क्षितिज पार झाल्यासारखं वाटतं, तसंच आयुष्याचं आहे. “Miles to go before I sleep” ही अवस्था प्रत्येकाची असते. सगळं पार पडल्यावरच यशाचा व समाधानाचा थांबा येतो. यशाच्यामागे धावायचं, का समाधानाच्या थांब्यावर थांबून क्षणभर विश्रांती घ्यायची, हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. सुखाचा शोध घ्यायला प्रत्येक जणाला यशोशिखराकडे जावं वाटतं, पण सुख पायाशी लोळण घेत असतं, हे अनेकांना माहीत नसतं. श्वास घेईपर्यंत अनेक गोष्टी पार पाडायच्या असतात, अनेक कर्तव्यं पार पाडायची असतात. अजून खूप पार पाडायचे आहे.
आयुष्य सुखी, समाधानी पार पडणं हे जीवनाचं अंतिम लक्ष. झालं, एकदाचं पार पडलं, तरीही पुढे बरंच शिल्लक असतं. पार पाडल्याची फक्त जाणीव असते. नेणिवेत पुन्हा असंख्य आव्हाने असतात. पार करणे हे क्षणिक असते, जबाबदारी पार करणंही क्षणिकच असतं. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण अनेक गोष्टी पार पाडत असतो, काही कर्तव्य म्हणून काही प्रेमाने. कधीकधी जाणिवेच्या आधीच, कधी जाणिवेसह कधी जाणिवेनंतर मृत्यू आपलं कर्तव्य पार पाडतो. अनेकांना चाकोरीबद्ध जीवनाची चौकट पार करायची नसते. आपल्या क्षमतेसह वर्तुळातच राहाणं लोक पसंत करतात, पण वर्तुळालाही छेद देऊन, वर्तुळ पार करून, मुक्त आकाशात मनाप्रमाणे झेप घेणारे, स्वतःच्या क्षमतेलाही पार करून, स्वतःहून, स्वतःतून उमलतात.
एव्हरेस्ट शिखर पार केलं म्हणजे सगळं पार पाडलं असं नसतं. पुन्हा पुन्हा शिखर काबीज करणं, नवीन नवीन विक्रम करणं, हेच मानवी मन. झालं, एकदाचं पार पडलं म्हणलं तरीही माणसांना विविध क्षेत्रांत, विविध आघाड्यांवर, विविध पातळीवर, अनेक गोष्टी पार करायच्या असतात.
थांब, माझ्या लेकराला न्हाऊ घालू दे, प्रमाणे हे थांबतच नसतं. पार हे माईलस्टोन आहे. प्रत्येक पार ऊर्जा देतं.
चलो दिलदार चलो, चाँद के उस पार चलो. ‘टुमारो नो प्लीज’ म्हणणाऱ्यांनाही मृत्यूचा पार जवळ करावासा वाटतो. सगळेच निकष पार केल्यानंतर विश्वसुंदरीचा किताब मिळतो; पण कोणत्याही निकषात न बसणारं, निकष पार न करणारं, सौंदर्य अस्तित्वात आहेच ना?
पार ही एक लक्ष्मणरेषा आहे. पूर्वी कार्य पार पडलं की समाधी घेऊन आयुष्याला पूर्णविराम दिला जात असे. आता अखेरच्या श्वासापर्यंत लोकं काही ना काही गोष्टीत, राहिलेल्या अपूर्ण इच्छा पार करण्याच्या प्रयत्नात व स्पर्धेच्या युगात लोकांची पार वाट लागली आहे. यश नैराश्य घेऊन येत असेल तर काय कामाचं? यशाच्यामागे धावण्यांमुळे समाधानाची पार वाट लागली आहे.
काय पार करायचं, किती पार करायचं, कसं पार करायचं, याचं सर्व ताळतंत्र सुटले आहे. अपयशाला पार केले की यशच आहे. यशाला पार केले की समाधान आहेच, असं नाही. काही गोष्टी पार करता येत नाही.
आयुष्याचा प्रत्येक क्षण वेगळ्या रंगात न्हाऊन निघतो. सगळेच क्षण सारखे नसतात. अनेक अडथळे पार करत करत शरीर मृत्यूपाशी थांबतं. मानवी जीवन म्हणजे क्षणांची मालिका तसेच ‘पार’ची मालिका आहे. एक पार पडलं की, दुसरं तयारच असतं. प्रत्येक आव्हान पार पाडणं, यातच जीवनाची इतिकर्तव्यता आहे.
माणसे असहाय्य झाली की प्रभूला विनवणी करतात. ‘प्रभु मेरी बिगडी नैय्या पार करा दे’.
सगळं पार करता येत नाही आयुष्यात काही पार आवाक्याबाहेरचे सगळ्यांना पार करायचंय एकमेकांना पार करताना पार वाट लागली तरी चालेल इतक्या निष्कर्षाप्रत येऊन पोहोचली आहेत माणसे सगळ्यांनाच पार करायचंय आवाक्याबाहेरचं क्षितिज सगळ्यांना पार करायचंय यशोशिखर
नैराश्याच्या नंतरचा कडेलोटही पार करायचा अनेकांना समाधानाच्या थांब्यावर थांबायला कुणालाच वेळ नाही सगळ्यांना जिंकायची आरपारची लढाई सगळ्या गोष्टी पारदर्शक असल्या तरीही स्वतःचा पारदर्शकपणा पार करायला कुणालाच आवडत नाही उत्सुकतेचं दुसरं नाव पार एक पार संपला की दुसरा पार पार एक माईलस्टोन प्रवास पार पाडण्यासाठी एक क्षणभर विश्रांतीचे स्थान जायचे होते चंद्रा पार, पण फक्त ठसेच उमटवले सगळी फुशारकी हे पार पडलं, ते पार पडलं म्हणण्यात गेल
शेवटी काही न काही पार पाडायचं राहातंच कार्डिओग्रामची न संपणारी रेघच करते जीवन-मृत्यूची सीमापार. शरीराच्या पार असतं मन नावाचं गाव. शब्दांच्या पार असतं भावनांचं आकाश जिथं मन मोकळं होतं इंद्रियांना पार केलं की मनावर ताबा मिळवता येतो मनच मनाला मला पार करू शकतं, शरीर नाही मनाला पार करता आलं की सगळे प्रश्न आपोआप सुटतात.
