(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आनंद गंधर्व’ आनंद भाटे

    आनंद भाटे हे एका माहिती तंत्रज्ञान कंपनीत अधिकारी पदावर काम करतात. आपली नोकरी सांभाळून ते गायन करतात. आनंद भाटे यांच्या घरात आधीपासूनच संगीताचे वातावरण होते. त्यांचा जन्म २९ एप्रिल १९७१ रोजी झाला. त्यांचे पणजोबा भाटे बुवा हे ठुमरी गायनातील व नाट्यसंगीतातील एक प्रसिद्ध गायक होते. त्यांचीही नाटक कंपनी होती, आनंद भाटे यांची संगीताची आवड पाहून त्यांच्या वडिलांनी वयाच्या दहाव्या वर्षी बालगंधर्वांचे ऑर्गन वादक हरिभाऊ देशपांडे यांचे चिरंजीव चंद्रशेखर देशपांडे यांच्याकडे त्यांना संगीत शिक्षण घेण्यास पाठवले. यशवंत मराठे यांच्याकडे ही त्यांनी शास्त्रीय शिक्षणाचे धडे गिरवले. आनंद यांनी २७ ऑगस्ट १९८१ रोजी म्हणजेच वयाच्या दहाव्या वर्षी मुंबई दूरदर्शनवरून "परब्रह्म निष्काम" आणि "जोहारमायबाप" ही दोन गाणी म्हणाली होती व आपला पहिला गाण्याचा कार्यक्रम केला.

    आनंद भाटे हे पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य. संगीत नाटकांतील नाटय़पदे आणि अभिनयामुळे मराठी रंगभूमीवर सुवर्णयुग निर्माण करणारे बालगंधर्व आणि शास्त्रीय संगीताबरोबरच संतवाणीच्या माध्यमातून श्रोत्यांवर आपल्या आवाजाचे गारुड करणारे पं. भीमसेन जोशी या दोघांचीही गायनशैली पूर्णपणे वेगळी होती. आनंद भाटे हे दोघांना जोडणारा समान धागा आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्याच एका कार्यक्रमात कमलाकर नाडकर्णी यांनी आनंद यांना ‘आनंद गंधर्व’ ही पदवी दिली. आणि मग पुढे कार्यक्रमालाही तेच नाव देण्यात आले. अनेक वेळा सवाई गंधर्व महोत्सवात त्यांनी आपले गायन सादर केले आहे. पंडित भीमसेन जोशी आणि बालगंधर्व हे त्यांचे आदर्श आहेत. जुन्या मैफलींची क्षणचित्रे, त्यांच्याकडचे अंदाजे १०० वर्षे जुने असलेले उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेबांचे तानपुरे आहेत. नवीन पिढीतल्या कोणत्या शिष्यांकडून अपेक्षा आहेत या प्रश्नाला पंडित भीमसेन जोशी यांनी "आनंद भाटे", असे दूरदर्शनवरील एका मुलाखतीत सांगितले होते. बालगंधर्व यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात त्यांनी अनेक गाणी गायिली असून त्यातील अनेक गीतांना पुरस्कार मिळाले आहेत. आनंद भाटे यांना "बालगंधर्व" या मराठी चित्रपटातील ‘चिन्मया सकल हृदया’ या भैरवीसाठी २०११ चे राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    आनंद भाटे यांचे गायन

    https://www.youtube.com/watch?v=pL5U1wVWNZQ

      April 29, 2017


  • रत्नागिरीतील ज्येष्ठ उद्योजक नानासाहेब भिडे

    नाना स्वभावानं मृदू असले तरी व्यवहाराच्या बाबतीत पक्के शिस्तप्रिय होते. वस्तूंची उधळमाधळ करणं, फुकट घालवणं दिसलं की त्यांना रागावर नियंत्रण करता येत नाही. ते स्वतः कधीही गल्ल्यावर मालकाच्या थाटात आजपर्यंत बसले नाहीत. रोजची रोकड किती जमा झाली एवढेच नानांना माहीत असते. घरामध्ये एका विशिष्ट ठिकाणी रोजचे कुठूनही मिळालेले पैसे, व्यवहारातील, कौटुंबिक भेटी-पाकीटे सर्व एकत्र राहिले पाहिजेत असा त्यांचा कटाक्ष असे.

      June 3, 2022


  • सुप्रसिद्ध लेखिका गौरी देशपांडे

    कथा, कादंबरी, ललित लेख, स्फुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार गौरी देशपांडे यांनी हाताळले आहेत. मराठीबरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी -मराठी व मराठी- इंग्रजी अनुवादसुद्धा प्रकाशित झाले आहेत.

      March 2, 2022


  • आनंद दिनकर कर्वे

    ग्रामीण उपयोजीत तंत्रज्ञानाचे एक गाढे अभ्यासक आणि दोनदा अॅश्डेन पुरस्कारप्राप्त (२००२ आणि २००६) भारतीय शास्त्रज्ञ

      December 15, 2010


  • वसंत आठवले

    पुस्तकांच्या दुनियेत सगळय़ात महत्त्व मिळते ते लेखकाला! त्याच्या प्रतिभेतून एखादी कलाकृती निर्माण होते तेव्हा त्याचे सारे श्रेय त्या निर्मिती करणाऱ्या लेखकालाच मिळते. त्या लेखकाने लिहिलेले शब्द पूर्वी लोखंडी खिळय़ांत आणि आता संगणकावर जुळवणाऱ्या ‘कंपोझिटर’चे किंवा जुळवलेले शब्द तपासणाऱ्या मुद्रितशोधकाचे किंवा पुस्तकाची छपाई करणाऱ्या आणि त्याचे बाइंडिंग करणाऱ्या कुणाचे नावही सहसा कधी प्रकाशात येत नाही.

    (कायद्याने मुद्रक आणि प्रकाशकाचे नाव व पत्ता प्रसिद्ध करणे आवश्यक असते, त्यामुळे ते छापले जाते, एवढेच!) एवढे सगळे झाल्यानंतर त्या पुस्तकाचे वाचकांपर्यंत जाणे ही तर सर्वात महत्त्वाची गोष्ट! त्यासाठी असणाऱ्या पुस्तक विक्रेत्यांना तर कुणी ओळखतही नाही. पुस्तकांची भव्य दालने उभारणाऱ्यांची ही गत, तर रस्त्यावर बसून अल्प दरात ज्ञानदान करणाऱ्याला कोण कशाला पुसतो? पुण्यात भरलेल्या ८३व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाने मात्र रस्त्यावर पुस्तक विक्री करणाऱ्या पुण्यातल्या एका ज्ञानभक्ताच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करून एक औचित्यपूर्ण पायंडा पाडला असेच म्हणावे लागेल. पुण्यातल्या बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिराच्या बाहेरच्या कट्टय़ावर गेली ४० वर्षे जुन्या पुस्तकांच्या विक्रीचा व्यवसाय करणारे वसंत आठवले यांच्या मनात उद्घाटन करत असताना कोणत्या भावना उचंबळून आल्या असतील? त्यांच्या दृष्टीने साहित्याच्या पंढरीत आपण वारकरी म्हणून सहभागी झाल्याचा कृतार्थ भाव असणे स्वाभाविक असले, तरी पुस्तकांच्या दुनियेतील सर्वात शेवटच्या पायरीवरचा हा पालखीचा भोई किती महत्त्वाचा आहे, याचे भान यानिमित्ताने साहित्य व्यवहारातल्या सगळय़ांनाच आले, हे फार चांगले झाले. आपले वडील यशवंत नारायण आठवले यांनाश्रेय देताना वसंत आठवले यांना त्यांचा जुनी पुस्तके जमविण्याचा छंद आठवतो. वडील रंगभूमीवर छोटय़ा-मोठय़ा भूमिका करत होते आणि त्यांचा गंधर्व संगीत नाटक मंडळींशी जवळचा संबंध होता. (‘एकच प्याला’च्या शेवटच्या प्रयोगात त्यांनी बालगंधर्वाबरोबर ‘सुधाकर’ची भूमिका केली होती!) चित्रपटांच्या आगमनानंतर मराठी रंगभूमीची जवळजवळ वाताहत झाली आणि यशवंतरावांना त्यांचा छंद उपयोगी पडला. तेव्हा वसंतराव तारुण्यात पदार्पण करत होते. बालगंधर्व हे वसंतरावांचेही दैवतच! बालगंधर्वावरील पुस्तकाच्या किमान पंधराशे प्रती विकल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडत असतो. किलरेस्कर ऑईल इंजिन्समधील ग्रंथालयातल्या नोकरीतून त्यांनी १९८५मध्ये स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. त्यापूर्वीपासूनच म्हणजे ७१पासून त्यांनी जुन्या पुस्तकांच्या विक्रीचा व्यवसायही सुरू केला होता. डॉ. रा. चिं. ढेरे यांच्यासारख्या अनेक संशोधकांचे सोबती म्हणून आठवले यांनी फार मोठी कामगिरी बजावली आहे. जुनी पुस्तके ही केवळ त्यातील साहित्यमूल्यांमुळेच विक्रीयोग्य होतात, याचे उत्तम भान वसंतरावांकडे आहे. त्यामुळे उत्तम पुस्तके मिळवणे आणि ती योग्य त्या व्यक्तींपर्यंत पोहोचवणे यातील जो अपूर्व आनंदाचा भाग आहे, तो वसंतरावांना अनेक वेळा मिळाला आहे. जरी त्या पुस्तकांच्या विक्रीतून मिळणारा पैसा यथातथाच असला, तरी त्यांना पुस्तकाचे मूल्य फार उत्तम रीतीने जाणवते, असा निर्वाळा अनेक ज्येष्ठ साहित्यिकांनी आणि संशोधकांनी दिला आहे. अनेक साहित्यिकांशी जवळची ओळख किंवा मैत्री असली, तरी वसंतरावांच्या चेहऱ्यावर त्याचे जराही प्रदर्शन कधी होत नाही. त्यांच्या दृष्टीने पुस्तकांचे प्रेम हेच खरे आणि टिकाऊ! गेली अनेक वर्षे सरस्वती मंदिराच्या कट्टय़ावर पुस्तके विकणाऱ्या या पुस्तक विक्रेत्याला रद्दीवाला म्हणून संबोधण्याची कुणाची हिंमतही होणार नाही, असे कार्य या व्यक्तीने केले आहे. शनिवारवाडय़ाचा १८१८ (म्हणजे ज्या वर्षी ब्रिटिशांनी याच वाडय़ावर युनियन जॅक फडकवला.) आणि १८२८ मधील नकाशा पुणे महानगरपालिकेला मिळाला, तो केवळ वसंतराव आठवले यांच्यामुळेच! जुन्या पुस्तकांमधील ज्ञानाचे अचूक निदान करता येण्यासाठी आवश्यक अभ्यास असणारा हा ज्ञानसाधक साहित्य संमेलनामुळे रस्त्यावरून साहित्याच्या व्यासपीठावर विराजमान झाला, हीच महत्त्वाची गोष्ट!

      August 5, 2017


  • चिनार खारकर

    ठाण्यातील केबल वाहिनीसाठी एका स्थानिक जाहिरातीचे संगीत संयोजन करुन २००१ साली आपल्या संगीत क्षेत्रातील कारकीर्दीची सुरुवात करणार्‍या खअरकर यांनी आपल्या यशाचा चढता आलेख कायम ठेवलेला आहे.

      May 29, 2014


  • जेष्ठ हार्मोनियमवादक पं.तुळशीदास बोरकर

    जेष्ठ हार्मोनियमवादक पं.तुळशीदास बोरकर बोरकर यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९३४ रोजी गोव्यातील बोरी येथे झाला.
    पं.तुळशीदास बोरकर उर्फ बोरकर गुरुजी संवादिनी वादन क्षेत्रातील ऋषितुल्य नाव. आज घडीला संवादिनी अर्थात पेटीवर प्रभुत्व असणारी जी काही मान्यवर मंडळी आहेत त्यातील हे अग्रगण्य नाव होते. प्रतिकूल परिस्थितीतून काम करत गुरुजींनी स्वताला घडवलं होते. त्यामागे त्यांचा रियाज तर होताच पण संवादिनी प्रतीचं प्रेम अधिक होते. पं.तुळशीदास बोरकर यांच्या घरापासून जवळच नवदुर्गेचं देऊळ होतं. त्या वेळी ते बरेचदा त्या देवळांमध्ये जाऊन बसत असत. भजन, कीर्तनावर तिथले हार्मोनियमवादक सुंदर साथ करत असत. पण त्या सुरांनी त्यांना आकर्षून घेतलं होतं.

    काही काळानंतर त्यांचे वडील अचानक वारल्याने गोव्याहून पुण्याला यावे लागले. पं.तुळशीदास बोरकर यांची मोठी बहीण, उत्तम कलागुण असलेली अभिनेत्री होती. त्यांना छोटा गंधर्वानी ‘कलाविकास’ मध्ये बोलावून घेतलं. ते त्यांच्या बरोबर तालमींना जात असत. कंपनीचे ऑर्गनवादक विष्णुपंत वष्ट यांनी विचारलं, ‘‘काय रे तुला हार्मोनियम शिकायची आहे का?’’ आणि त्यांनीच हार्मोनियम शिकवायला सुरुवात केली. त्यानंतर पुढच्याच आठवडय़ात त्यांचा नागपूरला दौरा होता. तिथे जबरदस्त थंडी होती. एक दिवस वष्ट गुरुजींनी पहाटे चार वाजता त्यांना उठवलं आणि म्हणाले, ‘‘चल शिकायला बस.’’ त्यांचीच लहानशी पेटी होती. त्यावर सात शुद्ध स्वर कसे वाजवायचे ते शिकवलं. तेव्हा सलग चार तास त्यांनी रियाज केला. मग नऊ वाजता म्हणाले, ‘‘ऊठ. चहा वगैरे घेऊन दहा वाजता परत ये.’’ त्यानंतर पुन्हा चार-पाच तास शिकायला बसले. म्हणजे त्या पहिल्याच दिवशी त्यांनी १२ ते १४ तास रियाज करून घेतला.

    काही वर्षानी ‘कलाविकास’ बंद पडली. या कंपनीचे पाच-सहा मालक होते. छोटा गंधर्व, केशवराव कुंटे, शंकर आपटे, हंसराज कोरडे, नागेश जोशी, दिगंबर भुमकर. त्यापैकी दोन-तीन जणांनी मिळून १९४९-५० दरम्यान ‘श्री.कलाविकास’ ही नवीन संस्था सुरू केली. त्यात छोटा गंधर्व आणि नागेश जोशी नव्हते. ‘देवमाणूस’ हे संगीत नाटक करायचं होतं. कुंटे यांनी या कंपनीसाठी गानू मास्तरांना ऑर्गनवादक म्हणून घेतलं. पंधरा दिवस झाले तरी त्यांच्या हातात ती गाणी बसेनात. मग कुंटे म्हणाले, ‘‘तुळशीदास तू ही गाणी ऐकलीयेस. बघ जरा, बस साथीला.’’ पं.तुळशीदास बोरकर म्हणाले ‘‘मला दोन्ही हातांनी वाजवता येत नाही.’’ ते म्हणाले, ‘‘चालेल, एका हाताने वाजव.’’ ते एका हाताने ती गाणी वाजवली. त्याबरोबर त्यांनी ओळखलं की हा मुलगा हे काम निभावू शकेल. मग त्यांनी ऑर्गनची बाजू पं.तुळशीदास बोरकर यांच्या वर ढकलली. या नाटकाच्या साथीसाठी २५ रुपये महिना पगार मिळाला होता.

    तेव्हापासून ते जो ऑर्गन वाजवू लागले तो कायमचा. त्यानंतर साधारण १९५२ साली छोटा गंधर्वानी पं.तुळशीदास बोरकर gov 'यांच्या कडून ‘संगीत सौभद्र’ची १२-१३ गाणी बसवून घेतली. गोपीनाथ सावकारांची संस्था होती. मग दर आठवडय़ाला ते पुण्याहून मुंबईला यायचे.

    पुण्यात छोटा गंधर्वाचं आणि पं.तुळशीदास बोरकर यांचं घर जवळच होतं. ते दर रविवारी त्यांच्याकडे तालमीसाठी जाऊन बसत असे. त्यांचा रियाज चालू असायचा. छोटा गंधर्वानी त्यांना रागदारी संगीत शिकवले. पण छोटा गंधर्व नाटकात गायलेले असल्यामुळे शास्त्रीय संगीत जगतात त्यांचं फारसं नाव नव्हतं. वास्तविक पाहता छोटा गंधर्व हा अतिशय हुशार माणूस. ते शास्त्रीय संगीत शिकले होते. पण शास्त्रीय संगीत गाणारी मंडळी संगीत नाटकातल्या गायक-नटांना दुय्यम मानत असत. त्यामुळे छोटा गंधर्वाचं शास्त्रीय संगीत गायक म्हणून फारसं नाव झालं नाही. त्या दरम्यानच त्यांना ‘मंदारमाला’ नाटकात ऑर्गन वाजवायची संधी मिळाली. चाळीस रुपये बिदागी मिळत होती. तिथे पं. राम मराठेंचा त्यांना सहवास लाभला. शास्त्रीय संगीत आणि नाटय़संगीत या दोन्हींवर त्यांची हुकूमत होती. लोक त्यांना मानत होते. ते त्यांच्या गायकीचा अभ्यास करत होते आणि त्यांना गुरू मानू लागले.

    पुढे पं.तुळशीदास बोरकर यांनी पी. मधुकर (मधुकर पेडणेकर) यांच्या कडे शिक्षण घेतले. तसेच पं. एस. सी. आर भट, पं. के. जी. गिंडे यासारख्या अनेक मातब्बरांचं मार्गदर्शन त्यांना मिळालं.

    पं.तुळशीदास बोरकर मल्लिकार्जुनजी यांची आठवण सांगताना म्हणतात, १९७८-८०च्या दरम्यान मल्लिकार्जुन मन्सुरांचा सत्तरावा वाढदिवस पु. ल. देशपांडेंच्या अध्यक्षतेखाली पाल्र्याच्या टिळक मंदिरात साजरा केला जाणार होता. त्या वेळी मल्लिकार्जुन मन्सुरांची हार्मोनियम मी टय़ून करून दिली होती. पु.ल. आणि मल्लिकार्जुनजी बेंगेरी आडनावाच्या गृहस्थांकडे गप्पा मारत बसले होते. तेवढय़ात मी आणि पन्नालाल घोष यांचे शिष्य आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक देवेंद्र मुर्डेश्वर तिथे गेलो. पुलंनी मल्लिकार्जुनजींना माझी ओळख करून दिली. ते म्हणाले, ‘‘अण्णा, मुंबईचे जे दोन-चार ऑर्गनवादक आहेत, त्यांच्यात या पोराचा हात मला आवडतो.’’ त्याबरोबर मल्लिकार्जुन लगेच म्हणाले, ‘‘अरे, मग आज याला साथीला बसू दे.’’ पण त्या कार्यक्रमासाठी बबनराव मांजरेकरांना आधीच बुक केलं होतं. त्यामुळे मी साथ करण्याचा प्रश्नच नव्हता. कार्यक्रमाच्या ठिकाणी पहिल्या रांगेत सगळे मातब्बर कलाकार बसले होते. प्रेक्षकांची तुफान गर्दी होती. पुलंच्या प्रास्ताविकाने छान माहोल तयार झाला आणि त्यानंतर मल्लिकार्जुनांचं गाणं होतं. मध्यांतरापर्यंत कार्यक्रम उत्तम झाला. पण बबनराव मांजरेकर डोंबिवलीला राहत असल्याने त्यांना दुस-या दिवशीच्या आकाशवाणी डय़ुटीसाठी लवकर निघावं लागणार होतं. पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत ते थांबू शकत नव्हते. त्याबरोबर मल्लिकार्जुन मन्सुरांनी मला त्यांच्या साथीला बसायला सांगितलं. मला दरदरून घाम फुटला. लोकांकडेही बघायची माझी हिंमत नव्हती. पण मन्सुरांची आज्ञा होती. त्यामुळे मी साथीला बसलो आणि कार्यक्रम सुफळ संपूर्ण झाला. तो संपल्यावर मन्सुरांना तबला साथ करणारे निझामुद्दिन खान मला म्हणाले, ‘वाह बोरकर!’ मला आनंद झाला.

    बेंगेरीसाहेबांनी मला बिदागी दिली. घरी येऊन देवासमोर ठेवल्यानंतर बघतो तर त्या लिफाफ्यात ५०० रुपये होते. त्या काळात ५०० रुपये बिदागी म्हणजे खूपच मोठी किंमत होती. तसंच एकदा किंग जॉर्ज शाळेत ‘मानापमान’चा प्रयोग होता. त्या प्रयोगाच्या आधी ‘दे हाता या शरणागता’ या गाण्यातल्या अंत-याच्या ‘संपदा चपलचरणा’ या ओळीवर मी टाळी घेऊन दाखवेन, असं त्यांनी प्रयोगाच्या आधी सांगितलेलं. त्याप्रमाणे त्यांनी एक भलीमोठी हरकत घेतली आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यानंतर तीच हरकत मी हार्मोनियम वर जशीच्या तशी वाजवली आणि त्यालाही प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. नाटकातल्या संगतकाराला अशी टाळी मिळणं फार दुर्मीळ. असाच आणखी एक अविस्मरणीय प्रसंग आहे. एकदा शोभा गुर्टूबरोबर मी लंडनला गेलो होतो. पाच-दहा प्रोग्रॅम्सचा दौरा होता. शेवटच्या कार्यक्रमाच्या वेळी पं. रविशंकर प्रमुख पाहुणे होते.

    कार्यक्रम संपल्यानंतर आयोजकांनी पं. रविशंकर यांना कार्यक्रमातल्या कलाकारांचा सन्मान करण्याची विनंती केली. त्या वेळी त्यांनी कौतुकाने माझी पाठ थोपटली आणि म्हणाले, ‘‘बेटे, अच्छी संगत करते हो, बहुत अच्छे!’’ ज्या रविशंकरांना कार्यक्रमां मध्ये खूप ठिकाणी ऐकलं. पण त्यांना जवळून बघता येईल का, असा मी विचार करत असे, त्या रविशंकरांनी मला आशीर्वाद दिल्यानंतर मी धन्य झालो. पं. तुळशीदास बोरकर यांनी पं. मल्लिकार्जुन मन्सूर, पं. भीमसेन जोशी, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. राम मराठे, पंडिता गंगुबाई हनगल, डॉ. प्रभा अत्रे यासारख्या दिग्गज कलाकारांना साथ केली आहे. पं.तुळसीदास बोरकर यांनी प्रा. मधुकर तोरडमल दिग्दर्शित हे बंध रेशमाचे या नाटकाचे साहाय्यक संगीत दिग्दर्शन केले होते.

    पं. तुळशीदास बोरकर यांना साहित्य कला अकादमीचा पुरस्कार दोन वेळा, ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’, ‘गोविंदराव टेंबे संगीतकार पुरस्कार’, ‘मा. दिनानाथ मंगेशकर स्मृती गुणगौरव पुरस्कार’, गोवा सरकारच्या सांस्कृतिक कलासंचनालयाचा राज्य पुरस्कार, भारत गायन समाजातर्फे देण्यात येणारा ‘पं. रामभाऊ मराठे पुरस्कार’, ‘चतुरंग संगीत सन्मान पुरस्कार यासारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केल आहे. संवादिनी वादनाकरिता सन्मानित केले जाणारे ते पहिले आणि मराठी मातीतले म्हणूनही ते एकमेव वादक होते. पं.तुळशीदास बोरकर यांचे निधन २९ सप्टेंबर २०१८ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 18, 2018


  • प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सितारादेवी

    सितारादेवी यांची गेल्या सहा दशकांहून अधिक काळ प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना अशी ख्याती राहिली होती. सितारा देवींनी देशविदेशांमध्ये कथ्थक नेले. लोकप्रिय केले आणि कथ्थकला रसिकांच्या मनात कायमसाठी एक उन्नत स्थान त्यांनी मिळवून दिले.

      May 10, 2019


  • प्रा.जगन्नाथ वाणी

    कॅनडातील मॅकगील विद्यापीठातून गणितात पीएचडी आणि त्यानंतर कॅनडातल्याच कॅलगरी विद्यापीठात गणिताचे अध्यापन करताना प्रा. जगन्नाथ वाणी यांनी आपले समाजसेवेचे सूत्र कधी सोडले नाही. कॅनडातून भारतातील उपक्रमांना भरघोस अर्थसाह्य मिळवून दिले व स्वत: ही संगीत, चित्रपटनिर्मिती अशा अनेक प्रांतात वेगळा ठसाही उमटविला. विविध क्षेत्रांतील त्यांच्या कार्याचा गौरव कॅनडा सरकारने सर्वोच्च सन्मान देऊन केला.

    सूत्र जनसेवेचे

      July 14, 2017


  • एक अभिमानास्पद मित्र – डॉ. अब्दुल कलाम

    एक वर्षापूर्वी आजच्याच दिवशी जगप्रसिध्द शास्त्रज्ञ व आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी जगाचा निरोप घेतला. माझ्या या अभिमानास्पद मित्राला अंत:करणापासून श्रध्दांजली.

    बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे विशाल सभागृह विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने ओसंडून वाहत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम मंचावर येऊन उभे राहिले आणि विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून अख्खे सभागृह डोक्यावर घेतले. वातावरण चैतन्याने अक्षरशः भारून जाणे म्हणजे काय असतं हे प्रत्येकाने अनुभवण्यास सुरवात केली. मंचावरील सर्व मंडळी आसनांवर स्थानापन्न झाल्यावर व दीपप्रज्वलन, प्रास्ताविक इ. उपचार आटोपल्यानंतर कलाम साहेब बोलण्यास उभे राहणार एवढ्यात ध्वनिक्षेपण यंत्रणा अचानक बंद पडली आणि आयोजकांचे धाबे दणाणले व यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी धावपळ सुरु झाली. मी पहिल्या रांगेत बसलो होतो व सर्व घडामोडी मला अगदी जवळून बघायला मिळत होत्या. मला वाटलं, ते आयोजकांजवळ नाराजी व्यक्त करतील, पण तसं न घडता त्यांनी खाणाखुणा करून यंत्रणा नियंत्रित करणाऱ्या माणसाचे स्वतःकडे लक्ष वेधले आणि ती कशी दुरुस्त करायची हे त्याला समजावून सांगितले. काही क्षणातच ध्वनिक्षेपण यंत्रणा सुरु झाली आणि त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यास सुरवात केली. विलक्षण प्रेरणादायक असलेलं ते भाषण टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात संपलं आणि राज्य मंत्री मंडळातील काही मंत्री व बारामतीतील अतिविशिष्ठ व्यक्तींशी संवाद साधण्यासाठी कलाम साहेब त्या परिसरातील अतिथीगृहाकडे रवाना झाले.

    कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मिटींग सुरु होण्यास काही मिनिटं राहिली असताना मी तिथे पोहोचलो. सभागृह अनेक अतिविशिष्ठ मंडळींनी गजबजून गेले होते. डॉ. कलामांना मी स्वतःची ओळख करून देऊन भेटीचा उद्देश सांगताच त्यांनी माझा हात धरून त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसवून घेतले. ‘तुमची मिटींग आटोपल्यावर आपण बोलू’ असं मी म्हणताच ते म्हणाले ‘या मिटींगपेक्षा आपल्या चर्चेचे विषय मला जास्त महत्त्वाचे वाटतात कारण त्यांचा संबंध थेट आपल्या शेतकरी बांधवांशी आहे.’ विजेच्या वापराशिवाय सिंचन, स्वयंपूर्ण खेडी, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयांवर मला अनेक प्रश्न विचारून ते थांबले नाहीत तर त्यावर तयार केलेल्या नोट्स तिथेच वाचून त्यांनी उपस्थित मंत्र्यांना काही प्रश्नही विचारले. संसद भवनावर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर मी तयार केलेल्या सुरक्षा व्यवस्थेच्या आराखडयावरही आमची चर्चा झाली. पाच मिनिटात संपेल असं वाटणारी चर्चा तब्बल वीस मिनिटे झाली तरी सुरूच होती. उपस्थितांमध्ये वाढू लागलेली अस्वस्थता बघून मी कलाम सरांचा निरोप घेण्याची तयारी करताच त्यांनी मला चहा घेण्याची व मान्यवरांच्या मिटींगमध्ये सहभागी होण्याची विनंती केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांविषयी वस्तुस्थिती कथन करताना विलक्षण खिन्नतेने त्यांचा चेहरा झाकोळून गेला होता व डोळे पाणावले होते. भारतासारख्या देशाचा एक राष्ट्रपती किती संवेदनशील असू शकतो हे बघून मी थक्क झालो.

    मिटींग संपल्यानंतर चर्चेनंतर उपस्थितांची फोटो सेशनसाठी लगबग सुरु झाली. आम्ही सर्वांनी फोटोसाठी पोझ दिली, पण कॅमेऱ्याने फोटो काढण्यास नकार दिला आणि आयोजकांना घाम फुटला. ग्रुपमध्ये माझ्या शेजारी उभे असलेले कलाम साहेब शांतपणे फोटो काढण्याची धडपड करणाऱ्या तरुणाकडे गेले, कॅमेऱ्याचं निरीक्षण करून त्याच्याशी काहीतरी बोलले आणि पुन्हा आमच्या ग्रुपमध्ये येऊन सुहास्य वदनाने उभे राहिले. त्यांचा विलक्षण साधेपणा व निगर्वीपणा बघून मी थक्क झालो असतानाच फोटो सेशन संपले व पुन्हा लवकरच भेटण्याचे ठरवून आम्ही एकमेकाचा निरोप घेतला.

    ज्यांच्या भेटीने उभ्या आयुष्याचं सार्थक झाल्याची भावना निर्माण व्हावी, ज्यांच्या विलक्षण प्रेरणादायी पण तितक्याच सध्या व्यक्तिमत्त्वाने भारून जावे, आदर्शांचा दुष्काळ पडलेल्या या देशात ज्यांचा आदर्श जिवापाड जपून एखादे महान कार्य उभे करण्याची प्रेरणा मिळावी असे थोर शास्त्रज्ञ, लेखक, कवी, डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम आज आपल्यात नसले तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रेरणादायक स्मृती आपल्या देशातील तरुणांना सतत प्रेरित करत राहतील. या महामानवाला माझी अंत:करणापासून श्रद्धांजली.

    श्रीकांत पोहनकर
    98226 98100
    shrikantpohankar@gmail.com

      July 27, 2016