( ही कविता प्राणवायुला समर्पित !)
इथेच मारू बोंबा आणिक इथेच बांधू बांबू ।
जरा उसासून थांबू ,शोधू कलेवरांचे तंबू ।।
लाडेकोडे वाढवलेली इथेच तोडू झाडे ।
प्राणवायुचे नरडे दाबून इथेच घालू राडे ।।
इथे ओरपू पाणी आणिक तिथेच टाकू विष्ठा ।
जगण्यासाठी हवी कशाला विकून टाकू निष्ठा ।।
एक विषाणू श्वास संपवी मनीमानसी कैक ।
भयसूचक त्या घंटा नीचा आता तरी त्या ऐक ।।
मरणानंतर सरणासाठी उरली नाहीत झाडे ।
नरकयातना दिल्या तयांना कशी पेटतील हाडे ?
-- डॉ .श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी
९४२३८७५८०६
ही कविता नावासह सर्वत्र पाठवायलाच हवी !
May 3, 2021
जन्मापासूनी बघतो तुला,
परि जन्मापूर्वीच ओळखले,
रोप लावले बागेमध्ये,
फुल तयाने दिले ।।१।।
चमकत होती नभांत तेंव्हा,
एक चांदणी म्हणूनी,
दिवसाही मिळावा सहवास,
हीच आशा मनी ।।२।।
तीच चमकती गोरी कांती,
तसेच लुकलुकणे,
मध्येच बघते मिश्कीलतेने,
हासणे रडणे आणि फुलणे ।।३।।
चांदणीचा सहवास होता,
केवळ रात्रीसाठी,
दिवस उजाडतां निघून गेली,
आठवणी ठेवून पाठी ।।४।।
नको जाऊस जरी ही इच्छा,
परि जाशील सोडून दुजा घरी,
आठवणीसाठा देत जा मजला,
दिलासा तोच हे समाघान धरी ।।५।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
May 19, 2016
या ‘गटारी’च्या सुमुहूर्तीं, चला रे पीत बसूं
दाखवून चुस्तीफुर्ती, चला रे पीत वसूं
मंजूरच सार्या शर्ती, चला रे पीत बसूं
श्रेष्ठ फक्त इच्छापूर्ती, चला रे पीत बसूं ।।
ही मदिरा चिंताहर्ती, चला रे पीत बसूं
ती जीवन-रक्षणकर्ती, चला रे पीत बसूं
ती चिरहर्षाची मूर्ती, चला रे पीत बसूं
ती नित्य देतसे स्फूर्ती , चला रे पीत बसूं
ती जगाचीच उद्धर्ती, चला रे पीत बसूं ।।
ती सार्यांची संस्कर्ती, चला रे पीत बसूं
अमुच्या भाराची धर्ती, चला रे पीत बसूं
ती राज्ञी चक्रवर्ती, चला रे पीत बसूं
प्राशकात होउन भर्ती, चला रे पीत बसूं
नच पर्वा, ‘को जागर्ती’, चला रे पीत बसूं
पोचूं स्वर्गीं वा गर्तीं, चला रे पीत बसूं
वाढेलच अंतीं कीर्ती, चला रे पीत बसूं ।।
गटारी : ‘गटारी अमावस्ये’चा सण
चुस्ती : चापल्य, चपळपणा
फुर्ती : शीध्रता, घाई
शर्ती : अटी
उद्धर्ती : उद्धार करणारी
संस्कर्ती : संस्कार करणारी
भाराची धर्ती : भार उचलणारी / वाहणारी
राज्ञी : राणी
प्राशक : पिणारे
भर्ती : प्रविष्ट, सामील
‘को जागर्ति’ : ‘कोण जागें आहे ?’
गर्तीं : खड्ड्यात , पाताळात
- सुभाष स. नाईक
# मद्यगान - २
December 28, 2017
थांब विज्ञाना, नको लावूस शोध
नष्ट करुनी भावना, नको गमवू आनंद / धृ /
उंच मारुनी भरारी
पोहंचला चंद्रावरी
दाही दिशा संचारी
नष्ट केलास तू , चांदण्यातील आनंद १
थांब विज्ञाना, नको लावूस शोध
फुलांतील सुवास
फळांतील मधुर रस
पक्षांचा रम्य सहवास
नष्ट केलास तू, निसर्गातील सुगंध २
थांब विज्ञाना, नको लावूस शोध
नदीतील संथता
ओढ्यातील चपळता
धबधब्यातील प्रचंडता
रोखलास प्रवाह तू, घालूनी बांध ३
थांब विज्ञाना, नको लावूस शोध
शरिराची योजना
गुंतागुंतीची रचना
श्रेष्ठत्व दिले ज्ञाना
भावना व विचार यांचा, निर्माण केला वाद ४
थांब विज्ञाना, नको लावूस शोध
तुझ्या शोधांतील झेप
क्षणिक सुखाची झोप
परि करी निसर्गा ताप
नको करुं तूं, ईश्वरी दयेचा प्रवाह बंद ५
थांब विज्ञाना, नको लावूस शोध
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 10, 2014
विष्ठा बघूनी थुंकलो,
घाण वाटली मजला,
अमंगल संबोधूनी,
लाखोली देई तिजला ।।१।।
संतापूनी मजवर ,
कान उघडणी केली,
तुझ्याचमुळें मूर्खा मी,
अमंगळ ती ठरली।।२।।
आकर्षक रूप माझे,
लाडू करंज्यानें युक्त
कपाटातूनी काढूनी,
केले सारे तूंच फस्त ।।३।।
परि मिळतां तुझा तो,
अमंगळ सहवास,
रूप माझे पालटूनी,
मिळे हा नरकवास ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
November 23, 2020
अजुनही एकांतात
कधी तिला आठवते
कोवळ्या त्या मनाचे
सुंदर गोड स्वप्न ते...
त्याला पाहुन
तिचं मन झुरलं होतं
कळलं नव्हतं तिला
पण ह्रुदय हरवलं होतं
बसल्या बसल्या बोटानं
वहीत रेषा ओढत होती
स्वतःच्या नावापुढे
त्याच नाव जोडत होती
झुरलेल मन तिचं
शब्द शोधत होतं
भावनां व्यक्त करण्यास
बळ शोधत होतं
ओठांवरच्या शब्दांना
कंठ नाहीच फूटला
हळुहळू मोगऱ्याचा
तो बहरही ओसरला
अल्पायुषी भावना ती
अशी न झुरता मेली
रेंगाळलेल्या पावलांनी
बोहल्यावर ती चढली
दूर राहिलेल्या वाटेसाठी
मन नाही अडखळलं
वास्तवाच्या हिरवळीवर
अगदी आनंदान रमलं...
अजूनही एकांतात
कधी तिला आठवते
पडलेले गोड स्वप्न ते
हसुन झटकून टाकते.
- डॉ.सुभाष कटकदौंड
October 20, 2018
शेवट असावा असा. नुकताच दारात .
कवडसा आलेला जसा.
झरकन नाहिसा होतो तसा...
शेवट असावा असा पहाटे गवतावरचा दवबिंदू असतो जसा.
एका क्षणात नाहिसा होतो तसा..
शेवट असावा असा. आळवावरचा थेंब
असतो अगदी जसा.
मोती मोती म्हणेपर्यंत घरंगळून जातो तसा.
शेवट असावा असा. पावसाच्या रेशिम.
धाग्यासारखा. ओंजळीत न येताच
वाहून जातो तसा..
शेवट असावा असा. प्राजक्ता सारखा.
आपल्या नकळत टपकन.
पडून जातो तसा....
–सौ. कुमुद ढवळेकर.
August 24, 2022
सागराच्या अथांग कुशीत,
एक लाट रोज जन्म घेते,
धावत धावत किनाऱ्यापाशी,
आपले सारे स्वप्न सांगते.
किनारा मात्र शांत उभा,
वर्षानुवर्षे वाट पाहतो,
लाटांच्या त्या असंख्य कथा,
मनात अलगद साठवून ठेवतो.
कधी लाट हसते मोत्यासारखी,
कधी दुःखाने भरते डोळे,
किनारा तिच्या प्रत्येक स्पर्शात,
शोधत राहतो नवेच भोवरे.
भेट त्यांची क्षणभराची,
तरी कहाणी अनंताची,
लाट निघून जाते पुन्हा,
किनारा जपतो स्पर्श जुना.
संधिप्रकाशी रंग उधळता,
दोघेही गुपिते बोलत राहतात,
चंद्रकिरणांच्या साक्षीने,
अबोल प्रेम जपत राहतात.
वादळ आले, ऋतू बदलले,
काळाने किती खेळ मांडले,
तरी लाटेच्या प्रत्येक परतीत,
किनाऱ्याने प्रेमच सांभाळले.
असेच चालते प्रेम त्यांचे,
ना वचनांचे, ना शब्दांचे भार,
एक धावत येणारी लाट,
आणि एक वाट पाहणारा किनारा.
अनंत सागर, अनंत प्रतीक्षा,
अनंत स्पर्शांचा तो पसारा,
प्रेम म्हणजे कदाचित एवढेच
एक लाट...
आणि
एक किनारा...
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे
मो:- 9011841212
July 7, 2026
खिडकीमधूनी टिपत होतो
बाह्य जगाचे द्दष्य आगळे
लोभसवाणें चित्र बघण्या
आतूर होऊन गेले डोळे
नयन नव्हते बघत ते
बघत होतो मीच खरा
खिडकीसम नयनातूनी
द्दष्य उमटते आंत जरा
संगीताचे सूर निनादूनी
लहरी त्यांच्या उठताती
कर्णा मधल्या पडद्यायोगे
आनंद मजला देवून जाती
मालक असूनी मी देहाचा
इंद्रिये सारी असती सेवक
ती केवळ साधने असूनी
आंतील 'मीच' असे साधक
मालक असूनी ताबा नसणें
स्वच्छंदी बनवी सेवकाला
इंद्रिये ती गोंधळ घालती
जागृकता नसतां मनाला
सोडून द्यावी वृत्ति मनाची
अरोप करणें इंद्रियावरी
ती तर केवळ सेवक असूनी
मनाची इच्छा पूर्ण करी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
April 7, 2017
विपरित वागूनी मन, नाश करिते शरिराचा
वासनेतील तफावत, काळ बनतो इंद्रियाचा...१,
उदर भरले असताना, अन्नाला विरोधते पोट
परि अतृप्तता जिभेची, घालते आग्रहाचा घाट....२,
मद्य सेवन करीता, झिंग ती येवून जाते
मेंदूतील चेतनेसाठीं, यकृत बिघडूनी जाते...३,
नाच गाणे देत असते, सूख नयनां - कर्णाला
शरिर वंचित होते, मिळणाऱ्या त्या विश्रांतीला....४
एक इंद्रियाची वासना, असती पूरक दुजाला
साध्य करण्यासाठीं हेच, जागृत ठेवावे मनाला...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 8, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti