पक्षी निरीक्षणाचा कोलाज

मुलांनी त्यांच्या भागातील पक्ष्यांविषयी लिहिले, त्यांची पक्ष्यांविषयीची निरीक्षणे संशोधनातून मांडलेल्या पक्षीपुस्तकापेक्षा कमी नाहीत. या प्रकल्पादरम्यानची प्रक्रिया, निरीक्षणे हे सगळं मुला-मुलींनी त्यांच्या भाषेत, शैलीत लिहिले आहे. तेच ‘पाखरां’ नावाच्या पुस्तकात छापले आहे. त्या पक्षी प्रकल्पादरम्यान पक्ष्यांची केवळ माहिती नाही तर त्यापलीकडे जाऊन तर्कसंगती, अंदाज लावता येणे, खोलात निरीक्षणे करता येणे, सहसंबंध ओळखता येणे या आकलन टप्प्यांवरही काम झाले आहे. पुस्तकातील अनोळखी माहिती वाचणाऱ्या मुलांनी स्वत:च माहितीचा स्रोत ‘पाखरां’ आणि कॅलेंडर यांच्या निमित्ताने तयार केला आहे.त्यांच्यासाठी ते समृद्ध शैक्षणिक अनुभव ठरले आहेत.



निसर्गाच्या निरीक्षणातून अवतरलेलं पुस्तक…

जव्हारच्या जिल्हा परिषद शाळांतील मुले-मुली जंगलाबरोबरही वाढतात, त्यांना जंगलाची भाषा कळते. त्यांना बाफळी, लोत, सरंबल या आणि अशा अनेक भाज्या त्यांच्या जंगलात कोठे सापडतात, त्या कशा शिजवायच्या हे माहीत. कोठला पक्षी एका वेळेस किती अंडी देतो-घरटे कसे बांधतो, भारद्वाज फार उंच कसा उडत नाही-डोंगराच्या टिगीला राहातो, हारूड पक्षी कसा उपडा पडून मरतो, नदीतील मासे, खेकडे हे सगळं त्यांना कोणीही पुस्तकातून शिकवलेले नाही. तो त्यांच्या दिवसाचा अविभाज्य भाग असतो, ‘वयम्’तर्फे एक प्रयोग केला गेला. त्यांच्या रोजच्या आयुष्यातील विषय काढले- गप्पा-गप्पांत छोटे-मोठे अनुभव कागदावर उतरवले. गावात लग्न असते तेव्हा ते काय काय करतात, बाहेरगावी बोचकी बांधून जेव्हा कामासाठी चार पैसे कमावण्यास जातात तेव्हा तेथे कंत्राटदाराबरोबर काय भानगडी होतात, खेळताना काय भांडणे होतात, जंगलात शेवळा गवसायला जाताना सापच कसा पाठी लागतो आणि पाहाता पाहाता, पंचवीस शाळांमधील चारशे मुला-मुलींनी त्यांचे अनुभव, सण यांविषयी, भाज्या-खेळ- त्यांच्या प्रक्रिया याविषयी लिहिले.

मुलांना ते विषय ओळखीचे असले तरी त्यांचे अनुभव मांडणे, हे ते नव्यानेच करत होते. त्यातील जागा शोधत होते. त्यांच्या गोष्टींत गावातील लग्नामधील पात्रांविषयी तपशील होते, काही ठिकाणी खेकडे पकडण्याच्या प्रक्रियेविषयी सविस्तर लिहिले होते, पक्ष्यांच्या शिकारीचे अनुभव होते. पोहताना पाण्यात डुंबताना केलेल्या मज्जा होत्या, त्या नुसत्या घटना नव्हत्या; तर ती मुले त्यांच्या लेखनात कितीतरी मजेचे, भीतीचे, रागाचे क्षण पकडू शकली होती. सगळ्यांनाच त्यांचे अनुभव लेखनात पकडता आले असे नाही, त्यांतील काहींनी ते तोंडी सांगितले. त्यावर गप्पा मारल्या. शब्दांत कसे मांडता येईल याचाही प्रयत्न केला.

त्यांच्याकडे सांगण्यासारखे होते, आहेच. पण त्यांचे विषय पुस्तकात सापडत नाहीत, वयाने मोठे होण्याच्या भानगडीत ते तसेच विरून जाते. त्या सगळ्या गोष्टी कॅलेंडरच्या माध्यमातून छापल्या. त्या गोष्टी वाचलेले अनेक स्तिमित झाले. त्यांना खेडेगावात राहाणाऱ्यांचे दुर्गम-अडचणींचे-अभावाचे जग माहीत होते; पण मुलांच्या आनंदाच्या जागा मात्र मुलांनीच त्यांच्यापर्यंत थेट पोचवल्या होत्या.
कोठला पक्षी घरटे कसे बनवतो, अंडी एका वेळी किती घालतो, उन्हाळ्यात, पावसाळ्यात की हिवाळ्यात दिसतो? शेगटाच्या झाडावर की हेदीच्या झाडावर दिसतो असे सगळे त्या मुलांना पाठ असते. रंगाने सारखा असला तरी एका खुणेने वेगळा पक्षी आहे हे ओळखणारी त्यांची ही त्यांची नजर थक्क करणारी होती. घरट्यांची वर्णने तर अशी करतात की, पक्षी आणि घरटे जसेच्या तसे डोळ्यांसमोर उभे राहात होते. आणि मग कातऱ्याला कातऱ्या का म्हणतात- त्याची नखे कात्रीसारखी कशी असतात, बांडोळा धुराशीच कसा दिसतो, कन्हूर वीस-चोवीस अंडी एका वेळी कसा देतो. अशा सगळ्या तपशिलांवर मुलांबरोबर ‘पक्षीगप्पा’ चांगल्याच रंगतात.

त्यांच्याशी गप्पा मारता मारता त्यांना माहीत असलेल्या पक्ष्यांची यादी काढली; तर अडुसष्ट पक्षी निघाले! पक्षीगोष्टी लिहिताना त्यात पक्ष्यांच्या शिकारीचेही अनुभव होते. मुलांनी त्यांच्या अनुभवलेखनात पक्षी कसा पकडावा, कसा ……खावा याचेही सविस्तर वर्णन केले.

पक्षी आपल्या भागात केव्हा केव्हाच दिसतात, नंतर गायब होतात; असे का बरे होत असावे? आपण खातो त्या पक्ष्यांची घरटी आपल्याकडे दिसतात का? अशा प्रश्नांकडे वळवून अभ्यासातून मते तयार होण्याकडे कल व्हावा. त्यांच्या निरीक्षणांना एका मोठ्या चित्राची जोड देणे, सूक्ष्मरीत्या त्याला अभ्यासणे याकडे वळणे अधिक योग्य ठरेल.

मुलांनी त्यांच्या भागातील पक्ष्यांविषयी लिहिले, त्यांची पक्ष्यांविषयीची निरीक्षणे संशोधनातून मांडलेल्या पक्षीपुस्तकापेक्षा कमी नाहीत. या प्रकल्पादरम्यानची प्रक्रिया, निरीक्षणे हे सगळं मुला-मुलींनी त्यांच्या भाषेत, शैलीत लिहिले आहे. तेच ‘पाखरां’ नावाच्या पुस्तकात छापले आहे. त्या पक्षी प्रकल्पादरम्यान पक्ष्यांची केवळ माहिती नाही तर त्यापलीकडे जाऊन तर्कसंगती, अंदाज लावता येणे, खोलात निरीक्षणे करता येणे, सहसंबंध ओळखता येणे या आकलन टप्प्यांवरही काम झाले आहे. पुस्तकातील अनोळखी माहिती वाचणाऱ्या मुलांनी स्वत:च माहितीचा स्रोत ‘पाखरां’ आणि कॅलेंडर यांच्या निमित्ताने तयार केला आहे.त्यांच्यासाठी ते समृद्ध शैक्षणिक अनुभव ठरले आहेत.

चार भिंतींच्या शाळेत गप्प गप्प बसणाऱ्या मुलामुलींनी लिहिलेले पहिलेवहिले पुस्तक – ‘पाखरां’ आणि त्यांच्याच जगाविषयी त्यांनीच लिहिलेल्या गोष्टींचे पुस्तक केले.

पुस्तक म्हणजे शेवटी निरीक्षणाचा कोलाजच असतो.

Author