जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
संगीतकार श्रीधर फडके यांच्याशी त्यांचे विशेष सूर जुळले होते. या जोडीची ‘फुलले रे क्षण माझे फुलले’, ‘मी राधिका, मी प्रेमिका’, ‘कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला’ इत्यादी गाणी खूप लोकप्रिय झाली.
April 8, 2022
मुंबईच्या बांधकाम इतिहासामध्ये विठ्ठल सायन्ना यांचे नाव अत्यंत आदराने व गर्वाने घेतले जाते.
ठाणे व मुंबईत विस्तीर्ण पसरलेल्या व वेगवेगळ्या आकारांनी, तसेच बांधकामाच्या शैलींनी नटलेल्या गगनचुंबी इमारतींचे, विस्तीर्ण जाळे विणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मुंबई व ठाण्याची वास्तू घडण करणारे प्रसिध्द बांधकाम ठेकेदार अशी त्यांची संपुर्ण भारतामध्ये किर्ती पसरलेली होती. याला कारणेही तशीच आहेत. मुंबईच्या जन्मापासून तिच्या गळ्यामधील दुर्मिळ अलंकाराचे काम करणारे, गॉथिक वास्तुशास्त्राचा अद्वितीय नमुना असलेले, व संयुक्त राष्ट्र संघटनेकडून प्रसिध्द होणार्या वर्ल्ड हेरिटेज साईट्सच्या यादीमध्ये नोंद झालेले पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस व आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस या रेल्वे स्थानकाचा काही भाग त्यांनी बांधला होता.
याशिवाय मुंबईतील अनेक इमारती व पायाभूत सुविधांची बांधणी त्यांच्या हस्ते झाली. मुंबईतील जनरल पोस्ट ऑफिस, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ( हल्लीचे राजा छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय) , स्मॉल कॉसेस कोर्ट, व इन्स्टीटयूट ऑफ सायन्स या इमारतींच्या निर्मीतीची जबाबदारी अतिशय समर्थतेने त्यांनी पेलली होती. त्यांचे सुपुत्र नारायण सायना यांची गणतीदेखील मुंबईतल्या दर्जेदार व नामांकित इमारत कंत्राटदारांपैकी होते. त्यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून याच व्यवसायामध्ये उंच भरारी मारली.
त्यांच्याच नावाने ठाणे येथे विठ्ठल सायन्ना मंदीर उभे आहे.
January 12, 2015
पिंपळी रसायनात पीएचडी मिळवलेले औरंगाबादचे वैद्य संतोष नेवपूरकर हे आयुर्वेद व्यासपीठ या संस्थेच्या माध्मातून देशभरात आयुर्वेदातील संशोधनाचे प्रसारकार्य करीत आहेत. विद्यार्थ्यांचा बुध्यांक, बोन मॅरोवरील उपचार याविषयी त्यांनी विविधांगी संशोधन केले आहे. शिरोधारा उपचारासाठी तयार केलेल्या भांड्यासाठी पेटन्ट मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत.
संतोष नेवपूरकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला संशोधनाची बहुगुणी मात्रा हा लेख पुढील पानावर वाचा.
संतोष नेवपूरकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला संशोधनाची बहुगुणी मात्रा हा लेख वाचा.
September 8, 2015
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता अतुल कुलकर्णीचे नाव मराठी चित्रपटसृष्टीत आदराने घेतले जाते. आत्तापर्यंत ७ भाषांमधून ६० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलेल्या अतुलने अनेक मानसन्मान प्राप्त केले. हा संवेदनशील अभिनेता सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर आपल्या लेखांद्वारे आणि मुलाखतींमध्ये रोखठोक मते मांडतांना पाहायला मिळतो. ‘हे राम’, ‘चांदनी बार’, ‘खाकी’, ‘पेज ३’, ‘रंग दे बसंती’, ‘वळू’, ‘नटरंग’, ‘पोपट’, ‘एका प्रेमाची गोष्ट’सारख्या चित्रपटांमधून त्याने लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.
September 10, 2017
आज १८ आक्टोबर
आज डॉ.अमोल कोल्हे यांचा वाढदिवस.
जन्म.१८ आक्टोबर १९८०
शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की, अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांची छबी डोळ्यासमोर उभी राहते. ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेतील शिवरायांच्या अप्रतिम भूमिकेमुळे अमोल कोल्हे यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.
डॉ.अमोल कोल्हे यांचा जन्म पुण्याजवळील नारायणगाव येथे झाला. आठवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी तेथेच घेतले आणि मग पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. आपटे प्रशालेतून विज्ञान शाखेमधून त्यांनी १२वीपर्यंतचे शिक्षण घेतले. १०वी आण १२वीच्या निकालांत त्यांचा गुणवत्ता यादीत समावेश होता. पुढे ते एम.बी.बी.एस.ची पदवी घेण्यासाठी मुंबईला गेले आणि त्यांनी जी.एस. महाविद्यालयातून त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. डॉ. अमोल कोल्हे हे मराठीतील प्रसिध्द अभिनेते. स्टार प्रवाह या वाहिनीवरील 'राजा शिव छत्रपती' या ऐतिहासिक मालिकेपासून ते प्रसिद्धीस आले.
डॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्नी डॉक्टर अश्विनी या वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक आहेत.
डॉ. अमोल कोल्हे हे एक प्रभावशाली वक्ते आहेत आणि ते सध्या शिवसेना या पक्षाचे सदस्य आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
October 18, 2016
आपल्या कॅमेऱ्याने सिनेतारे-तारकांना ग्लॅमर मिळवून देणारे, कलाकारांना नवा चेहरा देणारे असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांचा जन्म १६ सप्टेंबर १९५० रोजी झाला.
व्यक्तिचित्रण प्रकारातल्या प्रकाशचित्रांसाठी ते विशेष नावाजले जात असत. आपल्या मितभाषी स्वभावाने, मृदू वाणीने आणि व्यक्तीतील मित्रत्वाचा शोध घेणाऱ्या दृष्टीने त्यांनी केवळ सिनेजगतातीलच नव्हे तर समाजाच्या विविध प्रांगणातील व्यक्तींना आपल्या मित्रपरिवारात सामावून घेतले होते.
गौतम राजाध्यक्ष यांना छायाचित्रणासह कलेच्या विविध प्रांतात आवड होती. १९७७ मध्ये त्यांचा संबंध लिंटाजशी आला आणि त्यांना तिथेच नोकरीची संधी मिळाली. फोटोग्राफीेचे तंत्र ते लिंटाजमध्येच शिकले. या काळात त्यांनी लिंटाज इंडियामध्ये मानाच्या जागाही मिळविल्या होत्या. पुढे १९८० पासून १९८७ पर्यंत फॅशन फोटोग्राफर म्हणूनही काम पाहिले. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र काम केले.
छायाचित्र काढताना ज्यांचे छायाचित्र काढायचे त्यांचे व्यक्तिमत्त्व त्या छायाचित्रात आणण्याचा त्यांचा कसोशीचा प्रयत्न असायचा. म्हणून त्यांची छायाचित्रे बोलकी असत. १९९७ मध्ये त्यांचे ‘फेसेस’ हे छायाचित्रांचे पुस्तक प्रसिद्ध झाले. यात त्यांनी दुर्गा खोटे, साधना समर्थपासून ऐश्वर्या रायपर्यंतच्या ४५ भावमुद्रा टिपल्या आहेत. दोन वर्षांपूर्वीच त्यांचे ‘चेहरे’ या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन लता मंगेशकर यांच्या हस्ते झाले होते. त्यांच्या छायाचित्रांची प्रदर्शनेही रसिकांच्या चांगल्याच स्मरणात आहेत.
छायाचित्राबरोबरच स्टील फोटोग्राफीचे कामही त्यांच्याकडे आले. अनेक चित्रपटांची त्यांनी स्टील फोटोग्राफी केली आहे.
गौतम राजाध्यक्ष यांचे १३ सप्टेंबर २०११ रोजी निधन झाले.
मराठीसृष्टीवरील गौतम राजाध्यक्ष यांचा लेख.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 26, 2021
तलम, तरल, रेशमी आवाजाचा गायक तलत महमूद यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९२४ रोजी झाला.
तलत या नावातच एक तलम, तरल, रेशमी अनुभव मिळतो. तलत यांचा दु:खाचा आवाज होता. त्याही पेक्षा आपल्या मनातल्या प्रत्येकच नाजूक, तरल भावनेचा तो आवाज होता. तलत यांच्या आवाजाला मर्यादा होत्या. तरी देखील जगभरातल्या चाहत्यांचा विचार केला तर या सर्व गायकांपेक्षा तलतच्या चाहत्यांची संख्या काकणभर जास्तच भरेल. कारण बाकी सर्व आवाज हे गायकांचे होते पण तलत यांचा आवाज हा सर्वसामान्य माणसाचा होता. त्यामुळे सानुनासीक, किंचीत कापरा आवाज ही त्याची मर्यादा न ठरता तोच त्यांचा सर्वोत्तम गुण ठरला. त्याच्या आवाजाचा टोन हा सर्व गाण्यांसाठी सारखाच राहीला. सुरुवातीच्या काळात तलत महमूद पार्श्वगायक म्हणून नव्हे तर गायक म्हणून प्रसिद्धीच्या झोतात होते. त्यांना त्या काळी प्रतिसैगल म्हणूनच ओळखत होते. तलत अगदी लहानपणापासूनच सैगलचा वेडा होते. लखनौतील सनातनी वृत्तीच्या त्यांच्या वडिलांना हे गाण्याचे वेड बिलकुल पसंत नव्हते. तलत मात्र सैगलची गाणी, गझला पाठ करायचा व हुबेहूब सैगलप्रमाणे गायचे. मुकेश, रफीच्या सुरुवातीच्या जमान्यातील हे तलत स्वत:च्या चाहत्यांचा एक वर्ग निर्माण करू शकले. मुळात तलत हे एक गझलगायक होते.
गझल व गीत ही दोन्ही भावगीतेच व तलत हा भावपूर्ण आवाजात गाणारा गायक. गझल गाताना कवीच्या मूळ शब्दांची संगत तो कधीच सोडत नसे. तेथे तडजोड नव्हती. आपल्या येथील जगजितसिंग, राजेंद्र मेहता ह्या गझल गायकांनी पाकिस्तानी गझलगायक मेहदी हसनची शैली उचलली आहे. याच मेहदी हसनला ‘पाकिस्तानचा तलत महमूद’ म्हणून ओळखायचे. तलतचा आवाज हा मुळातच निर्मळ प्रीतीचा आवाज होता. वासनेचा लवलेशही त्यात दिसत नसे. अभिनेता म्हणूनही त्यांनी एकुण १३ चित्रपटात काम केलं. त्यापैकी नऊ चित्रपटात त्यांनी नायकाची भुमिका केली. "दिल-ए-नादान", " एक गांव की कहानी", "लालारुख" आणि "सोने की चिडीया" ही त्यातली काही नावे. मा.तलत महमूद यांनी दोन मराठी चित्रपटांसाठी गाणी गायली. त्यापैकी "पुत्र व्हावा ऐसा" या चित्रपटातले "यश हे अमृत झाले" हे गाणे लोकप्रिय ठरले. तलत यांच्या गाण्यामध्ये मधुरतेबरोबरच शोकात्मतेचाही सूर होता. तलत यांनी बॉलीवूड मध्ये जवळपास सर्वच संगीतकारांकडे सारखेच काम केले. त्यांचे उर्दु उच्चार हे इतर कुठल्याही गायकापेक्षा जास्त स्वच्छ होते. मजरुह सुलतानपूरी, साहीर यांचे सुरवातीच्या काळातले खास उर्दू काव्य, त्याला खरा न्याय तलतनेच दिला.
"शाम-ए-गम़ की कसम" हे त्याचेच एक उदाहरण आहे. तलत महमूद यांनी एकूण ७४७ गाणी गायली ज्यात ४८१ फिल्मी आणि तब्बल २६६ गैरफिल्मी गीतांचा समावेश आहे. एकूण २९३ चित्रपटांसाठी पार्श्वगायन त्यांनी केले. तरीही एकाही चित्रपटासाठी त्यांना पार्श्वगायनाचा फिल्मफेअर पुरस्कार काही मिळाला नाही. काही संगीतकारांनी त्याच्यातील मधुरतेला झुकते माप दिले, तर काहींनी शोकात्मतेला. शंकर-जयकिशन, सचिन देव बर्मन, अनिल बिश्वास, या संगीतकारांनी तलत यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन बसविले व सामान्य लोकांना त्याची गाणी गुणगुणायला लावली. भारत सरकारने त्यांना पद्मभुषण देऊन गौरवले होते. तलत महमूद यांचे ९ मे १९९८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
तलत महमूद यांची काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=QL9alA089fs
https://www.youtube.com/watch?v=DJcXtkNEHkM
तलत महमूद व लता मंगेशकर यांची काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=p3H5VbLNhpA
May 9, 2019
वसंतराव नाईक यांचा वारसा लाभलेले सुधाकरराव नाईक हे मीतभाषी पण करारी बाणा असलेले व्यक्तिमत्व. पाणलोट क्षेत्राचा विकास हे नवे सूत्र सुधाकररावांनी प्रभावीपणे वापरले.
September 3, 2010
काळी गोल टिकली. त्यावर भांगापर्यंत रेखाटलेली काळ्या कुंकवाची उभी रेघ. नाकात लकाकणारी चमकी. डार्क ब्ल्यू किंवा मरून रंगाची सिल्क साडी. काठ ठळकपणे उठून दिसणारे, हाती तंबोरा – मैफलीपूर्वीची डोळे मिटलेली ध्यानस्थ स्तब्धता. `आकाशवाणी धारवाड’ केंद्रावरचा फोटो वाटावा अशी आरती अंकलीकर – टिकेकरची प्रतिमा.
आरती अंकलीकर-टिकेकर यांनी आग्रा-ग्वाल्हेर घराण्याच्या पं. वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे आणि नंतर गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्याकडे संगीताचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांचा जन्म २७ जानेवारी १९६३ रोजी झाला.त्यांच्या गायनशैलीवर त्यांच्या दोन्ही गुरुंचा प्रभाव जाणवतो. चांगलं गाता येण्यासाठी नैसर्गिक देणगी, संस्कार, कष्ट (रियाज) आणि संधी या चार गोष्टींची गरज असते. आरती अंकलीकर - टिकेकर यांना आवाजाची देणगी तर मिळालीच होती, जोडीला आईवडिलांचे संस्कार, गुरूंची आणि परमेश्वकराची कृपा यांमुळे मिळालेल्या प्रत्येक संधीचं त्यांनी सोनंच केलं. आरती अंकलीकर-टिकेकर यांनी प्रथम वसंतराव कुलकर्णींकडे बारा वर्षं रीतसर आग्रा-ग्वाल्हेर घराण्याच्या गाण्याचे शिक्षण घेतले. वसंतराव कुलकर्णी यांची आठवण सांगताना त्या म्हणतात. वसंतरावांकडचा सकाळचा नऊचा क्लाुस आठवतोय. मला पोचायला २-३ मिनिटं उशीर झाला असावा. सर त्यांच्या गादीवर तक्त्यााला टेकून बसलेले. पांढरे शुभ्र धोतर, पांढरा झब्बा, कुरळे केस व्यवस्थित विंचरलेले. समोरच्या तबकात तंबाखू, सुपारी, विड्याची पानं, सरांच्या अंगठ्याच्या नखात चुना, डाव्या हातात तळहातावर तंबाखू. मला पाहताच चेहऱ्यावर नाराजी. मला म्हणाले, ""घड्याळात पाहतेस ना किती वाजले?'' मी- ""पण सर..'' ""बस.. उशिरा आली.'' सर - ""ख्यालाच्या आवर्तनामध्ये दुसऱ्या मात्रेवर समेवर येऊन चालेल का? वेळेचं भान नको का ठेवायला?'' ताल म्हणजे काय, आवर्तन म्हणजे काय, याचा मिळालेला पहिला धडा होता तो. असे शिस्तप्रिय, वक्तशीर, मितभाषी, आतून खूप प्रेम करणारे, वरवर कोरडे वाटणारे सर.
वसंतराव कुलकर्णींकडे गाण्याचे शिक्षणानंतर त्यां गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या कडे गाणं शिकल्या. किशोरी आमोणकर यांच्या बद्दलचे त्यांचे भाव व्यक्त करताना त्या म्हणतात, किशोरीताईंकडे चाललेला यमन मनात रुंजी घालतोय, समोर दिसतोय, दरवळतोय, जिभेवरदेखील यमनचीच चव रेंगाळतेय. केवळ त्या आठवणींनी मन जणू यमनच झालंय. ताईंकडे यमनची तालीम चाललेली असतानादेखील असंच वाटायचं, मीच यमन झाल्यासारखं. सगळं जग यमन झाल्यासारखं वाटे. त्यांच्या घरातून बाहेर पडल्यानंतरदेखील यमनमध्ये तरंगल्याचा आभास होई. अंतर्मनामध्ये यमनच चालू असे. ताई म्हणत, "रागाला शरण जा, तोच तुम्हाला वाट दाखवेल.'' ताईंचा श्वा स म्हणजेच संगीत. संगीत हेच जीवन. त्यांची गुरूवर अपार भक्ती. गुरू म्हणजे त्यांचीच आई- गानतपस्विनी - "मोगूबाई.' ताईंनी शिस्तबद्ध गायकी पचवून आपली स्वयंभू, स्वतंत्र गायनशैली निर्माण केली. रागाचं विशाल रूप त्यांना दिसलं आणि आम्हालाही त्याची अनुभूती दिली. मी स्वत: यमन होते तेव्हा काय घडत असतं, याचा साक्षात्कार करवला.
आरती अंकलीकर-टिकेकर यांनी नंतर आग्रा घराण्याचे अध्वर्यू मा.पं. दिनकर कैकिणी यांच्याकडे शिक्षण घेतले. पं. दिनकर कैकिणी यांच्याबद्दल बोलताना त्या म्हणतात. यश म्हणजे काय? पैसा, नाव, कीर्ती मिळवणं म्हणजे यश; मनातली स्वप्न पूर्ण होणं म्हणजे यश; की श्रोत्यांना भावविभोर करणं म्हणजे यश? चांगला माणूस बनणं म्हणजे यश की यशस्वी कलाकार होणं म्हणजे यश? निरंतर साधनेत रमणारं मन घडवणं म्हणजे यश, की सातासमुद्रापलीकडे कार्यक्रम करणं म्हणजे यश? या विचारांच्या भोवऱ्यात मन भरकटत असताना आठवतो तो माझ्या गुरूंबरोबर गायलेला राग भैरव. पं. दिनकर कैकिणी- आग्रा घराण्याचे अध्वर्यू- त्यांनी भैरव शिकवला. खरं तर उभाच केला डोळ्यांसमोर. राग ही केवळ एक स्वराकृती नसून, तरल भावाचं एक वलय आहे. अलगद तरंगणारं, गायकाच्या आणि श्रोत्याच्या तरल मनाला तरंगवणारं. पं. कैकिणी गुरुजींची काही वाक्यंर इथं आठवतात
"शास्त्रीय संगीत हे मनोरंजनासाठी नसून आत्मरंजनासाठी आहे.'
"भारतीय संगीत हे दोन स्वरांना जोडणाऱ्या दुव्यात दडलेलं आहे.'
त्यांनी आत्तापर्यत भारतभर तसेच भारताबाहेर अनेक प्रतिष्ठित संगीत महोत्सवांमध्ये आपली कला सादर केली आहे. आरती अंकलीकर-टिकेकर यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचा आणि संस्कृतीचा जगभरामध्ये आपल्या गायनाद्वारे प्रसार केला. प्रसिद्ध दिग्दर्शक शाम बेनेगल यांच्या `सरदारी बेगम’ या चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायनही केले आहे. आरती अंकलीकर-टिकेकर यांना आत्तापर्यंत पं. कुमार गंधर्व पुरस्कार, पं. जसराज पुरस्कार, व्ही. शांताराम पुरस्कार अशा अनेक नामांकित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. 'संहिता' या मराठी चित्रपटातील 'पलके ना मूंदो' या गाण्यासाठी आरती अंकलीकर-टिकेकर यांना उत्कृष्ट पार्श्वगायिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळालेला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
मी राधिका मी प्रेमिका
https://www.youtube.com/watch?v=AqH-TkK9NSk
ग्रेट भेटमधील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर यांची मुलाखत
http://www.ibnlokmat.tv/archives/65281
http://www.ibnlokmat.tv/archives/65279
सरदारी बेगम चित्रपटातील गाणी
https://www.youtube.com/watch?v=twjdlrUYcYs
https://www.youtube.com/watch?v=QAWHl2BKOJY
January 27, 2017
मृणाल कुलकर्णी यांनी मराठी-हिंदी चित्रपट, नाटक, टेलिव्हिजन या तिन्ही क्षेत्रात काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांचा जन्म २१ जुन १९७१ रोजी पुणे येथे झाला.तसेच ‘रमा माधव’ या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनातून त्यांनी दिग्दर्शिका म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. शिक्षण घेत असताना ‘स्वामी’ या मालिकेतून मृणाल कुलकर्णी यांनी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
‘राजवाडे अँड सन्स’, ‘तुझ्या-माझ्यात’, ‘रमा माधव’, ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’, ‘कशाला उद्याची बात’, ‘यल्लो’ या मराठी चित्रपटांमध्ये मृणाल यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यासोबतच ‘आशिक’, ‘राम गोपाल वर्मा की आग’, ‘रास्ता रोको’, ‘छोडो कल की बातें’, ‘मेड इन चायना’ या हिंदी चित्रपटांमधूनही मृणाल झळकली होती. पण, ‘सोन परी’ या मालिकेने त्यांना खरी ओळख देत घराघरात पोहोवले. ‘राजा शिवछत्रपती’, ‘मीरा’, ‘स्पर्श’, ‘गुंतता ह्रदय हे’, ‘अवंतिका’ या मालिकांद्वारेही त्यांनी अनेकांच्याच मनावर राज्य केले. मराठी व हिंदी चित्रपट, नाटक आणि दूरदर्शनच्या जगतात त्या एक हरहुन्नरी, प्रतिभासंपन्न अशा मनस्वी कलावंत म्हणून ओळखल्या जातात. मृणाल यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे.
'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं' आणि 'रमा माधव' या मराठी सिनेमांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. मृणाल या प्रसिद्ध साहित्यिक गो.नी. दांडेकरांच्या नात आहेत. साहित्यिक वीणा देव त्यांच्या आई आहेत. मृणाल कुलकर्णी यांचे चिरंजीव विराजस याने जाहिरात माध्यमातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिवाय सुभाष घईंच्या विस्लिंग वूड या संस्थेतून त्याने फिल्म मेकिंगचे प्रशिक्षण घेतले आहे. ‘कौन बनेगा करोडपती’चे दिग्दर्शक सिद्धार्थ बसू यांच्यासोबत काम करण्याची त्याला संधी मिळाली आहे.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
June 22, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti