पत्रास कारण की भावनांचं आदान-प्रदान करणारं पत्र, आज अचानक गायब झालं आहे. वैभव पाहिलेलं पत्र, आज अस्तंगत झाल्याचं पाहून फार वाईट वाटतं. किती जणांचे आयुष्य पत्रांनी घडवलं, किती जणांना व्यक्त व्हायला व्यासपीठ मिळालं, माणसाच्या मनातले तरंग एरवी विरून गेले असते; पण पत्रामुळे त्या भावना मनामनांत पोहोचतात. पत्राने व्यक्तिमत्त्व समृद्ध झाली, त्यांना वळण लागले, शिस्त लागली. पत्रातून माणसं घडली, पत्रातून इतिहास घडला, पत्राला समृद्ध वारसा आहे. पत्र म्हणजे आयुष्याची सुंदर ठेव, जपून ठेवावी वाटणारी. जणू अत्तराच्या कुपीतले अत्तर. पत्र म्हणजे पारिजातकाचा सडा. दुसऱ्याच्या अंगणात पडून, त्यांना सुखावणारा तो तो एक मित्र आहे.
पत्रलेखनाचीही आज स्पर्धा ठेवावी लागते, किती दुर्दैवी. ज्या पत्रांनी प्रेम व्हायचं, ज्या पत्रांनी मानवी मनं ताळ्यावर यायची, ज्या पत्रानं भांडणं सोडविली जायची, ज्या पत्रांनी आयुष्यात दीपस्तंभ दाखवला, ती पत्रं कुठं गेली? पंडित नेहरूंनी तुरुंगात राहून, पत्र पाठवून मुलीचे भावनिक पोषण योग्य वयात केल्यामुळे, एक समृद्ध व्यक्तिमत्त्व उदयास आलं.
संवादाचं उत्कृष्ट माध्यम म्हणून पत्राकडं पाहिलं जातं. काही ठिकाणी मित्रच हवे असतात, काही ठिकाणी पत्रंच हवी असतात. मित्राची जागा कोणी घेऊ शकत नाही, तसं पत्राची ही जागा कोणीच घेऊ शकणार नाही. लिहायचा कंटाळा म्हणून आज पत्रलेखन त्या प्रमाणात होत नाही.
आज भावनेपेक्षा कर्तव्यश्रेष्ठच्या नादात भावनेला केव्हाच तिलांजली दिली गेली आहे. पत्र म्हणजे भावनांना टिपणारा टीपकागद होता. टीपकागदच नसल्यामुळे भावनांचं साचलेपण मनाला त्रासदायक ठरत आहे. व्यक्त व्हायला माध्यमांची कमतरता नाही, तरीही पत्र हवंच. पत्रलेखनाचे कष्ट आज राहिलेच नाहीत. सुबक अक्षर, वळणदार अक्षर, नीटनेटके अक्षर, मोत्यासारखे अक्षर आज राहिलंच नाही. मोबाईलवर बोटं चालवली की मिनिटांत पत्र तयार होतात आणि मिनिटांत जातंसुद्धा. पत्र पोहोचवणारी कबुतरं आज राहिली नाहीत. पोस्टमन दुर्मिळ झाले आहेत. मुलांना पोस्टमन ही संकल्पनाच नाही. कधीतरी पत्रं घेऊन पोस्टमन येतो. सगळा व्यवहार मेलने होतो. पत्र नसताना जी घालमेल होते ती मानवी मनाला त्रासदायक ठरते. पत्र आहे म्हणून जीवनात सुसूत्रता आहे. समोरासमोर माणसं एकमेकांशी बोलू शकत नाहीत; पण पत्रांनी ती जास्त चांगल्या प्रकारे व्यक्त होतात.
माणसांचे मन व्यक्त व्हायला जागा नसेल तर मन सुन्न होतं. माणसे जोडली जातात, तशी तोडलीही जातात. पत्रांनी इतिहास घडवला आहे. मानवी मनाला पत्रांमुळे जगण्याची उमेद येते. प्रेमाच्या शिखराकडे जाण्यासाठी पत्रं ही पहिली पायरी आहे. पत्रातून जीवनाचे अर्थ शोधायचे असतात. सौंदर्य शोधायचे असते. शब्दांच्यापलीकडे असलेल्या भावना कळायला हव्यात म्हणून पत्र हवेच.
पत्राला मानवानेच निर्माण केले आणि मानवच पत्राला गतवैभव मिळवून देऊ शकतो. पत्र पुन्हा मानवी जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी हवं आहे. फक्त रूक्ष व्यवहारासाठी पत्र आज शिल्लक आहे.
परीक्षेतही आता पत्रलेखन विचारलं जात नाही. पत्रलेखन करायला मुळात नातीच शिल्लक नाहीत. कुणाला पत्र लिहायचे. काका, मामा, मावशी, आत्या, मावसबहीण, चुलत बहीण हे सगळे इतिहासजमा झालेत.
मुलांना नाती समजावून सांगावी लागतात, की ही तुझी आत्या, हे मामा, कधीतरी येणारे नातेवाईक मुलांच्या स्मरणात राहातच नाहीत. कारण स्मरणात राहायला सहवास आवश्यक असतो. तो सहवास कुटुंबातून हरवला आहे. आई-वडिलांच्या सहवासातसुद्धा मुलं राहात नाहीत. सहवास नाही म्हणजे प्रेम नाही आणि प्रेम नाही म्हणून पत्र नाही.
यंत्राने माणसाची बोलतीच बंद केली आहे. पत्र नाही, मित्र नाही अशा वातावरणात आजची पिढी वाढत आहे. पत्र ही दिवाळी अंकात वाचायची गोष्ट ठरली आहे. माणसांना पत्र लिहायला उद्युक्त होईल, अशी परिस्थिती हवी. पत्र हसवण्यासाठी, रडवण्यासाठी, मनाला फुंकर घालण्यासाठी आवश्यकच आहे.
अब्राहम लिंकनने पत्र लिहिले, त्याच्यानंतर फार काळ कुणी कुणाला विशेष पत्र लिहिलं नाही. मानवी भावना जिवंत करण्यासाठी पत्रातून घडावे सारे, पत्रांच्याही पलीकडले. पत्राची वाट पाहाणं नाही. पोस्टमन येणं नाही. वाट पाहाणं ही बरदार स व पु संकल्पनाच आता गेली. मनाच्या डोहात आजकाल तरंग उठत नाहीत, हीच आजची शोकांतिका आहे. पत्राने परत यावे सोशल मीडियावर. अनेकजण पत्राची वाट पाहात आहेत. अनेक कॉमेंट्स पत्राची वाट पाहात आहेत. पत्र आल्यास लोक वेडावून सोडतील, कधी नव्हे ते प्रेम व्यक्त करतील पत्रावर अक्षरशः स्तुतीचा वर्षाव करतील. लोकांची सवय मोडणे पत्राच्या हातात आहे, तेव्हा पत्राने परत यावे.
लाईकसाठीसुद्धा ईमोजीची रांगच्या रांग तयार आहे. कॉमेंटचा फॉरमॅट ठरलेला आहे. विचार न करता सगळं आजकाल हे करता येते. माणसे जेव्हा पत्र लिहितात, तेव्हा ती स्वतःची अशी राहात नाहीत. ईमोजीच्या जमान्यात आज पत्र लिहिणं म्हणजे भावनेचा उत्तुंग आविष्कार, तसंच पत्र ही आज मन मोकळं करण्याची जागा झाली आहे.
पत्राने अनेकांना लिहितं केलं, वाचत केलं. चर्चा करायला शिकवलं, याचं श्रेय पत्रा तुलाच आहे. जाणिवेतून नेणिवेत शिस्तबद्ध प्रवास तूच घडविला. आशयघन ते आनंदघन हा लिखाणाचा प्रवास अनेकांना सुखावून जातो. स्त्री-पुरुष नात्यातील पदर उलगडून दाखवण्यात तुझा हातखंडा आहे.
वर्ष संपले, स्वप्न संपले, आशा संपल्या. नवीन वर्ष, नवी उमेद, नवी स्वप्नं, नव्या आशा, फिनिक्स पक्षी जसा राखेतून उभा राहातो तसं मागील वर्षाच्या सुख-दुःखाचा जास्त विचार न करता पुढील वर्षी आपण कसे अधिक सक्षम होऊ, याचा विचार व्हायला हवा. मागील वर्ष जाणिवेचे होते, नवीन वर्ष नेणिवेचे असणार आहे.
खूप काही करायचं आहे, खूप काही जगायचं आहे. प्रत्येकास ध्येय असलं पाहिजे. मागील वर्षांनी प्रतिसाद दिला नाही. नवीन वर्षाला साद घालून प्रयत्न करणं अजून आपल्या हातात आहे. ढळलेली कोणतीही गोष्ट संध्याछाया याची जाणीव करून देते, पण उद्याचा दिवस माझाही असू शकतो, या आशेने जगायचं. मागील वर्षातील सुखाची घडी, जीवनात ही घडी अशीच राहू दे म्हणलं तरी ती राहात नाही. परीट घडी मोडते, पुन्हा नवीन परीट घडी, हेच आयुष्य आहे. मळलेले कपडे स्वच्छ धुणे, पुन्हा परीट घडी, हे अव्याहत चालू ठेवायलाच हवं. चेहरे आणि मुखवटे ओळखूनच जगता यायला हवे. शूद्र विचारांची माणसे खड्यासारखी दूर करता यायला हवीत. निराशेच्या चिखलाचे भवताल असूनही, कमळासारखं उमलावं लागणार आहे.
नवीन वर्षात ग्रहणही असणार आहे व इंद्रधनुष्यही असणार आहे. शब्दांच्यापलीकडे जा, नक्षत्रांचे देणे आपली वाट पाहातेय.
आज माणसं एकमेकांकडे जात नाहीत. तिळगुळ खाऊनही गोड बोलत नाहीत. पत्रच माणसांना जवळ आणू शकतं. पत्राने माणसांना विरंगुळा मिळाला, सुख मिळालं, त्याबद्दल अभिनंदन. असंच ‘पंख होती तो उड आती रे’ याची जाणीव तू करून देतोस.
