जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
आपल्या या ऑपरेटिंग सिस्टमला तोरवाल्ड्स यांनी फ्रीक्स असे नाव द्यायचे ठरविले होते. हा शब्द इंग्रजी शब्द फ्री (विनामूल्य), फ्रिक (विचित्र) आणि उनिक्स या दुसऱया ऑपरेटिंग सिस्टममधला एक्स हे अक्षर वापरून करण्यात आला होता.
December 28, 2021
राजमाता विजयाराजे शिंदे यांचे चिरंजीव माधवराव शिंदे यांनी राजकारणात प्रवेश करत १९७१ मध्ये गुना लोकसभा मतदारंसघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर १९८४ पर्यंत ते गुनातून खासदार म्हणून निवडून आले.
March 10, 2022
भालचंद्र उर्फ बी. जी. देशमुखांची गणती भारताच्या राजकीय पटलावरील सर्वपरिचीत व अनुभवी व्यक्तिमत्वांमधल्या, रूबाबदार व तडफदार अधिकार्यांमध्ये होते. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये त्यांनी भारतातील राजकीय वळणांची वाटचाल जवळून पाहिली होती, व राजकीयदृष्ट्या ऐतिहासिक असलेल्या एका कालखंडाचे ते प्रत्यक्ष साक्षीदार देखील होते. 1951 मध्ये स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले बी. जी देशमुख हे मुंबई राज्यातील पहिले आय. ए. एस. अधिकारी होते.
August 16, 2011
महाराष्ट्राचे ‘लाडके व्यक्तिमत्त्व’, ‘महाराष्ट्राचे आनंदयात्री’, ‘महाराष्ट्राचे भूषण’, ‘महाराष्ट्राचा अष्टपैलू कलावंत’ असा महाराष्ट्राचा अभिमान असणारे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे.
January 22, 2010
आदित्य ओक हे वादन क्षेत्रातलं एक आघाडीचं नाव. त्यांचा जन्म २० डिसेंबर १९७७ रोजी झाला. हार्मोनिअम, ऑर्गन वादनात यांचा हातखंडा आहे. अनेक सिनेमांचं संगीत संयोजनही त्यांनी केलं आहे. खूप लहान वयात पं. गोविंदराव पटवर्धन या हार्मोनिअम वादन क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तीकडून शिकण्याचं भाग्य ओक यांना लाभलं. आदित्य ओक यांचे वडिल डॉ. विद्याधर ओक गोविंदरावांकडे शिकायचे. त्यांना शिकवायला दर शुक्रवारी ते घरी यायचे. वयाच्या दहाव्या वर्षांपासून पुढे आठ वर्षं आदित्य ओक यांना गोविंदरावांकडे प्रत्यक्ष शिकण्याची संधी मिळाली. पं. गोविंदराव पटवर्धन शिकवणीबद्दल आदित्य ओक म्हणतात,''बाबांच्या इच्छेमुळे मी पेटी शिकायला लागलो. वादनाच्या क्षेत्रातलं गुरुजींचं ज्ञान, त्यांची शैली, त्यांचा आवाका संपूर्ण जगाला माहितीये.
पण शिक्षक म्हणूनही तितकेच श्रेष्ठ होते. त्यांनी मला शाळेत शिकवतात तसं पुस्तकी पध्दतीने कधी शिकवलंच नाही. ते स्वतः एखादी सुरावट पेटीवर वाजवून दाखवायचे. नाही समजली तर पुन्हा पुन्हा आपल्याला समजेपर्यंत वाजवून दाखवायचे. ती विशिष्ट सुरावटीची जागा त्यांच्यासारखी येईपर्यंत आपण वाजवायची. यामुळे एखादी जागा वाजवून बघायची सवय आपोआप लागली. पुन्हा पुन्हा वाजवायचा कधीतरी फारच कंटाळा यायचा, तेव्हा ते म्हणायचे - ''येईपर्यंत वाजव, म्हणजे कंटाळा निघून जाईल.'' यामुळे न कंटाळता रियाज करायची मला सवय लागली. माझं शिकण्यातलं कुतूहल कायम टिकून राहण्यात या सवयीचा भाग मोठा होता. एखादी सुरावट येईपर्यंत मला तिच्याविषयी कुतूहल वाटत राहायचं.
बऱ्याचदा रात्री उशिरा ते संगीत नाटकाचा प्रयोग संपवून यायचे आणि त्यानंतर मला शिकवायचे. कधीकधी इतका उशीर व्हायचा की मला झोप अनावर होत असे. मी झोपायला जायचो तेव्हा त्याचं वादन सुरू असायचं. अपरात्री कधीतरी मला जाग यायची, तेव्हाही ते वाजवतच असायचे. त्यांना निद्रानाशाचा विकार होता. पण झोप येत नाही किंवा दमलोय म्हणून त्यांना नुसतंच रिकामं बसलेलं कधी पाहिल्याचं आठवत नाही. जेव्हा जेव्हा मला कंटाळा येतो, तेव्हा गुरुजींचं हेच रूप मी डोळयासमोर आणतो.''
काही व्यक्तींनी हार्मोनिअमच्या क्षेत्रात स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलंआणि त्या व्यक्तींचंच पुढे घराण तयार झालं, अशांपैकीच एक म्हणजे पं. गोविंदराव पटवर्धन आणि त्यांचे तिसऱ्या पिढीतले आपण वारसदार आहोत याचा अत्यंत अभिमान असल्याचं आदित्य ओक सांगतात. ''आपली शैली येणाऱ्या प्रत्येक पिढीकडे संक्रमित होत जाण्यातूनच पुढे घराणे तयार होतं. माझे बाबा डॉ. विद्याधर ओक, मी आणि आता माझी पुढची पिढी गोविंदराव पटवर्धन नावाच्या एका घराण्याचा वारसा पुढे नेत आहोत.''
आदित्य ओक यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदवला आहे, तसंच अनेक चित्रपटांचं संयोजनही केलं आहे. 'बालगंधर्व'सारख्या चित्रपटाचं संगीत संयोजन केले आहे. हार्मोनिअम हे या वाद्याचे मूळ नाव असले तरी भारतात बाजा आणि महाराष्ट्रात पेटी या नावाने ते ओळखले जाते. या वाद्यांची जन्मकथा आदित्य ओक 'जादूची पेटी हा कार्यक्रम अतिशय रंजक पणे सादर करतात.
आज अनेक विद्यार्थी आदित्य यांच्याकडे शिकायला येतात.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 20, 2017
ग्वाल्हेर घराण्याच्या नामवंत गायिका वसुंधरा कोमकली यांची कन्या आणि शिष्या असे दुहेरी नाते असलेल्या आजच्या आघाडीच्या गायिका कलापिनी कोमकली यांनी आपल्या आई बद्दल व्यक्त केलेल्या या भावना..
आई आणि गुरू ही दोन्ही नाती माझ्यासाठी वसुंधरा कोमकली या व्यक्तिमत्त्वामध्ये सामावली गेली होती. जसे एका आईसाठी तिचे बाळ हे सर्वेसर्वा असते, तशीच त्या बाळासाठीही आई हीच सर्वेसर्वा असते. माझे वडील पं. कुमार गंधर्व हे आकाशाएवढे मोठे असले, तरी त्यांना आणि आम्हा मुलांना बांधून ठेवणारी वसुंधरा ही भूमी असते. माझ्यासारखे पोर आकाशात जेव्हा चिमणी होऊन उडण्याचा प्रयत्न करते किंवा घार होऊन विहंग करण्याची मनीषा बाळगते, त्या आकाशाची वैचारिकदृष्टय़ा लांबी-रुंदी जाणण्याचा प्रयत्न करते, तेव्हा शेवटी भूमीवरच येऊन विसावते. वसुंधरा कोमकली ही माझी आई सदैव माझ्यासाठी वसुंधरा या नावाप्रमाणेच भूमी राहिली आहे. त्यामुळे तिचे महत्त्व शब्दातीत आहे. जशी ती माझी जन्मदात्री आई तशी माझ्या सांगीतिक वाटचालीमध्ये मार्गदर्शन करणारी गुरूही. त्यामुळेच तिच्याशी माझे नाते हे महत्त्वाचे आणि वेगळी उंची गाठलेले होते.
संगीत क्षेत्रात मी जी काही आहे किंवा माझी ओळख आहे ती केवळ आईमुळेच आहे. माझे स्वत:चे उभे राहणे हे केवळ वसुंधरा कोमकली यांच्यामुळेच आहे. अगदी व्यक्तिगत पातळीवर सांगायचे, तर कुमारजी गेल्यानंतर वसुंधराताई ज्या खंबीरपणे उभ्या राहिल्या त्यामुळेच मी उभी राहू शकले आणि कलाकार म्हणून घडू शकले हे वास्तव आहे. वसुंधराताईने कोलकाता येथे पतियाळा घराण्याच्या गायकीचे शिक्षण घेतले. ती मुंबईला प्रो. बी. आर. देवधर यांच्याकडे ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे शिक्षण घेण्यासाठी आली. तेथे तिचा पं. कुमार गंधर्व यांच्याशी परिचय झाला. देवधरसरांच्या तालमीमुळे ती उत्तम गायिका झाली. पण, बाबांच्या संगीताने ती भारावली गेली. कुमारजींशी विवाह झाल्यानंतर १९६२ मध्ये देवास येथे घरी पहिले पाऊल ठेवले आणि त्यानंतर कुमारजींशी सर्वस्वी एकरूप झाली. नव्हे स्वत:ला विसरून ती कुमारजींशी समरस झाली. आधीचे संगीत शिक्षण बाजूला ठेवत तिच्या गायकीमध्ये बाबांच्या शैलीचा रंग चढला. कुमारजींचा सांगीतिक विचार आणि त्यांची शिकवण तिने आत्मसात केली. ते आपल्या गायकीतून मांडण्याचे तिचे कसब वाखाणण्याजोगे होते. पं. कुमार गंधर्व या व्यक्तीवर मनापासून प्रेम केले आणि नंतर त्यांची धर्मपत्नी झाली असली, तरी वसुंधरा ही त्यांची शिष्याच राहिली. सदैव शिकत राहण्याचा हा गुण तिने जीवनाच्या अखेपर्यंत जपला. ही तिची विद्यार्थी असण्याची दशा आहे त्याचे मला सर्वात कौतुक वाटते आणि आश्चर्यही वाटते. आताच्या काळामध्ये थोडे काही येत असेल, तर कलाकार स्वत:ला मोठे समजू लागतात. त्या पाश्र्वभूमीवर आईच्या विद्यार्थी असण्याची नवलाई मलादेखील जोपासावी असे वाटते.
गुरू म्हणून कुमारजी अतिशय कडक होते. त्यांच्याकडून शिकत असतानाही त्यांच्या गायकीप्रमाणेच अवघड वाटायचे आणि तसे ते अवघड असायचेही. पण, आईची शिकवण्याची पद्धत ही थोडी निराळी होती. एखादी तान शिकविताना ती अशा पद्धतीने घोटून घ्यायची की ती समजायला सुगम वाटायची. अर्थात ती तशी सुगम नाही हे नंतर मला गात असताना कळायचे. पण, तालीम घेताना आई ही तान सुगम आहे, असा भास निर्माण करायची. अर्थात आईने शिकविलेले मी किती आत्मसात करू शकले हे मला सांगता येणार नाही. पण, तिची गायन शिकविण्याची हातोटी कदापिही विसरता येणार नाही.
आई म्हणून वसुंधराताईने किती धीर दिला असे सांगायचे म्हटले, तरी नेमकेपणाने सांगता येणार नाही. एक परिपूर्ण गायक कलाकार म्हणून तिची इच्छाशक्ती दांडगी होती. मी आणि भुवनेश असे आम्हाला घडवून घेण्यासाठी ही इच्छाशक्ती तिला केवळ उपयोगी पडली असे नाही तर तिने ही इच्छाशक्ती आमच्यामध्येही संप्रेषित केली. प्रसंग आनंदाचा असो, दु:खाचा किंवा कसोटी पाहणारा, कोणत्याही प्रसंगाला खंबीरपणे कसे सामोरे जायचे हे तिने शिकविले. ‘गीतवर्षां’, ‘त्रिवेणी’, ‘मला उमगलेले बालगंधर्व’, ‘तांबे गीतरजनी’ ‘गीतहेमंत’, ‘ठुमरी, टप्पा, तराणा’ असे स्वतंत्र निर्मिती असलेले हे कुमारजींचे कार्यक्रम वसुंधराताईंशिवाय होऊच शकले नसते. कुमारजींच्या व्यक्तिगत जीवनात ती अर्धागिनी तर होतीच पण त्यांच्या सांगीतिक जीवनामध्येही ती अविभाज्य अंग झाली. एरवी संगीतामध्ये जुगलबंदी असते. पण, कुमारजी यांच्यासमवेत तिच्या संयुक्त गायनाला तोडच नव्हती. दोन प्रतिभावान कलाकारांमध्ये असे सुरेल आणि अप्रतिम सामंजस्य आढळणं अवघड आहे. हे सामंजस्य कुमारजी असेपर्यंत होतेच. पण, नंतर हा गुण तिने आमच्यामध्येही संक्रमित केला.
कुमारजी काय किंवा वसुंधराताई काय, ही पिढीच अशी घडलेली होती की ती सहजासहजी शिष्याची पाठ थोपटणारी नव्हती. तिने कधी तोंडदेखले कौतुक केल्याचे मला आठवत नाही. पण, कधी नाउमेदही केले नाही. एखाद्या मैफलीचे ध्वनिमुद्रण मी ऐकविल्यानंतर स्वर चांगला लागला, आवाज उत्तम आहे, रागमांडणी व्यवस्थित झाली याविषयी ती आई म्हणून थोडेसे कौतुक करायची. पण, त्याच क्षणी तिच्यामधील गुरू जागा व्हायचा. गायनामध्ये काय घडले नाही किंवा कसा स्वर लावला असता तर आणखी उत्तम झाले असले हे कधीही नमूद करायला तिने कमी केले नाही. मी कितीही चांगला प्रयत्न केला, तरी गुरू म्हणून तिची शाबासकी मिळवू शकले नाही. जेवढे म्हणून पिरगळता येतील तेवढे कान पिरगळावेत अशीच बहुधा त्या पिढीची धारणा असावी. जेणेकरून शिष्याच्या हातून काही चांगले घडू शकेल. वसुंधराताईंच्या या शिकवणीमुळेच मी गायिका म्हणून घडू शकले. स्वरांच्या आभाळात उडण्यासाठी सज्ज झाले आहे. पण, विहंग करून झाल्यानंतर स्थिरावण्यासाठीची आणि मनापासून सामावून घेणारी माझी भूमी म्हणजे माझी आई वसुंधरा कोमकली आपल्यामध्ये नाही हे सत्य स्वीकारणे जेवढे अवघड, तेवढेच ते पचविणेही अवघड.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.लोकसत्ता
July 29, 2017
गडकरी यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल व त्यानंतरचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले.त्यांचा जन्म २६ मे १८८५ रोजी झाला. महाविद्यालयात शिकत असताना मित्राच्या ओळखीने गडकरी 'किर्लोस्कर नाटक मंडळी'त दाखल झाले. या किर्लोस्कर नाटक मंडळीने चालवलेल्या रंगभूमी नावाच्या मासिकातून, तसेच शिवराम महादेव परांजपे यांच्या काळ वृत्तपत्रातून व हरीभाऊ आपट्यांच्या 'करमणूक' नियतकालिकातून ते कविता, लेख लिहू लागले. कविता व लेखांसोबतच ते नाट्यलेखनही करू लागले. गडकऱ्यांच्या अनेक नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत.त्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. भावबंधन, एकच प्याला सारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते. वेड्याचा बाजार आणि राजसंन्यास ही त्यांची नाटके मात्र अपूर्ण राहिली. मराठीचे शेक्सपियर असा त्यांचा सार्थ उल्लेख होतो तो मुख्यत्वे नाटकांसाठीच. नुसती नाटकेच नाहीत तर त्यांची सुधाकर, सिंधू, तळीराम, घनश्याम, लतिका वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत. काळ बदलला, खरे तर गडकऱ्यांनी हाताळलेले दारूबंदीसारखे विषयही कालबाह्य झाले, पण गडकऱ्यांची नाटके सदाहरित राहिली याचे श्रेय त्या देवदुर्लभ अशा लेखणीलाच द्यायला हवे. गडकऱ्यांचे विनोदी लेखन त्यांच्या संपूर्ण बाळकराम ह्या पुस्तकात एकत्रितपणे मिळते. नाट्यछटेपासून ते संवाद आणि विडंबनापर्यंत विविध प्रकारांतून गडकऱ्यांनी विनोद हाताळला. संपूर्ण बाळकरामचे पानन्पान खरोखरीच उच्च अभिरुचीच्या हास्यरसाची निर्मिती करणारे आहे. राम गणेश गडकऱ्यांनी 'मासिक मनोरंजन'मध्ये 'बाळकराम' ह्या टोपण नावाने विपुल लेखन केले. पुढे त्यांतील काही लेखांचा संग्रह 'रिकामपणची कामगिरी' ह्या नावाच्या पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला. राम गणेश गडकरी यांचे २३ जानेवारी १९१९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
May 26, 2017
विचारवंत, समीक्षक, सौंदर्यमीमांसक. रा.भा.पाटणकरांचे सर्वच लेखन तर्कशुद्ध आणि समीक्षेच्या क्षेत्रात मोलाची भर घालणारे आहे.
February 19, 2010
सतारवादनातील श्रेष्ठतम वादक रवि शंकर यांचा जन्म ७ एप्रिल १९२० रोजी झाला. रवि शंकर यांचे वडील श्याम शंकर विद्वान व कायदेतज्ज्ञ होते. त्यांचे पूर्ण बालपण वडिलांच्या गैरहजेरीतच गेले. त्यांची आई हेमाङ्गिनी यांनी त्यांचे पालन पोषण केले. थोरले भाऊ उदय शंकर हे विख्यात भारतीय नर्तक होते. ते पॅरिस येथे राहत.
१९३० साली रवि शंकर आईसोबत पॅरिस येथे गेले. त्यांचे आठ वर्षांचे शालेय शिक्षण तेथेच झाले. १९३८ साली, वयाच्या अठराव्या वर्षी रविशंकर यांनी उस्ताद अलाउद्दीन खान यांच्याकडे शिक्षण सुरू केले. शिक्षणकाळात ते उस्ताद साहेबांचे वडील व आजचे प्रसिद्ध सरोदवादक अली अकबर खान यांच्याशी परिचीत झाले. त्यांनतर त्या दोघांनी अनेक ठिकाणी एकत्र जुगलबंदी केली. उस्ताद अलाउद्दीन खान यांच्याकडिल शिक्षण १९४४ पर्यंत चालले. १९३९ साली अमदावाद शहरात प्रथम खुली मैफल केली.
१९४५ सालापासूनच रविशंकराच्या साङ्गीतिक सृजनशीलतेचे भ्रमण इतर शाखांमध्येही सुरू झाले. त्यांनी बॅलेसाठी संगीत रचना व चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन सुरू केले. त्याकाळातील गाजलेले चित्रपट धरत्री के लाल व नीचा नगर या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले. इक्बाल यांच्या सारे जहासे अच्छा या गीतास त्यांनी दिलेले संगीत अतिशय लोकप्रिय ठरले. १९४९ साली रवि शंकर दिल्लीच्या ऑल इन्डिया रेडिओत संगीत दिग्दर्शक म्हणून रूजू झाले. याच काळात त्यांनी वाद्य वृन्द चेम्बर ऑर्केस्ट्रा स्थापन केला.
१९५० ते १९५५ सालात रवि शंकर यांनी सत्यजित राय यांच्या अपु त्रयी - (पथेर पांचाली, अपराजित व अपुर संसार) या चित्रपटांना संगीत दिले. यानंतर त्यांनी चापाकोय़ा , चार्ली व सुप्रसिद्ध गांधी चित्रपटांस संगीत दिले. १९६२ साली पन्डित रवि शंकर यांनी किन्नर स्कुल ऑफ म्युझिक, मुंबई व १९६७ साली किन्नर स्कुल ऑफ म्युझिक, लॉस ऍन्जलेस स्थापन केली. रवि शंकर यांचे संगीत व्यक्तित्व दुमुखी होते. सतारवादक व संगीतकार अशी ती दोन रूपे होती. सतारवादक म्हणून ते परंपरावादी व शुद्धतावादी; पण संगीतकार म्हणून उन्मुक्तपणा अशा रूपात वावरत.
१९६६ साली त्यांनी प्रसिद्ध पाश्चात्य संगीतकार जॉर्ज हॅरि यांच्या सोबत जॅझ, अभिजात पाश्चात्य संगीत व लोकसङ्गीत अशा विविध प्रवाहांवर काम केले. १९५४ साली सोव्हिएत युनियनमधील मैफिल ही त्यांची पहिली आंतरराष्ट्रीय मैफिल. त्यानंतर १९५६ साली त्यांनी युरोप अमेरिकेत नेक कार्यक्रम केले. यात एडिनबर्ग फेस्टिव्हल, रॉयल फेस्टिव्हल हॉल अशा प्रतिष्ठेच्या मंचांचा समावेश आहे.
१९६५ साली बीटलसच्या जॉर्ज हॅरि यांनी सतार शिकण्यास सुरूवात केली. या काळात त्यांचे हॅरि यांच्याशी प्रस्थाप्त झालेले मैत्रीपूर्ण संबंध त्यांना आंतरराष्ट्रीय मंचांची पायरी चढवण्यास मदतभूत ठरले. जॉर्ज हॅरि हे रवी शंकरांचे पॉप जगतातील "मेन्टर" (पालक) मानले जातात. मा.रवि शंकर यांचे ११ डिसेंबर २०१२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 10, 2019
मुन्शी प्रेमचंद यांचे धनपत राय हे खरे नाव होते. साहित्य आणि कादंबरी क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी मुन्शी प्रेमचंद यांना ‘उपन्यास सम्राट’ म्हणूनही ओळखले जाते.
October 8, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti