प्रक्रिया को लर्निंग स्पेस: शैक्षणिक प्रक्रिया गतिमान होण्यासाठी अनेक पर्याय आज काल आपण समाजामध्ये पाहतो. अशीच एक पुण्यातील आगळीवेगळी प्रायोगिक शाळा म्हणता येईल अशी जागा प्रक्रिया को लर्निंग स्पेस बाळसं धरत आहे. नवनवीन विचारांची कास धरत व समाजात विकास रुजवण्यासाठी काही व्यक्ती प्रयत्नशील असतात, त्यापैकीच मुग्धा व सचिन नलावडे हे एक जोडप आणि त्यांनी सुरू केलेली प्रक्रिया Co learning Space ही मुलांसाठीची जागा….. या संस्थेच्या नावातच याची विचारधारा लपलेली आहे, शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेत सहभागी असणारा प्रत्येक घटक म्हणजे मुले, प्रवर्तक, पालक, संस्थेचे इतर सर्व पदाधिकारी शिकत आहेत…..इथे येणारा प्रत्येकजण शिकण्याच्या भावात आहे, म्हणून नावात Colearning आहे, सहशिक्षणाची ही अव्याहत प्रक्रिया एकत्रितरित्या चालू ठेवण्याची ही जागा असा या नावाचा जन्म झाला आहे. सचिन ने नाव अनब इथे राबवली जाणारी शिक्षण पद्धती याचा हे नाव देताना अतिशय खोलवर विचार केलेला आहे.
अशा प्रकारच्या प्रयोगशील शाळेमध्ये मुलांना पाठवण्यासाठी पालकांना आधी त्याची पार्श्वभूमी समजायला हवी व पटायला हवी. चांगल्या निकालाच्या शाळा व शिकवणी लावली की पालक निश्चिंत असतात. समांतर शिक्षण व्यवस्था ही आज काळाची गरज आहे.
तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यापासून ज्ञानेंद्रियाचा वापर कमी होत आहे. प्रचलित शाळेत मुलांना फक्त ऐकण्याचेच काम असतें. ऐकण्याकडे लक्ष नसेल तर आकलन होत नाही. संबोध स्पष्ट नसताना पाठांतर केले जाते व परीक्षेत ते लिहिले जाते. आठवण्याच्या क्षमते वरून त्याचे व्यक्तिमत्त्व व भवितव्य ठरतें. या सगळ्या गोष्टी लक्षात घेवून मुलांची संख्या कमी ठेवून शिक्षण पद्धतीविषयी काही नवे प्रयोग करण्याचे धाडस पुण्यातील हे जोडप करत आहे.
ज्या पालकांना प्रचलित शिक्षण व्यवस्थेमध्ये असणारे दोष टाळून अजून अधिक मुलाला काही तरी द्यायचे आहे, त्या मुलाला तो स्वतः काही तरी वेगळेपण घेऊन जन्माला आला आहे त्याचा शोध घ्यायचा आहे, असा पालक वर्ग प्रक्रिया मध्ये येतो.
प्रक्रिया को लर्निंग स्पेस शाळा ही एक अशी जागा आहे की जिथे मुलं कां शिकायचं, काय शिकायचं आणि कसं हे समजून रोज नवनवीन गोष्टी शिकतात. वय वर्ष तीन ते तेरा पर्यंतची मुले इथे एकत्र शिकतात. प्रक्रिया को लर्निंग स्पेस या शाळेची सुरुवात जुन २०२२ मध्ये झाली. अध्ययन ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. सहज अध्ययन पद्धती वर येथे काम केले जाते. स्वातंत्र्य, हक्क, कर्तव्याचे सहज आकलन याचे कोलर्निंग इथे होतं. मूल समजून घेऊन त्याला योग्य शास्त्रशुद्ध समाधानकारक पर्याय शोधणं ही आजची गरज आहे. मुलें स्वतःच्या शिकण्याच्या पद्धतीच्या वेगवेगळ्या उपक्रमातून नव्याने शोध घेत असतात तसेच आनंददायी प्रक्रियेचा अनुभव घेत असतात. ‘स्वतः चा शोध घेते ते शिक्षण’ प्रत्येक मुलाला स्वतःचा शोध घेण्याची प्रक्रिया साधली पाहिजे, यासाठी योग, ध्यान धारणा सारख्या काही विशेष प्रक्रिया इथे केल्या जातात. मुलाला स्वतःबद्दल सजगता येणे, स्वतःच्या क्षमता कळणे, स्वतःच्या क्षमता तो कशा ओलांडू शकतो हे समजणे. मुलांना त्यांच्या अंत: प्रेरणा समजून त्या दिशेने काम करता येणे यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या अॅक्टिव्हिटीज इथे घेतल्या जातात व यातून मुलाचा स्वतः सोबतचा, स्वतःला ओळखण्याचा, जाणून घेण्याचा प्रवास सुरू होतो. इथे वर्ग नाहीत, साधारण वय वर्षे नऊ ते बारा या वयोगटातील मुले सर्व विषय एकत्रच शिकतात. सगळ्यांचा वर्ग एकच. जे काय मुलांना शिकण्याच्या दृष्टीने काम केले जाते त्याचे पूर्ण गटाला आकलन झाल्याशिवाय प्रवर्तक पुढे जात नाहीत. चित्रकला भाषा, गणित, विज्ञान, इतिहास भूगोल, पर्यावरण असे सगळेच विषय इथे आहेत. इथे I. Q. पेक्षा E. Q. वर जास्त भर दिला जातो, कारण मूल्य शिक्षण हे महत्त्वाचं मानलं जातं. आपण व्यक्ती घडवतो म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व घडवतो – चरित्र घडवतो, त्यामुळे मूल्यांना अधिक महत्त्व आहे.
आजच्या प्रगतीच्या वेगापुढे माणुसकी कमी होते आहे. संवेदनशिलता आत्ताच कमी झाली आहे पंचवीस वर्षानंतर आपल्याला संवेदनशील माणसाची गरज लागणार आहे.
‘प्रक्रिया कोलर्निंग स्पेस’ हे मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रिया कार्यन्वित करणारे सेंटर आहे. प्रत्येकजण अनुभवातून, कृतीतून, पुस्तकांमधून आणि व्यक्तींच्या सहवासातून कांहीं ना कांहीं शिकत असतो तेही निरंतर असते, अमुक एक वर्गापर्यंत शिकलो की शिकण्याचे काम नाही, हा विचार खूप घातक आहे, त्यामुळे मुलामध्ये निरंतर शिकत राहण्याचा विचार रुजत नाही. प्रक्रिया मध्ये हा विचार रूजतो, तसेच कोलर्निंग म्हणजे इथे फक्त मुलं शिकत नाहीयेत तर इथे सर्व मुलं, मुलांसोबत काम करणारा प्रवर्तक, प्रक्रियाची संपूर्ण कोअर टीम हे सर्वजण शिकत आहेत, कधी मुलांकडून तर कधी इतर घटकांकडून, असच वातावरण इथे राखल जातं.
प्रक्रिया कोलर्निंग स्पेस ही अशी जागा आहे जिथे मूल, पालक, प्रवर्तक, संस्थापक व याला जोडलेले सर्व घटक इथे शिकण्याची प्रक्रिया अनुभवत आहेत. मुलांच्या शिकण्याच्या नैसर्गिक उर्मीवर व त्याची स्वतः ची शिकण्याची नैसर्गिक पद्धत त्याला शोधता यावी यावर भर दिला जातो. मुलांकडून प्रश्न आले की त्याला त्याच्या प्रश्नांचा शोध घेता यावा यासाठी वेगवेगळ्या मार्गाने जाताना त्याला मदत केली जाते. कोणत्याही मुलाला कोणत्याही प्रश्नाचे थेट उत्तर दिले जात नाही.
प्रक्रिया कोलर्निंग स्पेस मध्ये मुलांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर भर दिला जातो. स्वतः बद्दल सजगता येणे, स्वतः च्या क्षमता कळणे, स्वतः च्या क्षमता तो कशा ओलांडू शकतो हे समजणे, मुलाला त्याच्या अंत:प्रेरणा समजून त्या दिशेने काम करता येणे यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या activities इथे घेतल्या जातात, ज्यातून मुलाचा स्वतः सोबतचा, स्वतः ला ओळखण्याचा, जाणून घेण्याचा प्रवास सुरु होतो.
आठवड्याची सुरवातच खाऊ बनवण्याच्या उपक्रमातून होते. दर सोमवारी सर्वजण मिळून खाऊ करतात, खाऊ ठरवण्यापासून ते बनवून खाण्यापर्यंत च्या सर्व प्रक्रियेचा मुलेच महत्त्वाचा घटक असतात, फक्त त्यांना मदत केली जाते. भाज्या चिरणं पोळ्या लाटणं स्वयंपाक घरातील सर्व कामे लहान लहान मुले ही करतात.
मुलांना खूप वेगवेगळ्या ठिकाणी निसर्गाच्या, समाजात प्रसिद्धीच्या आहारी न जाता समाज घडविण्याच्या कामात स्वतःला वाहून घेतलेल्या माणसांच्या सहवासात भटकंतीला नेले जाते.
सातत्याने सहलीचे आयोजन केले जाते. वेगवेगळे परिस्थिती अनुभवता येते, ठिकाणं अनुभवता येतात. प्रतिकूल परिस्थिती कळतें. नकळतपणे या सहली मधून मुलांनी खूप काहीं शिकायला मिळते. मुलें आपण देतो त्यापेक्षा खूप जास्त शिकत असतात, ते कोणत्या पातळीवर काय शिकतात हे आपल्या आकलनाच्या पलीकडे असते, मूल कोणत्या अनुभवातून काय शिकले हे कोणतेही तंत्रज्ञान वापरून तपासता येत नाही कारण तंत्र पद्धतीला सुद्धा आपल्या बुद्धीच्या मर्यादा असतात. परीक्षांचा किंवा गृहपठाचा ताण इथे मुलाला नसतो. मुलं मराठी, गणित, संस्कृत, भूगोल, इतिहास, पर्यावरण, इंग्रजी, चित्रकला आणि विज्ञान असे सगळे विषय शिकतात पण त्याला कोणत्याही प्रकारची तासांची चौकट आखलेली नाही. हे सगळेच विषय शिकण्यासाठी विविध पद्धती शश्रूिशी करायला मुलाला संधी दिल्या जातात. पर्यावरण व भूगोलाचा भाग म्हणून अभ्यासले गेलेले खडकाचे ज्ञान इयत्ता चौथीच्या वयाच्या असलेल्या वेद ने आई बाबांसोबत हिमाचल मध्ये फिरायला गेला तेंव्हा बरोबर त्यांना तिथे समजावले. अशी मागील एकच वर्षात मुलांच्या मध्ये झालेली growth कमालीची आहे, मुलांची गुणात्मक प्रगती म्हणजे नक्की काय याची कितीतरी उदाहरण देता येतील. मुलांची शिकण्यातली गती, मुलांची शोधक वृत्ती, मुलांच्या व्यक्तिमत्वात झालेले बदल, रोजच्या रोज त्याची झालेली प्रगती त्यांच्याशी गप्पा मारल्या तर कळतं. वर्षाला एकच मूल्यमापन पत्रक देण्याने खर तर ही प्रगती ठरवता येत नाही, ही प्रगती त्यांच्या जीवनशैली चा भाग होणे आवश्यक असते.
प्रक्रिया कोलर्निंग स्पेस ही वेगळ्या पद्धतीची शाळा आहे असेच पालक म्हणत असले तरी ही शाळा नसून शिकण्याची वृत्ती असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी ची ही जागा आहे, इथे येणाऱ्या प्रत्येकांनी शिकत राहावे हाच मुळ गाभा आहे अन या सुंदर प्रक्रियेत सहभागी व्हावे.
हा आत्ता पूर्ण वेळेचा उपक्रम असला तरी या उपक्रमात जी मुले काही कारणाने सहभागी होऊ शकत नाहीत पण त्यांनाही या पद्धतीने शिकायला आवडेल आशा सर्व मुलांसाठी प्रक्रिया गेली ६ वर्षे प्रक्रिया वाचन कट्टा हा उपक्रम राबवते आहे. या उपक्रमाविषयी, प्रक्रियेंच्या इतर विशेष कार्यक्रमाविषयी जाणून घेण्यासाठी….
अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क साधता येईल
मुग्धा नलावडे (९७६५४०५५४१)
सचिन नलावडे
संस्थापक व संचालक
प्रक्रिया कोलर्निंग स्पेस