पाठांतराने गुण मिळतात; पण विचार करण्याने व त्यानुसार आचार करण्याने सद्गुण अंगी बाणतात. वेगवेगळ्या कल्पना केल्यानेच नावीन्य जन्म घेते. केवळ पुस्तकं वाचून आयुष्यात यशस्वी होता येत नाही. पुस्तकाच्या पलीकडेही काही वेगळी माणसंही समजून घेण्यासाठी अभ्यासायची असतात.
डॉ. रघुनाथ माशेलकर त्यापैकीच एक होत. पुस्तकातल्यासारखं ते केवळ वागले नाहीत तर त्यांच्यावर पुस्तक लिहिण्यासाखं ते खरोखरच जगले व वागले. पुस्तक शेवटी माणसांचच असतं. माणसांच्या आचार-विचारांचं असतं. माणसांच्या कर्तृत्वाच असतं.
पुस्तकं, माणसं हे शेवटी जगण्याला बळ देतात. माणसांना घडविणारी केवळ पुस्तकं नसतात. माणसांना निसर्ग, परिस्थिती, सभोवतालची माणसं घडवितात. श्यामला जसं श्यामच्या आईनं घडविलं तसंच माशेलकरांना त्यांच्या आईनं घडविलं.
मोठमोठी व्यक्तिमत्त्वं पुस्तकं वाचून घडली पण पुस्तकात अडकली नाहीत. पुस्तकातून त्यांनी आदर्श घेतले व नेतृत्वाने पुस्तकासाठी ते आदर्श बनले. माशेलकरांना लहानपणी तीन सवयी होत्या. एक म्हणजे भरपूर वाचन करायचं, दुसरं म्हणजे भरपूर लिहायचं आणि तिसरं म्हणजे वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धांमधून बोलायचं, यातही ते बक्षीसं मिळवत असत. या वक्तृत्व स्पर्धेसाठी तयारी करताना फक्त शाळेत जे जे काही शिकवतात, तेथे जे प्रश्न असतात त्यासाठी बाहेर जाऊन उत्तरे शोधून तयारी करावी लागते, ते ती करायचे. त्यातही बाकीची मुलं जे काही बोलत नाहीत, ते आपण बोलायचं असं ठरवून, ते शोधून वाचत असत व तयारी करत असत. अशा रीतीने त्यांची जडणघडण झाली ही सर्व तपश्चर्या त्यांना आज उपयोगी पडते. कारण आजही त्याचं भाषण ऐकायला हजारो लोक येत खूप असतात.
वाचनाची कितीही आवड असली तरीही त्यावेळच्या गरिबीमुळे पुस्तक विकत घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसायचे. मोठेपणी डॉ. माशेलकरांनी भारताच्या इनोव्हशन करण्याबाबत आणि सर्व प्रकारच्या पेटंट्सबाबत म्हणजेच स्वामित्व हक्काबाबत प्रचंड कार्य केलं, त्याची बीजं अनोख्या प्रकारे त्या शाळकरी वयात व पुस्तक वाचण्याच्या छंदात दिसतात. अनेक पुस्तके वाचून त्यांनी पुस्तका पलीकडील अनेक गोष्टी जगाला दाखवून दिल्या.
माशेलकरांच्या मते, ‘कल्पनांना जेव्हा धुमारे फुटतात तेव्हा त्यांना मुक्त आकाश हवं. कल्पनांच्या पंखांना पसरायला ना इंधन लागतं, ना त्यांना उडायला कोणत्या दिशेचं बंधन असतं. एखादा कवी सूर्यालाही न दिसणाऱ्या गोष्टी पाहू शकतो, तर मग शास्त्रज्ञ का नाही? ज्या क्षणी शास्त्रज्ञ अशा गोष्टी पाहू लागतो, त्या क्षणी वेगवेगळे शोध लागतात. हाच नवनिर्मितीचा आत्मा आहे. ‘
माशेलकरांच्या मते, प्रत्येकाने डॉक्टर किंवा इंजिनियर झालं पाहिजे, असं अजिबात नाही. इतर अनेक क्षेत्रांत प्रचंड संधी आहेत. जे काम करण्यात तुम्हाला आनंद मिळतो असं कोणतंही क्षेत्र निवडा, मग काम हे काम वाटत नाही. तो आनंदाचा भाग होतो किंवा जे काम कराल त्यामध्ये आनंद शोधता आला पाहिजे.
माशेलकरांनी औद्योगिक, विज्ञान व तंत्रज्ञानाने सामाजिक क्षेत्रात कार्य करून राष्ट्राच्या जडणघडणीत आपले बहुमूल्य योगदान दिले आहे. एखाद्या कामात कितीही यश मिळाले तरी त्यात अजून काय करता आले असते अशी असमाधानाची भावना माशेलकरांच्या मनात सतत असते.
केवळ पुस्तके वाचून समाधान मानू नये, तर पुस्तकाच्या पलीकडे असलेल्या नावीन्याचा, कल्पनेचा शोध घेतल्यानेच सृजन अवतरतं.
