुसते पुरण असो, आणि या सर्व नाजूक नैवेद्यावर साजूक तूपाची धार...... फक्त ताकद वाढत होती. वेगळ्या टाॅनिकची गरज नव्हती. घोड्याला काय खाद्य दिले जाते ? हरभरेच ना ? घोड्यासारखी गती आणि वाजीकर शक्ती मिळवण्यासाठी तसेच तेच खाद्य आपल्याला मिळण्याची व्यवस्था आपल्या देवांच्या नैवेद्यामधून केलेली होती. गॅस वाढतो, पित्त वाढते, जाडी वाढते म्हणून जेवणातून चणाडाळच हद्दपार केली आणि प्रोटीन पावडरचे डब्बे मात्र जिममधे खपवले जाऊ लागले. हे कधी लक्षातच आले नाही.
नागपंचमीला नागोबाला लाह्या, हळदीच्या पानात लपेटलेल्या पातोळ्या, पानगे, गोकुळाष्टमीला शेवग्याच्या पाल्याची भाजी, कोजागिरीला आटीव दूध, गुढीला श्रीखंड, हे नैवेद्य आरोग्य रक्षण करणारेच होते. नारळीपौर्णिमेला नारळीभात ठरलेलाच. नारळावरूनच ओळखली जाणारी ही पौर्णिमा!
वेगवेगळ्या ऋतुमधे येणारे वेगवेगळे सण, आणि या निमित्ताने होणारे नैवेद्य हे जणु काही आरोग्याचे बूस्टर डोसच होते. दरवर्षी नियमाने घ्यायचे आणि आरोग्य सांभाळायचे !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
21.06.2017
June 21, 2017

तुवरकाचे उपयुक्तांग आहे बीज व बीज तेल.हे चवीला तुरट,कडू,तिखट असून उष्ण गुणाचे व हल्के स्निग्ध व तीक्ष्ण असते.तुवरक कफनाशक व वातनाशक आहे.
February 6, 2018
खावे. पण गरज असेल तर खावे.
खावे. पण आवडत असेल तर खावे.
खावे. पण हितकर असेल तर खावे.
खावे. पण सहज उपलब्ध असेल तर खावे.
खावे. पण भूक असेल तर खावे.
खावे. पण पचवू शकत असेल तर खावे.
खावे. पण तयार करता येत असेल तर खावे.
खावे. पण जिभेला चव असेल तर खावे.
सगळ्या यातना काढतोय त्या पोट भरण्यासाठीच !
आणि आपल्या कृतीने जर..
पोटच बिघडत असेल तर, कशाला खावे ?
पचवू शकत नसू तर, कशाला खावे ?
गरज नसेल तर, कशाला खावे ?
आवडत नसेल तर, कशाला खावे ?
पिकतच नसेल तर, कशाला खावे ?
विकतचे आणून कशाला खावे ?
तोंडाला चव नसेल तर कशाला खावे?
केवळ आस्य आहे म्हणून ?
मुखी घास घेता करावा विचार,
कशासाठी मी, हे अन्न सेवणार ?
प्रत्येक घास खाण्यापूर्वी असा विचार करावा.
जीभ हा अत्यंत स्वार्थी अवयव आहे.
"मला बरं वाटतंय म्हणून मी खातेय,
इतरांना होणाऱ्या यातनांचे मला काय ?
असा अविचार जीभ करते.
ज्या एकीमुळे अवयवांची युती तुटत असेल, तिचे काय करायचे ? असे ठरवून बाकीचे सगळे अवयव त्याच्याकडे मागणी करतात, तो सर्व शक्तीमान तिला शिक्षा फर्मावतो, आणि जीभेची चवच काढून घेतो.
कठोर शिक्षा !
तिच्यावर बहिष्कार.
"तिला जे हवंय ते द्यायचं नाही, जोपर्यंत बाकीच्या अवयवांच्या यातना संपत नाहीत, पुनः युती होत नाही, तोपर्यंत तिला विसरून जा."
आणि तो तिची चवच काढून घेतो.
आता यापलीकडे जाऊन जो हट्टाने खाणार त्याला प्रमेहासारखी शिक्षा तोच देणार.
डाॅक्टरांकडे गेल्यावर त्यांना पहिल्यांदा बघावीशी वाटते तीला. जीभेला. तपासायला दाखवायला सांगतात ती जीभ. तिला तपासल्यानंतर डाॅक्टरना सहज कळते, आत हिने काय काय घोटाळे करून ठेवले आहेत ते !
आणि डाॅक्टर देखील पथ्य सांगतात, जोपर्यंत अवयवांची तिच्याशी परत युती होत नाही, तोपर्यंत, हे अजिबात खाऊ नका. तमुक पिऊ नका.
हे युती तुटणे अगदी पुरातन काळापासून चालत आलेले आहे. हे ज्याला कळले तो तरला.
आपले पूर्वज देखील काही कमी खवय्ये नव्हते. वेगवेगळ्या चवींचे, वेगवेगळ्या संस्कारांचे, एकाहून एक सरस पदार्थ तयार केले जात होते. ते लिखित स्वरूपात क्षेमकुतुहल सारख्या ग्रंथात पहायला मिळतात. त्यावेळेच्या पदार्थांची नावे संस्कृत मधील होती. आता बोलीभाषेत वेगवेगळी तयार झाली. आणि सर्व पदार्थ उत्तमात उत्तम द्रव्ये वापरून केले जात होते. साजूक तुपातल्या जिलब्या, गावठी गाईच्या दुधाची रबडी, घरातल्या चक्क्याचे रवाळ रसाला म्हणजे श्रीखंड, घरात जात्यावर ओव्या म्हणत दळलेल्या पीठाचे वडे किती सांगू ?
आता फक्त फरक एवढाच आहे की सगळे पदार्थ विकतचे, पामतेलात तळलेल्या जिलब्या आणि डालड्यात तळलेले कृत्रिम गुलाबाचा वास घातलेले गुलाबजाम. फरक आहेच ना !
जिभेचे चोचले नव्हते ते, त्यावेळची गरज होती. श्रम पण तेवढेच होते ना ! आता श्रम कमी झाले आणि खाण्याचे पदार्थ अति झालेत. परिणाम आजुबाजुला दिसतोच आहे.
आणखी एक फरक लक्षात येण्याजोगा, तो म्हणजे पूर्वी पुरणपोळीसाठी होळी पौर्णिमेच्या दिवसाची वाट पहावी लागत असे. गुळपोळ्या फक्त संक्रांतीला, श्रीखंड फक्त पाडव्याच्या मुहूर्तावर. लग्न मुंज असेल तरच लाडू. नाहीतर नाही.
आता बाजारात केव्हाही जा.
जो जे वांछिल तो ते सर्व काळ !
सर्व मधुर रसाचे पदार्थ चाॅकलेट पासून गुलाबजाम पर्यंत, मुबलक प्रमाणात समोर हजर असतात.
आपल्या सणांची रचना त्या त्या वातावरणातील हवामानावर आणि उपलब्ध साधनसामुग्री वर केली गेली आहे. त्यामुळे त्यावेळी ते पदार्थ खायलाच हवे असतात. आता जानेवारी फेब्रुवारी मधे अगदी रथसप्तमी पर्यंत तीळाचे लाडू मिळतात, ते आत्ताच, या सीझनला खाण्यासाठीच असतात.
सणांच्या निमित्ताने खाल्ले तर मनाची, वातावरणाची, परवानगी घ्यायची बिलकुल गरज नाही.
नाहीतर नंतर या मधुर सुखाच्या यातना ठरलेल्याच !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
04.02.2017
February 4, 2017
लक्षात असे येत आहे, की दररोज जेवताना मनात एकच विचार असतो,
हा घास मी चुकीचा तर घेत नाही ना ?
याने माझे काही नुकसान तर होणार नाही ना ?
मी आहाराचा कोणता नियम चुकवत तर नाही ना ?
एवढे नियम पाळूनही ही दररोजची औषधे काही कमी होत नाहीत.
एवढी औषधे खायची तर जेवायचे तरी कशाला ?
मी एवढे नियम पाळतो, पण माझा काहीच फायदा होत नाहीये.
September 3, 2016
जगण्याची साधी सोपी सूत्रे - एकशे बावन्न
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - भाग तेरा
सांगेन गोष्टी हिताच्याच चार - भाग दहा
आपण पूर्वाभिभाषी असावे, असे वाग्भटजी म्हणतात. म्हणजे स्वतःहून इतरांशी बोलायला जाणे. समोरून ओळखीचा कोणी येताना दिसला की, आपणच त्याला हाय, हॅलो, राम राम नमस्कार, नमस्ते, कसं काय, अशा शब्दांनी बोलायला सुरवात करावी. म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपण त्याचे वाटू लागतो.
आपल्याला यापूर्वी मदत केलेली व्यक्ती, ओळख झालेली व्यक्ती, उपयोगी ठरणारी व्यक्ती, डोक्यावरून पाणी नेणारी स्त्री, ज्येष्ठ नागरीक, ओझे घेऊन जाणारा, खूप जोरजोरात चालणारा, किंवा विद्वान व्यक्ती समोर आल्यास त्यांना स्वतः बाजूला होऊन रस्ता मोकळा करून द्यावा.
आज अॅम्ब्युलन्स, शालेय वाहाने, शववाहिका, पोलिसांच्या गाड्या, यांना रस्ता मोकळा करून द्यावा. त्यांना कोणतीही असुविधा आपल्यामुळे होऊ नये असे पाहावे.
आपली गाडी एखाद्या ठिकाणी पार्क करत असताना, दुसऱ्याला त्याची गाडी आत बाहेर करायला त्रास होऊ नये, याचा विचार करून आपले वाहन कुलुपबंद करावे, अन्यथा आपल्यामुळे इतरांचा खोळंबा होऊ शकतो, याची जाण ठेवावी. याने वाद वाढून आपल्या सोसायटीमधील माणसे देखील दुरावतात. हे लक्षात घ्यावे.
माणसं जोडण्याची ही कला आहे. ती जोपासली पाहिजे. कारण ऐनवेळी मोबाईल पेक्षा माणसेच उपयोगी होतात. ती आधी पासूनच जोडून ठेवावीत.
मी बरा माझे काम बरे, ही वृत्ती आता सोडून दिली पाहिजे. मला काय त्याचे चंद्र सूर्य प्रकाशतात, असे म्हणून चालणार नाही. सतर्कता हवीच. आजूबाजूला काय चाललंय हे समजून घेतलं नाही तर बाजूच्या घराला लागलेली आग आपल्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही.
मान दिला की मान मिळतो, मान मिळवण्यासाठी मान थोडी खाली झुकवावी लागली तरी चालते. लोकांनी आपल्याला मान दिला पाहिजे, ही अपेक्षा सोडून दिली की लोकमान्य होता येते, असे लोकमान्य टिळकांनी सुद्धा सांगितले आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
१०.०९.२०१७
September 10, 2017
दिव्यात वात, तोंडात हात अशी आमच्या मालवणी भाषेत एक म्हण आहे.
याचा अर्थ असा आहे की, जेव्हा दिवेलागणीची वेळ होते, तेव्हा हात तोंडाकडे, तोंडात जावा.
अगदी शब्दशः अर्थ लावू नका हो.
August 8, 2016
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे एकोणतीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग तेवीस
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
अंथरूणातून सूर्य बघू नये
अर्थ सरळच आहे. सूर्योदयानंतर अंथरुणात राहू नये. म्हणजेच ग्रंथात सांगितलेला नियम ब्राह्म मुहूर्तावर उठावे. "लवकर निजे लवकर उठे, त्यास धन आरोग्य संपदा मिळे" असं एक सुभाषित शाळेतील लाकडी खांबावर लिहिलेले आठवते.
पण आता जमाना बदल गया है.
आता आम्ही फार उशीर करत नाही, बारा साडेबाराला झोपतो. (झोपतो म्हणजे बाकीच्यासाठी ! डोक्यावरून पांघरूण घेऊन आत माझ्यासकट वाॅटसप जागा असतो. जास्त नाही दीड दोन वाजताच झोपतो. )
लवकर उठायला ज्यांना जमत नाही, त्यांचे पचन बिघडते. लवकर झोपणे होत नाही, याची अनेक कारणे असतील. पण लवकर उठणे होत नाही याला कोणताही युक्तीवाद नको. किमान सहा साडे सहाला उठलेच पाहिजे. रात्रीच्या जागरणाचे संयुक्तिक कारण असेल तर ती झोप दुपारी घ्यावी. पण जेवणानंतर नको. त्याने पुनः आम निर्माण होणार. इथे युक्ती वापरावी. दुपारची झोप आधी घ्यावी आणि उठून नंतर जेवावे. म्हणजे कफ प्रकोप होणार नाही. अर्थात ही पळवाट आहे. नियमाला पळवाट असावी पण पळवाट हा नियम बनू नये.
एवढ्या लवकर उठून करायचे काय, असाही प्रश्न काही जणांना पडेल. काही जण म्हणतील, आम्हाला जाग येते पण उठवत नाही. उठलो तरी ताकद असत नाही. उठायचं असतं, पण पाय दुखतात, पायाची टाच दुखते, गुडघे दुखतात, लवकर उठले तर म्हणे पित्त वाढते, चक्कर येते, डोके दुखते इ. इ. अनेक तक्रारी सक्काळी सकाळी सुरू होतात. या सर्व तक्रारींवर एकच रामबाण उपाय आहे, तो म्हणजे रात्रीचे जेवण सायंकाळी सातला संपलेच पाहिजे. अन्यथा जेवूच नये. जेवण नाहीतर फळ, ज्युस वगैरे वगैरे. नाही चालणार. पोट हलके सैल, रिकामे करूनच तर झोपायचे आहे.
आणि समजा उशीरा झोपणे झाले आणि सकाळी जाग आली तरी
गादीवर जास्त लोळू नये
असे आई सांगते.
मस्त बेड टी प्यावा, बायकोने हातात टीव्ही चा रिमोट आणून द्यावा, तिथूनच योगाचे चॅनेल सुरू करावे. आणि चकली वेफर्स खात खात योगा करणाऱ्यांना बघण्याचा व्यायाम करावा. नाहीतर साखरझोप अनुभवावी, पहाटेची स्वप्न म्हणे खरी होतात, म्हणून आपल्याला हवी तशी सुंदर सुंदर स्वप्ने पहावीत. आणि कानावर गोड हाक यावी,
"मोऽहऽअऽन्ऽ", जागो प्यारेऽऽऽऽऽ"
डोळे उघडून पहावे तर नेहेमीचीच......
सकाळी लवकर उठावे, आह्निक उरकावे, जमल्यास स्नानसंध्या करावी. ज्ञानमार्गाने जाणारे असू तर काहीबाही वाचन करावे, भले ते ज्ञान दै. लोकसत्ता, मटा किंवा वाॅटसप महाराजांकडून आलेले का असेना !
काही लेखन करावे. वाॅटसप वर लेखन करावे.ट्विटरवर टिवटिव करावी. मराठी इंग्लिश अथवा हिंग्लीश भाषा वापरावी. फेसबुकवरील असंख्य मित्रांना तत्वज्ञानाचे डोस पाजावेत. (आपण कोरडे पाषाण रहावे.)
ज्ञान ग्रहणाची आवड नसेल तर कोणतेही आवडीचे काम करावे. बागेत जावे, व्यायम करावा, जेवण बनवावे, टीव्ही मात्र पाहू नये.
कर्ममार्ग पण नको असेल तर सरळ साध्या सोप्या भक्तीमार्गाने जावे. देवळात जावे, तुळशीला, वडा पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात. घरातच राहायचे असेल तर लोटांगणे घालावीत, नाहीतर खुर्चीवर बसून नामस्मरण करीत राहावे, पण झोपून राहू नये. हे झोपणे मधुमेहाकडे नेणारे आहे. हे पक्के लक्षात ठेवावे. ( मी स्वतः रात्री एक वाजेपर्यंत जागा असतो, पण सकाळी सहा साडेसहाला नक्कीच उठतो. आणि रात्रीचे जागरण झाले तरी आम निर्माण होतच नाही, कारण माझे रात्रीचे भोजन सायंकाळी आटपलेले असते. )
आई जे सांगते त्यामधे काहीतरी अर्थ नक्कीच दडलेला असतो, कारण अनुभवाचे चार पावसाळे तिने जास्ती पाहिलेले असतात. भले त्यामागील शास्त्र, विज्ञान तिला माहिती नसेल. कारण तिला तिच्या आईने तसेच सांगितले होते.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
August 18, 2017
मसाले वर्गातला हा पदार्थ त्याच्या उग्र वासाने जेवणाला एक विशिष्ट चव आणि खमंग पणा आणण्याचे काम उत्तम बजावतो.फोडणीला खरोखरच चिमूटभर हिंग घातल्या शिवाय मजा नाही,एवढा फरक ह्या हिंग महाशयांच्या अनुपस्थितीने आपल्या जेवणात पडतो.व्यवहारात देखील 'हिंग लावणे' हा वाक्प्रचार जेवणात आणी व्यवहारात दोन्ही कडे उपयोगी पडतो.
चला तर मग करून घेऊयाना ह्या हिंग रावांची एक वेगळी ओळख.हिंग हा झाडाचा निर्यास आहे अर्थात झाडाच्या खोडामधून निघणारा द्रव.ह्याचे पांढरा आणि काळा असे दोन प्रकार असतात,त्यातील पांढरा हा सुगंधी व चमकदार असतो म्हणून त्यास हिराहिंग म्हणतात तर काळा हिंग हा जरा दुर्गंधी युक्त असतो.हे दोन्ही प्रकार औषधी प्रयोगात वापरले जातात.
हिंग हा चवीला तिखट आणी उष्ण असतो.त्यामुळे तो शरीरातील वात आणि कफ दोष कमी करण्यासाठी मदत करतो पण अतिवापराने पित्त मात्र वाढवू शकतो.हिंग हा पोटात देताना तूपासोबत भाजून मगच द्यावा.तसेच ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी हिंग घरगुती औषधामध्ये वापरू नये.
१)अपचनामध्ये पाव चमचा हिंग साजूक तूपात भाजून खावा व वरून गरम पाणी प्यावे.
२)भूक लागत नसल्यासवअथवा तोंडास रूची नसल्यास १/४चमचा हिंगपूड +२चमचे लिंबाचा रस हे मिश्रण जेवणाच्या पहिल्या घासा सोबत घ्यावे.
३)१/२ इंच आल्याचा तुकडा +१ चिमूट हिंग पूड हे मिश्रण जेवणापुर्वी चावून खावे ह्याने जीभेवर साचलेला मळ आणी तोंडास दुर्गंध येणे ह्या समस्या कमी होतात.
४)जखम लवकर भरून येण्यासाठी कडूनिंबाचा पाला आणी हिंग ह्यांची पेस्ट जखमेवर लावणे.(क्रूपया डायबेटिस मुळे जखम भरून येत नसेल तेव्हा वैद्यांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे ह्याची नोंद घ्यावी).
५)गांधील माशी चावलेल्या जागी हिंग उगाळून त्याचा लेप लावला तर वेदना आणी सूज कमी होते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
September 22, 2016
निषेधार्ह पाणी भाग तीन
नाम्बु पेयमशक्त्या वा स्वल्पमग्निगुल्मभिः ।।
पाण्डूदरातिसारार्शोग्रहणीदोष शोथिभिः ।
ऋते शरदन्निदाभ्यां पिबेत्स्वस्थोऽपि चाल्पशः ।।
वैद्यानाम शारदी माता असं ओळखला जाणारा शरद ऋतु आणि अंगाची लाही लाही करणारा ग्रीष्म ऋतु हे दोन ऋतू सोडून स्वस्थ माणसाने देखील पाणी अल्पच प्यावे. असं अगदी स्पष्टपणे वाग्भटजी म्हणत आहेत.
आता शरद ऋतु आणि ग्रीष्म ऋतु कोणते ते कधी येतात ? ऋतु सहा असतात, हे तरी आठवते आहे का ? "लहानपणी कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय." असे आपण म्हणाल. "शरद पोंक्षे माहिती आहे, हा शरद ऋतु कोण?" असं पोरगं विचारेल. विचारून पहा, गंमत म्हणून आपल्या इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या पोरांना. ऋतु म्हणजे काय हेच माहिती नसेल. शरद ग्रीष्म दूर राहिले.
आताच्या दिनदर्शिकेनुसार ऑक्टोबर हीट म्हणजे शरद ऋतुचा कालावधी. आणि एप्रिल मे चा सीझन म्हणजे ग्रीष्म ऋतु समजावा.
जमिनीवर पडलेल्या पावसाच्या पाण्याची सूर्याच्या सरळ आणि तीक्ष्ण किरणांनी परत वाफ व्हायला लागलेली असते. वातावरणात उष्णता वाढलेली असते. तसेच शरीरात देखील पित्ताचा प्रकोप सुरू झालेला असतो. हा काळ म्हणजे रोगांचे माहेरघरच. म्हणूनच सुभाषितकार गंमतीने या शरद ऋतुला वैद्यांची माता म्हणतात. आजच्या भाषेत, अनेक रोगांचा 'सिझन' सुरू होतो. वैद्यांचे आर्थिक भरणपोषण सुरू होते.
आणि दुसरा उल्लेखित ग्रीष्म ऋतु. भूगर्भातील पाण्याची पातळी खाली नेऊन पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणारा, तोंडचे पाणी पळवणारा, अंगातून पाण्याचे लोट घामाच्या रूपात बाहेर काढणारा हा ऋतु अगदी पाऽणीऽ पाणीऽऽ करायला लावतो. यावेळी वाग्भटजी म्हणतात, या दोन ऋतुंखेरीज पिबेत स्वस्थोऽपि अल्पशः
या दोन ऋतुमधे पण पाणी पिताना जरा काळजी घ्यावी. ग्रीष्मात तर पाण्याची पातळी खूपच कमी झालेली असते. जिथे टॅकरने पाणी पुरवठा होतो, तिथे पाण्यात अनेक अशुद्धी मिसळलेल्या असतात. अन्य भागात देखील पाणी जाड होते. ते शुद्ध केल्याशिवाय वापरू नये.
जसं वातावरणात उष्णता वाढलेली असते, तशी शरीरातील दोषांची स्थिती बदललेली असते. तिन्ही दोष आपले मूलस्थान सोडून बाहेरच्या दिशेत गेलेले असतात. जठरातील अग्निचे बल देखील प्राकृत नसते. त्यामुळे आधीच व्याधींनी आलेला अशक्तपणा असताना, पाण्यासारखा अग्निविरोधी घटक पोटात ढकलणे म्हणजे आ बैल मुझे मार सारखी अवस्था होते. या रोगग्रस्तांनी तर पाणी पिऊ नयेच. पण ज्यांना आपल्याला रोग होऊ नयेत, अशी इच्छा असणाऱ्यांनी सुद्धा पाणी पिताना साधे पाणी पिऊच नये. उकळलेले पाणी पिताना देखील चार वेळा विचार करून कमीच प्यावे, विचारपूर्वक प्यावे. गरजेपुरते प्यावे. सुसंस्कारीत जल प्यावे. व्याधीनुसार, दोषांच्या अवस्थेनुसार, वैद्य सल्ल्यानुसारच प्यावे. हवेच असेल तर ते सुद्धा काही तरी औषधी घालूनच !
मनुष्य खूपच अशक्त असेल तर प्राणधारण होईल इतके पाणी थोडे थोडे पाणी जरूर प्यावे, कारण पाणी हे जीवन आहे.
पण कोणीतरी सांगतो आहे म्हणून, कोणत्या तरी पुस्तकात वाचले म्हणून, अमुक गुरूजींनी सांगितले म्हणून, मला वाटले म्हणून, चॅनेलवर ऐकले म्हणून, वाॅटसमधील मेसेजमधे वाचले म्हणून, आमचे डाॅक्टर सांगतात म्हणून, आईने सांगितले म्हणून, नॅचरोपॅथीचा उपाय म्हणून, या योगतज्ञाने सांगितले म्हणून, जिममधल्या इन्स्ट्रक्टरने सांगितले म्हणून, मैत्रिणीने सांगितले म्हणून, स्कीन हेल्दी रहाण्यासाठी माझ्या ब्युटीशियनने सांगितले म्हणून, मूतखडा होऊ नये म्हणून, वैदूने सांगितले म्हणून, मुळव्याध भगंदरवाल्याने सांगितले म्हणून, अगदी बायकोने सांगितले तरीसुद्धा......
अ ति
पा णी
पि ऊ
न ये
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
January 11, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti