जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
"मालगुडी डेज'सह आपल्या इतर लेखनाने भारतासह जगभरातील वाचकांना भुरळ घालणारे भारतीय लेखक आर.के. नारायण यांचे पुर्ण नाव रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी. त्यांचा जन्म १० ऑक्टोबर १९०६ रोजी झाला.
१९३५ साली नारायण यांनी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी कल्पून स्वामी फ्रेन्ड्स या नावाची आपली पहिली कथामालिका लिहिली. त्यावेळी त्यांचे लिखाण भारतात कोणाच्याही पसंतीस उतरले नाही. या गोष्टी वाचून लेखक ग्रॅहॅम ग्रीन यांना मात्र या कथांमध्ये त्यांचे नवीन मित्र भेटल्यासारखे वाटले. त्यांनी पुढाकार घेऊन नारायण यांची ही कथामालिका छापण्यात रस घेतला आणि हे पुस्तक अतिशय गाजले. त्यानंतर नारायण यांनी एका पाठोपाठ एक सरस गोष्टी लिहून काढल्या. त्यांच्या बऱ्याच कथा मालगुडी नावाच्या गावाभोवती घडतात.
या गोष्टी वाचतांना वाचक त्यात हरवून जातात. हे गाव पूर्णपणे काल्पनिक आहे यावर अनेकांचा विश्वास बसत नाही, इतके वास्तववादी चित्रण नारायण यांनी आपल्या कथांमधून उभे केले आहे. या गावातीलच एक गोष्ट 'दि गाईड' यावर गाईड नावाचा हिंदी चित्रपट निघाला. दि गाईडचे मराठी रूपांतर श्री.ज.जोशी यांनी केले आहे. आर.के.नारायण यांच्या मिस्टर संपत आणि दि फायनान्शियल एक्सपर्ट या पुस्तकांच्या आधारेही चित्रपट निघाले आहेत. शिवाय त्यांच्या मालगुडी डेज वर आधारित १९८० च्या दशकात दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणात ‘मालगुडी डेज्’ ही मालिका प्रसारित झाली होती. त्या मालिकेसाठी नारायण यांचे बंधू प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी काढलेल्या रेखाचित्रांमुळे ती मालिका आणि ते पुस्तक यांच्या लोकप्रियतेत भरच पडली.
मालगुडी या एकाच गावातील विविध व्यक्ती, घटना, परिसर, बदलत्या जगाच्या तिथे उमटणार्याच पाऊलखुणा, त्यातून तिथे बदलत जाणारे विश्व, अगदी लहान मुलापासून ते इंग्रजी साहेबाकडे कारकुनी करणार्याल नव-बूर्ज्वा समाजाचे वेधक चित्रण त्या पुस्तकाने केले. प्रचंड लोकप्रिय झालेल्या या मालिकेचे काही वर्षांपूर्वी ‘मालगुडी डेज् रिटर्न’ या नावाने पुनप्रसारणही करण्यात आले होते. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये तयार करण्यात आलेल्या या मालिकेचे तेव्हा ३९ भाग प्रसारित झाले होते. मालिकेतील ‘स्वामी’ हा लहान मुलगा, त्याचे मित्र आणि त्यांचे भावविश्व मालिकेतून सादर करण्यात आले होते. आर. के. नारायण यांनी लिहिलेल्या काही लघुकथांवर ही मालिका आधारीत होती. साधी लिखाणशैली आणि हलक्या-फुलक्या विनोदामुळे नारायण यांची तुलना प्रसिद्ध रशियनलेखक आंतोन चेखव यांच्याशी केली जात असे. त्यांचे लिखाण जगातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे.
नारायण यांना पद्मभूषण, पद्मविभूषण, साहित्य अकादमी आदी सन्मान मिळाले होते. आर.के.नारायण यांचे १३ मे २००१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट.
May 13, 2017
माने, श्रीकांत
सार्वजनिक क्षेत्रामध्ये उच्च पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये सामाजिक भान आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार यांचे प्रमाण कमी होत चालले असताना आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या आणि प्रामाणिक सेवेच्या जोरावर कर्तृत्वाचा मोठा आलेख निर्माण करणारे वीजमंडळातील अभियंत्यांचे नेते श्रीकांत माने यांचे निधन संवेदनशील मनांना चटका लावून जाणारे आहे.
त्यांच्या निधनाने वीजमंडळातील अभियंत्यांना सन्मानाचे स्थान मिळवून देणारे एक कुशल नेतृत्व केवळ काळाच्या पडद्याआड गेले असे नाही तर भ्रष्टाचाराने पोखरलेल्या राज्य वीज मंडळातील हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार निर्भीडपणे बाहेर काढणाऱ्या एका समर्पित अभियंत्याला देश मुकला आहे. माने हे मूळचे महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवरील संकेश्वरचे. गुलबर्गा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्युत अभियांत्रिकी या शाखेत प्रथम श्रेणीमध्ये पदवी संपादन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य वीजमंडळात १९७६ साली ते कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरीत रुजू झाले. सलग ३० वर्षांच्या कालावधीत त्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता या पदापर्यंत झेप घेतली. या प्रवासात त्यांनी वीजमंडळाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि अभियंत्यांच्या संघटनांसाठी जे योगदान दिले, ते विसरता येणार नाही. ते जेव्हा वीजमंडळाच्या सेवेत दाखल झाले, तेव्हा मंडळाच्या अभियंत्यांचे साध्या सन्मानाच्या वागणुकीपासून ते वेतनश्रेणीपर्यंत अनेक प्रश्न प्रलंबित होते. मंडळातील सबऑर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशन या संघटनेला माने यांचे कुशल नेतृत्व मिळाले आणि मंडळाच्या इतिहासात १९८२ मध्ये न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाचा २७ दिवसांचा संप झाला. कधी भूमिगत राहून तर कधी हजारो अभियंत्यांच्या मोर्चाचे नेतृत्व करीत माने यांनी लढा दिला, त्यामुळेच कदाचित पुढे वीजमंडळातील अभियंत्यांना सन्मानाचे दिवस पाहता आले. माने यांनी वीज मंडळातील सिंगल फेज या अव्यवहार्य प्रकल्पाविरुद्ध दिलेल्या लढय़ामुळे मंडळाला आपले धोरण बदलणे भाग पडले. त्याहीपेक्षा त्यांनी मंडळात खरेदी केल्या जाणाऱ्या कोटय़वधी रुपयांच्या ट्रान्सफॉर्मर्स, कपॅसिटर्स, केबल्स यांच्या दर्जाविषयी जो लढा दिला, त्याचे मोलही नाकारता येणार नाही. निकृष्ट दर्जाची यंत्रसामग्री पुरविणाऱ्या ठेकेदारांनी राज्य वीजमंडळात काही बगलबच्च्यांना हाताशी धरून मंडळाला हजारो कोटी रुपयांचा चुना लावण्याचा धंदा वर्षांनुवर्षे सुरू ठेवला होता, त्याला कुलूप लावण्याचे काम माने यांनी केले. एका ट्रान्सफॉर्मरची चाचणी घेऊन शेकडो निकृष्ट दर्जाचे ट्रान्सफॉर्मर मंडळात दाखल करून घेण्याचे एक मोठे रॅकेटच त्यांनी जिवाची तमा न बाळगता उघडकीस आणले. त्यांनी या प्रकरणातून अंग बाहेर काढावे यासाठी भल्या मोठय़ा कंपन्यांनी कोटय़वधी रुपये कोऱ्या चेकद्वारे त्यांना देऊ केले. पण या नि:स्वार्थी अभियंत्याने त्याला लाथ मारून सर्वसामान्यांशी असणाऱ्या आपल्या निष्ठेला अधिक प्राधान्य दिले. या कार्याबद्दल त्यांच्या गळ्यात राष्ट्रीय सन्मान पडणे आवश्यक होते. तो मिळाला नसला तरी पुढे मंडळाला उपकरणांच्या दर्जानिश्चितीसाठी आपली पद्धत बदलावी लागली, ही मोठी देणगी त्यांनी सर्वसामान्यांना दिली आहे.
August 5, 2017
बेन किंग्जले हे मूळत: भारतीय वंशाचेच आहेत आणि त्याचं मूळ नाव कृष्णा भानजी. त्यांचा जन्म ३१ डिसेंबर १९४३ रोजी झाला. ते मूळचे गुजरातीच. त्याचे वडील गुजराती होते. किंग्जले यांच्या वडीलाचां जन्म केनियात झाला.त्यांचे आजोबा व्यापारी म्हणून जांजीबार स्थायिक झाले. किंग्सले यांचा जन्म जांजीबारचा ते वयाच्या १४ व्या वर्षी आपल्या वडीलाच्या बरोबर इंग्लण्डला गेले. बेन किंग्जले हे गांधी चित्रपटात इतके गांधींच्या भूमिकेत फिट्ट बसले, की आजही हॉलिवुडमध्ये आणि भारतात ‘गांधी’मधील त्या भूमिकेसाठीच ते ओळखले जातात. बेन किंग्जले यांना आपल्या सुरुवातीच्या काळात ‘गांधी’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्या मुळे त्यांनी अभिनयाचे शिखर लवकरच सर केलं.
बेन किंग्जले यांनी साकारलेल्या गांधी या भूमिकेत सर्वाधिक लक्षात राहिले ते डोळे. त्यांनी निर्धार, करुणा, संताप, दु:ख आणि बरीचशी मिश्किली अशा विविध मुद्रा बेननं सहजपणे दाखवल्या. दांडी यात्रेत तरातरा चालणारे ‘सुपरफिट’ गांधीजी, उपोषणांमुळे थकलेले तरीही न खचलेले गांधीजी, त्यांचे भक्तगण बनलेल्या अनेक गोऱ्या मंडळींच्या फिरक्या घेणारे गांधीजी, कस्तुरबांच्या निधनामुळे प्रचंड व्यथित झालेले गांधीजी, फाळणीच्या अपरिहार्यतेपुढे अगतिक झालेले गांधीजी अशा कितीतरी छटा. अॅयटनबरो आणि किंग्जले यांची सर्वात मोठी कामगिरी म्हणावी तर त्यांनी भारताचे राष्ट्रपिता नवीन पिढीसमोर पुन्हा जिवंत केले. बेन किंग्जले यांनी शटर आयलंड, आयर्न मॅन, प्रिंस ऑफ पर्शिया अश्या हॉलीवूड मधील चित्रपटात देखील काम केले आहे. तसेच जंगलबुक मध्ये मोगलीचा मित्र बगिराला याचा आवाज त्यांनी दिला आहे, त्यांनी बॉलीवूड मधील 'तीन पत्ती' 'ताज' या चित्रपटात काम केले आहे.
बेन किंग्जले यांना अकादमी पुरस्कार, बाफ्टा, गोल्डन ग्लोब पुरस्कार व स्क्रीन एक्टर्स गिल्ड अवार्ड्स असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
गांधी चित्रपट
https://www.youtube.com/watch?v=XyWRx_2MFbk
December 31, 2017
बंगाली गायक सुबीर सेन यांचा जन्म १५ मे १९३२ रोजी झाला. हेमंतकुमारसारखा आवाज असलेल्या सुबीर सेन यांना हिंदी चित्रपटांमध्ये फार थोडी गाणी मिळाली आणि तीही शंकर जयकिशन यांच्या मुळे. १९५०च्या काळात हेमंतकुमार फार लोकप्रिय होते. त्यामुळे तशाच आवाजाच्या सुबीर सेन यांना शंकर जयकिशन यांनी ‘आस का पंछी’ चित्रपटात संधी दिली. नायक राजेंद्रकुमार व एनसीसी कॅडेटनी सायकलवरून म्हटलेले सुबीर सेन यांचे गाणे ‘दिल मेरा एक आस का पंछी’ फार लोकप्रिय झाले. ‘विविध भारती’वरही ते खूप गाजले. त्यानंतर शंकर जयकिशनच्याच ‘छोटी बहन’मधील ‘मैं रंगीला प्यार का राही, दूर मेरी मंझिल’ हेही गाणे सुबीर सेनला लोकप्रियता मिळवून गेले. टांग्याच्या टापांच्या तालावर लता मंगेशकर यांच्यासोबतचे हे द्वंद्वगीत लोकप्रिय झाले. ‘कठपुतली’ चित्रपटात ‘मंझिल वही है प्यार की, राही बदल गये’ हे गाणेही लोकप्रिय झाले. ‘दिल लेके जाते हो कहाँ’ हे आणखी एक गाणे!
१९५० ते १९८० या काळात त्याची गाणी बंगालीत खुप गाजली. त्यामानाने त्याला हिंदीत फार थोडी गाणी मिळाली. अतिशय मोजकी पण लक्षात राहणारी गाणी हे सुबीर सेन यांनी हिंदीत गायली. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हेमंतकुमारशी मिळता जुळता त्याचा आवाज. त्यामुळे त्याची वेगळी छाप हिंदी चित्रपट सृष्टीत पडू शकली नाही. हिंदी चित्रपटांत एक काळी गाण्याची अतिशय निकोप अशी स्पर्धा होती. त्यामुळे हेमंत कुमार सारखा आवाज म्हणून असलेल्या सुबीर सेन यांना खुद्द हेमंत कुमार यांनीच आपल्या चित्रपटात गायला लावले होते. सुबीर सेन यांचे २९ डिसेंबर २०१५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
सुबीर सेन यांची गाणी.
https://www.youtube.com/watch?v=nWz3_obPvFQ
May 15, 2018
त्यांचा जन्म १३ एप्रिल १८९० रोजी झाला. दादासाहेब तोरणे यांनी 'श्री पुंडलिक'ची निर्मिती केली तेव्हा त्यांचे वय होते अवघे बावीस वर्षाचे. तोरणे कुटुंबिय मूळचे मालवणनजिकच्या कट्टा गावचे. त्या शेजारच्याच सुकळवाड या छोट्याशा गावात दादासाहेवांचा जन्म झाला. ते तीन वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. कट्टा गावात त्यांच्या कुटुंबियांची थोडीफार जमीन आणि राहते घर होते. घरच्या गरिबीमुळे त्यांच्या शाळेची फी भरणे घरच्यांना शक्य नव्हते. म्हणून लहान वयातच दादासाहेबांनी नशीब काढायला मुंबईचा रस्ता धरला. तेथून ते अच्युत कामत यांच्यासोबत कराचीला गेले आणि त्यांनी एका इलेक्ट्रिशनच्या दुकानात नोकरी पत्करली. तेथे सहा महिने उमेदवारी करून ते मुंबईला आले आणि त्यांना ग्रीव्हज कॉटन या प्रसिध्द कंपनीत नोकरी मिळाली. तेथे बढती मिळाल्यानंतर कंपनीने त्यांची बदली कराचीला केली. काही दिवसातच दादासाहेबांनी बाबूराव पै यांना सोबत घेऊन 'फेमस फिक्चर्स' ही पहिली चित्रपटवितरण संस्था स्थापन केली. 'पाठारे प्रभू ऍमेच्युअर ड्रॅमॅटिक क्लब' या मुंबईतील काही नाट्यरसिक हौशी मंडळींच्या संस्थेने १९०४ साली ऍडव्होकेट कीर्तिकर यांचे 'श्री पुंडलिक' हे नाटक बसविले. पहिल्याच प्रयोगाला १४ वर्षाचे दादासाहेब तोरणे प्रेक्षक म्हणून उपस्थित होते. हा प्रयोग पाहून किशोर वयातील दादासाहेब भारून गेले. त्यांनी नाटक मंडळींकडे आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कीर्तिकरांनी स्वतःची 'श्रीपाद नाटक मंडळी' ही कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या जडणघडणीत तरुण वयातील तोरण्यांनी सक्रीय भाग घेतला आणि आपल्यातील कलागुणांद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 'श्री पुंडलिक'चे काही प्रयोग झाल्यानंतर 'श्रीपाद नाटक मंडळी'ने दुसरे नाटक करण्याचे ठरवले. भारतातील कलारसिकांना १८९६ पासूनच जगाच्या इतर भागातील चलचित्रणाची चाहूल लागली होती. दादासाहेब तोरणे यांच्या डोक्यातही तो विषय दिवसरात्र घोळत होता. 'श्री पुंडलिक' हे आपल्या नाट्यसंस्थेचे हुकमी नाटक चलचित्रित करावे असा ध्यास दादासाहेवांनी घेतला. त्यासाठी ते १९०९ पासून हॉलिवूडशी संपर्कात होते. तेथून त्यांनी चित्रपट तयार करण्याविषयीची तांत्रिक माहिती मिळवली आणि खर्चाचा अंदाजही घेतला. दादासाहेबांच्या आग्रहामुळे त्यांच्याच नाटक मंडळीत सहभागी असलेल्या ऍडव्होकेट नानासाहेब चित्रे यांनी 'बोर्न अँड शेफर्ड' कंपनीच्या मुंबई कार्यालयातून 'विल्यमसन कायनेमॅटोग्राफ' हा मूव्ही कॅमेरा, त्याला लागणारी फिल्म मिळविली. तसेच जॉन्सन नावाचा एक कॅमेरामनही गाठला.
या कॅमेऱ्यात हालचाली टिपता येत असत. परंतु त्यात आवाजाचे रेकॉर्डींग होत नसे. तोपर्यंत आवाजाच्या रेकॉर्डींगचा शोध लागला नव्हता. म्हणून तोरणे, कीर्तिकर आणि कीर्तिकरांचे एक सहकारी नाडकर्णी या तिघांनी मिळून 'श्री पुंडलिक'चे वेगळे संवादविरहित चित्रणसूत्र (शुटींग स्क्रीप्ट) लिहिले. त्यानंतर त्या स्क्रीप्टनुसार आणि दादासाहेवांच्या दिग्दर्शनाखाली कॅमेरामन जॉन्सन आणि टिपणीस यांनी मुंबईच्या गिरगाव भागातील लॅमिंग्टन रोड, त्रिभुवन रोड आणि गिरगाव बॅक रोड या त्यावेळच्या तुरळक वाहतुक असलेल्या परिसरात शुटींग केले. चित्रपटात स्वतः दादासाहेब, टिपणीस आणि जोशी यांनीही भूमिका केल्या होत्या. शुटींग केलेली फिल्म प्रक्रियेसाठी जहाजाने लंडनला पाठविली गेली आणि तिची डेव्हलप केलेली प्रिंट जहाजानेच परत मुंबईला आणली गेली. असा हा मूळ मराठी नाटकावरून वेगळी चित्रणकथा लिहून केलेला पहिला भारतीय चित्रपट 'श्री पुंडलिक', सँडहर्स्ट रोड, गिरगाव येथील 'कॉरोनेशन सिनेमॅटोग्राफ' या नानासाहेब चित्रे आणि पुरुषोत्तम राजाराम टिपणीस अशा मराठी माणसाच्या मालकीच्या सिनेमागृहात १८ मे १९१२ ला रुपेरी पडद्यावर झळकला. हा चित्रपट चांगला दोन आठवडे चालला आणि विशेष म्हणजे 'टाईम्स ऑफ इंडिया'ने त्याची चांगली नोंदही घेतली होती. 'टाईम्स ऑफ इंडिया'चे ते जुने अंक पाहून सुप्रसिध्द सिनेलेखक फिरोझ रंगूनवाला यांनी १९६३ साली या साऱ्या इतिहासाची उजळणी केली होती. मात्र भारत सरकारने तिची दखल घेतली नाही. 'श्री पुंडलिक' चित्रपट निघाला त्या काळात सेन्सॉर बोर्ड अस्तित्वात आले नव्हते. त्यामुळे सेन्सॉरचे सर्टिफिकेट घेण्याचा प्रश्नच नव्हता. कदाचित त्यामुळे भारत सरकारच्या दप्तरी या पहिल्या भारतीय चित्रपटाची नोंद झाली नसावी. रंगूनवाला यांच्यापूर्वी सिनेपत्रकार हनीफ शकूर यांनी १९५३ साली सिनेसाप्ताहिक 'स्क्रीन'साठी खुद्द दादासाहेबांकडूनच एक लेख लिहून घेतला होता. सिनेपत्रकार शशिकांत किणीवर यांनीही 'भारतीय चित्रपटसृष्टीचे आद्य प्रवर्तक दादासाहेब तोरणे' हे पुस्तक जानेवारी २००७ मध्ये प्रसिध्द केले आहे. 'श्री पुंडलिक'च्या निर्मितीनंतर दादासाहेबांनी चित्रपट दिग्दर्शनाशिवाय, प्रक्षेपण, चित्रपट निर्मिती कंपनीचे व्यवस्थापन, तंत्रज्ञान, ध्वनिमुद्रण, वितरण व्यवस्था, नव्या स्टुडिओची पध्दतशीर उभारणी असे बहुविध नवे क्षेत्र पूर्णपणे आत्मसात केले. दरम्यान, १९२७ साली हॉलिवूडमध्ये 'जॅझ सिंगर' या पहिल्या बोलपटाची निर्मिती झाली. त्यापासून स्फूर्ती घेत दादासाहेबांनी ध्वनिमुद्रणासाठी आवश्यक असलेली यंत्रसामुग्री पुरविणारी 'मुव्ही कॅमेरा कंपनी' ही स्वतःची कंपनी स्थापन केली आणि हॉलिवूडमधून ऑडिओकेमिक्स हे ध्वनिमुद्रणाचे यंत्र मागवले. त्याचा उपयोग १९३१ साली आर्देशिर इराणी यांच्या 'आलमआरा' या पहिल्या हिंदी तसेच पहिल्या भारतीय बोलपटाच्या निर्मितीसाठी दादासाहेबांच्या तांत्रिक सहाय्याने केला गेला. त्याच वर्षी दादासाहेबांनी 'सरस्वती सिनेटोन' ही स्वतःची चित्रपट निर्मिती संस्था सुरू केली आणि पुढच्याच वर्षी त्यांनी भालजी पेंढारकर यांचे दिग्दर्शन आणि नानासाहेब सरपोतदार यांचे संपादन लाभलेला 'शामसुंदर' हा मराठी तसेच हिंदीतील बोलपट काढला. मराठी 'शामसुंदर' मुंबईच्या 'वेस्ट ऍन्ड' (आताचा 'नाझ') मध्ये सत्तावीस आठवडे चालला. रौप्य महोत्सव साजरा करणारासुध्दा हाच पहिला भारतीय बोलपट! त्यात कृष्णाच्या भूमिकेत बालनट शाहू मोडक आणि राधाच्या भूमिकेत शांता आपटे अशी पात्रयोजना होती. त्याच वर्षी कोल्हापूर येथील 'प्रभात स्टुडिओ'चे 'अयोध्येचा राजा' आणि 'अग्निकंकण' हे दोन्ही बोलपट मराठी व हिंदीतून प्रसारित झाले. दादासाहेबांनी पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, लोककथेवर आधारित अशा पंचवीस चित्रपटांच्या (मूकपट आणि बोलपट) निर्मितीनंतर १९४२ साली स्वतःची चित्रपट निर्मिती थांबविली. ते पुढेही चित्रपटक्षेत्रात आणखी मोलाचे कार्य करू शकले असते. परंतु त्यांनी ज्याला विश्वासाने आपला स्टुडिओ भाड्याने दिला त्या भाडेकरूने खोट्या कागदपत्रावर स्टुडिओ गहाण ठेऊन पाकिस्तानात पलायन केले. या विश्वासघाताचा धक्का जबरदस्त आणि असह्य होता. दादासाहेब तोरणे यांचे निधन १९ जानेवारी १९६० रोजी झाले.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 19, 2017
शॉटगन म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा जन्म ९ डिसेंबर १९४५ रोजी झाला. शत्रुघ्न सिन्हा हे बिहारच्या उच्च शिक्षित कुटुंबातील सदस्य आहेत. चारही बंधूंची नावे राम, भरत, शत्रुघ्न आणि लक्ष्मण अशी आहेत. वडिलांची इच्छा नसतानाही ते पुण्याला आले होते. फिल्म्स & टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटची प्रवेश परीक्षा तो उत्तीर्ण झाला होते. या संस्थेत राजकपूर भेट द्यायला आले होते. भेटीचा कार्यक्रम उरकल्यावर जाताना त्यांनी शत्रूला त्याच्या मित्रांसह मुंबईला शुटींग पाहण्यासाठी बोलवले. ते तिथे जाऊन त्यांना भेटले. जुहूमधील मा.शत्रुघ्न यांच्या बंगल्याचे नावही ‘रामायण’ आहे. त्यांच्या मुलांची नावे लव आणि कुश आहेत.
शत्रुघ्न सिन्हा यांनी १९६९ मध्ये `साजन’ चित्रपटाद्वारे सिनेमासृष्टीत पाऊल ठेवले होते. त्यांनी आतापर्यंत २०० हिंदी चित्रपटांसह बंगाली आणि पंजाबी चित्रपटांतही काम केले आहे. त्यांच्या सिनेमामधील अनेक डॉयलॉग आजही प्रसिद्ध आहेत. कालीचरण, विश्वनाथ, ब्लॅकमेल, दोस्ताना, शान आणि काला पथर हे त्यांची काही नावाजलेले सिनेमे आहेत. चित्रपटात काम केल्यानंतर सध्या ते राजकारणात कार्यरत असून सध्या बिहार तालुक्यात पाटणा साहिब क्षेत्राचे लोकसभेचे खासदार होते. अभिनेता म्हणून लोकप्रिय झालेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी राजकारणातही जगन्मैत्री टिकवण्याचा प्रयत्न केला. पत्रकार भारती प्रधान यांनी सुमारे सात वर्षांपर्यंत विविध शहरांमध्ये शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांशी चर्चा करून शत्रुघ्न सिन्हा यांच्या जीवन, प्रेम आणि करिअरवर ‘एनिथिंग बट खामोश’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. शत्रुघ्न एका चित्रपटात आपल्या भारदस्त आवाजामध्ये ‘खामोश’ म्हणाले होते. तेव्हापासून ते विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जनतेच्या आग्रहाखातर ‘खामोश’ हा डायलॉग म्हणतात.
सिनेस्टार काही प्रमाणात आपल्या प्रयत्नातून आणि काही प्रमाणात चाहत्यांच्या सहकार्याने स्वत:ची प्रतिमा तयार करतो. शत्रुघ्नसारख्या बडबड्या व्यक्तीच्या प्रतिमेसोबत ‘खामोश’ शब्द कसा काय जोडला गेला, हे कुणालाही कळालेले नाही. आपल्या सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात एकमेकांचे घनिष्ठ मित्र राहिलेल्या शत्रुघ्न आणि अमिताभ यांच्यात नंतर कटुता आली. त्यांनी यश जोहर यांचा पहिला चित्रपट ‘दोस्ताना’मध्ये एकत्र काम केले होते.
शत्रुघ्न यांनी रिना रॉयसोबत प्रेमप्र करण गाजले होते, पण लग्न पूनम यांच्यासोबत केले. १९६८ मध्ये पूनम या मिस यंग इंडिया म्हणून निवडली गेल्या होत्या. पूनम यांनी जोधा-अकबर’मध्ये तिने बादशहाच्या आईची भूमिका अत्यंत विश्वासार्हतेने साकारली आहे. शत्रुघ्न यांचा स्वभाव बडबड्या असला, तरी पूनम शांत स्वभावाच्या म्हणून ओळखल्या जातात.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट.
November 1, 2019
मोठाल्या मिशांचे कवी नायगावकर हे घरोघरी हास्याची कारंजी फुलवत असतात.त्यांचा जन्म २९ डिसेंबर १९४७ रोजी वाई येथे झाला. अशोक नायगावकर यांचे लहानपण गरीबीमुळे कष्टात गेले. त्यांची आई जी कामे करत असत त्याला ते मदत करत. आईबरोबर पापड करणे, मसाले कुटणे अशी सर्व कामे अर्थार्जनासाठी केली. याचवेळी प्र. के. अत्रे, लोहिया, दादासाहेब जगताप अशा अनेक लोकांची भाषणे त्यांनी ऐकली. नायगावकरांनी बी.कॉम. पदवीपर्यंत शिक्षण केले. लग्न झाल्यावर नायगावकर हे करंबेळकर वाडी, गावठाण चेंबूर येथे राहत असत. शिक्षणानंतर त्यांनी बँकेत ३१ वर्षे नोकरी केली आणि मग स्वेच्छानिवृत्ती घेतली. ते उत्तम सतार वादकही आहेत. तसेच त्यांचा अध्यात्माकडे ओढ आहे. योगी पुरुष बाबुराव कुळकर्णी हे त्यांचे अध्यात्मिक गुरू आहेत असे मानले जाते.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे ते २०१० पासून सदस्य होते. २०१२ मध्ये दापोली येथे झालेल्या १४ व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मा.अशोक नायगावकर भूषविले होते. या संमेलनात ते म्हणाले होते,'महाराष्ट्रात लेखक घडवण्यासाठी पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे.' उपरोधाच्या माध्यमातून गंभीर समाजचिंतन करणारे कवी अशी त्यांची ओळख आहे. वाचनाने संस्कृती सुधारते, वाचन वाढवा, त्यामुळे तुम्ही समृध्द व्हाल, असे ते म्हणतात. कतार, सिंगापूर, बँकॉक, दुबई, इस्त्रायल, लंडन, न्यूकॅसल, शिकागो, डेट्राईट, लॉसएंजेलिस, बफेलो, पिट्सबर्ग, फिलाडेल्फिया, इत्यादी ठिकाणी महाराष्ट्र मंडळामध्ये कवितेच्या मैफली त्यांनी केल्या आहेत. लोकसत्ता या वृत्तपत्रात गद्य लिखाणही त्यांनी केले आहे. त्यांच्या कविता सत्यकथा या प्रतिष्ठेच्या प्रकाशनात छापून आल्या होत्या. अशोक नायगावकर ह्यांनी प्रेमकविता, ग्रामीण कविता, पर्यावरण जाणीवेच्या कविता, सामाजिक, राजकीय कविता अशा अनेक प्रकारच्या कविता लिहिल्या आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 29, 2017
किराणा घराण्याचे गायक पं. अच्युत केशव अभ्यंकर उर्फ पं. ए के अभ्यंकर जन्म २ जानेवारी १९३७ रोजी श्रीवर्धन तालुक्यातील " दिवेआगर येथे झाला.
अच्युत अभ्यंकर यांनी आकाशवाणी येथे अनेक गाण्याचे कार्यक्रम केले. तसेच पं. अभ्यंकर यांनी देश–विदेशांत असंख्य मैफिली सादर केल्या. आपले गुरु पं. फिरोझ दस्तुर यांचा अनमोल ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहचविण्याच्या कार्यात स्वत:ला झोकून देऊन पं. अभ्यंकर यांनी ठाण्यातील अनेक संगीत संस्थात संगीत विद्यादानाचे अमूल्य काम केले. १९९२ ते १९९५ सालापर्यंत मुंबई विद्यापीठात हिंदुस्थानी संगीत शिक्षक म्हणून कार्यरत होते. पं अभ्यंकर यांना सुरमणी, गायनाचार्य, संगीत ऋषी या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून ठाणे महापालिकेतर्फे २००६ साली ‘ठाणे गौरव पुरस्कारा’ने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
पं अभ्यंकर यांच्या तालमीत ठाण्यातील अनेक नावाजलेले गायक आणि गायिका गायकीचे धडे घेतले. डॉ वरदा गोडबोले, लीला शेलार, विभावरी बांधवकर, मधुवंती दांडेकर, प्रणव पटवर्धन हे यापैकी काही. पं राम मराठे यांच्यासह अच्युत केशव अभ्यंकर यांनी संगीत मंदारमाला या नाटकाच्या काही प्रयोगांमध्ये विशेष भूमिका बजावली होती. पं. अच्युत केशव अभ्यंकर उर्फ पं. ए के अभ्यंकर यांचे ९ एप्रिल २०१८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.मराठी सृष्टी/इंटरनेट
January 2, 2019
…. या पत्रात स्वातंत्र्यवीर सावरकर वाहिनीला लिहितात कि ‘अशीच सर्व फुलें खुडावी’ आणि श्री रामाच्या चरणी (या देशासाठी ) अर्पण व्हावी. इतकी प्रचंड देशभक्ती असलेल्या सावरकरांना मात्र स्वराज्य मिळाल्यानंतर कोणता सन्मान प्राप्त झाला ? त्यांचे कोणते विचार आम्ही आमलात आणले.उलट सावरकरांना “जातीच्या ” भिंतीत चिणून आम्ही त्यांचा दररोज खून करीत आहोत ” आज स्वतःच्या पोळीवर तूप ओतून घेण्यासाठी धडपडणारे “नेते “पाहिल्यावर सावरकर स्वर्गातून म्हणत असतील… ” हेच फळ का मम तपाला “
May 29, 2019
राज कपूर यांचा जन्म १४ डिसेंबर १९२४ रोजी झाला. पेशावरहून मुंबईत वडिल पृथ्वीराज कपूरसोबत आलेल्या राजकपूर यांना पृथ्वीराजनी सल्ला दिला होता, की त्याने करिअरची सुरुवात खालच्या स्तरावरुन करावी, तरच तो वरिष्ट पातळी गाठू शकेल. वडिलांचा हा सल्ला मानत १७ वर्षीय राज कपूर यांनी 'रंजीत मुव्हीकॉम' आणि 'बॉम्बे टॉकीज' फिल्म प्रॉडक्शनमध्ये 'स्पॉट बॉय' म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्याकाळातील नामांकित दिग्दर्शक केदार शर्मा यांच्याकडे ते 'क्लॅप बॉय' म्हणून कामाला सुरुवात लागले. एका शॉटच्यावेळी राज कपूरने क्लॅप इतक्या जोरात मारली की नायक अभिनेत्याच्या दाढीचे केस त्यात अडकले आणि त्याची नकली दाढीच निघाली. यामुळे चिडलेल्या केदार शर्मा यांनी राज कपूरच्या श्रीमुखात लगावली. त्याच दिग्दर्शक केदार शर्मा यांनी पुढे जाऊन निलकमल या सिनेमाचा नायक म्हणून राज कपूरला घेतले.
राज कपूरचे वडिल पृथ्वीरीज हे त्याकाळातील नामवंत रंगकर्मी आणि अभिनेता होते. राज कपूर यांना अभिनयाचा वारसा त्यांच्याकडूनच मिळाला. राज कपूर त्यांच्यासोबत नाटकात काम करीत असत. त्यांच्या अभिनयाची सुरुवात तेथूनच झाली होती. राज कपूर यांचे पूर्ण नाव 'रणबीर राज कपूर' असे होते. 'रणबीर' हे आता त्यांचा नातवाचे म्हणजेच ऋषि - नितू कपूर यांच्या मुलाचे नाव आहे.
राज कपूर लहानपणी पांढरी साडी नेसलेल्या एका स्त्रीवर मोहित झाले होते. त्यानंतर त्यांचे पांढऱ्यासाडीचे आकर्षण कधीच कमी झाले नाही. त्यांनी आपल्या अनेक अभिनेत्रींना (नर्गिस, पद्मिनी, वैजयंतीमाला, झीनत अमान, पद्मिनी कोल्हापुरे, मंदाकिनी) पांढऱ्या साड्या नेसायला भाग पाडले. इतकेच नाही तर त्याच्या घरी पत्नी कृष्णा नेहमी पांढरी साडी नेसायच्या. राज कपूर यांच्या गाजलेल्या सिनेमामध्ये मेरा नाम जोकर', 'श्री ४२०','आवारा', 'बेवफा', 'आशियाना', 'अंर', 'अनहोनी', 'पापी', 'आह', 'धुन', 'बूट पॉलिश' इत्यादीचा समावेश होतो. भारत सरकारने त्यांना १९७१ साली हिंदी सिनेमातील त्यांच्या योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. १९८७ साली त्यांना हिंदी सिनेमातील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता. याशिवाय त्यांना १९६० मध्ये 'अनाडी' आणि १९६२ मध्ये 'जिस देश में गंगा बहती है' या सिनेमांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा 'फिल्म फेय़र' पुरस्कार मिळाला होता. १९६५ मध्ये 'संगम,' १९७० मध्ये 'मेरा नाम जोकर' आणि १९८३ मध्ये 'प्रेम रोग' या सिनेमांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा फिल्म 'फेय़र पुरस्कार' मिळाला होता. भारतीय सिनेमातील राज कपूर यांचे योगदान केवळ त्यांच्यापुरते मर्यादित नाही. त्यांच्या चार पिढ्यांनी हा वारसा कायम राखला आहे. कपूर परिवारात दादासाहेब फाळके पुरस्कार दोनदा आला. राज कपूर यांच्यासह हा पुरस्कार पृथ्वीरीज कपूर यांना १९७२ मध्ये मिळाला होता. त्यांनी ‘बरसात’, ‘आवारा’, ‘श्री ४२०’, ‘संगम’, ‘मेरा नाम जोकर’, ‘बॉबी’, ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘प्रेमरोग’, ‘राम तेरी गंगा मैली’ यांचे दिग्दर्शन केले होते. त्यांना पद्मभूषण पुरस्कार, चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार , फिल्म फेअर या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. मा. राज कपूर यांचे २ जून १९८८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 3, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti