आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सात
निसर्गाचे नियम - सर्वांसाठी सारखेच - भाग चार !
एक माणूस सोडला तर कोणी पशुपक्षी सहसा आजारी पडत नाहीत, हे कटु सत्य आहे. इतर प्राणी आणि माणूस यात एक धर्म सोडला तर बाकी आहार निद्रा भय आणि मैथुन या चार गोष्टी समान आहेत. या अर्थी एक सुभाषित पण शिकल्याचे स्मरते.
या सगळ्या पशुपक्ष्यांना नियत आयु मिळाली आहे. निसर्गाचे वरदान आहे. निसर्गच त्यांना शिकवत असतो. प्रत्येकाचा आहार ठरवून दिलेला आहे, त्यात ते बदल करीत नाहीत. गाई म्हैशीला कितीही उपाशी ठेवले तरी मांस भक्षण करणार नाही, वाघसिंहाला कितीही उपाशी ठेवले तरी ते गवताला तोंडही लावणार नाहीत. यामुळे की काय त्यांचे आरोग्य चांगले रहाते. शिकार करून पोट भरलेले असले तर समोर हरीण फिरले तरी सिंह त्याच्याकडे बघत सुद्धा नाही,
पोपट फक्त झाडावरचाच पेरू खातो, शिळा पेरू अजिबात खात नाही. शिळा म्हणजे झाडावरून जमिनीवर पडलेला सुद्धा खात नाही. कावळ्याला मात्र किडे पडलेला उंदीर सुद्धा चालतो, किंवा विष घालून मारलेला उंदीर देखील चालतो. गटारात पडून मेलेला पण चालतो, अपघाताने गाडीखाली सापडून मेलेला उंदीर ही त्याची जणुकाही फीस्टच !
प्रत्येक पशुपक्ष्याच्या नवीन पिल्लांसाठी प्रत्येक वेळी नवीन घरटे बांधले जाते. जुन्या घरट्याचा वापर कुंभारमाशीदेखील करत नाही. फळांनी लगडलेल्या झाडावर पक्ष्यांचे घरटे दिसत नाही, छोटे पक्षी छोट्या झाडांवर तर, गरूडासारखे मोठे पक्षी मोठ्या झाडाच्या अगदी वर घरटे बांधतात. ही यांची जीवन वैशिष्ट्य दिसतात. स्वतः जगण्यासाठी किंवा त्यांचा वंश वाढण्यासाठी असे करणे त्यांना निसर्गाने शिकवलेले असते.
जाती वर्ण भेदानुसार हे वरवर दिसणारे फरक असले तरी सूर्यास्त झाल्यावर मात्र कोणीच खात नाही, हे मात्र वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
माणसाने पाळलेल्या प्राण्यांमधे मात्र ही वैशिष्ट्ये बदललेली दिसतात. माणसाप्रमाणे, माणसाने पाळलेल्या पशुपक्ष्यांनीही आपली जीवनपद्धती बदलली आणि माणसांप्रमाणे त्यांनाही डाॅक्टरांची गरज भासू लागली.
निसर्गात आढळणारे प्राणी आणि माणसाच्या अवतीभवती वावरत असले तरी, माणसाने ज्यांना पाळलेले नाहीत, अश्या पशुपक्ष्यांनी मात्र आपली जीवनपद्धत बदललेली नाही.
त्याचाच परिणाम म्हणून असेल, पण सर्व कावळे एकाच आकाराचे दिसतात. एक जाड, एक बारीक, असे दिसत नाही. जसा कावळा तशीच चिमणी, तसाच पोपट, तसेच कबुतर.
निसर्गातील सर्वच प्राणी आहेत त्या आकारामधे बंदिस्त आहेत....
.
.
.
.
.
.
फक्त माणूस सोडला तर !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
09.05.2017
May 9, 2017

हिचे हळदीप्रमाणे दिसणारे वर्षायू क्षुप असते.ह्याची पाने ६० सेंमी -१मीटर लांब असतात व कंद गोल,स्थूल आल्याच्या कंदा प्रमाणे दिसणारा व रूंदिला बारीक व अधिक पांढरा असतो.ह्या कंदाला कैरी सारखा वास येतो.
ह्याचे उपयुक्तांग कंद असून हि चवीला कडू,गोड व थंड गुणाची असून हल्की व रूक्ष असते.आंबेहळद कफपित्तशामक व वातकर आहे.
चला आता आपण हिचे काही औषधी उपयोग पाहुयात:
१)शरीराचा कुठला हि अवयव मुरगळला असता आंबेहळदीचा लेप लावल्यास सुज कमी होते.
२)त्वचा रोगा मध्ये खाज व पुरळ आला असता आंबेहळदीचा लेप लावतात.
३)आंबेहळद रक्त शुद्ध करते म्हणून रक्ताच्या विकारात उपयुक्त आहे.
४)चेहऱ्यावर मुरमांचे डाग अथवा मुरूमे आली असता आंबेहळदीचा लेप लावतात.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
©️ Dr Swati Anvekar
English Name: Mango Ginger
March 28, 2018
दूध न देणारी गाय, शेतीसाठी निरूपयोगी ठरलेला बैल, शेरडू न देणारी शेळी, रेस हरणारा घोडा, यांना पोसून काय उपयोग? असा विचार करणारी पिढी भारतात जन्माला येतेय. हे संस्कारवान भारतीय संस्कृतीचे दुर्दैव नव्हे काय ? मग आईबाबांना देखील वृद्धाश्रमात टाकायला यांना लाज वाटेनाशी होतेय....
......आणि यात गैर ते काय ?
.......पोराच्या बोटाला धरून पाळणाघरात नेणाऱ्या आईबाबांना नंतर त्यांचे पोर हाताला धरून वृद्धाश्रमाची वाट दाखवणारच.......
.......त्यात नवीन पिढीचे काय चुकले ?
.......प्रत्येक गोष्ट पैश्यावर मोजणाऱ्यांना हीच शिक्षा योग्य आहे. असे कधीतरी वाटते.
पाश्चात्यांच्या संस्कारांना एवढे डोक्यावर बसवले की, आपले हित कशात आहे हेच कळेनासे झाले आहे.
बरे जे कोणी संस्कृतीचे रक्षण करणारे आहेत, त्यांच्यावर तथाकथित संस्कृतीरक्षक अशी उपहासात्मक पदवी देणारेही भारतीयच आहेत. प्रत्येक गोष्टीत फक्त पैसा आणि पैसाच बघणे ही पाश्चात्य वैश्यवृत्ती आहे. हा भारतीय विचार नाही, हे सुद्धा आता कळेनासे झाले आहे.
मग आम्ही भारतीय संस्कृतीरक्षक गाईला गोमाता का म्हणतो हे यांच्या कसे लक्षात येणार ? आणि मातेचे संरक्षण करायचे असते, हे यांना कोणत्या स्तरावरून समजावणार ?
उपयोगिता संपली की या जनावरांना क्रूरपणे, निर्दयपणे खाटीकखान्यात पाठवावे ?
काय म्हणावे या वैचारिक गुलामीला ?
"यांना कत्तलखान्याची वाट दाखवली तर यात गैर ते काय, यांचे पोषण करण्याच्या हट्टापायी भारतीय शेतीचे आजवर नुकसान होत आले आहे. अनुत्पादक गोष्टी तात्काळ संपवल्या पाहिजेत," असे आग्रहाने प्रतिपादन करणारे, एक महत्वाची गोष्ट विसरतात, कि भारतीय शेतकऱ्याच्या दृष्टी ने पशुधन ही प्रेमाची गोष्ट आहे. ज्या बैलांबरोबर आयुष्यभर त्याच्या साथीने आपली उपजिवीका वाहिली, कष्ट करवून घेतले, त्यांची उत्पादकता आणि उपयुक्तता यांचा पैशात हिशोब खऱ्या भारतीय शेतकऱ्याला मंजूर नसतो.
मोठ्यामोठ्या बंगल्यात राहून भाकड पशुधनावर, विनाकारण पोषणाचा आळ ठेवत, चर्चासत्रे झोडणारे मात्र, त्यांच्या बंगल्याची राखण करणाऱ्या कुत्र्याला किंवा लळा लावलेल्या मांजराला, ती वयस्कर झाल्याने आता नष्ट करू, ठार मारू असा विचार करताना दिसत नाहीत. असे का ? (अजून तरी कुत्र्यामांजराचे मांस खायला यांनी सुरवात केली नाही म्हणून असेल कदाचित.....)
एक भाकड गाय देखील नीट नियोजन केले तर दोन माणसाचे कुटुंब पोसू शकते, हे व्यावहारिक भारतीय सत्य आहे. याचा अभ्यास आता पाश्चात्य करू लागले आहेत.
तेव्हा पाश्चात्य संस्कारांनी बुद्धी भेद करणाऱ्यांनी एक लक्षात ठेवावे कि, भारतीय संदर्भ, भारतीय ग्रामीण जनतेची मानसिकता, त्यांची निरूपयोगी पशुंकडे पाहाण्याची दृष्टी, एकुण आर्थिक कुवत आणि सरकारी स्तरावरील पशुधनाची पैदास, ही इतर देशातील आकडेवारीपेक्षा, भारतीय आकडेवारीमधे आणि भारतीय मानसिकतेमधे फार वेगळे अंतर ठेवते.
दुर्दैवाने भारतातला एक मोठा वर्ग, जो पूर्णतः शाकाहारी म्हणून ओळखला जाई, त्या कुशाग्र बुद्धीतील काही जणांकडूनच आज मोठ्या प्रमाणात मांसाहाराचे समर्थन होताना दिसत आहे.
हा बुद्धि भेद करणाऱ्यांना लवकरच सद्बुद्धी दे रे परशुरामा !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
13.10.2016
October 13, 2016
मुळ्याचा वापर हा भाजी करायला तर केला जातोच, तसेच सांबार,आमटी,डाळ,कोशिंबीर,लोणचे इ पदार्थ तसेच कोलंबीची मुळा घालून केलेली आमटी हे सर्वच पदार्थ रूचकर व चविष्ट लागतात.
November 21, 2016
आजच्या काळातील एक जोरदार चर्चा सुरू असलेला एक विषय. आहारातील बदल चांगले की वाईट ?
कोणासाठी कसा आहार असावा, याचे काय काय नियम आहेत हे तारतम्याने ठरवायचे असतात.
वाॅटसपवर अनेक लोकाचे अनेक आहार सल्ले येत असतात. निसर्गोपचार, घरगुती आहार सल्ले, अनुभविक उपचार, आजीबाईचा बटवा, लेखाखाली स्वतःचेच नाव असलेले, दुसर्याच्या नावावरील लेख तिसर्याच नावाने खपवलेले, अनेक विरोधाभास असलेले सल्ले आपल्याला वाचायला मिळत असतात. त्यातील खरेखोटेपणा शोधायला तेवढा वेळही नसतो.म्हणून काही नियम गृहीत धरावे लागतात.
आपला पारंपारिक आहार कधीही बदलू नये.
जो आहार आपल्या पणजी पणजोबा, आजी आजोबा, आई बाबांनी घेतलेला आहे, तोच आहार आपल्यासाठी योग्य असतो. त्यांनी तो तेथील परिस्थिती, उपलब्धता, आवश्यकता, गरज, प्रकृती, विचार, इ. गोष्टी विचारात घेतलेल्या असतील.
आपले पूर्वज खूप हुशार होते, ज्ञानी होते, सूक्ष्मातील जाणणारे होते. प्रत्यक्ष कृती करणारे होते. केवळ वाचाळवीर आणि आरंभशूर नव्हते.
सांगे वडिलांची किर्ती, तो एक मूर्ख. असे समर्थांनी सांगून सुद्धा तो दोष मी स्विकारतो.
अनुभवाच्या आधारे जीवन जगायची एक आदर्श पद्धत त्यांनी निर्माण केली होती. खरं सांगायचं तर शास्त्र निर्माण करत गेले. अनुभवाच्या जोरावर, प्रायोगिकता वापरत, भविष्याचा वेध घेत जगायचं कसं हे पुढील पिढीला प्रत्यक्ष शिकवित गेले. आचरणात आणत गेले. त्याची पुढील पिढी त्यात ज्ञानाची आणखी भर टाकत गेली. अनुभव जोडत गेली. अनावश्यक गोष्टी काढत गेली, काही वेळा कालानुरूप बदलतही गेली. नवीन सिद्धांत तयार करत गेली. नवीन बदलाला समोरी गेली. मूळ तत्व न सोडता, होणारे बदल मान्य करत गेली. नवीन गोष्टींना मान्यता देत गेली.
यालाच सनातन म्हणतात. नित्य नूतन सनातन !
म्हणून तर हजारो वर्षे झाली तरी वैशिष्ट्यपूर्ण असलेली भारतीय संस्कृती अजून ही जिवंत आहे. केवळ कागदी घोडे न बनता, कृतीच्या स्तरावर बदल मान्य करत गेलेली आधीची वडील पिढी.
आता हेच पहा ना, अगदी आपल्या लक्षात येतील असे आपल्या डोळ्यासमोर झालेले आहारातील काही बदल आपल्या आधीच्या वडील पिढीने मान्य केलेच ना !
दोन पिढ्यांपूर्वी न्याहारीच्या वेळी फक्त कोंड्याची भाकरी आणि पेज जेवून रहाणार्या या पिढीने उपमा आणि पोहे स्विकारले.
त्या पुढच्या पिढीने थालीपीठ, आंबोळी, डोसा पण स्विकारला, वडा भजी ऊसळ मिसळ पण पचवली. आवडीने आणि चवीने खाण्याची चटक वाढत गेली.
आणि अगदी आताची पिढी पिझ्झा बर्गर पनीर बटरच्या बदलाला सामोरी जातेय.
परिवर्तन , बदल ही काळाची गरज असते. युक्ती वापरून त्यातील योग्य अयोग्य ठरवणे हे आपल्याच हातात असते.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
22.09.2016
September 22, 2016
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 1
हिंदुधर्माची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. ज्यामधे मूर्तीपूजा, पुनर्जन्म, श्राद्ध, एकत्र कुटुंब व्यवस्था, विवाह, उपनयन, प्रदक्षिणा, ओवाळणी, तेहेतीस कोटी देवता, दशावतार, देवपूजा, इ. अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील.
या वैशिष्ट्यांमधील एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कर्मकांड आहे.
कर्मकांडाकडे पहाण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असेल तर त्यातून काही गोष्टी शिकता येतात.
त्यातील काही गोष्टींचा आपण विचार जरूर करूया, जे आपण दैनंदिन जीवनामधे आचरणात आणत असतो. ते शोधण्यासाठी काही गोष्टींचा परत अभ्यास करूया.
आपण जे जे काही देवासाठी म्हणून करत असतो, ते खरं तर आपल्यासाठीच, आपल्या आरोग्यासाठीच असते. हा नियम ग्रंथोक्त (म्हणजे ग्रंथात वर्णन केलेला ) नाही. पण काही प्रथा कशा निर्माण झाल्या असतील, याचा घेतलेला हा मागोवा आहे. यात काही चुकत असल्यास जरूर सांगावे.
जसे देवपूजा करणे, देवपूजेसाठी काही उपचार केले जातात. पंचोपचार, षोडशोपचार इ.इ. यांचा काही विशिष्ट आध्यात्मिक अर्थ असणार आहेच, पण आरोग्याच्य दृष्टीने काही छुपे, गर्भित अर्थ आहेत का हे शोधण्याचा प्रयत्न करूया. जे नास्तिक आहेत, त्यांना या कर्मकांडामागील विचार पटला तर पटला.
केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः ते हरये नमः श्रीकृष्णाय नमः पर्यंत ही चौवीस नावे घेतली जातात. ही नावे घेतली असताना ईश्वर प्रणिधान हे एक कर्म असते. नामस्मरण हा महत्त्वाचा हेतू असतो. हे नामस्मरण करत असताना भटजी एक पळीभर पाणी प्यायला सांगतात. याचा अर्थ काय आहे ?
जे जे देवासाठी ते ते देहासाठी. हा विचार पटला की उत्तर मिळत जाईल.
देवपूजेची सुरवात या मंत्रानी होते. तेव्हा हे मंत्र म्हणताना घसा सुका असतो. हे मंत्र केवळ भटजींनी म्हणायचे नसतात, तर यजमानांनी सुद्धा म्हणायचे असतात. हे मंत्रोच्चार उच्चार करत असताना, त्यांच्या उच्चारांनी शरीरात एक उर्जा तयार होत असते. तसे या उच्चारामुळे आरोग्य देखील मिळते, असे मंत्रोच्चाराच्या फलश्रुतीमधे लिहिलेले आहे.
या मंत्राच्या स्पंदनांचा, त्यातून वाढलेल्या उर्जेचा, त्याचा घशाला त्रास होऊ नये, हा एक हेतु. एकुण चौवीस वेळा ही नावे उच्चारली जातात. सत्यनारायणाची तर एक हजार नावे सांगितलेली आहेत. ही नावे कालानुरूप, कार्यानुरूप, गुणवाचक, काही कर्मवाचक आहेत. नावे ( मग त्याला ईश्वर म्हणा, अल्ला म्हणा, आकाशातला बाप म्हणा नाहीतर अन्य काही,) नावे कितीही असली तरी तो एकच आहे. हे त्यातून समजून घ्यायचे असते.
यातील पहिली तीन नावे म्हणत असतानाच एकेक पळी पाणी प्यायला सांगितले जाते. एकेक पळीच का ? तिथे एकेक ग्लास किंवा एकेक पंचपात्री भरून का सांगितले नाही.
जे पाणी तहान नसताना प्यायचे असते, ते पळीभरच प्यायचे असते. केवळ घसा ओला होण्यापुरते ! नाहीतर हे अतिरिक्त पाणी अग्निमांद्य निर्माण करणारे ठरेल, हा आयुर्वेदातील दृष्टीकोन देखील इथे परत एकदा सिद्ध होतो.
............. हरये नमः श्रीकृष्णाय नमः !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
26.05.2017
May 26, 2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी - भाग 35
नैवेद्यम् समर्पयामी - भाग नऊ
देवाचे जेवण पूर्ण झाल्यावर ताम्हनात तीन पळ्या पाणी सोडायला सांगितले जाते. जर भटजींनी म्हटलेले मंत्र नीट ऐकलेत, तर यातील अर्थ लक्षात येतील. नाहीतर एकाबाजूने भटजी मंत्र म्हणताहेत, आणि दुसऱ्या बाजूला पूजा करताना यजमान मोबाईल वर बोलाताहेत, आणि यजमानीण आपला मेकअप करतेय, असे असेल तर हे केवळ कर्मकांड होते आहे असे समजावे. मग कावळे काव काव करायला टपलेले आहेतच. "अशी कर्मकांडे करण्यात वेळ कशाला घालवा ? जो नाहीच आहे त्याला नैवेद्य तरी कशाला दाखवा." वगैरे वगैरे.
तर भटजी असं म्हणतात, तीन वेळा ताम्हनात पाणी सोडा.
नैवेद्यान्तरेण आचमनीयम् समर्पयामि ।
हस्तप्रक्षालनम् समर्पयामि ।
मुखप्रक्षालनम् समर्पयामि ।
जेवणानंतर एक वेळा आचमन करावे. देवाचे नाव घेऊन एक पळी पाणी तळहातावर घेऊन पिणे म्हणजे आचमन करावे.
खरंतर प्रत्येक घासच देवाचे नाव घेत तोंडात घालायचा असतो. निदान तसा भाव तरी ठेवायचा. "आतले अन्न पचवायला मी आता देवाला सांगितलेले आहे, आता मला काळजी नाही, त्यातील गुणदोष तो बघेल."
खाताना भीती नसावी आणि खाल्ल्यानंतर आठवण न यावी. या दोन्ही गोष्टी देवाच्या स्मरणाने साध्य होतात. म्हणूनच भगवंत म्हणतात, "तुझा अधिकार फक्त कर्म करण्यापुरता. ( फक्त माझे स्मरण करत अन्न गिळायचे...) म्हणजेच केलेले कर्म तू मला अर्पण करणे. मी तुला त्याचे योग्य ते फळ, वेळ आल्यावर देणार आहे. यावर विश्वास ठेवायचा. म्हणजे पचन सुलभ होते.
आचमन करण्याने, अन्ननलिकेला आतील बाजूला लागलेले अन्न पुढे ढकलून अन्न नलिका धुतली जाते. एवढंच पळीभर पाणी जेवणानंतर घ्यावे, हा पण एक सोयीस्कर अर्थ.
जेवणानंतर देवाचे हाय धुवायला पाणी दिले जाते, तोंड धुवायला, चूळ भरायला, त्याच्या हातावर पाणी घातले जाते. केवढी एकरूपता साधली जाते. आपल्याकडे जेवायला आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना सुद्धा आपण असाच उपचार करावा. ( केवळ व्हीआयपी पाहुण्यांना नको )
त्याही आधी जेवल्यानंतर हात धुवायचे असतात आणि खळखळून चूळ भरायची असते, एवढे तरी सांगितले गेलंय.? कोणासाठी सांगितले असेल हे कर्मकांड ? देव जो स्वतः निर्लेपी, निर्मोही, निर्गुण निराकार आहे त्याच्यासाठी ???
जे जे देवासाठी ते ते देहासाठी.
वीतभर वाटीत बोटं बुचकळली आणि टीचभर पेपरला तोंडं पुसली की झालं हस्तमुख प्रक्षालन ! काय चाललं आहे ? कुठे भारतीय संस्कारातील दोन्ही हात स्वच्छ धुणे, खळखळून चुळा भरणे आणि कुठे पाश्चात्य प्रकारातील वाटीभर पाण्यात फक्त एका हाताची बोटे बुडवणे आणि ओठावरून कागद फिरवणे ?
नियमितपणे जर पाण्याने खळखळून चुळा भरल्या जात असतील तर दात किडत पण नाहीत, चुळ भरण्याने दातात अडकलेले अन्नकण बाहेर निघून जातात. आणि दाताला किड लागण्यापासून वाचवले जातात, म्हणून काही खाल्ल्यानंतर तोंड धुवावे, हात धुवावेत, हे देवपूजेच्या माध्यमातून दररोज सांगितले जाई.
पाश्चात्य देशात हस्त, मुख प्रक्षालन कसे करावे हे माहितीच नव्हते, वेळ मिळेल तेव्हा, पावासारखे सुके पदार्थ फिरत फिरत खायचे, आमटी भाजी, चटणी लोणचे असे ओले पदार्थच त्यांच्या ताटात न आल्याने, हाताला अन्न चिकटत नव्हते. त्यामुळे तोंड, हात धुणे हा संस्कार त्यांच्या संस्कृतीमध्येच नव्हता.
अन्न हातानी मुरडणे, कालवणे, एका हातानी त्याचे घास करणे, एका हातानीच खाणे, खाल्ल्यानंतर हात उष्टे होतात, म्हणून ते धुणे, हे त्यांच्या संस्कृतीमध्येच नव्हते. त्याचा परिणाम म्हणून या सर्व पाश्चात्य लोकांना दात आणि हिरड्यांच्या मोठ्या समस्या निर्माण होतात. आणि या समस्या निवारणासाठी दंततज्ञ !! आपल्या गावात, तीस वर्षापूर्वी किती डेन्टीस्ट होते, आणि आता गावामधे दंततज्ञ किती आहेत ? ओझरता सर्व्हे केलात तरी, यांची वाढलेली संख्या लक्षात येते. या दातांच्या रोगाची मूळ कारणे कुठे आहेत, कशात आहेत, याचा एकदा शोध घेतला पाहिजे.
ज्या पाश्चात्य देशात एकेकाळी दात घासणे, चुळ भरणे, गुळण्या करणे कधी माहितीच नव्हतं, त्यादेशातील लोकांनी, ज्या भारत देशातील वयोवृद्धांचे बत्तीस दात स्मशानामधे सुद्धा मोजून घेतले जात... अश्या आमच्या भारत देशातील लोकांचे, "मौखिक आरोग्य कसे चांगले राहील?" यावर चर्चासत्रे घ्यावीत, यापेक्षा मोठा विनोद नाही.
........पण आज जमाना बदल गया है। यालाच "कलियुग" असे नाव. दुसरं काय म्हणणार ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
28.06.2017
June 28, 2017
केवळ आयुर्वेदीय दृष्टीकोन म्हणूनही पुरणार नाही. भारतीय आयुर्वेदीय दृष्टीकोन म्हणणे आवश्यक आहे. कारण आज आणखी एक प्रकार चिकित्सा करताना विचारात घ्यावा लागतो, तो म्हणजे पाश्चात्य विचाराने अभ्यासलेला आयुर्वेद.
म्हणजे रोगाचे निदान पाश्चात्य पद्धतीने करायचे आणि चिकित्सा भारतीय पद्धतीने करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे मागे म्हटल्याप्रमाणे घोड्याला गाढवाचे शेपूट लावल्यासारखे होते.
भारतीय पद्धतीने निदान केले तर भारतीय पद्धतीने चिकित्सा करता येते. भारतीय पद्धतीने पथ्यापथ्य सांगता येते आणि रुग्णाला बरे वाटते. संपूर्णतः भारतीय !
थोडं आणखीन स्पष्ट करून सांगतो. जसे प्रमेह हा आजार आयुर्वेदात वर्णन केला आहे. मधुमेह हा त्याच्या वीस प्रकारापैकी एक. हा रोग का होतो, कसा होतो, त्याची लक्षणे काय आहेत, हे सर्व ग्रंथात वर्णन केलेले आहे. पण या रोगामधे रक्तातील साखरेचा संबंध आयुर्वेदात कुठेही वर्णन केलेला नाही. आणि असा हट्ट पण असता कामा नये. प्रत्येक शास्त्राचा एखाद्या रोगाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. शेवटी महत्त्वाचे काय आहे, रुग्णाला बरं वाटणं, पॅथी कोणती का असेना.
हो, आणखी एक. हे माझं वैयक्तिक म्हणणे अजिबात नाही. जे ग्रंथात लिहिलेले आहे ते जसेच्या तसे सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. एखाद्या रोगाचा माझा आयुर्वेद कसा विचार करू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे का ? विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल अन्य पॅथी.
त्या पॅथींचा डायबेटीस कडे पहाण्याचा दृष्टीकोनच वेगळा आहे. तो मान्यच आहे. तो त्यांच्या संशोधनाचा एक भाग असेल. पण त्याला प्रमाण मानून आयुर्वेदानुसार त्या रोगाची चिकित्सा देणे हे मला योग्य वाटत नाही.यात कुणा पॅथीला दुखावण्याचा प्रश्नच नाही. ज्यांना अॅलोपॅथीचा अगदी कळवळा येतोय, त्या आयुर्वेद पदवीधारकांनी खुशाल तसा विचार करावा. आम्ही किती वैचारिक गुलामगिरीत वागत आहोत, याचा हा उत्तम नमुना आहे.
आयुर्वेदातून उत्तरे कशी शोधायची ? आयुर्वेदाची जी पद्धत आहे, त्याचा पूर्णपणे भारतीय पद्धतीनेच विचार केला तर उत्तर मिळेल.
तर सांगायचेय काय, माझ्या अभ्यासानुसार, प्रमेह म्हणजे डायबेटीस नाही. आणि मधुमेहामधे रक्तातल्या साखरेचा संबंध तपासावा, असे कोणत्याही आयुर्वेदीय ग्रंथात लिहिलेले नाही. ( पुढील वाक्य वैद्यांसाठी आहे - "असल्यास त्याचा पुरावा दाखवावा.")
त्याच्या तपासणीचे निकष हे पूर्णपणे आयुर्वेदाचेच आहेत. ते तसेच अभ्यासले पाहिजेत.आयुर्वेदिय पद्धतिने रोगनिदान करुन आयुर्वेदिय चिकित्सापद्धति वापरणे,
यालाच म्हणतात,
चिकित्सेमागील आयुर्वेदीय दृष्टीकोन.
भारतीय आयुर्वेदातील भारतीय दृष्टीकोन.
माझे काही चुकलंय का ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
22.02.2017
February 22, 2017
अमुक रोगावर आयुर्वेदात काही सांगितले आहे काहो ?
नवीन नवीन रोगावर जुन्या आयुर्वेदातील औषधे कशी लागू पडतील ?
ही चौदा प्रकारची औषधे डाॅक्टरनी कायमचीच घ्यायला सांगितली आहेत. त्या औषधांबरोबर आयुर्वेदातील औषधी चालतील का ?
एखादे कायमचे घेण्यासाठी औषध सांगा हो वैद्यराज !
केमोचे साईड इफेक्ट टाळण्यासाठी आयुर्वेदात काही आहे का ?
अॅलोपॅथीमधे जसं क्रोसीन आहे तसं आयुर्वेदात काय सांगितले आहे ?
आम्हाला वैद्यांनी सांगितलेले पथ्य आणि औषध घ्यायच्या वेळा पाळता येत नाहीत, ते सोडून आयुर्वेदातील औषधे देऊ शकता का ?
बी काॅम्लेक्ससाठी आयुर्वेदात काय ?
मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करायची नाही तर आयुर्वेदात काही आहे का ?
अशा प्रकारचे असंख्य प्रश्न वैद्य मंडळींना विचारले जात असतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी वैद्याच्या शैक्षणिक आयुष्यातील निम्मी वर्षे फुकट गेलेली असतात. किंबहुना त्यासाठीच पाच वर्षाचा सिलॅबस पूर्ण करायला काहीजणांना सात आठ वर्षे पण द्यावी लागतात.
या एक मिनीटात विचारलेल्या दोन ओळीच्या प्रश्नांची उत्तरे अशी तीन चार ओळीतच कशी देता येणार ? पाच सहा दिवस विचार केल्यानंतर लक्षात येते की उत्तरे द्यायला सात तास तरी लागतील. म्हणजे आठवडा गेला. तोपर्यंत चांगलेच नाकी नऊ आलेले असतात. आणि दहा वेळा प्रश्नांची उत्तरे सांगितली तरी आणखी अकरा जण बारा प्रश्न घेऊन तयार असतात.
आजच एका गटात विचारणा झालीय. "प्रमेहाचे सर्व पंचवीस भाग वाचले. आता साखर नाॅर्मल राहण्यासाठी काय करायचे ते सांगा." म्हणजे लोकांना किती 'इन्स्टंट फाॅर्म्युले ' हवे आहेत ते बघा.
आयुर्वेद हे जीवनाचे शास्त्र आहे. ही विशिष्ट पॅथी नाही. विशिष्ट चौकट आखून त्यात औषधे आणि पथ्य कोंबायची म्हणजे आयुर्वेद नव्हे. असं जर कोणी करत असेल तर त्याला खरंतर आरोग्यच कळलेलं नाही.
समजा आपल्याकडे एखादे मशिन आणलेले आहे. तीन वर्षे वाॅरंटीचे ! काही कारणानी ते मुदतीपूर्वीच बंद पडले.
ते कसे बंद पडले, तेव्हा काय काम करीत होतो, याचे रसभरीत वर्णन ऐकवल्यानंतर तो काय म्हणतो ?
तज्ञाला दाखवल्यानंतर तो म्हणतो,
"अहो, या मशिन बरोबरचे हे 'लिफलेट' वाचले नाहीत का ? त्यावर हे बघा, स्पष्ट शब्दात लिहिले आहे, हे मशीन कसे वापरायचे ते ! तुम्ही हे मशीन तस्से वापरलेले नाही. सबब तुम्हाला या मशीनची 'वाॅरंटी' लागू होत नाही. "
आपण कपाळावर हात मारून फक्त "ओऽहोऽऽ" एवढंच म्हणू शकतो. म्हणतो. कारण तेवढंच आपल्या हातात असते. आणि ते 'लिफलेट' वाचायची वेळ निघून गेलेली असते.
जीवनाचं असच होतं. या शरीरासारखे दुसरे यंत्र नाही, असे हे दुर्लभ यंत्र जेव्हा तो शंभर वर्षाच्या वाॅरंटीसह, आपल्या हातात देतो, तेव्हाच एक 'लिफलेट' त्याने या यंत्राला जोडून पाठवलेले असते. हाऊ टु युज इट. लिहिलेलं असतं त्यावर !
पण आम्हाला हे 'लिफलेट' वाचून बघण्याची तसदी घ्यावी असे सुद्धा वाटत नाही. जेव्हा मशीन बंद पडते, तेव्हा हे मशीन का बंद पडले, कसे बंद पडले, कधी बंद पडले, हे शोधण्यासाठी, 'लिफलेट' शोधायची धावाधाव सुरू होते.
पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
असे होऊ नये......
या 'लिफलेटचे' नाव आहे.
" आयुर्वेद "
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021
11.02.2017
February 13, 2017
छान पंगत बसलेली आहे. जिलब्यांचा मस्त वास दरवळतो आहे. आवडीची मंडळी वाढायला अवतीभवती बागडताहेत,
अशा वेळी जिलबी खाण्यावरून पैज लागते.
August 16, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti