पूर्वी पत्रलेखनातून मने मोकळी व्हायची, माणसांची समजूत ‘काढली जायची. भावनांचा निचरा व्हायचा. आज पत्र फक्त आठवणीतच राहिली आहेत. असंच एक समजूत काढणारं पत्र सुनिताबाईंनी लिहिलेलं. सुनिताबाई देशपांडे यांचा दिनेश हा भाचा, त्यांच्या अंगाखांद्यावरच वाढला. तो लहान वयापासून बुद्धिमान आणि काही एकलकोंडा स्वभावाचा असल्याचे जाणवत होते. पुढे त्याने गणित या विषयात उच्चशिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला जाण्याचा विचार केला. आजच्या इतकं १९८० पूर्वी अमेरिकेला शिकायला जाणं सर्रास नव्हतं; शिवाय मेडिकल इंजिनियरिंग सोडून गणिताचं शुद्ध शास्त्र शिकण्याचा हट्ट हे त्याचं अनेकांना न समजण्याजोगं होतं, त्यांची समजूत काढणारं, दिनेशच्या निर्णयाला पाठिंबा देणारं सविस्तर पत्र सुनिताबाईंनी आप्पांना पाठवलं. त्यातलं त्यांचं दिनेशवरचं प्रेम आणि एकूण वकिली कसब डोळ्यात भरण्याजोगं आहे.
पत्रात त्या म्हणतात, ‘दिनेशबद्दल तुमच्या मनात काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. वास्तविकं, सगळीच हुशार मुलं मेडिकल, इंजिनियरिंगला जात असताना दिनेशने प्युअर मॅथेमॅटिक्स निवडले. याचा आम्हाला सर्वात जास्त आनंद झाला. मोठ्या पगाराच्या नोकऱ्या, श्रीमंती आणि अधिक सुख या दृष्टीने निवडणूक करता शुद्ध ज्ञानाच्या मार्गाने आपला नातू जातो, याबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल, अशी माझी समजूत होती. श्रीमंत बापाची मुले बहुदा छानछोकी, उधळपट्टी आणि व्वाईट संगत यातच रंगतात. दिनेश काहीसा एककल्ली आहे, पण स्वतःच्या गरजा ल्याने अगदी कमीत कमी ठेवल्या आहेत. उत्तम वाचन आणि अभिजात संगीत यातच त्याला रस आहे, उगाच संडे के संडे असली चिल्लर गाणी त्याला आवडत नाहीत. अगदी लहानपणापासून आम्ही त्याची वाढ कशी होते ते पाहात आलो आहोत. तो फारच रुक्ष होईल, असे वाटल्यामुळे आमच्या भाईने मुद्दाम त्याला पेटी शिकवायला लावली आणि हळूहळू संगीताची गोडी लावली. उत्तम संगीत हे माणसाला अधिक तल्लख आणि सुसंस्कृत करते. संगीतातही त्याने पटकन प्रगती केली. आज त्याला असलेली संगीताची समज इतकी वरच्या दर्जाची आहे की मल्लिकार्जुन मन्सूर, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे असले भारतातील अग्रगण्य संगीतकार त्याला आवर्जून आपल्या गाण्याला बोलावतात ही कमाई केवढी मोठी आहे पाहा. संगीत हे माणसाला सुंदर करते आणि परिपूर्ण करते हाच याचा अर्थ. दिनेशने जो विषय निवडलाय तो गणित हा विषय इतर शास्त्रांचा मूलभूत पाया आहे, त्यात त्याला गती आहे. कदाचित त्यातून त्याच्या हातून फार मोठा शोध लागून जाईलही, कोणी सांगावे? या विषयाचे ज्ञान फार पैसा देणारे नाही हे खरे; पण सर्वांनी पैसा पैसा करत त्याच्याच मागे लागावे का? दिनेशने तुमच्यासारख्या वडीलधाऱ्यांचे ऐकायला हवे होते असे तुम्ही लिहिले ते मात्र गंमतीने असणार. कारण वडीलधाऱ्यांना सर्व समजते आणि वडीलधाऱ्यांचे ऐकण्यातच खरे कल्याण असते असे तुम्ही तर नक्कीच म्हणणार नाही. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, गुरुतुल्य वडीलधाऱ्यांच्या मार्गाने श्रीकृष्ण गेला असता तर त्याला कौरवाच्या पक्षात जावे लागले असते आणि मग धर्मयुद्धही झाले नसते आणि गीतेचे तत्त्वज्ञाने जन्माला आले नसते, तेव्हा वडीलधारी लोक नेहमीच बरोबर असतात असे नव्हे, त्यांच्याही चुका होऊ शकतात, तरी तुम्हाला विनंती करते की, दिनेशच्या बाबतीत तुम्ही मुळीच काळजी करू नका. त्याने गणित आणि संगीत यांचा ध्यास घेणे ही आपल्या घराण्याच्या आणि देशाच्या दृष्टीने ही मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
कालच पुण्यात घडलेली गोष्ट सांगते, शिंपी नावाचा एक साध्या पोलीस ऑफिसरचा मुलगा आहे. अठरा-एकोणीस वर्षांचा. तो मेडिकलच्या पहिल्या परीक्षेतच नापास झाला. कारण तिथे त्याचे लक्षच नव्हते. पण त्याने एक असा शोध लावला आहे की, अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाने त्याला त्यासाठी पीएच.डी. दिली आहे आणि कदाचित नोबेल प्राइजही मिळेल इतका तो शोध श्रेष्ठ आहे. गणिताच्या साहाय्यानेच त्याने हे साध्य केले. कालपरवाच त्याला अमेरिकन डिग्री आली. जरा बऱ्यापैकी बुद्धिमत्तेची मुले थोडाअधिक अभ्यास केला तर डॉक्टर आणि इंजिनियर होऊ शकतात. दिनेशनेही तेच करण्यात फारसे स्वारस्य नाही. त्यांनी केलेली विषयांची निवड त्याच्या बुद्धिमत्तेच्या दृष्टीने अगदीच योग्य आहे, याची खात्री बाळगावी.”
पुढे दिनेशने परदेशात उत्तम यश आणि नावलौकिक मिळवला. गणितात तो थियरम म्हणून फारच उच्चस्थानावर पोहोचला. त्याचा एका सिद्धांत ठाकूर थियरम जातो.
मुलांचं मूलपण दडपलं जाऊ नये, उलट त्यांना शक्य तेवढ्या सोयीसुविधा मिळाव्यात या दृष्टीने सुनिताबाईंनी बालकार्याला पुष्कळ देणग्या दिल्या. शाळा, व्यायामशाळा, प्रयोगशाळा, वाचनालय इत्यादींना देणग्याचा अग्रक्रम दिला.
गोष्टी लादल्याने मुलं आनंदाला पारखी होतात हाच पालकांना संदेश व हीच पालकनीती होय.
