वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगाने जगभर प्रसिद्ध झालेल्या डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचा जन्म ५ डिसेंबर १९४३ रोजी झाला.
प्रा.डॉ. लक्ष्मण देशपांडे यांनी एम. ए.,पीएच.डी., मास्टर ऑफ ड्रॅमॅटिक्स या पदव्या प्राप्त केल्या होत्या. १९६६ ते १९६८ या कालावधीत मौलाना आझाद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून तर १९६८ ते १९८० स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. २३ नाटय़महोत्सवाचे आयोजन, २०० पेक्षा अधिक नाट्यकथांची निर्मिती करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, डॉ. श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर यांच्याबरोबर दोन चित्रपटांत भूमिका, अशी त्यांची नाट्य-चित्रपट कारकीर्द होती.
‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगामुळे डॉ. देशपांडे यांचा प्रेक्षक-श्रोता जगभर होता. एकूण ५२ पात्रांचे विविध आवाज आणि कमीतकमी प्रभावी हालचाली हे या एकपात्री प्रयोगाचे खास वैशिष्टय़ होते. मराठवाडय़ाच्या ग्रामीण जीवन शैलीशी एकरूप असलेले आणि अस्सल व्यक्तिरेखा असणारा हा प्रयोग केवळ मराठवाडय़ातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि विविध देशांतील मराठी नाटय़रसिकांना भावला. ‘गीनिज बुक’मध्ये तब्बल दोन वेळा नोंद घेण्यात आलेले लक्ष्मण देशपांडे यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. ‘वऱ्हाड’चे लेखन, दिग्दर्शन आणि कलावंत या सगळ्या भूमिका डॉ. देशपांडे यांच्याच होत्या. तीन छोटे दिवे, तीन माईक आणि पंचा इतके छोटे साहित्य वापरून ५२ व्यक्तिरेखा उभ्या करणाऱ्या ‘वऱ्हाड निघालंय लंडन’ची सुरुवात १९८० मध्ये झाली.
डॉ. देशपांडे यांनी 'वऱ्हाड' लंडन, अमेरिका, कॅनडा, दुबई, मस्कत, ऑस्टेलिया, नायजेरिया, नैरोबी, कतार, कुवेत, थायलंड, सिंगापूर या देशांतही पोहोचवले. 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'ने त्यांच्या या कार्याचा १९९६ मध्ये प्रथमत: गौरव केला. आजपर्यंत या एकपात्री प्रयोगाचे ३ हजारांपेक्षा अधिक प्रयोग झाले होते. डॉ. देशपांडे यांनी डॉ. अनुया दळवी यांच्याबरोबर द्विपात्री 'नटसम्राट'चे शंभरावर प्रयोग केले. त्यांनी दोन चित्रपटांतही काम केले.
स्वेच्छानिवृत्तीनंतर ते परभणीच्या अ. भा. नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष झाले. नाटकाच्या मिळकतीतून बरीचशी रक्कम त्यांनी नगिर्स कॅन्सर हॉस्पिटल (बाशीर्), अंधशाळा नाशिक आणि इतर ठिकाणी दिली. २००३ मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाने सन्मानित केले तर २००४ ला त्यांना विष्णुदास भावे पुरस्कार प्रदान करण्यात आला. या शिवाय अनेक मान्यताप्राप्त पुरस्कार त्यांना देण्यात आले. प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे २२ फेब्रुवारी २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
pd - November 8, 2019
राजेंद्रकृष्ण यांचे खरे नाव राजिंदर दुग्गल. शालेय वयात आठवीपासून राजेंद्रकृष्ण कविता करत असत.त्यांचा जन्म ६ जुन १९१९ रोजी जलालपूर पाकिस्तान येथे झाला.कवितेच्या वेडाने ते पुढे मुंबईत आला आणि सिनेमासाठी लेखन करू लागले. मुंबईतील त्यांचा प्रारंभीचा संघर्ष कंगवे, रूमाल विक्री करण्याइतपत कष्टाचा होता. त्या काळात अनेक गरीब मित्रांनी त्यांना आसरा दिला; १९४७ साली राजेंद्रकृष्ण पटकथाकार झाले आणि त्याचा पहिला चित्रपट पडद्यावर आला ‘जनता.’ गीतकार म्हणून त्याचा पहिला चित्रपट होता १९४७ सालचा ‘जंजिर.’
गीतकार आणि लेखक अशा दुहेरी भूमिकेमुळे त्याचा मान अधिक वाढला. मोतीलाल आणि सुरैया यांची भूमिका असलेल्या १९४८ सालच्या ‘आज की रात’ या चित्रपटामुळे ‘राजेंद्रकृष्ण’ नाव फिल्म इंडस्ट्रीत ओळखले जाऊ लागले. ‘सुनो सुनो ये दुनियावालो बापुजी की अमर कहानी.’ हे महात्मा गांधींच्यावर राजेंद्रकृष्ण यांनी गाणे लिहिले होतं, त्याला हुस्नलाल भगतराम यांनी या गीताला संगीत दिलं होतं आणि रफी यांनी गायिलेल्या हे गाणे रेडियो सिलोन खूप गाजले. या गाण्याने राजेंद्रकृष्ण गीतकार म्हणून घरोघरी पोहोचले. कथा-पटकथाकार म्हणून राजेंद्रकृष्ण यांचे नाव हिंदी, मद्रासी सिनेमाच्या पडद्यावर झळकत होतं. तमिळ भाषेचं उत्तम ज्ञान अवगत असल्याने त्यांना सर्वत्र दक्षिणेत व दक्षिणेतील निर्मार्त्यांकडून कामं मिळत गेली. तिथे सी. रामचंद्र ऊर्फ राम चितळकर यांचा दबदबा होता. त्यांच्याशी राजेंद्रकृष्ण यांची गट्टी जमली आणि या जोडीने नंतर पुढे उत्तमोत्तम गाणी हिंदी सिनेसंगीताच्या कोषात अजरामर केली. ‘अनारकली’, ‘आझाद’, ‘आशा’ आणि सर्व जगाला वेड लावणार्याा अलबेलाची गाणी होती. सी. रामचंद्र, राजेंद्रकृष्ण या जोडीने ‘यह जिंदगी उसी की है’ (अनारकली), ‘ए दिल मुझे बता दे, तू आ गया है’ (भाई भाई), ‘मन डोले मेरा तन डोले’ (नागीन), ‘कौन आया मेरे मनके द्वारे’ (देख कबिरा रोया), ‘छूप गया कोई रे दूर से पुकार के’ (चंपाकली), ‘चल उड जा रे पंछी’(भाभी), इतना ना मुझसे तू प्यार बढा (छाया) अशी सुरस गाणी दिली. ३०० हून अधिक चित्रपटांचं गीतलेखन करणाऱ्या राजेंद्रकृष्ण यांनी अनेक चित्रपटांचं कथा, पटकथा लेखनही केलं होते.
नया दिन नयी रात, गीता मेरा नाम, बनारसी बाबू , ब्लॅकमेल, बॉम्बे टू गोवा, रखवाला, गोपी, एक श्रीमान एक श्रीमती, सच्चाई, वारीस, पडोसन, साधू और शैतान, नई रोशनी, प्यार किये जा, खानदान, ब्लफ मास्टर, छाया, नजराना, भाई भाई, नागीन, ‘पडोसन’ची पटकथा मा. राजेंद्रकृष्ण यांनीच लिहिली होती. मा.राजेंद्रकृष्ण रेस खेळण्याचा छंद होता, यात त्यांना १९६० च्या दरम्यान त्यांच्या रेस खेळण्याच्या छंदाला यश लाभलं होतं, ४९ लाखांचा ‘जॅकपॉट’ घोड्यांच्या शर्यतीत लागला होता.
काय योगायोग राजेंद्रकृष्ण यांचा जन्म ६ जून व निधन सुद्धा ६ जून. राजेंद्रकृष्ण यांचे ६ जून १९८८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
राजेंद्रकृष्ण यांची गाणी.
https://www.youtube.com/watch?v=tPvqD3K8jXQ
https://www.youtube.com/watch?v=BylUftxAmvo
pd - June 6, 2017
यावर्षी सुब्रमण्यम यांनी चित्रपट सृष्टीतील पाच दशकांची कारकिर्द पूर्ण केली. एस. पी. बालसुब्रम्हण्यम यांना SPB किंवा बालू असेही म्हणतात. चाळीस हजाराहून अधिक गाणी गायल्याबद्दल त्यांच्या नावाची गिनीज बुकमध्ये नोंद आहे. त्यांना सहावेळा राष्ट्रीय पुरस्कारासह पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने ही सन्माबनित करण्यात आले आहे. १९६६ मध्ये त्यांनी गायक म्हणून पदार्पण केले. एस. पी. बालसुब्रम्हण्यम यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करण्यासाठी मिळाला आहे. त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, उत्कृष्ट पुरुष गायकाचा सहा वेळा पुरस्कार आणि नंदी पुरस्कार मध्ये तेलगू सिनेमासाठी 25 वेळा मिळाला आहे. मेन प्यार किया, हम आपके हैं कौन, एक दूजे के लिए अशा चित्रपटातील त्यांची गाणी गाजली. ‘स्वच्छ भारत’ मोहिमेचे राजदूत (ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर) म्हणून एस. पी. बालसुब्रमण्यम करत आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
pd - June 4, 2017
अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांचं साहित्य अनुवादित झालं आहे. त्यांना लेखनाबद्दल साहित्य अकादमीची फेलोशिप मिळाली होती. तसंच भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
pd - April 27, 2024
वयाच्या बाविसाव्या वर्षी दादांनी आपल्या वडिलांनी सुरू केलेल्या पाठशाळेत भगवद्गीतेवर प्रवचनं द्यायला सुरुवात केली.१९५४ मध्ये जपान येथे झालेल्या दुसर्या धार्मिक परिषदेत त्यांनी वेद आणि भगवद्गीतेवरील तत्त्वज्ञानावर भाषण केले.
pd - October 19, 2021
आशा काळे या मराठी नाट्यसृष्टीतल्या एक आघाडीच्या अभिनेत्री आहेत. त्यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९४८ रोजी गडहिंग्लज येथे झाला. आशा काळे मूळच्या कोल्हापूरच्या. त्यांचा जन्म गडहिंग्लजचा. आशा काळे यांचे वडील रावसाहेब काळे हे वनाधिकारी होते. शासकीय नोकरी असल्याने बदली ठरलेली. आई, वडील, मोठा भाऊ, धाकटी बहीण असे त्यांचे कुटुंब. रत्नागिरी, पाली, भोर, पुणे, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी त्यांचे बालपण गेले. शाळाही त्यामुळे वेगवेगळ्या झाल्या. लहानपणापासून त्यांना नाटक किंवा चित्रपटाची आवड नव्हतीच. नृत्याची विशेष आवड असल्याने बाळासाहेब गोखले आणि हजारीलाल यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय नृत्याचे (भरतनाटय़म्, कथ्थक) धडे घेतले. आठ-दहा वर्षांच्या असताना त्यांचे नृत्याचे कार्यक्रमही होत असत. आईचे मामा अभिनेते प्रकाश इनामदार यांचे वडील आप्पासाहेब इनामदार हे यांच्या ‘कलासंघ’ संस्थेतही त्यांनी काम केले. १९६२ मध्ये भारत-चीन युद्धाच्या वेळी देशाच्या संरक्षण निधीसाठी मदत म्हणून व्ही. शांताराम, बाबुराव पेंढारकर यांनी ‘शिवसंभव’ या नाटकाची निर्मिती केली होती. या नाटकात निजामशहाच्या दरबारातील एका प्रसंगात नर्तकीच्या भूमिकेसाठी ते मुलीचा शोध घेत होते. त्यांच्या वडिलांचा आणि पेंढारकर यांचा परिचय होता. पेंढारकर त्यांच्या घरी आले आणि आमच्या नाटकात तुमची मुलगी काम करेल का? असे विचारले. आशा भोसले यांनी गायलेल्या ‘गुलाबी ऑंखे है तेरी’ या ठुमरीवर नृत्य करायचे होते. आई-वडिलांनी परवानगी दिल्यामुळे नाटकात नर्तकी म्हणून आशा काळे यांनी काम केले. स्वत: बाबुराव पेंढारकर, बाळ कोल्हटकर आदी ज्येष्ठ कलाकार नाटकात होते.
त्यावेळी त्या १४ वर्षांच्या होत्या. त्या नाटकाचे पुढे १५ ते २० प्रयोग केले. त्यांची नृत्य आणि अभिनय कला बाबुराव पेंढारकर यांनी पाहिली आणि ‘नाटय़ मंदिर’ संस्थेच्या ‘सीमेवरून परत जा’ या नाटकातील भूमिकेसाठी विचारणा केली. आशा काळे यांचे पहिले व्यावसायिक नाटक, 'सीमेवरून परत. याचे दिग्दर्शक आत्माराम भेंडे होते. पुढे बाळ कोल्हटकर यांचे ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ हे नाटक त्यांनी केले आणि या नाटकाने त्यांना ‘ताई’ अशी ओळख मिळाली.
आशा काळे यांनी वेगवेगळ्या नाटय़संस्थांच्या अनेक नाटकांमधून कामे केली. यात प्रामुख्याने ‘कलावैभव’, ‘अभिजात’, ‘नाटय़संपदा’, ‘सुयोग’ आदींचा समावेश आहे. ‘गहिरे रंग’, ‘गुंतता हृदय हे’, ‘घर श्रीमंतांचे’, ‘देव दीनाघरी धावला’, ‘लहानपण देगा देवा’, ‘वर्षांव’, ‘विषवृक्षाची छाया’, ‘महाराणी पद्मिनी’ आणि अन्य काही त्यांची गाजलेली नाटके. ‘दुर्वाची जुडी’ चे ८४५, ‘गुंतता हृदय हे’ चे ८७५ प्रयोग त्यांनी केले. रंगभूमीवरून पुढे मराठी रुपेरी पडद्यावर त्यांचा प्रवेश झाला. भालजी पेंढारकरांचा ‘तांबडी माती’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘गनिमी कावा’, ‘घर गंगेच्या काठी’, ‘कैवारी’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘सासुरवाशीण’, ‘थोरली जाऊ’, ‘ज्योतिबाचा नवस’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘कुलस्वमिनी अंबाबाई’, ‘चांदणे शिंपीत जाशी’, ‘माहेरची माणसे’ ‘सतीची पुण्याई’, ‘सतीचं वाण’ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. त्यांचे बहुतांश सर्व चित्रपटांनी रौप्यमहोत्सव साजरा केला. राज्य शासनाच्या व्ही. शांताराम, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारासह त्यांना अन्य अनेक पुरस्कार आजवर मिळाले आहेत.
‘महाराणी पद्मिनी’ नाटकाच्या वेळचा एक किस्सा सांगताना त्या म्हणतात, दारव्हेकर मास्तरांनी तालमीच्या वेळी एक कागद दिला. त्यावर ‘शांतारामचा ससा आषाढात मेला, हे ऐकून सान्यांची शकू फार कष्टी झाली’ हे वाक्य लिहिलेले होते. खरे तर नाटकाचा आणि या वाक्याचा काहीच संबंध नव्हता. पण दारव्हेकर मास्तरांनी दिले म्हणून कोणताही प्रश्न न विचारता ते वाक्य पाठ केले. दुसऱ्या दिवशी त्यांना वाक्य पाठ केल्याचे सांगितले. तर हसून आणि लटक्या रागाने ते म्हणाले, अगं ते वाक्य पाठ करण्यासाठी दिले नव्हते. तुझे शब्दोच्चार शुद्ध व स्पष्ट होण्यासाठी ते तुला दिले होते. ‘शांताराम’ मधील ‘श’चा उच्चार शहामृगाच्या ‘श’चा, ‘आषाढातल्या’ ‘ष’चा उच्चार पोटफोडय़ा ‘ष’चा. श, स, ष यातील फरक कळावा म्हणून ते वाक्य तुला दिले होते. आणि तुम्हाला सांगते त्या नाटकातील माझ्या ‘अश्रु पुसू शकेल अशा पुरुषासमोर स्त्रीने रडायचे असते’ या वाक्यावर प्रेक्षकांकडून मला कडाडून टाळी मिळायची. दारव्हेकर मास्तरांचे ते मार्गदर्शन मोलाचे ठरले. या सगळ्याचे मूळ कुठे तरी माझ्या लहानपणातही रुजले गेले. संध्याकाळी घरी आल्यानंतर दिवेलागणीच्या वेळेस घरातील लहान मुलांनी रामरक्षा किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणण्याची आमच्याकडे पद्धत होती. ते स्तोत्रपठण मी तोंडातल्या तोंडात, पुटपुटत केले किंवा घाईघाईत म्हटले तर आई मला ओरडायची आणि अगं मोठय़ाने म्हण, स्पष्ट उच्चार कर असे सांगायची. आईच्या त्या ओरडण्याचाही पुढे फायदा झाला.
नियतीचा आणखी एक योगायोग सांगताना त्या म्हणतात, बाबुराव पेंढारकर यांचे मित्र आणि सिने फोटोग्राफर पांडुरंग नाईक ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ या नाटकाच्या एका प्रयोगाला आले होते.
चित्रपट आणि नाटकांधील सोशीक, सहनशील मुलगी, सून, आई अशा भूमिका हीच त्यांची ओळख झाली. या पठडीतून बाहेर पडावेसे वाटले नाही का? यावर त्या म्हणाल्या, हो तसा प्रयत्न केला. ‘हा खेळ सावल्यांचा’ हा चित्रपट आणि ‘गहिरे रंग’, ‘महाराणी पद्मिनी’ या नाटकातील भूमिका पठडीपेक्षा वेगळ्या होत्या. सोशीक व सहनशील भूमिकांप्रमाणेच या वेगळ्या भूमिकेतही रसिकांनी मला स्वीकारले. माझे कौतुक झाले. या भूमिकाही गाजल्या. वेगवेगळे कंगोरे असलेल्या विविध भूमिका करायला मी तयार असले तरीही माझ्या ‘चेहऱ्या’मुळे सोशीक, सहनशील, सोज्वळ, सुसंस्कृत आणि कौटुंबिक प्रकारच्या भूमिकाच माझ्या जास्त प्रमाणात वाटय़ाला आल्या. अर्थात त्याचे मला अजिबात वाईट वाटत नाही. जे घडायचे ते घडले. पण या सर्व भूमिका मी अक्षरश: जगले. त्या जिवंत केल्या. त्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांनाही मी तेव्हा आणि आजही ‘आपली’ वाटते. आई, ताई, मुलगी, सून असावी तर ‘आशा काळे’सारखी असे प्रेक्षकांना वाटायचे. माझ्या अभिनयाला मिळालेली ही दाद माझ्यासाठी नक्कीच आनंददायी आणि अभिमानास्पद आहे. पुढे फोटोग्राफर पांडुरंग नाईक यांचे चिरंजीव माधव नाईक यांच्याबरोबर आशा काळे यांचा विवाह झाला. माधव नाईक हे लघुपट निर्माते-दिग्दर्शक आहेत. लग्नानंतर त्यांचे नाव गौरी माधव नाईक असे असले तरी त्या आशा काळे या नावानेच प्रसिद्ध आहेत. आशा काळे या सामाजिक कार्य आवडीने करत असतात. त्या अनेक वृद्धाश्रम, मूकबधिर, मतिमंद मुलांच्या शाळा येथे जातात. कर्करोगाच्या शेवटच्या पायरीवर असलेल्या रुग्णांना भेटतात. आशा काळे ‘भारती विद्यापीठा’च्या संचालक मंडळावर आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
माहेरची माणसे चित्रपट.
https://www.youtube.com/watch?v=VqdxHNHxRDA
संसार चित्रपट
https://www.youtube.com/watch?v=pbKOK2XH-R8
pd - November 23, 2018
आपल्या जादुई स्वरांमधून रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन मंत्रमुग्ध करत तर कधी थिरकायला लावणारे गायक जयवंत कुलकर्णी यांची आज पुण्यतिथी
जयवंत कुलकर्णी यांनी गायनाचे धडे प्रसिध्द शास्त्रीय गायक लक्ष्मणराव देवासकर यांच्याकडुन गिरवले, त्यासोबतच उत्तम हार्मोनियम वाजवण्याची सुध्दा त्यांचे गुरु लक्ष्मणराव देवासकर यांच्यामुळेच मिळाली. त्यांच्या आवाजातील गाण्यांवर सत्तरच्या दशकातील तरुणाई इतकी फीदा होती की, महाविद्यालयात कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असोत जयवंत कुलकर्णी यांच्या “हिल पोरी हिला” किंवा “ही चाल तुरू तुरू” या दोन गाण्यांना हमखास “वन्स मोअर” मिळत असे. विशेष म्हणजे “सावध हरिणी सावध” या गाण्याला देखील अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला आणि संगीतविश्वात लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. कारण या गाण्याला उडत्या चालीच्या संगीतासोबतच जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील जोरकसपणा अनुभवायला मिळाला आणि मराठी चित्रपट व भावगीतांसाठी हा प्रयोग तसा नविनच होता. खरं पाहिलं तर जयवंत कुलकर्णी यांनी त्यांचा सांगितीक कारकीर्दीत जी कोणती चित्रपट गीत गायली त्या बहुतांश गाण्यां मध्ये “गावरानबाज” पहायला मिळत असे. पण विशिष्ठ कोणत्याही एकाच ढंगातील गायन प्रकारात व अडकता जयवंतजींनी “अष्टविनायका तुझा महिमा कसा”, “अंतरंगी तो प्रभाती छेडितो स्वरबासरी, नाम त्याचे श्रीहरि नाम त्याचे श्रीहरि”, “ विठुमाऊली तु माऊली जगाची, माऊली तू मूर्ती विठठ्लाची ” आणि “राम कुष्ण नारायण हरि, केशवा मुरारी पांडुरंगा” यासारखी अध्यात्मिक गीत आणि अभंग तल्लीन होऊन गायले! तसंच “अजिंक्य भारत अजिंक्य जनता” , “मंगल देशा पवित्र देशा” या दोन्ही गीतील त्यांच्या स्वरातून देशाभिमान प्रगट झाला नसता तर नवलच !
“शाब्बास बिरबल शाब्बास बिरबल” हे मराठी संगीत संगभूमीवर गाजलेले नाटक आणि त्यातील “विश्वानाथ सूत्रधार तूच श्याम सुंदरा ” ही नांदी आजही ऐकल्यावर ताजी वाटावी अशीच आहे, या नांदीला जयवंत कुलकर्णींसह पंडित-राम मराठे आणि रामदास कामत या गायकाने स्वरबध्द केले होते. या नांदीमुळे जयवंत कुलकर्णी यांच्या गायकीच्या शिरपेचात नाट्यपद गाण्याचा तुरा देखील रोवला गेला. मराठी चित्रपटांतील द्वंद्व गीतांमध्ये काही गायक-गायिकांच्या जोड्या गाजल्या, त्यापैकी जयवंत कुलकर्णीं सोबत उषा मंगेशकर ही गायनातील जोडी स्वरांच्या तालावर अक्षरश: ठेका धरायला लावत. या दोन्ही गायकांनी एकत्रित गायलेली सोंगाड्या चित्रपटातील “काय गं सखु”, आणि “माळ्याच्या मळ्यामधी कोण गं उभी” तर “सख्या साजणा” मधील “चल चल जाऊ शिणुमाला”, किंवा गारंबीचा बापू चित्रपटातील “चांदणं टिपूर हलतो वारा” तसंच “लागे ना, लागे ना रे थांग तुझ्या ह्रदयाचा ” आजही आपल्या ओठांवर रुंजी घालताहेत. यासह नवरा माझा ब्रम्हचारी मधील “आई तुझं लेकरु येडं गच कोकरु”, पडछाया चित्रपटातील “नाच लाडके नाच, जगापासुनी दूर राहुया नको जनांचा त्रास”, तर “अनोळखी”तलं “ जीवन गगन मी पाखरू ” आणि “अंधाराची खंत तू कशाला करिसी रे”, “नाते जुळले मनाचे मनाशी” या भावगीतातून मानवी मनाचा वेध त्यांच्या स्वरातनं अगदी प्रभावीपणे उमटला. “आमचा राजू का रुसला” , “माझ्या मामाची रंगीत गाडी हो,तिला खिल्लारी बैलांची जोडी हो” , “ गाव असा नि माणसं अशी, नातीगोती जडतंत कशी” अशी मिश्कील स्वरुपाची व बालगीते रसिकांनी उचलून धरली. “आयलय तूफ़ान बंदराला” या चित्रपटासाठी, लता मंगेशकर यांच्यासोबत, “आयलय बंदरा चांदाचं जहाज, हवलुबाईची पुनीव आज ” , हे क्वचित प्रसंगी ऐकायला मिळणारे अगदी वेगळ्या प्रकारचे कोळीगीत गायले होते.जयवंत कुलकर्णीं यांनी गायलेली प्रत्येक गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. यामध्ये भावगीतं, भक्तीगीतं व असंख्य चित्रपटगीतांचा देखील समावेश आहे. दादा कोंडकेंवर चित्रीत झालेल्या अनेक मराठी गाण्यांसाठी जयवंत कुलकर्णी यांनी पार्श्वगायन केलं असून हा आवाज जणु दादां कोंडकेंचा हे समीकरणचं होऊन बसले. अनेक मराठी गाण्यांना गावरान ढंगात गाऊन एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा बहुमान जयवंत कुलकर्णींचा आहे. “ज्योतिबाचा नवस” आणि “एकटा जीव सदाशिव” या चित्रपटातील गाण्यासाठी जयवंत कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारामध्ये गौरवण्यात आले होते.
मा.जयवंत कुलकर्णी यांचे ३१ ऑगस्ट २००५ रोजी निधन झाले. आपल्या समूहाकडून मा.जयवंत कुलकर्णी यांना आदरांजली.
--संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. सागर मालाडकर/ मराठी सृष्टी
pd - August 31, 2016
महान धावपटू फ्लाइंगसीख मिल्खासिंग यांचा जन्म २० नोव्हेंबर १९२९ रोजी झाला.
मिल्खा सिंग यांचा जन्म गोविंदपुरा स्थित शीख कुटुंबात झाला होता. मिल्खा सिंग यांनी आपल्या जीवनात ८० शर्यतीत भाग घेतला. त्यात ते ७७ वेळेस विजयी झाले. तीन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. १९५८ मधील कार्डिफ राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये मिल्खा सिंग यांनी 400 मीटरच्या शर्यतीत गोल्ड मेडल मिळवलं होतं. पण त्यांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली १९६० च्या रोम ओलिम्पिक स्पर्धेमुळे. त्या स्पर्धेत ४०० मीटरच्या शर्यतीत अगदीच सूक्ष्म फरकानं त्यांचं कांस्यपदक चुकलं होतं.
रोम ऑलिम्पिकमध्ये मिल्खा सिंग यांनी ४०० मीटर शर्यत ४५.७३ सेकंदांमध्ये पूर्ण केली होती. जर्मनीचा धावपटू कार्ल कूफमॅनपेक्षा ते सेकंदाच्या १०० व्या भाग एवढ्या कमी फरकानं मागं राहिले होते. पण त्यांनी शर्यत पूर्ण केलेली ही वेळ त्यानंतर पुढचे ४० वर्षं राष्ट्रीय विक्रम म्हणून कायम होती.मिल्खा कॉमनवेल्थ खेळात वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारे स्वतंत्र भारतातील पहिले खेळाडू होते.१९५८ च्या टोकियो इथं झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये मिल्खा सिंग यांनी २०० मीटर आणि ४०० मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकलं होतं. तर १९६२ च्या जकार्ता आशियाई स्पर्धांमध्ये ४०० मीटर आणि ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीतही सुवर्ण पदक जिंकलं होतं.
लष्करात जाण्याची मिल्खा सिंग यांची खूप इच्छा होती. त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला; मात्र तीन वेळा त्यांना अपयश आले. त्यामुळे त्यांनी लष्करात जाण्याचा विचार सोडला. मिल्खा सिंग यांना 'फ्लाइंग सीख' हे नाव पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आयुब खान यांनी १९६० मध्ये दिले होते. त्या वेळी मिल्खा यांनी पाकिस्तानचा सुवर्णपदक विजेता अब्दुल खालिकला पाकिस्तानातच हरवले होते. मिल्खा सिंगच्या आई-वडिलांचा मृत्यू फाळणीदरम्यानच्या दंगलीमध्ये झाला. मिल्खा यांचे लग्न भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार निर्मल कौरसोबत झाले. मिल्खा सिंग यांची पत्नी देखील एक खेळाडू होती. हे अनेक जणांना माहीत ही नसेल कदाचित. दोन महान खेळाडूंच्या मृत्यूमुळे क्रीडा जगतात शोककळा पसरली आहे. मिल्खा सिंह आणि त्यांची पत्नी निर्मला कौर यांची लव्हस्टोरी वेगळी आहे. मिल्खा सिंह हे पहिल्या नजरेतच निर्मला यांच्या प्रेमात पडले होते.
मिल्खा सिंग आणि निर्मला कौर यांची पहिली नजर ही खेळाच्या मैदानावरच भिडली. तिथूनच त्यांच्या प्रेमाची गोष्ट सुरू झाली. मिल्खा सिंग यांचं अनेक मुलींसोबतच्या अफेअरच्या चर्चाही गाजल्या होत्या. एक दोन नव्हे तर तीन मुलींसोबत मिल्खा सिंह यांचं नाव जोडलं गेलं होतं. या मुलींसोबत प्रेमाचे किस्सेही चांगलेच रंगले होते. मात्र मिल्खा यांचा जीव जडला तो मैदानावरच्या हॉलीबॉल खेळणाऱ्या राणीवर.
1955 मध्ये श्रीलंकेमध्ये मिल्खा सिंग आणि निर्मला कौर पहिली भेट झाली होती. याच ठिकाणी दोघांची एकमेकांशी ओळखही झाली. मिल्खा सिंग यांनी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, ते पहिल्याच भेटीत निर्मला कौर यांच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी कागद नसल्यानं निर्मला कौर यांच्या हातावर रुम नंबर लिहिला असल्याचा किस्साही फार गाजला आहे.
पहिल्या भेटीनंतर 1958 मध्ये दोघांची भेट पुन्हा एकदा झाली. 1960 मध्ये दोघांची भेट पुन्हा एकदा दिल्लीतील नॅशनल स्टेडियममध्ये झाली. तेव्हा मिल्खा सिंग खेळातील मोठं नाव बनलं होतं. या काळात कॉफीसाठी एकत्र येताना त्यांचं प्रेम वाढत गेलं.
दरम्यान या दोघांच्याही लग्नासाठी निर्मला कौर यांच्या घरातून मात्र विरोध होता. मिल्खा सिंग शिख असल्याने निर्मला कौर यांचे वडील दोघांच्या लग्नासाठी तयार नव्हते. त्यामुळे लग्नाच्या मार्गात अडथळा येत होता. अशावेळी पंजाबच्या तत्कालीन मुख्यमंत्री प्रताप सिंह कैरो यांना मध्यस्थी करावी लागली होती.
१९६२ मध्ये मिल्खा आणि निर्मला या दोघांचं लग्न झालं. मिल्खा सिंग यांनी अनेकदा आपल्या पत्नीचे जाहीरपणे कौतुक केलं केलं होतं. ते आपल्या बायकोला स्वतःची सर्वात मोठी ताकद मानत असत.
त्यांचा मुलगा जीव सिंग गोल्फचा प्रसिद्ध खेळाडू आहे. भारत सरकारने त्यांना अर्जून पुरस्कार आणि ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
भाग 'मिल्खा भाग मिल्खा' हा चित्रपट मिल्खा सिंग यांच्या १९४६ ते १९६० पर्यंतच्या जीवनावर आधारित बायोपिक आहे. यात फरहान अख्तर यांनी मिल्खा सिंग यांचा अभिनय केला आहे. या वयात ही मिल्खा सिंग हे देशातल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम करत असत. यासाठी सरकारनंही त्यांना मदतीचा हात दिला होता. मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांचं १३ जून २०२१ कोरोनामुळं निधन झाले होते.
मिल्खा सिंग यांचे १८ जून २०२१ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
pd - June 18, 2022
ज्यांच्या बॉर्न फ्री पुस्तकावर चित्रपट निघाला अशा वन्यजीव लेखीका जॉय अॅडम्सन यांचा जन्म २० जानेवारी १९१० रोजी ऑस्ट्रियामध्ये रोजी झाला. जॉय अॅडम्सन या आपल्या एल्सा सिंहिणीवरच्या पुस्तकामुळे सर्व निसर्गप्रेमी आणि जंगलप्रेमी मंडळींमध्ये विशेष प्रसिद्ध असणारी लेखिका. जॉर्ज अॅडम्सन या वन्यरक्षकाशी लग्न करून त्या केनियामध्ये स्थायिक झाल्या.
एकदा जॉर्ज अॅडम्सन यांनी स्वसंरक्षणार्थ मारलेल्या सिंहिणीचे तीन छावे त्यांना मिळाले. त्यातले दोन प्राणिसंग्रहालयाला देऊन एक तिने आपल्याजवळ ठेवला आणि तिचं नाव ‘एल्सा’ ठेवलं आणि तिला अगदी आपल्या घरातच वाढवलं. पुढे तिची पूर्ण वाढ होऊन एल्सालाही छावे झाल्यावर ती त्यांना भेटत राहिली. त्या सर्व अनुभवांवर जॉय अॅडम्सनने तीन पुस्तकं लिहिली ‘बॉर्न फ्री’, ‘लिव्हिंग फ्री’ आणि ‘फॉरेव्हर फ्री.’
बॉर्न फ्रीची कथा आहे एल्सा सिंहिण आणि तिचे पालक जॉय आणि जॉर्ज अॅीडम्सन या जोडप्याची. केनियाच्या जंगलात जंगलरक्षक असलेल्या जॉर्जने एकदा त्याच्या अंगावर चालून आलेल्या सिंहांवर स्वसंरक्षणार्थ रायफल चालवली आणि सिंह-सिंहीण ठार झाल्यावर त्याला दिसले ते या जोडीचे तीन छावे. या पिल्लांच्याच संरक्षणासाठी सिंह जॉर्जवर चालून गेले होते.
मग या तीन छाव्यांना जॉय आणि जॉर्जने वाढवले. त्यातलीच एक एल्सा. तिला आणि तिच्या भावंडांना वाढवताना आलेल्या अनुभवांवर अॅजडम्सनने बॉर्न फ्री हे अनुभवकथनपर पुस्तक लिहिलं आणि पुढे दिग्दर्शक जेम्स एच. हिल्स याने या जोडप्याच्या विलक्षण अनुभवांवर याच नावाचा सुंदर चित्रपट काढला.
एल्सा आणि तिची दोन भावंडं अॅअडम्सनच्या घरातच लहानाचे मोठे होतात. त्यापैकी दोघांची रवानगी रॉटरडॅमच्या प्राणीसंग्रहालयात केली जाते. पण एल्सा त्यांच्याबरोबरच राहत असते. दररोज धमाल मस्ती, जॉर्ज वा जॉयबरोबर भटकंती ही तिची दिनचर्या. पण तिचा खेळकरपणा इतरांना महाग पडत असतो.
एकदा ती हत्तींच्या कळपाच्या पाठी लागल्याने बिथरलेले हत्ती तिथल्याच एका गावात शिरतात, वस्तीची पार वाताहात करतात. या नासधुशीला कारणीभूत ठरलेल्या मस्तीखोर एल्साला आता एकतर जंगलात सोडायचे नाहीतर प्राणीसंग्रहालयात पाठवायचे अशी वेळ ओढवते. त्यावेळी जॉय मनसोक्त बागडणा-या, स्वच्छंद एल्साला जंगलात सोडायचा निर्धार करते.
पण, अॅतडम्सन कुटुंबात एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे वाढलेल्या एल्साला जंगलचा कायदा, शिकारीच्या त – हा कोण शिकवणार? वन्य प्राण्यांना आत्मसंरक्षणाचे, शिकारीचे बाळकडू त्यांच्या आईकडून मिळत असते. एल्सा तर पोरकी असते. शेवटी जॉयचं तिला प्रशिक्षण देते, शिकार कशी करायची ते शिकवते, जंगलातील वास्तव्यासाठी तयार करते. एल्साची जंगलात पाठवणी करून जॉय आणि जॉर्ज तिचा जड अंतकरणाने निरोप घेतात.
एल्सा जंगलात टिकाव धरेल का, इतर सिंह तिला स्वीकारतील का अशा अनेक प्रश्नांचं काहूर त्यांच्या मनात उठलेलं असतं. पण वर्षभरानं लंडनहून परतलेल्या या दोघांना एल्सा पुन्हा भेटते, ओळखते. मधल्या काळात एल्साचं जंगलाशी आणि तिथल्या सिंहांशीही नातं जुळलेलं असतं. तिच्याबरोबर तिचे तीन छावेही असतात.. या सगळ्या अनुभवांवरील पुस्तक म्हणजे बॉर्न फ्री.
ही तिन्ही पुस्तकं जगभर तुफान गाजली आणि त्यावर सिनेमे निघाले. पुढे त्यांनी चित्त्याचं ‘पिप्पा’ नावाचं एक पिल्लूही पाळलं आणि त्या पिप्पाच्या जीवनावर ‘दी स्पॉटेड स्फिंक्स’ हे पुस्तक लिहिलं. तेही लोकप्रिय झालं. बिबट्यांसंबंधी त्यांनी लिहिलेलं ‘क्वीन ऑफ शेबा’ हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. ‘दी सर्चिंग स्पिरीट’ हे त्यांचे आत्मचरित्र सुद्धा गाजलं होतं. ३ जानेवारी १९८० रोजी एका माथेफिरूने भोसकून जॉय अॅडम्सन यांची हत्या केली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
pd - January 20, 2019
गिटारवादक, अभिनेता आणि 'किंग ऑफ द रॉक अँड रोल'
त्यांचा जन्म ८ जानेवारी १९३५ रोजी झाला. कॉलेज शिक्षणासाठी ट्रक चालकाचं काम करण्याऱ्या एल्व्हिस यांनी एका ठिकाणी गायक म्हणून 'ऑडिशन' दिली पण त्यात तो नापास झाला. परीक्षकाने त्याला तुझ्यासाठी ट्रक ड्रायव्हरचीच जागा योग्य आहे असा अनाहूत सल्लाही दिला. यानंतर काही महिन्यातच हा मुलगा आणखी एका ऑडिशनसाठी गेला. यावेळी ही त्याची भट्टी काही जमत नव्हती. दिवसभर प्रयत्न करून थकलेला हा मुलगा शेवटी शेवटी पार कंटाळला पण इतर वादकांनी ब्रेक घेतला असताना आपल्या गिटारवर एकटाच गाऊ लागला. 'आर्थर कृडूप'चं ते मूळ गाणं हा मुलगा पार वेगळ्या ढंगात आणि जलद लयीत गाऊ लागला नि म्युझिक रूम मध्ये जणू विजेचा झटका बसल्यासारखं होऊन एक उत्फुल्ल वातावरण निर्माण झालं. इतर वादकांनी क्षणात याला साथ द्यायला सुरुवात केली आणि हे मूळचं संथ गाणं निराळ्याच आवेशात रेकोर्ड झालं. हे गाणं पहिल्यांदा 'रेडिओ'वर वाजवलं जाताच लोकांनी 'रेडिओ स्टेशन'वर फोन करून गायकाची चौकशी करायला सुरुवात केली. सर्वांना उत्सुकता होती की हा कोण नवा कृष्णवर्णी गायक आलाय. आणि जेव्हा त्यांना कळलं की नवीन गायक गौरवर्णी आहे पण याचं संगीत नि गायन मात्र 'ब्लूज-गोस्पेल' ढंगातलं आहे, त्यांचा विश्वासच बसेना. रेडिओवर या मुलाच्या मुलाखती प्रसारित होऊ लागल्या आणि त्यात मुख्यत्वाने त्याच्या शाळा आणि कॉलेजबद्दलचे प्रश्न विचारले जाऊ लागले की ज्यातून त्याचं गौरवर्णत्व सिद्ध व्हावं. गौर आणि कृष्ण दोन्ही वर्णीयांमध्ये हा मुलगा प्रचंड लोकप्रिय झाला. त्याच्या सांगीतिक आणि गायकी ढंगालाच पुढे 'रॉक एन रोल' अशी संज्ञा मिळाली. हा मुलगा होता 'द किंग' या नावाने नंतर ओळखला गेलेला 'एल्व्हिस प्रेस्ले' आणि ते गाणं होतं "That's All Right, Mama". १९६० च्या दशकात अमेरिकेने व्हिएतनाम मध्ये पुकारलेल्या युद्धावर जाण्यासाठी 'एल्व्हीस'चे नावही लष्करात दाखल होण्यासाठी पुढे आले. यावेळी तो चांगलाच लोकप्रिय होता. आपल्या लोकप्रियतेच्या आश्रयाने तो स्वत:ला अपवाद म्हणून लष्कराच्या सेवेतून स्वत:ची सुटका करून घेऊ शकला असता पण त्याऐवजी त्याने सैन्यात दाखल होणे मान्य केले. सैन्यात २ वर्ष सेवा करून तो परत अमेरिकेत दाखल झाला. या २ वर्षांच्या काळातच फ्रायबर्ग, जर्मनी इथे त्याची भेट 'प्रिसिला बिलिव'शी झाली आणि तिच्याशी त्याने ७ वर्षांनंतर लग्न केलं. एल्व्हिस प्रिस्लेची मुलगी लिसा मेरी हिच्याशी मायकेल जॅक्सननं मे १९९४ मध्ये विवाह केला. 'एल्व्हिस' यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गाणी या 'रॉक एण्ड रोल' संगीतात दिली किंबहुना त्याच्यासाठीच गीतकारांनी लिहिलेली गाणी आता खास त्याचीच म्हणून गणली जातात. यातलं संगीत, गायन आणि सादरीकरण हे 'एल्व्हिस' स्टाईलचंच आहे. मूळ 'जॉर्ज वाईस', 'ह्युगो पेरेत्ती' आणि 'लुइगी क्रियेटर' यांनी लिहिलेलं गाणं १९६१ साली 'एल्विस'ने गायलं आणि काही दिवसातच लोकप्रियतेच्या कळसाला पोहोचलं. या गाण्यातला 'एल्विस'चा आवाज, त्याची गायकी, हे गाणं म्हणताना त्याचा स्टेज वरचा वावर, त्याचे झ्याक प्याक कपडे, त्याचं ते पार डोळ्यात बघण सारं सारं जबरदस्त होतं. पुढे अनेक वर्ष तो आपल्या कार्यक्रमाची सांगता या गाण्याने करायचा. 'एल्विस' यांचे एक गाणं आहे, "Jailhouse Rock". 'जेरी लिबर' आणि 'माईक स्टोलर' यांनी लिहिलेलं हे परफेक्ट 'रॉक एन रोल' गाणं 'एल्विस'ने झकास गायलेलं आहेच पण याच नावाच्या त्याच्या चित्रपटात त्याने हे त्याच्या स्वत:च्या नृत्यशैलीत सादरही केलेलं आहे. 'लष्करी सेवेनंतर 'एल्व्हिस' यांनी आपलं करीअर पुन्हा सुरु केलं. संगीत, काव्य याबरोबरच त्यांनी अनेक सिनेमांमध्येही कामं केली. व्हिएतनाम युद्धापूर्वीपेक्षाही नंतर त्यांची लोकप्रियता कैक पटीने वाढली. १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि ७० च्या दशकाच्या उत्तरार्धात अनेकदा सलग दीड-दोन वर्षांचे संगीत दौरे त्याने केले. याच दरम्यान सिनेमातील कामंही होतीच. मा.एल्व्हिस प्रिस्टले यांचे १६ ऑगस्ट १९७७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
'द किंग' एल्व्हिस प्रिस्लेची काही गाणी.
http://www.youtube.com/watch?v=zRu3tw9fYxE&feature=related
http://www.youtube.com/watch?v=-rS55BtfNtI&feature=related
http://www.youtube.com/watch?v=e1s-E1WWipc
pd - January 8, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti