बरं झालं, अब्राहम लिंकन तुम्ही मुख्याध्यापकाला पुन्हा पत्र लिहिलं नाही. कारण पत्र संस्कृती आता राहिलीच नाही.
तुमचं पत्र केव्हाच खुंटीला टांगलंय. पण तुम्ही जसं मुलाला घडवायला सांगितलंय तसं परिपत्रकांमुळे शक्यच होत नाही.
शैक्षणिक कामेच इतकी आहेत की, आम्ही शैक्षणिक बाबीकडे लक्ष देऊ शकत नाही. आता परीक्षेतच काही गुणांसाठीच फक्त पत्रलेखन असतं. वाचणं, लिहिणं, चिंतन, मनन बंदच झालंय. माणसं ऑफलाइन नाही तर ऑनलाइनच हल्ली भेटतात. भावनेचा ठेका आता इमोजीनीच घेतला आहे. सुखासाठी, दुःखांसाठी प्रतीकाच्या माध्यमातून आता सांगितलं जातं. न वाचताही आवडलं म्हणता येतं.
आवडलं तरीही वाचलंच नाही ही सोय आहे.
या परिस्थितीत मुलाला खरे बोलायला कसे शिकवणार? अदृश्य शक्तीने शिक्षणाची लाइनच बदलली आहे, जीवनशैलीही बदलली आहे. विद्यार्थ्यांच्या परिपाठ, वर्गपाठ, गृहपाठ, मूल्यमापन या बाबी दुर्लक्षिल्या चालल्या आहेतच. मुलांना गोष्टी सांगणारे आजी-आजोबा आता जवळजवळ नाहीतच. संवाद आज संपल्यासारखेच आहेत. तुम्ही मुलाला जे शिकवायला सांगितलं, खरं तर तोच खरा अभ्यासक्रम, तेच खरं नवीन शैक्षणिक धोरण होय.
आज हक्क एकाचा, शिक्षण मात्र दुसऱ्याला मिळत आहे. शिक्षणहक्क नसलेले गरीब दाखवले जात आहेत. खरे लाभार्थी दूरच आहेत. सगळी दुःखं शैक्षणिक दलालांनी वाढवली आहेत. प्रवेशापासून ते परीक्षेपर्यंत दलाल आहेत. संदर्भ बदलत असतात हे तुम्ही विचारात घेतलं का? ज्ञानापेक्षा, टक्केवारी बहरते आहे.
पैसा असेल तर पैसा फेका आणि पैसा कमवा, अशी व्यवस्था या क्षेत्रात आहे.
न्यायप्रिय आणि सत्यनिष्ठ उदाहरणादाखलसुद्धा अवतीभवती पुतळ्याशिवाय दिसू नयेत, हेही मुलाला समजले आहे.
प्रचंड संख्येमुळे सगळ्या गोष्टी शाळेत शिकविता येत नाहीत. विजयाचा आनंद मुलं संयमानं घेत नाहीत. कोचिंग क्लासला श्रेय देतात, त्यांच्या जाहिरातींचं साधन बनतात. यशाची खात्री होती म्हणतात, कारण पेपर काढणाऱ्याची क्षमता त्याला माहीत आहे. पेपर तपासण्याच्या पद्धती, त्यांचा प्रामाणिकपणा त्याला माहीत आहे.
हार स्वीकारण्यास मुले तयार नाहीत. येनकेन प्रकाराने परीक्षेतील यशाचा हार त्यांना हवा आहे, त्यासाठी अशैक्षणिक गोष्टी ते करतील. संस्कारासाठी शाळेत टाकलेल्या मुलासमोर अभ्यासक्रमासाठीचे सोपस्कार होत आहेत. मुलं, प्रचंड टक्केवारी घेऊन बाहेर पडत आहेत.
तुम्ही म्हणाला होता, ‘जमेल तेवढं दाखवीत चला त्याला ग्रंथभांडार. मुले वाचतील असे काही तरी करा. मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा, सृष्टीचे शाश्वत सौंदर्य अनुभवायला, दिसू देत त्याला पक्ष्यांची आस्मान भरारी, सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर आणि हिरवेगार डोंगर’. पण त्यांच्या मनाला निवांतपणा आता मिळतच नाही. कोचिंग क्लास, दूरदर्शन यामुळे त्याचा उरलासुरला निवांतपणा राहात नाही. सृष्टीचे सौंदर्य, पक्ष्याची भरारी या कवितेतून आस्वाद घ्यायच्यासुद्धा गोष्टी राहिल्या नाही आहेत. वर्गात कविता शिकवली जाते, पण आस्वादली जातेच असे नाही. हिरवे हिरवे गार गालिचे त्याला डेस्कवर बसून, कॉम्प्युटरमध्येच पाहावे लागत आहे. परीक्षा पद्धतीने तो चूक ठरला आहे, त्याने कसा शिक्षणावर विश्वास ठेवावा. सामान्यही गुणवत्ता यादीत आणली जात आहेत. शाळेतले संस्कार करणं शिक्षकाची जबाबदारी आहे, पण संस्कार का केले नाही, का झाले नाही ते कोणीही शिक्षणाधिकारी विचारणार नाही. गुणवंतांचा सत्कार टक्केवारीनुसार होणारच? तो गुणवत्ता यादीत कसा आला याचा विचार न करता, सत्कार करणारे करतात. कारण त्यांना मिरवायचं असतं. विद्यार्थी म्हणतो, पहिला किंवा गुणवत्ता यादीत येईल असे वाटलेच नव्हते. कारण पालकांचे प्रयत्न त्याला माहीत नसतात.
तुम्ही म्हणाला होतात, ‘त्याला सांगा, त्यानं भल्यांशी भलेपणानं वागावं आणि टग्यांना अद्दल घडवावी. माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पाहा, जिकडे-तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊगर्दीत सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायला हवी’. पण समूह संपर्क साधना पुढे त्याची ताकद कमी पडत आहे.
तंत्रज्ञानाची सरशी झाली आहे. याच्यापुढे तो निष्क्रिय झाला आहे. अशैक्षणिक गोष्टीची सरशी होत आहे. आजच्या मुख्याध्यापकांची ओळख प्रत्येक मुलांशी असू शकत नाही. ओळख नाही म्हणून, संवाद नाही म्हणून आंतरक्रिया नाही. विनाअनुदानचे घोटाळे, परीक्षेतील घोटाळे, शैक्षणिक प्रश्नांची जाण त्याला शिकतानाच होत आहे. राजकारणापुढे शिक्षणाची कवचकुंडले तग धरेनाशी झाली आहेत. पण आजही काही यशोगाथा शिक्षण क्षेत्रात घडत आहेत.
एकदम निराशा नाही; पण तुमच्यासारख्यांनी अधूनमधून पत्र लिहिलं, तर ते अनेक पिढ्यांना प्रेरणा देण्याचं काम करतं. कारण पत्रांनीच मरगळलेल्या मनाला व समाजाला उभारी देण्याचं काम यापूर्वी केलं आहे. म्हणून अधूनमधून लिहीत चला.
