आठवणीतले शिक्षक

शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यामुळे शाळा नावारूपाला येते. अशीच एक नावाजलेली शाळा, बीड येथील चंपावती विद्यालय व तिचे मुख्याध्यापक मुकुंद घनश्याम कुलकर्णी यांची ही यशोगाथा. पूर्वी चांगल्या शाळा चांगल्या संस्कारामुळे ओळखल्या जायच्या. तेथून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यावर शिक्षकाची व शाळेची छाप असे. आताही शाळा चांगल्या निकालावरून ओळखल्या जातातच.



शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यामुळे शाळा नावारूपाला येते. अशीच एक नावाजलेली शाळा, बीड येथील चंपावती विद्यालय व तिचे मुख्याध्यापक मुकुंद घनश्याम कुलकर्णी यांची ही यशोगाथा. पूर्वी चांगल्या शाळा चांगल्या संस्कारामुळे ओळखल्या जायच्या. तेथून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यावर शिक्षकाची व शाळेची छाप असे. आताही शाळा चांगल्या निकालावरून ओळखल्या जातातच.

व्यक्तिमत्त्वाचे ठसे कधीच नामशेष होत नाहीत. काळ माणसे हिरावून घेऊ शकतो; पण संस्कार नाही. संस्कारांचं बोट हा आधारच असतो. लहानपणी चालण्यासाठी बोटाचा आधार लागतो. मोठेपणी आयुष्य सुसह्य करण्यासाठी झालेल्या संस्कारांचं बोट धरावंच लागतं. आठवण आहे म्हणून व्यक्तिमत्त्वाची साठवण आहे. नावात केवळ व्यक्ती नसते, व्यक्तिमत्त्व असतं. एकच नाव अनेकांचं असतं; पण व्यक्तिमत्त्वच नावाला ओळख देतं.

असंच एक व्यक्तिमत्त्व. मु. घ. गुरुजी, मु.घ.सर या नावाने ओळखले जाणारे. व्रतस्थ, शिस्तबद्ध आयुष्य जगणारे, मूल्यांची वाट न सोडणारे, अशी माणसे होती यावर विश्वास बसणे कठीण आहे. असे वाटणारे, जगण्यासाठीची शिदोरी व प्रेरणा देणारे, व जगण्याला बळ देणारे असे शिक्षक म्हणजे मु.घ.कुलकर्णी.

खरं तर, चारित्र्यवान व्यक्तीचं आयुष्य आचरणात आणलं तर वेगळं मूल्यशिक्षण द्यायची गरज भासणार नाही. आम्ही सभोवतालची माणसेच ओळखत नाही ही आजची शोकांतिका आहे. काही माणसे विचार देतात, काही आचरण शिकवतात. नव्या पिढीसमोर चांगली माणसे, चांगले शिक्षक, त्यांचे आचार, विचार यायलाच हवेत.

मु.घ.शास्त्राचे विद्यार्थी असूनही त्यांनी सर्वच विषय नेमक्या हातोटीने शिकवले, त्यांना कोणताच विषय वर्ज्य नसे. विज्ञान, इंग्रजीसारख्या कठीण विषयाची गोडी त्यांच्या शिकवण्यामुळे लागली असे सांगणारे कैक विद्यार्थी आहेत. मराठी, `संस्कृत आदि भाषा यांचाही त्यांनी विद्यार्थ्यांना लळा लावला. कुठल्याही वर्गाची, कोणतीही कविता ते प्रथम त्यांच्या स्वतः बांधलेल्या चालीमध्ये गाऊन दाखवत असत, त्यांनी दिलेल्या गोड चालीमुळे त्यांच्या विद्यार्थ्यांना अनेक कविता अद्यापही लक्षात आहेत. प्रत्यक्ष प्रयोगातून विज्ञान शिकवण्याची त्यांची पद्धत विद्यार्थ्यांमध्ये फार लोकप्रिय होती, ते इतिहास शिकवत असत तेव्हा विद्यार्थ्यांच्या डोळ्यादेखत इतिहास घडतो आहे, असा भास निर्माण होई. इंग्रजी विषयांमधील ‘द रेन’ ही पावसावर आधारित कविता त्यांनी चक्क पावसात शिकविली. ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे’ हा अभंग शिकवताना तो रानात जाऊन शिकण्याचा आग्रह केल्याचे अनेक विद्यार्थ्यांना आठवते. त्यांच्या इतके प्रयोगशील शिक्षक अभावानेच आढळतात.

मकरंद अनासपुरे हे त्यांचे विद्यार्थी, त्यांच्याबद्दल म्हणतात की, ‘मु. घ. सर कवी, लेखक, गाण्याची, वाद्याची जाण असणारे असल्यामुळेच त्यांनी विद्यार्थ्याकडून सांस्कृतिक कार्यक्रम बसवून घेतले. त्याचा आम्हाला पुढच्या जीवनात नक्कीच फायदा झाला.’

एक प्रयोगशील शिक्षणव्रती, स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेली, स्वातंत्र्यलढ्यात बालपणापासून तारुण्यापर्यंत आयुष्य व्यतीत केलेली आणि म्हणून स्वातंत्र्योत्तर काळात देशप्रेमाने भारावलेली अशी जी पिढी होती त्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून मु.घ.सरांकडे पाहाता येईल. विद्यार्थ्यांच्या हिताचे चिंतन हे त्यांच्या जीवनाचे सूत्र राहिले आहे. केवळ निकालाकडे लक्ष न देता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे त्यांनी लक्ष दिले. १९५३ ते १९८९ या छत्तीस वर्षांत ते विद्यार्थी आणि भारत देश हा एकच विषय घेऊन जगले.

गाता गळा, विविध वाद्ये वाजवण्याची क्षमता, उपजत रसिकता, चित्रकलेतील कौशल्य, संस्कृत तसेच उर्दू भाषेची असणारी सखोल जाण या सर्व क्षमतांनी परिपूर्ण असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे मु. घ. सर.

आचार्य अत्रे प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा शिक्षणतज्ज्ञ आचार्य अत्रे हा पुरस्कार त्यांना दिला गेला. १९८० मध्ये आदर्श शिक्षक म्हणून महाराष्ट्र शासनानेही त्यांना गौरविले होते.

डॉ. विवेक देशपांडे म्हणतात, ‘शाळेत खोडकर मुलगा म्हणून माझी ओळख होती. माझ्या आणि माझ्या वडिलांच्या ताणलेल्या नात्यांमध्ये मु.घ. सरांची मध्यस्थी नसती तर मी आज कोण असतो, काय झालो असतो, याची कल्पना करू शकत नाही. नंतर सरांची शाबासकी अनेकदा मिळवली, डॉक्टर झालो, सुवर्णपदकही मिळवलं.’ संबोध स्पष्ट झाले की, अभ्यासातले ताणतणाव नष्ट झाले, की मुले आपोआप अभ्यासाकडे वळतात. व्यक्तिमत्त्वाची जडणघडण कुटुंब आणि शाळा यामुळेच होते.

शेवटच्या दिवसात त्यांनी ‘हॅम्लेट’ हे नाटक पाहिलं. त्यांचा मुलगा माधव कुलकर्णी यांनी विचारलं, ‘आवडलं का नाटक? ‘ आवडलं का यावर त्यांनी होकार दिला. संवाद ऐकू आले का? या प्रश्नाला त्यांचं मिश्किल उत्तर होतं, ‘मला ते पाठच होतं की. ‘
अजूनही त्यांचे विद्यार्थी त्यांच्या बॅचचे स्नेहसंमेलन करतात. एकदा त्यांच्या विद्यार्थिनींनी दिलेले पत्र जे त्यांनी जपून ठेवले होते आणि ते बऱ्याच वर्षांनी स्नेहसंमेलनात दाखवले. हे पाहिल्यावर त्यांच्या विद्यार्थिनी सुजाता पाटील यांना भरून आलं होतं. आता पत्र लिहिणंच कमी झालं व पत्र आलेलं जपून ठेवणं हे दुर्मिळ झालं आहे.

मु. घ. म्हणजे कलासक्त, शिस्तप्रिय व माणसं जोडणारे, सहवासातील प्रत्येकाला शहाणं करून सोडणारे, पाठीवर शाबासकी देऊन प्रोत्साहन देणारे, भरभरून एखाद्याचे कौतुक करणारे, नेहमी सायकल वापरणारे, १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला घरीही झेंडावंदन करणारे अशीच त्यांची ओळख आहे.

जयश्री राऊत, (मुंबई) म्हणतात, ‘शाळेला शाळा न समजता कुटुंब मानणारे मु. घ. सर प्रत्येक गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमात मिसळत. वेळ काढून स्वतः जातीने भाग घेत. गणेशोत्सवात कोणती गाणी बसवायची, याकडे जातीने लक्ष देत. आता स्नेहसंमेलनातील गाणी व नृत्य पाहून शिक्षणाधिकाऱ्यांना गाण्याच्या निवडीबाबत परिपत्रक काढावे लागते.

शिक्षकाचे काम केवळ अध्यापन करणे नसून विद्यार्थ्यांना विचार देणं, दिशा दाखवणं, आचरण देणं हे होय. Values are not taught online. Values are caught offline. मूल्यं शिकवता येत नाहीत. मूल्यांची रुजवणूक केवळ अभ्यासक्रमातून होत नाही. मूल्यांचे संवर्धन होतं ते चांगल्या व्यक्तींच्या सहवासामुळे.

आठवणीतले शिक्षक विसरता येत नाहीत. मु. घ. सरांचे चाहते विद्यार्थी आज सर्व क्षेत्रांत, मोठमोठ्या पदांवर आहेत; पण ते जेव्हा आठवणीत रमतात तेव्हा सरांनी आम्हाला जे दिलं त्यांच्यामुळेच आज आम्ही यशस्वी आहोत, ही भावना व्यक्त केल्याशिवाय राहात नाहीत.

मु.घ. म्हणजे एक चालतं बोलतं मुक्त विद्यापीठच होतं. चांगली माणसे विचारांचा ठेवा ठेवून जातात. ते जणू जुन्या काळातल्या घटनांचं, माहितीचं, ज्ञानाचं भांडारच होते.

मु.घ.म्हणजे जुन्या काळातलं गुगल. मु.घ.म्हणजे संस्कार पेरणारा अवलिया.एक हुशार पिढी तयार करणारा, हाडाचा शिक्षक. विशिष्ट ध्येयाने, तत्त्वाने जगणारा. अशी माणसे आता आणायची कोठून? आता फक्त ती आठवायची.
कविता ही नुसती शिकवायची नसते, तर आस्वादायची गोष्ट असते, हे कविता शिकवताना ते स्वतः गाऊन दाखवायचे, स्वतः पेटी वाजवायचे. संस्कृतचे ज्ञान, अफाट वाचन, गायन, अध्यापन, प्रशासन, राजकारण, इतिहास, विज्ञान, अध्यात्म याचं ते माहिती केंद्र होतं. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर बंगाली साहित्य वाचायचे म्हणून बंगाली शिकण्याचा प्रयत्न करणं, हक्कांच्या माणसांना दुर्मिळ पुस्तके आणण्यास सांगणं, चित्रपट कसा पाहायचा, पत्रलेखन, सुबक हस्ताक्षर, कला, छंद, जोपासायला शिकवणारं असं ते एक परिपूर्ण व्यक्तिमत्त्व होतं. त्यांच्याजवळ काय नव्हतं? असे शिक्षक आज का नाहीत?

ते असे होते, तर त्यांना घडवणारे कसे असतील? मेंदूचं प्रत्यारोपण करता येत नाही; पण संस्काराचं प्रत्यारोपण करता येतं, ते त्यांनी केलंय. त्यांचे विद्यार्थीही ते करतीलच.

प्रत्येक चांगली म्हण त्यांना लागू पडते. साधी राहाणी, उच्च विचारसरणीपासून, मरावे परी किर्तीरूपी उरावेपर्यंत. माणसे जातात, पण आठवणी पेरून जातात. आठवणीचे वृक्षच मायेची सावली देतात, जीवन सुसह्य करतात. जिवंत असतानाच काही माणसे इतिहास निर्माण करतात, पुढच्या पिढीसाठी हमरस्ता तयार करतात. असा शिक्षक होणे नाही, याचेच शल्य आहे. सांगा, मुकुंद असा कुणी हा पहिला का?

अब्राहम लिंकनने मुख्याध्यापकाला लिहिलेल्या पत्रातील सर्व गोष्टी मुलांना त्यांनी आधीच शिकवल्या.

पुस्तकातील प्रतिज्ञा त्यांनी विद्यार्थ्यांच्या पुस्तकातून मस्तकात रुजवली. ते मूल्ये रुजवणारे शिक्षक होते. मुलांना केवळ शिकवणारे शिक्षक नव्हतेच.

मुलांना शिकवणारे नको तर शिकू देणारे शिक्षक हवेत. शिक्षक केवळ गूगलसारखे नकोत, माहितीचे भांडार नकोत, माहितीचा मारा, तोही एकतर्फी करणारे नकोत. गुरुकुल पद्धती जाऊन कुलगुरू पद्धती आली आहे. सुसंस्कारित आचार जाऊन भ्रष्ट आचार शिष्टाचार झाला. झिजलेल्या चपलेवरून चितळे मास्तर ओळखू यायचे. आता असे चितळे मास्तर शोधायचे कुठे? पण मु. घ. तर शोधता येतात.
व्यक्ती एकाचवेळी चांगले वडील, आजोबा, शिक्षक, आस्वादक, समीक्षक, वाचक, लेखक असं बरंच काही असू शकते, याचे उदाहरण म्हणजे मु. घ. सर.
आपण गुरूच्या मनात, मर्जीत आहोत ही भावना फार सुखावह असते, आणि तीही एका शांत, सुस्वभावी, विद्वान, सुसंस्कृत व निरपेक्ष व्यक्तीच्या मनात, ही विद्यार्थ्यांच्यासाठी फार मोठी पर्वणी आहे. काही माणसे व्यक्त होतात तेव्हा फार आतून व्यक्त होतात. आपल्या नकळत आपले काही आदर्श असतात, त्यात मु.घ. वरच्या स्थानावर आहेत. आपण कुणासाठी तरी दखलपात्र आहोत, हीच जगण्याची शिदोरी असते. माणसात देव शोधता आला की, मंदिर बंद असलं तरी चालतं.

Author