आंतरजालचं मायाजाल

आंतरजालच्या जाळ्यात तरुण पिढी कोळ्याप्रमाणे अडकली आहे. सध्या स्क्रीन टाईमने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. देश केवळ वैधानिक इशाऱ्यांनी चालत नाही, तर शिस्तीने चालतो. वैधानिक इशारा म्हणजे स्वैराचाराला दिलेलं प्रमाणपत्रआहे. अश्लीलता संस्कृतीस घातक आहे, हा वैधानिक इशारा अजून आला नाही. नैतिकता जेव्हा दगिन्याप्रमाणे लॉकरमध्ये ठेवलेली असते तेव्हा ती असून नसल्यासारखी असते.



आंतरजालच्या जाळ्यात तरुण पिढी कोळ्याप्रमाणे अडकली आहे. सध्या स्क्रीन टाईमने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. देश केवळ वैधानिक इशाऱ्यांनी चालत नाही, तर शिस्तीने चालतो. वैधानिक इशारा म्हणजे स्वैराचाराला दिलेलं प्रमाणपत्रआहे. अश्लीलता संस्कृतीस घातक आहे, हा वैधानिक इशारा अजून आला नाही. नैतिकता जेव्हा दगिन्याप्रमाणे लॉकरमध्ये ठेवलेली असते तेव्हा ती असून नसल्यासारखी असते.

प्रेमाला उपमा नसते. वासनेला प्रतिमा नसते. वासना ऑक्टोपसप्रमाणे असते, आकारहीन असते. प्रत्येक माणसात राक्षस असतो व माणसातला राक्षस केव्हा जागा होईल हे सांगता येत नाही. जसं ऑक्टोपस केव्हा आकार बदलेल ते सांगता येत नाही. मनातील मळभ दूर करण्यासाठी होळीत शिव्या देण्यापलीकडे आमची मुलं कधी पुढे गेली नाहीत. पण शाळेतील मुलं फेक अकाउंट उघडतात आणि अश्लीलतेच्या चर्चा करून बलात्कारपर्यंत जातात, तेव्हा पालकांनी नक्कीच गांभीर्याने ही बाब घ्यायला हवी. या आधीची पिढी अभिजात वाङ्मय, अध्यात्मावर, नैतिकतेवर पोसली गेली. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. म्हणून प्रेम पहिली पायरी सोडून त्यांनी एकदम वासनेची पायरी गाठली, हे भयावह आहे. पालक सुधारले तरच बालक सुधारतील. प्रेमचंद, शरदचंद्र, पु.ल. देशपांडे, कुसुमाग्रज ही नावेही माहीत नसलेली व माहीत करून घेण्याची गरजही वाटत नसलेली पिढी पालकांसाठी डोकेदुखी व आव्हान ठरत आहे. अनेक नियंत्रित, अनियंत्रित गोष्टींचा वावर आमच्या सभोवताली आज आहे. आम्हीच तो निर्माण केला आहे.

बॉईज लॉकर रूम हे हिमनगाचे केवळ टोक आहे. एका उच्चभ्रू समाजाच्या कार्यक्रमात अश्लीलता बोलली जात होती. निर्भया प्रकरण झाले तरी निर्भयपणे स्त्री विटंबना चालूच आहे. नको त्या वयात नको ते पाहिलं की मुलं अस्वस्थ होतात, उद्ध्वस्त होतात. अभ्यासाची चर्चा न करता अश्लीलतेची चर्चा करून सामूहिक बलात्काराचा गृहपाठ करण्यापर्यंत त्यांची मजल जाते. गेम खेळून मुले मृत्यूला कवटाळत आहेत, बलात्काराचे नियोजन करत आहेत, तरी काही संकेतस्थळे बंद होत नाहीत. काही घरात जेव्हा भ्रष्टाचाराने लक्ष्मी नांदते हे मुलं पाहातात तिथं नैतिकता खुंटीला टांगलेली असते. पॉर्न पाहाण्यात भारताचा तिसरा क्रमांक आहे.

कालांतराने प्रेम, अनुनय, शृंगार, प्रणय, यौवन शब्दांना अर्थ राहाणार नाही. वासना हीच जीवनाची इतिकर्तव्यता आहे असे वाटणारा एक वर्ग तयार होत आहे. भावविश्व कामविश्व झालं आहे. शाळा, घर यांना घरघर लागली आहे. घराला घरपण देणारी माणसे राहिली नाहीत. आदर्श माणसे जेव्हा लॉकपमध्ये जातात तेव्हा आदर्श केवळ पुतळ्यात उरतात. पूर्वी संस्कारचा वावर कुटुंबात, समाजात असे. आज विकारही आमच्या उंबरठ्याबाहेरच नाही तर आतही आला आहे. तंत्रज्ञानाचा वावर व वापर इतका प्रचंड प्रमाणात वाढला की, भावनेला पायदळी तुडवून अनेक चांगल्या गोष्टी लॉकरमध्ये टाकून घराचं लॉकर रूम केव्हाच झालं आहे. मुलांच्या नशिबात श्यामच्या आईची कुशी नाही तर मोबाईलच्या कुबड्या आहेत. प्रेमस्वरूप आई हे त्यांच्या कानावर पडतच नाही, तर हॅपी मदर्स डे एवढेच त्यांच्या कानावर पडतं. पूर्वीची पिढी पालकांच्या धाकात होती. जी आज बालकांच्या धाकात आहे. अश्लीलता घरात आली आहे, मालिकेतही आली आहे, चित्रपटात-साहित्यात आली आहे. संस्कारांचा टीपकागद किती पुरणार? मनाला लॉकडाऊन करता येत नाही. कारण मन भरकटतं. मन वढाय वढाय. वासना केवळ झिरपत नाही, तर त्याच्या प्रचंड धबधब्याखाली आमची तरुण पिढी न्हाऊन निघत आहे. वयात यायच्या आधीच मुलांनी वासनेचा रस्ता धरला आहे. भवताल जेव्हा लय हरवून बसतं तेव्हा जीवनाचा ताल बिघडतो.

घरच्यांबरोबर नको ते मुले पाहातात. मुलेही शॉक ऑब्सॉर्बर झाली आहेत. रक्तात काय भिनतं याला खूप महत्त्व आहे, संस्कार की विकार. श्यामच्या आईच्या संस्काराला गाडून कार्टूनच्या इमारतीत मुले हसत, खेळत, बागडत आहेत. त्यांच्यासमोर निसर्ग येतच नाही. फक्त अश्लीलतेचा संसर्ग येतो.

माणसे नाहीसे होतात; पण त्यांच्या विचारांचा पगडा नकळत आपल्यामध्ये असतो.

तंत्रज्ञानाचा वावर एवढा वाढला की, मरणासन्न माणसाला वाचवण्याचे सोडून लाईव्ह चित्रीकरण करून व्हायरल करण्यात धन्यता मानली जात आहे.

लता, पु.ल.शेक्सपियर यांचा वावर आजही व्यक्तिमत्त्वाला आकार देतो. मुलांना चांगले ऐकू द्या, चांगलं पाहू द्या, आस्वाद घ्यायला शिकवा, रसग्रहण करायला शिकवा, निसर्गाचं देणं, नक्षत्राचं देणं, शरदाचं चांदणं, शब्दांच्या पलीकडे जायला शिकवा. आता हतबल पालकांनी कठोर व्हायची वेळ आली आहे.
अनैतिकतेला लॉकरमध्ये टाकायची वेळ आली आहे.

Author