जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
प्रभाकर पंडित यांचा जन्म ३० सप्टेंबर १९३३ रोजी झाला. प्रभाकर पंडित यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण साताऱ्याला झाले. संगीताची आवड बालपणापासून असल्याने त्यांनी गायनाचे मार्गदर्शन मटंगेबुवा; तसेच पेंढारकरबुवा यांच्याकडे घेतले. व्हायोलिनचे शिक्षण त्यांना जे.वाय. पंडित यांच्याकडून मिळाले. संगीतात कारकिर्द घडविण्यासाठी ते मुंबईला आले. दादर येथे त्यांनी ३० वर्षे "मधुवंती व्हायोलिन विद्यालया"चे संचालन केले. मुंबई आकाशवाणी केंद्रावर १५ वर्षे ते काम करत होते. मुंबई विद्यापीठाच्या सुगम संगीत विषयाचे ते अभ्यागत व्याख्याते, तसेच परीक्षकही होते. संगीत क्षेत्रात सुमारे ४५ वर्षे कार्यरत असलेल्या पंडितांनी ध्वनिफीती, चित्रपट, नाटक, संगीतिका, संगीत नाटक यांसाठी संगीत दिले. संगीतबद्ध केलेल्या गाण्यांच्या ध्वनिफितींमुळे मा.प्रभाकर पंडित नावाजले गेले. याखेरीज दहा चित्रपट, वीस नाटके, संगीतिका, संगीत नाटके यांकरताही त्यांनी संगीत दिले. तसेच जाहिरातींच्या जिंगल्सचीही निर्मिती त्यांनी मोठ्या प्रमाणावर केली. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या "देवाचिये द्वारी'या अजित कडकडे यांच्या आवाजातील ध्वनिफितीने अत्यंत दुर्मिळ अशा "डबल प्लॅटिनम डिस्क'चा बहुमान मिळवला होता. मंगेशकरांसह सुरेश वाडकर, सुमन कल्याणपूर, कविता कृष्णमूर्ती, साधना सरगम ते स्वप्नील बांदोडकर पर्यंत सुमारे ७८ विविध गायकांचे आवाज त्यांनी आपल्या ध्वनिफितींच्या माध्यमातून लोकांसमोर आणले. भावगीते, भक्तिगीते, लोकगीते, अभंग, आरत्या, संतरचना, बालगीते असे अनेक गीतप्रकार त्यांनी संगीतबद्ध केले. रंग ओलेत्या फुलांचे, मन हा मोगरा, अभंग प्रभात, वृंदावनी वेणु, छंद हा विठ्ठलाचा, भक्तिप्रकाश, झुकझुक गाडी, देव दयानिधी अशा अनेक ध्वनिफितींची उदाहरणे सांगता येतील. "सुगम संगीताचे सौंदर्य' या पुस्तकाचे लेखनही त्यांनी केले होते. मा.प्रभाकर पंडित यांचे निधन २८ डिसेंबर २००६ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.विकिपीडिया
January 3, 2017
काकस्पर्श, वास्तव,अस्तित्व, कोकणस्थ, सुंबरन,साने गुरुजी,डॉ.प्रकाश आमटे अशा मराठी, हिंदी चित्रपटाना त्यांनी संगीत दिले आहे. राहुल रानडे यांनी भास्कर चंदावरकर, आनंद मोडक, अशोक पत्की यांच्यासारख्या दिग्गज संगीतकारां बरोबर काम केले आहे.
August 2, 2022
राहुल द्रविडच्या जागवलेल्या काही आठवणी. द्वारकानाथ संजगिरी यांच्या 'थर्ड अंपायर' या पुस्तकातून सारांशरूपाने!
बर्फापेक्षा थंड काही असू शकतं का ?
होय. होय. होय! राहुल द्रविडचं डोकं !!
याआधी आपण पाहिलंय की चेंडू फिरणाऱ्या खेळपट्टीवर त्याने इराणी कप मुंबईच्या हातून कसा पळवला ते! एक मुंबईचा खेळाडू मला सांगत होता, "अरे, तो फलंदाजीला जातानाच बरोबर बेडिंग, कपडे, टूथब्रश वगैरे घेऊन गेलाय, असं वाटत होत. त्या सामन्यात लक्ष्मण अप्रतिम खेळला, पण द्रविडचं अस्तित्व हा त्या विजयाचा पाया, ढाचा, कळस वगैरे सर्व होतं. मी तेव्हा त्याला फोनवर म्हटलं होतं, "आईकडून दृष्ट काढून घे. आपल्याकडे क्रिकेटमध्ये दृष्ट फार लवकर लगते."
त्याच्या फलंदाजीला दृष्ट लागून चालणार नव्हतं.
सचिन-राहुल हे भारतीय संघाचे श्वास होते. दोघेही एक-एक नाकपुडी! एक चोंदली तर दुसरी प्राणवायू पुरवते. एकेकाळी सचिन गेला कि श्वास कोंडायचा. द्रविड असला की श्वास कोंडणार नाही, असं वाटायचं. २००३ च्या विश्वकपात सचिन बल्ल्याने काव्य लिहून जायचा, पण शेवटी निबंध कोणीतरी लिहावा लागतो. ती जबाबदारी राहुल पूर्ण करायचा.
हे पद्य आणि गद्य हेच आपल्या क्रिकेटचं अभिजात साहित्य आहे. तेच दोघांनी प्रसवलं.
बरं, द्रविड पूर्वीप्रमाणे बसची वाट पाहावी तसा एखाद्या धावसंख्येवर पुढच्या धावेची वाट पाहात ताटकळत उभा राहात नाही. धाव ही कष्टाने मिळणारी बस नाही. ती वाट पाहात उभी असलेली कॅब आहे आणि तरीही त्याच्या फलंदाजीएवढी शाश्वती भारतीय संघात कुणाचीही देता येत नाही. द्युतात धर्मराजाने राहुलची विकेट लावली असती तर शकुनी हरला असता... धर्मराज नाही. त्याची फलंदाजी हा ट्रान्समध्ये जाण्याचा प्रकार आहे. अभ्यासात तो हुशार आहे, असं त्याची आई सांगते. 'अभ्यासाला बस' असं राहुलला म्हणे कधी सांगावचं लागलं नाही. 'राहुल द्रविड स्क्वेअर कट मारतो तशी त्याच्या गालावर कधी मारायला लागलीय का?' माझ्या गालावरच्या जुना जखमा आठवून मी त्याच्या बाबांना विचारलं. ते म्हणाले, ''साधी रागावण्याची वेळसुद्धा त्याने कधी येऊ दिली नाही. तो क्रिकेट खेळायला लागल्यावर सुद्धा शेवटचे दोन महिने फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचा. त्यामुळे क्लास मिळवायचा.'' बारावीत राहुलने त्याच्यासमोर असलेले अनेक शैक्षणिक पर्याय टाळून क्रिकेटपटू व्हायचं ठरवलं. तिथंही 'क्लास' मिळवला. आपण कधीतरी अधून मधून द्रविड जास्त बचावात्मक झाला की वैतागायचो. त्याच्या आई-बाबांना काय वाटत असेल? ते म्हणाले, ''आम्ही वृत्तीने सर्वच शांत आहोत. राहुलचं शतक झालं की आनंद होतो, पण हुरळून जात नाही किंवा अपयश फार मनाला लावून घेत नाही. कधीतरी मी त्याला विचारतो 'त्यावेळी असा का शॉट खेळलास? असा खेळायला हवा होतास'. तो फक्त हसतो. पण मला माहीत असतं तो यशापयशाचा अभ्यास करतो. ही त्याची अभ्यासू वृत्ती लहानपणापासूनच पाहिलीय. आजही तो विवेकानंद वाचत असतो.''
काही दोन-चार क्रिकेटर्सचा अपवाद सोडला तर इतरांना विवेकानंदांच्या फोटोखेरीज त्यांच्या बद्दल इतर माहिती नसावी.
राहुलच्या पेशन्सची एक गोष्ट. राहुलच्या आईने सांगितलेली. त्याच्या लग्नाच्या वेळी त्याच्या घरच्यांना असं वाटत होतं की लग्न हे साग्रसंगीत व्हावं. कारण त्याची मुंज साग्रसंगीत झाली होती. मुंजीत त्याला सोन्याचं जानवं सुद्धा घातलं होतं. पण राहुलचा आधी अशा विधींना विरोध होता. पण त्याच्या आईने त्याला सांगितलं की तेवढं माझ्यासाठी ऐक. हे विधी चार दिवस चालले होते. पण राहुल या खेळपट्टीवरून देखील हलला नाही.
कळलं तुम्हाला त्याचा पेशन्स कुठून आला?
मी आयुष्यात स्वतःच्या लग्नाचा अल्बम सोडून फक्त राहुलच्या लग्नाचा पूर्ण अल्बम पाहिलाय. एरवी लग्नाचा अल्बम म्हटलं की माझ्या अंगावर काटा येतो. त्या अल्बममध्ये मात्र फोटोफोटोत मला राहुलच्या पेशन्सच्या खुणा दिसत होत्या. शेवटी मैदानावरही लग्नच असतं. ते धावांशी असतं. मुंडावळ्यांऐवजी पॅड्स, ग्लोव्हज असतात. उलट मैदानावरचे विधी पेशन्सची जास्तच परीक्षा घेतात.
द्वारकानाथ संजगिरी
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
January 11, 2017
तोंडात पटकन रुळतील आणि गुणगुणता येतील, अशा चाली देणे ही रवि शंकर शर्मा ऊर्फ मा.रवी यांची खासियत होती. आपल्या सोप्या आणि गोडवा राखणाऱ्या संगीताने मा.रवी यांनी स्वतःची ओळख निर्माण केली होती.
रवी यांनी संगीताचे शास्त्रशुध्द शिक्षण घेतले नव्हते, तरीही त्यांना संगीताचा कान निश्चितच होता. लहानपणापासून आपल्या वडलांकडून ऐकलेली भजने आणि आजुबाजूला ऐकू येणार्या संगीताचे संस्कार त्यांच्या मनावर झाले होते. आपल्या कारकीर्दीत त्यांनी त्यावरच स्वरसाज चढविला. विशेष म्हणजे रवी यांच्यावर अमुक पध्दतीने संगीत देणारा संगीतकार असा कोणताच ठसा उमटविता येत नाही. कव्वाली (ऐ मेरी जोहराजबीं), बालगीत (चंदामामा दूर के, टिमटिम करते तारे), गझल (दिल के अरमां आँसूओं में बह गए), क्लब संगीत (बार बार देखो), भजन (तोरा मन दर्पन कहलाए, तुम्ही मेरे मंदिर तुम्ही मेरी पूजा), भावगीत यासारख्या अनेक प्रकारच्या चालींमध्ये त्यांनी गुंफलेली गाणी आजही रसिकांच्या तोंडी आहेत. पियानोवरील गाणी देण्यात त्यांचा हातखंडा होता. गुरुदत्त यांच्या `चौदहवी का चाँद’ चित्रपटातील गाण्यांनी रवी प्रसिध्दीच्या शिखरावर चढले. या चित्रपटाच्या शीर्षकगीताची चाल पाहिली तर उत्तररात्रीची शांतता आणि चंद्राची शीतलताच मनावर पांघरली जावी, असे वाटते. त्यानंतर आलेल्या `वक्त’मधील बहुतेक सर्वच गाणी लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार झाली. बलराज साहनीच्या तोंडची `ऐ मेरी जोहराजबीं, तुझे मालूम नहीं’ ही कव्वाली आजही मनात घर करून राहते, तर `आगे भी जाने ना तू’ हे गाणे ऐकणाऱ्याला स्वप्नसृष्टीत नेऊन सोडते. `धुंद’सारख्या थरारपटाचे शीर्षकगीतही लक्षात राहावे अशी त्यांची चाल आहे. यावरूनही त्यांच्या वैविध्य लक्षात येते.
अर्थात बदलत्या संगीत अभिरुचीमुळे १९८० च्या दशकानंतर रवी काहीसे मागे पडले. पण तेव्हाही `निकाह’ चित्रपटातील `दिल के अरमां’ या गाण्याने त्यांची शेवटची चमक दिसली.
रवी यांचा जन्म ३ मार्च १९२६ रोजी झाला. त्यांच निधन ७ मार्च २०१२ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ : इंटरनेट
March 3, 2017
’जीएं’शी झालेला त्यांचा पत्रव्यवहार पुढे हातकणंगलेकरांनी खंडरूपान्रे प्रसिद्ध केला. पुढे त्यांनी अनेक इंग्रजी कथांचे मराठीत लेखन केले, तर गो.नी.दांडेकर यांची माचीवरचा बुधा आणि व्यंकटेश माडगूळकर यांची सती या कांदबर्यांीचे इंग्रजीत अनुवाद केले.
July 14, 2022
१९६० ते १९८०या दशकात सिल्वर स्क्रीन गाजवणारा अभिनेता म्हणजे धर्मेंद्र हे असे एक अभिनेता आहेत. धर्मेंद्र यांनी मोठ्या पडद्यावर गुंडाबरोबर चार हात करताना तितकाय्च सहजपणे अभिनेत्र्याबरोबर रोमान्स केला. म्हणून त्यांना हिमॅन आणि 'गरम धरम' अशा नावाने पण ओळखले जाते. त्यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी झाला.
१९६० साली अभिनयक्षेत्रात पदार्पण केलेल्या धर्मेंद्राने आत्तापर्यंत २५० हून अधिक चित्रपटांमधून भूमिका केल्या आहेत. दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटाने त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. १९७६ ते १९८४ च्या काळात त्यांनी अनेक अॅक्शनपट केले.बिमल रॉय, जे पी दत्ता, मोहन कुमार, दुलाल गुहा, राजकुमार कोहली, राज खोसला, रमेश सिप्पी अशा अनेक दिग्दर्शकांसह त्यांनी काम केले.अर्जुन हिंगोरानींनी दिग्दर्शित केलेले त्यांचे चित्रपट खास गाजले. त्यांनी कब क्यू कहा, कहानी किस्मत की, खेल खिलाडी का कातिलो के कातिल, कौन करे कुरबानी या चित्रपटात एकत्र काम केले. फूल और पत्थर चित्रपटात त्यांनी मीना कुमारींसह काम केले.
मीना कुमारी, माला सिन्हा, सायरा बानू, शर्मिला टागोर, आशा पारेख, परवीन बाबी, हेमा मालिनी, रीना रॉय, जया प्रदा या मोठ्या अभिनेत्रींसह त्यांनी कामे केली. शोले चित्रपटादरम्यान धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यात प्रेमप्रकरण सुरु असल्याची चर्चा होती. जुगनू, ललकार, ब्लॅकमेल, यादो की बारात या चित्रपटांमुळे ते अॅक्शन हिरो म्हणून नावाजले जाऊ लागले. हेमा मालिनींसोबतची त्यांची जोडी नेहमीच हिट राहिली. शोले चित्रपटात त्यांनी साकारलेली विरूची भूमिका आजही सर्वांच्या लक्षात आहे. त्यांनी अनेक पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
धर्मेंद्र यांनी आपल्या मुलांसाठी चित्रपटांची निर्मितीही केली. त्यांनी निर्मिती केलेल्या चित्रपटाद्वारे त्यांच्या मुलांनी बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले. सनी देओलने बेताब तर बॉबीने बरसात चित्रपटाद्वारे बॉलीवूड पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी भाचा अभय देओलसाठी सोचा ना था चित्रपटाची निर्मिती केली.धर्मेंद्र यांनी उत्तरकाळात राजकारणातही उडी घेतली. २००४ सालातील भारतीय लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ते राजस्थान येथील बिकानेरातून भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक जिंकून लोकसभा सदस्य बनले.२०१२ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
December 8, 2017
साहिर लुधियानवी यांचे खरे नाव अब्दुल हयी.
त्यांचा जन्म ८ मार्च १९२१ रोजी लुधियाना येथे झाला. लुधियानात साहिर यांनी शिक्षण घेऊन काही काळ दिल्लीत राहून मग मुंबईकडे मोर्चा वळवला. प्राचार्यांच्या हिरवळीवर एका मुलीसोबत बसल्यामुळे त्यांना कॉलेजमधून काढूनही टाकलेले होते. साहिर यांच्या आयुष्यात अनेक प्रेमिका आल्या. मात्र त्या सर्वांमध्ये ज्ञान पीठ पुरस्कार विजेत्या 'अमृता प्रीतम' हे नांव सर्वात वर!
नौजवान आणि प्यासा या हिंदी चित्रपटांनंतर साहिर यांनी अख्ख्या भारतालाच वेड लावले. आओ की कोई ख्वाब बुने ही त्यांची कविता अत्यंत सुंदर! तल्खिया, परछाईया व अनेक काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. साहिर यांचे काव्य उच्च दर्जाचे असूनही सुप्रसिद्ध असायचे व आहे. ही दोन टोके जमवणे अनेक कवींना अवघड जाते. मा.गुलजार हे मा.साहिल यांचे काही काळ रूममेट होते असे म्हणतात. सुरुवातीच्या काळात हलाखीची परिस्थिती आणी नंतर पैशाचा नुसता धबधबा यामुळे त्यांचे आयुष्य बरेचसे अनियंत्रीत स्वरुपाचेच होते. त्यांनी आयुष्यात लग्न केले नाही. मात्र या व्यक्तीमत्वावर आणि त्यांच्या काव्यावर अनेक स्त्रियांनी जान कुर्बान करण्यापर्यंत प्रेम केले हे मात्र खरे!
जगातील इतर लोकांवर निस्सीम प्रेम करणारा, अमृता प्रीतम बरोबरील प्रेमप्रकरण गाजवणारा, गुरुदत्तच्या प्यासामधील गीते रचणारा, मद्यपान आणि धूम्रपान यात आयुष्य फेकून देणारा.. .... आणि... यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोचल्यानंतर 'लता मंगेशकरांनी' घेतलेल्या मानधनापेक्षा एक रुपया कायम जास्त मानधन'च' घेणारे...मा.साहिर लुधियानवी हे शायर आपल्या सर्वांनाच चित्रपट गीतकार म्हणून अधिक परिचित आहे. जो वादा किया वो निभाना पडेगा, कभी कभी मेरे दिल मे, चलो इक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो, तुम न जाने किस जहांमे खो अशी अजरामर गीते साहिर यांनी लिहिलेली आहेत. मा.साहिर लुधियानवी यांचे २५ ऑक्टोबर १९८० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
साहिर लुधियानवी यांची गाणी
https://www.youtube.com/shared?ci=-Le4BMzrr2c
https://www.youtube.com/shared?ci=4Qp_V08TtQI
भारत पाकिस्तानमधील युद्धाबाबत साहिर लुधियानवी यांनी रचलेली कविता
खून अपना हो या पराया हो
नस्ले-आदम का खून है आखिर
जंग मशरिक मे हो कि मगरिब मे (मशरिक = पुर्व, मगरिब = पश्चिम)
अम्ने-आलम का खून है आखिर (अम्ने-आलम = विश्व शान्ती)
बम घरोंपर गिरे के सरहदपर
रूहे-तामीर जख्म खाती है (रूहे-तामीर = निर्मीतीचा आत्मा)
खेत अपने जले कि औरोंके
जस्ति फाकोंसे तिलमिलाती है (जस्ति - जीस्त = जीवन)
इस लिये ए शरीफ इन्सानो
जंग टलती रहे तो बेहतर है
आप और हम सभीके आंगनमे
शम्मअ जलती रहे तो बेहतर है
March 11, 2017
वालुकाशिल्प बनवणाऱ्या कलाकारांमध्ये भारतातील एकमेव आणि जगातील अग्रणी म्हणुन आज सुदर्शनचं नाव घेतलं जातं. बर्लीनच्या किनाऱ्यावर झालेल्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट वाळुशिल्पकारचा किताब त्याने २००८ मध्ये, स्पर्धेतील त्याच्या पदार्पणातच जिंकला आणि जगभर त्याचा दबदबा निर्माण व्हायला सुरूवात झाली. आज सुदर्शनकडून या कलेचे धडे घेण्यासाठी जगभरातल्या सगळ्या समुद्रकिनाऱ्यावरचे लोक येतात. त्यासाठी त्याने सुदर्शन सॅण्ड आर्ट ईन्स्टीट्युट देखील स्थापन केले आहे.
April 15, 2022
मालती बेडेकर ह्या मराठीतल्या पहिल्या स्त्रिवादी लेखिका होत्या.
March 3, 2018
लतादीदींनी हिंदी,मराठी भाषेत तर गाणी गायलीच आहेत पण ३६ हुन अधिक प्रादेशिक व विदेशी भाषेत सुद्दा गाण्याचे रेकॉर्डिंग केले. १९८६ साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा हिंदी सिनेमातील सर्वोच्च सन्मान होता. दिदीच्या आयुष्यातील एक महत्वाचा प्रसंग २७ जानेवारी १९६३ रोजी त्यांनी ‘ये मेरे वतन के लोगो’ हे गीत गाऊन भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित-जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यात अश्रू आणले.
September 28, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti