व्यक्त, अव्यक्त

केवळ पुस्तकं वाचून अव्यक्त राहाणाऱ्या पिढीला, पुस्तकांच्या पलीकडे गेलं तरच व्यक्त होण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतात. मुलांना केवळ पोपटासारखं बोलायला शिकवण्यापेक्षा व्यक्त होणं शिकवायला हवं. बालकवींची कविता ‘हिरवे हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे’ कविता पाठ करून मुले अव्यक्त राहातात; पण प्रत्यक्षात जेव्हा हिरव्या गालिच्यावरून ते चालतात, उड्या मारतात तेव्हा ती जास्त व्यक्त होतात आणि आनंदाच्याजवळ पोहचतात.



केवळ पुस्तकं वाचून अव्यक्त राहाणाऱ्या पिढीला, पुस्तकांच्या पलीकडे गेलं तरच व्यक्त होण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतात. मुलांना केवळ पोपटासारखं बोलायला शिकवण्यापेक्षा व्यक्त होणं शिकवायला हवं. बालकवींची कविता ‘हिरवे हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे’ कविता पाठ करून मुले अव्यक्त राहातात; पण प्रत्यक्षात जेव्हा हिरव्या गालिच्यावरून ते चालतात, उड्या मारतात तेव्हा ती जास्त व्यक्त होतात आणि आनंदाच्याजवळ पोहचतात.

अव्यक्त राहाण्यात मने झाकोळतात. व्यक्त होणे म्हणजे ‘झाले मोकळे आकाश’ ही भावना मनात येणे.

संवाद नसलेल्या समाजात व्यक्त होणं आवश्यक आहे. वेळच्यावेळी व्यक्त झालं की अनेक प्रश्न सुटतात. चाफा बोलत नाही फक्त व्यक्त होतो. काही माणसे फक्त बोलतांत, व्यक्त होत नाहीत. निसर्ग किती भरभरून बोलतो, हातचं राखून ठेवत नाही. व्यक्त होतो तो निसर्ग. अव्यक्त राहातात ती माणसं, अव्यक्त राहातात म्हणून ही गुपिते आहेत.

व्यक्त होण्याने प्रेम होते, युद्ध होते, दंगल होते, सामंजस्याने प्रश्न सुटतात.

व्यक्त होणं हे केवळ अव्यक्त हिमनगांचे टोक आहे. खूप साचल्यावर माणसं व्यक्त झाल्याशिवाय राहात नाहीत, पत्राने असो व सोशल मीडियाच्या माध्यमातून असो.

कोण कोणाशी किती व्यक्त होतं, कोण कोणाशी किती समरस होतं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शरीर आणि मन हे कुठे व्यक्त होईल, सांगता येत नाही.

माणसांची तार जुळायची त्याच्याशीच जुळते, या तार जुळण्याला काहीच तार्किकता नाही, जशी प्रेमाला तार्किकता नसते. प्रेमातच माणसे व्यक्त होतात.

शरीराचा व्यापार तेजीत असला की मनाचा शेअर बाजार कोसळतो. मनं जुळली की शरीरं गौण ठरतात. मनाची गुंतवणूक शरीराच्या जोखमीवर अवलंबून असते.
‘Investments are subject to market risk’ प्रमाणे. व्यक्त होण्यात उद्ध्वस्त होण्याची भीतीही असते, म्हणूनही माणसे व्यक्त होत नाहीत. एखादा पुनः प्रत्ययाचा आनंद पुन्हा पुन्हा हवा असा वाटतो. कारण व्यक्त होण्याची हीच एक जागा हक्काची असते. माणसे जेवढी देवाजवळ व्यक्त होतात तेवढी प्रेयसीजवळ व्यक्त होत नाहीत. करण देवाजवळ क्रॉस चेकिंग नाही. माणसांच्या व्यक्त होण्यात स्वार्थही असतो, तसा फुलांच्यात व्यक्त होण्यात नसतो. फूल देवासाठीही व्यक्त होतं, स्त्रीच्या सौंदर्यवृद्धीसाठी व्यक्त होतं, मृत्यूशय्येवरही आदराने नतमस्तक होतं. व्यक्त होण्यासाठी आपलं निर्माल्य आहे हे त्याला ठाऊक असतं.

माणसांचे व्यक्त होणे म्हणजे त्यांना फिक्स डिपॉझिट वाटतं. जिथे व्याज जास्त तिथेच आपण गुंतवणूक होते. स्वार्थ पाहूनही माणसं व्यक्त होतात, मला काय मिळेल यातच त्यांचे जीवन व्यस्त असते. देवासमोर नवस बोलताना ही माणसे गुंतवणूक करतात, असं झालं तर तसं करेल. व्यक्त होण्यातही व्यापार असतो. गणिकेचं. व्यक्त होणं पैसा आणि शरीरासाठी असतं.
प्रेमात फक्त व्यक्त होणं निर्व्याज असतं. माणसं व्यक्त होऊ शकतात म्हणूनच आस्वाद घेऊ शकतात, परीक्षण करू शकतात, समीक्षा करू शकतात, टीका करू शकतात, चर्चा करू शकतात, तो त्यांचा एक बौद्धिक खुराकच आहे. प्राणी आणि वनस्पती यांच्या व्यक्त होणं याला मर्यादा आहेत. आपल्या आपल्या दृष्टीने, पण त्यांच्या दृष्टीनेही ते व्यक्त होतातच. प्राणी आणि वनस्पती निसर्गानुसार व्यक्त होतात निसर्गाविरुद्ध नाही. माणसांचं तसं नाहीये ते निसर्गाविरुद्धही व्यक्त होतात. निसर्गाला उद्ध्वस्त करून विजय मिळवण्यात, स्वतःचा विनाश कधी करून घेतात हे त्यांच्याही लक्षात येत नाही. माणसांच्या व्यक्त होण्यात विनाशही आहे. स्वतःच्या व्यक्त होण्यातून निर्माण झालेला एक विषाणू संपूर्ण मानव जात उद्ध्वस्त करू शकतो. मानवाची जीवनशैली बदलवू शकतो, माणसाला स्थानबद्ध करू शकतो. माणसाच्या प्रगतीसमोर प्रश्नचिन्ह उभारू शकतो. आनंद, दुःख या माणसांच्या व्यक्त होण्याच्या जागा. भावनेच्या संपत्तीवरून माणसांचं व्यक्त होणं ठरतं. कोणी भावनाप्रधान तर कोणी निर्विकार, भावनाशून्य. अनेकांना भावना असतात; पण त्या ते व्यक्त करू शकत नाहीत, त्या अव्यक्तच राहातात.

अनेक भावना लॉकरमध्ये असल्याप्रमाणे सुरक्षित तर असतात; पण उपयोगाच्या नसतात. त्या आहेत यातच समाधान. अनेक अव्यक्त भावनांनी माणसे लगडलेली असतात. अनेक अव्यक्त भावनांचे ओझे घेऊन माणसे जगतात. शेवटच्या श्वासापर्यंत माणसाजवळ एकच गोष्ट असते ती म्हणजे अव्यक्त भावना. प्रेम करायला व्यक्तच व्हायला पाहिजे असं नाही. अव्यक्त राहूनही अनेक गोष्टींवर, अनेकजण प्रेम करतात. अनेक गोष्टींवर प्रेम करण्याची आपल्याला मुभा आहे; पण काही ठिकाणी ‘नियम व अटी लागू’ हे पाळावं लागतं.

व्यक्त, अव्यक्त होण्यातून संस्कृती कळते, विकृती कळते. व्यक्त होण्यात बंधन आहे. कोणी कसेही व्यक्त नाही होऊ शकत. अव्यक्त राहाण्यात बंधन नाही. अव्यक्त राहून अनेक डाव साधता येतात. मनाचा थांगपत्ता लागू द्यायचा नसेल तर अव्यक्त सारखं साधन नाही. अव्यक्त प्रेम मुदतीची ठेव असते, आहे याचं समाधान. मनाच्या श्रीमंतीत अनेकांना स्थान असतं आणि ते असायलाही हवं. कुठे, काय, कसं, किती व्यक्त व्हायचं याचं गणित जमलं पाहिजे. व्यक्त होण्याचेही मापदंड ठरलेले असतात. माणसं व्यक्त होत नाहीत हीच आजची समस्या आहे, झाली तरी, सद्सद्विवेक बुद्धी, तत्त्वं गुंडाळून व्यक्त होतात.

पोखरलेल्या, उद्ध्वस्त व्यक्तिमत्त्वावर क्षणिक आनंदाचा इंद्रधनूही दाखवतात.

कसं चाललंय म्हणल्यावर मस्त उत्तर देऊन किती दिवस फसवणार. आपलं दुःख झाकून ठेवायची सवय लोकांना असते. काही जागा अशा असतात की, तिथेच फक्त दुःख व्यक्त करता येतं. अशा जागा जेवढ्या जास्त तेवढा माणूस श्रीमंत. पण विश्वासाने पाय धरावेत, विश्वास टाकावा अशा जागाच जेव्हा दुर्मिळ असतात, तेव्हा व्यक्त होणे कठीण असतं. श्रद्धा-अंधश्रद्धा यांना हातात घेऊनच देवाजवळ व्यक्त होता येतं. काही व्यक्त व्हायला कारणमीमांसा, तार्किकता खुंटीला टांगून ठेवावी लागते. अंधश्रद्धेची हातकडी ही लोकांना गजरा वाटते तेव्हा त्याला तुम्ही आम्ही काय करणार? एकाची श्रद्धा दुसऱ्यासाठी अंधश्रद्धा असू शकते. व्यक्त होण्याला मर्यादा आहेत, म्हणून अनेक तत्त्वज्ञान, विचार अव्यक्त राहिले आहेत, काळाच्या उदरात गडप झाले आहेत. माणसाच्या मृत्यूनंतर व्यक्त-अव्यक्तचा संघर्ष संपतो असं नाही.

मृत्यूनंतर ही माणसं व्यक्त होतात विचारांनी, पुस्तकरूपाने व आपल्या आयुष्यात सदैव दीपस्तंभ म्हणून मार्गदर्शक ठरतात. दीपस्तंभानीच मानवी जीवनाची ही नौका भरकटत नाही.

Author