फिअरलेस नाडिया म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाडियाचे खरे नाव ‘मेरी इवान्स’ असे होते. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९०८ रोजी पर्थ येथे झाला. हिंदी चित्रपटसृष्टीतील फिअरलेस नाडिया ही एक दिग्गज अभिनेत्री होती. जे बी एच आणि होमी वाडिया यांनी १९३० साली वाडिया मुव्हिटोन स्टुडिओची स्थापना केली होती. त्यांनीच ‘स्टंट क्वीन’ असलेल्या फिअरलेस नाडियाला लाँच केले होते. मूळची ऑस्ट्रेलियन असलेल्या नाडियाने भारतात अनेक अॅक्शन चित्रपट केले आणि अल्पावधीतच ती स्टार झाली. ती तिच्या बहारदार नृत्यासाठी, अॅक्शन्ससाठी प्रसिद्ध होतीच. शिवाय तिला चाबूकवाली म्हणूनही ओळखले जायचे. नाडियाने होमी वाडियाशी लग्न केले.
नाडिया लहान असतानाच तिच्या आई-वडिलांसह भारतात आली. तिचे वडील ब्रिटीश आर्मीमध्ये सैनिक होते. पेशावरमध्ये मोठी झालेली नाडिया तेथेच घोडेस्वारी शिकली. लहानपणीच त्यांनी घोडेस्वारी, जिमनॅस्टिक, बॅले डान्सिंगचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सर्कशीत प्रवेश केला व यानिमित्ताने त्या भारतभर फिरल्या.
पहिल्या महायुद्धात तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर ती आणि तिची आई मुंबईत स्थलांतरित झाल्या. त्यानंतर उत्तम नोकरी मिळावी याकरिता मेरीने (नाडिया) शॉर्टहॅण्ड टायपिंगचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी जाड असलेल्या मेरीने वजन कमी करण्याचाही निर्णय घेतला होता, त्यासाठी तिने रशियन नृत्य प्रशिक्षक मदाम अस्त्रोवा यांच्या नृत्यकला शाळेत नाव नोंदवले. त्यावेळी मदामनेच मेरीमध्ये असलेले कलागुण जाणले आणि भारतभर फिरण्या-या त्याच्या नृत्य/थेएटर ग्रुपमध्ये तिला सहभागी करून घेतले. त्याच्याच सांगण्यावरून तिने आपले नाव मेरीवरून नाडिया असे ठेवले.
नाडियाच्या एकाही चित्रपटाची डीव्हीडी सध्या उपलब्ध नाही. पण जे बी एच वाडिया यांचे नातू रियाद विन्सी वाडिया यांनी तिच्यावर १९९३ साली एक सुंदर माहितीपट तयार केला होता. त्याचे नाव ‘फिअरलेस : द हंटरवाली स्टोरी’ असे आहे. यात नाडियाच्या काही छायाचित्र आणि व्हिडिओंच्या माध्यमातून तिचे आयुष्य आणि करिअर दाखविण्यात आले आहे. द हंटरवाली उर्फ मेरी इवान्स यांचे ९ जानेवारी १९९६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
https://youtu.be/Y0A6a09C7hM
https://youtu.be/dcZ_ab5LcuQ
January 8, 2019
अप्रतिम स्त्रीसौंदर्याचा एक अनोखा नमुना असलेल्या पद्मा चव्हाण इतक्या सुंदर होत्या की त्यांच्या नाटकांच्या जाहिरातीत त्यांच्या नावाआधी ‘मादक सौंदर्याचा ऍटम बॉम्ब’ असे छापलेले असे.
July 7, 2017
कुमार गंधर्व नावाची ही जादूच अशी आगळीवेगळी होती. त्यांचा जन्म ८ एप्रिल १९२४ साली बेळगावजवळच्या सुळेभावी खेड्यात कानडी कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकली. लहान वयातच त्यांनी आपल्या गायकीची चमक दाखवली. आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीने त्यांनी रसिकांवर अक्षरशः गारुड केले. घराणेशाहीच्या चौकटीत बंदिस्त व्हायला त्यांनी साफ नकार दिला. त्याऐवजी आपली स्वतःची गानशैली जनमानसात रुढ केली. १९३० आणि १९४० च्या दशकात पंडित बी. आर. देवधर यांचे शिष्यत्व त्यांनी स्वीकारले. त्यावेळीच कुमारजींच्या नावाचा दबदबा भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात निर्माण झाला. एप्रिल १९४७ मध्ये भानुमती कंस यांच्याशी कुमारजींचा विवाह झाला आणि ते मध्य प्रदेशातील देवासमध्ये स्थायिक झाले. त्याचवेळी काळाने त्यांच्यावर आकस्मिक आघात केला. त्यांना टीबीची बाधा झाली. या दुखण्याने त्यांची फुफ्फुसे खालसा केली. असं म्हणतात की, या दुखण्यात त्यांचं एक फुफ्फुस कायमस्वरुपी निकामी झालं. पत्नी भानुमती यांनी याकाळात त्यांची सेवाशुश्रुषा केली. त्या आधी देवधरबुवांकडे आणि नंतर कुमारजींकडेच गाण्याचे शिक्षण घेत होत्या. त्यांच्याच मदतीने पंडितजी आजारातून बरे झाले आणि १९५३ मध्ये आजारानंतरची त्यांची पहिली मैफल रंगली. परंतु या दुखण्याने त्यांच्या स्वरराज्याला चांगलाच हादरा दिला होता. १९६१ मध्ये बाळंतपणात पत्नी भानुमतीचे निधन झाले. त्यानंतर कुमारजींनी वसुंधरा श्रीखंडे यांच्याशी विवाह केला. त्याही देवधरबुवांच्या शिष्या होत्या. कुमारजी आणि वसुंधराबाईंची कन्या कलापिनी ही अनेकदा गाण्याच्यावेळी तानपु-यावर त्यांना साथ द्यायची. माळव्याची लोकगीतं, निर्गुणी भजन , नवरागनिर्मिती यांवर कुमारजींचा मोठा व्यासंग होता. कुमारजींची लोकप्रियता अफाट होती. संगीतातील जाणकार मंडळी त्यांच्या गायकीवर जीव ओवाळून टाकायची. त्यामध्ये महाराष्ट्रीय मंडळींची संख्या मोठी होती. पुणे आणि मुंबईच्या उपनगरातील रसिकांच्या हृदयावर कुमारजींनी अधिराज्य गाजवले. याचठिकाणी त्यांच्या गाण्याच्या मैफली रंगायच्या. चेंबूरसारख्या परिसरात शाळांमध्ये त्यांच्या मैफली व्हायच्या. अगदी फुकट. खरेखुरे संगीताचे दर्दी या मैफलींना हजेरी लावायचे आणि कुमारजींच्या गाण्याची हरएक तान कानात जपून ठेवायचे. कुमार गंधर्वांची गायकी चित्रित करण्यासाठी एकदा जब्बार पटेल कॅमेरा घेऊन आले. मधु लिमये आणि ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर त्यावेळी उपस्थित होते. मैफलीत कॅमेरा पाहून कुमारजींना आश्चर्य वाटले. पंडितजींनी जब्बारना विचारले , कॅमेरात किती मोठा रोल आहे ? थोडक्यात किती वेळाचे गाणे चित्रित करायचे आहे ? जब्बार यांनी सांगितले , पावणे चार मिनिटे. एका चीजेसाठी पावणे चार मिनिट म्हणजे फारच अवघड काम. पण पंडितजींनी घड्याळ लावले आणि सांगितले सुरू करा चित्रीकरण. त्यांनी तराणा सुरू केला. समा बांधली आणि बरोबर २२५ सेकंदात समेवर येऊन गाणे संपविले. भारत सरकारने १९९० साली कुमारजींना पद्म विभूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता. मा.कुमार गंधर्व यांचे १२ जानेवारी १९९२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- विकिपीडिया / म.टा
January 12, 2017
प्रसिद्ध सतार व सूरबहार वादक कार्तिक कुमार कार्तिक कुमार हे पं. रविशंकर यांचे शिष्य, व मैहर घराण्याचे वादक.
April 15, 2019
भारत भूषण यांना लहानपणापासूनच चित्रपटांमध्ये काम करायची आवड होती. त्यांचा जन्म १४ जुन १९२० रोजी उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यात झाला.पण त्यांच्या वडिलांना ते पसंत नव्हते म्हणून मग त्यांना घर सोडावे लागले. चित्रपटांमध्ये काम करायच्या उद्देशाने भारत भूषण कलकत्याला निघून गेले. त्यावेळेला तेथे मोठमोठे चित्रपट बनत होते. तेथे त्यांना संघर्ष करावा लागला. एक दिवस त्यांच्या कष्टाचं चीज झाले व त्यांना चित्रपटांमध्ये काम मिळायला लागले. भारत भूषण चित्रलेखा या चित्रपटातून सहाय्यक अभिनेता म्हणून पडद्यावर आले. त्यांना सर्वात मोठा ब्रेक दिला तो म्हणजे केदारनाथ शर्मा यांनी सुहाग रात या चित्रपटामध्ये. या चित्रपटात भारत भूषण यांनी गीताबाली यांच्याबरोबर काम केले. हा चित्रपट हिट झाला. त्यांनतर १९५२ साली आलेला बैजूबावरा या चित्रपटाने त्यांना स्टार बनवलं. हा तो काळ होता जेव्हा भारत भूषण हे सगळ्या मोठ्या अभिनेत्री सोबत काम करत होते जसे मीनाकुमारी, वैजंतीमाला, गीताबाली सारख्यांबरोबर काम करत होते. आता ते चित्रपटांमध्ये अभिनयासोबत निर्माता म्हणूनही काम करू लागले.
भारत भूषण यांचे मुंबई व्यतिरिक्त इतर शहरांमध्येही अनेक बंगले होते. महागड्या आणि परदेशी गाड्या पण होत्या. ते निर्मिती क्षेत्रात उतरले परंतु त्यांना यश आले नाही. काही चुकीच्या निर्णयांमुळे भारत भूषण राजा पासून भिकारी बनत गेले. गाडी बंगला सगळं काही विकायची वेळ आली. भारत भूषण यांना खूप आर्थिक संकटांना सामोरे जावं लागलं. एक वेळ अशी पण आली कि त्यांना भाड्याच्या घरात राहावं लागलं. काही लोक म्हणत असत की हे सर्व त्यांच्या आणि मीनाकुमारीच्या प्रेमप्रकरणाचा परिणाम मानत होते. चित्रपटात मुख्य कलाकाराची भूमिका तर लांबच राहिली त्यांना छोटे मोठे रोल सुद्धा मिळेनासे झाले होते. त्यांची रोजची खायची सोया मोठ्या मुश्किलीने होत होती. असं म्हणतात कि ज्या स्टुडिओमध्ये गेल्यावर लोक न चुकता सलाम करायचे त्या स्टुडिओमध्ये भारत भूषण यांनी चौकीदाराची नोकरी देखील केली. याच गरिबीच्या परिस्थितीत भारत भूषण यांचे निधन २७ जानेवारी १९९२ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
भारत भूषण यांचे चित्रपट. भक्त कबीर (1942), भाईचारा (1943), सुहागरात (1948), उधार (1949), रंगीला राजस्थान (1949), एक थी लड़की (1949), राम दर्शन (1950), किसी की याद (1950), भाई-बहन (1950), आंखें (1950), सागर (1951), हमारी शान (1951), आनंदमठ और मां (1952) श्री चैतन्य महाप्रभु (1954), मिर्जा गालिब (1954), रानी रूपमती (1957), सोहनी महीवाल (1958), सम्राट्चंद्रगुप्त (1958), कवि कालिदास (1959), संगीत सम्राट तानसेन (1962), नवाब सिराजुद्दौला (1967)
June 23, 2018
मीनाक्षी शिरोडकर यांनी १९३८ मध्ये ब्रम्हचारी चित्रपटात दिलेल्या या बोल्डसीनची चर्चा त्याकाळी रंगली नसती तरच नवल. स्वीमसूटमधील दृश्यामुळे मीनाक्षी यांना प्रचंड टीका सहन करावी लागली. रेडिओपासून सुरुवात केलेल्या मीनाक्षी शिरोडकर यांनी कालांतराने चित्रपटात भूमिका स्वीकारल्या. आचार्य अत्रेंनी त्यांचं ‘रतन’ हे नाव बदलून ‘मीनाक्षी’ केलं.
June 3, 2022
कोंकणा सेन शर्मा ही दिग्दर्शिका अपर्णा सेन शर्मा यांची मुलगी आहे. बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्री कोंकणा सेनचा जन्म ३ डिसेंबर १९७९ रोजी झाला. 'इंदिरा' या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारत १९८३ साली कोंकणाने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर ती २००० साली 'एक जे अच्छे कन्या' या बंगाली चित्रपटात झळकली. चित्रपट जगतात कोंकणाला सर्वात पहिल्यांदा प्रसिध्दी 'मिस्टर एंड मिसेस अय्यर' या चित्रपटामुळे मिळाली. याचे दिग्दर्शन तिची आई अपर्ण सेन शर्मानेच केले होते. ती सायन्स रायटर आणि जर्नलिस्ट मुकुल शर्मा यांची मुलगी आहे. तिची आई अपर्णा सेन एक प्रसिध्द सिने अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहे.
'मिस्टर एंड मिसेस अय्यर'साठी कोंकणाला अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. यानंतर कोंकणा २००५ साली 'पेज थ्री' चित्रपटात चमकली. या चित्रपटामुळे तिची हिंदी चित्रपट वर्तुळात ओळख निर्माण झाली. यापूर्वी तिने अनेक भूमिका केल्या असल्या तरी ते चित्रपट कमर्शियली सक्सेस नव्हते. या दरम्यान तिने 'वेक अप सिड' चित्रपटात रणबीर कपूरसोबत रोमान्स केला. फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोंकणाने मिळवला आहे.
२००६ साली 'ओंकारा 'आणि २००७ साली 'लाइफ इन ए मेट्रो' या चित्रपटांसाठी कोंकणाला सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला होता. सहाय्यक अभिनेत्रीचा कोंकणाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. कोंकणा सेन ही अतिशय सिलेक्टेड चित्रपटातून आपल्याला दिसली आहे. प्रसिध्दीसाठी किंवा पैशासाठी सरसकट चित्रपटातून काम करण्याचा मोह तिने टाळला. आशयघन चित्रपटातूनच ती दिसली आणि छोट्या भूमिकातूनही ती उठून दिसली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 4, 2019
भाऊसाहेब पाटणकर अर्थात वासुदेव वामन पाटणकर यांना त्यांचे परिचित "जिंदादिल" भाऊसाहेब पाटणकर असेच म्हणायचे. त्यांचा जन्म २९ डिसेंबर १९०८ रोजी झाला. त्यांचे वडील वेदपंडित, तो वारसा भाऊसाहेबांनी कायम ठेऊन, संस्कृत, मराठी, उर्दू, इंग्रजी, भाषेवर प्रभुत्व मिळवले. नागपुरातून विधी शाखेची पदवी प्राप्त करून, १९३५ साली भाऊसाहेबांनी यवतमाळ येथे वकिली व्यवसायास सुरुवात केली. वकीली व्यवसायात भाऊसाहेबांनी फौजदारी खटल्यां मध्ये भरपूर यश संपादित करून वकील म्हणून नावोलौकिक मिळवला.
भाऊसाहेब स्वतः वेदपंडीत, वकील, शिकारी होते, शिकारीचा तर त्यांचा छंद नुसता शौर्य दाखविण्यासाठी नव्हता, तर श्वापदांची स्वभाव वैशिष्ट्ये, त्याचे निरीक्षण करुन भाऊसाहेबांनी कथा लिहिल्या होत्या, ज्या किर्लोस्कर, युगवाणी, अमृत इत्यादी अनेक मसिकात प्रकाशित झाल्या होत्या, त्यात शिकारीतील शौर्या पेक्षा, प्राण्यांच्या अभ्यासाला प्राधान्य असायचे. कालांतराने कायद्याने शिकारीला बंदी आली, त्यामुळे भाऊसाहेबांची शिकार पण बंद झाली, मोतीबिंदू मुळे भाऊसाहेबांच्या दोन्ही डोळ्यांची नजर गेली आणि त्याच कारणास्तव वकिली पण बंद करावी लागली, पण इतके होऊनही भाऊसाहेब हतबल झाले नाहीत, वेदाध्ययन,संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होतेच, त्यातील चंपू प्रकारात शायरीचा उगम असल्याचे ते म्हणत, त्यातूनच त्यांनी मराठी शायरीची रचना केली, त्यांची शायरी ही उर्दू भाषेतील शायरी पेक्षा वेगळी होती, त्यातून नेहमीच स्वाभिमानी आणि अपेक्षित अशा शायरीची रचना त्यांनी केली, पुढे मा.भाऊसाहेबांच्या शायरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला, महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या अनेक भागात त्यांचे कार्यक्रम होऊन लोकप्रिय झाले.
भाऊसाहेबांची मराठी शायरी, मराठी मुशायरा, मैफिल, दोस्तहो, जिंदादिल ही पुस्तके प्रकाशित झाली, खऱ्या अर्थाने त्यांनी मराठी शायरी आणि गझल हा प्रकार रुजवली आणि ती रसिकापर्यंत पोहोचवली. त्यांच्या " दोस्त हो" आणि " जिंदादिल " ह्या संग्रहानी मराठी साहित्याप्रेमीना वेड लावले. मा.भाऊसाहेब पाटणकर यांचे २० जून १९९७ रोजी निधन झाले.
भाऊसाहेब पाटणकरांची शायरी
पेड वेणीचे तुझ्या तू सोडू नको मागे पुढे
आम्ही तरी कैसे बघावे सारखे मागे पुढे
आलो तुझ्या दुनियेत नव्हतो चोर वा डाकू आम्ही
एकही ना चीज इथली घेऊनी गेलो आम्ही
तेही असो आमुच्या सवे आणिला ज्याला ईथे
भगवन अरे तो देहही मी टाकूनी गेलो ईथे
आजवरी बेधुंद जैसा मांड आम्ही गाईला
त्याच त्या तल्लिनतेने जोगिया ही गाईला
जाणतो इतुकेच आम्हा मस्तीत आहे गायचे
लोकहो हे दैव जाणे काय केव्हा गायचे
येतो असाही काळ केव्हा काही असेही गायचा
जोगिया डोक्यात आणिक मांड असतो गायचा
कौशल्य माझ्या गायनाचे कळलेच ना कोणा कधी
गेलो असा गाऊन नाही बेसूरही झालो कधी
सन्मानिले वैराग्य आम्ही शृंगार ही सन्मानिला
अंकावरी आहे रतिच्या बुद्ध येथे झोपला
विसरला दुनियेस आपुल्या गुंजनाही विसरला
कमलपोषी भृंग आता कमलासही त्या विसरला
हे आले वैराग्य आम्हा निष्कामता ऐसी आली
तैसी नको नुसतीच जेथे दाढी हवी लुंगी हवी
"आपुल्याच दाती ओठ आपुला चावणे नाही बरे,
हक्क अमुचा अमुच्यासमोरी मारणे नाही बरे"
भाऊसाहेब पाटणकरांची स्वत:च्या मृत्युवरील ही शायरी.
जन्मातही नव्हते कधी मी, तोंड माझे लपविले
मेल्यावरी संपूर्ण त्यांनी, वस्त्रात मजला झाकले
आला असा संताप मजला, काहीच पण करता न ये
होती आम्हा जाणीव की, मेलो आता, बोलू नये
कफ़न माझे दूर करुनी, पाहिले मी बाजूला
एकही आसू कुणाच्या, डोळ्यात ना मी पाहिला
बघुनि हे, माझेच आसू धावले गालावरी
जन्मभर हासून मी, रडलो असा मेल्यावरी
मरता आम्ही, शोकार्णवी बुडतील सारे वाटले
श्रद्धांजली तर जागजागी देतील होते वाटले
थोडे जरी का दु:ख माझे, असता कुणाला वाटले
जळण्यातही सरणात मजला, काहीच नसते वाटले
ऐसे जरी संतोष तेव्हा मानिला इतुकाच मी
कळलेच ना तेव्हा कुणा कफ़नात जे रडलो आम्ही
त्यांचेच हे उपकार ज्यांनी, झाकले होते मला
झाकती प्रेतास का ते तेव्हा कुठे कळले मला
लाभला एकांत जेव्हा, सरणात त्या माझ्या मला
रोखता आलाच नाही, पूर अश्रूंचा मला
जेव्हा चिता ही आसवांनी, माझी विझाया लागली
चिंता कसा जळणार आता, ह्याचीच वाटू लागली.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 29, 2017
रामायण या मालिकेत आपल्याला भरतच्या भूमिकेत एक मराठी चेहरा पाहायला मिळाला होता. या मालिकेत भरतची भूमिका अभिनेता संजय जोग यांनी साकारली होती.
November 27, 2021
अटल बिहारी वाजपेयींचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी झाला. अटलबिहारी वाजपेयी यांनी कानपूरमधून राज्यशास्त्रात एम.ए.ची पदवी मिळविल्यानंतर वाजपेयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ता झाले. त्यांनी राष्ट्रधर्म, वीर अर्जुन आणि पांचजन्य या नियतकालिकांत पत्रकारिता केली. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रमाताही ते सहभागी झाले. त्यांची राजकीय कारकीर्द म. गांधींच्या ‘चले जाव’ चळवळीपासून सुरु झाली. स्वातंत्र्यानंतर १९५१ मध्ये स्थापन झालेल्या ‘भारतीय जनसंघ’ या पक्षाच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाट होता. पक्षाचे संस्थापक नेते डॉ. शायामाप्रसाद मुखर्जी यांचे अटलबिहारी वाजपेयी विश्वासू सहकारी होते. मा.अटलबिहारी वाजपेयी १९५७ साली प्रथमच संसदेत लोकसभेत निवडून आले. त्यानंतर तब्बल नऊ वेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. पक्षाध्यक्ष पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या दुर्देवी मृत्यूनंतर पक्षाची धुरा वाजपेयींच्या खांद्यावर आली. ते १९६८ मध्ये प्रथमच पक्षाध्यक्ष झाले. पंतप्रधान इंदिरा गांधींनी १९७५ साली भारतावर लादलेल्या देशांतर्गत आणीबाणीमध्ये त्यांना दोन वर्षे कारावासात काढावी लागली.
आणीबाणीनंतर आपल्या सहकाऱ्यांसह, संपूर्ण पक्षच वाजपेयी यांनी १९७७ साली जनता पार्टीत विलीन केला. पण त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच १९८० मध्ये वाजपेयी यांनी मुंबईत नव्या भारतीय जनता पार्टीची घोषणा केली. जनता पार्टीच्या ,मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनतापार्टीच्या सरकारमध्ये वाजपेयी परराष्ट्रमंत्री होते. ते १९९६ साली प्रथमच पंतप्रधान बनले. परंतु तेरा दिवसात हे सरकार कोसळले. त्यानंतर १९९८ साली लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरल्याने वाजपेयी पुन्हा एकदा पंतप्रधान बनले. हेय सरकार तेरा महिनेच टिकले. पण याच काळात भारताने अणुस्फोट घडून आणला. आणि आपले सामाजिक- वैज्ञानिक श्रेष्ठत्व सिद्ध केले. त्याचप्रमाणे वाजपेयी यांच्या सरकारने पारंपारिक शत्रू असलेल्या पाकिस्तानाशी शांतता – समझोता करण्याचा प्रयत्न केला. कारगिलचे युद्ध ही घटनासुद्धा याच काळातील. वाजपेयी १९९९ मध्ये तिसऱ्या वेळी पंतप्रधान झाले. हे मंत्रिमंडळ पूर्ण पाच वर्ष टिकले. विविध विकास कामे करून देखील २०४४ च्या लोकसभा निवडणुकांत भाजपा सत्तेवर येऊ शकत नाही. त्यानानातर २००५ साली वाजपेयी यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. वाजपेयी यांच्या कुशल नेतृत्वाखालील भारताने हलाहल देखील पचविले. आणि भारताची तसेच भाजपचीही प्रतिष्ठा उंचावली. अटल बिहारी वाजपेयी ज्येष्ठ राजकीय नेते आणि भारताचे पहिलेच बिगर कॉंग्रेसी पंतप्रधान आहेत. एवढेच नव्हे तर १९९६ ते २००४ या आठ वर्षाच्या कालखंडात वाजपेयी यांनी तीन वेळा भारताचे पंतप्रधानपद भूषविले. वाजपेयी यांची आजवर सुमारे ४० पुस्तके प्रकाशित झाली असून पद्मविभूषण आणि उत्कृष्ट संसदपटू सारखे विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट / भा.ज.प
अटल बिहारी यांची कविता आओ फिर से दिया जलाएँ
आओ फिर से दिया जलाएँ
भरी दुपहरी में अंधियारा
सूरज परछाई से हारा
अंतरतम का नेह निचोड़ें-
बुझी हुई बाती सुलगाएँ।
आओ फिर से दिया जलाएँ
हम पड़ाव को समझे मंज़िल
लक्ष्य हुआ आंखों से ओझल
वतर्मान के मोहजाल में-
आने वाला कल न भुलाएँ।
आओ फिर से दिया जलाएँ।
आहुति बाकी यज्ञ अधूरा
अपनों के विघ्नों ने घेरा
अंतिम जय का वज़्र बनाने-
नव दधीचि हड्डियां गलाएँ।
आओ फिर से दिया जलाएँ
January 7, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti