जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे सरकार येणे काहीसे दुरापास्त झाले होते. काही आमदारांचे संख्याबळ कमी पडत असताना यशवंतराव चव्हाणांना साथ मिळाली ती विदर्भातील काँग्रेसच्या आमदारांची. त्यावेळी विदर्भात कामगार चळवळीत अग्रेसर असलेले काँग्रेसचे नेते नरेंद्र तिडके यांनी पुढाकार घेत २३ आमदारांची ताकद यशवंतरावांच्या पाठीशी उभी केली आणि राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले.
कायम समन्वयाची भूमिका घेणारे आणि तीच त्यांची प्रतिमा असलेले नरेंद्र तिडके तेव्हापासून राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले असे म्हटले तर वावगे ठरू नये. यशवंतरावांच्या बाजूने म्हणजेच काँग्रेसच्या बाजूने कायम उभे राहणारे नरेंद्र तिडके संयुक्त महाराष्ट्रवादी नसले तरी ते स्वतंत्र विदर्भवादीही नव्हते. विदर्भाचा विकास झाला पाहिजे यासाठी आग्रह धरतानाच स्वतंत्र विदर्भाची मागणी कधीही न करणाऱ्या नरेंद्र तिडके यांचे व्यक्तिमत्त्व मृदूभाषी, सर्वाना सोबत घेऊन चालणारे आणि कोणालाही टोकाचा विरोध न करणारे असे होते. म्हणूनच राज्यातील कामगार आणि भांडवलदार यांची विळ्या-भोपळ्याची मोट बांधण्याचे काम त्यांना सहज जमले. विदर्भाच्या शेतकरी वर्गातून म्हणजेच कास्तकार वर्गातून आलेले तिडके महाराष्ट्राच्या स्थापनेपूर्वी विदर्भात कामगारांचे नेते म्हणून ओळखले जात. मात्र कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी काँग्रेसची साथ सोडली नाही तर कायम काँग्रेसलाच साथ केली. कधीही एका वर्गाची बाजू न घेता समन्वयाच्या भूमिकेतून अनेक प्रश्न सोडविण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
दीर्घकाळ कामगार आणि उद्योग विभागाचे मंत्रिपद सांभाळणाऱ्या तिडके यांच्या काळात कामगारांच्या संपाचे प्रमाण काहीसे कमी होते. राज्यातील कामगार धोरणाला आकार देण्याचे काम त्यांच्याच काळात झाले. अत्यंत हळू आवाजात बोलणारे तिडके यांचे म्हणणे चर्चेच्या काळात कामगार नेत्यांना आणि भांडवलदारांना (मालकांना) कधीही ऐकू येत नसे, म्हणून कदाचित कामगार आणि भांडवलदार यांच्यात समन्वय साधण्यात ते यशस्वी झाले असावेत, असे विनोदाने बोलले जात असे. अनेक कामगार संघटनांचे पदाधिकारी म्हणून प्रदीर्घ काळाचा अनुभव असलेल्या तिडके यांनी १९५६ आणि १९६९ मध्ये जिनिव्हा येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या परिषदेत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्त्व केले होते.
१९५६ मध्ये ऑक्सफर्ड येथे झालेल्या राष्ट्रकुल देशांच्या परिषदेत त्यांनी भाग घेतला होता. १९४२ च्या स्वातंत्र्यलढय़ात विद्यार्थी दशेत सहभागी झालेल्या तिडके यांनी कारावासही भोगला होता. १९५२ मध्ये तत्कालीन मध्यप्रदेश राज्य विधानसभेचे सदस्य म्हणूनही संसदीय कामकाजाचा अनुभव घेतला होता. १९५३ मध्ये तत्कालीन मुंबई राज्य विधानसभेवर त्यांची निवड झाली होती. १९६० मध्ये प्रथम उपमंत्री म्हणून राज्य मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला आणि त्यानंतर त्यांनी ग्रामीण विकास, कामगार, उद्योग, ऊर्जा, मुद्रणालये, नियोजन आणि विधानकार्य आदी विभागांचे मंत्री म्हणून कामकाज सांभाळले. १९७६ मध्ये राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीत त्यांनी काही काळ हंगामी मुख्यमंत्री म्हणूनही काम सांभाळले होते. कधीही कोणत्याही प्रश्नावर न चिडता सर्वाना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिडके यांनी संसदीय कामकाजमंत्री म्हणूनही आपला ठसा उमटवला.
विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सुसूत्रता आणणाऱ्या तिडके यांना आदर्श संसदीय कामकाजमंत्री म्हणूनही गौरविले जातेच पण त्यांच्या काळातील विधिमंडळाच्या कामकाजाचा अनेकदा दाखला देण्यात येतो. सध्या काँग्रेसमधील अनेक गटातटात सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणामध्ये नरेंद्र तिडके यांच्यासारख्या समन्वयकाची उणीव भासते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष असताना किंवा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) पक्षाच्या निवडणूक आघाडीचे प्रमुख म्हणून काम करीत असताना तिडके यांनी कधीही अंतर्गत गटबाजीला खतपाणी घातले नाहीच, पण अशी गटबाजी होऊ नये यासाठी सर्वच घटकांना एकत्र आणण्याचेच प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने काँग्रेस एका सच्चा समन्वयवादी काँग्रेस नेत्याला मुकली आहे.
VV
August 4, 2017
स्वरांच्या साडेतीन सप्तकांमध्ये फिरणारे, सुमधुर आवाजाची देणगी लाभलेले, ‘जसरंगी जुगलबंदी’ या अनोख्या गायन प्रकाराचं भारतीय संगीतसृष्टीला योगदान देणारे आणि आपल्या गायनाद्वारे रसिकांना ‘ईश्वरानुभूती’ देणारे तपस्वी गायक, तसंच देश-विदेशातल्या अनेक विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने शिक्षण देऊन संगीतसंपन्न वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणारे ‘गानगुरू’ म्हणजे पंडित जसराज. जसराज यांचे वडील मोतीराम हे सुद्धा मेवाती घराण्याचे गायक होते.
पंडित जसराज यांचा यांचा जन्म २८ जानेवारी १९३० रोजी झाला. त्यांना वयाच्या चौथ्या वर्षी वडील पं. मोतीराम यांच्याकडून तालीम मिळाली. मा.पंडीत जसराज यांच्या बालपणाचे काही दिवस हैद्राबादच्या गल्ली-मोहल्यात गेले. येथील गौलीगुडा चमन आणि नामपल्ली असे मोहल्ले आहेत ज्यात त्यांच्या बालपणीच्या आठवणी आहेत. त्यांना शाळेच्या रस्त्यावरच्या त्या हॉटेलची आठवण आहे जेथे थांबून ते बेगम अख्तर यांच्या गजला, ‘दिवाना बना है तो दिवाना बना दे, वरना तकदीर कही तमाशा न बना दे’ ऐकत असत. या गजलनेच त्यांना शाळा सोडायला लावली आणि मग ते तबला वाजवू लागले. तबलजी हे गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे कळल्यामुळे ते अतिशय व्यथित झाले, आणि मग त्यांनी तबला वाजवायचे सोडून गायक बनायचे ठरवले. अनेक वर्षांनी त्यांना लाहोरमध्ये गायक कलाकाराच्या रूपात मंचावर मुख्य आकर्षण म्हणून यावे हे सुचले, आणि मग गायक होण्यासाठीचा दीर्घ संघर्ष सुरु झाला. एका मैफलीमध्ये त्यांचे गायन ऐकून ‘तुम तो सुन्नी शागीर्द हो’ अशा शब्दांत तबलानवाज उस्ताद आमीर हुसेन खाँ यांनी गौरव केला होता. उस्ताद अमीर खाँ साहेब, गुलाम अली खाँ आणि ओंकारनाथ ठाकूर यांचे गाणे त्यांना खूप आवडायचे.
पंडित जसराज म्हणतात की संघर्ष, मेहनत, रियाज सर्व गोष्टी जीवनात आवश्यक आहेत. त्याच संघर्षात कामी येतात. आपल्या जीवनात पंडीतजींनी अनेकांना जमिनीवरून आकाशात जाण्याचा मार्ग दाखवला आहे. पंडित जसराज मानतात की, संघर्षांतून यश मिळते, मात्र त्याच बरोबर ते मानतात की, त्याकडे ‘मी’ च्या नजरेतून पहाता कामा नये. माणसाला जेंव्हा स्वत:चा गर्व होतो तेंव्हा तो संपतो. त्याच्या संघर्षांच्या कक्षा संपतात. पंडीतजी मानतात की या दीर्घ जीवनात जर काही प्रेरणा घेतली जाऊ शकते तर ती हीच की सातत्याने काम करत राहिले पाहिजे. गायचे असेल तर शिकत रहा, रियाज करत राहा आणि परमेश्वराच्या कृपेची वाट पहा.
पंडित जसराज कोणालाही भेटले की त्यांच्या तोंडून बाहेर पडतं ते, जय हो. मा.पं.जसराज यांची कन्या दुर्गा जसराज यांच्या संकल्पनेतून पंडितजीचा जीवनपट उलगडणारी ‘गोल्डन व्हॉइस गोल्डन इयर्स’ ही ही चित्रफीत साकारली आहे. कला जिवंत राहावी, ती पुढच्या पिढीमध्ये रुजावी यासाठी जसराजजी प्रयत्नशील आहेत. आपल्या पैकी खूप जणानां माहित नसेल कि मा.जसराज हे व्ही.शांताराम यांचे जावई. पत्नी मधुरा ही चित्रपती व्ही. शांताराम यांची कन्या.
भारतीय सरकारने संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल पद्मविभूषण पुरस्कार देऊन मा.जसराज यांना गौरवले आहे. पं. संजीव अभ्यंकर हे पं. जसराज यांचे शिष्य.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
January 31, 2017
आठवणीतील माणसं हे सदर लिहिताना अनेक चेहरे डोळ्यासमोर आले अन रेखाटले गेले पण काल घोडपदेव नाक्यावर लागलेला भाऊ यांचा फलक पाहिला आणि श्याम हुले नावाचं व्यक्तिमत्व अलगद अंत:चक्षूसमोर उभं राहिलं. त्यांच्या स्मृतीगंधाची दरवळ मनात रेंगाळू लागली. काळाच्या ओघात आपण अशा अनेक व्यक्ती आणि वल्ली पाहतो आणि विसरून जातो. फक्त आजूबाजूच्या आणि रोज च्या जीवनातील व्यक्ती लक्षात राहतात आणि अशा अनेक वल्ली काळाच्या उदरात गडप होऊन जातात. अशीच एक व्यक्ती श्याम हुले मनाला भावलेल्या या व्यक्तीबद्दल लिहावे आणि चार लोकांना सांगावे, अगदी मनापासून वाटले.
रांगोळी किंवा रंगावली आणि भारतीय संस्कृतीचे अतूट समीकरण. कुठल्याही शुभ प्रसंगी रांगोळीला स्थान असतं या कलेने व्यावसायिक रूप धारण केलं नसलं तरी या रांगोळीत नांव कमावलेल्या पैकी श्याम हुले हे एक आपल्या विभागाला लाभलेले स्नेहशील सौहार्द. त्यांचा *जनजागृती* उदघाटन प्रसंगी रांगोळीतून साकारलेला वाघ शिवसेनाप्रमुखांना जागच्या जागी खिळवून ठेवतो. दाताच्या जबड्यात गुलाबाची पाकळीच्या लाल छटेमागील कारण काय....? असं शिवसेनाप्रमुखांनी विचारल्यावर भाऊंनी दिलेले उत्तर ‘वाघ म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे वाघ.जो पर्यंत वाघ शांत आहे तो पर्यंत शांत आहे.पण कोणी आडवा आला तर त्याला फाडून खाल्याशिवाय राहणार नाही.ही लाल छटा म्हणजे रक्त दर्शविते. आजही किती तरी तत्कालीन कार्यकर्त्यांना आठवत असेलच. शिवसेनेला वाघ कोणी दिला असेल तर या भाऊंनी.‘ त्याशिवाय त्यांनी कॅनव्हास पेपरवर बाळासाहेबांचे रेखाटलेले चित्र सर्वश्रुत आहे. त्यामुळे या उत्तम गुणी चित्रकाराचे नांव दसरा मेळाव्यात बाळासाहेबांच्या मुखातून घेतले गेले तेव्हा या माणसाची पत काय होती ते आपल्या लक्षात येईलच. गुणवंत मांजरेकरांच्या रांगोळी प्रदर्शनात भाऊंच्या दोन रांगोळ्या असायच्या. भाऊंच्या पाण्यावर काढलेल्या रांगोळी लक्षवेधी ठरत असत. प्रदर्शनात कमलाकर गोंजीसारख्या प्रतिभावंत रांगोळीकारांच्या सोबतीला रांगोळी हा एक बहुमानच. ही एक अशी कला आहे की, रांगोळीत जमीन आणि बोटं यांचा स्पर्श होत नाही.त्यामुळे ती अस्पर्शित राहिली. शासकीय स्तरावर उदासीनता या अर्थाने अस्पर्शित राहिली त्यामुळे यांचा गौरव कधी झाला नाही.
आम्ही लहान असताना या व्यक्तीला आणि ते रेखाटत असलेल्या कलेल्या अगदी जवळून पाहिले आहे. त्याचा नेत्रसुखद आनंद घेतलेला आहे.पालनजी रतनजी चाळीतून जाता येताना नेहमीच दर्शन घडले. साधा माणूस हातात ब्रश घेऊन आपल्या कलेला तंत्र,मंत्र आणि मर्म यातून प्रत्यक्षात उतरविणारा .... रंग आणि रेषा यांच्या माध्यमातून कला साकार करणारा चित्रकार एक ख्यातकीर्त व्यक्तिमत्व श्याम हुले ( भाऊ) यांच्या रूपातून सहवास लाभणे हे आमचे भाग्य समजतो. त्यांच्या कलेतील तंत्रकौशल्य म्हणजे रंगछटांचे वजन थोडेही ढासळू न देता त्यांनी केलेली कल्पनारम्य, उत्कृष्ट प्रतिमा मोहित केल्याशिवाय राहत नव्हती. भाऊ या कलेत इतके रमून गेले की, त्यांना कुणाशी सवडीने बोलायला देखील वेळ मिळत नसे. पण व्यवस्थितपणा आणि व्यावसायिकपणा त्यांना कधी जमलाच नाही. अगदी लोक देतील त्या पैश्यावर कामे केली. सेनेचे काम करताना पैसे कधी मागितले नाही. वाजवून पैसे कधी घेतलेच नाही. कोणी दिले नाही त्याचे दु:ख त्यांनी मानले नाही. मुळात ते मृदुभाषी आणि कमी बोलणारे. कुणावर कधी हुकुमत गाजविणे किंवा अधिकारवाणीने बोलण्याची सवय कधी जडून दिली नाही.त्याला ते तरी काय करणार....!
शिवसेना स्थापन झाली तेव्हा आपल्या विभागात काही मोजून कार्यकर्ते होते. तेव्हा स्थानिक सत्ताधारी आणि त्यांच्या गुंडासमोर उघडपणे काम करण्याची कुणाची हिम्मत नव्हती. त्याकाळी श्याम हुले,दत्ता घाग, दत्ता चव्हाण ( पालनजी रतनजी चाळ ) , शिवसेनेचा ढाल म्हणून संबोधले गेलेले संभा घाडगे ( वाणी चाळ,), गोविंद शिंदे ( बुवाची चाळ ) गंगाराम साळुंके ( खोजा चाळ ) अनंत मारणे ( मारुती माळी चाळ ) अन्य काही मंडळींनी सेनेची बीजे ह्या घोडपदेव सभोवतालच्या परिसरात रोवली. ही नांव आजच्या पिढीला माहित नसतीलच. ह्या छान्दिष्टांच्या मळ्यातून एकेक मोती जोडले गेले. ते आजतागायत गुंफण्याचे काम आजची पिढी करते असं आपण समजू. आता मोती मिळत नाहीत. मोत्यांनी माळेत गुंफून घेण्याऐवजी कुणाच्या तरी करंगळीत शोभिवंत म्हणून जगणे पसंत केले आहे.
तत्कालीन नगरसेवक विजय लोके यांनी अनेकांच्या जीवनगौरवार्थ महापालिकेत सर्वाधिक नामकरण प्रस्ताव मंजूर केले होते. पण पाट्यांचे अनावरण केले नव्हते.महापालिकेने पाट्या लावल्या पण त्या काळाच्या ओघात गडप झाल्या. घोडपदेव नाक्यावर कै.बाबुराव मेटकरी चौक असाच तिष्ठत आहे. त्यांची साधी पाटी देखील आजतागायत लावलेली नाही. असंच श्याम हुले चौक विषयी घडले. मला श्याम हुले चौक विषयी झालेल्या राजकारणात पडायचे नाही. एखादा फलक पाहिला की,आम्ही श्याम आर्टची ती बारीक अक्षरे शोधीत असायचो. कारण ती वळणदार अक्षरातून त्या त्या पेंटरची प्रतिमा दिसून येत होती. आज त्या वळणदार सुंदर अक्षरांचा जमाना गेला पण खंत अशी की,श्यामभाऊ पेंटरच्या निमुळत्या बोटातून साकारलेला अविष्कार आज पाहायला मिळत नाही. काही म्हणा त्या काळात गुंफलेल्या माळेतील गडप झालेल्या या मोत्याविषयी आम्हाला आजही आदर आहे.
*अशोक भेके*
March 23, 2017
संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात त्यांनी लिहिलेला ‘संयुक्त महाराष्ट्र — महागुजरात’ हा ग्रंथ त्या दोन राज्यांच्या जडण-घडणीचा अद्ययावत ज्ञानकोश समजावयास हरकत नाही. ‘अहल्या आणि इतर कथा’ हा त्यांचा लघुकथा संग्रह आहे.
January 29, 2022
त्यांचे निश्चित वय कोणालाच माहित नव्हते. असेल ७२ किंवा ७५ वा ७८-असेच त्यांना जवळून ओळखणारेही म्हणत. त्यांचे शिक्षण? विज्ञानातील पदवीधर असावेत! पण कोणत्या महाविद्यालयात, कुठले विषय घेऊन, कधी आणि कोणत्या ‘क्लास’मध्ये पास झाले हेही त्यांचे बहुतेक निकटवर्ती सांगू शकत नसत. घरचा पत्ता होता; पण ते राहात होते त्याला लौकिक अर्थाने ‘घर’ म्हणणे कठीण! कॉटवर, खुर्चीवर, टेबलवर, सर्वत्र पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रांमधली कात्रणे.
त्या सर्व अस्ताव्यस्त पसाऱ्यातून त्यांना पाहिजे तो संदर्भ ते शोधू शकत असत. नाहीतरी त्यांच्या स्मृतीत तो पक्का असायचाच..‘घरा’त कुठेतरी कपडे-धुतलेले, न धुतलेले, वाळत टाकलेले. इस्त्रीचा शर्ट त्यांनी कधी घातल्याचे कुणी पाहिलेले नाही. शर्टला बटण असण्याचे कोणते बंधन नाही. दाढी केली-न केली, भांग पाडला न पाडला, स्नान केले वा न केले तरी बघणाऱ्याला फरक कळणार नाही. (सवयीने बोलताना आंघोळ केली असे ते म्हणत), चष्माही बेंगरुळ. घरात रेडियो होता. लहान टीव्हीसुध्दा, पण त्याच्या वायर्स, केबल्स अशाच इकडे-तिकडे..भेटलेल्या माणसाशी चर्चा, वाद, भांडण अनेक मुद्दय़ांवरून. जशी पुस्तके, नियतकालिके, कात्रणे अनेक विषयांसंबंधात.
कार्ल मार्क्स ते किशोरी आमोणकर, हेन्री किसिंजर ते कथाकार ओ हेन्री, आइनस्टाईन ते पंडित नेहरू, डॉ. आंबेडकर ते अब्राहम लिंकन असे सर्वजण त्यांचे ‘कुटुंबिय’ पुस्तकरुपाने त्यांच्या घरात व मनात नांदत असत. त्यांना नाव अर्थातच होते. जतीन्द्र कराडकर. आई-वडिल दोघेही स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरही कम्युनिस्ट. म्हणजे वारसा जरी मीनाक्षी साने, कॉम्रेड कराडकर, कॉम्रेड डांगे, कॉम्रेड सरदेसाई अशांचा आणि सदस्यत्वही (बहुधा!) कम्युनिस्ट पक्षाचे, तरी कोणत्याही चौकटीत मावू शकणारा हा माणूस नव्हता. ‘मार्क्स की मॅथेमॅटिक्स’ यापैकी एकच निवडायचा प्रसंग आला तर बहुधा त्यांनी गणिताचीच निवड केली असती ! गणित हा विषय किती आनंदाचा आहे हे ते सांगत आणि आपण कोणत्याही मुलाच्या मनातील गणिताविषयीची अढी काढून टाकू शकतो असे म्हणत. कोणतेही लौकीक वा प्रतिष्ठेचे गणित वा विज्ञान शिक्षण न घेतलेल्या जतीनने आयआयटीतर्फे होणाऱ्या खुल्या गणित स्पर्धामध्ये आठ वेळा पुरस्कार प्राप्त केले होते. फिजिक्स (अॅस्ट्रोफिजिक्स, न्यूक्लिअर फिजिक्स इ.) या विषयाचे त्यांचे ज्ञान विलक्षण होते. जगाच्या पाठीवर कुठेही या दोन विषयांत जे संशोधन होत असे त्याची पूर्ण माहिती त्यांच्याकडे असे आणि त्या शोधांचे स्वरूप कितीही गुंतागुंतीचे असले तरी ते उत्तमपणे समजावून सांगू शकत असत. त्यांच्या ज्ञानभांडारात या विषयांप्रमाणेच साहित्य-संस्कृती आणि राजकारणही असे.
अनेक कविता मुखोद्गत आणि एखाद्या राजकीय घटनेचे, व्यक्तीचे वा एखाद्या वैज्ञानिक संकल्पनेचे निरुपण करताना ते नेमकी कविता म्हणून तो मुद्दा स्पष्ट करत असत. कराडकर कधीही परदेशी गेले नाहीत. पण त्यांना रशिया, अमेरिका, आफ्रिका इत्यादी प्रदेशांबद्दल इतकी भौगोलिक, राजकीय, सांस्कृतिक माहिती असे आणि कोणत्याही घटनेचे विश्लेषण करताना ते इतक्या वेधक पद्धतीने हे घटक विशद करून सांगत की खरे म्हणजे ते ‘आंतरराष्ट्रीय राजकारण’ विषयाचे प्राध्यापकही होऊ शकले असते.
इतिहास- मग तो मराठय़ांचा असो वा इंग्रजांचा- माहीत असल्याखेरीज राजकारणातील गुंतागुंत कळत नाही असे त्यांचे मत होते. साहजिकच त्यांचा इतिहास- युद्धशास्त्रसुद्धा- हाही चिंतनाचा व अभ्यासाचा विषय होता. लौकीक अर्थाने त्यांना कुणीही विद्वान म्हणणार नाही. त्यांना ते आवडलेही नसते. त्यांना कुणीही कोणतेही पुरस्कार दिले नाहीत. त्याचे तर त्यांना अप्रूपही नव्हते. ते ज्या कम्युनिस्ट पक्षात-चळवळीत- वाढले त्यांनीही त्यांची फार कदर केली नाही. ज्याला इंग्रजीत ‘मॅवेरिक’ म्हणतात असा हा ‘मॅवेरिक कॉम्रेड’ होता. सर्वसाधारणपणे कम्युनिस्ट पक्षात संघटनेच्या शिस्तीला, पक्षाच्या ‘लाईन’ला आणि विविध प्रसंगांमधील धोरणांना खूप महत्त्व असते. ती शिस्त वा लाईन तोडून चालत नाही.
कराडकरांना पक्षातून काढून टाकले नाही हा पक्षाचा मोठेपणा की कराडकरांचा मोठेपणा पक्षात कळू शकणाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे त्यांचा व्यासंगी विक्षिप्तपणा खपून गेला हे सांगणे कठीण आहे. जतीनची मूळ मार्क्सवादी विचारसरणी आणि कम्युनिस्ट आदर्शावर निष्ठा होती- तितकीच त्यांची ज्ञाननिष्ठाही होती. ते इतके नि:स्पृह होते की, आपण नि:स्पृह आहोत हेही त्यांना माहीत नव्हते- जसे इतका व्यासंग असून त्यांना कुणी ‘स्कॉलर’ म्हणून संबोधले नाही हे तर त्यांच्या गावीही नव्हते! असे लोकच निखळ बौद्धिक-वैचारिक जीवनाला अर्थ आणि आशय प्राप्त करून देतात.
August 5, 2017
आज १५ सप्टेंबर..आज मराठीतील प्रसिद्ध नाट्यअभिनेते डॉ. दाजी भाटवडेकर ऊर्फ केशवचंद्र मोरेश्वर भाटवडेकर यांची जयंती
जन्म:- १५ सप्टेंबर १९२१
दाजी भाटवडेकर मूळचे मुंबईचे. स्वातंत्र्यपूर्व काळात दाजींचे आजोबा मुंबईतील एक प्रख्यात डॉक्टर होते. त्याकाळी त्यांना मुंबईचे महापौरपदही मिळाले होते. त्यांचे घराणे संपन्नत असले तरी घरांत धार्मिक आणि संस्कृती जपणारे वातावरण होते.दर एकादशीला घरात कीर्तन आणि भजनाचा कार्यक्रम होत असे. दर पंधरवड्याला होणार्या असल्या कार्यक्रमातील नाट्याचा आणि कथानकांचा दाजींच्या मनावर खोल परिणाम झाला. ते कीर्तनकार बुबांच्या आवाजाची आणि बोलण्याच्या ढंगाची हुबेहूब नक्कल करीत असत. भरदार आवाजाची देणगी मिळालेल्या दाजींनी संगीत नाटकांत भूमिका करायला सुरुवात केली. दाजींच्या दुर्दैवाने पुढे मराठी संगीत रंगभूमीला उतरती कळा लागली. संभाषणात नाटकी अभिनिवेशाने बोलण्याच्या जागी वास्तव शैलीने बोलायची पद्धत पडू लागली. मग दाजींनी आपला मोहरा संगीत रंगभूमीकडे वळवला. दाजी स्वतः उच्चशिक्षित आणि संस्कृ त नाटकांचे गाढे अभ्यासक असल्याने त्यांना संस्कृत रंगभूमीची चळवळ सुरू करायला फारशी अडचण पडली नाही.. मुंबईच्या ब्राह्मण सभेत त्यांनी १९५० ते १९८० या काळात दर वर्षाला एक नवे संस्कृत नाटक रंगभूमीवर आणले. कालिदास महोत्सवाच्या काळात दाजींनी ’अभिज्ञान शाकुंतल’ या संस्कृत नाटकाचा प्रयोग भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि अन्य सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीत सादर करून वाहवा मिळवली. संस्कृत नाटकांनाही पुढे प्रेक्षक मिळेनासे झाले. मात्र, ही नाटके सादर करताना काय काय अनुभव आणि अडचणी आल्या यावर दाजींनी लिहिलेला प्रबंध मुंबई विद्यापीठाने स्वीकारून त्यांनी डॉक्टरेट दिली. दाजींच्या संस्कृत रंगभूमीवरील योगदानाबद्दल भारतरत्न महामहोपाध्याय डॉ. पां. वा. काणे यांनी त्यांच्या एका ग्रंथातील परिशिष्टात खास उल्लेख केला आहे. मराठी रंगभूमीबरोबरच इंग्रजी, संस्कृत आणि हिंदी रंगभूमीवरही त्यांनी काम केले. मा.दाजी भाटवडेकर यांचे २६ डिसेंबर २००६ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा.दाजी भाटवडेकर यांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- विकीपीडीया
दाजी भाटवडेकर यांचा अभिनय असलेली नाटके आणि त्यातील त्यांची भूमिका
एकच प्याला (सुधाकर), कृष्ण द्वीप (हिंदी), दुर्गा (जिवाजीराव), मानापमान (लक्ष्मीधर, विलासधर), मृच्छकटिक (शकार), बॉर्न येस्टरडे (इंग्रजी, दिग्दर्शक - हर्बर्ट मार्शल), भाऊबंदकी (तुळोजी, राघोबा, सखाराम बापू), भावबंधन (घनश्याम, धनेश्वर, मोरू), म्युनिसिपालिटी (पांडोबा), लग्नाची बेडी ( कांचन, गोकर्ण, तिमिर), शारदा ( कांचनशेट, भद्रेश्वर), संशयकल्लोळ (फाल्गुनराव, वैशाखशेठ), सौभद्र (बलराम)
स्वयंवर (रुक्मी).
September 15, 2016
वसंत वैद्य प्रकाशझोतात आले ते त्यांच्या खुमासदार लेखनशैलीमुळे. प्रयोगशील लेखकाप्रमाणे एक अत्यंत हळव्या मनाचे व सृजनशील कवी म्हणूनही ते रसिकांच्या आठवणींमध्ये मिसळून गेले.
January 22, 2015
पंडित ओंकारनाथ ठाकुर हे ग्वाल्हेर घराण्याचे एक प्रसिद्ध गायक होते. त्यांचा जन्म २४ जुन १८९७ रोजी गुजराथ मधील भंडारण जिल्ह्यातील जहाज या गावी झाला. ओंकारनाथजी चौथे व शेवटचे अपत्य. ओंकारनाथजींचे बाल आयुष्य अतिशय कष्ट, गरिबी व हालअपेष्टांनी भरलेलं होते. ओंकारनाथ ठाकूर यांचे आजोबा पं. महाशंकर ठाकुर व वडिल पं. गौरीशंकर हे नानासाहेब पेशवे व महाराणी जमनाबाई यांचे पदरी शुर वीर लढवय्ये होते. परंतू, 'अलोनीबाबा' नावाच्या एका योग्याच्या सानिध्यात आल्यानंतर गौरीशंकरांचे जीवनविषयक सार पुर्णपणे बदलले. त्यामूळे त्यांनी आपला जास्तीत जास्त वेळ 'ओम' अथवा प्रणव साधनेत खर्च करण्यात घालवला. ह्याच सुमारास त्यांच्या चौथ्या मुलाचा जन्म झाल्याने त्यांनी त्याचे नाव 'ओंकारनाथ' ठेवले. जरी गौरीशंकरांनी आपले आयुष्यांत घर उभारणीला मदत केली तरी त्यांचे मन सतत प्रणव साधनेत होतं. त्यामूळे झवेरबांना नेहेमीच प्रतारणा, घृणा व अपमानाला सामोरं जावं लागल. गौरीशंकरांच्या मोठ्या भावाने झवेरबांना खुप त्रास दिला. शेवटी मोठ्या दिराने झवेरबां व ह्या ४ छोट्या लहानग्यांना एक दिवस कठोरपणाने सगळे कपडे व दागदागिने घेऊन घराबाहेर काढले. पण झवेरबां अतिशय कष्टाळु, मानसिकरित्या भक्कम व संतुलित होत्या. त्यांनी धुणी-भांडी करण्याची चार कामं लगेच धरली. मुलं मोठी होत होती. सगळच विपरित असताना त्यांनी कधी हिंमत सोडली नाही आणि कधी कोणापुढे हात पसरले नाहीत. आईचा धीरोदात्त स्वभाव, अतिशय प्रखर स्वाभिमान ह्यांचा ओंकारनाथजींच्या मनावर व व्यक्तिमत्वावर चांगलाच खोल ठसा उमटलेला होता.
ओंकारनाथजींनी मोजक्या कलाकरांसारखंच स्वतःच्या शारीरिक क्षमतेवर पण बरेच लक्ष केंद्रित केलं होतं. आयुष्यातल्या अतिशय कठोर शिस्तीशिवाय ओंकारनाथजी स्वतः रोज भरपूर व्यायाम करायचे. अन्न वाया घालवण्याच्या ते एकदम विरोधात होते. त्यांच्या व्यायाम प्रकारात ते सुर्यनमस्कार, पोहोणे याशिवाय 'गामा' ह्या त्यावेळच्या नावाजलेल्या मल्लाकडुन ते मल्लविद्याही शिकलेले होते. त्यांच्या पन्नाशीनंतरही त्यांनी हा व्यायाम चालू ठेवला होता. आपल्या आई-वडिलांकडून मिळालेल्या प्रणव साधना, धर्माबद्दल आस्था व संकटाना तोंड देण्याची वॄत्ती ह्या सगळ्या गोष्टी व वडिलांपुढे जाऊन 'नाद-उपासना' किंवा अज्ञाताची संगीतातून केलेली भक्ती हे ओंकारनाथजींमध्ये ओतप्रोत भरलेली होती. जेव्हा गौरीशंकरांनी संन्यास घेतला तेव्हा ओंकारनाथजींची अवस्था कात्रीत पकडल्यासारखी झालेली. एकीकडे आपली कष्टाळू आई जिच्याबद्दल त्यांना प्रेम व चिंता होती तर दुसरीकडे नर्मदेच्या काठावर संन्यासी वडिल ज्यांच्याबद्दल ओंकारनाथांना अतिव आदर होता.
अशाच तरुण वयात ओंकारनाथांनी स्वयंपाक शिकुन घेतला व एका वकिलाच्या घरी आचारी म्हणून काम करू लागले. असं करणं त्यांना क्रमप्राप्त होतं कारण आईच्या एकटीच्या पगारावर घर चालेना. हे सगळं करताना त्यांची खुप दमछाक होई. एकीकडे नर्मदेच्या काठावर वडिलांची झोपडी साफ करावी, त्यांना पाण्याचे हंडे भरून द्यावेत, त्यांची व्यवस्था लावावी व नंतर ४-५ मैल पळत जाऊन कामाला लागावं व स्वयंपाक करावा. मंडळी, आज हे सगळं लिहीताना हात थरथर कापताहेत आणि डोळ्यांत आसवांनी घर केलय. ज्यांनी हे भोगलय त्यांनाच ते कळणार.
हे सगळं करत असताना ओंकारनाथजींनी एका मिलमधे मील कामगार म्हणूनही काम केलं. तेथेही मिल मालक ह्या छान दिसण्यार्यां, कष्टाळू व हुशार मुलाकडे इतका आकॄष्ट झाला की त्याला वाटलं की ह्या मुलाला आपण दत्तक घ्यावं. परंतु ओंकारनाथजींच्या वडिलांनी हे साफ धुडकावून लावलं व म्हणाले की 'माझ्या मुलाला साक्षात सरस्वतीचा आशिर्वाद आहे. तिच्या जोरावर तो पैसा, प्रसिद्धी मिळवेल. पण कोणा श्रीमंताच्या घराचा दत्तक मुलगा म्हणुन नाही'.
ओंकारनाथजी नेहेमी सांगायचे की त्यांच्या वडिलांकडे बर्यादच गुढ विद्या होत्या. त्या आधारे त्यांनी आपला मृत्यू बराच आधी सांगितला होता. १९१० साली आपल्या मृत्यूच्या अगोदर त्यांनी आपल्या लाड्क्या मुलाला ओंकारनाथजींना जवळ बोलावून त्यांच्या जीभेवर अतिशय दुर्मिळ व अमुल्य मंत्र लिहीलेला होता.
याच्या बरीच वर्ष असलेलं ओंकारनाथजींच संगीत प्रेम उफळुन आलेलं होतं. अश्याच वेळी एक दानशूर व्यक्ती शेठ शहापुरजी डूंगाजी मंचेरजी त्यांच्यासाठी देवदुतासारखे ऊभे राहिले. शेठजींनी ओंकारनाथजींना मुंबईच्या पंडित विष्णु दिगंबर पलुस्करांच्या संगीत महाविद्यालयात प्रवेश मिळवुन दिला. हा क्षण ओंकारनाथजींच्या आयुष्यातला सोनेरी क्षणच म्हणावा लागेल. ह्याच वेळेस ओंकारनाथजींच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. पंडितजींच्या प्रेमळ मार्गदर्शन व तालीम ह्यांनी ओंकारनाथजींच एका उत्कृष्ट संगीतकारात रूपांतर झालं. त्या ६ वर्षांच्या काळात ओंकारनाथजींनी एका अस्सल एकनिष्ठ शिष्याप्रमाणे गुरुची सेवा करून गुरुकडुन सगळी संगीत विद्या मिळविली. पलुस्करांची त्यांच्यावर इतकी मर्जी बसली की जेव्हा पलुस्करांनी लाहोरमधे गांधर्व महाविद्यालय चालु केलं तेव्हा ओंकारनाथजींना त्यांनी मुख्याध्यापक केलं. तेव्हा ओंकारनाथजींच वय अवघ २० वर्ष होतं. त्यावेळेस ओंकारनाथजींचा दिवस काहीसा असा असायचा, ६ तास झोप, १८ तास विद्यालयात स्वतःचा रियाझ व विद्यार्थांना शिक्षण. ते अतिशय शिस्तबद्ध व सात्त्विक आयुष्य जगले.
१९१७ साली जेव्हा बडोद्याला संगीत परीक्षक म्हणुन पाठवले गेले तेव्हा बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड व दिवाण मोनुभाईंवर त्यांची चांगलीच छाप पडलेली होती. त्याच साली त्यांना अतिशय प्रसिद्ध जालंधरच्या श्री हरिवल्लभ मेळ्यामध्ये गाण्याचं आमंत्रणही मिळालेलं. त्याकाळी श्री हरिवल्लभ मेळ्यामध्ये गाणं गायला मिळणं ही एक अतिशय पर्वणी असे. अनेक मोठे मोठे कलाकार तिथे आपली कला सादर करीत. असं म्हटल जातं की त्यावर्षी तरूण ओंकारनाथजी व वयोवृद्ध भास्करबुवा बखले यांनी अशी काय मैफल सजवली की लोकांनी दागदागिने व धनसंपत्तीची खैरात दोघांवर केली. ह्या सगळ्या गोष्टींमधे जवळजवळ २५ वर्षे ओंकारनाथजींनी श्रीरामाचे 'रामचरित मानस' चे वाचन, मनन व अभ्यास रोज नियमित चालू ठेवला होता. त्याचबरोबर व्यायाम व आपल्या गुरुप्रमाणे रामधुन व रामनाम संकिर्तन चालू ठेवलं होतं. १९२२ साली ओंकारनाथजींच लग्न श्रीमती इंदिरादेवींसोबत झालं.
इंदिरादेवी, शेठ प्रल्हादजी दलसुखराम ह्या धनवान शेठजींच्या कन्या. १९२४ साली नेपाळचे राजे महाराज चंद्र समशेर जंग बहादुर यांच्या आमंत्रणावरुन त्यांनी अतिकठीण असा नेपाळ दौरा केला. त्यांना तेव्हा अमाप धन व प्रतिष्ठा मि़ळाली. स्वतः राजाने त्यांना ५००० रु. रोख व अगणित मौलिक अलंकार दिले. ह्याच वेळेस महीना ३००० रु. अशी घसघशीत दरबार गायकाची नोकरीसुद्धा देऊ केली. पण ओंकारनाथजींना घरी परतण्याचे वेध लागलेले. कधी एकदा घरी आईच्या पायावर सगळी संपत्ती घालतो असं त्यांना झालेलं. त्यांच ते कित्येक वर्षे जपलेलं स्वप्न होतं. म्हणुन त्यांनी ती नोकरी धुडकावून लावली.
ह्याच सुमारास ओंकारनाथजींना विविध शास्त्रांचा अभ्यास करण्याचा छंद लागला. शिवाय ते एक सच्चे देशभक्तही होते. ओंकारनाथजींनी भडोच काँग्रेस कमिटी व गुजरात काँग्रेस कमिटी वरही काम केले. दैवाचे आभार मानावे तितके थोडेच की ते तिथे अडकले नाहीत. १९३० साली ओंकारनाथजींना परत नेपाळ दौरा घडला. ह्या वेळेस त्यांनी सगळी संपत्ती गुरु पलुस्करांच्या पायावर अर्पण केली. पलुसकरांचा आनंद गगनात मावेना. ह्यानंतर ओंकारनाथजींचे हैद्राबाद, म्हैसुर व बंगालचे दौरे झाले. हैद्राबादमधे त्यांनी मालकंस रागात अशी काही मैफल जमवली की स्वतः गुरुने पं. पलुस्करांनी त्यांना भर बैठ्कीत मिठी मारली व आपल्या आसवांचा आशीर्वाद दिला.
आपल्या पुर्व आयुष्यात ओंकारनाथजींनी जैन मंदिरासाठी काम करत असताना जैन भाषा अवगत करुन घेतली. ह्याशिवाय त्यांना हिंदी, मराठी, इंग्रजी, संस्कृत, बंगाली, पंजाबी, उर्दू व नेपाळी भाषांवर प्रभुत्व होतं. १९३३ साली जागतिक संगीत संमेलनाचे त्यांना निमंत्रण मिळाले म्हणुन ते इटलीला फ्लॉरेन्समधे गेले. इटलीची त्यांची एक कथा खुप प्रसिद्ध आहे. त्यांनी सरळ जाऊन मुसोलिनीच्या व्यक्तिगत सचिवास मुसोलिनीला फक्त ५ मिनीटे गाणं ऐकवण्याची गळ घातली. केवढं ते धैर्य. पण फक्त ५ मिनीटांच्या बोलीवर तो तयार झाला. तशी मुसोलिनीसाठी त्यांनी 'तोडी' गायला. ५ मिनीटांनी ओंकारनाथजी थांबले. तर मुसोलिनीने त्यांना खुणेनेच गात राहायला सांगितले. अर्ध्यातासाने शेवटी सचिवाने गाणं थांबावायची सुचना केली. जाताना मुसोलिनी डोळे पुसत एवढच म्हणाला की ' हे संगीत मी पुन्हा ऐकणार नाही. माझं हृदय असं विरघळलेलं चालणार नाही. मी हुकुमशहा आहे. मला कठोरच रहायला हवं. पुन्हा हे संगीत मला ऐकवू नकोस. तुझी बिदागी सन्मानपुर्वक घे. तुझं संगीत चालू राहु दे पण इथे नाही तुझ्या देशात..'. मंडळी, अशी जादु आहे आपल्या भारतीय अभिजात संगीताची आणि ओंकारनाथजींच्या आवाजाची होती. नंतर ओंकारनाथजींनी संपुर्ण युरोप दौरा केला. त्यांनी शेख अमानुल्ला ह्या अफगाणिस्तानमधल्या राजासमोरही गायन केलं. त्यांच्या मित्रांनी त्यांना लंडनमध्ये असताना किंग जॉर्ज (पाच) ह्याच्यासामोर गायला परवानगी मिळावी म्हणुन प्रार्थना कर असं तेव्हा ओंकारनाथजींनी स्वाभिमान ठेऊन ते साफ धुडकावून लावली.
ओंकारनाथजी रशियाकडे जात असताना आपल्या लाड्क्या पत्नीचं बाळंतपणात मृत्यु झाल्याचं कळलं. त्यांना हा जबरदस्त आघात होता. इतका की त्यांनी दौरा अर्धवट सोडलाच पण त्यांना अल्पकाळासाठी स्मृतीभ्रंश झाल्यासारखं झालं. ओंकारनाथजींच्या बोलण्यात नेहेमीच आपल्या एकनिष्ठ, प्रेमळ व वात्सल्यपुर्ण पत्नीबद्दल आदरभाव असे. ते म्हणत की इंदिराजींशिवाय त्यांना इथपर्यंत पोहोचताच आलं नसतं. कलकत्याच्या मोठ्या संगीत सभेत रसिकांनी एकदा त्यांना 'निलांबरी' राग गाण्याची फर्माइश केल्यावर विनयपुर्वक नाही असे सांगितल्यावर कारण काय तर ते म्हणाले की 'इंदिराजींचा हा आवडता राग. जर गायला बसलो तर इंदिराजींच्या आठवणीने गाता येणार नाही.' केवढं हे निस्सीम प्रेम. परत लग्न कर अशी आईने गळ घातली तरी त्यांनी परत लग्न केलं नाही व उत्तरादाखल ते म्हणाले की 'माझ्या रामाच्या वचनाप्रमाणेच मीही एकपत्नीव्रत राहणार'. केवढी ही निष्ठा...
पत्नीच्या मृत्युनंतर जरी ओंकारनाथजींच गाणं सुरु राहिलं तरी त्यात एक प्रकारची करूण छटा असे. पंडितजींनी ह्यानंतर कटु आठवणींमुळे भडोच सोडलं व मुंबईमधे 'संगीत निकेतन' चालु केलं. पं मदनमोहन मालवीय ह्यांची एक इच्छा होती की बनारस हिंदु विश्वविद्यालयात त्यांना पंडितजींच्या देखरेखीखाली संगीत विभाग चालु करायचा होता. पण पं. मालवियांचा मृत्यु झाला. नंतर हे काम पं. गोविंद मालविय यांनी पुरे केलं. तेव्हा ओंकारनाथजींनी (पंडितजींनी) 'डिन' म्हणुन अतिशय चोख काम पार पाडलं. त्यांनी बरेच शिष्य तयार केले जसे डॉ. प्रेमलता शर्मा, यशवंत राय पुरोहीत, बलवंत राय भट, डॉ. राजम, राजबाबू सोनटक्के, फिरोझ दस्तुर, अतुल देसाई, पि. न. बर्वे असे कितीतरी. त्यातील डॉ. राजम ह्या त्यांच्याबरोबर अखेरपर्यंत व्हायोलीन साथीदार होत्या. ओंकारनाथ ठाकूर यांना १९५५ साली 'पद्मश्री', 'संगीत प्रभाकर' , - पं मदनमोहन मालवीय, 'संगीत मार्तंड' - कलकत्ता संस्कृत महाविद्यालय - १९४०, 'संगीत महामहोदय' - नेपाळ नरेश - १९४० असे अनेक पुरस्कार मिळाले. पं.ओंकारनाथ ठाकूर यांचे २९ डिसेंबर १९६७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 29, 2017
ख्वाजा अहमद अब्बास उर्फ के. ए.अब्बास हे हाडाचे पत्रकार होते. उर्दूतले नामवंत लेखक आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण निर्माते-दिग्दर्शक कथा-पटकथाकार के. ए.अब्बास यांचा जन्म ७ जून १९१४ रोजी पानीपत, हरियाणा येथे झाला. त्यांनी ४६ वर्षे ‘लास्ट पेज’ हा स्तंभ सुरुवातीला ‘बॉम्बे क्रॉनिकल’ व नंतर ‘ब्लिटज’मध्ये लिहिला. राज कपूर यांचे व आर. के. फिल्म्सचे लाडके लेखक कथा-पटकथाकार म्हणून के.ए.अब्बास यांची ओळख होती. १९५१ साली ‘आवारा’ या सिनेमाची पटकथा आणि संवाद अब्बास यांची होते. पुढे अब्बास यांनी श्री ४२०’, ‘जागते रहो’, मेरा नाम जोकर, बॉबी चित्रपटाच्या पटकथा लिहिल्या होत्या. आपल्या पटकथांनी एक वेगळा विचार मांडणारे आणि समाजातील विषमतेला अधोरेखित करणारी स्वतंत्र शैली त्यांनी निर्माण केली. के. ए.अब्बास यांनी शंभरच्या वर पुस्तकांचं त्यांनी लेखन केलं आहे.
व्ही.शांताराम यांचा ‘डॉ. कोटनीस की अमर कहाणी’ हा चित्रपट अब्बास यांच्या ‘And One Did Not Come Back’ च्या कथेवर बेतला होता. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या चित्रपट करियरची सुरवात ख्वाजा अहमद अब्बास यांच्या निर्देशनाखाली बनलेली सात हिंदुस्तानी मधल्या सात कलाकाराच्या पैकी एका कलाकाराच्या स्वरुपात केली होती. के. ए.अब्बास यांच्या शहर और सपना या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. भारत सरकारने १९६९ साली के. ए.अब्बास यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. के. ए.अब्बास यांचे इतर चित्रपट ‘धरती के लाल’, ‘शहर और सपना’, ‘दो बूंद पानी’, सात हिंदुस्तानी, नया संसार, नीचानगर, शहर और सपना, धरती के लाल, परदेसी. अभिनेता शाहिद कपूरचे ते पणजोबा होत. के. ए.अब्बास यांचे १ जून १९८७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
June 7, 2017
अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, राज्यघटना, सामाजिक व राष्ट्रीय समस्या इ. चा व्यासंग असलेले विचारवंत राजकीय नेते मधु लिमये यांचा जन्म पुणे येथे १ मे १९२२ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचा शिक्षकी पेशा होता. नोकरी निमित्त अनेक गावी जावे लागत असल्याने मधू लिमये यांचे शिक्षण त्यांच्या आजोळी पुण्यातच झाले. १९३७ साली मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला.
January 30, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti