जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग ८२ ; आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक ११
जे जे देवासाठी ते ते देहासाठी – भाग ३९
देवाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर भटजी सांगतात, या विड्यावर पाणी सोडा. आणि म्हणा, “तांबूलम् समर्पयामी ।”
म्हणजे तू आता जे काही मोदक वगैरे खाल्लेले आहेस, ते पचवण्यासाठी हा तांबूल तुला अर्पण करीत आहे.
तांबूल म्हणजे विडा.
विडा म्हणजे परत काही जणांना कळणार नाही. खायचे पान, ज्याला आपण बिटल लीफ म्हणतो, ती दोन पाने, त्याच्या शिरा आणि देठ काढून टाकून त्याला चुना लावून वर थोडा कात घालून सुपारी फोडून वेलची आणि बडिशेप घालून त्याची त्रिकोणी किंवा चौकोनी घडी करणे आणि घडी सुटू नये, म्हणून पुनः वर लवंग टोचली की याला विडा म्हणतात. जेवणानंतर हा विडा देवाला द्यायचा असतो.
पण असा विडा तयार करून देवाला हल्ली कोणीच देत नाही. केवळ दोन विड्याची पाने एक सुपारी आणि रूपया दोन रूपयाचे नाणे जे काही कनवटीला असेल, ते काढून त्या पानसुपारीवर ठेवले की काम झाले.
देवा मला एवढंच शक्य होतं. बाकीच्या वस्तू घ्यायला मला सवडच झाली नाही म्हणून वर नाणं ठेवलेलं आहे, त्यातून जे काही लवंग बडिशेप तुला घेता येत असेल तर घे. त्यासाठी हे नाणे वर ठेवलेले आहे. त्यात pls भागवून घे !
या विड्यामधे एवढी काटछाट सुरू झाली आहे. मग उत्तम गुण कसा मिळणार ????
पान खाणं हे व्यसन आहे. व्यसनापासून लांब राहिलेले बरे ! एकदा पान खायला सुरवात केली की, कधी त्यात तंबाखू घातला जाईल याचा नेम नाही, म्हणून पान खाणे नको. असे सांगणारे महाभाग भेटले की हसावं की रडावं तेच कळत नाही.
हा जो विडा आहे, त्यात तंबाखू नाही. आणि व्यसन तंबाखूचं लागतं. आणि आपण लावून घेतो. तंबाखू काय स्वतः सांगत नाही मला खा म्हणून. माझा माझ्यावर संयम असला तर कोणतेही व्यसन लागत नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
पानाचं व्यसन नसतं. काही मोठ्ठे गैरसमज आपण करवून घेतले आहेत, त्यातील हा एक. आणखी की व्यसन लागलं की ते म्हणे सुटत नाही. व्यसन म्हणजे काही औषध नव्हे! (कायमस्वरूपी घेण्यासाठी) रक्तदाब, मधुमेह, यावरील गोळ्यांचे व्यसन आयुष्यभर लागले तरी चालते. हे व्यसन म्हणे लावून घ्यायचे असते. हे चालते, मग आरोग्यदायी विडा का नको ?
देवाला चालतं मग मला का चालणार नाही ? जे जे देवासाठी ते ते देहासाठी. या सूत्रावर जर विश्वास असेल तर वेगळ्या औषधांची गरजच काय ?
षोडशोपचार पूजेमध्ये देवाला औषधी गुणांचा विडा चालतो, वेगवेगळ्या वनस्पती चालतात, हा निसर्ग म्हणजेच एक मोठे दिव्य औषध आहे. निसर्गाने जे दिलंय तेच औषध आहे. पण पूजा करताना देवाला कृत्रिम रासायनिक औषधे देताना कधी पाहिलंय ?
असा विचार कधी केलाच नव्हता राव !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
02.07.2017