कहाणी

बालपण सुरू होतं ते, एक होता… या कहाणीनेच. आपली कहाणी आपणच घडवायची असते. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. प्रत्येकाच्या जीवनाची एक कहाणी असते. जीवन म्हणजेच कहाणी व जगणं म्हणजेच कहाणी.



बालपण सुरू होतं ते, एक होता… या कहाणीनेच. आपली कहाणी आपणच घडवायची असते. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. प्रत्येकाच्या जीवनाची एक कहाणी असते. जीवन म्हणजेच कहाणी व जगणं म्हणजेच कहाणी.

जीवन म्हणजे जगण्या-मरण्याच्या दरम्यानची कहाणीच होय. प्रत्येक कहाणीला सुरुवात असते तसेच शेवटही असतो. प्रत्येकाची कहाणी केवळ स्वतःचीच नसते. कहाणीत काही पात्रे जन्मजात असतात, तर काही पात्रे अचानक पाहुण्यासारखी टपकतात. आयुष्याच्या विविध टप्प्यांवर आपल्या जीवनाची कहाणी वेगवेगळे वळण घेते. कधी सुखावह तर कधी दुःखावह.

आपल्या जीवनात प्रेम प्रवेश करतं. ते कधी आईचं प्रेम बनून तर कधी प्रेयसीचं प्रेम बनून, कधी नात्याचं, कधी मित्राचं. प्रत्येक नातं एक कहाणी असते.

असामान्यांची कहाणी समोर ठेवून तिचं अनुकरण करणारे अनेक जण आपली कहाणी बनवायला जातात. ‘एक दुजे के लिये’ चित्रपटाची कहाणी पाहून आपल्या जीवनाची कहाणी संपवली.

आदर्शाची फौज तयार व्हायला एका यशस्वी कहाणीची आवश्यकता असते. जिजाऊने कहाणी सांगून शिवबांची कहाणी घडलीय. नेहरूंच्या पत्रांची कहाणी इंदिरा घडवून गेली. मिळालेल्या संचिताची तक्रार न करता वंचितांसाठीच नव्हे तर सगळ्यांसाठी यशाची कहाणी, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची आपल्या डोळ्यासमोर आहे. संघर्षाची कहाणी यशाचीच असते. अब्राहम लिंकनच्या पत्राची कहाणी शिक्षण व्यवस्थेचे डोळे उघडण्यास, आत्मचिंतन करण्यास कारणीभूत ठरली. चिमुरड्या ग्रेटाच्या कहाणीने पर्यावरणवाद्यांचे डोळे उघडले.

सलमाच्या कहाणीने शिक्षणाच्या संघर्षाची कहाणी जगासमोर ठेवली. कहाणी केवळ मनोरंजनार्साठी नसते तर ती माणसे घडविण्यासाठीही असते. अनेकांची कहाणी आपल्यासाठी असते, मापदंड जगण्यासाठी. कहाणीमुळेच आमचं जीवन घडतं. कहाणी मग ती लताची असेल तर आमचं जीवन सुरमयी होऊन जातं. एखाद्या अभिनेत्याची कहाणी फॅशन म्हणून सामान्यांच्या जीवनात रूळते. जीवन सुसह्य होण्यासाठी चांगल्या कहाण्या आवश्यक असतात. सामान्य माणूस कहाणी होऊ शकत नाही; पण असामान्य माणसांची कहाणी तो अनुकरण करू शकतो आणि म्हणूनच अनुयायांची काही कमी नाही.

चळवळ फोफावते ती नेतृत्वाने. यशस्वी माणसाची कहाणी एक दीपस्तंभ असते. सामान्य माणसांना जगण्याचं प्रयोजन नसतं तेव्हा दीपस्तंभच त्यांना मार्गक्रमण करण्यास प्रवृत्त करतो.

नैराश्याच्या गर्तेत गेलेल्यांसाठी एखादी कहाणीच त्यांना तारते. एखादी कहाणी यशाची असते, एखादी कहाणी अपयशाची असते. एखादी कहाणी सुखाची असते. एखादी कहाणी हत्येची असते. एखादी कहाणी आत्महत्येची असते. व्यक्ती तितक्या कहाण्या. अयशस्वी जीवनाची कहाणी यशस्वी करून दाखवणे हीच जीवनाची इतिकर्तव्यता आहे. लहानपणी मनातील अपयश अस्वस्थ करतं; पण तेच अपयश त्यांच्या भविष्याचा धडा ठरतं. पुढच्या आयुष्यात मिळवलेले मोठेपण अपयशाला मारून टाकतं.

अपयश आलेल्या अनेकांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची मोहर त्याच्यावर उमटवून यशाची पायवाट तयार केली आहे. अपयशाची कहाणी ही यशाच्या कहाणीची पहिली पायरी असते. अपयश आलं तरीही मोठ्या माणसांचे चेहरे आठवा, त्यांच्या कहाण्या आठवा, तुमचे उद्याचे भविष्य त्यामध्येच आहे.

यशोगाथेची कहाणी प्रेरणास्थान असते. कहाणीला ट्रिस्ट देण्याची संहिता लिहिण्याची ताकद जर माणसांमध्ये असेल तर अपयशसुद्धा यशामध्ये रूपांतरित होतं. वाल्याचा वाल्मिकी होणं ही कहाणी अपयशाकडून यशाकडे वाटचाल करणारी आहे. अनेकांच्या प्रतिभा आयुष्याच्या उत्तरार्धातच फुलल्या आहेत.

लता मंगेशकर यांच्या अनुवंशिकतेची कहाणी जरी पुढे चालू राहाणार नसली तरी अनेकांनी त्यांच्यासारखं गाऊन, प्रयत्न करून ती पुढे चालू ठेवलीच आहे. अनेक लता, आशा आहेत, हवाय तो आधार. आयुष्य म्हणजे पाच नाजूक बोटांच्या कौशल्याची कहाणी असते. आयुष्याचा गुलमोहर बनवायचा की निवडुंग हे पाच नाजूक बोटांची कहाणीच ठरवते. इतिहासातल्या कहाण्याच पुन्हा नव्या स्वरूपात आपल्यासमोर येतात. व्यक्तीला व्यक्तिमत्त्व असतं तसं कहाणीला एक व्यक्तिमत्त्व असतं.

व्यक्तिमत्त्वाचा विकास म्हणजेच जीवनाच्या कहाणीचा विकास. मृत्यूनंतर काही कहाण्या अजरामर होतात, तर काही कहाण्या काळाच्या पोटात गडप होतात. प्रत्येक कहाणीचं एक नशीब, एक नियती असते हे मान्य करावे लागेल.

आपली कहाणी दुःखाची असली तरी तिला सुखावह कहाणी करणं आपल्या हातात असतं.

Author