फिनलँडची शिक्षणपद्धती

अगदीच लहान मुलांना पुस्तकांच्यापलीकडचं जग प्रत्यक्ष दाखवायला हवं पुस्तकांच्या पानांपेक्षा झाडावरच्या पानांचे निरीक्षण, फुलांचे निरीक्षण फुलांचा सुगंध याच्या जाणिवेत त्यांना रमू द्या. भवताल ओळखीचे झालं की शिकणं सुलभ होतं. पुस्तकांतल्या रूक्ष शब्दांचा अर्थ निसर्गात शोधता यायला हवा.



अगदीच लहान मुलांना पुस्तकांच्यापलीकडचं जग प्रत्यक्ष दाखवायला हवं पुस्तकांच्या पानांपेक्षा झाडावरच्या पानांचे निरीक्षण, फुलांचे निरीक्षण फुलांचा सुगंध याच्या जाणिवेत त्यांना रमू द्या. भवताल ओळखीचे झालं की शिकणं सुलभ होतं. पुस्तकांतल्या रूक्ष शब्दांचा अर्थ निसर्गात शोधता यायला हवा.

अशाच प्रकारे फिनलंडमध्येही पूर्व प्राथमिक शिक्षणाचा विचार करताना पुस्तकांच्यापलीकडे जे आहे त्याचा परिचय अधिक करून दिला जातो. फिनलँडमध्ये प्री-स्कूलच्या रचनेचा मूळ उद्देशच विद्यार्थ्यांना शाळेसाठी तयार करणे हा असतो. शाळेत जाण्याआधी मुले शाळेत आवश्यक कौशल्यानेयुक्त असावीत, असं अपेक्षित असल्यामुळे काही सवयी मुलांना येथे लावल्या जातात. वयाची सहा वर्षे पूर्ण झालेली मुलं इथे येतात. मुलं शाळेसाठी याच काळात तयार झाली तर नंतरची प्रक्रिया सोपी जाते. इथं कोणत्याही प्रकारचं पुस्तकी शिक्षण न देता खेळामधून त्यांना सामान्यज्ञान दिलं जातं. कारण या वयात मेंदूचा सर्वार्थाने विकास होत असतो.

वर्गामध्ये गटात काम करता येणं ही मुलासाठी महत्त्वाची गोष्ट असते. मुलांनाही सवय लागावी म्हणून या एक वर्षाच्या काळात त्यांना गटात काम करण्यास सांगितले जाते आणि आवश्यक त्या ठिकाणी मदत केली जाते. मुलांना वाचता यावे आणि लिहिण्यासाठी त्यांना उत्सुकता निर्माण व्हावी, या गोष्टीवर येथे काम केले जाते.

शाळेमध्ये व्यवस्थित वागता यावं यासाठी स्वतःची कामं स्वतः करणं, गटात चांगल्या प्रकारे काम करता येणं यासाठी मुलांना तयार केलं जातं. बालकाचा विकास हा शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भाषिक अशा विविध टप्प्यावर होताना दिसून येतो. येथील शाळेच्या शिक्षिका जिम हॉलमध्ये शारीरिक शिक्षणा धडे देत असताना विविध आकाराच्या चकत्यावर जसे की, त्रिकोण, गोल चौकोन विद्यार्थ्यांना उभे करतात त्यातून बालकांना विविध गणितीय आकाराची ओळख होते, त्याचप्रमाणे खेळातून शिक्षण या संकल्पनेद्वारे विविध रंग व त्यांचे ज्ञान हे विद्यार्थ्यांना होताना दिसते. स्वतःच्या नावाचे आद्याक्षर जिथे असेल तिथे उभे राहून पाय ठेवायचा, नातेवाईकांची मित्र-मैत्रिणींची नावे कुठल्या आद्याक्षरापासून सुरू होतात, याची माहिती विद्यार्थ्याला होते त्यामुळे भाषेचा अभ्यासही होतो.
इथे पाठ्यक्रमापेक्षा अभ्यासक्रमाला जास्त महत्त्व दिलं जातं. भाषिक विकास पर्यावरण, निरीक्षण, माझा समाज, कुटुंब, माझी शाळा आणि मी तसेच शारीरिक क्षमतांचा विकास आणि अभिव्यक्ती विकास अशा बाबींचा विचार येथे केला जातो.

मुलांना कोरे कागद आणि खडू इत्यादी रंगसाहित्य देऊन कोणतेही चित्र काढायला रेघोट्या मारायला सांगितलं जातं. मुलं मनसोक्त त्याचा आनंद घेतात. रेषेला वळणच हवं, रंग चित्राच्याबाहेर जाऊ नये इत्यादी बंधन त्याला यावेळी घातली जात नाहीत. चित्रकलेची आवड निर्माण होणे, स्वतः काहीतरी केल्याचा आनंद मुलाला मिळणं, हा त्यामागचा हेतू असतो.

गेली सलग पाच वर्षे फिनलंड हा देश आनंदी देश व सर्वोत्तम शिक्षण पद्धती असलेला देश म्हणून ओळखला जातो. येथील शिक्षणव्यवस्थेचा अभ्यास करून या देशाने शिक्षण पद्धतीत नक्की कोणते बदल केले ज्यामुळे ही पद्धत इतकी यशस्वी झाली, याबद्दलचा अभ्यास श्री. हेरंब कुलकर्णी व शिरीन कुलकर्णी यांनी करून अशा प्रकारच्या सकारात्मक गोष्टींचा अंतर्भाव भारतातील शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर सीसीई (centre for creative education) अंतर्गत भारतातल्या त्यांच्या शाळेत त्यांनी अशाच पुस्तकांच्यापलीकडील उपक्रमांची सुरुवात केली आहे.

एखादी यशोगाथा जेव्हा सार्वत्रिक होते तेव्हाच विकास होतो.

Author