(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • मोह, लोभ, क्रोध, भय ते मोक्ष

    जेव्हा आपण कुल्फी खात असतो तेव्हा आपण एक हात खाली धरतो, त्याला गीतेत "मोह" म्हंटले आहे.

    जेव्हा कुल्फी खाऊन झाल्यावर कुल्फीची दांडी चाटतो, त्याला गीतेत "लोभ" म्हंटले आहे.

    कुल्फीची दांडी फेकून झाल्यावर, समोरच्याची कुल्फी अजून कशी संपली नाही ते पाहतो त्याला गीतेत " इर्षा" म्हंटले आहे.

    काही वेळेस कुल्फी संपण्याच्या अधिक दांडी हातात राहून कॅल्फी गाळून जमीनी वर पडते त्याला गीतेत " क्रोध" म्हंटले आहे.

    झोप पूर्ण होऊन सुद्धा जे काही लोक अंथरुणात लोळत राहतात त्याला गीतेत"आळस"असे म्हंटले आहे.

    हॉटेल मध्ये भोजन झाल्यावर, ओंजळ भर बडीशोप व साखर खातो त्याला गीते मध्ये " भिकारी" पणाचे लक्षण म्हंटले आहे.

    बाहेर जाताना लावलेले कुलूप ओढून पाहाणे ह्याला गीतेत "भय" म्हंटले आहे.

    आपण व्हाट्सअप्प वर मेसेज पाठवल्या वर दोन निळ्या टीका दिसतात की नाही ते पाहतो त्याला गीतेत "उतावळेपण" म्हंटले आहे.

    पाणीपुरी खाऊन झाल्यावर कधी साधी पुरी, कधी शेवपुरी, कधी गोड पुरी दे रे " भय्या" असे म्हणतो त्याला गीतेत "शोषण " म्हंटले आहे.

    फ्रुटी पिऊन झाल्या नंतर स्ट्रॉने शेवटच्या थेंबा पर्यंत फ्रुटी ओढत राहणे ह्याला गीतेत " मृगतृष्णा"म्हंटले आहे.

    चणे विकत घेता घेता थोडे चणे किंवा शेंगदाणे हातात घेऊन खाणे ह्याला गीतेत " अक्षम्य अपराध " असे म्हंटले आहे.

    जेव्हा पंगतीत जेवताना मठ्ठा वाढणारा येत आहे हे पाहून पानांतील मठ्ठा गटागट पिऊन घेतो त्याला गीतेत "छळवाद" असे म्हंटले आहे.

    ही पोस्ट वाचून झाल्यावर गालातल्या गालात हसू येणे म्हणजे " मोक्ष"

  • स्मरणशक्तीचे सर्वोत्तम उदाहरण : माझी आजी

    माझी आजी आनंदी रामकृष्ण जोशी निरक्षर होती तथापि, श्रीसत्यवान-सावित्रीचे वटपौर्णिमेचे महत्व सांगणाऱ्या साडेतीनशे ओव्या तिला मुखोद्गत होत्या ! आजीने मौखिक पद्धतीने शिक्षण घेतले होते ! तिच्या अफाट स्मरणशक्तीचं मला नेहेमीच कौतुक वाटत आलंय !

    माझी आजी म्हणजे माहेरची "द्वारका" ही जुन्नरच्या रुख्मिणी पंढरीनाथ हरकरे ह्यांची सुकन्या ! विवाहानंतर तिचे नाव सौ. आनंदी रामकृष्ण जोशी असे झाले, तरी "द्वारकाकाकू, द्वारकामावाशी" ह्याच नावाने सर्वत्र सुपरिचित होती. एकोणीसशे दहा सालचा तिचा जन्म ! त्या काळामध्ये लवकर विवाह व्हायचे. लाक्षणिक शालेय शिक्षण जरी नसले, तरी ती आदर्श गृहपत्नी होती.

    शिवनेरी, लेण्याद्री जिथे आहे ते जुन्नर हे माझे आजोळ ! तेथील वरल्या आळीमधील श्री मुरलीधराचे मंदिरात ज्येष्ठी पौर्णिमेला तीन दिवसांचा हा उत्सव असायचा . माझी आजी तीन दिवस उपवास करायची. त्यावेळी वट सावित्रीच्या ह्या ३५० ओव्या, तीन भागामध्ये अर्थात तीन दिवसात, ती म्हणायची आणि ते ऐकण्यासाठी खूप गर्दी व्हायची. आजीचा आवाज गोड होता, श्लाघ्य होता, आजही तिचा तो मधाळ स्वर कानामध्ये घुमतोय !

    नंतर काही वर्षे, पुण्यातील सदाशिव पेठेतील श्री खुन्यामुरलीधर मंदिरात तिने वटसावित्रीच्या ओव्या म्हणल्या होत्या. दिनांक १०, ११, १२ जून १९६८ ह्या तीन दिवसामध्ये माझ्या आजीने, तीन भागातील ह्या वट सावित्रीच्या ओव्या, पुण्यातील शनिवार पेठेतील गोळे राम मंदिरामध्ये सादर केल्या होत्या. त्याचे वार्तांकन आणि छायाचित्र, पुण्याच्या सकाळच्या सि. पु. थत्ते ह्यांनी केले होते, १३ जून १९६८ रोजी "सकाळ"मध्ये ते प्रसिद्ध झाले होते ! फोटोमध्ये आजीच्या डावीकडे, ओव्या लिहिलेली वही उघडून बसलीय ती माझी आई, उषा पंडित चिंचोरे !

    जुन्नरच्या सराई पेठेमध्ये राहणाऱ्या चंद्रभागा घाटपांडे पारुंडेकर मावशी ह्या तिच्या नातेवाईक, त्यांनी त्यांच्या पूर्वजांकडून मौखिक पद्धतीने "वटसावित्री"च्या ओव्या शिकल्या होत्या. त्या पारुंडेकर मावशींनी माझ्या आजीची जिद्द हेरून, तिला ह्या ओव्या शिकविल्या. माझी "आनंदीआजी घरातील सगळी कामे झाल्यावर, दररोज दुपारच्यावेळी पारुंडेकर मावशींच्या घरी जायची. त्या माझ्या आनंदी आजीला रोज एकेक ओवी म्हणून दाखवायच्या. ते ऐकून, माझी आजी ती ओवी घोकून घोकून पाठ करायची. विशेष म्हणजे, ओव्या शिकवत असतांना, पारुंडेकर मावशी माझ्या आनंदी आजीच्या पुढ्यात, त्यांचे निवडणं-टिपणं ठेवायच्या. आजी एकीकडे ते काम करता-करता, "परळी-आडणी या विस्तारली ताटं" अश्या ओव्या पाठ करायची. ओवी पाठ झाल्यावर, माझी आजी आपल्या स्वतःच्या घरी यायची की संध्याकाळची कामं - तेलवात, कंदील तयार ठेवणे, अशी कामे करायची. दुसया दिवशी दुपारचेवेळी, आजी मावशींच्या घरी गेल्यावर, आधल्या दिवसाची ओवी आधी म्हणून दाखवायची मग पुढची ओवी शिकायची, अश्या मौखिक पद्धतीने "वट सावित्रीच्या साडे तीनशे ओव्या" तोंडपाठ व्हायला तिला सहा महिने लागले !

    आनंदी आजीची अफाट स्मरणशक्ती शेवटपर्यत तल्लख होती. आज मनात विचार येतो, आजकाल साक्षर मुलांना सर्व सुख-सुविधा उपलभ्द असूनसुद्धा साधी तीन कडव्यांची शाळेच्या पुस्तकातील कविता पाठ नसते.

    "आनंदी"आजी नाव सार्थक करणारी होती, माझे आजोळ जणू "द्वारका" नगरी होती ! माझ्या आजीची गणपतीवर भारी श्रद्धा होती. गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय तिच्या मुखाखाली कधीही घास उतरला नव्हता. "मोरया मोरया" असा अविरत जप करणा-या माझ्या आजीला देवाज्ञा झाली, ती सुद्धा भाद्रपद चतुर्थीला १५ सप्टेंबर १९७२ रोजी आणि तेही अहेवपणी, जणू तिने घेतलेल्या, सत्यवान सावित्रीच्या वश्याची सांगता झाली !

    -- उपेंद्र चिंचोरे
    19 june 16

  • कनवाळू समाजसेवक

    बंगालमधील थोर समाजसेवक ईश्वरचंद्र विद्यासागर हे त्यांच्या कनवाळूपणाबद्दल खूपच प्रसिद्ध होते. त्यांचा हा कनवाळू स्वभाव लहानपणापासूनच होता.

    ईश्वरचंद्र विद्यासागर आपल्या शाळेतील गोरगरीब मुलांना नेहमीच मदत करीत. एकदा हिवाळ्यात अतिशय कडक थंडी पडली होती म्हणून ईश्वरचंद्रांच्या आईने खास बाजारात जाऊन उबदार लोकर आणली व त्या लोकरीचे ईश्वरचंद्रांसाठी स्वेटर विणल व तो स्वेटर घालून ईश्वरचंद्रांना शाळेत पाठविले. सकाळच्या वेळी रस्त्याने जाणाऱ्या ईश्वरचंद्रांना रस्त्याच्या कडेला एक भिकारीण आपल्या लहान मुलासमवेत बसलेली दिसली. तिच्या मुलाच्या अंगात फाटके कपडे होते व थंडी सहन न होऊन ते रडत होते. ईश्वरचंद्रांना ते पाहून त्या मुलाची दया आली व त्यांनी मागचापुढचा कसलाही विचार न करता स्वत:च्या अंगातील नवा कोरा स्वेटर काढून त्या भिकारणीला दिला व त्या मुलाला घालायला सांगितला.

    तो उबदार स्वेटर मुलाच्या अंगात घातल्यानंतर थंडी पळत्यामुळे त्या मुलाचे रडणे थांबले. ते हसू लागले. ते पाहून त्या समाधानाने ईश्वरचंद्र शाळेत गेले. शाळा सुटल्यानंतर ते जेव्हा घरी परतले तेव्हा आईने छोट्या ईश्वरचंद्राला त्याबाबत विचारले; तेव्हा त्याने तो स्वेटर भिकारणीच्या मुलाला दिल्याचे सांगितले. आर्हने त्याच्यावर रागावल्याचे नाटक केले व ती
    म्हणाली, “या गोष्टीबद्दल मी तुला आता चांगला मार देणार आहे. त्यामुळे तुला नक्कीच वेदना होतील.” त्यावर शांतपणे ईश्वरचंद्र म्हणाले, “मी तुझ्या दृष्टीने अपराध केला आहे खरा; त्याबद्दल मला तू जरूर मार. मात्र या मारामुळे होणाऱ्या वेदना मला ते मूल थंडीत कुडकुडताना पाहिल्यामुळे झालेल्या वेदनांपेक्षा नक्कीच कमी असतील” छोट्या ईश्वरचंद्रांचा तो कनवाळूपणा पाहून आईने त्याला मार तर दिला नाहीच; उलट जवळ घेऊन त्याचे कौतुक केले.

  • शैलेंद्र

    आज शैलेंद्रला जाऊन पन्नास वर्षं झाली. त्याच्या जीवनाच्या शोकांतिकेवर आतापर्यंत अनेकदा लिहिलं गेलयं. त्याचा शोकात्म शेवट आठवला की मन हमखास खिन्न होतं. म्हणून ठरवलं की आज त्याच्या फक्त आनंददायी आठवणींची उजळणी करायची आणि मस्त गाणी ऐकायची !! आणि मग जाणवलं की एक tragic end सोडला तर त्याचा सगळा कलाप्रवास म्हणजे एक "सुहाना सफर"* आहे.
    मग मी गेलो या सफरीवर ....
    मधुमती पासूनच सुरुवात केली :

    मधुमतीमधलं, टूटे हुए ख्वाबोंने हमको ये सिखाया है हे काळजाला हात घालणारं गाणं त्यानं अवघ्या दहा मिनीटांत लिहिलं होतं आणि नंतर ते मधुमतीचं एक हायलाईटच बनून गेलं .

    त्याच्या बंगल्याशेजारी हेमंतकुमारला चित्रपट दुनियेत सगळेजण, ''राजा 'साली'वाहन" असं म्हणायचे. कारण त्याच्या चार अविवाहित मेव्हण्या ( हिंदीत : साल्या) काही दिवस त्याच्या बंगल्यावर राहत असत. एके रात्री शैलेंद्र स्वतःच्या बंगल्याच्या गेटपाशी अडखळून पडला. त्याने मद्यपान केले होते . तो पडलेला पाहताच शेजारी गच्चीत उभ्या असलेल्या हेमंतकुमारच्या मेव्हण्या जोरात हसल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी शैलेंद्रनं गाणं लिहिलं :

    जंगलमें मोर नाचा किसीने न देखा
    हम जो थोडीसी पीके जरा झूमें...

    रंगोली चित्रपट चालू असताना त्याचं आणि शंकर-जयकिशन यांचं थोडं भांडण झालं. हे तात्पुरतं भांडण रसिकांसाठी बरंच फायदेशीर ठरलं, कारण शैलेंद्र लिहिता झाला :
    छोटीसी ये दुनिया पहचाने रास्ते है, तुम कभी तो मिलोगे तो पूछेंगे हाल .

    बूट पॉलिशच्या एका सिच्युएशनवर, शैलेंद्र विचार करत, सोफ्यावर बसला होता. घरात काही पाहुणे आले होते.
    तेवढ्यात त्याचा दोन वर्षांचा मुलगा, अर्धवट खाल्लेला लाडू, इवल्याश्या मुठीत धरून त्याच्या समोर आला आणि पाहुण्यांना पाहून सोफ्याच्या मागे लपला. तेव्हा पाहुण्यांनी त्याला विचारलं , 'बाळा, तुझ्या मुठीत काय आहे ?'
    हे ऐकताच शैलेंद्रच्या लेखणीतून शब्द प्रकटले,

    "नन्हें मुन्ने बच्चे तेरी मुठ्ठीमें क्या है
    मुठ्ठीमें है तकदीर हमारी
    हमने किस्मतको बसमें किया है"

    कधी नव्हे तो एकदा 'राज कपूर' बरोबर वादविवाद झाला . शैलेंद्रनं लगेच आव्हान दिलं,
    " हम भी है तुम भी हो दोनो है आमने सामने*"
    ( नंतरची ओळ मात्र चित्रपटाच्या प्रसंगाला साजेशी) .

    आवारा ची कथा ऐकायला 'राज' त्याला, के ए अब्बास यांच्याकडे घेऊन गेला . अब्बास म्हणजे त्या काळातलं बडं प्रस्थं ! शैलेंद्र अगदीच नवखा ! अब्बासनी शैलेंद्रकडे बघितलं सुद्धा नाही. सलग दोन तास ते कथा 'सुनवत' राहिले. शेवटी राजने शैलेंद्रला विचारलं "क्यों कवीराज, कुछ समझमें आया?"
    शैलेंद्र खाडकन म्हणाला ,
    "गर्दीशमें था, आसमान का तारा था, आवारा था"
    त्या दोघांनी चमकून शैलेंद्रकडे पाहिलं . या शब्दांनी फक्त टायटल साँग तयार झालं असं नाही तर चित्रपटाच्या मध्यवर्ती व्यक्तिरेखेचं स्वरूपही ठरुन गेलं.
    पुढे हे गाणं रशियात सुद्धा इतकं लोकप्रिय झालं की तिथल्या 'कँसर वॉर्ड' या सुप्रसिद्ध कादंबरीदेखील या गाण्याचा उल्लेख आला.

    " आवारा" नंतरच्या चित्रपटांत, राज कपूरच्या व्यक्तिरेखेचं वर्णन करणारी बहुतेक सगळी गाणी शैलेंद्रनं लिहीली : मेरा जुता है जापानी, 'होटोंपे सच्चाई रहती है', ' मेरा नाम राजू घराना अनाम' इ. मुकेश हा राज कपूरचा 'प्रकट' आवाज होता तर शैलेंद्र हा 'आतला' आवाज !

    एकदा शैलेंद्र आणि जयकिशन रस्त्यावर फिरत होते आणि समोरून एक अप्रतिम सौंदर्यवती येताना दिसली. 'ती पाहताच बाला कलीजा खलास झाला' अशी अवस्था जयकिशन यांची झाली. ते तिच्याकडे वळून वळून पाहत असताना, शैलेंद्र मागून उद्गारला :
    'मुडमुडके न देख मुडमुडके

    शैलेंद्रच्या अशा 'सुखद स्मृतींनी' मनात दाटी केली. मग, "घायल मनका पागल पंछी उडनेको बेकरार' मधील असह्य वेदना कुठल्या कुठे उडून गेली . "शैलेंद्र" म्हटलं की मनावर दाटून येणारी काजळी विरून गेली.
    ताजंतवानं होऊन उठलो. "अनाडी"ची रेकॉर्ड काढली आणि लावली ,
    के मरके भी किसीको याद आयेंगे
    किसीकी आसूओंमें मुस्कुराएंगे
    कहेगा फूल हर कलीसें बार बार
    जीना इसीका नाम हैं

    धनंजय कुरणे , कोल्हापूर
    9325290079)
    14.12.2016

  • रडत राऊत बखर

    "शके १९७८ च्या माघ महिन्यात दख्खन प्रांतात धामधूम उडाली होती. उधोजी राजांच राज्य खालसा करण्यासाठी आदिलशहा दहा लाखाची फौज घेऊन पुन्हा एकदा जातीने उतरला होता. आदिलशाही फौजेचं नेतृत्व देवा फडणविस नावाचा विदर्भातील ताज्या दमाचा सरदार करत होता.देवा फडणविस साध्या शिपायापासुन बारगीर, हवालदार , मनसबदार अशा पायऱ्या चढत चढत सेनापती पदापर्यंत पोहचला होता तर उधोजी राजांना राज्य वंशपरंपरागत मिळालेलं होतं. फडणविसाच्या दिमतीला शेलार मामा, विनोदराउ तावडा, किरीट बहाद्दर सोमय्या आदी बिनीचे शिलेदार होते. उधोजींची सारी मदार बाळ आदित्यराजे आणि समुद्री वारे अंगावर झेलत मोठा झालेला आगरी नाखवा मिलिंद नार्वेकरावर होती. घोडदळ, पायदळ, तिरंदाज, गोलंदाज अशी दोन्ही बाजूने जय्यत तयारी झाली होती.

    नाशिकचा सुबेदार आणि उधोजींचा धाकटा भाऊ राजोजीने रसद आणि कुमक पाठवू का असा सांगावा घेऊन आपला पेशवा बाळाजी नांदगावकरनाथ राजधानी मातोश्री वर पाठवला पण उधोजी राजेंनी राजोजीसाठी "गर्दीस मेळल्यावीना तोंड देखिल दाखवू नकोस" असा उलट निरोप देऊन बाळाजीची बोळवण केली. पेशवा बाळाजी डोळ्यात अश्रु घेऊन राजगडावर परतला.

    ...............आणि एकदाची दोन्ही फौजांची गाठ साष्टीच्या बेटाजवळ पडली.एकच गर्दी झाली. गनिम चारी बाजुने हल्ला करू लागला पण उधोजी राजांनी स्वतः तोफेला बत्ती देऊन शत्रुला भाजुन काढुन बेजार केले. दक्षिण दिशेचा एक बुरुज लढवताना बाळ आदित्यच्या हल्ल्यात शेलार मामांचा धाकला बंधू ठार झाला हि खबर ऐकताच पिसाळलेल्या शेलारमामांनी ' तुमचा बाप इकडे मरुन पडला आहे आणि तुम्ही कुठे पळता' असं ओरडत उधोजींचा जवळचा सरदार राहुल शेवाळा याला जायबंदी करुन आपला बदला घेतला. अटीतटीची लढाई झाली.

    दुपार पर्यंत हाडा मांसाचा चिखल झाला.रक्ताचे ओघळ पार दर्यात जाऊन मिळाले. कोणीच मागे हटत न्हवते. पण संध्याकाळ पर्यंत चित्र पालटू लागले. शत्रूने आपल्या राखीव फौजा बाहेर काढल्या आणि मराठी फौजा शत्रुच्या संख्येपुढं धाप टाकू लागलं.किती मोती गळाले आणि किती माणकं गर्दीत मिळाली याची मोजदाद करणं कठीण होऊन बसलं. प्रत्यक्ष रणांगणावरील खबर घेऊन जासुद टाकोटाक मातोश्री वर पोहचले. खलबतखान्यात आपल्या अष्टप्रधान मंडळासह बसलेल्या उधोजींना खबर देताना जासुदांना देखिल अश्रू आवरत न्हवते.

    'राजं सध्या शिबंदी आणि रसद कमी आहे. गनिम अरबी घोडे आणि फिरंगी तोफांच्या जोरावर एकेक ठाणी काबीज करत चालला आहे. आपल्या जवळ हौसला आणि जिद्द भरपुर परंतु आत्ताच मराठी सैन्याजवळ खाण्यासाठी शिववड्याशिवाय काही उरले नाही, आदिलशाही फौजा ढोकळा फाफडा खाकरा खाऊन मस्तवाल झालं आहे. आपल्याला नुसत्या इरशिरीवर युद्ध जिंकता येणार नाहीच, पण अजून थोडा वेळ युद्ध चाललं तर आहे तेवढं राज्य सुद्धा हातातुन जाईल त्यामुळे आता आदिलशहा बरोबर सलाह करावा वेळ येईल तेव्हा आदिलशहाला बघुन घेऊ' असा पोक्त सल्ला उधोजींना अष्टप्रधान मंडळाकडून मिळाला.

    मोठ्या कष्टाने आणि दुःखी अंतकरणाने आई भवानीला साक्षी ठेऊन उधोजी राजांनी सल्ला मनावर घेतला कारण पुनवडी, वसई, वऱ्हाड, विदर्भ येथील सगळ्या किल्ल्यांना शत्रू गिळंकृत करून बसला होता. पुन्हा उभं रहायचं असेल तर आत्ता जगणं महत्वाचे होते." बचेंगे तो और लडेंगे" म्हणणारा दत्ताजी त्यांना आठवला आणि .................

    सालीना चाळीस हजार होन उत्पन्न असलेली साष्टीची बेटं उधोजी राजांना आणि खानदेश वऱ्हाड बारा मावळासह तीन लाख होनांचा प्रदेश आदिलशहाला या बोलीवर शके १९७८ साली तह यशस्वी पार पडला."

    रडत राऊत बखर

    तुषार दामगुडे
    ( खोटा इतिहासकार )

  • पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे!

    पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. खिशात भरपूर पैसा असल्यावर आपण आनंदी असण्याची काहीही शाश्वती नसते पण जवळ पुरेसा पैसा नसला की दुःख ग्यारंटीड असतं!! याची उप-गंमत म्हणजे ‘पुरेसा’ म्हणजे काय हे आयुष्यात कधीही समजत नाही… उप-उप-गंमत अशीये की पुरेसा म्हणजे किती हे ठरवलं आणि तेवढा मिळवलाच तरी तो ‘पुरत’ नाही आणि पुरेसाची व्याख्या पुन्हा बदलते!

    पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. आपल्याला आपल्या शिक्षण, लायकी आणि कष्टांच्या मानानी कमीच मिळतो आहे असं वाटत असतं. आपल्यापेक्षा कमी शिक्षण किंवा लायकी असलेल्या आणि नगण्य कष्ट करणाऱ्यांना खूप जास्त मिळतोय असं वाटत असतं. आपल्याला जो मिळतो तो टिकत नाही, इतरांकडे मात्र टिकतो असं वाटत असतं. आपल्याला बेसिक गरजांनाही पुरत नाही, इतरांकडे अफाट उधळपट्टी करायला असतो असं वाटत असतं. आणि हे असं म्हणजे असंच सगळ्या सगळ्यांनाच वाटत असतं! इतरांच्या तूलनेत आपला पैसा ही फार म्हणजे फार गंमतशीर गोष्ट आहे!!

    पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. तो एका दरवाज्यानं येतो आणि हजार खिडक्यांवाटे पसार होतो! आला की खूप छान, भारी, मस्त, बरं वगैरे वाटतं. पण तो नुसताच येऊन थांबल्यानं आणि घरात साचून राहिल्यानं त्यातून काही म्हणजे काही मिळत नाही. म्हणजे आपल्याकडे खूप पैसा आलाय हे भारी वाटलं तरी त्यानं पोटही भरत नाही आणि इतर सुखंही मिळत नाहीत. पोट भरायचं आणि इतर काही मिळवायचं तर त्याला अनंत खिडक्यांमधून बाहेरच जाऊ द्यावं लागतं. पैसा आपल्यामुळे मिळणारं सुख मोठं का खर्चल्यामुळे मिळणारं हे ठरवता येत नाही, कारण पैसा अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे!

    पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. ‘दैव देतं आणि कर्म नेतं’ म्हण पैशाला लागू होत नाही. पैसा कष्ट केल्यानं, म्हणजे ‘कर्मानं’च मिळतो. क्वचित कधी दैवामुळंही मिळू शकतो, लॉटरी वगैरे लागल्यावर, पण तो काही शाश्वत मार्ग नाही. रेग्युरल, नियमित वगैरे पैसा मिळवायचा तर अफाट कष्ट पडतात, ‘कर्म’ करावं लागतं. पण ‘कर्मानं’ मिळालेला पैसा ‘दैवा’मुळे एका क्षणात नाहीसा होऊ शकतो. चोरी म्हणू नका, टॅक्स म्हणू नका, आजारपणं म्हणू नका, अपघात म्हणू नका, भूकंप म्हणू नका… काय वाट्टेल ते ‘दैव’ किंवा योगायोग समोर उभे ठाकतात आणि कर्मानं कमावलेल्या पैशाचं क्षणार्धात होत्याचं नव्हतं होऊ शकतं… ‘कर्म कमावतं अन दैव हिसकावतं’ ही पैशाच्या बाबतीतली म्हण असायला हवी!!

    पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. दुसऱ्याकडून उधार घेतलेला पैसा कधीच लक्षात रहात नाही आणि दुसऱ्याला उधार दिलेला पैसा कधीच विसरला जात नाही!! जे उधारीचं तेच मदतीचं, तेच दान-धर्माचं, तेच खर्चाचं वगैरे. आपल्याला मिळालेलंही आपलंच आणि आपण दिलेलंही आपलंच हे फक्त पैशाच्या बाबतीत घडतं, कारण पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे!!

    पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. ज्याच्याकडे नाही त्याला कमवावासा वाटतो. ज्याच्याकडे आहे त्याला अफाट कमावावासा वाटतो आणि ज्याच्याकडे अफाट आहे त्यालाही अजून जास्त अफाट कमवावासा वाटतो. माझ्याकडे आहे तेवढा पुरेसा आहे, मला अजून जास्त पैसा नको असं कोणी म्हणजे कोणी म्हणत नाही.

    पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. ‘पैशापाशी पैसा जातो!’ जिथे ऑलरेडी खूप पैसा आहे तिथे अजून अजून पैसा जात रहातो. जिथे खूप कमी पैसा आहे तिथून पैसा जमेल तेवढ्या लवकर कल्टी मारत रहातो.

    पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. पैसा मिळवण्यासाठी आयुष्यभर आपण खपतो. मग एक दिवस आपण ‘खपल्यावर', आपण निघून जातो, पैसा इथेच रहातो!!

    पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे!

  • ओळख…

    रमेश विजयची वाट पाहात हॉटेलात एका टेबलावर बसलाय...वेटर जवळ येऊन मेनू कार्ड देतो विजय तो तसाच समोर ठेवत एक चहा आणायला सांगतो, चहा पिता - पिता रमेश समोर च्या टेबलावर बसलेल्या सुंदर तरुणीकडे पाहात असतो ती तरूणीही मधे - मधे चोरून त्याच्याकडे पाहात असते इतक्यात रमेश समोरून येताना दिसतो त्याला पाहून विजय जागेवर उटून उभा राहतो तो जवळ येताच त्याला प्रेमाने अलिंगन देतो आणि समोरच्या खुर्चीवर बसायला सांगतो....

    रमेशः वेटर ! ( वेटर जवळ येताच )

    विजयः दो प्लेट मेंदू वडा और उसके बाद दोन चहा ! ( वेटर निघून गेल्यावर...रमेशचा हात हातात घेत विजय ) किती वर्षांनी भेटतोय ना आपण ? अरे तुमच्या रूम एस. आर.ए. मध्ये गेल्या होत्या ना झाली का बिल्डींग ?

    रमेशः हो झाली आणि आम्ही शिफ्ट पण झालो एकदाचे चार वर्षे भाड्याच्या घरात राहून जीव नकोसा झाला होता. चार वर्षे कोणत्यातरी तुरुंगात शिक्षा भोगत होतो की काय असं वाटत होत मला.

    विजयः का रे ?

    रमेशः तुला माहीत आहे लहानपणापासून स्वतःच्या मालकीचा घरात हवं तसं, हवं तेंव्हा आणि हवे तेवढे पाय पसरून राहण्याची सवय त्यामुळे भाड्याच्या घरात राहिलो त्या दरम्यान कोणाशी नव्याने मैत्री केली नाही की संवाद केला नाही कारण संवाद झाला तरच विसंवाद होतो. माझी ओळखही कोणाला कळू दिली नाही. आपल्या शेजारी चार वर्षे एक मोठा लेखक राहात होता हे आता पुढे मागे कधी तरी कळेल त्यांना ! आता स्वतःच्या मालकीच्या घरात राहायला गेल्यावर माझा आत्मा शांत झाला.

    विजयः मग आता कसं वाटतय झोपडीतून टॉवरमध्ये राहायला गेल्यावर

    रमेशः फार काही बदल झालाय असं मला वाटत नाही फक्त आमची आडवी चाळ आता उभी झालेय असं वाटतंय इतकच !

    विजयः आता बोललास एखाद्या लेखकासारखा आता तुझ्यातील लेखक बोलायला लागलाय वटत ! पण मी एका लेखकाला नाही मझ्या मित्राला भेटायला आलोय.

    रमेशः मी लेखक नंतर अगोदर तुझा मित्र आहे बरं ! बाकी वहीनी, आई आणि तुझी पोरं कशी आहेत ?

    विजयः सगळे मजेत आहेत. आई सध्या गावी आहे अधून – मधून येते मुंबईला... बाबा गेल्यापासून ती जास्त गावालाच असते. तिथल्या वातावरणात तिची तब्बेत बरी असते. बरं तू लग्न कधी करतोयस ? आई विचारत होती ? तुझ्या लग्नाची तिलाही फार काळजी आहे.

    रमेशः उगाच लग्न करून देशाच्या लोकसंख्येत भर घालण्याचा माझा विचार नाही बर !

    विजयः लोकसंख्या नको वाढवू पण लग्न तर कर...

    रमेशः लोक लग्न का करतात ? आपला वंश पुढे वाढावा म्ह्णून ! मला नाही वाटत की आपला वंश पुढे वाढता आणि आपलं असं कोणत सालं राजा महाराज्यांच घराण आहे.

    विजयः ते ठिक आहे पण आयुष्यभर एकटा राहाणार आहेस का ? म्हातारपणी कोणी साबतीला कोणी नको का ?

    रमेशः म्हातारपण कोणी पाहीलय आणि जिच्याशी मी लग्न करेन ती मला अर्धवट सोडून जाणारच नाही याची खात्री कोण कोण देणार आहे का ?

    विजयः बरं बाबा तू लग्नच करू नकोस ब्रम्हचारी रहा, सन्यास घे आणि एका मटाची स्थापना कर म्ह्णजे निदान आंम्ही आमच्या म्हातारपणी हरी- हरी करायला त्या मटात येऊ.

    रमेशः ब्रम्हचारी मी आहेच आणि आता सन्याशीही झालोय आणि आपला समाज हाच माझा मट आहे या समाजातच राहून मला समाजासाठी कार्य करायचयं...

    विजयः आपण शाळेत असताना कोणाला स्वप्नातही वाटल नव्हतं की एक दिवस तू इतका मोठा लेखक होशील.

    रमेशः मला तरी कोठे वाटलं होत पण मला वाटत माझा जन्मच लेखक होण्यासाठी झाला असावा.

    विजयः तुला असं का वाटतं ?

    रमेशः लहानपणापासून माझी एक मैत्रीण होती मनिषा नावाची. तिच्या आईची मी तिच्याशी लग्न करावं अशी खूप इच्छा होती. एक दिवस तिने मला विचारल तुला मोठा होऊन कोण व्हायचयं ? तेंव्हा माझ्या तोंडून अगदी सहज निघून गेल लेखक ! तिच्या आईला ते माझं दिवाळस्वप्न वाटल. मनिषा वयात आल्यावर तिच्या आईने मला तिच्याशी लग्न करतो का म्ह्णून विचारणा केली. मी स्पष्ट नकार दिला. माझ्या आयुष्यात मी एखाद्या मुलीला दिलेला तो पहिला आणि शेवटचा स्पष्ट नकार होता. तो नकार देऊन मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा गाढवपणा केला की काय असं आता मला वाटू लागलंय. नव्हे तोच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा गाढवपणा होता.

    विजयः अरे ! पण तू नकार का दिलास ? नकार देऊ नाहीतर काय करू ? आमच्या आई-बाबाने आंम्हाला फक्त जन्मच दिला होता आणखी काय दिल होत घंटा ? मला माझ्या भावंडाची काळजी वाटत होती. मला त्यांच भविष्य सुरक्षित करायचं होतं पण आज त्यांच भविष्य सुरक्षित झालयं पण माझं भविष्य मात्र असुरक्षित झालयं !

    विजयः ते कस काय ?

    रमेशः शाळेत असताना मी किती हुशार होतो तुला माहीतच आहे. मी डॉक्टर, इंजिनिअर, वकील काहीही होऊ शकलो असतो पण बारावी झाल्यावर शिक्षण सोडून मला नोकरी करावी लागली. काबाड कष्ट करून मी माझ्या बापाचं घर सावरलं आमच्या घराला गरीबीतून श्रीमंतीत आणण्यासाठी माझी वीस वर्षे खर्च झाली. या वीस वर्षात माझं स्वतःच भविष्य सुरक्षित करण्यासाठी मला स्वतःहून चालत आलेल्या सर्व संध्या मी गमावून बसलो होतो... तुला खरं सांगू माझा नात्यांवरचा आणि प्रेमावरचाही विश्वास आता आणि लग्नाच्या बाबतीत सांगायच तर माझ्या आयुष्यात इतक्या स्त्रिया येऊन गेल्या गेल्यात की मला आता खात्रीच वाटत नाही की त्यांच्या तोडीची एखादी स्त्री आता मला पत्नी म्ह्णून लाभेल...

    विजयः बरं कविताच काय ? कधी भेटली होती का ?

    रमेशः चार वर्षापूर्वी तिच लग्न झाल्याचं ऐकल होत त्यानंतर काही पत्ता नाही. कदाचित आता एखाद्या मुलाची आईही झाली असेल...बरं झालं बिचारीच आयुष्य मार्गी लागल एका मुलीचे उशिरापर्यंत कोणत्याही कारणाने लग्न न केल्यास तिला सहन न होणारा मानसिक त्रास मला कळू शकतो.

    विजयः तुझी आणि तिची काय भानगड होती ?

    रमेशः भानगड अशी नाही पण खरं सांगतो अगदी तीसरीत असल्यापासून ती मला आवडायची पण मला तिचा धडाडी स्वभाव, त्याची मात्र भिती वाटायची. माझं तिच्यावर प्रेम होतं पण ते शारीरिक आकर्षणातून निर्माण झालेल नव्हत. तिच जर माझ्यावर प्रेम असत आणि तिने जर मला माझ्याशी लग्न करतोस का ? अस विचारल असत तर मी नक्की तिच्याशी लग्न केल असत. आजही माझ्या मनात तिच्याबद्दल तेच प्रेम आणि तोच आदर आहे जो काल होता. माझ्या हृद्यातील तिची जागा कोणी कधीच घेऊ शकणार नाही कारण ती माझं पहील प्रेम होती.

    विजयः मग तुझ्या कथेतील बाकी नायिका वास्तविक होत्या की त्या फक्त कल्पनेतून जन्माला आल्या होत्या ?

    रमेशः माझ्या कथेतील एकही नायिका कल्पनेतून जन्माला आलेली नाही. प्रत्येक नायिका वास्तवात होती फक्त प्रत्येक वेळी तिचा वास्तवातीला नायक मी होतोच असे नाही.

    विजयः मी तुला कधी बोललो नाही पण मला वाटत माझ्या मावस बहिण ज्योती तिच्यासोबतही तुझ काहीहीतरी चालू आहे अशी शंका मला आली होती ? मला आवडल असतं तुला माझा भावोजी करून घ्यायला, पण आता तिच लग्न होऊन ती ही तीन पोरांची आई झाली...आजही तुझी आठवण काढते कधी – कधी तिच्याही मनात तुझ्याबद्दल आजही ओलावा आहे असं जाणवत मला का कोणास जाणे.

    रमेशः गालात गोड ह्सत... विजय मला माहीत होत की ज्योतीच माझ्यावर प्रेम आहे, आमच्या प्रेमाला तुझा विरोध हाणार नाही हेही मला माहीत होत, आमच्या घरातील सर्वांना ती आवडतही होती, पण तिच अल्पशिक्षीत असणं ही सगळ्यात मोठी अडचण होती. तिच्याशी लग्न करून मला स्वतःवर आणि तिच्यावरही अन्याय करायचा नव्हता. माझा मित्र या नात्याने तू मला संगितल असतस तर मी तिच्याशी लग्न करायला तयारही झालो असतो पण तू आपल्या मैत्रीला जागलास या जगात माझा एकच मित्र आहे आणि तो तू आहेस म्ह्णूनच आज पाच वर्षानंतर भेटूनही आपल्या नात्यात काहीही फरक पडलेला नाही.

    विजयः मलाही वाटत होत की तुझ कोणातरी अती सुंदर आणि हुशार मुलीशी लग्न व्हावं प्रतिभासारख्या...

    रमेशः प्रतिभा... ती ही झाली आता दोन पोरांची आई. तिच्यावरही माझं प्रेम होत आणि मी ही तिला आवडायला लागलो होतो पण कधी ? जेंव्हा वर्तमानपत्रात माझे फोटो छापून यायला लागले होते तेंव्हा ! माझ्या प्रसिध्दीवर प्रेम करणारी स्त्री मला माझ्या आयुष्यात नको होती त्यामुळेच प्रसिध्दी माझ्या वाट्याला आल्यावर मी फारसा कोणा स्त्रीच्या भानगडीत पडलो नाही की कोणाच्या प्रेमात पडलो नाही आणि गुंतलो तर नाहीच. शाळेत असताना प्रतिभासाठी मी काय काय केल तुला काय सांगू...

    विजयः सांग ना तिच्याबद्द्ल तू मला फारस कधीच काही सांगितला नाहीस.

    रमेशः सांगतो ऐक ! ती आमच्या बाजूच्या सोसायटीत राहायची तिच्या घरासमोरून एक रस्ता जंगलात जायचा तो रस्ता जिथे संपायचा तिथे एक ओढा होता. फक्त तिला पाहता याव म्ह्णून पावसाळ्यात चार महिने मी त्या ओढ्यावर आंघोळ करायला जायचो आणि कधी- कधी कोणाला शंका येऊ नये म्हणून घरातील चादरी कपडे धुवायलाही घेऊन जायचो. म्ह्णजे तिच्यासाठी मी धोबीही झालो होतो. जाताना तिच्या घरात हमखास डोकावून पाहायचो ती दिसली की देवाच दर्शन झाल्यावर एखाद्या भक्ताला जितका आनंद होत असेल तितका आनंद मलाही व्हायचा. इतर महिन्यात ती दुपारी आमच्या सोसायटीतून विहीरीवर पाणी आणायला जायची मग मी आमच्या घरातील भरलेले हंडे रिकामे करून विहिरीवर पाणी आणायला जायचो ते नाहीच जमले तर वाटेत भर उन्हात एका बंद घराच्या उंबरट्यावर बसून तिला येता - जाताना पाहात बसायचो. ती खूप हुशार होती त्यामुळे तिला पटवायला आपली हुशारी पुरेशी आहे असं मला वाटत होत पण ते पुरेस नव्हत कारण ती इतर बर्‍याच कलेत पारंगत होती फक्त चित्रकला आणि हस्तकला सोडली तर त्यात आमचा कोणी हात धरू शकत नव्हता. माझ्या चित्रांच्या प्रेमात पडणार्‍या बर्‍याच मुली होत्या तेंव्हा माझ्या आजु -बाजुला पण प्रतिभा त्यात नव्हती दुदैवाने. त्यामुळे तिला पटविण्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळे करायला हवे असा विचार माझ्या मनात आला. त्यामुळे मी तिच्यासाठी एक प्रेमपत्र लिहलं ते सामन्य प्रेमपत्र नसावं म्ह्णून मी त्यात तिच्यावर एक कविता लिहण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या आयुष्यातील पहिली कविता लिहली. माझ्यातील कविला तिनेच जन्म दिला. ते पत्र तिला देण्याची काही मला हिंमत झाली नाही कारण मला वाटलं ती तिच्या आयुष्यात फार मोठी होईल इतकी मोठी की तिच्या अस्तित्वाची जगही दखल घेईल. पण तसं काहीच झालं नाही तिनेही एका सर्वसामान्य स्त्रीचाच मार्ग स्वीकारला आणि मी प्रसिध्दीचा अवघड मार्ग स्वीकारला. एका क्षणाला मी तिला जेथे पाहात होतो तिथे मीच उभा होतो आणि माझ्याजागी ती.

    विजयः खरं सांग रमेश तुझ्या आयुष्यात आतापर्यंत किती स्त्रिया आल्या ?

    रमेशः वीस – पंचवीस असतील...नक्की आकडा नाही सांगता येणार...

    विजयः त्यातील एकीनेही तुला माझ्याशी लग्न करशील का म्ह्णून विचरणा केली नाही का ?

    रमेशः नाही ना ! मला त्याच नेहमीच सर्वात जास्त आश्चर्य वाटत राहत. आजही अविवाहीत विवाहीत स्त्रिया माझ्याशी बोलायला उत्सूक असतात पण मला वाटत त्या माझ्यावर प्रेम करत नाहीत तर माझा आदर करतात.

    विजयः म्ह्णजे तू लग्न का करत नाहीस याच समाधानकारक उत्तर तुझ्याकडे आजही नाही बरोबर ?

    रमेशः हो !

    विजयः आता जर तुझ्या आयुष्यात एखादी स्त्री आली आणि ती म्ह्णाली, ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचयं तर तू काय करशिल ?

    रमेशः शक्यतो असं होणार नाही पण जर झालंच तर मी तो माझ्या नियतीचा कौल म्ह्णून मान्य करेन.

    विजयः बरे ते जाऊदे ! मला सांग मगाशी तू म्ह्णालास की तुझं भविष्य सुरक्षित नाही ते कसं काय ?

    रमेशः तुला माहीत आहे मी सोळाव्या वर्षापासून नोकरी करत होतो. दहा वर्षे मी सलग नोकरी केली तेंव्हा येणारा सगळा पैसा मी माझ्या कुटुंबावर खर्च केला तेंव्हा मी स्वतःचा असा स्वतंत्र विचारच केला नाही. त्यानंतर मी माझा छंद जोपासावा म्ह्णून मी लिखाण करू लागलो त्यातूनही काही आर्थिक फायदा तर होत नव्हता उलट तोटाच होत होता त्यामुळे मागील सात-आट वर्षात काही बचत करने मला काही जमले नाही. आता आमच्या कुटुंबातील सारेच कमवते झाले आहेत त्यामुळे माझे उत्पन्न हे त्यांच्या नजरेत अत्यल्प झाले आहे. त्यामुळे माझा लिखाण करणे हा आता सर्वांनाच रिकामटेकडेपणाचा उद्योग वाटू लागला आहे. माझ्या बाबांनी तर चक्क माझ्यातील लेखकाची तुलना बेवड्याशी केली. ते मला म्ह्णाले बेवडापण घर – संसार, बायका - पोर सांभालून बेवडा पितो. ज्यांच्यासाठी मी माझ्या आयुष्यातील मला सर्वात मोल्यवान गोष्टींचा त्याग केला त्या माझ्या कुटुंबातील एकालाही माझ्यातील लेखक समजून घ्यावासा वाटला नाही याचा मला सर्वाधिक राग आला आणि मी आता स्वतःशिच विचार केला माझ्या घरातील माणसच जर मला माझ्यातील लेखकाला समजून घेऊ शकत नसतील तर परक्या घरातून आलेली ती काय मला घंटा समजून घेणार ?

    विजयः याचा अर्थ असा होतो की लग्नाच्या दिशेने जाणारा तुझा मार्ग अधिक खडतर झालेला आहे.

    रमेशः हो ! हे खरं आहे. आई मुलांना फक्त जन्म देते कर्म देत नाही. विजय तुला सांगतो लग्नाच्या बाबतीत माझं नशिब बदलण्याचा अनेकांनी प्रयत्न केला पण त्यातील एकालाही यश आलं नाही उलट जो माझ्या लग्नाच्या भानगडीत पडला तो माझ्यापासून दुरावला. काहीतरी माझ्यात आहे ज्यामुळे स्त्रिया माझ्याकडे आकर्षित होतात पण माझ्या प्रेमात पडत नाहीत त्यांना माझा सहवास हवा असतो पण त्यांना माझं होऊनही राहायचं नसत. त्यांना आयुष्यभर माझ्याशी मैत्रीच नात असावं असं वाटत असतं कदाचित हाच मला कोणाकडून तरी मिळालेला शाप असावा.

    विजयः तू लग्न केल नाहीस याचा तुला काही त्रास होतो का ?

    रमेशः त्रास ! कसला त्रास अजिबात नाही उलट मी लग्न केलं तर मला त्रास होईल अशी भिती मला सतत वाटत असते. लग्नाच नुसता विषय जरी निघाला तरी माझे मन बेचैन होते. जिच्याशी मी लग्न करावं अशी स्त्री माझ्या आयुष्यात अजून आलेलीच नाही असं मला माझं मन सतत सांगत असत. माझ्या लग्न न करण्याचा मला काहीच त्रास नाही उलट मी आनंदी आहे पण माझ्या नातलगांना आणि समाजातील इतर लोकांना उगाच वाटत राहत की माझं लग्न व्हावं. आज माझ्या लग्नाच्या बाबतीत आमच्या घरातील लोक आज जात – धर्म कशाशीही तडजोड करायला तयार आहेत कारण माझं लग्न हा आता त्यांच्या गळ्यातीला फास झाला आहे म्ह्णून ! ही तयारी जर त्यांनी दहा वर्षापूर्वी दाखवली असती तर आज चित्र वेगळ असतं. मी एक संसारी माणूस असतो जगातील सारी सुखे माझ्या पायाशी लोळ्ण घेत असती. माझ्याकडे बर्‍यापैकी लक्ष्मी असती पण सरस्वती नसती दुदैवाने...आणि मी लेखकही नसतो...

    विजयः तू काहीही म्हण पण आज तुझी जी काही परिस्थिती आहे त्याला तू स्वतः जबाबदार आहेस. ती तू कधीही बदलू शकला असतास मग का नाही बदलीस?

    रमेशः मला साध, सरळ आणि सोप्प जीवन जगायला आवडत नाही. सामान्य माणूस त्याच्या जीवनात जे काही करतो त्यापेक्षा वेगळ काहीतरी मला करायच असतं. सामान्य माणूस आयुष्यभर पैशाच्या मागे धावतो म्हणून मी धावलो नाही. सामान्य माणूस लग्न करून चार पोर काढण्यात धन्यता मानतो म्ह्णून मी मानत नाही. सामान्य माणूस इतरांनी त्यांच्याबाबतीत केलेल्या चुका माफ करतो पण मी करत नाही. सामान्य माणूस प्रसिध्दीसाठी झटत नाही पण मी झटतो. सामान्य माणूस समाजासाठी स्वतःला त्रास करून घेत नाही पण मी करून घेतो. सामन्य माणूस ज्या गोष्टींना मान्यता देऊ शकत नाही अशा बर्‍याच गोष्टींना मी मान्यता दिली आहे.

    विजयः रमेश तू असामान्य आहेस म्ह्णूनच समाजाने तुला जगू दिला आहे नाहीतर कधीच तुझा जीव घेतला असता.

    रमेशः हो ! बरोबर आहे, आपला समाज हा मुंगीच्या गतीने बदलतोय, आपल्या देशाने कितीही प्रगती केली तरी आपल्या देशातील विवाहसंस्था नष्ट होणार नाही फक्त तिच्या ओझ्याखाली दबणार्‍यांची संख्या मात्र वाढत जाईल. माझा विवाह संस्थेला विरोध नाही पण विवाह सर्वांसाठी नाही हे सत्य समाजानेही आता स्वीकारायला हवे. आपल्या देशातील कोणाचाही कोणाची चोकशी करताना चौकशीचा पहिला प्रश्न असतो, तुझं लग्न झाल का ? दुसरा – तुझं लग्न जमलयं का ? , तीसरा- लग्न कधी करणार ? , चौथा- कोणी भेटत नाही का ? पाचवा- लग्नासाठी तडजोड का करत नाही ? सहावा – काही समस्या आहे का ? सातवा- पटवून का लग्न करत नाही ? या प्रश्नांना काही अर्थ आहे का ? पण आपला सारा देश या प्रश्नाभोवती फिरतो वेड्यागत...

    विजयः आपल्या देशात तशीही पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची संख्या कमी होत चाललेय तुझ्यासारखा लग्न न करण्याचा विचार करणार्‍या पुरुषांची आपल्या देशाला आज खरंच खूप गरज आहे. नाहीतर आपल्या देशात पुन्हा महाभारत अवतरल्याशिवाय राहाणार नाही.

    रमेशः विजय ! तू जरी हे विनोदाने म्ह्णत असलास तरी माझ्या दृष्टीने ही आपल्या देशातील फार मोठी समस्या आहे. लग्नासाठी उतावले असणारे असंख्य पुरुष मी माझ्या आजुबाजुला पाहातोय म्ह्णूनच मुलगी वयात आली रे आली की कोणी ना कोणी तिच्यावर टपून बसलेला असतोच. आपल्या देशातील स्त्रियांची संख्या अशीच कमी होत रहिली तर आपला समाज असंतुलीत होईल आणि समाजस्वास्थ बिघडेल. पुरुषांची स्त्रियांचा आदर करणारी नाही तर स्त्री लंपट पिढी जन्माला येईल. आज काही अंशी सुरक्षित असणारी स्त्री अधिक असुरक्षित होईल तेंव्हा.

    विजयः मलाही दोन मुलगेच आहेत सूना आतापासूनच शोधायला हव्यात...

    रमेशः आपल्या मुलगे आहेत याचा अभिमान बाळगण्यापेक्षा ज्यांना मुली आहेत त्यांचा सन्मान केला त्यांना मान दिला तरी ही परिस्थिती बदलेल असं मला वाटतं.

    विजयः बरोबर आहे तुझं.

    रमेशः आज समाजात जो काही स्वैराचार बोकाळलाय तो मला आजिबात पसंत नाही. लग्नाचा तर आज नुसता बाजार मांडलाय, लग्नाचा धंदा सुरू झालाय. माझ्या एका उदयोगपतीच्या मुलाच लग्न चार वर्षे जुळ्त नाही चार वर्षात त्याला लग्नासाठी सुयोग्य वधू मिळाली नाही. हजारो रुपये खर्च करून कोणी ते काम त्याच्यासाठी करूही शकलेले नाही त्याच्या फार अटी नसतानाही. प्रत्येक मुलीला त्याच्याकडून वेगळी अपेक्षा असते, कोणाला तो पोस्ट ग्रॅज्युएट नाही हे खटकते, कोणाला त्यांची उंची, कोणाला त्याचे वजन, कोणाला त्याचे सोशल नसण, कोणाला त्याच सुंदर दिसण, कोणाला त्याच्या आईची जात, तर कोणाला त्याच्या बाबांची दोन लग्न खटकतात. त्याच्या आयुष्यातही बर्‍याच मुली येऊन गेल्या होत्या त्यांना नाकारल्याचा आता त्याला पश्चाताप होत आहे. माझ्यात आणि त्याच्यात एकच फरक आहे तो म्ह्णजे तो लग्नासाठी उतावला झालेला आहे आणि मी नाही. त्याचे बाबा इतके मोठे उद्योगपती पण त्याच्यासाठी त्याच्या लग्नासाठी कोणतीही तडजोड करायला तयार झाले आहेत कारण त्यांना आपल्या मुलाच लग्न करून लोकांची तोंडे बंद करायची आहेत. हे बाप बेटे ऐरवी वाघासारखं जीवन जगतात पण लग्नाचा विषय म्हटला की दोघांचीही बकरी होते. आपल्या देशात झोपायला आणि प्रेम करायला जात - धर्म कोणालाही आडवा येत नाही फक्त लग्न करताना तो आडवा येतो. पत्रिका आडव्या येतात. इतर अनेक गोष्टी आडव्या आणल्या जातात...

    विजयः आता जर तू लग्न करण्याचा निर्णय घेतलासच तर तुला कशी स्‍त्री पत्नी म्ह्णून अपेक्षित आहे ?

    रमेशः फार काही नाही, तिला वाचनाची आवड असावी, सामाजिक जाण असावी, सर्वात महत्वाचे ती स्वार्थी नसावी, सारासार विचार करणारी असावी, संसारात फार रमणारी नसावी, स्पष्टच सांगायच तर ती सामान्य स्त्री नसावी. तिची स्वतःची अशी वेगळी ओळख असावी, ती माझ्यावर अवलंबून नसावी, एक स्वतंत्र व्यक्ती म्ह्णून सर्वार्थाने जगण्यास ती लायक असावी.

    विजयः रमेश तुला खरोखरच स्वप्नातील परी हवी आहे. पण तरीही एक मित्र म्ह्णून तुला तुझ्या स्वप्नातील परी या आयुष्यात मिलो अशी मी देवाकडे प्रार्थना करेन. पण मित्रा आता तिच्याबाबतीत तडजोड मात्र करू नकोस मला ते आवडणार नाही.

    रमेशः तडजोडच जर करायची असती ना विजय ! तर कधीच केली असती आता ह्त्ती आत गेलाय फक्त शेपूट बाकी आहे.

    विजयः बाकी आता नवीन काय करण्याचा विचार आहे ?

    रमेशः विजय तुला म्ह्णून सांगतो, आता काही काळ लिखाण बंद करून व्यावसायात लक्ष घालण्याचा मी निर्णय घेतलेला आहे कारण भरल्यापोटीच प्रवचन देणे आणि ऐकणे शक्य असते, पोट भरण्यासाठी पैसा लागतो तो मी मिळवला बर्‍यापैकी पण मी साठवला नाही आता मला तो साठवायचा आहे. समाजात दुदैवाने तू समाजासाठी किती त्याग केला आहेस यावरून तुझी किंमत हल्ली ठरत नाही. तुला मान मिळण्यासाठी तुझ्याकडे किती पैसा आहे हे महत्वाची भुमिका बजावत. फक्त पैशाच्या जोरावर किती अक्क्ल शून्य लोक मोठे लेखक म्ह्णून मिरवत असतात समाजात. मी लेखक म्ह्णून स्वतःला सिध्द केले आहे पण आता मला माझा मान हवाय आणि इतरांनाही त्यांचा मान मला मिळवून द्यायचा आहे.

    विजयः याबाबतीत माझी काही मदत लागली तर मला सांग मी नक्की करेन.

    रमेशः ती तू करशीलच याची मला खात्री आहे.

    विजयः पण पैशाच्या मागे इतकाही धावू नकोस की त्या पैशाच्या ओझ्याखाली तुझ्यातील लेखक दबला जाईल.

    रमेशः तस काहीही होणार नाही. माझ्यातील लेखकाला कोणीही विकत घेऊ शकणार नाही.

    विजयः माझ्य शुभेच्छा आहेत तुझ्या पूढील वाटचालीसाठी...

    रमेशः धन्यवाद ( विजयचा हात हातात घेत )

    ( विजयजागेवरून उटतो तो उटल्यावर रमेशही उटतो दोघ पुन्हा एकमेकांना प्रेमाने अलिंगन देतात.)

    विजयः आता पुन्हा भेटू तेंव्हा कदाचित एक उद्योगपती म्ह्णून तुझी एक नवीन ओळख निर्माण झालेली असेल...चल निघूया....

    ( दोघे जायला निघतात... मगापासून रमेशकडे चोरून पाहणारी मुलगी त्यांच्या दिशेने येते आणि त्याला म्ह्णते सर...एक सेल्फी प्लीज )

    -- निलेश बामणे

    202, ओमकार टॉवर, बी – विंग, गणेश मंदिरा जवळ, श्रीकृष्ण नगर, संतोष नगर,
    जन.ए.के.वैद्य मार्ग, गोरेगांव ( पूर्व ), मुंबई – 400 065.
    मो. 8652065375 / 8692923310
    Email- nileshbamne@yahoo.com
    nileshbamne10@gmail.com

  • लतावर न लिहिलेला लेख

    "लताचा 87 वा वाढदिवस येतोय , काहीतरी लिहिलं पाहिजे " असं परवा एका मित्राला म्हटलं तेव्हा तो माझ्यावर भडकलाच !
    " त्या कुठे ? तू कुठे ? ( तुझी पात्रता काय ?) आणि तू त्यांना सरळ एकेरीत संबोधन करतोस ? निदान वयाचा तरी विचार ? "

    मी त्याला म्हटलं , ' हे बघ, आपण दोघेही कोल्हापूरात राहतो ! तू कधी म्हणतोस का, 'आदरणीय श्री अंबाबाई यांच्या देवळात चाललोय ' ?
    आपण म्हणतो " अंबाबाईला चाललोय " किंवा ' आत्ताच मारूतीला जाऊन आलो !'
    ' उद्या आमच्याकडे गणपती साहेब येणार आहेत असं म्हणायची आवश्यकता नाही , आपल्या सगळ्या दैवतांना आपण एकेरीत संबोधतो '
    लताही दैवतासमानच !
    खरं म्हणजे असल्या दैवतीकरणाचा मला मनस्वी राग आहे . पण हिच्या गाण्यापुढे सगळे अभिनिवेष अगदी गळून पडतात .

    मध्यंतरी एक मित्र म्हणाला , 'लताला भारतरत्न देणं चुकीचं आहे , तिने आपल्या संगीतात थेट नवीन भर काय घातली ? जे संगीतकारांनी सांगितलं ते तिनं म्हटलं , तिनं काय कुमारजींसारखे नवे राग निर्माण केले काय ? '

    मग मी त्याला ' संगीतकारांचे भीष्माचार्य ' - अनिल विश्वास यांच्या एका उद्गाराची आठवण करून दिली -
    " लता आली आणि आम्हा संगीतकारांना 'देवदूत' आल्याचा आनंद झाला , ती यायच्या आधी गायकाच्या गळ्याला झेपेल अशीच चाल तयार करायला लागायची . पण ती आली आणि सगळी बंधनं नाहीशी झाली " .
    म्हणजे अनेक संगीतकारांची प्रतिभा मुक्त विहार करू शकेल असं आभाळ - असा अवकाश - लताच्या गाण्यानं उपलब्ध झाला , हे तिचं केवढं मोठं योगदान आहे ?
    मग मात्र तो निरुत्तर झाला .

    एकदा अशीच चर्चा चालली होती - लता आणि आशा यांच्या स्वभावातल्या फरकाबद्दल .. आशाला सगळ्याची हौस ... लता मात्र सदैव पांढ-या सुती ( की सुतकी ) साडीत ! एक जण म्हणाला ' या बाईंनी लग्न पण केलं नाही ... संसार नाही इ. इ.
    तेव्हा माझे एक ज्येष्ठ सहकारी म्हणाले, "अहो, लतानं 1956 सालीच एका गाण्यातून आपल्याला सांगून ठेवलंय - 'मेरा छोटासा देखो ये संसार है, मेरा जीवन है ये, मेरा सिंगार है' - संगीत हाच तिचा 'संसार' , सात स्वर हेच तिचं जग, संगीतातले यच्चयावत अलंकार हेच तिचे दागिने ' , उगीच लौकिक फूटपट्ट्या कशाला लावता ? '

    ' नास्तिक व्यक्तीला देखील आस्तिक बनवण्याची ताकद तिच्या गाण्यात आहे . आपले पाडगावकर तसे निरीश्वरवादीच ! पण तेही म्हणाले ,
    ' एेकता गायकांना
    वानितो मी त्यांच्या स्वरांना
    एेकता गाणे 'लताचे'
    मानितो मी इश्वराला '

    लेख लिहायला म्हणून बसलो आणि लताच्या गाण्यांच्या अथांग सागराकडे एक कटाक्ष टाकला . त्याचा तो प्रचंड पसारा पाहून एकच गोष्ट पक्की समजली ,
    " लताचं प्रत्येक गाणं हे परीपूर्ण आहे पण तिच्या गाण्यावरचा प्रत्येक लेख हा अपूर्ण - अधुरा असाच असणार ! स्वतःची मर्यादा लक्षात आली आणि लेख लिहायचा विचार सोडून दिला ! लताच्या स्वरविश्वासमोर नतमस्तक होऊन शांत उभा राहिलो

    ( धनंजय कुरणे 9325290079)

    28.9.2016

  • मातीवर मातीच

    निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हे एकदा असेच रानावनातून चालत जात असताना, पुढे चालात असलेल्या ज्ञानेश्वरांच्या पायाशी त्यांना एक सोन्याची अंगठी दिसते. संन्यस्त असल्याने, सोन्याचा मोह आपल्या अजून "लहान" असलेल्या बहीणीला होवू नये म्हणून ज्ञानदेवांनी त्या अंगठीवर अगदी सहजपणे पायाने माती घातली आणि पुढे चालत गेले.

    मागून येत असलेया लहानशा मुक्ताला संशय आला आणि तीने ते काय आहे ते माती बाजूला सारून पाहीले. तीला कळले की ज्ञानेश्वराचा आपल्यावर विश्वासा नाही.

    ती शांतपणे म्हणाली की "ज्ञानदेवा, संन्याशाला सोने आणि माती समान असताना, तू या कृतीतून "मातीवर मातीच" नाही का टाकलीस? का सोन्यात आणि मातीत तुला फरक करता येत नाही?".

    -- दीपक गायकवाड

  • आठ आण्यातलं लग्न

    महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे निवर्तल्याला १२ जून रोजी अठरा वर्ष पूर्ण झाली. त्यांच्या लग्नाची ही कथा