प्रभाकर पेंढारकर हे चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांचे सुपुत्र असलेल्या पेंढारकर यांनी अनेक दर्जदार चित्रपटांची निर्मिती केली.
October 8, 2021
सरस्वतीबाई राणे ऊर्फ सकीना यांचा जन्म किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब व ताराबाई माने या दांपत्याच्या पोटी ४ ऑक्टोबर १९१३ रोजी झाला.
ताराबाई ह्या सरदार मारुतीराव माने यांच्या सुकन्या होत. मारुतीराव माने हे बडोदा संस्थानाच्या राजमातांचे बंधू होते. अब्दुल करीम खाँ हे त्या राजदरबारात गायक होते व ताराबाईंना गाणे शिकवत होते. दोघांचे प्रेम जुळले व त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला. परंतु ताराबाईंच्या मातापित्यांचा ह्या विवाहास विरोध असल्यामुळे अब्दुल करीम खाँ व ताराबाईंना संस्थान सोडावे लागले.
त्यांनी मुंबईत संसार थाटला व यथावकाश पाच अपत्यांना जन्म दिला. त्यांच्या दोन पुत्रांची नावे सुरेश उर्फ अब्दुल रहमान व कृष्ण ही होती; तर मुलींची नावे चंपाकली, गुलाब आणि सकीना उर्फ छोटूताई अशी होती. पुढे ही भावंडे अनुक्रमे सुरेशबाबू माने, कृष्णराव माने, हिराबाई बडोदेकर, कमलाबाई बडोदेकर आणि सरस्वतीबाई राणे या नावांनी प्रसिद्धीस पावली.
उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेब यांच्याकडून सुरू झालेली किराणा घराण्याची परंपरा पुढे सुरेशबाबू माने, हिराबाई बडोदेकर, सरस्वतीबाई राणे, कमलाबाई बडोदेकर या भावंडांनी समर्थपणे सुरू ठेवली. त्यांनी किराणा घराण्याला अनेक दिग्गज गायक दिले. संगीत एकच प्याला..संशय कल्लोळ..संगीत सौभद्र या मराठी संगीत नाटकात सरस्वतीबाई राणे यांनी कामे केली होती. ख्याल गायिकेतील जुगलबंदीची सुरवात सरस्वतीबाई राणे यांनीच केली होती.
मराठी चित्रपट ''पायाची दासी'' मध्ये महिला पार्श्वगायिका म्हणून सरस्वतीबाई राणे यांनी गाणी गायली होती. १९४३ मध्ये प्रदर्शित झालेल्या निर्देशक विजय भट्ट यांच्या ''रामराज्य'' या चित्रपटातील सरस्वतीबाई राणे यांनी गायलेली गाणी खूपच लोकांना आवडली होती. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताप्रमाणेच मराठी-हिंदी चित्रपटांसाठी पार्श्व९गायन, भावगीत गायन, संगीत रंगभूमीवर अभिनय असे त्यांचे विविधांगी कर्तृत्व होते. गायिका मीना फातर्पेकर यांच्या त्या आजी होत. सरस्वतीबाई राणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दर वर्षी पुरस्कार देण्यात येतो.
सरस्वतीबाई राणे यांचे निधन १० ऑक्टोबर २००६ रोजी झाले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
October 31, 2017
कल्पवृक्ष कन्येसाठी, गंगा यमुना डोळ्यात उभ्या कां?, लिंबलोण उतरता, जिथे सागरा धरणी मिळते, सप्तपदी ही रोज चालते, रिमझिम पाउस पडे सारखा, घट डोईवर, अशा एकसे एक सुंदर गाण्यांचे जनक म्हणजे नामवंत गीतकार म्हणजे कवी पी. सावळाराम. त्यांचा जन्म ४ जुलै १९१४ रोजी झाला.
पी.सावळाराम यांचे खरे नाव निवृत्ती रावजी पाटील. पी.सावळाराम यांना शालेय वयापासूनच काव्याची गोडी लागली होती. पुढे ते शिक्षणासाठी सांगलीला महाविद्यालयात दाखल झाले, तेथे त्यांना तिथे शिक्षक लाभले, ते थोर कवी माधव ज्युलियन म्हणजेच प्रोफेसर माधवराव पटवर्धन तेथेच ह्या सर्जनशील मनाच्या पी.सावळाराम यांची काव्यकळा फुलू लागली. त्यांच्या संपर्कात ते आले, तेव्हा त्यांनी ‘सौंदर्य नसते रंगात। सौंदर्य असते अंतरंगात। उघडुनि पाही।’ या ओळी असलेली ‘काळा गुलाब’ शीर्षकाची कविता लिहिली. ही कविता तेव्हा कॉलेजमधल्या वर्णाने काळी, परंतु दिसायला सुंदर असलेल्या एका मुलीवर लिहिली होती.
पी.सावळारामांपाशी विलक्षण प्रतिभा होती. पंढरपूरला बडव्यांचे असलेले वर्चस्व पाहिल्यावर ‘पंढरीनाथा झडकरी आता। पंढरी सोडुनि चला। विनविते रखुमाई विठ्ठला’ हे गीत त्यांनी लिहिले. महाविद्यालयीन शिक्षण झालेले निवृत्ती पाटील, ठाणे येथे रेशनिंग ऑफिसमध्ये नोकरीसाठी रुजू झाले. काव्याची उर्मी त्यांना गप्प बसू देत नव्हती. एच. एम.व्ही. कंपनीच्या वसंत कामेरकरांनी पाटलांना संधी दिली आणि ह्या पी.सावळाराम यांची गट्टी जमली ती संगीतकार वसंत प्रभू ह्यांच्याशी. त्यांची पहिली दोन गाणी प्रसिद्ध झाली, निवृत्ती पाटील ह्या नावाने, पण त्याचवेळी नागपूर आकाशवाणी केंद्रावर निवृत्ती पाटील नावाचेच बासरीवादक कलाकार होते, ह्या नामसाधर्म्यातुन त्यांना बाहेर यायचे होते, त्यावेळी पी. सावळाराम ह्यांचे एक मित्र उपयोगाला आले. ते मित्र होते, विधानसभेचे माजी अध्यक्ष वि. स. पागे होय. तर ह्या पागे यांना, ह. ना. आपटे ह्यांच्या त्यावेळी गाजत असलेल्या, "उषःकाल" ह्या कादंबरीमधील "सावळ्या" ह्या व्यक्तिरेखेने भारावून टाकले होते. पागे ह्यांना, आपला मित्र निवृत्ती पाटील ह्याच्या व्यक्तिरेखेत ह्या "सावळ्या"चे साधर्म्य जाणवायचे. ते निवृत्ती पाटील ह्यांना "सावळ्या" नावाने हाकारायचे. झाले. अशा रीतीने निवृत्ती पाटील ह्यांनी आपले "पी.सावळाराम" हे नाव धारण केले.
पंढरपूरला बडव्यांचे असलेले वर्चस्व पाहिल्यावर ‘पंढरीनाथा झडकरी आता। पंढरी सोडुनि चला। विनविते रखुमाई विठ्ठला’ हे गीत त्यांनी लिहिले. १९४९ साली ‘राघु बोले मैनेच्या कानात ग’ हे पहिले गीत त्यांनी लिहिले. वसंत प्रभू, माधव शिंदे व दिनकर पाटील हे त्यांचे स्नेही होते. मराठी चित्रपटांचा तो ऐन बहराचा काळ होता. जिथे चित्रपटगृहे होती, तिथे प्रदर्शित होणाऱ्या बऱ्याच चित्रपटांतून पी. सावळारामांची गाणी असायची. सर्वसामान्य लोकांपर्यंत ती अशी थेटपणे पोहोचली होती. परंतु पी. सावळाराम यांच्या गीतांचा संग्रह फार उशिरा म्हणजे १९९१ साली कुसुमाग्रजांच्या प्रस्तावनेसह प्रसिद्ध झाला. पण त्याआधी कित्येक वर्षे तुकारामांच्या अभंगांप्रमाणे सावळारामांची गीते लोकांच्या मनात आणि कंठात कायमची बसली होती. त्यांना सामाजिक कार्याची ओढ होती. १९६४-६५ साली ते ठाण्याचे नगराध्यक्ष झाले. येऊर पाणी योजना आणि ड्रेनेज सिस्टमसंबंधी त्यांनी विशेषत्वाने लक्ष घालून त्या पूर्णत्वास नेल्या. शिक्षकांच्या पगारात त्यांच्याच काळात वाढ झाली. ६३-६४ साली ते शिक्षण समितीचे सभासदही राहिले. ठाण्याच्या ज्ञानसाधना कॉलेजच्या स्थापनेत इतरांबरोबर त्यांचाही सहभाग होता. त्यांच्याप्रतीच्या कृतज्ञतेने या कॉलेजने ‘पी. सावळाराम गौरवग्रंथ’ प्रकाशित केला.
पी. सावळाराम यांची गीते अशी लोकमानसात त्यांचा ठेवा म्हणून स्थिरावली आहेत. संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम यांच्या अभंग व ओव्यांना हे भाग्य लाभले होते. अलीकडल्या काळात ग. दि. माडगूळकर यांच्या बरोबरीने कवी पी. सावळाराम यांना ते लाभले. या अर्थाने ते ‘जनकवी’ आहेत.
‘गंगा यमुना डोळ्यांत उभ्या का?’ या गीतातील भावना लग्न होऊन सासरी जाणाऱ्या कुणाही मुलीच्या आईच्या आहेत. आपल्याला दुरावणार म्हटल्यावर होणारे दु:ख अतिशय अल्पाक्षरी, पण अर्थपूर्ण शब्दांत त्यांनी साक्षात् उभे केले आहे. म्हणूनच त्यातली भावना कुणा एका ‘क्ष’ आईची न उरता कुणाही आईची असू शकते. त्यांच्या गीताच्या या सामर्थ्यांमुळेच ते महाराष्ट्रात अजरामर झाले आहेत.
‘ज्ञानदेव बाळ माझा’, ‘विठ्ठल तो आला आला’ व ‘सखू आली पंढरपुरा’ ही गीते. ती लोकभाषेला सहजपणे जवळ जाणारी आणि तिच्यातील नादमाधुर्य टिपणारी आहे. पण त्याचबरोबर एखादी लावणी लिहिताना ते लावणीचा म्हणून जो ठसका असतो, तिथे नायिकेची प्रेमासंबंधातली जी धिटाई असते ती ते नेमक्या शब्दांमध्ये टिपतात. उदाहरणार्थ, ‘काल रातीला सपान पडलं’ किंवा ‘तुला बघून पदर माझा पडला’ या त्यांच्या लावण्या पाहाव्यात.
सावळारामांनी जवळजवळ सातशे-आठशे गीते लिहिली. त्यांपैकी पाचशे-सहाशे रेकॉर्डवर आली. मा.पी. सावळाराम यांना ‘जनकवी’ ही उपाधी देताना कुसुमाग्रजांना नेमके काय अभिप्रेत होते, हे त्यांनी पुढील शब्दांमध्ये व्यक्त केले आहे..‘ पी. सावळाराम त्यांच्या रसपूर्ण आणि भावगर्भ गीतांच्या द्वारा महाराष्ट्रातील असंख्य घरांपर्यंत- नव्हे, घरातल्या स्वयंपाकघरांपर्यंतही पोहोचले आहेत. खानदानी दिवाणखान्यापासून गोरगरीबांच्या ओटी-ओसरीपर्यंत सर्वत्र या नावाचा संचार झाला आहे. नागरवस्तीच्या वेशीवरच ते थांबले नाहीत. ग्रामीण भागातील झोपडय़ांत आणि चावडी-चव्हाटय़ावरही त्यांचे स्वागत झाले आहे. सावळारामांनी गद्यलेखनही केले. आकाशवाणीच्या ‘कामगार सभे’साठी ‘सहज सुचलं म्हणून’ कार्यक्रमात त्यांनी संहितालेखन केले.
‘माणसाला पंख असतात’ या चित्रपटाचे लेखन, ‘माणसा आधी हो माणूस’ व ‘मंगल कलश’ हे लघुपट व एस. टी.वर ‘सारे प्रवासी घडीचे’ हे वार्तापत्र त्यांनी लिहिले. याशिवाय त्यांनी ‘पुत्र व्हावा ऐसा’, ‘नांदायला जाते’, ‘कन्यादान’, ‘सलामी’ आणि ‘बेरडाची अवलाद’ या चित्रपटांच्या कथाही लिहिल्या. १९८२ सालच्या ‘गदिमा’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. मा.पी. सावळाराम यांचे २१ डिसेंबर १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 26, 2017
माणिक वर्मा यांनी वयाच्या अकराव्या वर्षी म्हणजे १९३९ साली दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेली चार भावगीते गायली आणि दोन ध्वनिमुद्रिकामध्ये गाऊन ह्या क्षेत्रात त्या आल्या. अर्थात चित्रपटगीतांच्या बाबतीतही त्यांचे महत्वाचे स्थान आहे. प्रभात कंपनीच्या हिंदी ‘ गोकुल ‘ या चित्रपटात सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेले गीत त्यांनी प्रथम गायले. परंतु त्यांनी जास्त गाणी हिंदीपेक्षा मराठी चित्रपटांसाठी गायली. माणिक वर्मा यांनी असंख्य भावगीते , भक्तिगीते , चित्रगीते गायली आणि ती सर्व गाणी आजही आपल्या संस्कृतिक जीवनाचा भाग बनून राहिली आहेत.
July 15, 2021
आज ७ नोव्हेंबर..आज मराठी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या *सुनीता देशपांडे यांची पुण्यतिथी*
जन्म :- ३ जुलै १९२५
पु.ल. आणि सुनीताबाई यांनी ओरिएंटल हायस्कुलात शिक्षक म्हणून काम केले होते. मा.पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाईंचे लग्न १२ जून १९४६ रोजी झाले. करारी व्यक्तिमत्त्वाच्या व शिस्तीच्या भोक्त्या सुनीताबाई या पुलंची मूक सावली म्हणूनच केवळ वावरल्या नाहीत तर पुलंच्या जडणघडणीतही त्यांचा अत्यंत क्रियाशील वाटा होता. पुलंचे व्यक्तिमत्त्व साहित्य, एकपात्री प्रयोग, चित्रपट, नाटक, संगीत या क्षेत्रांत तळपत असताना सुनीताबाई प्रकाशझोतात फारशा नव्हत्या. खरे तर सुनीताबाईंनी पुलंबरोबर अनेक नाटक आणि चित्रपटांतूनही भूमिका केल्या होत्या. ‘वंदे मातरम्’ या त्यांच्या पहिल्याच मराठी चित्रपटात त्यांनी नायिकेची भूमिका केली. ‘बटाटय़ाची चाळ’, ‘वाऱ्यावरची वरात’ या पुलंच्या प्रयोगातही त्यांनी भूमिका केल्या होत्या. असे असूनही कलावंत म्हणून त्यांची फारशी दखल घेतली गेली नव्हती. नंतर या दोघांनी बा. भ. बोरकर, आरती प्रभू, बा. सी. मर्ढेकर आदी कवींच्या काव्यांचा मागोवा घेणारे जाहीर कार्यक्रम सुरू केले तेव्हा सुनीताबाईंची खऱ्या अर्थाने सर्वसामान्य रसिकांना ओळख झाली. कविता हा त्यांचा जीव की प्राण होता. मराठीतील अनेक कवींच्या अनेक कविता त्यांना तोंडपाठ होत्या. या काव्यप्रेमातूनच जाहीर काव्यवाचनाचा हा कार्यक्रम साकारला होता.
१९९० मध्ये ‘आहे मनोहर तरी’ हे आपल्या व पुलंच्या सहजीवनाचा मागोवा घेणारे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले आणि त्याने साहित्य वर्तुळात तसेच पुलंच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली. लेखिका म्हणून हे त्यांचे पहिले पुस्तक तडाखेबंद खपले व गुजराथी आणि इंग्रजीत अनुवादित झाले तरी त्याला पुलंसारख्या दिग्गज लेखकाच्या नावाचेच वलय होते. त्यानंतर मात्र ‘मण्यांची माळ’, ‘मनातलं अवकाश’ आणि ‘सोयरे सकळ’ या त्यांच्या पुस्तकांनी त्यांची साहित्यिक म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती.. ‘प्रिय जी. ए.’ हे त्यांचे प्रकाशित झालेले शेवटचे पुस्तक. त्यांचे अत्यंत आवडते लेखक असलेल्या जी. ए. कुलकर्णीना त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या पत्रांचा हा संग्रह म्हणजे मराठी साहित्यातील एक अत्यंत वेगळे असे दालन ठरले आहे. पुलंच्या ठायी असलेल्या कलंदर वृत्तीला गोंजारत त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या सुनीताबाईंनी त्यांच्या दातृत्वासही सामाजिक जोड दिली. सुनीताबाईंच्या व्यक्तिमत्त्वातच सामाजिक सहवेदना असलेला एक कलावंत दडला होता. त्यामुळे लोकांची दु:खे एका कलावंताच्या नजरेने टिपल्यामुळेच त्यांच्या पुढाकाराने पु. ल. देशपांडे फाऊंडेशनची संकल्पना पुढे आली आणि विविध क्षेत्रांत महत्त्वाचे काम करणाऱ्या अनेक संस्थांना या फाऊंडेशनच्या माध्यमातून एक कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या देणग्या मिळू शकल्या. अनिल अवचट यांचे मुक्तांगण, पाल्र्याचा लोकमान्य सेवा संघ, मराठी विज्ञान परिषद, ग्रामायन यासारख्या अनेक संस्थांना पुल - सुनीताबाईंनी अक्षरश: लाखो रुपयांच्या देणग्या दिल्या. त्या प्रत्येकवेळी त्याची वाच्यता होणार नाही, याची खबरदारीही त्यांनी घेतली. त्यासाठी या दाम्पत्याने साधी राहणी पसंत केली. मा. सुनीता देशपांडे यांचे ७ नोव्हेंबर २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
November 7, 2016
अलीशा चिनॉय चे नाव घेतले की मेड इन इंडिया एक प्याेरा सोनिया एक दिल चाहिए बस मेड इन इंडिया हे गाणे डोळ्या समोर येते. त्यांचा जन्म १८ मार्च १९६५ अहमदाबाद येथे झाला. अलीशा चिनॉय यांना बॉलीवूड मध्ये बाप्पी लहरी यांनी आणले. अलीशा चिनॉय यांनी बाप्पीदा यांच्या बरोबर १९८० च्या काळात टारझन, डान्स डान्स कामांडो, गुरु, लव्ह लव्ह असे अनेक चित्रपट केले. १९९५ साली आलेले मेड इन इंडिया हे गाणे अलीशा चिनॉय यांना एका रात्रीत हिट करून गेले. ह्या गाण्याच्या आधीही अलीशा चिनॉय यांनी गाणी गायली होती, पण मेड इन इंडिया हे गाणे त्यांना लकी ठरले. या गाण्याबरोबरच काटे नही कटते हे मिस्टर इंडिया मधील गाणे पण गाजले. अलीशा चिनॉय यांनी मा.बाप्पी लहरी यांच्या बरोबरच आनंद मिलिंद,कल्याणजी आनंदजी,नदीम श्रवण,अन्नू मलिक राजेश रोशन अश्या संगीतकाराबरोबर काम केले आहे. अलीशा चिनॉय यांचे इतर अल्बम जादू, बेबी डॉल, आहह, अलीशा आहेत. अलीशा चिनॉय यांची गाजलेली काही गाणी तेरे इश्क में नाचेंगे (राजा हिंदुस्तानी), छा राहा हैं प्यार का नशा (चंद्रमुखी) रौंधे (प्यार तुने क्या किया), सोना सोना रूप है (बॉलीवुड / हॉलीवुड), मौजे में (कारोबार), दे दिया (कीमत), रुक रुक रुक (विजयपथ) और विवादास्पद सेक्सी सेक्सी सेक्सी मुझे लोग बोले (खुद-दार).
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
अलीशा चिनॉय यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=6NkGASg4LoA
मेड इन इंडिया गाणे
https://www.youtube.com/watch?v=IvloHsmi_vg
March 21, 2017
विनायक दामोधर कर्नाटकी म्हणजेच मास्टर विनायक यांची कन्या असलेल्या बेबी नंदा यांचे मूळचे नाव रेणुका विनायक कर्नाटकी. त्यांच्या आईचे नाव सुशीला. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९४१ रोजी कोल्हापूर येथे झाला. नंदाने चित्रपटांत लहानपणी बेबी नंदा या नावाने बालकलाकार म्हणून मंदिर, जग्गू, शंकराचार्य, अंगारे, जगद्गुरु आदी १५ ते १६ चित्रपटांत, आणि तरुणपणी अनेक हिंदी चित्रपटांत नायिकेच्या भूमिका केल्या.
बेबी नंदा यांनी १९४६ साली मंदिर या चित्रपटात एका मुलाची भूमिका साकारली. तोच त्यांचा पहिला चित्रपट ठरला. त्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच मास्टर विनायक यांचे निधन झाले. तेव्हा हे कुटुंब दादर-शिवाजी पार्क येथील आशीर्वाद बंगल्यात राहत होते. नंदा या आयडियल हायस्कूलमध्ये असताना वयाच्या बाराव्या वर्षी कुलदैवत या दिनकर पाटलांच्या मराठी चित्रपटात अभिनेत्री म्हणून झळकल्या, तर त्यांना त्यांचे मावसकाका व्ही. शांताराम यांनी हिंदी चित्रपटात प्रवेश मिळवून दिला. कुलदैवत नंतर सहा मराठी चित्रपट नंदा यांनी केले.
सदाशिव जे रावकवि दिग्दर्शित शेवग्याच्या शेंगा, राजा परांजपे दिग्दर्शित देव जागा आहे, देवघर, यशवंत पटेकरांचा झालं गेलं विसरुन जा, हंसा वाडकरसोबतचा मातेविना बाळ हे ते चित्रपट. शेवग्याच्या शेंगा मधील बहिणीच्या भूमिकेसाठी नंदा यांना जवाहरलाल नेहरुंच्या हस्ते गौरवण्यात आले होते. व्ही. शांताराम यांच्या तुफान और दिया या चित्रपटात त्यांना पहिल्यांदा मोठा ब्रेक मिळाला. १९६५ पासून नंतर पुढे त्यांच्या यशाची घौडदौड वाढतच गेली.
१९५७ मध्ये आलेल्या `भाभी` सिनेमातल्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचं फिल्मफेअर एवार्डसाठी नामांकन मिळालं होतं. मात्र या पुरस्कारांमध्ये लॉबिंग होत असल्याचा सनसनाटी आरोप करत त्यांनी रोखठोक भाष्य केलं होतं. राज कपूर, शशी कपूर, देवानंद, मनोजकुमार, अशा गाजलेल्या अभिनेत्यांसोबत त्यांचे अनेक सिनेमे हिट झाले. कानून, ऑंचल, मेहंदी लगी मेरे हाथ, जब जब फुल खिले, जोरू का गुलाम अशा अनेक हिट सिनेमांची नोंद बेबी नंदा यांच्या नावावर आहे. मा.नंदा यांचे निधन २५ मार्च २०१४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 8, 2019
बॉलीवूड अभिनेत्री बिंदू यांचा जन्म १७ एप्रिल १९५१ रोजी झाला. बिंदू यांचे वडील नानूभाई देसाई हे चित्रपट निर्माता होते.
बिंदू या चारहून अधिक दशके बॉलीवूड मध्ये काम करत आहेत. बिंदू यांनी आपली करीयरची सुरवात १९६९ मध्ये आलेल्या इत्तेफाक व दो रास्ते या चित्रपटापासून केली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी १६० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. कटीपतंग मधील शबनमच्या अभिनयासाठी व मेरा नाम शबनम या गाण्यासाठी अजूनही लोक बिंदू यांची आठवण काढतात.
बिंदू यांनी आपल्या इम्हतीहान व हावस या चित्रपटातील कामाने हिंदी चित्रपट उद्योगात वेगळे नाव कमवले. त्यानी व्हॅम्प रोल करण्यास सुरवात केली. या सोबतच त्यांनी अभिमान, अर्जुन पंडित या चित्रपटातील केलेले अभिनय गाजले. जंजीर मधील त्याच्यावरील मोना डार्लिंग डायलॉग प्रसिद्ध झाला.
बिंदू यांनी आपले बालपणीचे मित्र चंपकलाल झवेरी यांच्याशी लग्न केले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
April 17, 2017
‘भारताचे सांस्कृतिक राजदूत’ म्हणून जगभरातील अनेक देशांनी पाचारण केलेले पं. रविशंकर हे जगभरातील सर्वाधिक पुरस्कार व सन्मान मिळवलेले भारतीय कलाकार असावेत! ‘डॉक्टर ऑॅफ फाइन आटर्स’ (कॅलिफोर्निया विद्यापीठाकडून, १९६८), तीन वेळा ‘ग्रॅमी’ अवॉर्ड (१९६७, १९७० व १९७३ : हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय), ‘युनिसेफ’ सन्मान (१९८०), मेरीलॅण्ड व बाल्टीमोर राज्यांचे सन्माननीय नागरिकत्व (१९८४), फ्रान्स सरकारचा कलाविषयक सर्वोच्च नागरी सन्मान (१९८५), ‘फुकोओका एशियन कल्चरल प्राइझ’ (जपान १९९१), ‘रामोन मॅग्सॅसे’ पुरस्कार (फिलिपाइन्स, १९९२), ‘महात्मा गांधी’ सन्मान (लंडन, १९९२), हार्वर्ड व न्यू इंग्लंड विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट (१९९३), ब्रिटीश कोलंबियातील व्हिक्टोरिआ विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट (१९९४), ‘प्रीमियम इंपीरिअल’ सन्मान (जपान आर्ट असोसिएशन, १९९७), ‘पोलर म्युझिक’ अवॉर्ड (नोबेल सन्मानाची प्रतिष्ठा असणारे, १९९८), ब्रिटीश सरकारकडून ‘नाइटहूड’ हा नागरी सन्मान (२००१) असे जगभरातील अनेक सन्मान त्यांना दिले गेले. अमेरिकेतील ह्यूस्टन नगरपालिकेने १९८३ साली ४ व ५ जून हे दोन दिवस ‘रविशंकर दिन’ म्हणून साजरे केले!
April 7, 2022
‘उतरन’ मालिकेमधून घराघरांत पोहोचलेल्या तपस्या अर्थात अभिनेत्री रश्मी देसाईचा जन्म १३ फेब्रुवारी १९८६ रोजी आसाम येथे झाला.
रश्मी देसाई टीव्ही इंडस्ट्रीतली स्टार म्हणून ओळख दिली. या मालिकेनंतर रश्मी अनेक रिअॅलिटी शोजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली.'इश्क का रंग है सफेद' या मालिकेतही तिनं एक छोटी भूमिका साकारली होती. त्यानंतर ती 'झलक दिखला जा', 'कॉमेडी सर्कस', 'फिअर फॅक्टर' यांसारख्या रिअॅलिटी शोजमध्येच जास्त दिसू लागली होती. छोट्या पडद्यावर मालिकेपासून करिअरला सुरूवात केलेल्या रश्मीनं बॉलिवूडच्या काही सिनेमांमध्येही छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत.
तिचे खरे नाव शिवानी देसाई. रश्मीने मुंबईच्या नारसी मॉजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून टूर अँड ट्रॅव्हलमध्ये डिप्लोमा केला आहे. रश्मीने एका आसामी चित्रपटातूनच आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली आहे, नंतर भोजपुरी सिनेमासृष्टीत बस्तान बसवलं आणि आता हिंदी मालिकांची लोकप्रिय नायिका झाली आहे. तिने गजब भइल रामा, कब होए गौना हमार, नदिया के तीर, गब्बर सिंह, दूल्हा बाबू, बंधन टूटे न आणि पप्पू के प्यार हो गईल यांसारख्या सिनेमात काम केलं.
रश्मी देसाई बिग बॉस 15 मध्ये देखील दिसली होती. तिने वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घरात एन्ट्री केली होती. इतकंच नव्हे तर ती टॉप 5 मध्ये पोहोचली होती. रश्मी तिच्या कामामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत रहिली आहे. तिचं खासगी आयुष्यात अनेक चढ- उतारांनी भरलेलं आहे. श्मीनं अभिनेता आणि तिचा सहकलाकार नंदिशशी गाजावाजा न करता लग्न केलं होतं. दोघांचं लव्ह मॅरेज होतं. रश्मी देसाई गुजराती तर नंदिश पंजाबी आहे. 'उतरन' मालिकेच्या सेटवर दोघांची भेट झाली आणि त्यांची लव्ह स्टोरी सुरू झाली. २०१२ मध्ये दोघांनी लग्न केलं. पण लग्नाच्या अवघ्या एका वर्षात त्यांच्यात वाद होऊ लागले. चार वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. रश्मी सोशल मीडियाद्वारेही सतत आपल्या चाहत्यांना भेटत असते. आपल्या चाहत्यांसाठी फोटोज आणि व्हिडीओज देखील सतत शेअर करत असते. रश्मी आपल्या खाजगी आयुष्यातल्या रिलेशनशिप्समुळेही सतत प्रकाशझोतात असते.
-संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
February 13, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti