"बोला अमृत बोला...‘, "आला खुशीत समिंदर...‘ "क्षण आला भाग्याचा...‘ यांसारख्या मधाळ गीतांनी एकेकाळी मराठी रसिकांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलविणाऱ्या ज्योत्स्ना भोळे या पूर्वाश्रमीच्या दुर्गा केळेकर. त्यांचा जन्म ११ मे १९१४ रोजी झाला. बालपणापासून त्यांना गायनाची व अभिनयाची आवड होती.
ज्योत्स्ना भोळे यांना रंगभूमीवरील पहिल्या अभिनेत्रीचा मान मिळाला. ज्योत्स्नाबाईंना अभिनया प्रमाणे आवाजाची दैवी देणगी होती. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी प्रथम ‘आंधळ्यांची शाळा’ या नाटकात भूमिका केली. या नाटकाचा प्रथम प्रयोग दि. १ जुलै १९३३ रोजी मुंबईच्या रिपन थिएटरमध्ये झाला. या नाटकात त्यांनी नायिकेची म्हणजेच बिंबाची भूमिका केली.या नाटकाचे मुंबई व पुणे येथे शंभराहूनअधिक प्रयोग झाले. कंठसंगीतासाठी इतर गायिकांपेक्षा अगदी वेगळा असा खास आवाज होता. विवाहानंतर १९३३ साली त्यांचे पती केशवराव भोळे यांनी ‘नाट्यमन्वंतर’ ही संस्था काढली. या संस्थेने अनेक नाटकांचे प्रयोग केले.
‘अलंकार’ नाटकात वत्सलेची, ‘आराधना’त देवकीची, ‘आशिर्वाद’मधील सुमित्रा, ‘एक होता म्हातारा’तील उमा, ‘कुलवधू’ मधील भानुती, ‘कोणे एके काळी’ मधील कल्याणी, ‘धाकटी आई’ मधील वीणा,‘भूमिकन्या सीता’मधील सीता, ‘रंभा’तील सुगंधा, ‘राधामाई’ मधील राधा तर‘ विद्याहरण’ मधील देवयानी अशा अनेक नाटकातील त्यांच्या भूमिका गाजल्या. या नाटकातील पदे त्यांनी गाऊन अजरामर केली. १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेच्या दिवशी शिवाजीपार्क येथे झालेल्या कार्यक़्रमात त्यांनी कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रियअमुचा एक महाराष्ट्र देश हा’ हे गीत गाऊन एक इतिहासच रचला.
यागीताला शंकरराव व्यास यांनी संगीतबद्ध केले. या गीताने महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण भारावले.ज्योत्स्नाबाईंना अभिनय, गायन याबरोबर साहित्याचीही आवड होती.त्यांनी ‘आराधना’ या नाटकाचे लेखन केले. त्या अनेक वर्षे ‘महाराष्ट्र कल्चरलसेंटर’च्या अध्यक्षा होत्या. १९९९ साली त्यांना महाराष्ट्र शासनाचा ‘लतामंगेशकर पुरस्कार’ तर पुणे महानगरपालिकेतर्फे ‘बालगंधर्व पुरस्कार’असे अनेक पुरस्कार मिळाले. अनुबंध प्रकाशन या संस्थेने त्यांचे आत्मचरित्र ‘तुची ज्योत्स्ना भोळे’ हे प्रकाशित केले आहे.
ज्योत्स्ना भोळे यांचे निधन ५ ऑगस्ट २०११ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ज्योत्स्ना भोळे यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=ytNtDJ9Yq38
August 5, 2017
रंगभूमी असो किंवा समांतर सिनेमा, टीव्ही, बॉलिवूड, हॉलिवूडचा पडदा; भूमिका दहा मिनिटांची असो किंवा नायकाची; ती अजरामर करण्याची ताकद ओम पुरी यांच्याकडे होती. त्यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९५० रोजी हरियाना मधील अंबाला येथे झाला. चेहरा देखणा नव्हता, पण दमदार अभिनय आणि भारदस्त आवाज, या जोरावर त्यांनी सिनेसृष्टीत अल्पावधीतच आपला दबदबा निर्माण केला होता. विशेष म्हणजे, या झंझावाती प्रवासाची सुरुवात १९७६ मध्ये एका मराठी सिनेमापासून - 'घाशीराम कोतवाल'पासून झाली होती. या सिनेमात घाशीरामची मध्यवर्ती भूमिका साकारल्यानंतर, अगदी गेल्या वर्षीपर्यंत त्यांची घोडदौड सुरू होती.
पंजाबमधील पटियाला येथून त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण घेतले होते. नंतर १९७६ मध्ये त्यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टिट्यूटमधून पुढील शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी एका स्टुडिओमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर त्यांनी 'मजमा' या खासगी नाट्यमंडळाची स्थापना केली. १९८० मध्ये प्रदर्शित झालेल्या आक्रोश चित्रपटातून पुरी यांना बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला.
'घाशीराम कोतवाल' या मराठी चित्रपटातील घाशीराम, 'आक्रोश'मधील लहान्या भिकू, 'अर्धसत्य'मधील अनंत वेलणकर, 'घायल'मधील एसीपी जॉय डिसोझा, 'नरसिंह'मधील सूरज नारायण सिंह बापजी, 'माचिस'मधील सनातन, 'चाची ४२०'मधील बनवारीलाल, 'हेराफेरी'मधील खडकसिंग, 'रंग दे बसंती'मधील अमानुल्ला खान, 'दबंग'मधील पोलीस इन्स्पेक्टर या सगळ्या बहुरंगी-बहुढंगी, नायकी-खलनायकी-विनोदी भूमिका अत्यंत ताकदीनं साकारणारे ओम पुरी यांनी 'आरोहण' आणि 'अर्धसत्य'मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. सिनेसृष्टीतील अमूल्य योगदानाबद्दल १९९० मध्ये त्यांना पद्मश्रीनंही सन्मानित करण्यात आलं होते. फिल्मफेअरच्या जीवनगौरव पुरस्कारासह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते. ब्रिटिश सिनेसृष्टीतील कसदार कामगिरीबद्दल त्यांना मानद 'ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर' ही पदवीही प्रदान करण्यात आली होती. ब्रिटिश विनोदी चित्रपट 'ईस्ट इज ईस्ट'मधील भूमिकेसाठी त्यांना बाफ्टा पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. रिचर्ड अॅटनबरो यांच्या गांधीमध्ये ओम पुरी हे पाहुणे कलाकार होते. सन ऑफ फॅनेटिक, सिटी ऑफ जॉय, वुल्फ या सिनेमांमधील त्यांच्या भूमिकांचंही प्रचंड कौतुक झालं होते.
ओम पुरी यांच्या विनोदी अभिनेत्याचं दर्शन घडलं होतं ते, काक्काजी कहीं आणि मिस्टर योगी या टीव्ही मालिकांमधून. त्यानंतर गोविंद निहलानी यांच्या 'तमस'मधील भूमिकेनं त्यांना दिग्गजांच्या पंक्तीत नेऊन बसवलं. दूरदर्शनवरील 'भारत एक खोज' या कार्यक्रमातील त्यांचा आवाज आजही अनेकांच्या कानात तसाच कायम आहे. 'द जंगल बुक' या चित्रपटातील 'बघीरा'ला ओम पुरी यांनीच आवाज दिला होता. ओम पुरी यांचे निधन ६ जानेवारी २०१७ झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :-इंटरनेट
November 2, 2017
आपल्या करीयर मध्ये त्यांनी ११० हून अधिक चित्रपटात अभिनय केला. १९९८ साली आलेल्या ‘रामायण’मालिकेत चंद्रशेखर यांनी आर्य सुमंत यांची व्यक्तिरेखा साकारली होती. चंद्रशेखर व रामानंद सागर चांगले मित्र होते. त्यांच्या आग्रहाखातर चंद्रशेखर यांनी आर्य सुमंतची भूमिका स्वीकारली होती.
June 16, 2022
राजाभाऊ जेव्हा चित्रपटक्षेत्रात आले तो जमाना मूकपटाचा होता , त्यांनी ह्या क्षेत्रात प्रवेश मिळवला तो मूकपटाना संगीत देण्याच्या निमित्ताने . परंतु ते तरुण असल्यामुळे पडद्यावरील उत्तमोत्तम पात्रे पाहून ते भारावून जात आणि त्यातूनच त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली . राजाभाऊ यांनी एस . व्ही. वर्तक यांच्या ‘ लपंडाव ‘ नाटकात ‘ वाटाणे ‘ नावाचे विनोदी पात्र रंगवले होते.
August 9, 2021
महाराणी ताराबाई या छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते ह्यांच्या कन्या होत्या. त्यांचा जन्म १६७५ रोजी झाला. छत्रपती राजाराम महाराजांशी त्यांचे लग्न १६८३-८४ च्या सुमारास झाले.
२५ मार्च १६८९ रोजी मोघलांनी रायगडांस वेढा घातला असता त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या.छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर ताराबाई,राजसबाई व अंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या.रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली. १६९४ साली ताराबाई,राजसबाई व अंबिकाबाई यांच्यासह जिंजीला पोहचल्या. ९ जून १६९६ रोजी त्यांना शिवाजी हा पुत्र झाला.
१६९७ साली जिंजी मोघलांच्या ताब्यात पडला पण तत्पुर्वी राजाराम जिंजीहून निसटून महाराष्ट्रात परतले. पण ताराबाई व इतर लोक मोघल सेनापती जुल्फिखान यांच्या तावडीत सापडले पण जुल्फिखानने सर्वांची मुक्तता केली. २ मार्च १७०० रोजी छत्रपती राजाराम यांचा सिंहगड किल्ल्यावर मृत्यु झाल्यानंतर मराठी साम्राज्याची सुत्रे ताराराणीच्या हाती आली.ताराराणीच्या सैन्यामध्ये बाळाजी विश्वनाथ,उदाजी चव्हाण,चंद्रसेन जाधव,कान्होजी आंग्रे आदि मात्तबर सेनानी होते.त्यांनी मोघलांची पळता भुई थोडी अशी अवस्था केली. १७०५ साली त्यांनी मोघलांच्या ताब्यातील पन्हाळा किल्ला जिंकून पन्हाळा ही राजधानी बनविली.
छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली. मराठा सैन्यातले शूर सरदार संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव ह्यांच्या साथीने महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाच्या मोगल सैन्याला सतत हुलकावणी दिली. १७०५ मध्ये मराठी फौजा नर्मदा ओलांडून माळवा प्रांतात शिरल्या आणि मोगल फौजांना त्यांनी खडे चारले. त्या जिंकलेल्या प्रांतांमधून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करून स्वराज्याची तिजोरी आर्थिकदृष्ट्या बळकट केली.
वास्तविक १७०० साली छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचे उत्तराधिकार छत्रपती शाहू महाराजांकडे जायला हवे होते. पण शाहूराजे त्यावेळी वयाने खूपच लहान होते आणि नंतरच्या काळात मोगलांच्या कैदेत होते. महाराणी ताराबाईंनी आपला मुलगा शिवाजी ह्याला गादीवर बसवले. १७०७ साली औरंगजेबाचा औरंगाबादजवळ मृत्यू झाला. त्यानंतर मोगलांनी शाहूंची सुटका करताना ह्या उत्तराधिकाराचे बीज पेरले. औरंगजेबच्या मृत्युनंतर शाहूंची मोघलांच्या कैदेतून सुटका झाली.
शाहू सुटल्यानंतर ताराराणी व शाहू यांच्यात वारसाहक्कासाठी संघर्ष सुरू झाला.१२ ऑक्टोबर १७०७ रोजी ताराराणी व शाहू यांच्यात खेड-कडूस येथे लढाई झाली त्यात शाहूचा विजय झाला. अशारीतीने ताराराणीने जिंकलेले सर्व किल्ले शाहूला आपसूकच मिळाले.शाहूच्या पक्षातील बाळाजी विश्वनाथ यांनी ताराराणीच्या पक्षातील उदाजी चव्हाण,चंद्रसेन जाधव, कान्होजी आंग्रे आदि सेनानींना शाहूच्या बाजूला वळवून घेतले. त्यामुळे शाहूचा पक्ष बळकट झाला. शाहूंनी साताऱ्या ला गादीची स्थापना केली आणि महाराणी ताराबाईंनी साताऱ्याहून माघार घेऊन, कोल्हापूर येथे वेगळी गादी स्थापन केली. १७१४ साली राजमहालात झालेल्या घडामोडींनंतर शिवाजीला पदच्युत करून राजे संभाजी ह्या राजारामाच्या दुसऱ्या मुलाला छत्रपती म्हणून नेमले. सरतेशेवटी वारणेला झालेल्या दिलजमाईनुसार शाहूराजांनी कोल्हापूरच्या गादीला संमती दिली.
मराठी साम्राज्यात सातारा व कोल्हापूर अशा दोन स्वतंत्र गाद्या निर्माण झाल्या. १७१४ साली कोल्हापूरच्या राजमहालात झालेल्या घडामोडींनंतर राजाराम यांची दुसरी पत्नी राजसबाई यांनी आपला मुलगा दुसरा संभाजी यांस कोल्हापूरच्या गादीवर बसवून ताराराणी व तिचा पुत्र दुसरा शिवाजी यांस बंदी बनवून कैद केले. या कैदेमध्येच ताराराणीच्या पुत्राचे निधन झाले.
पुढे शाहूच्या मध्यस्थीने ताराराणीची कैदेतून सुटका झाली.त्यानंतर ताराराणी सातारा येथे राहावयास गेल्या. शाहूंना पुत्र नसल्यामुळे त्यांनी ताराबाईंचा नातू रामराजा यांस दत्तक घेतले. ताराराणींचे निधन ९ डिसेंबर १७६१ रोजी झाले.
कवी गोविंद यांनी सेनानी महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन पुढीप्रमाणे केले आहे.
दिल्ली झाली दीनवाणी। दिल्लीशाचे गेले पाणी। ताराबाई रामराणी। भद्रकाली कोपली।। रामराणी भद्रकाली। रणरंगी क्रुद्ध झाली। प्रलयाची वेळ आली। मुगल हो सांभाळ।।
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
December 10, 2021
हिंदी चित्रपट संगीतकारांचा विचार करताना, बरेचसे संगीतकार हिंदी चित्रपटांपुरते किंवा हिंदी भाषिक गीतांपुरते आपले अस्तित्व ठेवतात. यात अगदी इतर भाषिक संगीतकार जसे बंगाली, मराठी, पंजाबी दक्षिण भारतीय संगीतकार (जे प्रामुख्याने हिंदी चित्रपटांसाठीच स्वररचना करीत होते) यांनी आपली कारकीर्द हिंदी चित्रपटाभोवतीच साकार केली. अर्थात हे त्यांची मर्यादा असे म्हणता येणार नाही पण त्यांनी हिंदी चित्रपट हेच आपले ध्येय ठेवले. या मताला सणसणीत अपवाद म्हणून वसंत देसाई यांचे नाव अवश्यमेव घ्यावेच लागेल.
कोकणपट्टीतील सावंतवाडी जवळील सोनवड गावी जन्म. हा तपशील जरा महत्वाचा म्हणायला लागेल कारण हा परिसर धर्म आणि लोकसंगीताने गाजणारा आहे. याचा प्रभाव आणि परिणाम वसंतदेसायांवर नक्कीच झाला असणार. त्यांच्या नंतरच्या कारकिर्दीचा बारकाईने आढावा घेतला तर वरील मताला पुष्टी मिळते.
संगीतात लहानपणापासून अतोनात रस, याची परिणीती, उस्ताद इनायत खान आणि डागर बंधू, यांच्याकडून शास्त्रोक्त संगीताची तालीम घेतली. वसंत देसायांच्या स्वररचनेवर रागसंगीताचा फार प्रभाव आहे, याचे मूळ इथे सापडू शकते. पुढे तरुण वयात प्रभात कंपनीत, गोविंदराव टेबे यांच्या हातखिळी सहाय्यक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि प्रभात कंपनीत स्थिरावले. इथे त्यांना व्ही. शांताराम भेटले आणि नंतर जेंव्हा व्ही. शांतारामांनी प्रभातपासून वेगळे व्हायचा निर्णय घेतला तेंव्हा वसंत देसाई यांना तिथे भरपूर संधी मिळाल्या. या दोघांना प्रभातचा वारसा मिळाला होता, हे मुद्दामून ध्यानात ठेवावे लागेल. समान विचार आणि ध्येये यांचा परिणाम दोघांच्याही कार्यात दिसला. राजकमल बरोबर त्यांनी दीर्घकाळ काम केले.
वास्तववादी चित्रपटनिर्मितीत ज्याचा उद्भव होतो त्या संगीतावरच भर असल्याकारणाने विविध आणि वास्तव ध्वनी-उगम वापरण्यावर देसाई यांचा कटाक्ष होता. उदाहरणार्थ, " डॉ आँखे बारा हाथ" या चित्रपटातील "सैय्या झुठो का बडा सरताज निकला" या गाण्यात "रावणहथ्था" या लोकवाद्याचा समर्पक उपयोग!! तसेच याच चित्रपटातील "ऐ मालिक तेरे बंदे हम" या गाण्यात योजलेला लयबंध वाऱ्याने उघडझाप करणाऱ्या खिडकीने पुरवला जातो.
वसंत देसाईंच्या रचनांत थोडाफार नाट्यगीतांचा गंध राहिलापण हे थोडे अपेक्षित असेच म्हणावे लागेल. याशिवाय असे जाणवते, पारंपरिक सांगीत चलने आणि चाली यांच्या अंगभूत सांगीत आकर्षणशक्तीवर विश्वास असल्या कारणाने त्या जशाच्या तशा व परिणामकारकतेने वापरण्यात त्यांनी मागेपुढे पहिले नाही. याचाही संबंध मराठी नाट्यसंगीताशी असलेल्या त्यांच्या जवळच्या नात्याचा असावा. हिंदुस्थानी कलासंगीताचा आपण यथातथ्य वापर करतो असा मराठी नाट्यसंगीतपरंपरेचा दावा बऱ्याच अंशी सार्थ असतो, हा दृष्टिकोन इथे महत्वाचा आहे. या परंपरेचा आणि देसाई यांचाही कलासंगीतास पातळ करून वापरण्यावर भरवसा नव्हता. उदाहरणार्थ "दिल का खिलौना हाये टूट गया" (भैरवी), "बोल रे पपीहरा" ही गाणी ऐकावीत. तसेच "गुड्डी" या चित्रपटातील गाणे - हमको मन की शक्ती देना - या प्रार्थना गीताला केदार या शांत-गंभीर रागाचा आधार आहे पण रागविस्ताराची अपेक्षा निर्माण होऊ नये अशी खबरदारी चालीच्या चलनातून घेतली आहे. या उलट "बोल रे पपीहरा" ही शास्त्रोक्त चीज त्रितालाऐवजी केहेरवासारख्या तालात बांधून जरा हलकी फुलकी केली आहे. याचाच वेगळा अर्थ असा घेता येतो, परंपरेत राहून प्रयोग करण्याकडे देसायांचा कल होता.
"झनक झनक पायल बाजे" या चित्रपटातील "नैन सो नैन" या गाण्यासाठी "मालगुंजी" रागाचा आधार घेतला आहे आणि हा राग प्रेम-प्रणय इत्यादींसाठी वारंवार वापरलेल्या बागेश्रीपासून नाजूक अंतर राखून असतो म्हणजे तास ठेवावा लागतो. याच चित्रपटातील, भारताच्या अनेक प्रांतांत प्रचलित "बारमासा" या पारंपरिक लोकगीतप्रकारच्या धर्तीवर त्यांनी ऋतूवर्णनपर पद्यें योजली आहेत. या रचनांना गीतांचे स्वरूप न देता केवळ चाली ठेवण्यात देसाई यांनी परंपरेत राहून थोडा बदल करण्याच्या रचनापद्धतीचा अवलंब केला आहे. यामुळे त्यांच्यावर काही बंधने आली हे खरे, पण त्याचबरोबर तयार चाली व त्यासाठी सज्ज ऐकणारेही निश्चित झाले. "जो तुम तोडो पिया" किंवा " ऐ मेरे दिल बता" या रचनासुद्धा ठरीव दृश्यांसाठी साचेबंद संगीत, वसंत देसाई कसे वापरीत असत, याची कल्पना येते,
आणखी एका बाबीकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. व्ही. शांतारामांसाठी काम करताना केलेल्या रचना नाट्यप्रभावित वास्तववादाला धरून असत पण इतर चित्रपटांसाठी त्यांचे धोरण वेगळे रहात असे. आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांनी दिलेले "मेघा बरसने लगा है आज की रात" - शक चित्रपटातील गाणे अधिक वेधक उदाहरण म्हणून मांडता येईल. राजकमलसाठी केलेल्या संगीतरचनांत न आढळणारे विशेष अशा संगीतरचनांत आढळतात याचा वेगळा अर्थ, त्यांच्या सर्जनशीलतेस व्यापक रूप होते.
वसंत देसायांच्या पुढील सांगीतिक रचनांचा आराखडा अत्यंत व्यामिश्र तसेच परंपरेत राहून प्रयोग करणारा आणि नंतरच्या काळात आधुनिक वाद्यांच्या सहाय्याने अधिक गुंतागुंतीचा होता, असे विधान ठामपणे करता येते. अशी प्रतिभा लाभलेला संगीतकार विरळाच असतो. एका बाजूने हिंदी चित्रपट, दुसरीकडे मराठी चित्रपट आणि तिसरीकडे मराठी रंगभूमीवरील कामगिरी - इतका व्यापक पट एकाच कारकिर्दीत समर्थपणे हाताळणे, हीच खरी वसंत देसायांची सर्जनशीलता म्हणायला लागेल.
August 29, 2018
विठ्ठलराव गाडगीळ स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्री नरहर विष्णू उर्फ काकासाहेब गाडगीळ
यांचे चिरंजीव. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९२८ रोजी झाला. मराठी राजकारणी आणि काँग्रेसपक्षाचे सक्रीय कार्यकर्ते आणि राज्यसभा व लोकसभेचे खासदार आणि सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील होते.
विठ्ठलराव गाडगीळ हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी होते. ते संसदीय काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी, १९७१ आणि १९७६ मध्ये राज्यसभा सदस्य होते. विठ्ठलराव गाडगीळ हे १९७५ ते १९७७ या काळात इंदीरा गांधी यांच्या मंत्रीमंडळात संरक्षण उत्पादन मंत्री राहिले होते, राजीव गांधींच्या कारकिर्दीत "माहीती आणि नभोवाणी" खात्याचे मंत्री होते. त्यांच्या काळात मुंबई दूरदर्शनचे दुसरे चॅनल चालू झाले होते.
विठ्ठलराव गाडगीळ यांनी विवीध वृत्तपत्रातून वेळोवेळी लेखन केले ते "संसदमार्ग - लोकशाहीचा राजमार्ग" (लेखक: विठ्ठलराव गाडगीळ, प्रकाशकः प्रेस्टीज प्रकाशन) या ग्रंथात संकलीत झाले.
ग.प्र. प्रधान यांच्या मतानुसार "लोकशाहीच्या राजमार्गावरील विवीध संघर्षांचे,घटनांचे घटनांमागील विचार प्रवाहांचे वर्णन विवेचन आणि विश्लेषण विट्ठलराव गाडगिळांच्या लेखनातून झाले असून , खासदार आणि मंत्र्यांच्या आधीकार कक्षा आणि मर्यादांचे पैलू गाडगीळांच्या लेखनात येतात परंतु इंदिरा गांधींची कार्यपद्धती आणि आणीबाणी विषयी लेखन करताना ग.प्र. प्रधानांच्या मतानुसार विट्ठालराव गाडगीळांची लेखणी अडखळत असे.
विठ्ठलराव गाडगीळ यांचे ६ फेब्रुवारी २००१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 25, 2019
“निरोगी माणसात निर्माण झालेल्या लक्षणांप्रमाणेच लक्षणे असलेला रोगी आसल्यास ते औषध ती लक्षणे दूर करतं” असा सिद्धांत त्यांनी या अभ्यासाअंती मांडला आणि हा “सम लक्षण चिकित्सा ” होमिओपॅथीचा मूलभूत सिद्धांत ठरला. १७९६ मध्ये हानिमान यांनी या विषयांची माहिती प्रथम ‘हॉफलॅंड जर्नल’ मध्ये लिहिली . त्यानंतरच्या काळात त्यांनी स्वतःवर, मित्रांवर, कुटुंबीयांवर ९० औषधांचं सिद्धीकरण केलं. त्याची क्रमवार माहिती ” होमिओपॅथिक मटेरिया मेडिका ” या नावाच्या पुस्तकात संकलित केली .याच पुस्तकाचे पुढे १८११ ते १८२१ या काळात सहा भाग निघाले .
April 12, 2022
ठुमरी, दादरा व गझल गायिका नैनादेवी यांनी आपल्या गाण्याची तालीम गिरीजा शंकर चक्रवर्ती यांच्या कडून घेतली. नंतर त्यांनी रामपूर -सहसवास घराण्याचे उस्ताद मुश्ताक हुसेन खान आणि बनारस घराण्याच्या रसूलन बाई यांच्या कडे गाण्याचे शिक्षण घेतले.
November 1, 2019
अमीन सायानी यांचा जन्म २१ डिसेंबर १९३२ रोजी झाला.
‘बहनों और भाइयो'
गेली कित्येक वर्ष मा.अमीन सयानी हे पडद्यामागे राहूनच श्रोत्यांचं मनोरंजन करीत आहेत.
एके काळी याच अमीन सयानीनी ‘आवाजकी दुनियाके दोस्तो’ अशी स्नेहपूर्ण साद घालून रसिकांच्या मनावर आणि हृदयावर ‘बिनाका गीतमाला’ या प्रचंड लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक वर्ष राज्य गाजवलं होत. तोच लाघवी, आर्जवी आवाज अजूनही मंत्रमुग्ध करतो.
अमीन सायानी यांचा पूर्ण परिवार स्वातंत्र्यसंग्रामाशी जोडला गेला होता. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल आणि मौलाना आझाद हे चार प्रमुख नेते त्यांच्या परिवाराला व्यक्तिश: ओळखत होते त्यांच्या वडिलांचे काका रहेमतुला सायानी साहब गांधीजींचे निकटचे स्नेही होते. पुढे ते इंडियन नॅशनल काँग्रेसचे सभापती झाले. मा.अमीन सायानी यांची आई गांधीजींची शिष्या होती. स्वतंत्र भारताला जो झेंडा भेटरूपाने देण्यात आला होता, त्या झेंडय़ावर स्वातंत्र्य संग्रामात सहभागी शंभर महिलांच्या सहय़ा होत्या. त्यात मा.अमीन सायानी यांच्या आईची सही होती.
अमीन सायानी यांनी सिनेसंगीताचं सुवर्णयुग रेडिओ सिलोनच्या माईकसमोर बसून अनुभवलं. श्यामसुंदर, खेमचंद प्रकाश, हुस्नलाल भगतराम यांचा जमाना मागे सरला होता. गुलाम हैदर, नूरजहा ही मंडळी पाकिस्तानात निघून गेली होती. नौशाद, सी. रामचंद्र टॉपला येत होते. मा.अमीन सायानी लोकप्रिय गाण्यांचं गणित उलगडून सांगताना म्हणतात.
‘‘त्या वेळची परिस्थिती फार वेगळी नव्हती. त्या वेळेस तर गाणी ऐकण्याचे सोर्सेसही खूप कमी होते. गाणी ऐकायची तर सिनेमाला जाऊन बसायचं नाही तर रेडिओ सिलोन ऐकायचं, कारण केंद्रीय माहिती व नभोवाणी खात्याचे मंत्री डॉक्टर बी. व्ही. केसकर यांनी ऑल इंडिया रेडिओवर सिनेसंगीत वाजवण्यास बंदी घातली होती. त्याचाच फायदा सिलोनला मिळाला. तेव्हा गाणी ऐकण्याकरिता लोक सिनेमाला गेलेच नाहीत तर चांगली गाणी नाहीशी होत. कधी तरी उलटाच प्रकार घडत असे. फिल्मीस्तानचा ‘नागिन’ रिलीज झाला त्याआधी त्याची गाणी बाहेर आली नव्हती; पण गाणी वाजायला सुरुवात झाली आणि लोक ‘नागिन’ पहायला झुंडीने थिएटरवर जाऊ लागले. धीरे धीरे फिल्म हिट हो गयी और गाने भी धूम मचा गये.’’
हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासात बिनाका गीतमाला ‘माइलस्टोन’च्या रूपाने उभी आहे आणि अमीन सायानी त्याचे अविभाज्य घटक. ३ डिसेंबर १९५२ ला बिनाका गीतमालाची सुरुवात झाली आणि चित्रपटसंगीताची थक्क करून सोडणारी अफाट लोकप्रियता जगासमोर आली. मा.अमीनभाई सांगतात. ‘‘त्या वेळेस ‘हिट परेड’ नावाचा इंग्लिश कार्यक्रम रेडिओ सिलोनवर होत असे. सहज एक कल्पना निघाली, हाच कार्यक्रम हिंदीतून पेश केला तर! एक प्रयोग म्हणून गीतमाला सुरू झाली. सात-आठ गाणी वाजवायची त्यांची क्रमवारी बदलून, लोकप्रियतेनुसार त्यांना नंबर देऊन ऐकणाऱ्यांनी जॅकपॉट जिंकायचा. त्या वेळेस टपाल, पत्रं एवढं एकच माध्यम होतं. रेडिओ सिलोनच्या अधिकाऱ्यांनी चाळीस ते पन्नास पत्रांची अपेक्षा ठेवत यंत्रणा सज्ज केली होती. प्रत्यक्षात नऊ हजार पत्रं आली. हा धक्का जोरदार होता आणि पहिलं वर्ष संपता संपता पत्रांचा आकडा (प्रत्येक आठवडय़ाला अर्थात) साठ हजारांपर्यंत पोहोचला.’’
बिनाका गीतमालाचा इतिहास मा.अमीन सायानी यांना पाठ आहे. शंकर जयकिशन, नौशादपासून मदनमोहनपर्यंत आणि सचिनदेव बर्मनपासून राहुलदेव बर्मनपर्यंत त्यांच्यापाशी आठवणींचा खजिना आहे. याच संगीतकारांच्या अमर्याद कर्तृत्वाच्या छायेत मा.अमीन सायानी यांची पर्सनॅलिटी फुलली.
‘जी-हाँ बहनो और भाइयो’.. म्हणत सुरुवात करणारी त्यांनी शैली निर्माण केली. आज वयाच्या ८४ व्या वर्षी अमीनभाई नव्या समालोचक-निवेदकांना कोणता सल्ला देतात?
‘‘प्राणायाम. सर्वाधिक बेस्ट. प्राणायाम से पूरे फेफडे साफ हो जाते है. आवाजात ताकद येते. स्टॅमिना वाढतो. ते म्हणतात मला मेहंदी हसननने सांगितलेला किस्सा आठवतो. त्यांनी गायक म्हणून करिअर करण्याचा निर्णय त्यांच्या वडिलांना, काकांना सांगितला तेव्हा दोघे हिरीरीने पुढे आले आणि त्यांनी मेहंदी हसनना दररोज हजार दंड-बैठका काढण्यास भाग पाडलं. हजारो मैल धावण्याचा सराव करण्याची सक्ती केली. मेहंदी हसनच्या मनावर एकच गोष्ट त्या दोघांनी बिंबवली- ‘जब तुम्हारा शरीर मजबूत नही तो तुम गा नही पावोगे.’ मी तर म्हणतो, कोणत्याही व्यवसायात शरीर का स्वस्थ होना जरूरी है बोलने मे तो और भी अच्छा है. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट, सिगारेट कधी पिऊ नका. मी सुरुवातीला चिक्कार सिगरेट पीत असे, अगदी ‘चेन स्मोकर’च्या पठडीत. प्रचंड प्रॉब्लेम्स निर्माण होत. ऐन वेळेला सर्दी-खोकला. त्याचा परिणाम आजही माझ्या शरीरावर दिसतो. हालांकी मै बरसो पहेले सिगरेट छोड चूका हू, पण दुष्परिणाम व्हायचे ते झालेच. अनाऊन्सर, गायक किंवा नट यांनी कधीही सिगारेटच्या वाटेला जाता कामा नये. उससे ज्यादा कोई खातरनाक चिज नही है.’’
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
December 23, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti