बाणेर येथील सम्यक मनोविकार हॉस्पिटलमधील डॉ. ज्ञानराज चौधरी व डॉ. रूपाली चौधरी यांच्याशी झालेल्या चर्चेमधून माणसांच्या संबंधित माणसांच्या मनासंबंधी पुस्तकांच्या पलीकडील गोष्टी ज्या व्यवहारात आवश्यक आहेत त्याचे महत्त्व समजले. पुस्तकात सर्व प्रश्नांची उत्तरे सापडत नाहीत, पुस्तकाबाहेर व्यवहारात शोधावी लागतात. पुस्तकांच्या पलीकडे खूप खूप शोधावं लागतं. जो वाचन करतो त्याला आपण पुस्तकाचा किडा म्हणतो. पुस्तके वाचून यश मिळवलेले लोक इथे पेशंट म्हणून येतात. पैसा अमाप असतो पण माणसांनी त्यांना अव्हेरल्यामुळे एक प्रकारचे नैराश्य त्यांच्या मनात येऊन आत्महत्या करण्यापर्यंत ते आलेले असतात, त्यांना पुन्हा माणसात आणणं म्हणजे कोसळतं विमानाचं सेफ लँडिंग करण्यासारखं आमचं काम आहे, असं डॉ. ज्ञानराज चौधरी म्हणाले. पुस्तकं वाचून त्यांच्यावर उपचार करता येत नाहीत, तर पुस्तकांच्या पलीकडे जाऊनही वेगळ्या संवाद थेरपीने त्यांना पुन्हा आयुष्याच्या वळणावर बोट धरून समाजात आनंदाने जगण्यासाठी सज्ज करावं लागतं. अनेक गोष्टी पुस्तकात शिकायला मिळत नाहीत. पुस्तके आपल्याला विचार करायला लावतात, आपल्याशी संवाद साधतात; पण पुस्तकाच्या पलीकडे जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला संवाद साधल्याने अनेक गोष्टींचे ज्ञान होते, आकलन होते.
माणसे वाचता यायला हवीत, निसर्ग वाचता यायला हवा, त्यांच्याशी संवाद साधला की, आपल्याला पुस्तकापेक्षाही ज्ञानाचे भंडार हाती लागतं. व्यक्तिमत्त्वाची जडणघडण संवादानेच होते.
आपण सर्व प्रसारमाध्यमांच्या सहवासात सजीव माणसापेक्षाही जास्त वेळ राहात आहोत.
सजीव माणसाशी संवाद साधल्याने मन मोकळं होतं, विचारांचं आदान-प्रदान होतं. यांत्रिकीकरणामुळे मन मोकळं करायच्या जागा कमी झाल्या आहेत, त्यामुळे व्यक्तिमत्त्वं निर्वात पोकळीत वाढत आहेत. आपल्या मनाशी तरी आपण संवाद करतो का? मनाला वेळ देतो का? मनाला समजून घेतो का? मनाशी हितगुज करतो का? कारण तेवढा निवांत वेळ कुणाजवळच नाही, प्रत्येकाची समस्या ही आहे की वेळच नाही.
वेळ नाही म्हणतच वेळेचा अपव्यय होतो. वेळ काढावा लागतो तरच मनाची मशागत होईल आणि संवाद बहरतील. पंडीत नेहरूंनी तुरुंगातून आपल्या कन्येला पत्रांच्या माध्यमातून भावनिक पोषण करत माहिती, ज्ञानही दिले जे पुस्तकांच्याही पलीकडले होते. श्यामच्या आईने श्यामला दिलेले संस्कार पुस्तकाच्या पलीकडले होते, आजही सानेगुरुजी आठवतात. पुस्तके ही शेवटी माणसेच लिहितात, म्हणून माणसांना समजून घ्यायचा प्रयत्न व्हायला हवा. अब्राहम लिंकननेसुद्धा मुख्याध्यापकांना पत्र लिहिताना माझ्या मुलाला हे शिकवा सांगताना पुस्तकांच्या पलीकडील गोष्टी ज्या जीवन यशस्वीपणे जगायला शिकवतात त्याच सांगितलेल्या आहेत. ते पत्र आजही मुख्याध्यापकांच्या कक्षात विराजमान आहे. पुस्तकात एखादी निसर्गावरील कविता असते; पण जेव्हा आपण निसर्गात त्याची अनुभूती घेतो तेव्हा ती जास्त समजते, म्हणून पुस्तकाच्या पलीकडे जाऊन विचार जेव्हा आपण करतो तेव्हा तो मनात रुजतो. हिरवे हिरवे गार गालिचे ही कविता नुसती पाठ करू नका, तर ती निसर्गात अनुभवा.
‘श्रावण मासी हर्ष मानसी’ हे पुस्तकातल्या कवितेपेक्षा प्रत्यक्ष जीवनात अनुभवायला हवं.
नदीचे खळखळतं पाणी, पक्ष्यांचा किलबिलाट, पाण्यावरील तरंग हे पुस्तकात वाचून कळत नाही, तर त्याची प्रत्यक्ष अनुभूती पुस्तकांच्या पलीकडे जाऊन अनुभवावी लागते.
