अच्युत ठाकूर हे गेल्या ४० हून अधिक वर्षांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत होते. १९८३ साली ‘श्री रामायण’हा मराठी चित्रपट त्यांनी संगीतबद्ध केलेला पहिला चित्रपट होता. त्यातली गाणी त्या वेळी गाजली होती.
May 18, 2021
सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यात झाला. लावणीच्या इतिहासात आजही ठळकपणे समोर येणाऱ्या नावात सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. सत्यभामाबाई पंढरपूरकर यांनी लावणीसाठी वा गायकीसाठी लौकिक अर्थाने कोणतेही शिक्षण घेतले नव्हते. वयाच्या १० व्या वर्षीच त्यांच्यातल्या संगीत कलेची जाणीव झाली. त्यांनी बालवयातच एकट्याचे लावणी सादरीकरण केले. त्यानंतरच्या काळात गोदावरीबाई पुणेकर यांच्या नेतृत्वाखालील लावणी गटात त्या सामील झाल्या. म्हणजे गोदावरीबाई या एका अर्थाने त्यांच्या प्रथम शिक्षिका व सहकारी ठराव्यात. तेथे त्या नृत्य, गवळणी, गझल या गोष्टीशी वकुबाने परिचित झाल्या.
गझल काय असते ती कशी म्हणावी आदी बारकावे त्यांना इथे कळाले. लावणीच्या गायनात त्यांचे गुरु म्हणून नारायणराव उत्पात, ज्ञानोबा उत्पात, दादोबा वैरागकर, मच्छिंद्र उत्पात, विठोबा ऐतवाडकर आणि रामभाऊ उत्पात यांचा उल्लेख होतो. गोदावरीबाई पुणेकर यांच्या गटात चार वर्षे काम केल्यावर त्यांच्या मनाने उचल खाल्ली आणि त्या घरी परत गेल्या. घरी परतलेल्या सत्यभामाचा नवीन प्रतिभाशाली आणि नवे रूप बघून त्यांच्या कुटुंबियांची मने बदलली. त्यांचे शोषण करण्याचा प्रयत्न झाले. त्यांच्यावरती कामाची सक्ती होऊ लागली. त्यामुळे सत्यभामाबाई पुन्हा पुणेकर मंडळींमध्ये परतल्या. परतल्यानंतर पेशवे काळात अनेक शाहिरी लावण्या त्या शिकल्या. हा काळ अठराव्या शतकाच्या उत्तररार्धाचा होता. त्यानंतर त्यांनी जे संगीत आणि अदाकारीचे सादरीकरण सुरु केले ते पुन्हा मागे वळून पहिलेच नाही.
वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी लग्न केले आणि स्वतःची संगीत बारी काढली. सुरुवातीच्या काळात स्वतःच्या घराच्या दिवाणखान्यातच त्या लावणी सादर करू लागल्या. त्यातही बैठकीच्या लावण्या जास्त असत. पण पुढे या बैठकीच्या लावण्यांचा त्यांच्यावर शिक्का बसला. अनेक सामाजिक बंधने, स्त्रीत्वाच्या मर्यादा आणि तत्कालीन नैतिकतेचे संदर्भ पाहता सत्यभामाबाईंनी ज्या नेटाने आणि जोमाने आपली लावणीची सेवा अबाधित अखंड ठेवली त्याला तोड नाही. त्यांचे आयुष्य एका जिद्दी स्त्रीच्या कलासक्तीचे तेजस्वी प्रतिक आहे. मधुचंद्राचा अनुभव घेणाऱ्या बालिका वधूच्या भावस्थितीचे दर्शन घडविणारी लावणी सत्यभामाबाई पंढरपूरकर सादर करीत तेंव्हा घाबरलेल्या बालिकावधूच्या दहा भावमुद्रांचे दर्शन त्या घडवीत. अंगाला कंप सुटणे, ओठ कोरडे पडणे, डोळ्यातून अश्रू येणे, गाल लाल होणे आदी मुद्रा सत्यभामाबाई करून दाखवीत. पंढरपूरच्या मंदिरात लावणी सम्राट बाळकोबा उत्पात यांच्यासमोर ही लावणी सादर करताना दहावी अदा कोणती असा सवाल त्यांनी सत्यभामाबाई पंढरपूरकर यांना करताच त्यांनी जवळच्या खांबाला मिठी मारून डोळे गच्च बंद केले व ही 'दहावी अदा' असे करून दाखवले होते.
पंढरपूरी बाजाचे गायन, अदाकारीची लावणी ज्ञानोबा उत्पात आणि सत्यभाबाईंनी लोकप्रिय केली होती. 'अबोल का होता धरिता सखया मजवरी`, 'झाले तुम्हावरी दंग सखया`, 'तुम्ही माझे सावकार` 'बांगडी पिचल बाई`, 'शहर बडोरे सांडून आले वर्स झाली बारा` 'पाहुनिया चंद्रवदन` अशा अनेक पारंपरिक लावण्यांचा खजिना सत्यभामाबाईंकडे होता. जवळपास पाच दशके सत्याभामाबाईंनी रंगमंचाची आणि लावणीची सेवा केली. त्यांना महाराष्ट्र सरकार आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह असंख्य पुरस्कार मिळाले. मा.सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचे ९ सप्टेबर १९९४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
September 9, 2018
वासुदेवांनी ब्रिटिश सत्तेला उलथून टाकण्यासाठी सशस्त्र सैन्य उभारण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी काही सहकारी तयार केले. त्यात दौलतराव, गोपाळराव, गणपतराव घोटवडेकर, अप्पा वैद्य, अण्णासाहेब पटवर्धन, परशुराम पाटनकर, भिकाजी पंथ हर्डीकर, माधवराव नामजोशी, सितारामपंत गोडबोले, विष्णु खरे ,बाबु जोशी आदि तरुण होते.
February 17, 2022
नटसम्राट’ हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर उभे राहते ते एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे ‘डॉ. श्रीराम लागू’ भारतीय चित्रपटाच्या इतिहासातले एक तेजस्वी अभिनय पर्व असलेले, नटसम्राट गणपतराव बेलवलकरांसारखी अनेक पात्रे रंगभूमीवर चिरंजीव करणारे, अनेक नाटककारांना प्रयोजन देणारे, व्यक्तिमत्व म्हणजे, डॉक्टर श्रीराम लागू. मराठी रंगभूमीवरचा नटसम्राट या शब्दात श्रीराम लागूंचे वर्णन करता येईल. भूमिका जिवंत करणे हा वाक्प्रचार लागूंच्या बाबतीत अगदी खरा ठरतो. मराठी रंगभूमी, चित्रपट, हिंदी चित्रपट यात यशस्वी मुशाफिरी करणारे लागू खऱ्या अर्थाने रमले ते नाटकातच.
March 10, 2019
”भारतीय सिनेमांमध्ये सामाजिक, स्त्रीप्रधान असे चित्रपट जेव्हा बनू लागले त्यावेळी अनेक गुणी कलाकार या इंडस्ट्रीला लाभले. त्या काळच्या कलाकारांमध्ये असलेल्या असाधारण प्रतिभेमुळे यशाचं शिखर अगदी सहज सर करता आलं आणि त्यांचं नाव चित्रपटाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले; त्यापैकीच एक नाव होते शांता आपटे. त्यांचा जन्म १९ मार्च १९२३ रोजी झाला. शांता आपटे यांचे वडिल रामचंद्र आपटे रेल्वेत नोकरीला होते; शांता आपटें यांचे शालेय शिक्षण ४ थी पर्यंतचं, त्यानंतर घरीच शिकवण्यासाठी शिक्षक येत, अभ्यासाव्यतिरिक्त वयाच्या ५ व्या वर्षापासून गायनाचे धडे सुध्दा शांता आपटेंना दिले गेले; पुण्यात असताना बापूराव केतकर यांच्याकडे संगीताचं पहिलं प्रशिक्षण घेतलं; कालांतर त्यांच्या वडिलांची बदली पंढरपूरला झाली त्यामुळे तिथे गायन आणि संगीताचं प्रशिक्षण नारायण बिवा थिटे व मास्टर कृष्णाराव यांच्याकडून घेतले. लहान वयातच शांता आपटेंनी गायनाचे छोटे-मोठे जलसेही करु लागल्या; अश्या या गोड गळ्याच्या गायिकेला रुपेरी पडद्यावर अभिनय करण्याची संधी मिळाली. कला तसंच अभिनय क्षेत्रात कारकीर्द घडवायची असेल तर सर्वच गोष्टी अवगत असणं गरजेच्या आहेत; हे माहित असल्यामुळे शांता आपटेंनी ड्रायव्हींग, स्वीमिंग यासारखे प्रकार शिकून घेतले. नृत्यात तर त्या निपुणच होत्या! भालजी पेंढारकरांच्या ‘श्यामसुंदर’ या चित्रपटातून या सिनेमात शांता आपटेंनी ‘राधा’ ची भूमिका साकारली; त्यानंतरच्या २-३ वर्षात शांताजींनी शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण घेतलं व कालांतराने ‘प्रभात’च्या ‘अमृत-मंथन’ , ‘वहॉं’ , ‘राजपुतरमणी’ सारख्या हिंदी चित्रपटातून भूमिका करुन आपल्यातील वैविध्यपूर्ण कलेची चुणूक दाखवून दिली; तसंच ”गोपालाकृष्ण” , ”अमरज्योती” या चित्रपटातील भूमिका सुध्दा प्रचंड गाजल्या; ”कुंकू” चित्रपटानी त्यांच्या अभिनयावर आंतरराष्ट्रीय मोहोर उमटवली. कारण त्याकाळात बर्लिन फेस्टीव्हल मध्ये शांता आपटेंच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं होतं, आणि कुंकू त्यांच्या कारकीर्दीचा ”माइलस्टोन” ठरला. शांता आपटेंची ओळख बनला; कारण त्यांची कुंकूतील भूमिका त्या काळातल्या एका अतृप्त मनाचा ठाव घेणारी होती जी शांता आपटेंनी हिबेहूब रंगवली. ”कुंकू” आणि ”स्वयंसिध्दा” या चित्रपटात अन्यायाविरोधात पेटून उठनाऱ्याच स्त्रीचं दर्शन शांता आपटेंनी घडवून दिलं. शांता आपटेंचा खाजगी जीवनात वावरसुध्दा अन्याय सहन करायचा नाही आणि वेळ प्रसंगी त्यांनी ते दाखवून देखील दिले. एकदा एका पत्रकाराने शांता आपटें यांच्या विषयी काहीतरी खोटी खरपूस बातमी बनवली, ती बातमी वाचल्यावर त्या खूपच हैराण झाल्या ! आपण ही गोष्ट बोललोच नव्हतो तर त्या पत्रकाराने छापलीच कोणत्या आधारावर? त्याक्षणी अगदी बेधडकपणे शांता आपटे त्या वृत्तपत्राच्या कार्यालयात गेल्या व ही बातमी छापणाऱ्या व पत्रकाराला आपल्या फटक्यांचा प्रसाद द्यायला देखील मागे-पुढे पाहिले नाही. हा प्रसंग म्हणजे एक अपवाद असला तरी खोटेपणाच्या विरोधात केलेला हा मुकाबलाच होता; मिलेट्री माईंडेड असल्याने वेळेचे भान, हजरजबाबीपणा, शिस्तबध्दता, आणि हाती घेतलेलं कार्य वेळच्यावेळी पूर्ण करणे हे गुण अगदी नमुद करण्यासारखेच होते. तसंच एक आई म्हणून शांता आपटे स्वत: आपल्या मुलीवर बारीक लक्ष ठेवून होत्या. नाटक आणि शुटिंग्समधून वेळ मिळेल तेव्हा जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबियासोबत व्यतीत करण्याचा प्रयत्न करत; इंग्रजी भाषेचं वाढतं महत्व ओळखून शांता आपटेंनी आपल्या दोन्ही मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल केले, पण घरात असताना अगदी सक्तीने मराठीतच बोलायचे यावर त्या ठाम असायच्या. शांता आपटेंना हिंदी, मराठी, इंग्रजी सोबतच अनेक भाषा अवगत होत्या; त्यामुळे अनेक प्रादेशिक चित्रपटामध्ये त्यांना भूमिका करता आल्या ज्यामध्ये गुजराती, बंगाली, तमिळ, तेलुगू या भाषांचा समावेश आहे. त्याकाळी महिलांचा रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावरील वावर कमी होता,पण या क्षेत्रात महिलांनी दैदिप्यमान कामगिरी करावी असं त्यांना मनोमन वाटे, आणि म्हणून ऑफस्क्रीन आणि बॅकस्टेज आर्टिस्ट ना शांता आपटेंकडून सतत प्रोत्साहून मिळत असे.
”शांता आपटे” यांचे, ”कुंकू” मधील निरा या त्यांच्या भूमिकेमुळे जाचक परंपरेला विरोध करणारी स्त्री आणि अन्यायाविरुध्द बंड पुकारुन समाजाला सत्मार्गाकडे नेणार्याल स्त्रीची प्रतिमा निर्माण झाली; त्याकाळी अश्या भूमिका साकारुन अजरामर करणं हे मोठं धारिष्ठ्यच होतं आणि मा.शांता आपटेंनी हे लिलया पेललं; १९३१ ते १९५३ या काळात मा.शांता आपटे यांनी रुपेरी पडद्यावर आणि मराठी संगीतरंगभूमीवर साकारलेल्या भूमिका कायम स्मरणात राहिल्या. भारतीय चित्रपटामधील झंझावती अभिनेत्री म्हणून ज्यांचं नाव अग्रक्रमाने घेतले जाते अश्या काही मोजक्या स्त्रीकलाकारांमधील ‘शांता आपटे’ हे नाव वर्तमानकाळातील कलाकारांना प्रेरणा देत राहिले आहेत. त्याकाळात पार्श्वगायनाची संकल्पना रुजली नसल्याने बहुदा गायक-गायिका या रुपेरी पडद्यावर भूमिका करत; पण मा.शांता आपटे म्हणजे गायन आणि चतुस्थ अभिनयाचा आविष्कार होता. १९५३ नंतर मा.शांता आपटें यांनी मराठी संगीत रंगभूमीवर ”सौभद्र” , ”मानापमान” , ”लग्नाची बेडी” , ”एकच प्याला” सारख्या नाटकांमधून दर्जेदार भूमिका केल्या, अनेकअंकी असलेल्या या नाटकांसमोर प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे मोठे आवाहन असे; म्हणून प्रयोगात सतत नाविन्यपूर्ण भूमिका सादर करण्याची जबाबदारी कलाकारांवर असायची, याच भान शांता आपटेंना असल्याने नेहमीच आपल्या अभिनयाचे वैविध्यमय आविष्कार सादर केले तसंच अनेक जुन्या ‘संगीत’ नाटकांना, पुनर्जीवीत केले, ते म्हणजे त्याकाळातील नामवंत कलाकारांना सोबत घेऊन अर्थात या नाटकांचा पारंपारिक बाज आणि मुळ गाभा मात्र तसाच ठेवला गेला.
एका प्रसंगाचा किस्सा नयना आपटे सांगतात की मुंबईतल्या गोरेगाव परिसरात मोतीलाल नगर या रस्त्याचे उद्घाटन पंडित नेहरुंच्या हस्ते करायचे होते. अभिनेत्री शांता आपटेसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यावेळी पंडित नेहरूंनी शांता आपटेंना वंदेमातरम गाण्याची विनंती केली. आणि त्यांच्या सुरमधूर स्वरांनी कार्यक्रमाला चार चांद लागले. मा.शांता आपटे यांचे २४ फेब्रुवारी १९६४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 25, 2017
भीमसेन जोशी म्हणजे 'गायनाचं विद्यापीठ होते. भीमसेन म्हणजे कांही लेखक किंवा भाष्यकार नव्हे, पण भीमसेनी गाणं म्हणजे शंभर टक्के स्वच्छ “शास्त्र” आणि ते ही यमा-नियमांचा नुसता रवंथ नव्हे तर, शास्त्राच्या चौकटीला धरून भला मोठ्ठा महाल उभा केल्यासारखं! अनेक रेकॉर्डिंग्स आणि व्हिडिओ यांच्या स्वरूपात भीमसेन सतत आपल्यासोबत राहणार आहेतच. जशी पंडितजीच्या आवाजाची चव नेहमीच मनात रेंगाळते तशीच या अनोळखी रूपाची आठवणही कायम मनात रहाते.
पं.भीमसेन जोशी थोडक्यात जीवनप्रवास.
कर्नाटकमधील धारवाड जिल्ह्यातील गदग येथे ४ फेब्रुवारी १९२२ रोजी जन्म. १६ भावंडांमध्ये सर्वात थोरले. वडिल गुरुराज जोशी हे शिक्षक तर आजोबा त्या वेळचे प्रसिद्ध गायक. घरी संगीत शिकवण्यासाठी ठेवलेल्या शिक्षकाकडून समाधान न झाल्याने ११ व्या वर्षी गुरूच्या शोधात घर सोडले. विजापूर, धारवाड, पुणे, ग्वाल्हेर, कोलकाता, दिल्ली, लखनौ, रामपूर अशी भटकंती. ग्वाल्हेर येथे माधव संगीत शाळेत शिक्षण. जालंधर येथून वडिलांनी पुन्हा घरी आणल्यानंतर १९३६ पासून धारवाड येथे सवाई गंधर्व यांच्याकडून संगीतशिक्षण. वयाच्या १९ व्या वर्षी पहिला जाहीर कार्यक्रम. २२ व्या वर्षी कानडी आणि हिंदी भक्तीगीतांच्या त्यांच्या पहिल्या ध्वनीफित एचएमव्ही तर्फे प्रकाशन. १९४३ मध्ये मुंबई आकाशवाणी येथे नोकरी. समीक्षकांबरोबरच सर्वसामान्यांचीही भरभरून दाद. उत्स्फूर्तता, अचूक सूर लावणे, लांबलचक पल्लेदार ताना वैशिष्ट्यपूर्ण आवाज आणि तालावरील प्रभुत्व ही त्यांच्या गायकीचीखास वैशिष्ट्ये. शुद्ध कल्याण, मियाँ की तोडी, पुरिया धनश्री, मुलतानी, भिमपलास, दरबारी आणि रामकली हे विशेष आवडते राग. गुरूंना श्रद्धांजली म्हणून १९५३ मध्ये सवाई गंधर्व महोत्सवाची पुण्यात सुरुवात.
२४ जानेवारीला भीमसेन जोशी यांची माहिती समूहावर आलेली आहे, त्यामुळे आज माहिती न टाकता काही दिग्गज व्यक्तीनी सांगीतलेल्या भीमसेन जोशी यांच्या आठवणी...........
माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांना संशोधनाच्या क्षेत्रातील अडचणीच्या प्रसंगातून भीमसेन जोशी यांचे संगीत ऐकल्यानंतर मार्ग मिळायचा. पंढरीच्या वारीला जाणाऱ्या लक्षावधी वारकऱ्यांना 'तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल' अशा एकापेक्षा सरस अभंगवाणीने बळ देण्याचे काम त्यांनी केले. हे स्व:ता डॉ. कलाम यांनी एका मुलाखतीत सांगीतले होते.
श्रीनिवास खळे यांच्या संगीत रचना या गायक गायिका यांना गाण्यासाठी अवघड असत, त्यामुळे खळे यांच्या कडे गाणे म्हणजे कठीण परीक्षा पास होणे असे मानले जात असे. याबबत त्यांना विचारले असता ते म्हणत कि त्या रचना हि शब्दांची गरज आहे. आणि योग्य संगीत रचने शिवाय गीतातील भाव रसिकांपर्यंत पोचणार कसे ?
त्यांनी संगीतबध्द केलेली भक्ती गीते तर इतक्या अवीट गोडीची आहेत कि त्यावर काय बोलावे. या संगीत रत्नाने विश्वरत्न संत तुकाराम यांच्या रचना संगीत बद्ध करताना, त्या दोन भारतरत्नांकडून गाऊन घेतल्या. 'अभंगवाणी ' यासाठी पंडित भीमसेन जोशी या दिग्गजांचा आवाज त्यांनी संगीतबद्ध केला. त्यांनी संगीत दिलेल्या, पंडित भीमसेन जोशींच्या आवाजातील - 'राजस सुकुमार मदनाचा पुतळा ।
रविशशिकळा लोपलिया ॥१॥'
आणि ,लताजींच्या आवाजातील - 'सुंदर तें ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवोनियां ॥१॥ '
ही अशी रचना अशी आहे कि त्यातील स्वरांची आर्तता सुरांमुळे इतक्या पराकोटीला जाऊन पोहचते कि , विठुरायाचे ते रूप पाहण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वरच धावून आला तरी त्यात नवल नाही.
गौतम राजाध्यक्ष यांनी भीमसेन जोशी यांची सांगितलेली आठवण
मी पुण्याला चाललो होतो. फर्स्ट क्लासच्या डब्यातही ब-यापैकी गर्दी होती. दिवसभराच्या कामाने मी थकलेला होता. डोळे मिटून पडून राहावं, असा विचार करत असतानाच त्याच्या कानावर गाण्याचे सूर पडले. वरच्या बर्थवर सगळ्यांकडे पाठ करून आडवे पडलेले एक गृहस्थ स्वत:शीच गुणगुणत होते. ते सूर इतके अद्वितीय होते की गौतम सांगायचा, ‘‘मी माझा सगळा थकवा विसरलो आणि इतकं महान कोण गातंय, हे शोधण्याचा प्रयत्न करू लागलो.’’ लोणावळ्याला गाणी थांबली तसा मी डब्याच्या बाहेर लावलेली प्रवाशांची यादी पाहू लागलो. त्यावर नाव होतं- बी. जोशी. इतका वेळ आपण प्रत्यक्ष पंडीत भीमसेन जोशींचं गुणगुणणं ऐकत होतो, या विचाराने त्याला शहारा आला.तेव्हा माझी आणि पंडिंतजींची ओळख नव्हती. त्यांचे फोटो काढण्यासाठी त्यानंतर २१ वर्ष जावी लागली. आणि ते माझ्यासाठी भीमअण्णा झाले. फोटो काढताना मी नम्रपणे त्यांना गायची विनंती केली आणि त्या दुपारी ‘‘आसवानी तोडी’’ गाऊन त्यांनी ती पूर्णही केली.
किशोरी अमोणकर यांनी भीमसेन जोशी यांची सांगीतलेली आठवण.
आम्ही एका कार्यक्रमासाठी अमृतसरला गेलो होतो. अमृतसरला भयंकर थंडी, रात्रीच्या वेळी बाहेर मी एका साध्या खाटल्यावर झोपले होते. तेव्हा तिथून भीमसेन दादा चालला होता. त्यांचं माझ्याकडं लक्ष गेलं. तो म्हणाला, अरे रे, अशी थंडीत उघडयावर कशी झोपली आहे ही ? त्याने ताबडतोब त्याच्या अंगावरची शाल काढून माझ्या अंगावर घातली. तो भीमसेन दादा मी आजही विसरत नाही.
सुधीर गाडगीळ यांनी भीमसेन जोशी यांची सांगीतलेली आठवण.
"पंडित भीमसेन जोशी" म्हटले की, सवाई गंधर्व, अभंगवाणी, रागदारी यातले काही ना काही तुमच्या डोळ्यासमोर नक्कीच येणार. पण "ऑटोमोबाईल" म्हटले तर कसे वाटेल. गाडगीळ सांगतात, पंडीतजींना गाड्यांची खूप आवड होती. गाडी भरगाव सोडण्यात जसा त्यांच्या हातखंडा होता तसाच गाडी दुरुस्त करण्यात ही ते गाण्या इतकेच तज्ज्ञ होते. गाडीच्या इंजिन सहित प्रत्येक पार्ट ची माहिती पंडीतजींना असायची. बिघडलेली गाडी, काय केले तर दुरुस्त होईल आणि किती वेळात होईल, ही माहिती गॅरेज वाल्याला ते अगदी बिनचुक सांगत असत. एकदा नगरला कार्यक्रमाला जायचे होते, पंडीतजींनी नुकतीच नवीन मर्सिडिज घेतली होती. मी त्यांच्या घरी पोहोचताच त्यांनी मर्सिडिज काढली आणी म्हणाले 'बसा'. गाडी अर्थातच पंडितजी चालवत होते. सवयीने त्यांनी ती फुल स्पीड मध्ये सोडली होती. तासाभरात ते कोरेगावभिमाला पोहोचले. समोर नदीवरचा पुल होता. पलीकडून एक ट्रक येताना दिसत होता. पुल तसा अरुंदच होता. पण पंडितजी काही वेग कमी करायला तयार नव्हते. मी जीव मुठीत धरून गाडीत बसलो होतो आणि ट्रक अगदी गाडीच्या शेजारून गेला पण धक्का न लागता. गाडगीळांनी न राहवून 'हुश्श' केले. त्यावर पंडितजी म्हणाले, घाबरू नका गाडगीळ, लुगडं फाटेल पण मांडीला खरचटणार नाही.
पु.ल.देशपांडे यांनी भीमसेन जोशी यांची घेतलेल्या मुलाखतीचे काही अंश.
पु.ल. : 'घराणं' या विषयावर तुमचं काय मत आहे?
भीमसेन : माझं स्वत:चं काय आहे की, मी डेमॉक्रॅटिक आहे. म्हणजे मी कुठल्याही घराण्याचा हट्ट धरत नाही. आपली तयारी पाहिजेच. स्वतंत्र घराणं पाहिजेच. कारण आई-वडिलांशिवाय मुलगा होत नाही. आताची गोष्ट सोडून द्या. गुरूंनी जेवढं शिकवलंय तेवढं जर लोकांपुढे ठेवलं, तर ती पोपटपंची होते. मग आपलं काहीतरी वैशिष्ट्य पाहिजे. मी तर सगळ्या घराण्यांची भट्टी करून आपल्यात मिसळून घेतली आहे.
पु.ल. : तुमच्या गाण्याचं वैशिष्ट्य असं वाटतं, की तुमचा जो मूळ पाया आहे, त्या पायाला कुठंही धक्का न लावता तेव्हाच्याच इमारतीत जी रचना तुम्ही केलीत, त्याच्यामध्ये नावीन्य आहे. जुन्या घोड्याला शिंगं काढून म्हणायचं, की मी नवा घोडा काढला, असं ते नावीन्य नाही.
भीमसेन : त्याचं घोडेपण टिकवून, म्हणजे किराण्याला जे अभिप्रेत आहे, की स्वरांची आराधना करत करत जाणं, हे ठेवून मी त्याच्यावर पुष्कळ नवीन केलं. माझ्या भाषेत म्हणायचं तर प्रत्येक कलावंत हा चोर आहे. मोठा चोर आहे. त्याच्यात कोणी लहान असतो, कोणी मोठा असतो, पण असं केल्याशिवाय स्वतंत्र गायक होऊ शकत नाही.
पु.ल. : आता मला हे सांगा की, तुमची पहिली बैठक कुठं झाली?
भीमसेन : म्हणजे कर्नाटकात की पुण्याला?
पु.ल. : पुण्याला.
भीमसेन : अरे, तुमच्याच घरामध्ये गायला बसलो होतो. तुम्ही आणि ते गोडबोले होते.
पु.ल. : हो, आठवतंय मला. त्यानंतर तुम्ही ज्या वेळेला पब्लिकमधली बैठक सुरू केलीत, त्या वेळेला लोकांपुढे गाताना आपल्याला काय काय करायला पाहिजे, याचा विचार करून तुम्ही गाण्यामध्ये काही अदलबदल केलेत का?
भीमसेन : नाही. असं काही नाही. बदल वगैरे काही विशेष केलेले नाहीत मी. जे तेव्हा गात होतो, ते अजूनही गात आहे. मुख्य एवढंच की, त्याला वेळेचं बंधन वगैरे पाळतो. उगीच आपलं आपल्याला येतंय म्हणून तास-सव्वातास गायचं, ही फॅशनच होऊन गेलीय. लोक म्हणतात, अरे हा राग यांनी तासभर पिसला. आता ते पिसणं नकोच.
सचिन तेंडूलकर यांच्या आठवणीतील भीमसेन जोशी.
मी एकदा काही खाजगी कामाकरता मुंबई वरून कलकत्त्याला विमानाने निघाला होता. हा साधारण दीड तासाचा प्रवास. मंडळी स्थिरस्थावर झाली होती.. विमान नभात होतं. सचिनला बसल्याबसल्या डुलकी लागली..काही वेळाने झोपेतच आपल्या जवळ कुणी उभं आहे अशी त्याला जाणीव झाली आणि त्याने डोळे उघडले..पाहतो तर जवळच एक सद्गृहस्थ उभे होते.. त्यांची व सचिनची नजरानजर झाली आणि ते सद्गृहस्थ दोन्ही हात जोडून मला म्हणाले,
"नमस्कार. माझं नांव भीमसेन जोशी. आपला खेळ मला फार आवडतो, मी आपला चाहता आहे. आज अशी विमानात अचानक आपली भेट झाली याचा मला आनंद वाटतो!"
त्या आठवणीत सचिन पुढे असं लिहितो की 'मी बसल्याजागी उडालोच अक्षरशः! एवढा मोठा माणूस आणि इतका साधा आणि नम्र! मी पटकन उठून उभा राहिलो. त्यांनी माझे दोन्ही हात हातात घेतले व स्मितहास्य करून ते आपल्या जागेवर निघून गेले!'
लता मंगेशकर यांनी सांगितलेली पं.भीमसेन जोशी यांच्याबद्दल आठवणी.
मला भारतरत्न मिळाल्यानंतर "या भारतरत्न' असे
नेहमी म्हणणारे... "अहो लताबाई, घरी या की एकदा. गरम थालिपीठ आणि त्यावर लोणी हा बेत करायला सांगतो' असा आग्रह करणारे पं. भीमसेन जोशी... ‘त्यांचे नाव झाले नव्हते त्या वेळेपासून मी त्यांना ओळखत होते. अनेकदा आम्ही भेटत असू. त्यांच्या घरी माझे जाणे-येणे असे. ते प्रत्येक भेटीत दिवसभर संगीत आणि संगीताविषयीच बोलत असच. चित्रपट, शास्त्रीय संगीत हे त्यांच्या चर्चेचे विषय असत. इतर विषयांचा समावेशच त्यांच्या बोलण्यात कधी नसे. त्यांना भरधाव गाडी चालविण्याची सवय होती. नव्हे तर दूरवरचा प्रवास करून थकल्यानंतरही ते दुसऱ्या दिवशी गायनास बसत होते, हे विशेष!
पं. संजीव अभ्यंकर यांनी सांगितलेली पं.भीमसेन जोशी यांच्याबद्दलची आठवण.
१९८१ मध्ये वयाच्या ११ व्या वर्षी मी पहिल्यांदा कुंदगोळ येथे भरलेल्या सवाई गंधर्व महोत्सवात प्रथम गायलो. पंडितजींच्या गुरू भगिनी गंगुबाई हनगल यांनी मला त्या महोत्सवासाठी निमंत्रित केलं होतं. त्यावेळी अर्थातच माझा आवाज सुटलेला नव्हता. मी त्या ठिकाणी काळी पाचमध्ये गायलो. गाणं संपल्यानंतर ग्रीन रूममध्ये पंडितजींनी पाठिवर कौतुकाची थाप मारली आणि मला आशीर्वाद दिले. त्यावेळी पंडितजींसोबत काढलेलं छायाचित्र आजही माझ्या संग्रही आहे. त्याच वर्षी एका खासगी कार्यक्रमात मी पंडितजींबरोबर गायलो. पंडितजींनी माझं गाणं ऐकलं आणि ते आई-वडिलांना म्हणाले, ‘हा ज्ञानदेवांच्या कुळातील मुलगा आहे.’ त्यांच्या या शब्दांमुळेच आई-वडिलांनी माझी संगीतक्षेत्रातील कारकीर्द निश्चित केली.या क्षेत्रात मी स्थान पक्कं करू शकलो यामागे पंडितजींनी त्यावेळी दिलेला आशीर्वाद आहे. १९९० च्या सवाई गंधर्व महोत्सवात ‘मोस्ट ब्राईट यंग आर्टिस्ट’ म्हणून माझा पंडितजींच्या हस्ते सत्कार झाला. त्यावेळी पुन्हा एकदा आशीर्वाद देऊन पंडितजींनी माझी आत्मियतेने चौकशी केली. त्यानंतर अनेकदा पंडितजींच्या भेटी होत राहिल्या. प्रत्येक भेटीत त्यांचा साधेपणा मनाला भावत राहिला. इतका मोठा, जागतिक किर्तीचा कलावंत असूनही पंडितजींच्या मनाला अहंकाराचा स्पर्शही झाला नाही. पंडितजींनीमी लहान असताना आई-वडिलांना माझ्या बाबतीत दलेले सल्ले फार मोलाचे ठरले. एकदा ते आई-वडिलांना म्हणाले, ‘हा मुलगा छान गातोच. पण, त्याच्या तब्येतीकडेही लक्ष द्या.’ पंडितजींनी दिलेला हा सल्ला मला फार मोलाचा वाटला. केव्हाही भेटले तरी त्यांच्याशी गप्पांची मैफल सहज जमून यायची. अशा वेळी त्यांना वयाचं, ज्येष्ठतेचं बंधन आड यायचं नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 4, 2019
आज २९ सप्टेंबर. बॉलीवुडचा विनोदाचा बादशहा मेहमूद यांची जयंती. मेहमूद यांचा जन्म २९ सप्टेंबर १९३२ रोजी झाला.
मुमताज अली हे मेहमूद यांचे वडील मुंबई टॉकीज स्टुडिओमध्ये काम करत असत. मेहमूद अभिनेता बनण्याच्या आधी ड्रायव्हरचेही कामही करत असत मीना कुमारी यांनी त्यांना टेबल टेनिस शिकवण्यासाठी नोकरीला ठेवले होते. तेव्हा त्यांनी मीना कुमारीची बहीण मधू हिच्याशी विवाह केला. विवाह केल्यावर अभिनय करण्यास सुरवात केली. सुरुवातीला "दो बिघा ज़मीन" व "प्यासा" " या चित्रपटात छोटी मोठी कामे केली. पहिला ब्रेक परवरिश या चित्रपटात मिळाला. ज्यात राज कपूर यांचा भाऊ म्हणून रोल केला. मग ते प्यार किए जा, प्यार ही प्यार, ससुराल, लव इन टोक्यो व जिद्दी सारखे हिट चित्रपटात दिसले. यातील काही चित्रपटात हिरो म्हणून रोल केले, परंतु प्रेक्षकांना त्यांना कॉमेडियन म्हणून खूप आवडले. नंतर मेहमूद यांनी त्याच्या स्वत:चे प्रॉडक्शन हाउस चालू केले. प्रॉडक्शन हाउसचा पहिला चित्रपट छोटे नवाब नंतर सस्पेंस-कॉमेडी फिल्म भूत बंगला व साठ च्या दशकातील हिट चित्रपट पड़ोसन. पड़ोसनला अजून ही श्रेष्ठ विनोदी चित्रपट मानले जाते.
मेहमूद यांनी यानंतर अनेक चित्रपटात कामे केली. गुमनाम, प्यार किए जा, बॉम्बे टू गोवा, सबसे बड़ा रूपैया, पत्थर के सनम, अनोखी अदा, नीला आकाश, नील कमल, कुँवारा बाप इ. सिनेमांत हीरो आणि हिरोइनची कमाई खलनायकापेक्षा जास्त असते, परंतु त्याकाळी महमूद हीरोपेक्षा काही पटीने ज्यास्त पैसे घेत होते. 'सु्ंदर' सिनेमात महमूद यांच्यासोबत विश्वजीत यांनी काम केले होते. या सिनेमात हीरो म्हणून काम करण्यासाठी विश्वजीत यांना दोन लाख रुपये तर महमूद यांना आठ लाख रुपये मानधन मिळाले होते. असेच 'हमजोली' सिनेमासाठीसुध्दा घडले होते. या सिनेमातील नायक जितेंद्र होते, परंतु महमूद यांना त्यांच्यापेक्षा जास्त पैसे मिळाले होते.
हास्य अभिनेता, विनोदवीर, विनोदाचा बादशहा अशी अनेक विशेषणे असलेला मेहमूद हे अभिनेता म्हणूनही प्रसिद्ध होते. मात्र त्यांच्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना रडण्यासुध्दा भाग पाडले. 'कुंवारा बाप', 'लाखो में एक जैसा'सारख्या सिनेमे याचे मोठे उदाहरण आहेत. या दोन्ही सिनेमामध्ये महमूद यांनी मुख्य अभिनेता म्हणून काम केले. 'कुंवारा बाप' ही महमूद यांच्या ख-या आयुष्यावर आधारित सिनेमा होता. त्यांचा मुलगा मकदूम अलीला पोलियो झाला होता. महमूद यांनी त्याला ठिक करण्यासाठी लाख प्रयत्न केले मात्र होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांनी आपले दु:ख सिनेमाव्दारे मांडण्याचा प्रयत्न केला होता.
आई एस जौहर व मेहमूद यांची जोडी खास मानली जाते. या दोघांनी जौहर महमूद इन गोवा व जौहर महमूद इन हाँगकाँग या चित्रपटात जान आणली. मेहमूद यांनी त्याच्या कारकिर्दीत ३०० पेक्षा हिंदी चित्रपटांमधून काम केले.
मेहमूद यांचे २३ जुलै २००४ रोजी निधन झाले. मेहमूद यांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
September 29, 2016
आजही एखाद्या विशीतल्या तरुणाला मागे पाडेल, एवढी प्रचंड ऊर्जा, लगबग त्यांच्यात आहे.त्यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी झाला. ८५ व्या वर्षीही त्यांच्यात गाण्याची, स्वर उंचावण्याची क्षमता एवढी आहे की, ऐकणारे थक्कच होतील. ‘ऐंशी वर्षांची म्हातारी बुढी अन् वय काय सांगते सोळा? आंधळा मारतो डोळा...’ या दादा कोंडकेंच्या गाण्यातील मर्म आशाताईंनी कर्तृत्वाने सार्थ करून दाखवले आहे. आशाताई अघोषित भारतरत्न’च आहेत, हे कोणताही संगीतरसिक नाकारणार नाही. लतादीदींसोबत कुण्याही गायिकेची तुलना होऊच शकत नाही, हे एकवेळ मान्य केले तरी,लतादीदींच्या तुलनेत आशा भोसलेंचे गानकर्तृत्व कुठेही मागे नाही. उलट आशा भोसले यांच्या सुरांना जी ‘शार्प धार’ आहे, जे माधुर्य आहे, शब्दफेकीची अनोखी नजाकत आहे, ते अन्य कोणत्याही गायिकेकडे नाही. गाण्यांची जेवढी व्हेरायटी; मग ते शास्त्रीय गीत असो, गज़ल असो, मादकगीत असो, भक्तिगीत-भावगीत असो, पॉपगीत-कॅबरेगीत असो,लावणी-ठुमरी असो वा कव्वाली असो; सादरीकरणाची खास शैलीतील विलक्षण हातोटी आशा भोसलेंनी जोपासली आहे, जी अन्य कुठल्याही गायिकेच्या वाट्याला आली नाही, याची पावती तर दस्तुरखुद्द लतादीदीही देतात! स्वतंत्र छाप आशाताईंनी संगीतविश्वााच्या सुरील्या दुनियेत उमटवली, तेही लतादीदींसह शमशाद बेगम, गीता दत्त, नूरजहॉं, सुरैया यांसारख्या पट्टीच्या गायिका फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असताना! सर्वांत मोठी गोष्ट अशी की, आशा भोसले यांना वैवाहिक जीवनात, चित्रपटसृष्टीत जो संघर्ष करावा लागला, तेवढा अन्य कुठल्याही गायिकेला नाही! तब्बल सहा दशके रसिकमनावर गारूड घालणार्याग व आज वय वर्षे ८४ असतानाही तोच मधुर स्वर आशाताईंकडे आजही कायम आहे. मात्र, ‘मेलोडी क्वीन’ आशाताई यांचा सहा दशकांचा प्रवास अतिशय संघर्षपूर्ण, खडतर असाच राहिलेला आहे. प्रारंभी अतिशय वाईट दिवस त्यांनी आयुष्यात अनुभवलेले आहेत. वयाने जवळपास दुप्पट असलेल्या ज्या व्यक्तीवर नितांत प्रेम केले व लतादीदींसह घरातील सर्वांचाच कडाडून विरोध असताना त्यांचा रोष पत्करून आयुष्याचा जोडीदार म्हणून घरातून पळून जाऊन ज्याची मोठ्या विश्वा साने निवड केली, त्याच्याचकडून म्हणजे गणपतराव भोसले यांच्याकडून विश्वायसाला तडा गेल्यानंतर जिव्हाळ्याचे सर्वच लोक गमावल्याचे जे दिवस आशाताईंनी अनुभवले व त्यानंतरही त्या न डगमगता कुणाच्याही सहकार्याविना केवळ आपल्या गानकौशल्याच्या बळावर ज्या धीरोदात्तपणे उभ्या राहिल्या आणि प्रचंड यशस्वी झाल्या, त्याला खरोखरच तोड नाही!
‘संघर्षाचं प्रतीक’ म्हणूनही आशाताईंकडे पाहिल्यास ते वावगं ठरणार नाही. कारण ती वस्तुस्थिती आहे. त्यांच्या जागी अन्य दुसरी कुठलीही महिला राहिली असती, तर कदाचित कधीच आत्महत्या करून मोकळी झाली असती. कारण, पदरात दोन मुले टाकून व गर्भात एक बाळ सोडून गणपतराव भोसले व त्यांचे बंधू आशाताईंच्या जिवावर उठले होते.अतिशय घाणेरडी वागणूक मिळाल्याने आशाताईंनी ६० साली गणपतराव भोसले यांच्याशी घटस्फोट घेतला होता, हा सत्य परंतु कटु असा खाजगी इतिहास आहे. आपल्या इच्छेविरुद्ध आपल्याच स्वीय सचिवासोबत लग्न केले म्हणून संपूर्ण मंगेशकर कुटुंबाच्या कर्त्या करवित्या लतादीदी यांचीही साथ-जिव्हाळा त्या गमावून बसल्या होत्या. गणपतराव हे लतादीदींचे स्वीय सचिव होते. लग्नाच्या वेळी आशाताईंचं वय १६ तर गणपतराव ३१ वर्षांचे होते. अशा कठीण दिवसांत आशाताईंनी कारकीर्द घडवायला प्रारंभ केला तेव्हा त्यांना अनेक खडतर, कटु अनुभवांचा सामना करावा लागला. कुणी गाणे गाण्याची संधी देत नसत, अन्य गायिकेने नकार दिलेली गाणी त्यांच्या वाट्याला येत असत, अल्प मानधनावर त्यांना टुकार गाणी गावी लागत असत. बी ग्रेड, सी ग्रेड नायिकांवर चित्रित असलेली गाणी त्यांना गावी लागत असत. हे सर्व आशाताईंच्या वाटेला प्रारंभी येत गेलं व आशाताईंनीही नशिबाचे भोग समजून ते स्वीकारलं. स्वीकारण त्यांना भागच होतं, परिस्थितीच तशी होती! मात्र त्यांनी, मिळालेल्या या प्रत्येक संधीचं सोन्यात रूपांतर केलं, असं की ‘देखनेवाले देखतेईच रह्य गये!’ प्रत्येक गाणं तन-मन ओतून असं काही तडाखेबाज गायलं की बस्सं़! आशाताईंच्या वाईट दिवसांमध्ये गुरुदत्त यांची पत्नी गीता दत्त, शमशाद बेगम, लता मंगेशकर या फिल्म इंडस्ट्रीतील टॉपच्या गायिका होत्या. पुढे पंचमदांची साथ मिळाल्यानंतर आशाताईंनी एकापेक्षा एक अशा गाण्यांची ज्या गोडव्याने बरसात केली, त्याने ‘चिंब’ झालेले रसिकमन कधीच ‘कोरडे’ होत नाही. लावणी, भावगीतं-भक्तिगीतं, गज़ल, पॉप, उडत्या चालीतली गाणी, लोकगीतं, कव्वाली, रवींद्र संगीत आदी सर्वांमध्ये आशाताईंनी अमिट मुद्रा उमटवली.
१९४३ साली ‘माझा बाळ’ या चित्रपटात दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘चला चला नव बाळा...’या गाण्याने आशाताईंनी चित्रपट गायनाला प्रारंभ केला होता. ४८ साली हंसराज बहल यांच्या ‘चुनरियॉं’ या चित्रपटात ‘सावन आया...’हे गीत गाऊन आशाताईंनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.५३ साली बिमल रॉय यांनी ‘परिणीता’साठी आशाताईंना संधी दिली, ५४ साली राज कपूर यांनी ‘बूट पॉलिश’मध्ये मोहम्मद रफी यांच्यासोबत ‘नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुठ्ठी मे क्या है...’ गायला दिलं. पुढे ओ. पी. नय्यर यांनी ५६ साली ‘सीआयडी’साठी संधी देऊन आशादीदींच्या पदरात मोठं यश दिलं.
५७ साली ‘नया दौर’मध्ये ओपींच्या उडत्या चालीवर रफीसाहाबसोबतचं ‘मॉंग के साथ तुम्हारा’, ‘उडे जब जब जुल्फे तेरी’, हेमंतकुमार यांच्या संगीतातलं ‘जागृती’मधलं ‘दे दी हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल’, सी. रामचंद्र यांचा संगीतसाज आणि भरत व्यास यांनी रचलेलं ‘नवरंग’मधलं ‘आधा है चंद्रमा रात आधी’, ‘तू छुपी है कहॉंऽ मै तडपता यहॉं’, जयदेव यांचं संगीत असलेलं देव आनंद-साधनावरचं ‘हम दोनो’मधलं रोमॅण्टिक ‘अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नही’, ‘काला पानी’तलं देव आनंदला विनंती करणारं मधुबालाचं ‘अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना’,मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं ‘मेरा साया’तलं ‘झुमका गिरा रे’, ओपी-कमर जलालाबादींचं ५८ सालच्या ‘फागून’मधलं ‘एक परदेसी मेरा दिल ले गया, जाते जाते मिठा मिठा गम दे गया’, ‘तिसरी कसम’चं लोकगीतं ‘पान खाये सैया हमारो, सावली सुरतीयॉं होठ लाल लाल’, ‘किस्मत’मधलं शमशाद बेगमसोबतचं ‘कजरा मोहोब्बतवाला अखियों मे ऐसा डाला’, ‘पेईंग गेस्ट’मधलं चुलबुल्या नूतनला देव आनंद छेडतो तेव्हाचं ‘छोड दो आँचल जमाना क्या कहेगा’, ‘वक्त’मधलं ‘आगे भीऽ जाने ना तूऽ,पिछे भी जाने ना तू, जो भी है, बस यही एक पल है’, कोंबडी पकडणार्याव ‘बांगडू’ किशोरदांसोबतचं ‘हाल कैसा है जनाब का’, ‘हावडा ब्रिज’मधलं ‘आईयेऽ मेहरबॉं’, झीनतवरचं ‘हरे रामा’तलं ‘दम मारो दम’, ओपींचं ‘चॉंद उस्मानी-किशोरदां यांच्यावरचं ‘बाप रे बाप’मधलं ‘पिया पिया पिया मोरा जिया पुकारे, हम भी चलेंगे सैया संग तुम्हारे’, शहरयार यांनी रचलेलं खय्याम यांनी संगीत दिलेलं ‘उमराव जान’मधलं ‘इन आँखो की मस्ती के, मस्ताने हजारों है’, ‘ये क्या जगहा है दोस्तो, ये कौनसा दयार है’, ‘तुमसा नही देखा’तलं ‘सर पे टोपी लाल, हाथ मे रेशम का रूमाल, हो तेरा क्या कहना’, ‘एक मुसाफिर एक हसीना’तलं ‘बहुत शुक्रिया बडी मेहरबानी’, नासिर हुसेन यांच्या ‘तिसरी मंझील’मधलं अतिशय गोड ‘ओ मेरे सोना रे सोना रे सोना रे, दे दुंगी जान जुदा मत होना रे’, ‘ओ हसीना जुल्फोवाली जानेजहॉं’, ‘आजा आजा मै हू प्यार तेरा’, ‘आदमी और इन्सान’मधलं ‘जिंदगी इत्तफाक है’, ‘अनहोनी’मधलं ‘मैने होठो से लगाई तोऽऽ हंगामा हो गया’, ‘बांगडू’सोबतचं ‘आशा’मधलं ‘इना मिना डिका’, ‘काश्मीर की कली’तलं ‘इशारों इशारों मे दिल लेनेवाले’, गुलजार यांचं ‘मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है’, हेलनच्या बहारदार नृत्यावरचं ‘कारवॉं’तलं ‘पिया तू अब तो आजा’, ‘मेरे सनम’चं ‘जाईये आप कहॉं जायेंगे, ये नजर लौटके फिर आयेंगी’, ‘ज्वेल थिफ’चं ‘रात अकेली है, बुझ गए दिये’, ‘शिकार’चं ‘पर्दे मे रहनें दो पर्दा ना उठाओ’, ‘द ग्रेट गॅम्बलर’मधलं अमिताभ-झीनतवरचं फॉरेनमध्ये होडीतलं रोमॅण्टिक ‘दो लफ्जों की हैऽऽ दिल की कहानी’,‘पुकार’मधलं ‘बचके रहना रे बाबाऽऽ बच के रहना रे’, परवीनबॉबीचं नृत्य असलेलं ‘जवानी जानेमन हसीन दिलरूबा’,‘हम किसी से कम नही’तलं ‘ये लडका हाये अल्ला कैसा है दिवाना’, ‘चुरा लिया है तुमने जो दिलको’, ‘मुकद्दर का सिकंदर’चं ‘ओ साथी रे तेरे बिना क्या जिना’, ‘लगान’चं ‘राधा कैसे ना जले’ अशी खूप मोठी गाणी आशाताईंची आहेत. मराठीत गदिमा-यशवंत देवांचं ‘उघडी नयन शंकरा, वसंत ये वनांतरी’, ‘सिंहासन’मधलं सुरेश भटांचं ‘उष:काल होता होता काळरात्र झाली’, बहिणाबाईंचं ‘अरे खोप्यामंधी खोपा सुगडिणीचा चांगला’, खेबुडकरांचं ‘सतीचं वाण’ मधलं किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला’, ‘फटाकडी’तलं नांदगांवकरांचं ‘लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बेंगलोर गोवा नि काश्मीरला, कुठं कुठं जायाचं हनीमूनला’, हेमंतकुमार यांच्यासोबत गायलेलं सुधीर मोघेंचं ‘हा खेळ सावल्यांचा’मधलं ‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय’, पी. सावळाराम यांचं ‘भालू’मधलं ‘गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे व्हावे मिलन, व्हावे मिलन’, सुधीर फडके उपाख्य बाबुजींसोबत गायलेलं खेबुडकरांचं ‘पान जागे फूल जागे, भाव नयनी जागला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला’, भटांचं ‘चांदण्यात फिरताना माझा धरलास हात’, शांता शेळके यांनी रचलेलं ‘जिवलगा, राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे’,भा. रा. तांबेंचं वसंत प्रभूंच्या संगीतसाजातलं बाबुजींसोबत गायलेलं ‘तुझ्या गळा, माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा’, ‘शापित’ मधलं सुधीर मोघेंचं गीत आणि बाब 'राष्ट्रीय पुरस्कार', असंख्य 'फिल्मफेअर पुरस्कार', मध्य प्रदेश सरकारचा 'लता मंगेशकर पुरस्कार', 'महाराष्ट्र सरकारचे १५ पेक्षा जास्त पुरस्कार' आणि नुकताच २००८ मध्ये मिळालेला 'पद्मविभूषण पुरस्कार' - हे पुरस्कार आशाताईंना बहाल करण्यात आले आहेत.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ‘दादासाहेब फाळके सन्मान’ आशाताईंना २०००-२००१ मध्ये प्रदान करण्यात आला. भारत-पाकिस्तान असोसिएशनचा ‘नाईटिंगेल ऑफ एशिया’ हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते, बी.बी.सी.आकाशवाणीच्या वतीने 'जीवनगौरव पुरस्कार'ही त्यांना देण्यात आला. आशाताईनी आजपर्यंत सुमारे ९०० चित्रपटांना आवाज दिला आहे. त्यांनी आत्तापर्यंत १४ भाषांमध्ये सुमारे १२००० गाणी गायली आहेत. आपल्या समूहातर्फे मा.आशाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
आशा भोसले यांची गाणी.
https://www.youtube.com/watch?v=7MjZYvAAakI
https://www.youtube.com/watch?v=ooFjhE_DjJE
https://www.youtube.com/watch?v=48jGe4vcar8
आशा भोसले यांची मराठी गाणी.
https://www.youtube.com/watch?v=sQwTJmRFJE4
https://www.youtube.com/watch?v=7T8PqtOGsLI
September 8, 2017
आज बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्री कोंकणा सेनचा वाढदिवस.
कोंकणा सेनचा जन्म ३ डिसेंबर १९७९ रोजी झाला.
कोंकणा सेन शर्मा ही दिग्दर्शिका अपर्णा सेन शर्मा यांची मुलगी आहे. 'इंदिरा' या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारत १९८३ साली कोंकणाने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर ती २००० साली 'एक जे अच्छे कन्या' या बंगाली चित्रपटात झळकली. चित्रपट जगतात कोंकणाला सर्वात पहिल्यांदा प्रसिध्दी 'मिस्टर एंड मिसेस अय्यर' या चित्रपटामुळे मिळाली. याचे दिग्दर्शन तिची आई अपर्ण सेन शर्मानेच केले होते. ती सायन्स रायटर आणि जर्नलिस्ट मुकुल शर्मा यांची मुलगी आहे. तिची आई अपर्णा सेन एक प्रसिध्द सिने अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहे. 'मिस्टर एंड मिसेस अय्यर'साठी कोंकणाला अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. यानंतर कोंकणा २००५ साली 'पेज थ्री' चित्रपटात चमकली. या चित्रपटामुळे तिची हिंदी चित्रपट वर्तुळात ओळख निर्माण झाली. यापूर्वी तिने अनेक भूमिका केल्या असल्या तरी ते चित्रपट कमर्शियली सक्सेस नव्हते. या दरम्यान तिने 'वेक अप सिड' चित्रपटात रणबीर कपूरसोबत रोमान्स केला. फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोंकणाने मिळवला आहे. २००६ साली 'ओंकारा 'आणि २००७ साली 'लाइफ इन ए मेट्रो' या चित्रपटांसाठी कोंकणाला सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला होता. सहाय्यक अभिनेत्रीचा कोंकणाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. कोंकणा सेन ही अतिशय सिलेक्टेड चित्रपटातून आपल्याला दिसली आहे. प्रसिध्दीसाठी किंवा पैशासाठी सरसकट चित्रपटातून काम करण्याचा मोह तिने टाळला. आशयघन चित्रपटातूनच ती दिसली आणि छोट्या भूमिकातूनही ती उठून दिसली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
December 3, 2016
आपल्या या संवाद लेखनाचे इंगीत सांगताना, स्वत: दिनकरराव म्हणत, ‘मेळ्याचे संवाद लिहिताना संवाद लेखनाची गुरूकिल्ली सापडली. संवाद कलापथक-नाटक अथवा चित्रपटातले असोत, ते बोलीभाषेत लिहावेत, ऐकता क्षणीच प्रेक्षकांना कळलं पाहिजे. भालजी पेंढारकरांच्या साध्या-सोप्या-खटकेदार संवादाची छाया माझ्या संवादलेखनावर पडली आहे. त्यामुळे या क्षेत्रातले ते माझे गुरू आहेत.’ असे आवर्जून ते कबूल करताना आणि संवाद-लेखनाचे महत्त्व पटवून देताना गुरूबद्दलची कृतज्ञताही व्यक्त करत असत.
March 21, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti